Thursday, June 23, 2016

पन्नाशीच्या पुढे काय?



शिवसेना ही मराठी अस्मितेसाठी मुंबईत स्थापन झालेली संघटना आता पन्नाशीत आली असताना, राज्यव्यापी पक्ष म्हणून पुर्णपणे प्रस्थापित झाली आहे. अर्थात अजूनही तिला स्वबळावर राज्याची सत्ता हस्तगत करता आलेली नाही. मग पन्नास वर्षात तिने कोणता पल्ला गाठला, असा सवाल विचारला जाऊ शकतो. पण नेहमीच्या राजकीय आकलनानुसार शिवसेनेचे विश्लेषण होऊ शकत नाही, की तिच्या पन्नास वर्षांची मोजदाद करता येणार नाही. कारण पन्नास वर्षातली निम्मी वर्षे शिवसेना ही मुंबईपुरती मराठी अस्मिता जपणारी संघटना होती आणि राजकीय पक्ष होण्याची तिची धडपड यशस्वी होत नव्हती. विविध राजकीय वादळे व झंजावात अंगावर घेत बाळासाहेबांनी शिवसेनेचे वेगळेपण कायम जपले आणि तिला अन्य राजकीय पक्षांप्रमाणे प्रसंगोपात वहावत जाऊ दिले नाही. त्यामुळे पंचविशी पार करताना शिवसेना खर्‍या अर्थाने राजकीय पक्ष होऊ शकली. तोपर्यंत तिचे स्वरूप मुंबई ठाण्यापुरते मर्यादित होते. बहुतेक राजकीय पक्षांशी जवळीक किंवा खडाजंगी असे रागलोभाचे संबंध जपत सेनेने ती वाटचाल केलेली होती. पण १९८५ नंतर शिवसेनेला खरी शक्ती प्राप्त झाली. तिथून मग महाराष्ट्रात शिवसेना मुळ धरू लागली. पण सगळेच नेतृत्व शहरी असल्याने, तिला ग्रामीण महाराष्ट्राची ओळख होऊन पाय रोवण्यात दोन दशकांचा काळ खर्ची पडला. अवघ्या तीस वर्षात शिवसेनेने भाजपाच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि सेनेचा मुख्यमंत्रीही सिंहासनावर आरुढ झाला. पण तरीही आत्मविश्वासाने महाराष्ट्र पंखाखाली घेण्याची महत्वाकांक्षा तिने कधी बाळगली नव्हती. आज तो टप्पा सेनेने ओलांडला आहे. दिड वर्षापुर्वी स्वबळावर महाराष्ट्र लढवताना ६३ जागा जिंकून दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरताना सेनेने आपले राजकीय बळ सिद्ध केले आहे. त्याच्या पुढे काय?

अर्थात ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपाशी फ़ाटले आणि सक्तीनेच सेनेला स्वबळावर लढावे लागले. त्यातून अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आणि सेनेला खरी आपली शक्ती कळू शकली. त्यानंतर सत्तेसाठी भाजपा व सेना एकत्र आलेले असले, तरी त्यांच्यातली मैत्री आता समान विचारांचा धागा असण्यापेक्षा व्यवहारी तडजोड उरली आहे. कधीही तुटू शकेल अशी ती युती आहे. कारण गुण्यागोविंदाने ती युती झालेली नसून, कुरबुरी अखंड चालू असतात. पन्नाशीचा समारंभ साजरा करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडायचा मानस नसल्याचे सांगितले आहे. पण तसे बोलण्याची त्यांना गरज भासावी, यातच युती गुण्यागोविंदाने कार्यरत नसल्याची ती कबुली ठरते. खरी प्रामाणिक युती असती व योग्य सत्तावाटप होऊ शकले असते, तर असे बोलण्याची ठाकरे यांना गरज नव्हती. पण ते बोलले, त्याचे कारण सत्तेतून बाहेर पडण्याचा आग्रह अनेकजण त्यांच्याकडे धरत असतात. शरद पवार म्हणतात, नालायकांच्या सोबत रहाता कशाला? म्हणजे सत्तेतून बाहेर पडा व भाजपाला धडा शिकवा. तर त्यालाही उद्धवनी हे उत्तर दिले आहे. पवारांच्या किंवा अन्य पक्षांच्या सोयीने आपण सत्ता सोडणार नाही, की युतीतून बाहेर पडणार नाही, असेच यातून उद्धवनी सुचवले आहे. ते उत्तर भाजपापेक्षा पवारांसाठी अधिक पुरक आहे. पण त्यातला इशाराही समजून घेतला पाहिजे. राष्ट्रवादी किंवा कॉग्रेस यांना पोषक किंवा लाभदायक ठरावे, म्हणून शिवसेना आततायीपणे सत्तेतून बाहेर पडणार नाही. पण म्हणून कितीही अडचण अपमान झाला म्हणूनही सत्तेला चिकटून युतीत रहाणार नाही, असाही इशारा त्यातून भाजपाला दिलेला आहे. आज नाही, तरी भाजपाला अडचणीचे असेल, तेव्हा आपण युती मोडू शकतो; असेच त्यातून उद्धव ठाकरे सांगत आहेत, हे विसरता कामा नये.

रविवारी वर्धापनदिनाच्या सोहळ्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण मोजके व सुचक अधिक आहे. अखेरचा निर्णय माझा असेल, असे त्यांनी म्हटले. तर तो अखेरचा निर्णय कोणता असणार आहे? युतीत व सत्तेत सहभागी होण्याचाही निर्णय उद्धव यांचाच होता. पक्षप्रमुख म्हणून बाहेर पडण्याचाही निर्णय आपोआपच त्यांचाच असणार आहे. मग अंतिम निर्णय माझाच असेल, असे ठासून सांगण्यामागचा हेतू काय? तर मागच्या वेळी युती तोडण्याचा निर्णय खडसे यांचा किंवा भाजपाने घेतला होता. यावेळी तो निर्णय भाजपाने घ्यायचा नसून आपल्या हाती आहे, असेही त्यातून सुचवलेले आहे. कारण सत्ता युतीची असली तरी त्यातले निर्णय भाजपाचेच नेतृत्व घेत असते आणि त्यामध्ये युती म्हणून शिवसेनेला फ़ारसे स्थान नाही. त्यामुळे दाखवायला युती असली तरी सरकार भाजपाचे आहे आणि म्हणूनच त्यात रहायचे नाही असा निर्णय भाजपा घेऊ शकत नाही. ज्यांचे सरकार त्यांना सत्ता राबवावीच लागेल. त्यात शिवसेना सहभागी नसेल, तर अन्य कोणाला घेऊन भाजपाला सत्ता चालवणे भाग आहे. उद्धव यांच्या इशार्‍याचा एक अर्थ असाही निघू शकतो. एकूण त्यांचा सूर बघितला तर ते युतीमध्ये खुश वा आनंदी नाहीत, हे त्यातून उघड होते. मात्र आता सत्तेबाहेर पडून राजकीय लाभ कोणताही नाही. मग अहंकाराच्या आहारी जाऊन तसला जुगार खेळण्यात अर्थ नाही. हे हा नेता जाणून आहे. त्याचवेळी आपल्याला अन्य कुणा चाणक्याच्या सल्ल्याची गरज नाही. स्वयंभूपणे आपण निर्णय घेऊ शकतो, असेही त्यांनी स्वपक्षातील मुत्सद्दी शहाण्यांना सांगितले आहे. मात्र या दरम्यान पन्नाशी गाठलेल्या शिवसेनेचे भवितव्य काय; असाही एक प्रश्न आहे. त्याचे उत्तर उद्धव देऊ शकलेले नाहीत. महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेच्या अनेक शाखा झाल्या असून, त्यातले अनेकजण आपली कडवी हिंदूत्वाची भूमिका घेऊन काम करीत असतात. त्याचे भवितव्य काय?

कालपरवा दिल्लीनजिकच्या दादरी गावामध्ये एक घटना घडली ती महत्वाची आहे. अखलाख महंमद नावाच्या मुस्लिमाची तिथे जमावाने काही महिन्यांपुर्वी हत्या केलेली होती. गोमास भक्षणाच्या संशयाने हे हत्याकांड घडले होते. आता त्यविषयी आलेल्या अहवालानुसार तिथे सापडलेल्या मांसाचा नमूना गोमासाचाच असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गावकर्‍यांनी पंचायत घेऊन अटकेतील हिंदूंना निर्दोष मुक्त करण्याची मागणी केलेली होती. त्या पंचायतीवर सरकारने बंदी घातली होती. ती बंदी झुगारून पंचायत भरवली गेली. त्यामध्ये स्थानिक शिवसेना शाखेचा पुढाकार होता. वाहिन्यांवर ज्या बातम्या दाखवल्या, त्यात काहीजण उद्धवचा चेहरा असलेले रुमाल गळ्यात घालून तिथे उपस्थित होते. याचा अर्थ कडव्या हिंदूत्वाचा पर्याय म्हणून आज देशातील काही तरूण शिवसेनेकडे अपेक्षेने बघत आहेत. महाराष्ट्र व मराठी अस्मिता यापलिकडे शिवसेनेचे हे आकर्षण सेनेचे नेतृत्व विचारात घेणार आहे काय? दिल्लीत जाणारे सेनेचे खासदार त्या अन्य प्रांतातील शिवसेनेला खतपाणी घालून राज्याच्या सीमा ओलांडण्याचे प्रयास करणार काय? भाजपाने देशाची सत्ता संभाळताना सर्वधर्मसमभावाचा मुखवटा लावलेला आहे. त्यामुळे नाराज असलेल्या हिंदू तरूणांना नेतॄत्व देण्याचा प्रयास शिवसेना करणार काय? सेनेची आक्रमक वृत्ती अशा देशभरच्या हिंदू तरूणांना भुरळ घालणारी आहे. त्यांना आज भाजपाकडून उघडपणे नेतॄत्व मिळू शकत नाही. त्याचा लाभ शिवसेना उठवू शकते. पण त्यासाठी आवश्यक व्यापक राष्ट्रीय भूमिकेतून सेनेत विचार होणार आहे काय? पंचविशीत राज्यव्यापी होण्याचे यश मिळवणार्‍या सेनेला पन्नाशीत राष्ट्रीय पक्ष होण्याची ती अपुर्व संधी आहे. सवाल तितक्या व्यापक दृष्टीचा आहे. सेनेतले आजचे नेतृत्व महाराष्ट्राच्या सीमापार बघू शकणार आहे काय? की राज्यातील सत्तेपुरतेच समिकरण जुळवत हे नेतृत्व बसणार आहे?

3 comments:

  1. माधव ज्युलियन यांची एक प्रसिद्ध कविता आज आठवते आणि त्याचे कारण सांगण्याची गरजच नाही ."वाघिणीचे दूध प्याला वाघबच्चे फाकडे ,भ्रांत तुम्हा का पडे ? '' या ओळींमधील वाघिणीचे दूध म्हणजे चिपळूणकरांनी गौरवलेले इंग्रजी भाषेचे विचारधन हा तात्कालिक संदर्भ सर्वांना माहित आहे तरीपण सध्याच्या युवकांना वाघ आणि त्याचा पंजा या शिवसेनेशीच आठवण करून देतात हे देखील तेवढेच खरे आहे . अर्धशतक पूर्ण केल्याचे यश साजरे करताना कमळाबाई ( कमलाबेन म्हणूया का ?) काय करतील याची चिंता कशाला ?

    ReplyDelete
  2. बिहार विधानसभा निवडणूक सेनेने लढवली आणि चांगली मते मिळवली. आता येणारी गोवा निवडणूक शिवसेना नेतृत्वाने गांभीर्याने लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. अलीकडेच एका मुलाखतीत उद्धव आणि आदित्य यांनी येणार्‍या काळात सेना राष्ट्रीय पक्ष म्हणून समोर येईल असे सुतोवाच केले आहेत. कशासाठी नाही तरी भाजपला नुकसान करण्यासाठी तरी शिवसेना राष्ट्रीय पातळीवर नक्की काम करेल असा अंदाज आहे.

    ReplyDelete