Tuesday, June 28, 2016

केलेल्या पापाची फ़ळे



आपल्याकडे लोकपाल आंदोलन जोरात असताना मध्य आशियात रणधुमाळी माजलेली होती. आज आपण त्या बातम्या विसरून गेलेलो आहोत. तेव्हा ट्युनिशियामध्ये जनक्षोभ टोकाला गेला आणि दिर्घकाळ सत्तेत असलेला हुकूमशहा देश सोडून पळून गेला होता. मग तिथे लोकशाही आली, अशी घोषणा झाली आणि तेच लोण मग जवळच्या अनेक अरबी देशात पसरू लागले. मोठा स्फ़ोट इजिप्तमध्ये झाला. तिथे दिर्घकाळ सत्तेत असलेल्या होस्ने मुबारक यांच्या सत्तेला आव्हान देणारे तरूण थेट राजधानी कैरोच्या मुख्य तहरीर चौकात येऊन ठाण मांडून बसले. दिवस उलटून चालले होते आणि सरकारने कितीही इशारे देऊन त्यात फ़रक पडत नव्हता. इजिप्तची सत्ता कित्येक दशके लष्कराच्या हातीच आहे, अर्धशतकापुर्वी तिथे अब्देल गमाल नासेर या लष्करी अधिकार्‍याने राजेशाही उलथून पाडल्यावर लोकशाही आणल्याचा दावा केला होता. पण त्यातल्या मुस्लिम ब्रदरहुड संघटनेने डोके वर काढले आणि नासेर यांना ती प्रवृत्ती चेपून काढण्यासाठी लोकशाही गुंडाळून ठेवण्याची पाळी आली. तेव्हापासून मग दिखावू लोकशाही आणि लष्कराच्या हाती खरी सत्ता, असाच कारभार चालू राहिला. होस्ने मुबारक त्यांचाच वारसा चालवित होते. तर मुस्लिम ब्रदरहुड तिथे इस्लामी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील राहिला. वेगवेगळ्या नावाने ते जिहादी संघटना करीतच राहिले होते. त्यांना तुरूंगात टाकून व चकमकीत ठार मारून सत्ता स्थिर राहिली, तरी बंडखोर वृत्ती संपली नाही. म्हणूनच अरब उठावाचे लोण आले, तेव्हा विद्यार्थी व अन्य संघटनांचा आडोसा करून ब्रदरहुड रस्त्यावर उतरला. मुबारक सत्ताभ्रष्ट होईपर्यंत ब्रदरहुडने आपला चेहरा समोर आणला नव्हता. पण नंतर झालेल्या निवडणूकीत भक्कम संघटनेच्या बळावर ब्रदरहुडचा नेता मोरसी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. आज युरोप महासंघ ढासळतोय, त्याची मुळे त्या अरब उठावात रुजलेली आहेत. म्हणून हा इतिहास सांगणे भाग आहे.

इजिप्तचा बळी घेतल्यावर अरब उठावाचे लोण सिरीया व लिबिया आदी मुस्लिम देशात पसरले होते. त्याला जनतेचा उठाव आणि लोकशाही क्रांती ठरवून अमेरिकेने सत्ताधीशांच्या विरोधातल्या बंडाला समर्थन दिले होते. नुसते समर्थन दिले नाही, तर अशा हिंसक आंदोलनाला हत्यारे पुरवण्यापासून इतरही मदत अमेरिका व त्यांच्याच पठडीतले नाटो देश करीत राहिले. थोडक्यात ज्याला अरब उठाव म्हटले गेले, त्याची प्रेरणा व चिथावणी युरोपियन देश व अमेरिकेचीच होती. जेव्हा स्थानिक पातळीवर हे उठाव इजिप्तप्रमाणे यशस्वी झाले नाहीत आणि स्थानिक राज्यकर्ते बंड चेपून काढू लागले, तेव्हा नाटो सेना त्यात उघडपणे हस्तक्षेप करू लागल्या. नाटो देशांनी आपली सेना उघडेपणे अरबी भूमीवर आणली नाही. पण लिबिया व सिरीयाच्या हवाई दलांना नामोहरम करण्याची कारवाई नाटो देशांचीच होती. त्यातून अरबी देश व मुस्लिम जगतामध्ये युरोपियन देश मुस्लिम विरोधी असल्याची धारणा निर्माण झाली. मग त्याच देशातले मुस्लिम अशा नाटो हस्तक्षेपाच्या विरोधात बोलू लागले. पण ते मानले गेले नाही. तेव्हा युरोपातील विविध देशातले मुस्लिम तरूण आपल्या देशात घातपात करू लागले, तर काही युरोपियन मुस्लिम तरूण आपल्याच सेनेच्या विरोधात लढण्यासाठी इराक सिरीयात दाखल झाले. त्याचीच दुसरी बाजू अशी, की या अरबी देशात अराजक माजले आणि लक्षावधी अरबी मुस्लिम लोकसंख्या परागंदा झाली. त्यांना आसपासचे अरबी देश आपल्यात सामावून घ्यायला राजी नव्हते. म्हणूनच हे निर्वासित दुबई-कुवेत वा सौदी अरेबियात जाण्यापेक्षा उत्तरेकडे युरोपियन देशात धाव घेऊ लागले. म्हणजे युरोपसमोर निर्वासितांची समस्या उभी राहिली. तीनचार वर्षापुर्वी नाटो सेनेने अरबस्तानात जे पेरले, ते आता युरोपात उगवते व पिकते आहे. ब्रिटन युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याची वेळ त्यातूनच आलेली आहे.

पहिली गोष्ट म्हणजे अरबी देशात कुठलाही उत्स्फ़ुर्त उठाव झालेला नव्हता. तर अमेरिकन पैशावर चालणार्‍या सेवाभावी संस्थांनी माध्यमे व स्थानिक कुरापतखोरांना हाताशी धरून उभा केलेला तो देखावा होता. मोठी शहरे व राजधानीच्या शहरातले हे देखावे, माध्यमांनी जगभर रंगवून सांगितले आणि युरोपियन देशातील उदारमतवादी मंडळींनी आपापल्या देशावर दडपण आणून, मानवी हेतूसाठी अरबी देशात लष्करी हस्तक्षेप करण्याची पाळी आणली. त्याचा दुहेरी परिणाम असा होता, की युरोपात आधीपासून वसलेले मुस्लिम व त्यातले तरूण विचलीत होऊन गेले. त्यांच्यावर जिहादी संघटनांच्या प्रचाराचा परिणाम होत गेला. तर अरबी देशात अराजक माजले आणि त्याचा लाभ उठवत आधीच कार्यरत असलेल्या जिहादी संघटनांनी आसपासच्या प्रदेशात आपले हातपाय पसरले. त्यांना चिरडून काढण्यासाठी राज्यकर्त्यांनी आपले लष्कर व हवाई दल वापरल्यावर नाटोने जनतेवर हिंसक हल्ले रोखण्यासाठी आधुनिक विमाने वापरून लिबिया व सिरीयाचे हवाई दल संपवून टाकले. त्याचा एकत्रित परिणाम असा झाला, की या भागात अराजक माजले आणि त्यात धर्माच्या नावाने उडी घ्यायला युरोपातीलच मुस्लिम तरूण जाऊ लागले. दुसरीकडे निर्वासित म्हणून परागंदा झालेल्या लोकांचे लोंढे अन्यत्र आसरा शोधू लागले. त्यातले काही ग्रीस व अन्य मार्गाने युरोपच्या किनार्‍यावर पोहोचू लागले. त्यातले काही बुडून मृत्यू पावले आणि युरोपातील उदारमतवादी संघटनांनी त्यांना आश्रय देण्यासाठी दबाव आणला. मग येणार्‍या लोंढ्यात कोण खरा निर्वासित व कोण मुखवटा पांघरून आलेला जिहादी, याला धरबंद राहिला नाही. लक्षावधी निर्वासितांच्या लोंढ्यांना सामावून घेण्याच्या धोरणाने कुणीही उठून युरोपात धाव घेऊ लागला. त्यात बांगलादेशी, अफ़गाण, पाकिस्तानी घुसखोरही जाऊ लागले. एकूण युरोपियन महासंघातही अराजकाची स्थिती निर्माण झाली.

जसजसे हे घुसखोर, निर्वासित मोठ्या संख्येने युरोपच्या कुठल्याही देशात शहरात घुसू लागले, तसतशी तिथली स्थिती बदलू लागली. भणंग-गणंग यांना युरोपच्या समाजात व जीवनशैलीत सामावून घेण्य़ाची कुठलीही तयारी व व्यवस्था नव्हती. दिवसागणिक या निर्वासित घेण्याच्या धोरणाने युरोपियन जीवनात व्यत्यय निर्माण केलेच. पण स्थानिक पातळीवर असुरक्षितताही वाढत गेली. डोक्यावर छप्पर नाही की कामधंदा नाही, अशा छावण्यांमध्ये निर्वासितांना रोखून धरणे पोलिसांना अशक्य होऊ लागले. हे घोळकेच्या घोळके कुठल्याही देशातून, कुठल्याही शहरात मोकाट फ़िरून धमाल उडवू लागले. आपल्या देशात व घरात शहरात मुळच्या युरोपियनांना सुरक्षित रहाणे अशक्य होऊन गेले. त्यातून मग हे निर्वासित मुस्लिम अरब नकोत आणि त्याची सक्ती करणारा युरोपियन महासंघ सुद्धा नको, अशी मानसिकता वाढू लागली. ब्रेकझीट ही त्यातून उदयास आलेली चळवळ आहे आणि ब्रिटनखेरीज अनेक देशात आता तशा चळवळींना जोर चढू लागला आहे, जर्मनीत पेगिडा ही संघटना सतत लोकप्रिय होत चालली असून, तशाच संघटना स्वीडन, हॉलंड आदी देशात उभ्या राहिल्या आहेत. पुर्व युरोपातील अनेक देशांनी निर्वासितांचा लोंढा आधीच रोखला आणि आपल्या सीमा काटेरी कुंपणांनी बंद केल्या होत्या. आता जे काही चालले आहे, तो अरब उठावाचा परिणाम आहे. अरबी मुस्लिम देशात लोकशाही स्थापित करायचा अट्टाहास ज्या पाश्चात्य उदारमतवादी संस्थांनी केला, त्याची फ़ळे आता युरोपला भोगावी लागणार आहेत. कारण त्यांच्याच प्रेरणेने अरब उठाव झाला, त्यांच्याच नाटो फ़ौजांनी सिरीया-लिबियाच्या सेनेला नामोहरम करून जिहादींना शिरजोर होऊ दिले. ते देश बरबाद झाले आणि तिथले लोंढे युरोपात समावून घेण्याच्या हट्टाने आता युरोपियन महासंघालाच ग्रहण लागले आहे. ब्रिटन ही त्याची नुसती सुरूवात आहे.

1 comment:

  1. ज्यांनी जगात 'फाळण्या' पेरल्या आता त्यांच्याच संघाची अन नंतर देशाचीही फाळणी होऊ घातली आहे. याला 'कर्माचे फळ' म्हणतात!!!

    ReplyDelete