Monday, June 20, 2016

शिवसेनाप्रमुख नावाचे अढळपद१९८७ सालातली गोष्ट आहे. शिवसेनेने तेव्हा नव्याने महाराष्ट्रात घोडदौड सुरू केली होती. म्हणजे दोन दशके मुंबई ठाण्यापुरती असलेली शिवसेना खरोखरच महाराष्ट्रव्यापी पक्ष होण्यासाठी हातपाय हलवू लागली होती. पुण्यात किरकोळ निवडणूका लढवणार्‍या सेनेने पलिकडे औरंगाबाद या मराठवाड्याची राजधानी मानल्या जाणार्‍या शहरात पाय घट्ट रोवला होता. प्रथमच झालेल्या तिथल्या नव्या महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. तेव्हा ‘सामना’ सुरू झालेला नव्हता आणि ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सेनेचे मुखपत्र होते. त्याचा कार्यकारी संपादक म्हणून मी काम बघत होतो. औरंगाबादच्या पालिका निवडणूकीची यंत्रणा प्रामुख्याने मुंबईतील स्थानिय लोकाधिकार समितीने संभाळली होती. त्याचा म्होरक्या दिलीप म्हात्रे त्या यशानंतर ‘मार्मिक कार्यालयात आला आणि निवडणूकीचे किस्से सांगत होता. तिथे शिवसेनेला बहूमतासाठी दोन जागा कमी पडल्या होत्या. पण अपक्षांच्या मदतीने ती त्रुटी भरून काढणे सहजशक्य होते. पण निदान एक वर्ष तरी सेनेचा महापौर होऊ नये, असे तोच दिलीप म्हात्रे मला कळवळून सांगत होता. मी थक्क झालो. जो दिलीप स्टेट बॅन्केत अधिकारी म्हणून काम करताना सर्व पगारी रजा सेनेच्या अशा कामासाठी खर्च करीत होता, त्याला मिळालेल्या यशाचे कौतुक कमी आणि भविष्याची चिंता अधिक होती. इतक्या लौकर सेनेला सत्ता मिळाली, तर हे नवे तरूण अननुभवी नगरसेवक बिघडतील, ह्याची त्याला फ़िकीर होती. स्वत: सत्तेपासून अलिप्त रहाणारा दिलीप एकटाच असा शिवसैनिक नाही. खुद्द त्याला प्रेरीत करणारा शिवसेनाप्रमुखही तसाच अजब माणूस होता. जग त्याला बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखते.

त्याच दरम्यान म्हणजे १९८७-८८ या कालखंडात कुठल्यातरी विषयावरून संपादक बाळ ठाकरे व माझी एका राजकीय विषयावरून चर्चा झाली होती. त्यांनी काहीतरी वादग्रस्त विधान केल्यामुळे सर्वत्र कल्लोळ माजला होता. त्यांनी अशी विधाने केल्याने शिवसेनेची मते घटतात किंवा मतदाराच्या मनावर विपरीत परिणाम संभवतो, असा मुद्दा मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होतो. मी राजकारणाचा अभ्यासक असल्याने कुठलाही पक्ष कशामुळे मते मिळवतो वा गमावतो, ह्याच निकषावर विचार करतो आणि विश्लेषण करीत असतो. निवडणूकीत मते मिळवण्याच्या वा गमावण्याच्या निकषावरच बहुतेक राजकीय पक्ष व नेते जाहिर भूमिका घेत असतात. माझ्याही बोलण्याचा आशय तोच होता. माझा सगळा युक्तीवाद शांतपणे शिवसेनाप्रमुखही असलेल्या संपादक बाळासाहेबांनी ऐकून घेतला. मग मोजक्या शब्दात त्यांनी आपल्या वादग्रस्त विधानाचा खुलासा केला. ‘मते जातील, कमी होतील, हे खरेच आहे. पण ती माझी मते जात नाहीत. कारण मी उमेदवारच नाही. हे मनोहरपंत, सुधीरभाऊ, महाडिक, नवलकर उभे रहातात, त्यांची मते जातील. मी निवडणूक लढवत नाही. कारण शिवसेनाप्रमुख पदासाठी कधी निवडणूक होत नाही. मतांचे सोड, मी बोललो त्यात चुक काय ते सांग. बरोबर असेल तेच मी बोलतो. मग मते मिळोत की जावोत.’

या उत्तराने मला अवाक केले. निवडणूक लढवणार्‍या कुठल्याही पक्षाचा म्होरक्या असे बोलू शकत नाही. किंबहूना एक एक मत मिळवण्याच्या समिकरणावरच कुठल्याही पक्षाच्या भूमिका ठरत असतात किंवा बदलत असतात. बाळासाहेब त्याला अपवाद होते आणि तितकाच कसल्याही अपेक्षेशिवाय पक्षासाठी अखंड मेहनत करणारा दिलीप म्हात्रेसारखा त्यांनी गोळा केलेला शिवसैनिकही राजकारणातला अपवाद होता. असा नेता आणि त्याने जमवलेले असे सवंगडी कार्यकर्ते समजून घेता आले, तर शिवसेना समजू शकते. तिच्याविषयी उहापोह करता येऊ शकतो. प्रचलीत व प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते कार्यकर्त्यांच्या निकषावर शिवसेनेचे राजकीय विश्लेषण होऊ शकत नाही. पन्नास वर्षापुर्वी आपल्या रहात्या घरात बाळ ठाकरे नावाच्या व्यंगचित्रकाराने मराठी अस्मिता जपणार्‍या तरूणांचा एक सामाजिक गट स्थापन केला. तेव्हा त्याला राजकारणात काही करून दाखवण्याची महत्वाकांक्षा नव्हती, की समोर कुठला राजकीय आराखडा सज्ज नव्हता. परिस्थितीने त्या इच्छेला जसे वळण दिले, तशी शिवसेना घडत गेली आणि काळाच्या उदरातून उलगडत आलेल्या प्रत्येक वादळाला अंगावर घेण्याचे कौशल्य दाखवत एक नेता महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात दाखल झाला. त्याला आपण आज बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखतो. तो कुठल्याही निकषावर राजकीय नेता ठरत नाही, तरी राजकारण करत होता आणि स्पर्धात्मक राजकारणात राहूनही त्यातल्या स्पर्धेपासून संपुर्ण अलिप्त होता. म्हणूनच जे त्याच्याही तुलनेत मोठे दिग्गज मराठी नेते विसाव्या शतकाने बघितले, त्यांच्या पासंगालाही उतरू शकणार नसतानाही त्याच बाळासाहेबांनी महाराष्ट्रावर आपली कायमची छाप सोडली. आचार्य अत्रे, मधू लिमये, एसेम जोशी, कॉम्रेड डांगे, यशवंतराव चव्हाण यांच्या तुलनेत बाळासाहेबांना राजकीय नेताही म्हणता येत नाही, इतके ते अननुभवी होते.

उपरोक्त नेत्यांनी महाराष्ट्र हे भाषिक राज्य मिळवण्यापासून तिथे राजकारण खेळण्याची पराकाष्टा केली. त्यांचा राजकीय अभ्यास संघटना कौशल्य आणि चतुराई यात बाळासाहेब खुप मागे आहेत. पण सार्वजनिक जीवनात जनमानसावर जादू करण्याची किमया इतरांच्या तुलनेत त्यांना अधिक जमली. आपल्या इशार्‍यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खेळवण्याइतकी मजल बाळासाहेबांनी मारली, तरी कधीही कुठली निवडणूक लढवण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. कदाचित महात्मा गांधी सोडले तर सत्तापदापासून पुर्णपणे अलिप्त राहुन सत्तेलाही झुकवण्याची क्षमता राखलेला गांधींनंतरचा हा दुसरा भारतीय अपवाद म्हणता येईल. राज्यात वा देशात कुठल्याही पक्षाचे सरकार असो किंवा पुर्णपणे विरोधातला नेता सत्तेवर बसलेला असो, त्यालाही झुकवण्याची किमया या माणसाला कशामुळे साधली, हे कुणालाही न सुटलेले कोडे आहे. त्याचे उत्तर तितकेच सोपे आहे. ते उत्तर दिलीप म्हात्रेसारख्या हजारो शिवसैनिकांच्या अदृष्य़ इच्छाशक्तीमध्ये सामावलेले आहे. कुठल्याही पक्ष संघटनेत काम न केलेला हा माणूस, प्रतिभावंत व्यंगचित्रकार होता आणि त्याला परिस्थितीने राजकारणात ओढून आणले. ती जबाबदारी पार पाडताना त्याने आपल्यातला कलाकार कलंदर मरू दिला नाही. म्हणूनच कर्तव्यापलिकडे त्यांनी राजकारणाच्या आखाड्यात स्वत:ला बंदिस्त करून घेतले नाही. प्रत्येक सत्ताधारी पक्षाला वा सरकारला त्याचाच कायम धाक वाटत आला. सामान्य माणसाच्या मनातल्या भावना जाहिरपणे बोलण्याची हिंमत, ही बाळासाहेबांच्या राजकारणाची खरी शक्ती होती. कारण तितक्याच बेधडकपणे त्यांच्याच शब्दासाठी रस्त्यावर येणारा झुंजार तरूण त्यांनी आपल्या पाठीशी उभा केलेला होता. म्हणूनतर पाठीशी पन्नास आमदार असताना या माणसाचा जो धाक होता, तोच पाठीशी पन्नास नगरसेवक वा दोन आमदार नसतानाही होता.

मागल्या अर्धशतकात त्यांनी ४५ वर्षे महाराष्ट्र व प्रामुख्याने मुंबईवर आपली जी अनभिषिक्त हुकूमत गाजवली, ती राजकीय बळावर नव्हती. तर त्यांच्याशी निष्ठावान असलेल्या हजारो शिवसैनिकांची किमया होती. मग १९६० च्या दशकात दक्षिणेतील हिंदी चित्रपटांना मुंबई बंद करण्याचा विषय असो, रिडल्सवरून उठलेले वादळ असो, अयोध्येत शिवसैनिकांनी बाबरी पाडल्याचा आरोप असो वा त्यानंतरची दंगल असो. या माणसाने कधी बोललेला शब्द मागे घेतला नाही, की त्याच्या परिणामांना तो घाबरला नाही. म्हणूनच एका बाजूला इशारा देताच रस्त्यावर येणार्‍या तरूणांची फ़ौज ही त्यांची शक्ती होती, तशीच दुसरीकडे त्यांच्या जहाल भाषेत सत्य बोलण्याचे धाडस बघून भारावलेली कोट्यवधी जनता, याच देशातली होती. मुंबई महाराष्ट्र सोडाच देशाच्या सीमा ओलांडून बाळासाहेबांचा हा दबदबा उभा राहिला होता. काही वर्षापुर्वी पाकिस्तानी पत्रकारांचे पथक मुंबई भेटीला आले असताना त्यांनी अगत्याने बाळासाहेबांची विचारपूस केली होती. आजकाल ते फ़ारसे बोलत नाहीत. पण त्यांचा पाकिस्तानातही धाक असल्याचे त्या पथकाने बोलून दाखवले होते. पण ज्यांनी व्यक्तीगत पातळीवर बाळासाहेबांशी गप्पा वा चर्चा केल्या असतील, त्यांना अशा धाकाचा बागुलबुवा पटणारा नव्हता. कारण व्यक्तीगत पातळीवर हा साधासरळ माणूस होता आणि कुणाशीही मैत्रीपुर्ण गुजगोष्टी करून मैत्री जोपासणारा होता. प्रसंग व परिस्थिती त्याच्यातला नेता समोर आणायची आणि तेव्हा घेतलेले निर्णय किंवा बोललेले शब्द मागे घेण्याची राजकीय चतुराई त्यांना कधी दाखवता आली नाही. कारण तो तशा अर्थाने कधी राजकीय नेता नव्हताच. हीच तर त्यांची किमया होती. सतत शरद पवारांना घालून पाडून बोलताना, तेच पवार पंतप्रधान होणार असतील तर मराठी माणूस म्हणून त्यांनाही समर्थन देण्याचे जाहिर आश्वासन बाळासाहेबांनी दिले होते.

स्वातंत्र्योत्तर काळात आरंभी जे राजकीय पक्ष व नेतृत्व महाराष्ट्रात उदयास आलेले होते. त्यानंतरच्या दोन दशकात तेच प्रस्थापित होऊन गेलेले होते. त्यात बदल करू शकणारा कोणी नव्हता. त्याला छेद देण्याचे महत्वाचे काम बाळासाहेब ठाकरे या व्यंगचित्रकाराने केले. आयुष्यातली अखेरची तीस वर्षे त्यांनी व्यंगचित्रे काढायचे थांबवले होते. पण त्यांच्यातला व्यंगचित्रकार कधी संपला नाही की त्याच्यावर राजकारणी मात करू शकला नाही. प्रसंगापुरता राजकारणी होऊन ते कायम आपल्या व्यंगात्मक शैली व माध्यमातच रमले. राजकारण व सार्वजनिक जीवनात व्यंगात्मक माध्यम वापरणारा तोच एकमेव अपवाद भारतीय राजकारणात होता. कदाचित त्यामुळेच महाराष्ट्राच्या नव्हेतर भारतीय राजकारणातला आमुलाग्र बदल घडवण्यास तोच कारणीभूत झाला असावा. शिवसेनेने हिंदूत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला, तेव्हा हिंदूत्वाचा वारसा विसरून जुना जनसंघ असलेला भाजपाही गांधीवादी समाजवादात रमलेला होता. पण शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद बघून आधी महाराष्ट्रात आणि मग देशव्यापी भाजपाने हिंदूत्व पत्करले. पार्ल्याची पोटनिवडणूक व औरंगाबादचे शिवसेनेचे यश भाजपाला पुन्हा हिंदूत्वाकडे घेऊन आले. त्यातून युती जन्माला आली आणि नंतर भाजपाही गर्वसे कहो हिंदू है अशा घोषणेत रमला. पण बाळासाहेबांच्या त्या हिंदूत्वाने देशभर प्रेरणा निर्माण केली होती. त्याच्या विरोधात जाताना महाराष्ट्रातले डावे समाजवादी पक्ष कायमचे अस्तंगत होऊन गेले आणि हिंदूत्वाचीच कास धरणार्‍या भाजपासमोर देशभरातील तथाकथित सेक्युलर पक्षांचा पालापाचोळा होऊन गेला. आज देशात भाजपाची एकहाती सत्ता दिसते, त्याचा आरंभ १९८६ नंतर बाळसाहेबांनी हिंदूत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन सुरू केलेल्या वादळातून झाला हे विसरता कामा नये. म्हणूनच ह्या माणसाला भारतीय सार्वजनिक जीवन किंवा राजकारणातील झंजावात संबोधणे योग्य ठरेल.

वादळ किंवा झंजावात कुठले संकेत देऊन येत नाही, की वाटेत आडव्या येणार्‍यांना दयामाया दाखवत नाही. जेव्हा ते वादळ थंडावते, तेव्हा सभोवतालचा परिसर आमुलाग्र बदलून गेलेला असतो. शिवसेनेचा उदय आणि बाळासाहेबांचा सार्वजनिक जीवनातील प्रवेश ही एकच घटना आहे. पण त्यानंतर क्रमाक्रमाने महाराष्ट्र व देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात कधी सहभागी होऊन, तर कधी त्यापासून अलिप्त राहून बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिकांनी राजकारणाचे स्वरूप किती बदलले आहे? १९६० पासून १९९० हा पहिल्या तीस वर्षाचा कालखंड आज कोणाच्या स्मरणातही उरलेला नाही. १९९० नंतरच्या राजकारणात जुन्या पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा आता बघायलाही शिल्लक उरलेला नाही. त्याचे श्रेय कोणाला देता येईल? दिर्घकाळ महाराष्ट्रातून कॉग्रेसला पराभूत करायला राबलेल्या डांगे अत्रे जोशींना असाध्य असलेले ते शिवधनुष्य १९९५ सालात बाळासाहेबांनी पेलून दाखवले. पुढल्या काळात त्यालाच रोखण्यासाठी जुने पारंपारिक सेक्युलर पक्ष कॉग्रेससह एकवटत गेले, त्यात त्यांचाच पालापाचोळा होऊन गेला. उरल्यासुरल्या कॉग्रेसला मतांच्या विभाजनानंतरही सत्ता मिळवणे आज अवघड होऊन बसले आहे. ही स्थिती त्या वादळाने आणली ज्याला अवघे जग बाळासाहेब म्हणून ओळखते. त्याची शक्ती कोणी कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. ती शक्ती पदाची अपेक्षाही न करणार्‍या दिलीप म्हात्रे, अरविंद भोसले किंवा अरविंद सावंत यांच्यासारख्या कुठल्याही क्षणी रस्त्यावर उतरून आपले सर्वस्व पणाला लावणार्‍या लाखो निनावी शिवसैनिकात सामावलेली आहे. बाळसाहेब आज हयात नाहीत. पण त्यांनी दिलेला वसा घेऊन जगणारे व शिवसेनेला पुढे घेऊन जाणारे तेच शिवसैनिक हयात आहेत. म्हणूनच त्यानंतरच्या प्रत्येक पिढीत तसे शिवसैनिक जन्माला येत गेले. त्यांनी आपल्या जगण्यात बाळासाहेबांचा अंश जपून ठेवलेला असेल, तोवर शिवसेना कायम राहिल. तोच झंजावात व त्याची किमया कायम असेल. कारण बाळासाहेब अद्वितीय होते, तितकेच असे कार्यकर्ते व शिवसैनिक अद्वितीय असतात. त्यांनी आपल्या कृतीतून व वागण्यातून तेवत ठेवलेला बाळासाहेब अमर्त्य असतो. जो कुठल्या पदात, निवडणूकीच्या यशात किंवा सत्तेत नसतो. जसे शिवसेनाप्रमुख हे अढळपद त्यांनी स्वत:साठी निर्माण केले, तितकेच त्यांनी शिवसैनिक हेही अढळपद निर्माण करून ठेवलेले आहे. तशा प्रत्येक शिवसैनिकात नवा झंजावात निर्माण करण्याचे बीज ठेवून या झंजावाताने इहलोकीचा निरोप घेतला. बीज अंतर्धान पावते व वृक्षाच्या रुपाने अजरामर होते, तसा तो झंजावात अजून आसपास असल्याचे म्हणूनच अनेकांना जाणवत रहाते.

8 comments:

 1. संजय महाडिकJune 20, 2016 at 9:31 PM

  अप्रतिम.

  ReplyDelete
 2. भाऊ.......
  अतीशय सुंदर लेख आहे......
  स्व बाळासाहेबांच्या स्मॄतीस अभिवादन

  ReplyDelete
 3. भाऊ १९ तारखेचा दै पुढारी मधील लेख सुंदर आहे

  ReplyDelete
 4. Khup chan bhau.... Saheb kharach manache Raje hote🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  ReplyDelete
 5. Shivsena from 1985 till today you present perfectly correct. But nowadays Shivsena busy in political activity, which it was missing in his days. But you this article best of it....

  ReplyDelete
 6. अप्रतिम!!!
  पहिलं नमन बाळासाहेबांना! दुसरं तमाम कडवट शिवसैनिकांना!! तिसरं अर्थात भाऊ तुम्हाला!!!

  ReplyDelete