Saturday, November 29, 2014

भूईमुग गिळून गप्प बसावे का?



महसुलमंत्री झाल्यावर माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांची भाषा बदलली असल्याची टिका पहिल्याच महिन्यात सुरू झाली आहे. त्यातूनच नव्या सरकारची प्रतिष्ठा व प्रतिमा कशी असेल, त्याचा अंदाज येऊ शकतो. पण त्याहीपेक्षा एक प्रतिक्रिया मनाला शिवून गेली. लागोपाठ खडसे यांची दोन वक्तव्ये लोकांना खटकली. त्याबद्दल एका सामान्य नागरीकाने सोशल मीडियात म्हटले आहे, की आधी खडसे अजितदादांची भाषा बोलायचे, आता त्यांनी शरद पवारांची भाषा उचलली आहे. असे काय म्हणाले खडसे? विरोधी नेता असताना दुष्काळात गांजलेल्या शेतकर्‍यांना आधीच्या सरकारने दिलासा दयावा, म्हणून हेच खडसे विजबिले माफ़ करण्याचा आग्रह धरायचे. तशा मागण्या आवाज चढवून करायचे. पण स्वत:च सरकारमध्ये आल्यावर मात्र त्यांना दुष्काळात गांजलेल्या शेतकर्‍याचा खिशात खुळखुळणारा पैसा दिसू लागला आहे. मोबाईल वापरून त्याची बिले वेळच्यावेळी भरणार्‍यांना, विज बिले भरायला पैसे कशाला नसतात? मोबाईल कनेक्शन तोडले जाईल म्हणून ते बिल वेळीच भरता. मग विजेची बिले का नाही भरणार, असा सवाल खडसे यांनी केला. मग प्रश्न असा, की जेव्हा खडसे विरोधी नेता होते, तेव्हा तोच दुष्काळी शेतकरी मोबाईल फ़ोन वापरत नव्हता, की तेव्हा मोबाईलचे बिलच त्याला येत नव्हते? तेव्हा देशात व खेड्यापाड्यात मोबाईलच आलेले नव्हते, असे खडसे यांना म्हणायचे आहे काय? गेल्या महिनाभरात देशात मोबाईल खेडोपाडी पोहोचले, असे खडसे यांना वाटते, की आता अच्छे दिन आलेले असल्याने दुष्काळातही शेतकरी सुखवस्तू असतो, असा त्यांचा दावा आहे? नेमके काय बदलले आहे? विरोधी पक्षातून सत्तेत जाणे, असा बदल खडसे यांच्यापुरता झालेला आहे. बाकी सामान्य वा दुष्काळी शेतकर्‍याच्या बाबतीत कुठलाच फ़रक पडलेला नाही. म्हणून बदल झाला आहे, तो सत्तेमुळे खडसे यांच्या भाषेत.

पण ही भाषा शरद पवारांची म्हणजे काय? असे काय बोलले नाथाभाऊ? त्यांनी शेतकर्‍याच्या बाबतीत असे उदगार काढल्याने कल्लोळ झाल्यावर विविध लोकांकडून प्रतिक्रिया आल्या. त्यातच मग दुष्काळाची पहाणी करायला गेलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही कोणीतरी प्रतिक्रिया घेतली. त्यांनीही नेमक्या खडसेंच्या विरोधाभासी भूमिकेला व भाषेला आक्षेप घेतला. उद्धव इतकेच म्हणाले, की सत्तेत बदल झाला आहे, त्याची जनतेला जाणिव होईल असे बोलावे. त्यात खटकण्यासारखे होतेच काय? आधीच्या सरकारवरचा राग म्हणुन लोकांनी सत्तेत बदल घडवून आणला आहे. तेव्हा निदान अल्पावधीत कुठला व्यवहारी बदल झाला नाही, तरी भाषा बदलावी, ही अपेक्षा काय मोठी आहे? काम झाले नाही तरी चालेल. पण लोकांना नुसत्या गोड शब्दांनीही जिंकता येत असते. तसे नसते तर गेल्या लोकसभा प्रचारात उत्तम भाषणावर मोदींना इतका मोठा विजय मिळालाच नसता. त्यांच्या जागी नाथाभाऊंना भाजपाने प्रचाराला जुंपले असते, तर सोनिया गांधींच्या कॉग्रेसला मोठे यश मिळू शकले असते. कारण कॉग्रेसचे नेते किंवा राहुल गांधी ज्या उर्मटपणाने बोलत होते, त्यामुळे पडणारा खड्डा त्यांना नाथाभाऊंनी भरून दिला असता. उद्धव ठाकरे यांनी कुठलेही राजकारण आपल्या प्रतिक्रियेत आणलेले नाही. त्यांनी भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाला दोष दिला नाही, की दुष्काळाला आजचे सरकार जबाबदार असल्याचे कुठे म्हटले नाही. मग नाथाभाऊंनी खडसावल्यासारखी भाषा कशाला बोलावी? तर त्यांचे म्हणणे आपण संवेदनाशील आहोत, म्हणूनच तडकाफ़डकी उत्तर देतो. एका वाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी वेगळाच खुलासा केला. आपण उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोललो, नाही तर एका वाहिनीच्या पत्रकाराने विपर्यास केला त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्धवनी ती अकारण आपल्या अंगाला लावून घेतली.

पहिली गोष्ट नाथाभाऊंची प्रतिक्रिया नवी नाही. भूईमुग जमिनीवर उगवतात की मातीच्या खाली, तेही ठाऊक नसणार्‍यांनी आपल्याला शिकवू नये असे काहीसे नाथाभाऊ बोलले. यात नवे काहीच नाही. तब्बल दोन दशकापुर्वी तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी अशी भाषा प्रथम वापरली होती. शिवसेनेचे नेतृत्व मुंबईतले व शहरी असल्याचे ठासून सांगताना पवारांनी तशी भाषा केली होती. ज्यांना बटाटे जमिनीवर पिकतात की जमिनीच्या खाली ते ठाऊक नाही, त्यांना शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवणे कसे जमेल, असा सवाल करीत तेव्हा पवार ठाकरे यांची खिल्ली उडवायचे. मग पंधरा वर्षांनी म्हणजे २००९ च्या विधानसभा निवडणूकीत पवारांचे शिष्य आबा पाटिल यांनी त्याच शिळ्या कढीला ऊत आणला होता. उद्धव ठाकरे यांनी प्रचारात आबांवर काही टिका केली, तेव्हा आबा चार बैलांचा नागर जुंपून शेतात उतरले होते. उद्धव ठाकरे यांनी कधी नांगर हाकला आहे काय? आपण दोन जोड्यांचा नांगर जोडतो, जरा नांगरून दाखवा, असे आव्हान आबांनी तेव्हा दिलेले होते. अशावेळी मग सवाल उपस्थित होतो, की नांगरकाम करण्यात हातखंडा असलेल्यांना गृहमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था हाती देणारा किती शहाणा असेल? कारण असा विचार करणारा गुंड गुन्हेगार कुठल्या जमिनीत उगवतो, त्याचाच विचार करत बसेल आणि गुन्हेगारी मात्र मोकाट होत जाईल. कारण असा विचार करणारा पोलिस कारवाई करण्यापेक्षा शेतात फ़वारणी केल्यासारखा बंदोबस्त करत राहिल. मुळात असे काही उफ़राटे बोलणेच गैरलागू असते. शेतीत काम केल्यानेच शेतीविषयक सगळे उमगत असते, तर शेतीशास्त्राचा विकास व संशोधन करणार्‍यांना मुर्खच म्हणायला हवे. कारण त्यातले बहुतांश संशोधक जन्माने वा व्यवसायाने शेतकरी नव्हते. मंगळावर अवकाशयान सोडणार्‍या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणार्‍या पंतप्रधान मोदींचे काय करायचे? त्यांना त्यातला कुठला अनुभव आहे?

थोडासा अधिकार हाती आला, मग माणसाला ताळतंत्र उरत नाही, त्यातून अशी भाषा सुरू होते आणि भरकटत जाते. कालपर्यंत नाथाभाऊ विरोधी बाकावर बसत होते आणि त्यांनीही आधीच्या सत्ताधार्‍यांवर कडाडून व कठोर भाषेत टिका केलेली आहे. तेव्हा त्यांनीही असेच प्रत्त्युतर द्यायला हवे होते काय? विरोधी नेता म्हणून आरोग्य सेवेविषयी नाथाभाऊंनी अनेक टिका केलेल्या होत्या. मग त्यावर तुम्ही कधी डॉक्टर होता, असा सवाल करायचा काय? किंवा कुणा डॉक्टराने इंजेक्शन म्हणजे काय असे विचारले, तर चालले असते काय? सत्तेत आल्यावर मुळातच सौम्य भाषा आवश्यक असते. आणि संवेदनशीलतेचा विषय असेल, तर संवेदना ही वागण्यातून व भाषेतून दिसायला हवी. सतत गरीब व दुष्काळ याविषयी आवाज उठवणार्‍याला सत्ता हाती आल्यावर कृतीतून संवेदना दाखवता आली पाहिजे. आपण होऊन अधिक सुविधा सवलती शेतकर्‍यांना देण्यातून ती संवेदना अधिक स्पष्ट झाली असती. उलट त्याच शेतकर्‍यावर बुडवेगिरीचा आरोप करण्याला संवेदना कसे म्हणता येईल? मोबाईलची बिले भरता आणि विजे्च्या थकबाकीत सवलत मागता, ही भाषा सामान्य शेतकर्‍यावर आरोप करणारी आहे. कारण त्यात पैसे असताना बुडवेगिरी करता असा गर्भित अर्थ निघतो. तिथे मग आधीच विरोधी नेता म्हणून खडसे बोलायचे ती भाषा खरी, की आजची उद्दाम सत्ताधारी भाषा खरी, असा सवाल उभा रहातो. संवेदनाशीलता ही आपल्यावरील आरोपपुरती असून चालत नाही. तिची अभिव्यक्ती इतरांच्याही बाबतीत दिसायला हवी. आपल्यावर आरोप झाल्यावर बोचतात, तर आपणही इतरांवर तसे आरोप करताना जपून शब्द वापरायला हवेत. नाथाभाऊंना त्याचे भान उरलेले नाही. आरोप झाले तर त्यांनी भूईमुग गिळून गप्प बसावे असे कोणी म्हणत नाही. परंतु सत्तेमुळे भाषा उर्मट झाली ,असेही लोकांना वाटू नये इतकी तरी काळजी घ्याल की नाही?

2 comments:

  1. खुर्चीचा माज

    ReplyDelete
  2. भाऊ,
    मला लक्षात आलेली एक गोष्ट सांगतो. खरेतर भुईमुग जमीनीखाली येतो की जमीनीवर हा प्रश्न विचारणेच चुक आहे. भुईमुग संपुर्ण झाडाला बोलले जाते. भुईमुगाच्या शेंगा ज्यात शेंगदाणे असतात ती जमीनीखाली येते तर झाड जमीनीवर असते. दोन्ही मिळून भूईमूग होतो. नाहीतर भूईमूगाच्या शेंगा कशाला म्हणाले असते. भूईमूग हा मूग नसून शेंगदाणे असतात.

    ReplyDelete