Wednesday, August 22, 2018

गांधी रोज मारला जातो.

Tushar Gandhi along with supporters in Pune. (Photo: PTI)

गांधीजींचे पणतु तुषार गांधी यांनी यावर्षीच्या दाभोळकर स्मृतीदिनाच्या सोहळ्यात भाग घेतला होता. पुण्यात ओंकारेश्वर पुलापासून सानेगुरूजी स्मारकापर्यंत जमलेले लोक हाती फ़लक घेऊन मिरवणूकीने चालत गेले आणि दाभोळकर हत्येचा सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असल्याचे सांगण्यात आले. नंतर झालेल्या भाषणात तुषार गांधी यांनी नवा गांधीवाद कथन केला. उपस्थितांना तो भावलाही. यात जे गांधीविचार मांडले गेले, ते ऐकून गांधीजींनी गोडसेने गोळ्या झाडण्याचीही प्रतिक्षा केली असती काय, अशी शंका येते. कारण भविष्यात आपल्या नावावर इतका भंपकपणा व थिल्लर गोष्टी प्रतिष्ठीत केल्या जाण्याच्या भयाने महात्माजींनी आपली इहलोकीची यात्रा कदाचित आधीच गुंडाळली असती. माणुस किती बेताल व बिनबुडाचे बोलू शकतो, त्याचा ‘तुषार’ म्हणून या पणतुचे वक्तव्य बघावे लागेल. देशात रोज गांधीजी मारले जातात, असे याने सांगितले. त्यात तथ्य जरूर आहे, पण रोज मारले जाणारे गांधी आधुनिक गोडसेकडून मारले जात नाहीत, तर गांधीनामाचा जप करणारेच गांधीहत्या करीत असतात. कारण एका बाजूला गांधी हा विचार असल्याचा डंका पिटला जात असतो आणि दुसरीकडे त्या विचाराला पार्थिव ठरवण्यासाठी आकांडतांडव चालू असते. गांधी हा विचार असता तर त्याला गोडसे मारू शकत नव्ह्ता आणि त्या विचाराला मारल्याचा आक्रोश तुषारसहित इतरांना करावा लागला नसता. किंबहूना कोणीही कुणाचाही विचार मारू शकत नाही, हेच सत्य आहे. म्हणून तर ज्यांच्यावर सतत हत्या व हननाचे आरोप मागली सत्तर वर्षे चालू राहिले, त्यांचा विचार फ़ैलावत गेलेला आहे. कारण त्यांचाही अन्य कुणाला पटणारा विचारच आहे. गांधींचा विचार तितका प्रभावी असता, तर त्यावर गोडसे समर्थकांना मात करता आली नसती. पण त्या गोडसेचे स्तोम तुषार सारख्यांनीच माजवलेले आहे. त्यांनी रोजच गांधी मारण्यासाठी सतत गोडसे जीवंत ठेवलेला आहे.

दाभोळकर यांच्या मारेकर्‍याला पकडले आहे. पण कोर्ट व कायदा त्याला शिक्षा देऊ शकत नाही. कारण हत्या करणार्‍या संस्थेचीच एक शाखा राज्य करते आहे, अशी ‘मुक्ता’फ़ळे त्यांनी उधळली आहेत. यांना सरकार, कायदा वा राज्य वगैरे काही कळते किंवा नाही, याचीच शंका येते. कारण जेव्हा दाभोळकरांची हत्या झाली, तेव्हा तर अशा ‘मारेकर्‍यांच्या राजकीय शाखे’चे राज्य नव्हते ना? तरीही दाभोळकरांची हत्या झाली. तुषार गांधी वा महात्मा गांधींचा वारसा सांगणार्‍यांचे राज्य असलेल्या कर्नाटकात आणखी दोघांच्या हत्या झाल्या. मग तिथेही राज्य करणारे गांधीहत्येचे वारसदार आहेत काय? त्यात शोधले तर तथ्य जरूर आहे. कारण या लोकांचा दावा मान्य केला तर गांधी हा विचार असतो आणि त्या विचारांची हत्या मागल्या सात दशकात पुरोगामी व कॉग्रेसने सातत्याने रोजच्या रोज केलेली नाही का? प्रत्येक धोरणातून व कृत्यातून गांधी रोजच मारला गेला आहे. आपल्या मृतदेहावरून फ़ाळणी करावी लागेल, असा इशारा देणार्‍या गांधींच्या गळी देशाची विभागणी ज्यांनी मारली, त्यांनी गांधी विचाराला मारले नव्हते काय? भारत खेड्यात रहातो म्हणणार्‍या गांधीजींकडे पाठ फ़िरवून शहरांची बेछूट बकाल वाढ करणार्‍यांनी गांधींचा विचारच मारलेला नाही काय? सार्वत्रिक पातळीवर अशी गांधी विचाराची हत्या होत राहिली आणि तुषारसारखा पणतु त्यांनाच टाळ्या पिटुन पाठींबा देत राहिला नव्हता काय? तेव्हा गांधी हत्या रोज होते, हे निखळ सत्य आहे. पण मजेची गोष्ट अशी, की त्या गांधीविचारांच्या मारेकर्‍यांना कुठली शिक्षा कुठल्या कायद्याने वा न्यायालयानेही दिलेली नाही. अर्थात गांधी हा विचार असेल तरची ही गोष्ट आहे. पण असल्या विधान वक्तव्यातून हे दिवाळखोर उरलासुरला गांधी समाजातून उखडून फ़ेकत आहेत. गोडसेने मारूनही न मेलेला विचार, नामशेष करायचे काम इमानेइतबारे पार पाडीत आहेत.

‘लोकांच्या मनात प्रचंड विष पेरले गेले आहे. विषारी आणि विखारी विचारधारेपासून तरुणांना लांब नेले पाहिजे, त्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी विचार रुजवला पाहिजे.’ हे आणखी वैचारिक ‘तुषार शिंतोडे’ आहेत. सात दशके देशात गांधीवादी पक्ष राज्य करत होते. मग त्यांनी लोकांच्या मनात विष व विखार पेरायच्या कामाला रोखले कशाला नाही? की तेव्हाही कुठल्या कोर्टाने त्यात अडथळे आणलेले होते? मुद्दा त्याच्याही पुढला आहे. हे सर्व होत असताना तुषार सारखे दिवटे पणतु व इतर भंपक गांधीवादी लोक कुंभकर्णाच्या झोपा काढत घोरत पडलेले होते. कारण गांधीवादी सरकारने यांना विविध अनुदानातून ऐषरामाच्या सुखसोयी उभ्या करून दिलेल्या होत्या, तो ऐषाराम चालू असताना इतर कुठे कोण विषपेरणी करतो आहे, किंवा विखाराचे पीक काढतो आहे, त्याकडे बघायला कोणाला सवड होती? तुषारसारख्यांचे लक्ष कुठे असते, त्याची त्यानेच एकदा जाहिर कबुली दिली आहे. समोर काय आहे ते डोळ्यांना दिसत असले, म्हणून आपण बघतोच असे नाही. आपल्या मनाला व मेंदूला बघायचे आहे तितकेच बघत असतो. सहाजिकच तुषार गांधी आपल्या पणजोबा वा गांधीविचाराकडे कशा नजरेने बघतात, याला महत्व आहे. एकदा ट्वीटरवर भाष्य करताना याच तुषारने म्हटलेले होते, ‘मला विम्बल्डन खेळणार्‍या मुली बघायला आवडतात. पण माझे भलत्याच बॉलकडे लक्ष असते.’ ज्याला टेनिस कुठल्या चेंडूने खेळतात हे खेळ वा सामना दिसताना देखील बघता येत नाही, त्याला गांधी विचार वा तत्वज्ञान कुठून बघता येणार वा समजू शकणार ना? ते त्याचे सोशल मीडिया खाते खरे की खोटे ठाऊक नाही. पण परवा त्याने जी मुक्ताफ़ळे उधाळली ती तशाच लायकीची नाहीत काय? त्यामुळे भारतातल्या करोडो लोकांना भावलेला गांधी आणि अशा भुरट्यांचा गांधी, यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. तुमच्या आमच्यासाठी गांधीविचार वा महात्मा असेल पण तुषार वा अन्य गांधीवादी भंपकांसाठी ती एक मालमत्ता असते. ऐषारामाची सोयसुविधा असते. मग ती रोजच मारली जाणार ना?

दाभोळकर, कलबुर्गी वा गौरी लंकेश म्हणूनच गांदीवादी राजसत्ता असतानाच मारले जातात. नुसते मारले जात नाहीत, तर त्यांचे मारेकरीही पकडले जात नाहीत. कशाला व कोणी पकडायचे? रोजच्या रोज गांधीहत्येचे भांडवल करण्याची सुविधा गांधी मरण्यातच सामावलेली असेल, तर तुषारसहीत अन्य कुणा गांधीभक्ताला गांधी जगवण्याची इच्छा तरी कशाला असणार ना? गांधीविचार उक्तीकृतीच्या सांगडीतून सुरू होत असतो. केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे, हा गांधीविचाराचा पाया आहे आणि तुषारला त्याचाही पत्ता नाही. तिथे जमलेल्यांना तरी कुठे पत्ता होता? म्हणून मग हे जगाला उपदेश करीत फ़िरत असतात. अंधश्रद्धा संपली पाहिजे. तरूणांना विषारी विचारापासून लांब नेले पाहिजे. विद्वेषाच्या संस्कृतीतून दुर न्यायला हवे आहे. हे सर्व हवे आहे. कोण देणार आहे? हे सर्व कोण करणार आहे? तुषार वा पुण्यतिथीसाठी जमलेले यापैकी काही करणार नाहीत. अन्य कोणी केले पाहिजे. इतरांनी काय करावे याची यादी तयार आहे. पण आपण काय करायचे त्याचा पत्ता नाही. कृतीतून जगासमोर आदर्श निर्माण करायचे, त्याला गांधी म्हणतात. हेही अशा शहाण्यांना ठाऊक नाही. सर्वात कडी म्हणजे हा तुषार म्हणतो, कोर्ट कायदा न्याय शिक्षा देऊ शकत नाही. लोकांनीच शिक्षा दिली पाहिजे. लोकांनी दिलेली शिक्षा म्हणजे काय असते रे तुषार? जमावाचा न्याय म्हणजेच लोकांनी दिलेली शिक्षा असते ना? कोणी गोमांस बाळगले खाल्ले म्हणून झालेल्या सामुहिक हत्या, किंवा मुले पळवल्याच्या समजूतीतून झालेले जमावाचे हल्ले, या दिडशहाण्याला न्याय वा शिक्षा वाटते काय? ही गांधीवादाची आजची शोकांतिका आहे. ज्याला गांधीविचार अजून उमजलेला नाही व आशयही कळलेला नाही, तो दाभोळकर स्मृतीदिनी गांधीवाद सांगत होता. बाकी ‘आम्ही सारे’ नंदीबैल होऊन माना डोलवित होते. यापेक्षा गांधीहत्या आणखी काय वेगळ्या स्वरूपातली असू शकते?

14 comments:

  1. Extremely thought provoking article Sir. Gandhi can be defined in one sentence as highlighted by you,"be the change you wish to see in the world".

    Thank you Sir.

    ReplyDelete
  2. गांधींचे ब्रम्हचर्याचे प्रयोग वाचले की लक्षात येते .... तुषार लागते बौल बघायला का आवडतात ?

    ReplyDelete
  3. झोंबणारं आहे पण कटू सत्य आहे

    ReplyDelete
  4. नेहमी प्रमाणेच मनाला पटणारे विचार.

    ReplyDelete
  5. पहिल्या गांधींनी टोप्या घातल्या. ह्याच्या कडून काय अपेक्षा ठेवणार? गांधी के, नेहरू काय, आंबेडकर काय, ठाकरे काय सगळ्यांच्या वंशाच्या दिव्यांनी अकलेचे दिवेच लावले आहेत।

    ReplyDelete
  6. गोडसेनी जनतेच्या न्यायालयाचा न्याय निवाडा केला होता. वध करून. असेच नसेल काय?

    ReplyDelete
  7. भाऊ,
    अप्रतिम
    गांधीच्या खऱ्या मारेकऱ्यांचा ठिकाणा आज कळला

    ReplyDelete
  8. फारच भयंकर मनुष्य आहे हा,

    ReplyDelete
  9. Twitter Link
    https://twitter.com/TusharG/status/17478798962?s=20

    ReplyDelete
  10. सणसणीत आणि झणझणीत

    ReplyDelete
  11. Respected Bhau...

    Apratim post. Most of the members are part of an eco system created by the age old party. They are in electronic & print media, writers, poets, " intellectuals " film stars and others.
    They have selective agenda and double standards. And you have exactly exposed them nicely.
    Party has activated its team nationally and internationally also. But over the period they have been exposed by the social media and some good people like you. Lets keep it up....

    Most of your posts in August were worth a fortune for us. Eye openers for all.

    Regards
    Daya

    ReplyDelete
  12. एकदम चपखलपणे लेख लिहिला आहे भाऊ!

    ReplyDelete