Monday, July 16, 2018

दलित पॅन्थरचा कालखंड

namdeo dhasal के लिए इमेज परिणाम

ज. वि. पवारच्या पंच्याहत्तरी निमीत्ताने काल जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेक गोष्टी आठवल्या. प्रामुख्याने मध्यंतरीच्या काळात आंबेडकरी चळवळीतील जे काही बदल वा उलथापालथी चालू आहेत, तेव्हा अशा गोष्टी आठवतच होत्या. भीमा कोरेगावच्या आधी पुण्यात एक परिषद भरवली होती आणि तिथे बाबासाहेबांचे नाव पुढे करून अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या/ मग ही चळवळ माओवादी वा नक्षली लोक काबीज करायला निघाल्याचाही आरोप झाला होता. तसे त्यात नवे काहीच नाही. बाबासाहेबांच्या मागे पोरक्या झालेल्या त्यांच्या अनुयायांना व पाठीराख्यांना आवश्यक तितके समर्थ नेतृत्व मिळू शकले नाही आणि त्यातले अनेकजण आमिषाला बळी पडत गेले होते. तो इतिहास साठ वर्षे जुना आहे. त्याचा साग्रसंगीत समाचार जविने आपल्या ‘आंबेडकरोत्तरी आंबेडकरी चळवळ’ या ग्रंथमालेत घेतलेला आहे. तेव्हा शेड्युल कास्ट फ़ेडरेशन हा देशातला एक मोठा समर्थ राजकीय प्रवाह होता आणि तिसर्‍या लोकसभेत त्याचे दोन अकडी सदस्यही निवडून आलेले होते. त्यांनाच पुढल्या काळात रिपब्लिकन पक्षाचे म्हणूनही ओळखले गेले. राजकीय जागरुकता आजच्या इतकी प्रभावी नसतानाचे त्या चळवळीचे स्वरूप अनेक राजकीय पक्षांना भयभीत करून सोडणारे होते आणि म्हणूनच या चळवळीचे लचके तोडण्याचे प्रयास तेव्हाच सुरू झालेले होते. त्याची प्रसंग व तारीखवार नोंद जविने केलेली आहे. पण काल मला आठवलेला प्रसंग म्हणजे दलित पॅन्थरला झालेली दुफ़ळीची बाधा. ऐनभरात ही दलित तरूणांची संघटना असताना डाव्यांच्या एका मोर्चात सहभागी झालेल्या नामदेव ढसाळने आपण हाडाचे कम्युनिस्ट असल्याचे वक्तव्य केले आणि पॅन्थरला घरघर लागलेली होती. त्या एका वाक्याने या संघटनेच्या नेत्यांमध्ये वाद माजवला व त्याचा परिपाक झुंजार संघटनेच्या दुफ़ळीत झाला होता.

आज प्रकाश आंबेडकर नक्षली वा माओवादी विचारांचे समर्थन करताना हिरीरीने त्याच्याशी आंबेडकरी चळवळीची नाळ जोडू बघत असतात आणि इतरही अनेक डाव्या चळवळीचे विचारक अभ्यासक त्याचे धागेदोरे शोधत असतात. पॅन्थरच्या त्या काळात विविध युवक संघटनांची एक संघर्ष समिती होती आणि त्यात नव्या पॅन्थरची भर पडलेली होती. त्या समितीत अनेक संघटनांचे प्रतिनिधी होते. त्यांची बैठक दादरच्या डी. एल. वैद्य रोडवर समाजवादी पक्षीय भाडेकरू संघटनेच्या ‘हृदगत’ या कार्यालयात व्हायची. अशाच एका बैठकीला नामदेवच्या आग्रहाने गवळे-मोरे अशा दोघा दलित तरूणांचा छोटेखानी सत्कार आम्ही केलेला होता. मराठवाड्यात कुठल्याशा गावात दलितांचे डोळे फ़ोडण्याची हिडीस अमानुष घटना घडलेली होती. त्यावर विधानसभेत आवाज उठवला जावा, म्हणून या दोन तरूणांनी धुमाकुळ घातला होता. माटुंगा लेबर कॅम्पातील या दोघांनी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून पत्रके विधानसभा गृहात टाकली होती आणि म्हणून हक्कभंगाचा प्रस्ताव आणुन दोघांनाही शिक्षा ठोठावण्यात आलेली होती. पण हे तरूण पॅन्थरचे नव्हते, तर रिपब्लिकन पक्षाचेच कार्यकर्ते असावेत. तर त्यांच्या त्या छोट्या सत्कारासाठी दोघेही निळ्या टोप्या घालून आलेले होते आणि त्यावेळच्या भाषणात नामदेव वारंवार त्या दोघांचा उल्लेख ‘कॉम्रेड’ गवळे-मोरे असा करीत असल्याने ते कमालीचे अस्वस्थ झालेले होते. आज जितक्या सहजपणे अनेक आंबेडकरी विचारक कम्युनिस्ट चळवळीशी बाबासाहेबांच्या विचारांसी नाळ जोडतात, ती किती फ़सवी आहे, त्याचा तो नमूना होता. मग पुढे नामदेवच्या त्या वादग्रस्त वक्तव्याने पॅन्थरला भगदाड पडले होते. ‘हाडाचा कम्युनिस्ट’ अशी भाषा केल्यावर नामदेव माघार घ्यायला राजी नव्हता आणि राजा ढाले व अन्य पॅन्थर नेत्यांनी तो विषय कळीचा बनवला होता. त्यातून मग जाहिरनामा की नामा-जाहीर असाही विवाद रंगला होता.

पॅन्थरच्या आरंभीच्या काळात एक निवेदनवजा छोटी भूमिका पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आलेली होती. पॅन्थरचा जाहिरनामा असे त्याचे स्वरूप होते आणि त्यात ढोबळ मानाने राजकीय सामाजिक भूमिका त्यात होती. जो जो गरीब तो तो दलित, असे त्याचे ढोबळ स्वरूप होते. पण नामदेवने हाडाचा कम्युनिस्ट असे शब्द वापरले आणि पराचा कावळा होऊन गेला. अर्थात त्याचा लाभ उठवण्यासाठी कॉग्रेस एका बाजूला व कम्युनिस्ट दुसर्‍या बाजूला, अशा दोन्हीकडून पॅन्थरचे लचके तोडण्याचे प्रयास झाले. आधीही रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वा सत्तेची पदे व आमिष दाखवून मुळची रिपब्लिकन चळवळ खिळखिळी करून टाकण्यात आलेली होती. त्या मरगळीतून जो आंबेडकरी विचारांचा नवा धुमारा फ़ुटला, तो पॅन्थर होता, तर अवघ्या दिडदोन वर्षात त्यालाही तेच दुहीचे ग्रहण लागले आणि दुफ़ळीच्या त्या आगीत तेल ओतण्याचे काम प्रस्थापित राजकीय पक्षांनी केलेले होते. हा वाद इतक्या टोकाला गेला, की नामदेवच्या समर्थकांनी राजा ढाले व अन्य पॅथर नेत्यांना हाकलण्याची घोषणा केली. तर त्या गटाने नामदेवला बाजूला करून टाकले. अजून बाळसेही न धरलेल्ल्या एका धगधगत्या संघटना व चळवळीचे असे तुकडे होऊन गेले. पण ते कशामुळे झाले? तर बाबासाहेबांचा विचार कम्युनिस्ट भूमिका वा विचारांचा समर्थक नाही, म्हणून झालेले होते. राजा ढाले हा त्यातला सर्वाधिक अभ्यासक होता आणि त्याच्या संशोधक वृत्तीने सतत कम्युनिस्ट विचारांचा विरोध केला होता. नामदेव प्रत्यक्ष चळवळी व आंदोलनाचा पुत्र होता. त्याला वैचारिक काथ्याकुट करण्यापेक्षा वेगाने सामाजिक राजकीय बदलाचे वेड होते. अशा संघर्षात पॅन्थरचा बळी पडला आणि त्याला कम्युनिस्ट व कॉग्रेसचा हातभार लागला. नंतरच्या काळात रिपब्लिकन ऐक्याचे नारे घुमत राहिले आणि आणखी आणखी गटतट पडत गेले.

आर जी रुके या दुय्यम आंबेडकरी नेत्याने १९६७ सालात कॉग्रेस सोबत युती करण्याच्या विरोधात मांडलेली भूमिका खुप नेमकी होती. अशा युतीसाठी झालेल्या एका बैठकीत रुके म्हणाले होते, ‘आज आपला पक्ष स्वाभिमान आणि आंबेडकर निष्ठा बाळगून आहे. कारण कार्यकर्त्यासमोर कुठल्याही प्रकारचे आमिष नाही. ते सत्तेपासून दूर आहेत म्हणूनच ते ताठ आहेत. कॉग्रेसच्या आहारी आपण गेलो तर कार्यकर्त्यांना स्वार्थाची लागण लागेल. त्याच्या स्वार्थापुढे पक्षहित नगण्य ठरेल. त्यांना एकदा सत्तेच्या सावलीत बसायची सवय लागली, की मग त्यांची आपण सुटका करू शकत नाही. सत्तेसाठी स्पर्धा नाही म्हणून कार्यकर्त्यांमध्ये बंधूभाव आहे. उद्या सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली, तर एकमेकांचे गळे कापायला हेच कार्यकर्ते मागेपुढे पहाणार नाहीत. बाबासाहेबांच्या विचारप्रणालीची जागा कॉग्रेस घेई्ल आणि मग आपल्या पक्षात बजबजपुरी माजेल. हे नाकारायचे असेल तर येत्या जिल्हा परिषद निवडणूकीत कॉग्रेस बरोबर युती करू नये. युती केली तर तो आपल्याच पायावर आपण धोंडा मारून घेतला असे होईल आणि आत्मनिर्भर आंबेडकरी चळवळ संपुष्टात येईल.’ त्याचेच प्रत्यंतर वारंवार येत राहिले आहे आणि आज त्याचे स्मरणही कोणाला राहिलेले नाही. बाबासाहेबांचे नातु प्रकाश आंबेडकरच अशा कुठल्याही वैचारिक भेसळीला वा तिलांजलीला समर्थन देताना दिसत आहेत. बाबासाहेबांच्या विचारसरणीला बाजूला सारून माओवाद हीच आंबेडकरी विचारसरणी असल्याचे ठणकावून सांगितले जाते, तेव्हा रुकेंची आठवण येते आणि अशा शेकड्यांनी प्रसंगांची नोंद करून ठेवणार्‍या जविच्या मेहनतीचे कौतुक वाटते. आपला वारसा व आपला इतिहास विसरलेल्यांना भविष्य उभे करता येत नाही. आज पुन्हा एकदा उभारी घेणार्‍या नव्या पिढीतला दलित तरूण भरकटत गेला, तर मग आंबेडकरी चळवळीचे भवितव्य काय असेल?

2 comments:

  1. रस्त्यावर धांगडधिंगा घालून सर्व समाजाला वेठीस धरणारे लोक , वाचन वगैरे भानगडीत पडत नसतात. त्यांना समजणारी भाषा वेगळी असते. आंबेडकरांचे साहित्य त्यापैकी किती जणांनी वाचले असेल ?

    ReplyDelete
  2. हा लेख खूपच आवडला. हे लेखन केवळ आंबेडकरी चळवळीला लागू नसून कोणत्याही चलवळीला लागू होते असे वाटते.

    सुनील

    ReplyDelete