Tuesday, April 24, 2018

विचारवंती जातिव्यवस्था

मुले वाढत्या वयात शहाणी होत जातात, त्यामुळे त्यांना हातळणार्‍या वडीलधार्‍यांनी आपल्या वागण्यातही तितकी प्रौढता आणणे अगत्याचे असते. कोवळ्या वयात मुलांना अनेक गोष्टींची खरीखरी उत्तरे आपण देऊ शकत नसतो. म्हणून काहीबाही सांगून सारवासारव केलेली असते आणि मुलेही त्यात फ़सलेली असतात. पण वयात येणार्‍या मुलांच्या जाणिवा आणि ज्ञानात भर पडलेली असते. वडीलधार्‍यांच्या अपरोक्षही त्यांना बरेच काही समजू लागलेले असते. अशा बदलत्या काळात मुलांना अजाण समजून जुनाच खेळ चालू ठेवला, तर वयाचा मान राखून मुले तुमचा अवमान करणार नाहीत. पण तुमच्या पाठीमागे तुम्हाला म्हातारचळ लागला म्हणून हसत असतात. तुमचे कुठलेही मत मनावर घ्यायचे सोडून देतात. अलिकडल्या कालखंडात जगभरच्या प्रस्थापित बुद्धीमंत विचारवंतांची तशीच काहीशी अवस्था झाली आहे आणि एकूण कुठलाही समाज अशा विचारवंत शहाण्यांच्या मताकडे काणाडोळा करू लागला आहे. मात्र या वैचारिक म्हातार्‍यांना त्याचे भान येताना दिसत नाही. म्हणून तर पदोपदी अशा लोकांना हास्यास्पद व्हायचे प्रसंग येऊ लागले आहेत. तो अनुभव भारतात येतो, तसाच जगातल्या अन्य देशातही येत असतो. शहाण्यांनी काही सांगावे आणि लोकांनी निर्धास्तपणे त्याकडे पाठ फ़िरवुन आपले मत बनवावे, असे वारंवार घडू लागले आहे. तसे नसते तर जगभरच्या ६०० शहाण्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भारतातील बलात्काराविषयी चिंता व्यक्त केली नसती. किंवा असे शहाणे आयसिस इराकमध्ये भिन्न वंशाच्या मुलीमहिलांवर बलात्कार होताना गप्प बसून राहिले नसते. तेव्हा निवांत झोपा काढणार्‍यांनी आज उन्नाव कठुआचे बलात्कार ही जागतिक महिला समस्या असल्याचे पत्र लिहीने, जागतिक मुर्खपणाचे लक्षण आहे. कारण जितके नाटक रंगवले जाते आहे, तितकी ती जागतिक चिंतेची समस्या अजिबात नाही.

अर्थात भारतातील शहाण्यांनी ती भयंकर समस्या असल्याचे चित्र रंगवले हे सत्य आहे आणि अशा समस्या मागल्या चार वर्षापासून देशातील पुरोगामी वर्गाला सतत भेडसावत आहेत. खरे तर त्यांना अन्य कुठलीही समस्या वा प्रश्न भेडसावत नसून, नरेंद्र मोदी ही त्यांची सर्वात चिंताजनक समस्या झालेली आहे. ती आजची नाही की चार वर्षाचीच समस्या नाही. मागल्या पंधरा वर्षापासून जगभरच्या अशा विचारवंतांची ती समस्या झालेली आहे. आज त्यांनी मोदी पंतप्रधान असल्यामुळे त्यांनाच पत्र पाठविले आहे. पण पंधरा वर्षात अशी पत्रे त्यांनी विविध संस्थांना, विविध देशाच्या सत्ताधार्‍यांना व संसदांना पाठवालेली आहेत. त्यातला विषय प्रसंगानुसार बदलत असतो. एकच मुद्दा सर्वत्र कायम असतो, त्याचे नाव आहे नरेंद्र मोदी! आता या ताज्या पत्रात त्यांनी काय लिहीले आहे वा कोणती मागणी केली आहे? ते तात्पुरते बाजूला ठेवूया. २००२ पासून जगभरच्या अनेक विचारवंतांनी भारतातल्या त्यांच्या पुरोगामी जातबंधूंच्या आग्रहाखातर नरेंद्र मोदींना अटक करावी, त्यांना तुरूंगात टाकावे, किंवा त्यांना कुठल्याही देशाने व्हिसा देऊ नये, अशी पत्रे लिहीलेली नव्हती काय? आज ज्या सहाशे शहाणे वा संस्थांचा उल्लेख होतो आहे, त्यापैकी कितीजणांनी अमेरिकेच्या वा अन्य पाश्चात्य देशांच्या सत्ताधीशांना मोदीविरोधात पत्रे लिहीली होती? मोदींना व्हिसा देऊ नये किंवा दिलेला व्हिसा रद्द करावा, म्हणून सादर केलेल्या पत्र खलित्यावर यापैकी कितीजणांच्या सह्या होत्या? जरा कोणी वाहिनी वा संपादक त्याचा तपशील सादर करील काय? ज्या माणसाला कुठल्याही खटला वा सुनावणीशिवाय जगभर दंगलीचा पुरस्कर्ता वा मारेकरी ठरवण्याचे फ़तवे शहाण्यांनी काढलेले होते, त्यांच्यावर आज त्याच मोदींकडे न्याय मागण्याची नामुष्की का आली आहे? त्यांच्या अशा जागतिक मोहिमेनंतरही मोदी देशाचे पंतप्रधान का होऊ शकले?

ज्यांना आपल्या जुन्या मुर्खपणाचा अजून विचार करायची बुद्धी झालेली नाही, त्यांना शहाणे विचारवंत तरी कशाला म्हणायचे? विद्यापीठातले प्राध्यापक वा सरकारी सन्मान पारितोषिके मिळाल्याने कोणी विचारवंत होत असतो काय? गुजरात दंगलीनंतर मोदींची जगभर वा प्रामुख्याने प्रगत देशात कोंडी करण्याचे डावपेच भारतातील पुरोगामी उदारमतवादी गटाने खेळलेले होते. त्यांचे जगभरचे भाईबंदही त्यात हिरीरीने उतरले होते. इतकी मजल गेली, की आंतरराष्ट्रीय कोर्टात मोदींच्या विरोधात खटलाही अदखल करण्याची कल्पना पुढे आलेली होती. त्या प्रत्येक सोहळ्यात जे लोक सामील होते, त्यांना तेव्हाही विचारवंत म्हणून नावाजण्यात आलेले होते आणि आजही तेच लोक सामुहिक पत्र लिहीत आहेत. फ़रक इतकाच, की यावेळी त्यांनी खुद्द मोदींकडेच न्यायाची अपेक्षा चालवली आहे. यातला मुर्खपणा असा, की ज्याची सैतान म्हणून संभावना केली, त्याच्याचकडे आज न्याय मागावा लागत आहे. ज्यांना मोदी मागली चौदा वर्षे सैतान वाटला होता, त्याच मोदीकडून न्यायाची अपेक्षा करणे हा मुर्खपणा नाही काय? उलट या लोकांनी आज नवे आरोप करताना वा नव्या शंका घेताना, आपली जुनीच भिती खरी ठरली म्हणून मोदींवर टिकेचा भडीमार करायला हवा ना? आपली शंका खरी ठरली आणि मोदींच्या हाती सत्ता आल्यावर भारतात अराजक माजले आहे. तेव्हा जगातल्या असतील नसतील त्या उदारमतवादी सत्तांनी पुढाकार घेऊन मोदींना सत्ताभ्रष्ट करावे आणि भारतीयांची मोदींच्या जाचातून मुक्तता करावी, असे एक सार्वत्रिक आवाहन केले असते तर योग्य झाले असते. पण तसे झालेले नाही आणि जगात त्यांच्या केविलवाण्या बुद्धीचातुर्याला आता कोणी विचारेनासा झाला आहे. म्हणून लाचारीने त्यांनी खुद्द मोदींनाच कौल लावला आहे. त्यातून त्यांनी आपण जगातले दुर्मिळ निवडक मुर्ख असल्याचीच ग्वाही दिलेली आहे.

पाच वर्षापुर्वी निर्भयाकांड झाले आणि तेही बलात्कार हत्येचेच प्रकरण होते. तेव्हाचे सरकार यापेक्षाही बधीर व असंवेदनाशील होते. हजारोच्या संख्येने देशाच्या मोठया शहरातील लोक रस्त्यावर उतरले होते. तर त्यांना तात्कालीन भारत सरकारने झोडपून पांगवले होते. इतके होऊनही या विचारवंताना भारतातील मुलीमहिला अत्यंत सुरक्षित व सुखरूप असल्याची स्वप्ने पडत होती. यापैकी कोणी एकाने मनमोहन सिंग यांना पत्र लिहून काही कारवाई करण्याची मागणी केलेली नव्हती. आज देशातील कुठल्याही मोठ्या शहरात महानगरात तितका आक्रोश आढळून आलेला नाही. निर्भयाकांडाच्या वेळी लोकक्षोभ दिसला त्याचा कुठे मागमूस भारतात आज आढळून येत नाही. अशा वेळी ह्या जगभरच्या शहाण्यांना खडबडून जाग आलेली आहे आणि त्यांनी पत्र लिहून भारतातील मुलीमहिलांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. यापेक्षा दुसरा कुठला हास्यास्पद भाग असू शकतो? मनमोहन सिंगांचे युपीए सरकार सत्तेत असताना निर्भयावर सामुहिक बलात्कार होऊन तिला ठार मारले, त्याने ज्यांची झोप उडाली नाही त्यांना संवेदनाशील कसे म्हणता येईल? की मोदी सत्तेत असताना खुट्ट वाजले तरी भयंकर असते आणि मनमोहन सत्तेत असताना बलात्कार हत्याकांडही न्यायाचा अविष्कार असतो, असे या दिडशहाण्यांना वाटते? त्यांची भूमिका पक्षपाती नसती, तर त्यांनी तेव्हाही असे पत्र लिहीले असते. मोदींचा व्हिसा अडवा असे पत्र बुश-ओबामा यांना लिहीण्याचा आगावूपणा केला नसता. त्यांना बलात्कार वा अन्य कशाशीही कर्तव्य नाही. मोदी सत्तेत आहेत आणि पंतप्रधान आहेत, ती़च अशा शहाण्यांना भेडसावणारी वस्तुस्थिती आहे. बाकी उन्नाव कठुआच्या घटना हे निमीत्त आहे. आता उदारमतवाद ही एक उच्चभ्रू जात झाली आहे आणि त्यांच्याच जातीतील कोणी सत्तेत असताना गुन्हे झाल्यास ते माफ़ असतात. मोदी त्या पुरोगामी उच्चभ्रू जातीचे नाहीत, म्हणून त्याची वैचारीक जातीव्यवस्था कोसळली आहे ना?

2 comments:

  1. भाऊ, हे जे कोणी लोक आहेत व ते मोदींना परिस्थितीची जाणीव करून देत आहेत हेच मुळात भाड्याने आणलेले लोक आहेत. हे लोक स्वतःचे अस्तित्व विसरून पैश्याकरिता रडत आहेत कारण रडण्याचे पैसे मिळाले आहेत. आशिफा करीत न्याय हवा पण 39 मारले गेलेल्या लोकांबद्दल डोळ्यात पाणी नाही ! हीच का त्यांच्यातील सवेदनशीलता ! मोदी खुपते, भारताची भरभराट खुपते त्यांच्या डोळ्यात. शिवाय 4 वर्षात एकपण घोटाळा नाही, मग आपण कधीच सत्येत येणार नाही ही साल आहे त्यांना.

    ReplyDelete
  2. माझ्या मते आपण एखाद्या घटनेकडे राजकीय दृष्टीकोनातून तुलना करताना बघताना आपण एका वाईट घटनेचे समर्थन करत आहोत .

    ReplyDelete