Tuesday, July 10, 2018

मंबाजीचे आधुनिक वंशज

वारीत संभाजी भिडे के लिए इमेज परिणाम

गेले दोनचार दिवस आषाढी वारीच्या निमीत्ताने एक नवा वाद उकरून काढण्यात आलेला आहे. या वारकर्‍यांच्या मांदियाळीत स्वत:ला धारकरी म्हणवून घेणार्‍यांनी यावे किंवा नाही, असा तो वाद आहे. अर्थातच खर्‍याखुर्‍या वारकर्‍यांना असल्या वादात स्वारस्य नसून ते वादाकडे ढुखंकूनही न बघता आपली वाटचाल करीत आहेत. परंतु त्यात भलतेच लोक नाक खुपसून आपापले पांडित्य सांगायच्या उचापती करीत आहेत. पण अशा कुठल्याही अभ्यासक जाणकार बुद्धीमंताला मुळातच संतमहात्म्याचा थांगपत्ता लागलेला नाही. जगाच्या पाठीवरल्या कुठल्याही देशात व समाजात मुळात संत निर्माण झाले, तेच प्रस्थापित बुद्धीमंत व विचारवंत यांना झुगारून देणारी जनमानसाची प्रेरणा होते. तथाकथित शहाणे जेव्हा एकूण लोकसंख्येला पापपुण्य व चांगलेवाईट अशा गुंत्यात अडकवून त्याचे सर्व बाजूंने शोषण करू लागतात, तेव्हा त्या समाजाला त्यातून मुक्ती देण्यासाठी बंडखोर जन्माला येत असतो. प्रामुख्याने असा बंडखोर हा संताच्या रुपाने उदयास येत असतो. त्याची उक्तीकृती अशा प्रस्थापित बुद्धीमान वर्गाला आव्हान देत असते. त्यांनी कुंठीत करून ठेवलेली जीवनशैली प्रवाहित करण्यासाठी अशा संताला नवे तत्वज्ञान व विचार समाजासमोर आणून बदलाचे वारे निर्माण करायचे असते. मग विषय धर्म, संस्कृती वा सभ्यतेचा किंवा थेट राजकारणाचा असो. जेव्हा अशा संताची जनमानसातील महत्ता व मान्यता वाढीस लागते, तेव्हा या अभिजन बुद्धीवादी वर्गाचे अदृष्य सिंहासन डळमळीत होऊ लागते. त्यांच्याच मान्यतेवर टिकून असलेल्या विविध राजसत्ता डळमळीत होऊ लागतात. त्यामुळे अशा आव्हानावर पहिला हल्ला बुद्धीवादी वर्गाकडून होत असतो. तुकाराम महाराजांना छळणारा मंबाजी वा ज्ञानेश्वर माऊलींच्या भावंडासहीत एकूण कुटुंबाला वाळीत टाकणारी प्रवृत्ती म्हणजेच मंबाजी असतो.

माऊली कुणा तात्कालीन बुद्धीमंत शास्त्रीबोवांना आपली ज्ञानेश्वरी कथन करायला गेले नव्हते, की समजवायलाही गेलेले नव्हते. तुकोबांनी कुणा पंडित वा मंबाजीकडे आपल्या गाथेसाठी प्रमाणपत्र मागितले नव्हते. उलट हीच मंडळी त्यांच्या मागे हात धुवून लागलेली होती. जे इथे अशा संतांच्या बाबतीत झाले, तेच शेकडो वर्षापुर्वी युरोपात सॉक्रेटीसच्या वाट्याला आलेले होते आणि गॅलिलीओच्या अनुभवास आलेले होते. तेव्हा आजकाल वारीच्या निमीत्ताने उठलेला ऐन पावसाळ्यातला धुरळा, नवा किंवा इथल्यापुरता मर्यादित मानायचे कारण नाही. मानवी इतिहासात व संस्कृतीत हे वारंवार होत आलेले आहे. त्यातली पात्रे बदलत राहिलेली आहेत. पण प्रवृत्ती कायम तशाच्या तशाच राहिलेल्या आहेत. तेव्हा मंबाजी होता आणि आता संभाजी ब्रिगेड आहे. काही वर्षापुर्वी अशा वारीमध्ये संभाजी भिडे गुरूजींचे धारकरी सहभागी व्हायचे किंवा नाही, याची कोणाला फ़िकीर नव्हती की कुठली वाहिनी चर्चाही करीत नव्हती. चर्चा कशाला बातमीही आलेली नव्हती. तेव्हा वारकर्‍यांत सनातन संस्थेचे कोण कशाला आले वा गेले, असा वाद रंगवला जायचा. तो वाद कोणी उकरून काढला होता? आज त्या सनातन संस्थेचे कोणी नाव घेत नाही. मग त्या संस्थेचे कोणीही वारीत जातच नसेल काय? तेव्हा धारकरी जात असतीलही. पण त्याबद्दल कोणी अवाक्षर बोलत नव्हता. सहासात वर्षापुर्वी वारीतला एक महत्वाचा वाद होता की तुकोबा मोठे की ज्ञानेश्वर माऊली मोठी? तुकोबांची हत्या ब्राह्मणांनी घडवून आणली व नंतर सदेह वैकुंठाला गेल्याची आवई पिकवली गेली हो. त्यावर किती चर्चा रंगल्या होत्या? त्यासाठी किती इतिहास संशोधन झालेले होते? मुळातच ज्यांचा वारीशी थेट भावनिक वा मानसिक संबंधच नाही, त्यंनी वारीच्या निमीत्ताने अशा उचापती कराव्यातच कशाला? तर ती एक विध्वंसक प्रवृत्ती असते.

आपला समाजनमावर जो पगडा आहे, त्यातून लोक शहाणे झाले तर ते स्वयंभूपणे विचार करतील आणि आपण निर्माण करून ठेवलेल्या धर्मकर्म, पापपुण्याची मिमांसा करू लागतील. मग आपली जीवनमूल्य ठरवण्याची मक्तेदारी संपुष्टात येईल, ही भिती असते. ती प्रत्येक समाजातल्या अशा पुरोहोत बुद्धीजिवी वर्गाला कायम सतावत असते. त्यामुळे आपण उभ्या केलेल्या भ्रामक चित्र वा आभासाला जराही धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली, तरी असा वर्ग खवळून चवताळून मैदानात येत असतो. आरंभी असे बदमाश बुद्धीवादी संभाजी ब्रिगेड सारख्या भुरट्यांना पुढे करतात आणि आपल्या तडे पडू लागलेल्या भ्रामक तटबंदीची डागडूजी करून बघतात. ते शक्य झाले नाही, मग खिंडार पडलेल्या त्यांच्या बुरूजातून त्यांना हत्यार उपसूनच बाहेर पडावे लागते. आताही तीच गोष्ट झाली आहे. मागल्या काही वर्षात संभाजी ब्रिगेडला पुढे करून जी डागडुजी साधली गेली नाही आणि एकामागून एक पुरोगामी भ्रमाचे किल्ले गड उध्वस्त होऊन गेले, तेव्हा त्यांनाच तलवार उपसून घराबाहेर पडावे लागलेले आहे. शिवाजी महाराज हिंदू धर्माचे पाईक वा राखणदार नव्हते असला प्रचार उपयोगी ठरला नाही, तेव्हा वारी व वारकरी संप्रदायावर हल्ला चढवण्यात आलेला आहे. ब्रिगेड म्हणायची शिवरायांच्या सैन्यात बहुतांश मुस्लिम सैनिक होते, म्हणून ते हिंदू साम्राज्य नव्हते. आता नवी संकल्पना पुढे आली आहे. वारकरी हा संप्रदाय म्हणे हिंदूंचा नाही, तर मानवतावादी संप्रदाय आहे. नशीब पंढरपूर ही दुसरी मक्का असल्याचे अजून कोणी बुद्धीमंत सांगायला पुढे आलेला नाही. मुळातच अशा लोकांना वारी वा वारकरी संप्रदायाची कुठले कर्तव्य नाही. त्यांना हिंदू धर्म वा ती अस्मिता ज्या कुठल्या पायावर भक्क उभी राहू शकते, तोच ढासळून टाकायचा आहे. त्याहीपेक्षा आपल्या तावडीतून समाज मुक्त होतोय त्याच्या चिंतेने त्यांना घेरलेले आहे.

तुकोबा ज्ञानोबा हे प्रस्थापिताचे विरोधक होते व व आव्हानवीर होते. आज असते, तर त्यांनी सर्वप्रथम प्रस्थापितालाच आव्हान दिले असते आणि आजचे प्रस्थापित म्हणजे पुरोगामी बुद्धीवाद आहे. जो कुठल्याही कसरती करून समाजाला आपल्या ओलिस ठेवायला अखंड धडपडत असतो. कालपरवा राष्ट्र सेवादलाच्या पुढाकाराने एक वारीविषयक पुस्तक प्रकाशित करण्यात आले. ज्या संघटनेचे नानासाहेब गोरे यांच्यासारखे विचारवंत वारकरी संप्रदाय संतपरंपरा यांनी समाजाला टाळकुटे बनवल्याचे पांडित्य सांगत होते, त्याच संघटनेने वारकरी विषयावर पुस्तक कशाला काढावे? त्यांनी वारीत काय योग्य वा काय अयोग्य हे सांगण्याची गरजच काय? वारी समाजाला नाकर्ता बनवते, असाच टाळकुटेपणाचा अर्थ आहे ना? मग त्यांनी आधी इतकी वर्षे त्या संप्रदायाची निंदानालस्ती कशाला केली? त्याचा आधी खुलासा करावा आणि त्यासाठी माफ़ी मागावी. मग पुस्तक प्रकाशन व पांडित्य सांगावे. पण असल्या गोष्टीचे खुलासे बुद्धीवादी अभिजन करीत नाहीत. त्यांना आपलाच नाकर्तेपणा कायम सतावत असतो. म्हणून वांझोट्याने इतरांची मुले पळवावीत, तसे पुरोगामी अभिजन नेहमीच इतरांची अभिमान स्वाभिनामाची प्रतिके पळवत असतात किंवा त्यांना ठार मारून टाकत असतात. ते नेहमी तुकोबांना छळणार्‍या मंबाजीसारखे वागत असतात. गाथा बुडवा म्हणणारे मंबाजी सर्व युगात व समाजात असतात. म्हणून भगवी पताका घेऊन वारी करणार्‍या समुदायात भगवे फ़ेटे घालून कशाला आलात, असला खुळचट प्रश्न त्यांना पडू शकतो. तो जाहिरपणे विचारण्याचे धाडस होऊ शकते. राज्यघटना वा कुठल्या नियम कायद्यांनी वारीचा गणवेश नक्की केला आहे काय? वारीत संभाजी भिडे कशाला वा त्यांनी मनुचा संदर्भ कशाला द्यायचा, असले प्रश्न म्हणून विचारले जातात. मंबाजीच्या वंशजांनो, तुमचा वारीशी संबंधच काय?

16 comments:

  1. अगदी बरोबर आहे

    ReplyDelete
  2. अगदीं बरोबर विश्लेषण केले आहे भाऊ तुमी

    ReplyDelete
  3. भाउ 2014 साली मोदींना बहूुमत आणि काॅंगरेसला विरोधी पक्षाची पन मान्यता नाही तेव्हा काहीजन म्हनत होते की आता कांगरेस विरोध करण्यासाठी असंविधानिक अराजकी मार्ग वापरेल ज्या घटना घडतायत ते दाखवतातच आहेत काॅंगरेसचे डीप असेटस कामाला लागलेत ना त्यांना दलित प्यारे ना वारकरी ना मुसलमान,नाआदिवासी ना शेतकरी त्यांची भक्ती फक्त 10 जनपथ.पन तुम्ही जागर करताय ते आवश्यकच आहे

    ReplyDelete
  4. अजब असतात पुरोगामी लोक्स. हे श्री तुकाराम महाराजांच्या तोंडी त्यांनी न सांगीतलेले तत्वज्ञत घालतात. या लोकांना देव, देश, धर्म यांच्या विषयी आत्मीयता नाही.

    ReplyDelete
  5. पुर्वार्ध : भिडे गुरुजींबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया वाचण्याची आता सवय झाली आहे. यातील बहुतांश लोक त्यांना प्रत्यक्ष कधीही भेटलेले नसतात किंवा फार फार तर त्यांनी गुरुजींचे एखाददुसरे व्याख्यान प्रत्यक्ष किंवा youtube वर ऐकलेले असते. गुरुजी कसे जगतात हे पाहण्याचे भाग्य त्यांना फारसे लाभलेले नसते. ते भाग्य सुदैवाने लाभल्यामुळे लिहिण्याचे दुस्साहस करत आहे. लिखाणाचा नाममात्र हेतू इतकाच आहे की ज्यांना गुरुजींबद्दल काहीच माहिती नाही त्यांचे मन भ्रमित होऊ नये. मी गुरुजींचा प्रवक्ता वगैरे कोणीही नाही किंवा त्यांना तसा कोणी प्रवक्ता लागत सुद्धा नाही याची कृपया आधीच नोंद घ्यावी .एकेक मुद्दा पाहू
    १ ) गुरुजींचे आंबा विधान. गुरुजी सुमारे अर्धशतक संघाचे प्रचारक राहिलेले आहेत. संघ म्हणजे काय याबाबतीत प्रत्येकाचे आकलन वेगवेगळे आहे त्याबद्दल आता बोलणे नको. परंतु या संघ विचारांशी फारसे न जुळल्यामुळेच गुरुजी संघातून बाहेर पडले असावेत असे मानावयास पुरेसा वाव आहे. संघाचे प्रचारक असताना गुरुजींना धाराशिव जिल्ह्यामध्ये मायभाते नामक एक शेतकरी भेटला होता ज्याने त्याच्या शेतात असे आंब्याचे झाड असल्याचा दावा केला होता. गुरुजींचे नाशिक मधले व्याख्यान हे त्या आंब्याची जाहिरात करण्यासाठी नसून त्यांनी केवळ उदाहरण म्हणून तो प्रसंग सांगितला व पुढे ते असे म्हणाले की जर एखादा आंबा खाऊन पुरुषाचे नपुंसकत्व जात असेल तर शिवछत्रपती आणि संभाजीमहाराज यांच्या विचारांचे ग्रहण करणाऱ्या हिंदूंचे पिढ्यानुपिढ्या आलेले राष्ट्रीयत्वाचे नपुंसकत्व का जाणार नाही. इथे केवळ उदाहरण म्हणून त्या आंब्याचा गुरुजींनी उल्लेख केला जो तितकाच उचलून माध्यमांनी जणूकाही गुरुजी स्वतःच्या शेतातील आंब्यांची जाहिरात करत आहेत असे भासविले व यावर विश्वास ठेवणारी माणसे ही किती अल्प बुद्धीची असतील हे देखील त्यानिमित्ताने सिद्ध होऊन गेले .

    ReplyDelete
  6. भाग२

    २ ) मनू बद्दल गुरुजी काय बोलले
    मुळात मनू कोण होता, मनू बद्दल ज्ञानेश्वरांचे वारकरी संतांचे विचार काय आहेत हे जाणून न घेता बडबड करणाऱ्या लोकांच्या मुळे हा सर्व उपद्व्याप होतो आहे.
    *मनू म्हणजे नक्की काय ?हा कोण होता ? मनुस्मृति म्हणजे काय ?*
    आपल्या धर्मशास्त्रांमध्ये श्रुती वांङ्गय आणि स्मृती वाङ्मय असे वाङ्मयाचे मुख्य प्रकार आहेत. जे ज्ञान कधीच बदलत नाही ते श्रुतीं मध्ये मोडते. हे ज्ञान शाश्वत आहे. आणि जे ज्ञान हे एका विशिष्ट काळापुरते लागू केले जायचे त्याला स्मृती असे म्हणतात. स्मृती या नावातच त्याचे सार सामावलेले आहे. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर भारताचे संविधान हे स्मृती या प्रकारात मोडणारे लिखाण आहे. कारण ते आताच्या काळाला लागू असून त्यामध्ये अनेक बदल वेळोवेळी करण्यात आलेले आहेत ते शाश्वत नाही. भारतीय धर्मशास्त्राने काळाची अप्रतिम व्याख्या केलेली असून पृथ्वीवर पुन्हा पुन्हा प्रलय होऊन नवीन मानवी संस्कृतीचा जन्म होत असतो व अशा अनेक संस्कृती आजवर निर्माण होऊन लोप पावलेल्या आहेत. हा सर्व कालखंड मोजण्याचे अत्यंत अचूक मोजमाप आपल्या कडे आहे.
    त्यातील सध्याचे जे मन्वंतर सुरू आहे त्या मन्वंतराचा अधिपती विवस्वान नावाचा एक राजा होऊन गेला. हा तो राजा असतो ज्याला परमेश्वर प्रत्यक्ष येऊन संस्कृती, धर्म ,राज्य ,मानवी व्यवस्था कशा चालवायच्या याचे ज्ञान थेट देतो.
    कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला ब्राह्मण लोक देश काल वर्तमानस्थिती चा उल्लेख करतात तो नीट ऐकत चला. त्यामध्ये कलियुगे भरत वर्षे भरतखण्डे
    गोदावर्या: अमुक तीरे हे सांगताना वैवस्वत मन्वंतरे असा उल्लेख करून आपल्याला जाणीव करून देत असतात की हे विवस्वान नावाच्या मनूचे मन्वंतर सुरू आहे. थोडक्यात आज आपल्याला जे जे म्हणून धर्माचे ज्ञान प्राप्त झालेले आहे ते थेट परमेश्वराने मनू द्वारे आपल्यापर्यंत पोहोचविलेला आहे. आता हे आम्ही म्हणतो का तर तसे नाही हे स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या सुरूवातीलाच आपल्याला सांगतात.
    *इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् । विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १ ॥*

    अर्थात भगवंत सांगतात की अर्जुना हे सर्व ज्ञान जे मी तुला आज देतो आहे ते या युगाच्या प्रारंभालाच मी विवस्वान नावाच्या मनूला दिलेले असून त्याने पुढे ते ज्ञान इक्ष्वाकु वंशामध्ये प्रक्षेपित केले .इश्वाकु वंशा पासूनच रामाचा रघुवंश उत्पन्न झालेला आहे ,हे लक्षात घेण्यासारखे आहे.

    ReplyDelete
  7. भाग३ : ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेवर केलेली टीका आहे. नवीन पिढीसाठी पुन्हा एकदा सांगतो टीका करणे या अर्थाने मराठी मध्ये आपण जो शब्द वापरतो त्याचा या टीकेची काही संबंध नाही. एखाद्या ग्रंथाचे विस्तृत विवेचन करणे त्यावर स्वतःचे भाष्य करणे याला टीका करणे असे म्हणतात. असो तर ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतात ?

    *मग देव म्हणे अगा पंडुसुता l हाची योगु आम्ही विवस्वता | कथिला परी ते वार्ताI बहुवा दिसांची ॥*
    *मग तेणे विवस्वते रवी I हे योगस्थिती आघवीI निरोपिली बरवी मनू प्रति॥*
    *मनूने आपण अनुष्ठिली I मग इक्ष्वाकुवा उपदेशिली I ऐसी परंपरा विस्तारिलीI आद्य हे गा॥*
    थोडक्यात माऊली आपल्याला स्पष्टपणे सांगतात की परमेश्वराने त्याचे सर्व ज्ञान सर्वप्रथम विवस्वान याला दिले. त्याने तेच ज्ञान त्याच्या पिढीमध्ये पुढे प्रसारित केले. व हे सर्व ज्ञान ज्या मनूला प्राप्त झाले त्याने स्वतः तो योगमार्ग अंगीकारला ,त्याचे अनुष्ठान केले व तो योग सिद्ध झाल्यावर तोच योग त्याने इक्ष्वाकु ला देऊ केला. आणि हेच ज्ञान रघु वंशांमध्ये पुढे प्रसारित झाले. हे ज्ञान देण्याची पद्धत पूर्वी ग्रंथरूपात ग्रथित केली जात असे. तो ग्रंथ म्हणजेच मनुस्मृती होय.

    ही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्यापर्यंत विस्तारलेली हिंदू धर्माची परंपरा जी आहे तिचे मूळ मनू पासून सुरु होते असे स्वतः माऊली सांगतात. यातील *आद्य* हा माऊलींनी वापरलेला शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे.
    कारण हा तोच शब्द आहे ज्याने ज्ञानेश्वरी ची सुरुवात माऊली करतात. *ओम नमोजी आद्या l वेद प्रतिपाद्याl जयजय स्वसंवेद्याl आत्मरूपाll*
    इतक्या महत्त्वाच्या शब्दाचा गैरवापर स्वतः ज्ञानेश्वर माऊली तरी करणार नाहीत. जो शब्द थेट आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यासाठी माऊली वापरतात, त्याच शब्दांमध्ये ते मनूचा देखील गौरव करतात यामध्येच सर्व सार आले. मग मनुस्मृतीला नंतरच्या काळामध्ये इतका विरोध का झाला असेल? त्याचे कारण इंग्रजांनी आपल्या स्वकीयांना हाताशी धरून केलेला मनुस्मृतीचा अपप्रचार होय. ह्या मनुस्मृतीमध्ये मुद्दाम होऊन काही अश्लाघ्य श्लोक घुसडण्यात आले व केवळ त्यांचाच प्रसार करून मनुस्मृती कशी खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला. आत्तासुद्धा भिडे गुरुजींच्या संपूर्ण भाषणातील केवळ एखादेच वाक्य उचलून त्याचा जसा गहजब माध्यमे करतात अगदी तीच पद्धत हे लोक त्या काळामध्ये वापरत होते. संदर्भाशिवाय जर आपण अशी आधली मधली वाक्ये उचलायला सुरुवात केली तर त्याने अर्थाचा अनर्थ होत असतो हे सांगायला कुठल्या तज्ञाची आवश्यकता नाही. इतिहासामध्ये एकदा अनैतिहासिक गोष्टी घुसडल्या की हळूहळू शेकडो वर्षांनी त्या इतिहासाचाच भाग होऊन जातात. आज ब्रिगेडी इतिहासकार शिवछत्रपतींची इतिहासाची जी मोडतोड करत आहेत ती पाहता तुमच्या सहज लक्षात येईल की अजून सात-आठशे वर्षांनी शिवाजी महाराज हे मुसलमान राजा होते असा सुद्धा इतिहास कायम होऊ शकेल. असो ज्या लोकांनी साक्षात ज्ञानेश्वर माऊलींना सोडले नाही तुकोबारायांना सोडले नाही शिवछत्रपतींना सोडले नाही त्या प्रवृत्ती भिडे गुरुजींना सोडतील अशी अपेक्षा करणेच गैरलागू आहे. सुदैवाने तुकोबारायांनी त्यांना तत्कालीन पुरोगामी लोकांकडून होत असलेल्या त्रासाचे रीतसर वर्णन करून ठेवलेले आहे ते मुळापासून वाचण्यासारखे आहे आणि तुकाराम महाराज त्या लोकांचे पुढे काय होईल ते सांगता ते ही वाचावे.

    *पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथे मी विठ्ठला काय बोलो ॥ १ ॥*
    *कांद्याचा खाणारा चोजवी कस्तुरी । आपण भिकारी अर्थ नेणे ॥ २ ॥*
    *न कळे ते मज पुसती छळूनी । लागता चरणी न सोडती ॥ ३ ॥*
    *तुझ्या पायाविण दुजे नेणे काही । तूची सर्वांठायी एक मज ॥ ४ ॥*
    *तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलो भांडा वादकांशी ॥ ५ ॥*

    कलियुगी कवित्व करिती पाखांड । कुशल हे भांड बहू झाले ॥ १ ॥
    द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडी । मुखे बडबडी कोरडेचि ॥ २ ॥
    दंभ करी सोंग मानावया जग । मुखे बोले त्याग मनी नाही ॥ ३ ॥
    वेदाज्ञे करोनी न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनि ॥ ४ ॥
    तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसे ॥ ५ ॥

    नाहीं आह्मी विष्णुदास । करीत आस कोणांची ॥1॥ कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ध्रु.॥ असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥2॥ तुका ह्मणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥3॥

    ReplyDelete
  8. अंतिम भाग :राहता राहिला विषय सुवर्ण सिंहासनाचा तर त्याबाबत सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घ्यावी. रयतेचे कल्याण करावे हे शिवाजी महाराजांना सुद्धा कळत होते तरीसुद्धा त्यांनी 32 मण सोने खर्च करून सिंहासन उभे केलेच . कारण सिंहासन हे प्रतीक असते. भारताच्या राष्ट्रपतींना राहण्यासाठी एवढा मोठा 40 दरवाजे असलेला महाल कशाला हवा आहे ? कारण राष्ट्रपती हे प्रथम नागरिकाचे प्रतीक असते. त्याचप्रमाणे राजा हा संपूर्ण प्रजेचा पालक मानला जातो त्यामुळे सिंहासन व त्याची सर्व बिरुदे ही प्रतीकात्मक असतात. आपल्या देशावर परकीयांनी आक्रमणे केली हे जर मान्य असेल तर त्यांनी ठरवून पृथ्वीराज चव्हाणचे सिंहासन तुकडे तुकडे करुन फेकून दिले हे मान्य करायला हरकत नाही. व तीच सल तीच बोध मनात बाळगत शिवछत्रपतींनी पुरेशी ताकद प्राप्त झाल्यावर हिंदूंचे तख्त पुन्हा एकदा विश्वामध्ये उभे करून दाखविले ते या सिंहासनाच्या रूपाने. शिवछत्रपतींच्या माघारी झुल्फिकारखानाने त्या सिंहासनाचे पुन्हा तुकडे-तुकडे करून टाकून दिले. हे तुकडे सिंहासन नावाच्या एका फर्निचर चे तुकडे नसतात तर ते तुमच्या प्रतीकाचे पर्यायाने तुमच्या अस्मितेचे स्वाभिमानाचे तुकडे असतात. अर्थात ज्यांना स्वाभिमान वगैरे गोष्टी समजतात त्यांना त्यातले वर्म कळू शकेल. केवळ सिंहासन उभे राहिल्यावर गुरुजींचे काम संपणार नसून उलट ती कार्याची सुरुवात आहे. दररोज प्रत्येक तालुक्यातील दोन हजार मुले जेव्हा सिंहासनाला जागता पहारा देण्याच्या निमित्ताने रायगडावर अनवाणी चढत येतील आणि तिथल्या मातीचा स्पर्श त्यांच्या शरीराला होईल सकाळी भरघोस व्यायाम करून नंतर शिवचरित्राचे पारायण करून एक संपूर्ण दिवस निर्व्यसनी राहून उदात्त विचारांच्या संपर्कात ती मुले जेव्हा राहतील तेव्हा निश्चितच त्यांच्या आयुष्याला काहीतरी नवी दिशा मिळेल आणि कुठल्याही कार्यात हात घातल्यावर यश मिळवण्याची एक विजिगीषू वृत्ती त्यांना तेथे प्राप्त होईल जी कुठल्याही एका फडतुस नोकरीपेक्षा कैकपटीने श्रेष्ठ आहे. गुरुजींचे धारकरी आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये यशस्वी आहेत. फक्त त्याची कुठे जाहिरात ना धारकरी करतात ना गुरुजी करतात. आज गुरुजींना जो काही विरोध होतो आहे त्याचे महत्त्वाचे कारण सिंहासनाचा हा प्रकल्प हाच आहे. आजपासून पन्नास वर्षांनी दिसणारा महाराष्ट्र हा पूर्णपणे वेगळा असेल आणि त्याचे मूळ स्थान हे 32 मण सोन्याचे सिंहासन असणार आहे यात आम्हाला कोणतीही शंका वाटत नाही. गुरुजींना विरोध करण्यापेक्षा गुरुजींच्या या उदात्त कार्यामध्ये जर आपण सर्व सहभागी झालो तर ते कार्य अधिक गतीने पूर्णत्वाला नेता येईल. कारण तुम्ही विरोध केलात तर तुमच्या शिवाय हे कार्य तडीला जाणार आहेत यात शंकाच नाही.

    ReplyDelete
  9. भाग४ :
    तात्पर्य हेच की गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे कोणाला चांगले वाटावे म्हणून काही बोलत नाहीत. तर जे जे आपल्या पूर्वजांनी चांगले ,उत्तुंग, उदात्त विचार मांडून ठेवले आहेत तितकेच ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. आत्ता भिडे गुरुजींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे लोक हे तुकाराम महाराजांचे किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे समर्थक नसून हे तेच लोक आहेत हे एकेकाळी ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण असल्यामुळे वारकरी संत असू शकत नाहीत असे म्हणून ज्ञानदेव तुकाराम म्हणायच्या ऐवजी नामदेव तुकाराम म्हणा असा वारकऱ्यांना सल्ला देत होते. आज स्वतःला बुद्धिवादी समजणारे आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काही लोक समाजामध्ये दिसतात जे संविधानालाच आपला धर्मग्रंथ मानतात आणि देशालाच देव मानतात त्या लोकांना असेच आवर्जून सांगावेसे वाटते की आपण केवळ देशापुरता विचार न करता अखिल मानवजातीचा विचार केला पाहिजे. *हे विश्वची माझे घरl ऐसी मती जयाची स्थिरl किंबहुना सचराचर l आपणचि जाहलाll* असे कळवळून सांगणाऱ्या माऊलींचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला अजिबातच नाही. केवळ काही लोक मनुस्मृती जाळतात हे लक्षात ठेवणाऱ्या तुम्ही कधी मनु सुद्धा वाचलेला नाही ,ज्ञानेश्वर सुद्धा वाचलेले नाहीत आणि तुकाराम सुद्धा तुम्हाला कळलेले नाहीत. त्यामुळे भिडे गुरुजी काय आहेत हे जाणण्याचा तुम्हाला अधिकारच नाही .कारण तुम्हाला कळलेले भिडे गुरुजी हे अलीकडच्या दोन-तीन वर्षांच्या माध्यमातील गदारोळामुळे कळलेले आहेत, तर आम्हाला कळलेले गुरुजी हे वर्षानुवर्षांच्या सहवासातून आणि त्यांच्या प्रत्यक्ष *बोले तैसा चाले* या आम्हाला आलेल्या अनुभवातून जाणिवेत उतरलेले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही गुरुजींना उपदेशाचे डोस पाजत बसण्यापेक्षा गुरुजींच्या पायाशी बसून किंवा त्यांच्या सोबत सह्याद्रीच्या गडकोटांची भटकंती करून थोडेफार ज्ञान पदरामध्ये पाडून घेता आले तर तुम्ही गुरुजींचे समकालीन असल्याचा काही लाभ करून घेतला असे म्हणता येईल, नाहीतर तुकाराम महाराजांच्या समकालीन धर्ममार्तंडां मध्ये आणि तुमच्या मध्ये फारसा काही फरक राहणार नाही. गुरुजी नेहमी म्हणतात ते या प्रकारांमुळे पटते.
    विश्वाचा आकार केवढा?ज्याच्या-त्याच्या मेंदू एवढा !

    ReplyDelete
    Replies
    1. Aapan atishay Sundar Ani marmik vishleshan kelela aahe.tya baddal apale Manapasun aabhar aani abhinandan.Hindu dharmatil je kahi udatta Ani bhavya aahe tyachi apratim mahiti aapan dilit.specially MANU baddal.Dhanyawad.

      Delete
    2. फार छान विश्लेषण केलेत. धन्यवाद.

      Delete
  10. He khar. Je Lok varkari lokana shivya dyayche jyana varkari don divas punyat rahatat mhanje adchan vataychi te ata vari baddal boltat

    ReplyDelete
  11. भाऊ खूप योग्य लिहिलंय तुम्ही

    ReplyDelete
  12. संतांचा व वारीचा मनापासून राग करणारी ही पुरोगामी बांडगुळं भिडगुरुजी प्रकरणात प्रो-वारकरी कसे होतात?
    पोकळ बांबूचे फटके हाच उपाय आहे.
    भाऊनसारखी मंडळी तो उपाय करायला वेळ लावत नाहीत ह्याचा संतोष आहे.

    ReplyDelete
  13. मूळ मनुस्मृृतीचे मराठी भाषांंतर ऊपब्ध आहे का? असल्याास काय नावाने ?कोठे मिळेल?

    ReplyDelete
    Replies
    1. Swami vardanand bharati yanchi manusmutri war marathi tika uplabdh aahe.
      Manismruti cha aadhar bharata chi rajya ghatana, hindu code bill tayar karanya sathi dekhil ghetala gela aahe.

      Delete