Friday, July 13, 2018

इतिहास नवा घडवू

fire at mantralaya के लिए इमेज परिणाम

मागल्या काळात आपला राखीव प्रांत असलेल्या पश्चीम महाराष्ट्रातलेही गटकोट किल्ले उध्वस्त झाल्यापासून शरद पवार काहीसे अस्वस्थ आहेत. जिजाऊ ब्रिगेड वा संभाजी ब्रिगेड असे ‘नॉन पार्टी असेटस’ निर्माण करूनही नवे काही हाती लागण्यापेक्षा हातातले हक्काचे बुरूज ढासळले. पक्षाची पुरती विल्हेवाट लागली. तेव्हापासून पवार साहेबांनी चिंतनाला आरंभ केला आणि त्यातून नवा इतिहास घडवण्याचा चंग बांधला. त्यासाठी संशोधन निबंध प्रबंध लिहू शकणार्‍या डॉ. जीतेंद्र आव्हाडांना जवळ घेतले. तेव्हा साहेबांना इतिहास थोडाफ़ार कळू लागलेला होता. परिणामी त्याच गोतावळ्यात वावरणार्‍या अजितदादांना इतिहासाचा लळा लागला असेल तर नवल नाही. नेहमी फ़ुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा जप कशाला, असा प्रश्न विचारणार्‍यांची तोंडे नुसती पगडी तोंडात कोंबून बंद होणार नव्हती. म्हणूनच मग अधिक सहाय्यासाठी इतिहासकार शिरीमंतांना हाताशी धरले गेले. त्यातून साहेबांनी लावलेला पहिला शोध म्हणजे फ़ुले शाहू आंबेडकरांचे कार्य. या संशोधनाच्या निमीत्ताने जीतेंद्र आव्हा्ड स्वत: सांगलीला गेले होते आणि त्यांच्या संशोधनात हिंदूस्तान प्रतिष्ठानच्या काही नतद्रष्टांनी अडथळे आणले. मग साहेबांना थेट मुख्यमंत्री देवेंद्राला साकडे घालावे लागले. अर्थात तीच आपल्या देशाची खुप जुनी परंपरा आहे. ॠषीमुनींच्या होमहवन यज्ञयागामध्ये राक्षस अडथळे आणायचे, तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नजिकच्या राजाचे संरक्षण मागितले जात असे. त्याला अनुसरून साहेबांनी देवेंद्राला पत्र लिहून फ़ुले शाहू आंबेडकरांच्या कार्यात अडथळे आणले जात असल्याची गोष्ट नजरेस आणुन दिली होती. आव्हाड हे कार्य करीत असताना अडथळे आले ,असे त्यांनी अगत्याने त्यात नमूद केलेले होते. सहाजिकच साहेब इतिहास नव्याने घडवायला कटीबद्ध झाल्याचा शोध मराठी रयतेला लागला. आता त्यात दिवसेदिवस दादा व आव्हाड भर घालीत असतात.

आरंभी आपले उपमुख्यमंत्रीपद गेल्यामुळे अजितदादांना काम उरले नव्हते. पण गेल्या दोन वर्षात भरपूर पाऊस व घरण बंधार्‍यात पाण्याचा मजबूत साठा झाल्यामुळे तर दादा अगदीच बेकार होऊन गेले. मंत्रीपद गेले तरी धरणे भरण्याचे कौशल्य त्यांनाच अवगत असल्याने दादांना थोडेतरी काम होते. पण पाऊस नीटनेटका झाल्यामुळे तेही काम राहिले नाही. सहाजिकच त्यांनी साहेबांकडे रोजगार हमी अंतर्गत काम मागितले आणि साहेबांनी त्यांना शिरीमंताच्या वाड्यावर पाठवून दिले. शिरीमंतांनी मग दादांची बाराखडी खडखडीत घोकून घेण्याचे काम सुरू केले आणि फ़ फ़ फ़ुल्यातला आणि च च चलेजावचा असे घोकून घेतले. त्यामुळे चलेजाव आंदोलन महात्मा फ़ुले यांनी छेडल्याचा ऐतिहासिक शोध लागून गेला. त्याचाच शोधनिबंध परवा दादांनी जाहिरपणे एका वाहिनीला मुलाखत देताना वाचून टाकला. पण समाजात नेहमी काही नतद्रष्ट लोक असतात. त्यामुळे दादांच्या त्या शोधनिबंधावर पाणी ओतले गेले. जसा धरण भरण्याच्या तंत्रज्ञानाचा विनोद करण्यात आला, तसाच आता चलेजाव चळवळ विषयीचा शोधनिबंध टवाळीचा विषय करण्यात आलेला आहे. पण दादांच्या अशा संशोधनाचा आधार कुठला, असा साधा प्रश्न कोणी विचारला नाही. अलिबागच्या पक्षीय चिंतन शिबीरात साहेबांनी मुळात मालेगाव शोधनिबंध वाचला होता, त्याचाच आधार घेऊन दादांनी आता चलेजावचे मूळ शोधून काढलेले आहे. तेव्हा मालेगाव येथे एका मशिदीत बॉम्बस्फ़ोट होऊन काहीजणांचा मृत्यू झालेला होता. तर मशिदीत मुस्लिम मुले स्फ़ोट कशाला करतील? किंवा फ़क्त मुस्लिमांनाच स्फ़ोट प्रकरणी कशाला अटक होते? असे प्रश्न उपस्थित करून साहेबांनी पोलिस शोधकामाचे बीजभाषण केलेले होते. मग त्यातून साध्वी प्रज्ञासिंग व कर्नल पुरोहित अशांना बिनपुराव्याचे दिर्घकाळ तुरूंगात डांबले गेले होते. तिथून या इतिहास संशोधनाला आरंभ झालेला आहे.

कसल्याही पुराव्याशिवाय किंवा संदर्भाशिवाय साहेब कसलाही शोध लावू शकतात. ठाण्यात जागोजागी उंच भव्य दहीहंड्याला लावणे व त्या तमाशात नामांकित नटनट्या आणुन नाचवणे; म्हणजे फ़ुले शाहू आंबेडकरांचे समाज सुधारणेचे कार्य असल्याचा शोध साहेबांनीच लावलेला नव्हता काय? तसाच त्यांनी मालेगावचा खळबळजनक शोध लावला. तर दादांनी फ़ुल्यांच्या चलेजाव चळवळीचा शोध लावण्यात काय आक्षेपार्ह असू शकते? शिरीमत कोकाटेबुवांना गुरूस्थानी मानले, की पृथ्वीपासून सूर्याची उत्पत्ती झाली वा चंद्राभोवती पृथ्वी प्रदक्षिणा करते, असलेही वैज्ञानिक शोध लागू शकतात. पण अशा भव्यदिव्य शोध संशोधनाची आपल्या माध्यमांना जणू काही किंमत नाही. ते मुर्ख बागेतला आंबा खाऊन मुले होतात असल्या भाकडकथांवर चर्चावाद करीत बसतात. सवड मिळाली तर अग्रलेखही लिहीतात. पण कोणी दादांना आमंत्रित करून अशा ऐतिहासिक संशोधनासाठी अधिक सविस्तर काही विचारत नाही. अफ़जल खान आपल्या राज्याच्या सीमा राखायला व वाढवायला आलेला होता. त्याचा हिंदू धर्माशी कुठलाही संघर्ष नव्हता, असले मौलिक संशोधन आजवर कुणा नावाजलेल्या इतिहासकाराला सांगता आलेले आहे काय? आयुष्यभर दरिद्री जीर्ण कागदपत्रे चाळत बसलेल्यांना असे ताजेकोरे ऐतिहासिक दस्तावेज कळायचे तरी कसे? त्यासाठी पवारांसारखी ‘प्रतिमा आणि प्रतिभा’ आवश्यक असते. त्यांचा सहवास लाभला, तर गीताही तोंडपाठ असू शकते. घोकंपट्टी करायची कुठे आज गरज उरली आहे? आपल्या डेटाकार्डमध्ये डाऊनलोड केले, म्हणजे झाले तोंडपाठ. आव्हाड गीता आपल्याला तोंडपाठ असल्याचे सांगत होते, म्हणजे त्यांनी ती आपल्या स्मार्ट फ़ोनमध्ये डाऊनलोड केलेली असणार. पण आजच्या पत्रकार संपादकांना त्याचे आकलन कसे व्हावे? ते मुर्ख तिथल्या तिथे गीतेचा श्लोक म्हणायला सांगू लागले.

आव्हाड काय किंवा अजितदादा काय; ते इतिहासाचे पठ्ठे आहेत. कालपरवा नागपूरला विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पावसाने थैमान घातले आणि विधान भवनातही पाणी शिरले. तर दादांना आपल्या काळातील सुखरूप भरणारी विधानसभा आठवली ना? याला इतिहासाची जाण म्हणतात. पण त्याच दादांच्या कारकिर्दीत सहा वर्षापुर्वी मंत्रालयच बघता बघता धडधडा पेटणार्‍या आगडोंबाच्या भक्ष्यस्थानी पडलेले होते. त्याचे कुणाला स्मरण झाले काय? दादांना वा आव्हाडांना मंत्रालयाची आग आठवणार कशाला? पण त्यांच्या विरोधकांनाही आठवली नाही. विधानसभेचे अधिवेशन भरवण्यापुर्वी त्याची पुर्ण सज्जता असायला हवी आणि आपत्ती नियोजनही असायला हवे, असे दादांनी ठणकावून सांगितले होते. पण सज्जता म्हणजे काय, असे त्यांना कोणी विचारलेच नाही. अन्यथा दादांनी तात्काळ मंत्रालयातल्या आगीच्या वेळचे आपत्ती नियोजन तोंडावर फ़ेकले असते. मंत्रालय धडधडा पेटलेले होते, तेव्हा अग्निशमन दलाच्या गाड्य़ा पोहोचल्या, तर त्यांना मंत्रालयाच्या पटांगणातशी पाऊल टाकता येणार नाही, इतकी जबरदस्त सज्जता बाबा-दादांच्या प्रशासनाने राखलेली होती. आग भडकलेली असताना अर्धापाऊण तास मंत्रालयाच्या पटांगणातल्या उभ्या केलेल्या अनधिकृत गाड्या हलवण्यात खर्ची पडलेला होता. तितक्यात आणखी एक मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. याला म्हणतात, आपत्ती व्यवस्थापन. दादांकडून देवेंद्रांनी त्याचे धडे गिरवले पाहिजेत. फ़ुल्यांनी चलेजाव सुरू केल्याचा शोध घेण्यापेक्षा मंत्रालयात आग कोणी लावली व परसरवली, त्याचे स्मरण करायला हवे. यासाठीच दादा, आव्हाड वा साहेब महान असतात. ते कायम इतिहास घडवत असतात. जुना इतिहास मोडीत काढून नवा इतिहास घडवताना सातत्याने रिडेव्हलपमेंट चालू असते ना? तशी साहेब आता लोकशाही सुद्धा रिडेव्हलपमेन्ट योजनेत घालायला सज्ज झालेले आहेत.

https://www.loksatta.com/maharashtra-news/watch-video-ncp-leader-ajit-pawar-says-mahatma-phule-launches-quit-india-movement-1712751/

6 comments:

  1. सामर्थ्य असे की ज्ञानेश्वर आगाशे असोत, कर्नल पुरोहित असोत, भुजबळ असोत किंवा अगदी अलीकडे डी एस के असोत. केव्हाही कायद्याच्या कचाट्यात जीव घ्यावा किंवा केव्हाही सोडावा. मग नवा इतिहास रचणे काय मोठेसे? पुण्यातला प्रत्येक फ्लायओव्हर चुकीच्या दिशेला झाला. मग दुरुस्त करायला पुढची दहा वर्षे कामं चालू राहिली, पुण्यापासून कोल्हापूर रस्ता सर्व्हिस रोड आणि अंडर पास न ठेवता केला. आता पुढची दहा वर्षे पुन्हा हायवे उचला वगैरे चालू आहे. त्याच रस्त्याला कर्नाटक हद्दीत काही नाही करावे लागत.अशी दूरदृष्टी असणारा द्रष्टा राजा इतिहास नाही घडवणार तर काय?

    ReplyDelete
  2. " जी जात नसते ती जात असते म्हणून तिला जात म्हणतात " हेच खरे याची प्रचिती आली हा लेख वाचून...

    ReplyDelete
  3. नवा इतिहास घडवण्यासाठी नवे नेतृत्व आणि तशी धमक पाहिजे. घराणेशाही बंद करून नवीन लोकांना नवीन विचारसरणीला वाव जनतेने मिळवून दिला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने नवा इतिहास नवा भारत घडू शकेल

    ReplyDelete
  4. तुमची लेखन शैली आवडली भाऊ ...शहाण्याला शब्दांचा मार पुरे..

    ReplyDelete