Thursday, June 30, 2016

शिवसेना, भाजपा आणि ‘शोले’सध्या देशभर सलमानखानचा ‘सुलतान’ गाजतोय आणि महाराष्ट्रात ‘सैराट’ चित्रपटाने धमाल उडवून दिलेली आहे. पण मराठी राजकारणात मात्र जुने तेच सोने म्हणत, सलीम जावेदच्या ‘शोले’ चित्रपटाचा गाजावाजा चालू आहे. सत्तेत सहभागी असलेल्या दोन मित्र पक्षातली मैत्री उतू जात असताना एकमेकांवर जो प्रेमपुर्ण शब्दांचा मोठा वर्षाव चालू आहे, त्यात शोलेतील प्रसंग व ‘डायलॉग’ मुक्तपणे उधळले जात आहेत. भाजपाचे मुखपत्र ‘मनोगत’मधून त्याची सुरूवात झाली आणि शिवसैनिकांनी आपल्या आवडत्या छंदानुसार त्या मुखपत्राची होळी केली. मग भाजपाचे बिन्नीचे शिल्लेदार आशिष शेलार मैदानात आले आणि त्यांनी ‘सामना’च्या अंकाची होळी करू असा इशारा दिला. पण इशार्‍यापलिकडे त्यांची मजल गेली नाही. कदाचित रावसाहेब दानवे यांनी शिखलफ़ेक थांबवा असा आदेश दिल्याने, शेलारमामांचे मागले दोर कापले गेले असावेत. पण म्हणून या शिमग्यातली ‘शोले’ चित्रपटाची गर्दी ओसरली नाही. माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा धीर सुटला व त्यांनी शोलेचाच आधार घेऊन अमिताभ धर्मेंद्रच्या मैत्रीचा हवाला देऊन टाकला. शोलेतल्या जय विरूसारखी दोन पक्षांची मैत्री कशी घट्ट आहे. त्याचा हवाला सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. एकाच मोटरसायकलवर स्वार होऊन बिनधास्त वेडीवाकडी वळणे घेत भरधाव सुटलेल्या त्या दोन मित्रांना कुठल्याही अपघाताची पर्वा नसते, हा प्रसंग खुप बोलका आहे. आजच्या सेना-भाजपा मैत्रीचे इतके नेमके वर्णन आणखी कुठे सापडू शकणार नाही. ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’ अशा गीतातून दोघे आपल्या दाट मैत्रीचा हवाला देतात. त्यात थोडा बदल करून म्हणता येईल, ‘तोडेंगे युती मगर, हम सत्ता नही छोडेंगे’! व्वा सुधीरभाऊ, काय दाखला दिलात तुम्ही! ‘शोले’ चित्रपटात असे कित्येक प्रसंग आहेत, की जे अशा राजकारणाशी सुसंगत आहेत.

भाजपाच्या मुखपत्राने तुरूंगात जय विरू बंदिस्त असतानाचा जेलरचा प्रसंग उधृत केला आहे. त्यात जय विरूपेक्षा त्यातल्या हास्यास्पद जेलर असरानीचे वक्तव्य उधृत केले आहे. त्यातून शिवसेनेला मिरच्या झोंबल्या. पण मुनगंटीवार यांनी तुरूंगाबाहेर जय विरू काय दिवे लावतात, त्याचा दाखला दिला आहे. त्याच चित्रपटात तुरूंगातून मुक्त झालेले जय-विरू मग ठाकुरच्या गावी पोहोचतात, तिथलाही प्रसंग मोठा मनोरंजक व सूचक आहे. रेल्वे स्थानकात पोहोचले तरी रेल्वे गावी जाणारी नसल्यामुळे पुढला प्रवास टांग्याने करणे भाग असते. तिथे बसंती नावाची हेमामालिनी, धन्नो नावाच्या घोडीला टांग्याला जुंपून प्रवासी वाहतुक करीत असते. या दोन मित्रांची त्याच बसंतीशी गाठ पडते आणि तिच्याच टांग्याने ठाकुरच्या गावी जाण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागतो. त्या प्रवासात ही बसंती अखंड बडबड करत असते आणि त्या दोन मित्रांना आपसात बोलण्याचीही मोकळीक मिळत नाही. इतके अखंड बडबडून झाल्यावर बसंती धक्कादायक ‘राजकीय’ विधान करते. देखो, इतनी बाते कही, लेकीन बसंती अपना नामही कहना भुल गयी. हे ऐकून जय उर्फ़ अमिताभ खोचकपणे तिला म्हणतो, ‘बसंती, तुम्हारा नाम क्या है बसंती?’ मुनगंटीवार किंवा ‘मनोगत’च्या संपादकांना हा प्रसंगही आठवायला हरकत नव्हती. शंभरदा आपले नाव उच्चारून तेच सांगायला विसरल्याचे बसंती म्हणते, तेव्हा जय तिचेच नाव दोनदा घेऊन तिचे नाव नव्याने तिला विचारतो. अखंड बोलून बडबड करूनही आपण बोललोच नाही, असे बसंती सांगते, तो प्रसंग मनोगतातून सुटला. मुनगंटीवारांच्या विस्मृतीत गेल्याने असेल, नाथाभाऊंना जाग आली आणि तेच बसंती होऊन सामोरे आले. आपण तोंड उघडले तर देश हादरून जाईल, असे म्हणत त्यांनी शोलेचा पुढला प्रसंग साजरा केला. तोंड उघडले तर म्हणजे? नाथाभाऊ उपरोक्त विधान तोंड बंद ठेवून बोलले काय?

जळगावच्या एका पक्ष बैठकीत नाथाभाऊ मार्गदर्शन करायला उभे राहिले होते. आता सभेत तोंड बंद ठेवून कसे बोलावे, याचेच मार्गदर्शन नाथाभाऊ करत असावेत. अन्यथा त्यांनी तोंड उघडले तर, असा इशारा कशाला दिला असता? पण भारतातले किंवा महाराष्ट्रातले पत्रकार इतके बिलंदर आहेत, की नाथाभाऊंनी तोंड उघडलेलेही नसताना त्यांच्या तोंडातून निघालेली वाक्ये छापून टाकली आहेत. हा अर्थातच नाथाभाऊंवरचा घोर अन्याय आहे. जो माणूस तोंडही उघडत नाही, त्याच्या तोंडी विधाने घालून प्रसिद्धी द्यायची, याला तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात ना? तो नाथाभाऊंच्या वाट्याला आला असेल, तर त्याला अन्याय नाहीत दुसरे काय म्हणायचे? तर अशा रितीने जळगाव मुक्कामीही नाथाभाऊंनी तोंड उघडले आणि तोंड उघडणार नाही, असा इशाराही दिला. कारण बाकीच्यांना मंत्रीपदाची चिंता आहे. नाथाभाऊंना देशाच्या सुरक्षेची चिंता आहे. आपण बोललो व त्यासाठी तोंड उघडले, तर देश हादरून जाईल आणि मग इसिस वा तोयबांना काही कामच शिल्लक उरणार नाही, अशी भिती त्यांना सतावत असावी. म्हणुनच खडसे यांनी मौनव्रत धारण केलेले आहे. ते बोलत नाहीत आणि तरीही त्यांच्या तोंडची वाक्ये लोकांना ऐकू येत असतात, त्याला माध्यमातून प्रसिद्धीही मिळत असते. सगळा प्रकार कसा शोलेतल्या बसंतीला शोभणारा आहे ना? बसंती आपले नाव सांगायचे विसरून जाते आणि नाथाभाऊ बोलतात, पण त्यांचे तोंडही उघडत नाही. हा सगळा प्रकार बघून रमेश सिप्पीला नव्याने शोले बनवण्याचा मोह झाल्यास नवल नाही. सलीम जावेदना एकत्र येऊन या नव्या मैत्रीपर्वावर ‘नाथाभाऊ बोले’ अशी पटकथा लिहीण्याचा मोह झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. खरेच मुनगंटीवार यांनी जय विरूच्या मैत्रीचा दिलेला दाखला किती नेमका आहे आठवते?

त्यातला विरू बसंतीच्या प्रेमात पडलेला असतो आणि त्याच्या वतीने मुलीला मागणी घालायला जय बसंतीच्या म्हातारीकडे पोहोचतो. विरू किती गुणी व सालस मुलगा आहे, त्याची अमिताभने कथन केलेली कहाणी चार दशकांनंतरही लोकांच्या स्मरणात ताजी आहे. मुलगा एकदम सालस, कुठले व्यसन नाही, घाणेरड्या सवयी नाहीत. हे सांगताना अमिताभ उर्फ़ जयने कशी झकास कथा रंगवली होती ना? आज भाजपा किंवा शिवसेना एकमेकांचे जे जाहिरपणे गुणगौरव करीत असतात, ते त्या कथेपेक्षा कि्ती भिन्न आहे? मोजक्या, नेमक्या सभ्य शब्दात बदनामी करण्याची कुशलता, त्या कथेतच सामावलेली नाही काय? रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार किंवा इतर भाजपा नेते ज्याप्रकारे सेनेशी असलेल्या दोस्तीची वर्णने करतात आणि शेलार व इतर नेते सेनेवर दुगाण्या झाडत असतात, ते शोलेतल्या अमिताभला शोभणारे नाही काय? एकूण काय महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शोले चित्रपटाची पटकथा रंगात आलेली आहे. त्यातले जय-विरू. जेलर-बसंती फ़टाफ़ट ओळखता येतात. पण त्याच चित्रपटात उशीरापर्यंत खलनायक गब्बरसिंग जसा नजरेस पडत नाही, तसाच आजच्या शोलेतला गब्बरसिंग अदृष्य आहे. तो नेमका कोण? पचास पचास कोस दूर कुठल्या घरात बालक रडत असेल, तर आई त्याला गप्प करण्यासाठी गब्बर आयेगा अशी भिती घालते. तसा नव्या शोलेतला गब्बर कोण असेल? तालुका जिल्ह्याच्या राजकारणात कोणी कार्यकर्ता नेत्याचे ऐकत नसेल, तर नेता कोणाच्या नावाची भिती आपल्या अनुयायांना घालत असेल? शहाणे व्हा, सावध रहा, नाहीतर गब्बर येईल, अशी कोणाच्या नावाने धमकी या नाट्यात दिली जात असेल? सुधीरभाऊ, नाथाभाऊ, दानवे यापैकी कोणीतरी त्याचा चेहरा दाखवाल की नाही? ‘बारा’ गावचे पाणी पिणार्‍यांचीही ‘मती’ गुंग करणारा सवाल आहे ना?

3 comments:

 1. हाहाहा भाऊराव! एकवेळ दिल्लीहून आलेला अफझलखान परवडला. पण बारामतीचा गब्बर नको!

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 2. या गब्बरचे हात नतोडता दादा कोंडके यांचे सुप्रसिद्ध भाषणातील अोळीं आठवतात "कुठुनकुठुन कोथळा बाहेर काढायला हवा"

  ReplyDelete
 3. Congress lost in2014 may be many reasons but kapil Saibal Renuka choudhary Manish Tiwari these are perfect reasons why mm singh lost Dilli badly. Some day Sanjay Raut will take Shivsena in to big trable. His nonsense irritated sainik also.

  ReplyDelete