Thursday, July 5, 2018

२०१९ ची जमवाजमव

modi shah के लिए इमेज परिणाम

मोदी विरोधातील सर्वपक्षीय एकमेव आघाडी उभी करण्याचे विविध प्रयत्न जोरात चालू आहेत आणि त्यात बिघाडी करायचेही प्रयास त्याच विरोधी पक्षातील काही नेते करत आहेत, अशावेळी या एकत्रित विरोधी पक्षाला भाजपा कसा सामोरा जाणार आहे? असा प्रश्न अनेक राजकीय अभ्यासकांना सतावत असतो. तर त्याचे उत्तर सोपे आहे. पण ते शोधायची अभ्यासकांना अजिबात गरज वाटत नाही, हीच भारतातील अभ्यासकांची मोठी गंमत आहे. अशी उत्तरे कुठल्या गाईड नामक पुस्तकात मिळत नसतात. ती आसपास कुठेतरी सांडलेली असतात आणि शोधली तर नक्की सापडत असतात. त्यापैकी एक उत्तर खुद्द भाजपाच्या अध्यक्ष अमित शहांनीच पत्रकार परिषदेतून दिलेले आहे. पण त्याकडे डोळसपणे बघायची किती अभ्यासकांना गरज वाटलेली आहे? मोदी सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्यावर अमित शहांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे मोदी सरकारचे गुणगान केले आणि ती प्रथाच असते. कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष स्वपक्षीय सरकारचा नाकर्तेपणा कथन करण्यासाठी पत्रकारांशी बोलत नसतो. पण त्याच वेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना शहांनी एक लक्षणिय गोष्ट सांगितली होती. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास तिला भाजपा कसा सामोरा जाणार, असा प्रश्न होता. शहांनी त्याला गुगली सारखे उत्तर दिले होते. विरोधी पक्षांनी काय करावे, ते मला ठरवता येणार नाही. मी भाजपाचा गाडा हाकत असतो आणि आमचे लक्ष्य २०१९ साठी ५० टक्के मते मिळवण्याचे आहे, असे शहांनी सांगितले होते. त्याचा फ़ारसा कुठे उहापोह झाला नाही किंवा चर्चाही रंगल्या नाहीत. पण त्याच उत्तरात भाजपाची पुढल्या लोकसभेची रणनिती दडलेली आहे. ती रणनिती मोदी ३१ टक्के मतांवरच पंतप्रधान झाले, त्या गृहीताला छेद देण्याची आहे.

मागल्या लोकसभेत एनडीए म्हणजे भाजपाप्रणित आघाडीला ३४० जागा व ४३ टक्के मते मिळालेली होती. त्यापैकी भाजपाला २८२ जागा व ३१ टक्के मते मिळालेली होती. म्हणजेच भाजपा वा मोदी ३१ टक्के मतांवर सत्ता संपादन करू शकले, हे गृहीतच खोटे आहे. अशा खोट्या गृहीतावर विरोधी पक्षांची रणनिती आखलेली असेल, तर तिची फ़सगत नक्की होणार. कारण मोदींच्या नावावर वा नेतॄत्वावर शिक्कामोर्तब करण्यासाठीच एनडीएतील पक्ष एकवटलेले होते. त्यातील भले पाचसहा टक्के मते त्या त्या पक्षाची असतील. पण जवळपास तितकीच मते मोदींच्याही नावावर मित्र पक्षांना मिळालेली आहेत. म्हणजेच आजही स्वबळावर भाजपा मैदानात असेल, तर त्याला ३० टक्क्याहून अधिक म्हणजे ३५ टक्केपर्यंत मते मिळवता येउ शकतात. शहा यांचे गणित तो टक्का ४० पार नेऊन ४२-४३ असा करायचे आहे. स्वातंत्र्योत्तर काळात नेहरू वा इंदिराजींनाही यापेक्षा अधिक मतांचा टक्का मिळवता आलेला नव्हता. कितीही आघाड्य़ा केल्या व मतविभागणी टाळण्याचे प्रयोग केले, म्हणून कॉग्रेस पराभूत होऊ शकलेली नव्हती. मग आज भाजपाने तितक्या मतांचा टक्का गाठला, तर त्याला बहूमताला वंचित रहावे लागेल काय? शहा यांनी मांडलेले समोकरण हे नेहरू-इंदिरा गांधी यांच्या काळातली रणनिती आहे. अर्थात इतका मोठा पल्ला गाठणे सोपे नाही, की सहजशक्यही नाही. म्हणून मग पल्ला मोठा ठेवायचा आणि तेवढा गाठताना त्याच्या जवळपास पोहोचण्याचा हेतू बाळगायचा, ही शहांची रणनिती आहे. ५० टक्के ठरवले तर ४० टक्के पार करणे शक्य आहे, असे त्यामागचे गृहीत आहे. त्यानुसार मग रणनिती व डावपेच आखले जात आहेत. मागल्या चार वर्षात शहांची खरी रणनिती मतदान वाढवण्याची राहिली आहे. आताही त्याच मार्गाने ते चालत आहेत. मग विरोधी पक्ष काय करतील, त्याची त्यांना फ़िकीर नाही.

आपल्याला आठवत असेल तर गतवर्षी राष्ट्रपती पदाच्या निवडणूका झालेल्या होत्या आणि तिथे भाजपाला शह देण्यासाठी राहुलना बाजूला ठेवून सोनिया गांधींनी सुत्रे हाती घेतलेली होती. त्यांनी सर्व विरोधी पक्षांच्या तीन बैठका दोन महिने आधीपासून घेतलेल्या होत्या. पण त्यांना सर्व पक्षांच्या वतीने एकमेव उमेदवार उभा करणार, इतकेही निश्चीत करता आले नाही. भाजपा काय करतोय, याची प्रतिक्षा करण्यात वेळ गेला आणि अखेरीस भाजपाने रामनाथ कोविंद यांचे नाव जाहिर केल्यावर कॉग्रेस व इतरांना दलित उमेदवार शोधण्याची पळापळ करावी लागली होती. आताही विरोधकांची तीच तारांबळ आहे. आपापल्या प्रभावक्षेत्रात कसे जिंकावे, याचा अभ्यास व डावपेच आखण्यापेक्षा, ते भाजपाला रोखण्याच्या मनसुब्यात रंगून गेलेले आहेत. त्यांना शहांच्या अशा ५० टक्के मतांच्या गणिताचा उलगडा करण्याची गरज वाटलेली नाही. कदाचित अनेकजण त्यांची टिंगलही करतील. कारण भारताच्या संसदीय इतिहासात कुठलाच नेता वा पक्ष ५० टक्के मतांची मजल मारू शकलेला नाही. १९८४ सालात इंदिराजींची हत्या झाल्यावर राजीव गांधी पंतप्रधान होते आणि त्यांना अपुर्व मते मिळलेली होती. पण त्यांनाही पुर्णपणे ४९ टक्के मते मिळालेली नव्हती. तेव्हा मतदान एकतर्फ़ी होऊनही ५० टक्के पल्ला गाठला गेला नव्हता. पण ४८ टक्के मतांत राजीवना ४१५ जागा मिळाल्या होत्या. मग शहांचे हे ५० टक्के गणित काय आहे? तर त्यांना ४० टक्के पार करायचे आहेत आणि त्याचा अर्थ असा, की भाजपा विरोधकांसाठी फ़क्त ६० टक्के मते शिल्लक उरतात. त्यातली अपक्ष वा बंडखोरांनी घेतलेली दहा टक्के मते बाजूला केली, तर उरतात ५० टक्के आणि त्याचे वाटेकरी निदान दोनतीन आघाड्य़ा असणार. खेरीज भाजपाच्या मित्र पक्षांचीही मते त्यातूनच येणार. हे अजब समिकरण आहे. ते गंमत म्हणून अजिबात मांडलेले नाही.

गेल्या लोकसभेनंतर भाजपाने शहांच्या नेतृत्वाखाली अन्य राज्यात खुप मुलूखगिरी केलेली आहे. केरळ, ओडिशा वा बंगाल आसाम अशा राज्यात भाजपाने नव्याने आपला विस्तार करून घेतलेला आहे. बंगालमध्ये तर अलिकडल्या प्रत्येक मतदानात डावे व कॉग्रेसला मागे टाकून भाजपा दुसर्‍या क्रमांकावर आलेला आहे. ओडिशात तशीच स्थिती आहे आणि केरळ, तेलंगणा, आंध्रा अशा राज्यात भाजपाने हातपाय पसरलेले आहेत. त्याची गोळाबेरीजम करून ४० टक्क्याच्या पार नेण्याचे लक्ष्य ठेवून आपण काम करीत असल्याचेच शहा यांनी त्यावेळी सांगितले होते. पण लक्षात कोण घेतो? आणखी एक बाब समजून घेतली पाहिजे. कॉग्रेस व तिच्या सोबत जाणार्‍या पक्षांची मते सर्वदूर पसरलेली आहेत. तर भाजपाची मते ठराविक जागी केंद्रीत झालेली आहेत. म्हणजे कपात उंच वाटणारा चहा म्हणजे भाजपाची मते आहेत आणि बशीत ओतलेला चला म्हणजे विरोधी पक्षांची मते आहेत. त्यात ज्याची उंची अधिक असते, तोच विजेता ठरत असतो. १९८४ सालात भाजपला दोन जागा मिळाल्याचे सर्वजण अगत्याने सांगतात. पण तरीही भाजपाची तेव्हाची मते ९ टक्के होती. त्याच्या साडेपाचपटीने मते मिळवताना कॉग्रेसला जागा मात्र भाजपाच्या दोनशे पटीहून जास्त मिळाल्या होत्या. कपबशीतल्या चहाला समजून घेतले, तर मतांची टक्केवारी व जागांचे यश समजून घेता येईल. अमित शहा हे निवडणूका लढवण्याचे अजस्त्र यंत्र आहे. त्याने भाजपाला त्यासाठीची यंत्रणा बनवलेले आहेत आणि आठ महिन्यांनी सुरू व्हायच्या मतदानातील उमेदवार ठरवण्यापासून कोणाला वगळायचे, त्याचीही यादी आतापासून बनवली जात असणार हे उघड आहे. येत्या लोकसभेत किमान शंभर विद्यमान खासदारांना नारळ दिला जाईल व नवे चेहरे मैदानात पुढे आणले जातील. मात्र त्याच भाजपाला पराभूत करण्याच्या गमजा करणार्‍यांना अजून एकजुट म्हणजे काय, त्याचीही व्याख्या ठरवता आलेले नाही.


12 comments:

 1. 'एकजुट' म्हणजे काय रे भाऊ?

  ReplyDelete
 2. भाउ तुमच एकाच ठिकाणी मतांचेconcentrete होणे हे अगदी बरोबर आहे कारन २०१४साली भाजपला cleansweepमिळालेल्या राज्यात टक्केवारी50-60पर्यंत गेलीय पन काही राज्यात संघटनाच नसल्यामुळे सरासरी३१ दिसते nda ची 43 होते काॅंगरेस मते देशभर पसरुन 25 सरसरी होते अस कर्नाटकात पन हेच झाल आता तर bjp देशभर पसरलीय काॅंगरेसन विरोधासाठी31 टक्के चिडवने ठिकय पन पुरोगामी लोकांचे वेब पेपर विडिओ मधुन तेच खर मानुन विश्लेषन करणे काॅंगरेससाठी घातक आहे त्याना खर माहित नाही की लिहायच नाही?

  ReplyDelete
 3. भाऊ तुम्हाला साष्टांग नमस्कार!!!

  ReplyDelete
 4. अमित शहा बर्याचश्या गोष्टी पुढे येवुन बोलतात.पन त्यांचा विरोध करण्यासाठी लोक तिकडे लक्ष देत नाहीत.त्यांनी कर्नाटकात पन सांगितले होते की भाजप ने 65% प्रदेशात 36% मते मिळवलीत.काॅंगरेसच्या कमी जागा येवुन मते मात्र 38% होती पन पुर्ण कर्नाटकातील होती.जेडीएसला पांठीबा देताना त्यांचे मिडियातील लोक हेच सांगत होते पन शहांनी बरोबर निष्कर्ष काढला तेच ते २०१९ साठी करत नसतील कशावरुन,मध्ये बातमी होती की मोदी प्रत्येक मतदारसंघाचे इंटर्नल सर्वे करतायत आणि ते पक्षाला खुषीसाठी नसुन रीयल डाटा असेल

  ReplyDelete
 5. भाऊ एक विनंती. article 370 कसे रद्द करता येईल त्यावर एक लेख लिहा.

  ReplyDelete
  Replies
  1. YES BHAU THIS IS THE AREA WHERE YOUR SUTDY AND EXPERIENCE WILL GIVE LIGHT MOST YOU MUST WRITE ON ARTICLE 370, we all have strong feeling on kashmir but we have very limited knowledge

   Delete
 6. भाऊ काँग्रेस पक्षाने सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या पासून मीडिया चॅनेल,मोठया वृत्त समूहाचे पत्रकार असे पक्ष संघटने बाहेरचे लोक यांच्या मदतीने निवडणुका जिंकण्याचे तंत्र अमलात आणले आहे tahlka,गुजरातच्या दंगली यांच्या मदतीने त्यांना 2004 आणि 2009 मध्ये यश देखील मिळाले पण 2014 मध्ये मोदींच्या सारखा पक्ष संघटनेचा वापर करून निवडणुका जिंकणारा नेता समोर आला आणि काँग्रेस अक्षरशः भुईसपाट झाली आताही जिग्नेश हार्दिक अशा outsource केलेल्या लोंकांच्या जीवावर निवडणुका जिंकायचे त्यांचे तंत्र आहे आणि तिथेच ते मार खाणार आहेत

  ReplyDelete
 7. कपबशीचं उदाहरण अप्रतिम.

  ReplyDelete
 8. भारीच विश्लेषण

  ReplyDelete
 9. भाऊ अप्रतिम विश्लेषण

  ReplyDelete