लोकमान्य, लोकशक्ती अशी बिरुदावली मिरवणार्यांना अजून आपण एकविसाव्या शतकात आल्याचे भान नसावे. अन्यथा त्यांनी शिवसेनेच्या पन्नासाव्या वर्धापनदिनाचा मुहूर्त साधून ‘वाघ: वल्कले, वल्गना’ असे पांडित्य झाडण्याचा उद्योग केला नसता. शिवसेनेने आपल्या स्थापनेपासून वाघ हे प्रतिक सातत्याने वापरले आहे. मग त्यांच्या बोलण्यात वागण्यात तसल्या प्रतिमा प्रतिके येत रहातात. यात आता काही नवे राहिलेले नाही. त्यांच्याच कशाला अनेक राजकीय सामाजिक नेत्यांच्या व संघटनांच्या भाषेत असे प्राणिजगत डोकावत असते. त्यावर भाष्य करण्यापेक्षा तशा पक्षांच्या भूमिका धोरणे यांना धारेवर धरण्यात बुद्धीवाद असतो. पण बुद्धीचे अजीर्ण झाले असले, मग वास्तवाचे भान उरत नाही आणि नसलेल्या शहाणपणाचे ओंगळवाणे प्रदर्शन मांडावेच लागते. इथेही नेमके तेच झाले आहे. अर्थात तशीही सेनेची टवाळी करायला हरकत नाही आणि त्या निमीत्ताने सेनेसह इतरांना प्राणिजगताविषयी माहिती पुरवायला अजिबात आक्षेप नसावा. मात्र आपण जी माहिती देतोय, ती तरी परिपुर्ण असावी ना? त्याचा तरी मागमूस लोकमान्यांच्या ‘वल्गनां’मध्ये आहे काय? अग्रलेखाचे पहिलेच वाक्य बघा, ‘वाघ, डरकाळी, पंजे, नखे आणि शिवसेनेचे राजकारण यांचा दूरान्वयानेही संबंध नाही. वास्तविक प्राणिजगत हे काही तत्त्वावर चालणारे असते.’ प्राणिजगत तत्वावर चालते, तर ते तत्व कोणते? त्याचा कुठेही खुलासा नाही. पुढे हे शहाणे म्हणतात, ‘पहिली बाब म्हणजे वाघांच्या दुनियेत मुलाचे नेतृत्व लादले जात नाही कारण वाघ आपल्या उत्तराधिकाऱ्याची चिंता करीत नाही. वाघाच्या मुलाला आपल्या प्रदेशात स्वामित्व गाजवावयाचे असेल तर त्यास इतर वाघांशी झुंजावे लागते. वाघाचा मुलगा आहे म्हणून त्यास काही कोणी विशेष वागणूक देत नाही.’ शंभर टक्के मान्य! पण वाघ आपल्या पिलाचे पालनपोषण तरी करतो काय? वाघ वा तत्सम प्राणीमात्रांमध्ये कुटुंब संस्था असते काय?
असले अग्रलेख वाचून हल्ली लोकांच्या ज्ञानात भर पडत नाही, की त्यावर लोक माहिती वा ज्ञानासाठी विसंबून रहात नाहीत. कारण अशा जगभरच्या गोष्टींची संशोधित अभ्यासपुर्ण माहिती देणारी शेकडो साधने आज लोकांना उपलब्ध आहे. दुर्दैवाने वल्गनांचे अग्रलेख लिहीणार्यांनाच अजून त्याचा पत्ता लागलेला नाही. अन्यथा असे काही लिहीण्यापुर्वी त्यांनी नॅट जिओ किंवा डिस्कव्हरी अशा वाहिन्यांवरचे माहितीपट बघूनच अकलेचे तारे तोडले असते. वाघ कशाला, कुठल्याही पशू वंशात त्यातला नर फ़क्त वीर्यदानाच्या पलिकडे कुठलीच जबाबदारी उचलत नाही. मादीला माजावर आली असताना आपले नैसर्गिक कर्तव्य पार पाडून वाघ, सिंह किंवा तत्सम पशू विभक्त होतात. पुढली सर्व जबाबदारी त्या जननीने निभावून न्यायची असते. तेव्हा आपला वारसा पिलांना, मुलांना देण्याच्या संकल्पनाच मानवी आहेत आणि त्याही कुटुंबसंस्था विकसित झाल्यानंतरच्या आहेत. मग वाघाने आपले नेतृत्व आपल्या वारसाला देण्याची अक्कल आलीच कुठून? वाघाचे स्वामीत्व ही वल्गना त्याच निर्बुद्धतेतून आलेली आहे. कारण वाघाचे कुठेही स्वामीत्व नसते आणि सिंह किंवा अन्य प्राण्यातही स्वामीत्व हे जननक्षम असलेल्या मादीवरचे असते. ते स्वामीत्व जननक्षम असलेल्या नरापुरते मर्यादित असते. जेव्हा त्याची कुवत घटू लागते, तेव्हा त्याला हटवून ‘स्वामीत्व’ प्राप्त करायला नवा नर पुढे सरसावतो. ह्या ‘तत्वावर’ प्राणिजगत चालत असते. बाकी पिले वा वारसांचा हिशोब मादी ठेवते आणि ठराविक काळानंतर स्वय़ंभू व्हायला मादी वयात येणार्या नर वारसाला पिटाळून लावत असते. अन्यथा पिताच आपल्या वारसाचा बळी घेत असतो. पण ही डिस्कव्हरी अजून लोकमान्यांना झालेली नसावी. म्हणून त्यांनी वाघाने आपल्या वारसाला स्वामीत्व देण्याचे अर्धवट ज्ञान पाजळण्याची हौस भागवून घेतली.
शिवसेनेने वाघाच्या प्रतिकाचा वापर करू नये असा आग्रह धरणार्यांनी, आधी स्वत: तरी प्रतिके व त्यांची व्याप्ती समजून घ्यायला नको काय? पण अग्रलेख लिहायला बसले, मग कुठल्याही अभ्यासाशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होते अशीच ठाम समजूत आहे. मग मदर तेरेसांच्या शापवाणीवर ‘उ:शाप’ मागण्याची नामूष्की येत असते ना? इथेही वेगळे काहीही घडलेले नाही. मुंबई महापालिका हातातून गेली तर? असा प्रश्न उपस्थित करून स्वत:च लोकमान्यांनी त्याचे उत्तरही दिलेले आहे. पण शिवसेनेच्या ताब्यात कधीपासून मुंबई पालिका आहे आणि यापुर्वी कधी तिथली सत्ता सेनेने गमावली वा त्यामुळे कुठले गवत सेनेच्या वाघाला खायची पाळी आली, त्याचाही तपशील माहिती असायला हवा ना? १९८५ सालात सेनेने युती नसतानाही पालिकेची सत्ता मिळवली आणि १९९१ सालात विधानसभेतली युती भाजपाने तोडली असताना, सेनेची पालिकेतील सत्ता गेलेली होती. मग तेव्हा कुठल्या मैदानात सेनेचा वाघ गवत चरत फ़िरत होता? त्याचाही तपशील थोडा द्यायला नको काय? ‘महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेप्रमाणे सेनेच्या हातून मुंबई महापालिकादेखील गेली तर या वाघांवर गवत खाण्याची वेळ येणार हे नक्की.’ असे लिहीण्यापुर्वी १९९१ तपासून बघायला हरकत नव्हती. गिरणी संपात मराठी माणूस भरडला गेला, तेव्हा सेनेने काय केले असाही बेअक्कल सवाल या अग्रलेखातून विचारला गेला आहे. अर्थात पुरोगामी ठरण्यासाठी तो सवाल गेल्या तीन दशकात अगत्याने सतत विचारला गेला आहे. पण जो संपच दत्ता सामंतांनी केला त्यात सेना काय करू शकत होती? तर तेव्हा अमराठी गिरणी मालकांना सेनेने साथ दिल्याचाही भन्नाट शोध यातून लावला गेला आहे. डॉ. सामंतांच्या महिनाभर आधी शिवसेनेनेच मुंबईत दोन दिवस गिरण्यांचा सार्वत्रिक संप यशस्वी केला होता, हे अशा किती दिडशहाण्यांना ठाऊक आहे?
सामंत गिरणी संपात उतरण्याच्या अलिकडे गिरणी कामगार सेनेने असा संप केला होता. पण तो पुढे चालविण्यापेक्षा सरकारला हस्तक्षेप करायला भाग पाडून, डबघाईस आलेला गिरणी उद्योग वाचवायला हवा, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. पण त्यांच्यापेक्षा कामगाराला सामंतांची भुरळ पडली. कारण त्या काळात बहुदेशीय कंपन्यात सामंतांनी मोठमोठे बोनस करार केलेले होते. पण त्याचवेळी शेकडो छोट्या कंपन्याही सामंतांच्या आडमुठेपणाने बंद पडल्या होत्या. बेमुदत संपाने गिरण्यांना सामंत कायमचे टाळे लावतील व मालकांना तेच हवे आहे. गिरण्या चालवणे आतबट्ट्याचे असून, त्यांनी व्यापलेली जमीन अब्जावधी रुपयांची असल्याने मालकांनाही सामंतांचा बेमुदत संप हवाच होता. सामंतांनी ते काम सोपे करून दिले. फ़ार कशाला ‘लोकसत्ता’च्या मालकांनाही तेव्हा सामंतांच्या युनियनने वेढले होते. त्यांनी तात्काळ कंपनी बंद करून काहीकाळ लोकसत्ताच बंद पडला होता. लोकसत्तेचे तात्कालीन बुद्धीमंत संपादक तेव्हा काय लिहीत होते, करीत होते, असा प्रश्न आजच्या वारसांना कसा पडत नाही? तेव्हा यांच्यातलेच कोण कोण मालकाच्या बाजूने उभे राहिले व कामगारांशी त्यांनी गद्दारी केली, त्याचा वारसतपास करून बघावा. ‘सामना’चे आजी माजी कार्यकारी संपादक त्यातलेच होत. तेव्हा दुसर्यांचे वारस किंवा स्वामीत्व तपासण्यापेक्षा ‘लोकसत्ता’कारांनी एक वेगळी ‘संपादकीय टीम" नेमून आपल्याच पुर्वज पितरांनी काय काय दिवे लावलेत, किंवा कुठल्या कुरणातील गवत चघळले आहे, त्याकडेही जरा शोधक नजरेने बघावे. मग आपल्याही अंगावर त्यातले काही काळे पिवळे पट्टे उमटलेले कुबेरांसह त्यांच्या टीमलाही दिसू शकतील. त्यासाठी भिंग वा दुर्बिणा मागवण्याची गरज नाही. खर्या वाघाबद्दल बोलायचे असेल, तर जरा डिस्कव्हरी वाहिनीवरचे माहितीपट अभ्यासावे. मग मदर तेरेसा यांची अवकृपाही पदरी पडण्याचे वेळ टाळता येईल.
Bhau,chhan.
ReplyDeleteवा भाऊ लोकसत्तेची (लोकांचासट्टा मांडणारा ) मस्त पिसे काढली.
ReplyDeleteत्याच दिवशी च्या पेपर मध्ये चिदंबरम चा इशरत जहान वरती सारवासारवी साठी लेख आहे त्याची पण पिसे काढणे आवश्यक आहे. ही विनंती.
अमुल शेटे
Jabardast bhosdla bhau... Apratim.....
ReplyDeleteमस्त भाऊ उत्तम लेख
ReplyDeleteekdam bharich bhau
ReplyDelete