Saturday, June 25, 2016

मोदीभक्त, मोदीत्रस्त आणि मोदीभ्रष्टभारतीय समाजात किंवा जे आपापली मते बाळगणारे लोक आहेत, त्यांच्यात हल्ली तीन प्रमुख गट पडलेले आहेत. अर्थात सगळा भारतीय समाज त्या तीन गटात विभागला गेलेला नाही. त्यांच्या एकूण बेरजेपेक्षा अनेकपटीने भारतीय लोकसंख्या यापासून अलिप्त आहे. कारण आपले मत योग्यवेळी व योग्य जागी व्यक्त करावे, इतके सामान्यज्ञान अशा मोठ्या लोकसंख्येपाशी आहे. म्हणूनच असे लोक नित्यनेमाने चालणार्‍या गदारोळापासून पुर्णपणे दूर असतात आणि चाललेल्या तमाशाची मजा लुटत असतात. मात्र उरलेल्या तीन गटात सतत हाणामारी चालू असते. त्यांची सर्वसाधारण विभागणी तीन गटात होते. यातले मोदीभक्त म्हणून ज्यांची सातत्याने हेटाळणी अन्य दोन गटांकडून होते, त्यांच्यात अनेकजण शांतपणे विचार करून आपले मत बनवणारे असतात आणि वेळोवेळी मोदींच्या कारभाराचे वा निर्णयाचे स्वागत करीत असतात. कधी ते मोदी वा भाजपाच्या निर्णयाने विचलीत होऊन त्यावर टिकाही करत असतात. त्यांना मोदीभक्त संबोधावे लागते. कारण त्यांच्यापाशी काही तारतम्य आढळते. त्यांचे दुसरे टोक म्हणजे मोदीभ्रष्ट मंडळी! या गटात मोदी विरोधकांचा जसा समावेश होतो, तसाच मोदी समर्थकांचाही समावेश होतो. कारण त्यांना मोदी या शब्दाने भ्रष्ट वा निकामी करून टाकले आहे. त्यांची मते वा भूमिका मोदी या शब्दाने तयार होत असतात. मग समोरचा विषय कुठलाही असो. त्या मोदीभ्रष्ट मंडळींना बाकी कशाचाही विचार करण्याची गरज वाटत नाही. मोदींना योग्य ठरवणे किंवा मोदींना नालायक ठरवणे, असे यात दोन भाग पडतात. मोदीत्रस्त हा त्यापेक्षाही वेगळा असा गट आहे. यातल्या मंडळींना मोदी निवडून आलेले वा त्यांनी पंतप्रधान झालेले मान्य करायलाच त्रास होतो. त्यामुळे आपण निर्बुद्ध ठरल्याच्या न्युनगंडाने पछाडलेले लोक यामध्ये समाविष्ट होतात.

यापैकी मोदीभक्त हे भाजपावालेच असतात असे नाही किंवा त्यांना आपले राजकीय मत असतेच असे नाही. पण मागल्या दिड दशकामध्ये देशव्यापी जी मोदीविरोधी विषारी प्रचारमोहिम राबवली गेली, त्यातून मोदींकडे डोळसपणे बघणार्‍यातून हा भक्तगण तयार झाला आहे. म्हणूनच तो मोदींचे आंधळे समर्थन करत नाही, तर आपुलकीने मोदी यशस्वी व्हावेत, अशी त्याची इच्छा असते. त्याच्या सदिच्छा मोदींच्या पाठीशी आहेत. त्या सदिच्छा वाया जाऊ नयेत, म्हणून तो मोदींकडे विधायकपणे बघत असतो. ज्या परिस्थितीने मोदींना देशासमोर आणले, त्यातून हा वर्ग तयार झालेला आहे. त्यामुळेच देशभर मोदींना मानणारा मतदार निर्माण होत गेला. असा गट किंवा समर्थक हा भाजपाचा भोक्ता वा पाठीराखा नाही. तर देशाला आज मोदींच्या नेतृत्वाखेरीज पर्याय नाही, अशी त्याची धारणा आहे. किंबहूना ती भावना ओळखूनच मोदींनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उडी घेतली होती. जी तात्कालीन भाजपातल्या अनेकांनाही मान्य होत नव्हती. अशा भाजपाबाह्य मोदीभक्तांमुळेच त्या पक्षाला शेवटी मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवावे लागले होते. या वर्गाला मोदींकडून कुठल्या व्यक्तीगत अपेक्षा नाहीत. पण मोदी देशाला प्रगतीपथावर घेऊन जातील, हा त्या वर्गाचा आशावाद आहे. म्हणूनच असा वर्ग स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेण्यात लाज बाळगत नाही. त्याचे प्रत्यंतर गॅसवरचे अनुदान सव्वा कोटी कुटुंबांनी सोडून देण्यातून आले आहे. तो खरा मोदीभक्त आहे. कारण तो कृतीतून मोदींच्या योजना व धोरणे यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेत असतो. मात्र त्यातल्या बहुतांश मंडळींना भाजपा किंवा त्याच्या राजकीय धोरणात, भूमिकेत किंचितही स्वारस्य असल्याचे आढळून येणार नाही. पण मोदींचा विषय आला, मग हाच वर्ग तावातावाने मोदींचे समर्थन पाठराखण करायला पुढाकार घेताना दिसेल.

दुसरा गट आहे मोदीत्रस्तांचा! ही मंडळी आजच नव्हेत तर गुजरात दंगल झाल्यापासून किंवा कदाचित भाजपा स्थापन होण्याच्या पुर्वीपासूनच मोदी विरोधक असावेत. किंबहूना मोदी मुख्यमंत्री होण्याच्याही आधीपासून हे लोक मोदीत्रस्त आहेत. कारण मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत आणि त्याच संस्कारात वाढलेले आहेत. सहाजिकच संघाशी जे काही संबंधित असेल, ते काय आहे त्याकडे ढुंकूनही न बघता असे ग्रासलेले लोक त्याच्या विरोधात दंड थोपटून उभे रहातात. आधी विरोध करतात, टिकेची झोड उठवतात आणि मग विचारतील, चर्चा कशाबद्दल होती? हे मोदीत्रस्तांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मोदींच्या भाषणाला अमेरिकन संसदेत टाळ्या मिळाल्या, तर हे लोक म्हणणार मदार्‍याच्या माकडाच्या कसरती बघूनही लोक टाळ्या वाजवतातच की! असे युक्तीवाद करताना आपणही अण्णा हजारे वा तत्सम कोणासाठी टाळ्या वाजवतो, ह्याचेही त्यांना स्मरण उरत नाही. आपण दिर्घकाळ गुजरात दंगल, त्यातला हिंसाचार यांच्या विरोधात जगभर काहूर माजवूनही मोदी पंतप्रधान झालेच कसे, याची टोचणी त्यांना शांत बसू देत नाही. सहाजिकच कुठेही मोदींचे कौतुक झाले, की ही मंडळी विचलीत होऊन त्यावर तुटून पडत असतात. मग त्या विषयात त्यांच्या भूमिकेला तडा जात नसला तरी बेहत्तर! उद्या मोदी सूर्याला सूर्य म्हणाले, तरी अशी मंडळी त्यावर प्रश्नचिन्ह लावायला मागेपुढे बघणार नाहीत. कारण सूर्य महत्वाचा नसून मोदी त्याला सूर्य ठरवतात, ही मोदीत्रस्तांची समस्या असते. जगातले मुस्लिम देशही योगदिवस साजरा करीत असताना वा भारतात बहुसंख्य मुस्लिम त्यात सहभागी असताना, अशा मोदीत्रस्तांना त्यात हिंदूत्वाचा वास येऊ लागतो. जोवर देशाच्या राजकारणात किंवा पंतप्रधानपदी मोदी आरूढ झालेले असतील, तोपर्यंत अशा मोदीत्रस्तांना व्याधीमुक्त होता येणार नाही.

तिसरा गट मिश्र आहे. त्यात कडवे मोदीभक्त आणि कट्टर मोदीत्रस्तांचा समावेश होतो. यातला कडवा मोदीभक्त डोळे झाकून मोदींचे समर्थन करीत असतो. किंबहूना मोदी हा साक्षात विष्णूचा अवतार असून, भारतीय समाजाच्या उद्धारासाठीच त्याने अवतार घेतला आहे, अशी त्यांची पक्की खात्री आहे. यातले बहुतांश लोक भाजपातले इच्छुक वा पाठीराखे आहेत. मोदींचे नाव जपले वा गुणगुणले मग गहन समस्यांचेही निवारण होते, अशा त्यांच्या समजूती आहेत. म्हणूनच मग पहलाज निहलानी वा गजेंद्र चौहान यांच्याही समर्थनाला असे मोदीभ्रष्ट ‘भक्त’ हिरीरीने पुढे येतात. कारण मोदी सरकारने नेमणूक केलीय म्हणजेच योग्य, असे त्यांचे तर्कशास्त्र असते. उलट याच गटातला दुसरा घटक दुसर्‍या टोकाला असतो. निहलानी वा चौहान यांची नेमणूक मोदी सरकारने केली म्हणजेच वाटोळे झाले, अशी त्यांची पक्की समजूत असते. कन्हैया मोदींना शिव्या घालतो ना? मग तो आपोआप समर्थनीय असल्याच्या भूमिकेतले मोदीत्रस्तही याच गटात मोडतात. दिसायला ही दोन टोकाची मंडळी आहेत. पण त्यांची मानसिकता जशीच्या तशी एकसारखी आहे. मोदी हा एकच शब्द त्यांना प्रवृत्त करत असतो. तो शब्द उच्चारला मग समोर प्रसंग, विषय वा घटना कोणती आहे, त्याच्याशी त्यापैकी एकालाही कर्तव्य नसते. त्यांची बुद्धी मोदी शब्दाने भ्रष्ट केलेली असल्याने, त्यांना मोदीभ्रष्ट संबोधणे योग्य ठरावे. आपले सुदैव असे आहे, की आजही यापलिकडे मोठा समाज त्यापासून मुक्त आहे आणि तारतम्याने विचार करू शकतो. आपणच कशा खुद्द नरेंद्र मोदीही त्याच अलिप्त समाजावरच विसंबून देशाचा कारभार हाकत आहेत. आपले भक्त वा आपल्यामुळे त्रस्त लोकांपासून सावध राहिलो, तरच काही उपयुक्त विधायक करता येईल, हे मोदीही जाणून आहेत. म्हणूनच दोन वर्षे कारभार उत्तम होऊ शकला. निदान घरंगळलेला नाही.

7 comments:

 1. Bhau, How do you understand what is in our mind? I guess that makes a difference between just thinking and being able to put thoughts on paper.

  ReplyDelete
 2. आणखी एक प्रकार - ' मोदीमस्त ' ,मोदी पंतप्रधान झाल्यावर पृथ्वीराज चौहान नंतर हिंदू राज्य आल्याने आनंद व्यक्त करणारे वगैरे

  ReplyDelete
  Replies
  1. त्यांनाच मोदी भ्रष्ट म्हटलेय ना वर
   ..

   Delete
 3. एकदम अचूक!करेक्ट विश्लेषण !

  ReplyDelete
 4. अतिशय मार्मिक

  ReplyDelete
 5. Rahul oturkar made right comments. Rahul I read bhau since my childhood in MARMIK. I JUST FOND OF HIM.

  ReplyDelete
 6. काही अंशी खरं आहे हे. कारण social media वर मोदींवर एखादा विनोद सहज म्हणून टाकला तरी शिव्या खाव्या लागतात आणि मोदींचं कौतुक केलं तरी विरोध सहन करावा लागतो. यात अजून एक category जोडली पाहिजे. म्हणजे लोकसभेला मोदींवर विश्वास ठेऊन त्यांना मतं देणारे आणि नंतर भ्रमनिरास होऊन त्यांच्यावर टीका करणारेही आहेत. हा विशेष करून ग्रामीण आणि शहरातील निम्न-मध्यमवर्गीय माणूस आहे. याच्या मोदींकडून फार अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. दुसरीकडे काही लोक मुळातच 'विरोधात' असतात. मग ते कॉंग्रेस असो किंवा भाजप. ते नेहमी 'सरकार काहीच करत नाही' असं म्हणत असतात.
  भक्त, त्रस्त आणि भ्रष्ट इथपर्यंत भारतीय मर्यादित नाही यातच समाधान... नाहीतर तीन वर्षे झाली तरी मोदी जाहिरातीतून बाहेर काही येत नाहीयेत

  ReplyDelete