Wednesday, July 18, 2018

मोदींचा बाजारभाव

manish tiwari tweet के लिए इमेज परिणाम

तिकीटावरून कळते मोदींची 'मार्केट व्हॅल्यू'- तिवारी
नवी दिल्ली - हैदराबाद येथे पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला पाच रुपये तिकीट ठेवल्याने, यावरून त्यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे हे कळते, अशी खोचक टीका केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचे प्रचारप्रमुख असलेले नरेंद्र मोदी यांची 11 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी पाच रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. त्यामुळे भाजपवर काँग्रेस नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. तिवारी म्हणाले, ''एखाद्या बाबाचे प्रवचन ऐकण्यासाठीही आता १०० ते हजार रुपयांपर्यंत तिकीट खरेदी करावे लागते. एखादा चित्रपट पाहण्यासाठीही २०० ते ५०० रुपयांपर्यंतचे तिकीट काढावे लागते. मात्र, एका फ्लॉप वक्त्याचे भाषण ऐकण्यासाठी फक्त पाच रुपयांचे तिकीट काढावे लागत आहे. यावरून मोदींचे मार्केट व्हॅल्यू किती आहे, हे कळून येते.''

पाच वर्षापुर्वी म्हणजे नेमकी तारीख सांगायची तर १६ जुलै २०१३ रोजी, सकाळ दैनिकात प्रसिद्ध झालेली ही बातमी माझ्या फ़ेसबुक पेजवर मी टाकली होती. फ़ेसबुक अशा जुन्या आठवणी अधूनमधून जाग्या करून देत असते. त्यामुळे ती वाचनात पुन्हा आली. तेव्हा मनिष तिवारी मनमोहन सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि बोलघेवडे नेता म्हणून ओळखले जात होते. अलिकडे त्यांची वाचाळता खुप कमी झाली आहे, किंवा पक्षाने त्यांच्या तोंडात बोळा कोंबलेला असावा. पण पाच वर्षापुर्वी कॉग्रेसच्या घाताचा पाया कोणी व कसा घातला होता, त्याचा हा पुरावा आहे. आज त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते आहे, म्हणून त्या बातमीला महत्व आहे.

तेव्हा म्हणजे २०१३ सालच्या जुलै महिन्यात भाजपाने नरेंद्र मोदींना आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणूनही घोषित केलेले नव्हते. फ़क्त प्रचारप्रमुख म्हणून नेमले होते. त्याच भूमिकेत मोदी हळूहळू देशाच्या इतर राज्यात जाऊन आपल्या लोकप्रियतेची चाचपणी करीत होते. अशाच एका जाहिरसभेचे आयोजन तात्कालीन आंध्राच्या राजधानीत एका स्टेडीयममध्ये करण्यात आलेले होते. मार्केटींगच्या ज्या विविध पद्धती असतात, त्याचा हा वापर होता. म्हणूनच तिथे नुसती गर्दी जमवण्यापेक्षा त्या सभेसाठी पाच रुपये तिकीट लावण्यात आलेले होते. त्यातून मोदींच्या लोकप्रियतेचा गवगवा करण्याची संधी भाजपाला साधायची होती. त्यालाही एक कारण होते. नाशिक येथे एका सभेसाठी सोनिया गांधी येणार होत्या आणि त्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी पैसे मोजून महिला गावकर्‍यांना गोळा करण्यात आल्याची बातमीही गाजलेली होती. या महिलांना खाऊनपिऊन शेदोनशे रुपये वगैरे द्यायचे मान्य करून आणलेले होते. पण सभा संपल्यावर पैसे मिळाले नाहीत, म्हणून त्या गावकर्‍यांनी राडा केला होता आणि त्याची पोलिसात तक्रारही झालेली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या सभेला पैसे द्यावे लागत नाहीत, तर लोक तिकीट काढून मोदींना ऐकायला येतात, असा भुलभुलैया भाजपाच्या व्यवस्थापकांना उभा करायचा होता. सहाजिकच त्यासाठी हे किरकोळ तिकीट लावण्यात आलेले होते आणि बहुतांश तिकीटे परस्पर कार्यकर्त्यांनीच घाऊक खरेदी केलेली होती. त्यात नाक खुपसण्याची तिवारींना गरज नव्हती. पण हात दाखवून अवलक्षण करणार्‍यांनाच कॉग्रेसमध्ये नेता मानायची प्रथा असल्याने, तिवारींनी आपले कर्तव्य पुर्ण केले. त्या तिकीटावरून मल्लीनाथी केलीच. मोदींचा बाजारभाव किती ते त्यांनी आपल्या पांडित्यपुर्ण भाषेत सांगितलेले होते व पुढे लढायची वेळ आली, तेव्हा शेपूट घालणारा पहिला नेता तिवारीच होते.

तिवारींची ही प्रतिक्रीया जुलै २०१३ ची आहे. पण २०१४ चा मार्च एप्रिल उजाडला, तेव्हा हा इसम पंजाबमधून लोकसभेसाठी आपल्या हक्काच्या जागेवरही लढायला तयार नव्हता. पक्षाने तिकीट देण्यापुर्वीच उमेदवारी नाकारून आपला बाजारभाव दिवाळखोरीत गेल्याचे त्यानेच जाहिर केले होते. तिवारीच कशाला तेव्हाचे अर्थमंत्री चिदंबरम यांनीही आपल्या पक्षातर्फ़े लोकसभेला उभे रहायचे आमंत्रण नाकारले होते. मुद्दा असा, की बाकीच्या वेळी राणा भीमदेवी थाटाच्या वल्गना करणार्‍या अशा नेत्यांनी खरोखर लढायची वेळ आली, मग कॉग्रेसला सातत्याने दगा दिलेला आहे. पडायची शक्यता असतानाही जे लढायला उभे रहातात वा पुढे येतात, ते खरे नेता असतात. कॉग्रेसमध्ये अशा नेत्यांचा दुष्काळ सुरू झाला, तिथून त्या पक्षाला घरघर लागलेली आहे. तेव्हा असे लोक काय काय वल्गना करीत होते, ते आज त्यांच्याही स्मरणात राहिलेले नसावे. भारत म्हणजे गुजरात नाही. मोदींना गुजरातबाहेर कोण ओळखतो? अशा शेलक्या भाषेत बोलणारे आज काय मुक्ताफ़ळे उधळत असतात? आम्ही सगळे पुरोगामी पक्ष एकत्र येऊन मोदींना पराभूत करणार. कोणी थांबवले आहे? २०१४ मध्येही त्यांना एकत्र येण्यापासून मोदींनी रोखलेले नव्हते. आजही रोखलेले नाही. मुद्दा एकत्र यायचा वा मोदींना रोखण्याचा नसून, मैदानात उतरून प्रतिस्पर्ध्याला भिडण्याचा असतो. तेव्हा इतका आवेश हे लोक दाखवून मोदींची खिल्ली उडवत होते. पण आपल्याच घरी पंजाबच्या मतदारसंघात उभे रहाण्यापासून तिवारींनी पळ काढला होता आणि नरेंद्र मोदी थेट उत्तरप्रदेशात येऊन वाराणशीला लोकसभेची निवडणूक लढायला सरसावलेले होते. पण त्याचाही अर्थ समजून घ्यायची या शहाण्यांना गरज वाटली नाही की आज आपली इतकी दुर्दशा कशाला झाली आहे, त्याचा विचार करायची इच्छा होत नाही. यापेक्षा पुरोगाम्यांच्या पराभवाची आणखी कसली हमी द्यायला हवी आहे?

शत्रूला कमी लेखून कधी लढता येत नाही. आपली तयारी किती पक्की आहे, त्याचीही पुर्वचाचणी करूनच मैदानात उतरावे लागते. तर लढता येत असते आणि लढलात तर जिंकता येत असते. जिंकण्याची शक्यता लढण्यातून निर्माण होत असते. मोदींना आपल्या जिंकण्याच्या शक्यतेपेक्षाही विरोधकांच्या पराभूत मानसिकतेची अधिक खात्री आहे. किंबहूना तेच तर मोदींच्या विजयाचे गमक होऊन गेलेले आहे. जिथे अशी वाचाळता झाली नाही, तिथे मोदी व भाजपाला पराभवाची चव चाखावी लागलेली आहे. लोकसभेत मार खाल्ल्यावर शहाणा झालेल्या केजरीवालांनी फ़ुशारक्या मारण्यापेक्षा दिल्लीत नव्याने मोर्चेबांधणी केली आणि मोदी-शहांना विधानसभेत धोबीपछाड देऊन दाखवला होता. तीच कथा बिहारमध्ये नितीशकुमार यांची होती. तोंडाची वाफ़ दवडण्यापेक्षा त्यांनी लालू व कॉग्रेस यांना सोबत घेऊन मैदान आखून घेतले आणि भाजपाचा दणदणित पराभव केला होता. पण आज त्याचा कुठेही देशभर मागमूस दिसत नाही. प्रत्येक पुरोगामी पक्षाची इंजिने तोंडाच्या वाफ़ेवर दौडवली जात आहेत आणि मोदी पुन्हा एकदा देशाच्या विविध महानगरात राज्यात जाऊन लोकसभेसाठी चाचपणी करू लागलेले आहेत. विरोधक हात गुंफ़ून उंचावून आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने रंगवित आहेत. तर मोदी-शहा जमिनीला हात लावून आपली जमीन चा़चपून बघत आहेत, नेमकी हीच स्थिती २०१३ मध्ये होती आणि २०१४ चे निकाल लागले, तेव्हा तोडपाटिलकी करणार्‍यांचे डोळे पांढरे झालेले होते. आज तिवारींची जागा शशी थरूर यांनी घेतली आहे, इतकाच काय तो फ़रक आहे. पुरोगाम्यांना म्हणूनच मोदी मनोमन शुभेच्छा देत असतील. कारण अशाच दिवाळखोरांच्या पराक्रमाने मोदींच्या विजयाचा मार्ग प्रशस्त होत असतो. तिवारी थरूर इतिहासजमा होतात आणि मोदी-शहा इतिहास घडवला म्हणून मिरवू शकतात. मग २०१९ कोणते रंग उधळत येईल?

4 comments:

 1. आणि २०१९ मध्ये म्हणतील थरूर चे वक्तव्य काँग्रेस ला भोवले जसे अय्यर चे २०१४ मध्ये ,मोदी देशभरात जातायत तसेच विविध लाभार्थींशी रोजच संवाद करतायत आणि भाजप पक्ष म्हणून थरूर ला उत्तर पण देतेय .

  ReplyDelete
 2. Apratim visleshan. Tumhi ekte patrakar ahat ki jyanna political hawa khhoop agodar samju Shakti. Dhanyawad

  ReplyDelete
 3. I used to purchase Marmik in 1995 to 1999 regularly. I used to read Bhai torsekar lekh very first.

  ReplyDelete
 4. अत्यंत मार्मिक!

  ReplyDelete