Sunday, August 12, 2018

रोडगा वाहीन तुला

Image result for mehmood sunil dutt padosan

दिडदोन महिन्यापुर्वी महाराष्ट्रात दोन लोकसभा पोटनिवडणूका झाल्या होत्या. त्यात सत्ताधारी शिवसेना भाजपा युतीतले दोन्ही पक्ष परस्परांच्या विरोधात पालघर येथे लढले होते. त्या निकालाच्या निमीत्ताने एबीपी माझा वाहिनीवर चर्चा झाली होती. त्यात सहभागी होताना मी गंमत म्हणून काही बोलून गेलो होतो. ते इतके सत्य निघेल, अशी माझीही तेव्हा अपेक्षा नव्हती. राज्यातील या दोन पक्षांच्या युतीचे भवितव्य काय, असा प्रश्न मला संयोजकाने विचारला होता आणि त्याचे उत्तर देताना मी गंमतीने म्हणालो होतो, पन्नास वर्षापुर्वीच या स्थितीचे विश्लेषण एका चित्रपट गीतामध्ये येऊन गेले आहे. राजकारण हा आशावादाचा खेळ असतो आणि त्या काळात ‘आस का पंछी’ नावाचा चित्रपट येऊन खुप चालला होता. त्यातले एक गाजलेले गीत होते, ‘तुम रुठी रहो, मै मनाता रहू, तो मजा जीनेका औरही आता है’. असे नायक म्हणतो आणि त्याला प्रतिसाद देताना नायिका उत्तरते, ‘थोडे शिकवे भी हो कुछ शिकायत भी हो, तो मजा जीनेला औरही आता है’. सत्तेतील भाजपा आणि शिवसेनेचे तसेच चालू आहे आणि आपणही त्यावर हौसेने इतक्या चर्चा करत असतो. त्यातही खुप मजा येते ना? चर्चेत सहभागी झालेल्या सर्वच सहकार्‍यांना त्यामुळे हसू आलेले होते आणि बहुधा प्रेक्षकांनाही ते वक्तव्य हसवून गेलेले असावे. पण ती गंमत होती. राजकारण खुप गंभीर विषय असतो आणि लोकशाहीच्या कारभारात गंमत नसते, तर करोडो लोकांच्या जगण्याशी तो कारभार निगडीत असतो. म्हणून राजकारण गंभीरपणे करायची गरज असते. पण त्यातले गांभिर्य आजकालचे नेते व राजकारणी पुरते विसरून गेलेले दिसतात. सिनेमा आणि राजकारण यांची इतकी गल्लत होऊन गेली आहे, की आता चित्रपटांच्या पटकथा व आशयही राजकीय पक्षांची रणनितीही बनु लागली आहे. आगामी लोकसभेसाठी कॉग्रेसची अशीच रणनिती वाचली आणि मला पन्नास वर्षे जुना ‘पडोसन’ चित्रपट आठवला.

गेल्या आठवड्यात कॉग्रेस पक्षाच्या उच्चसुत्रांनी दिलेली एक बातमी वाचनात आली आणि मला धक्काच बसला. या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉग्रेसची लोकसभेची रणनिती मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखायची आहे. म्हणजे त्या पक्षाला किंवा त्याच्या मित्रपक्षांना बहूमत वा सत्ता मिळवायची नाही, की भाजपाला पराभूतही करायची इच्छा उरलेली नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान कसे होऊ शकणार नाहीत, यासाठी तमाम कॉग्रेसी चाणक्य आपली बुद्धी पणाला लावत असल्याचे त्यातून स्पष्ट होते. ती रणनिती अशी आहे, की तीन मोठी राज्ये भाजपाला सत्ता व बहूमत मिळवून द्यायला कारणीभूत झाली आहेत. तिथेच मोदींचा अश्वमेध रोखला, म्हणजे मोदी पंतप्रधान होणार नाहीत. भले भाजपा मोठा पक्ष होईल व त्याचाच पंतप्रधान असेल. पण सत्ता मिळवण्यासाठी मित्रपक्षांचा कुबड्या घ्याव्या लागतील आणि मित्रपक्ष मोदीशिवाय अन्य कोणाला पंतप्रधान करण्याच्या बोलीवर भाजपाला पाठींबा देतील. ही रणनिती असेल, तर त्याचा अर्थ इतकाच होतो, की भाजपाला मोदींच्या नेतृत्वाखाली बहूमतच नव्हेतर तीनशेहून अधिक जागा मिळण्याविषयी कॉग्रेसचे चाणक्य आत्मविश्वासाने भरलेले आहेत. इतका आत्मविश्वास आजही भाजपा वा त्याच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये नाही. आपल्याला नक्की बहूमत मिळेल असे अमित शहा वा मोदीही कुठे ठामपणे आज बोलत नाहीत. पण त्यांना बहूमतापासून वंचित ठेवण्याचीच कॉग्रेस रणनिती आखत असेल, तर त्याचा अर्थ मोदी-शहा बहूमताचा पल्ला गाठण्याच्या स्थितीत असल्याची खात्री कॉग्रेसला असावी असे दिसते. मग ते बहूमत रोखणे हा डावपेच झाला आहे आणि त्यासाठी भाजपाला साडेचार वर्षापुर्वी मिळालेल्या बहुतांश जागांचा मार्ग रोखून धरण्याला रणनिती बनवण्यात आलेले आहे. ती तीन मोठी राज्ये उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार अशी आहेत. कारण या तीन राज्यात १६८ जागा आहेत.

मागल्या खेपेस भाजपाने या १६८ पैकी १४६ जागा जिंकलेल्या होत्या. उरलेल्या १३५ जागा त्यांनी बाकीच्या राज्यातून मिळवल्या होत्या. सहाजिकच गणिताच्या भाषेत ही रणनिती योग्यच भासणारी आहे. पण आपण या तीन राज्यात कमाल जागा मिळवल्या आणि तिथे वाढ होण्यापेक्षा घट होऊ शकते, हे भाजपाही जाणून आहे. म्हणून तर नंतरचा साडेचार वर्षात त्या पक्षाच्या नेतृत्वाने अन्य राज्यात नवी मुलूखगिरी करून बंगाल, ओडीशा वा अन्यत्र आपले हातपाय पसरून घेतलेले आहेत. पण इतका दणदणित पराभव होऊनही कॉग्रेसने आपले जुने ढासळलेले बुरूज डागडुजी करून सावरण्यासाठीही कुठली हालचाल केलेली नाही. आपण जिंकावे किंवा अधिक जागा मिळवाव्या असा कुठलाही विचार कॉग्रेस वा त्याच्या निष्ठावान मित्रांच्या मनालाही शिवलेला नाही. त्यापेक्षा भाजपाच्या जागा कुठे कमी होतील, त्याचा विचार जोरात चालू आहे. त्यापेक्षा नकारात्मक विचार म्हणजे मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखण्याची भूमिका. मुद्दा आपली सत्ता आणण्याचा उरलेला नसून मोदींना फ़क्त अपशकून करण्यावर लक्ष केंद्रीत झालेले आहे. तेही आकड्यात बघायचे तर २३०-२५० च्या आत भाजपाला रोखण्याचे आहे. म्हणजे इतक्या जागा भाजपा सहज मिळवू शकतो, याची कबुली कॉग्रेस देते आहे. इतक्या जागा सोपी गोष्ट आहे काय? १९९१ नंतर कॉग्रेसला कधी २३० चा पल्ला ओलांडता आलेला नाही. सोनियांच्या नेतृत्वाने कॉग्रेसचा जिर्णोद्धार झाला, त्या २००९ सालातही कॉग्रेसला २०६ इतकीच मजल मारता आलेली होती आणि आता तितकीही आशा उरलेली नाही. त्यापेक्षा भाजपाला २३० इतके रोखण्य़ाचा आटापीटा त्या शत्रूपक्षाला बहूमत मिळण्याच्या भितीचे प्रतिक आहे. राहुल गांधी नित्यनेमाने मोदींना जनता धुळ चारणार म्हणतात. पण त्यांच्या पक्षाची रणनिती पलायनवादी दिसते, अन्यथा असले आकडे समोर आलेच नसते.

आपण संसदेत पंधरा मिनीटे बोललो, तर मोदींना पळता भूई थोडी होईल. किंवा मोदी-भाजपावर लोक नाराज असल्याच्या गर्जना करणे सोपे आहे. प्रत्यक्षात लढाईची वेळ येते, तेव्हा भाजपाला जाऊन भिडण्याला महत्व असते. लढाईचे दोन प्रकार असतात. आक्रमण परतून लावायची बचावात्मक लढाई आणि दुसरी असते प्रतिपक्षाची सत्ता हिरावून घेण्याची आक्रमक लढाई. राहुल गांधी नेहमी आक्रमक पवित्र्यात असतात. पण पक्षाची रणनिती मात्र बचावात्मक आहे. भाजपाचे प्रभावक्षेत्र व्यापण्यापेक्षा कॉग्रेस त्याला अन्य कोणी खिंडार पाडावे, म्हणून आशाळभूतपणे प्रतिक्षेत बसलेली आहे. मग तशी वेळ येते, तेव्हा शेपूट घालून माघार घेण्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. मग ‘पडोसन’मधला मेहमूद आणि सुनीलदत्त आठवतात. एका प्रसंगात मेहमूद आवेशात सुनीलदत्तला इशारे देत असतो. ‘भोला आगे मत आना.’ पण सुनीलदत्त पुढे येतच रहातो आणि मेहमूद इशारे देतच रहातो. भोला आगे मत आना. पण त्याचा उपयोग होत नाही, तेव्हा मेहमूद दाक्षिणात्य हिंदीत म्हणतो, ‘भोला तुम आगे आयगा? भोला तुम आगे आयगा? तो हम पिछे जायगा!’ मागल्या साडेचार वर्षातली कॉग्रेसची वागणूक नेमकी तशीच राहिली आहे. पडोसन चित्रपटात हा प्रसंग केवळ विनोद म्हणून घातला आहे आणि त्यात प्रत्यक्षात त्या दोघांची हाणामारी होतच नाही. पण पन्नास वर्षापुर्वीचा चित्रपटातला तो विनोद आज भारतातील शतायुषी पक्षाची रणनिती झाली आहे. भाजपाला लोकसभा मतदानात स्वबळावर पराभूत करायची इच्छाशक्ती कॉग्रेस गमावून बसली आहेच. पण मित्र समविचारी पक्षांच्या मदतीनेही भाजपाला सत्तेवरून बाजूला करण्याची आशाही त्या पक्षाच्या नेतृत्वाला उरलेली नाही. सहाजिकच प्रतिकात्मक लढाई म्हणून मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखण्याला ते आपली रणनिती बनवू लागले आहेत. देशातील सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाचा हा डावपेच प्रत्यक्षात युद्धापुर्वीच पराभवाची कबुली देणारा नाही काय?

ज्या १६८ जागांचे गणित यात कॉग्रेसी चाणक्यांनी मांडले आहे. त्यात कॉग्रेसला काय स्थान आहे? उत्तरप्रदेशच्या ८० जागांपैकी कॉग्रेस किती लढवू शकते? बिहारच्या ४० पैकी किती जागी कॉग्रेसपाशी लढत देऊ शकणारे उमेदवार आहेत? महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी किती ठिकाणी कॉग्रेस स्वबळावर विजय संपादन करू शकते? मग तिथे भाजपाचा पराभव किंवा जागा घटण्याने कॉग्रेसला कोणता राजकीय लाभ होऊ शकतो? भाजपाची संख्या इतरांनी घटवायची असेल, तर कॉग्रेसचे संख्याबळ कसे वाढणार आहे? ते वाढणार नसेल तर कुठल्या आधारावर कॉग्रेस पंतप्रधान पदावर दावा करू शकणार आहे? नसेल तर मोदी वा भाजपा विरोधाचे नेतृत्व आपल्याच हाती असायला हवे, असा दावा कसा करता येईल? कोणी कॉग्रेसी चाणक्य याचा विचार करतो आहे काय? अशा राज्यांचा विचार करण्यापेक्षाही अजून कॉग्रेस जिथे मजबूत आहे आणि भाजपाशी स्वबळावर टक्कर देऊ शकेल, अशा राज्यांचा व तिथे अधिक जागा जिंकण्याचा विचार त्या पक्षात कोणीच कशाला करत नाही? उदाहरणार्थ गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक ही राज्ये तशी आहेत. महाराष्ट्र, बंगाल, ओडिशा, केरळ, बंगाल वा आंध्र-तेलंगणा, पंजाब, हरयाणा अशा राज्यात १६८ पेक्षाही अधिक जागा असून, त्यात सव्वाशे दिडशे जागा जिंकण्याचा मनसुबा कशाला योजला जात नाही? आपले बळ जिथे आहे, तिथे शक्ती पणाला लावून भाजपाशी तुल्यबळ होण्याची मनिषा कशाला नसावी? कॉग्रेसला स्वबळावर लढण्याच्या जागा दोनशेच्या आसपास आजही असून तिथे लक्ष केंद्रीत केल्यास शंभरी ओलांडणे अशक्य नाही. अशा थेट भाजपाशी लढत असलेल्या राज्यात अधिक जागी कॉग्रेस जिंकण्यातूनही भाजपाचा अश्वमेध रोखला जाऊ शकतो. पण आपण जिंकावे हा विचारही कॉग्रेस विसरून गेली आहे. त्यापेक्षा भाजपा-मोदींच्या नावाने शिमगा करण्याला ते राजकारण समजू लागले आहेत.

क्रिकेट कसोटी सामन्यात फ़ॉलो ऑन नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे आधी फ़लंदाजी करणार्‍या संघाने मोठी धावसंख्या उभारली, मग त्याच्यापेक्षा सोनशे दिडशे धावा कमी करूनही आपल्या फ़लंदाजीची अब्रु राखण्याची चिंता नंतर खेळणार्‍या संघाला भेडसावत असते. त्याला फ़ॉलो ऑन टाळणे म्हणतात. पण ती स्थिती प्रत्यक्षात सामना सुरू झाल्यावर आणि आधी खेळणार्‍याने मोठी धावसंख्या उभारल्यानंतर येत असते. सामना सुरू होण्यापुर्वीच कोणी इतकी धावसंख्या गृहीत धरून फ़ॉलो ऑन टाळण्याची भाषा बोलत नसतो. सामना सुरू होण्यापुर्वी दोन्ही बाजू सामना जिंकण्याचीच भाषा बोलत असतात. इथे लोकसभेच्या मतदानाला सात महिने शिल्लक असताना कॉग्रेसचे चाणक्य फ़ॉलो ऑन टाळण्याची भाषा बोलत असतील, तर त्यांनी भाजपा प्रचंड संख्याबळ मिळवणार हे गृहीत धरलेले दिस्ते. त्याला पराभूत मनोवृत्ती म्हणता येईल. आपल्याला यश मिळावे अशी अपेक्षा बाळगण्यापेक्षा दुसर्‍याचे नुकसान होण्यासाठी नवससायास करण्याच्या या प्रवृत्तीचे वर्णन संत एकनाथ महाराजांनी एका भारूडातून केले आहे. ‘भवानी आई रोडगा वाहीन तुला’. असे भारूड गाताना प्रत्येकाच्या वाईटाचीच अपेक्षा केलेली असते. त्यापेक्षा कॉग्रेसची रणनिती भिन्न आहे काय? आपण दोनशेहून अधिक जागा जिंकून देशाल पर्यायी सरकर वा कारभार देण्याचा विचार सर्वस्व गमावल्यानंतर साडेचार वर्षे उलटून गेल्यावरही सुचत नसेल, तर कॉग्रेसला कोणते भवितव्य असू शकते? अवघ्या आठ जागांनी कर्नाटकात भाजपाचे बहूमत व सत्ता हुकलेली असेल तर लोकसभेत २५० चा पल्ला पार करूनही मोदींचे बहूमत हुकणारच ना? त्याची फ़िकीर कॉग्रेसने कशाला करावी? त्यापेक्षा आपली संख्या वाढवण्याची रणनिती व डावपेच असले पाहिजेत. पण राहुल गांधी वा सोनिया गांधी त्या दिशेने विचार करताना दिसत नाहीत. म्हणून मग त्याच पडोसन चित्रपटातली जुगलबंदी आठवते.

किशोरकुमार व नर्तक मेहमूद यांच्यातली सायरा बानुला जिंकण्यासाठीची ती जुगलबंदी आजही अनेकांचा स्मरणात आहे. ‘एक चतुर नार बडी होशियार’. दिवसेदिवस राहुल-सोनिया आणि मोदी-शहा यांच्यातला राजकीय संघर्ष त्या विनोदी गाण्याच्या जुगलबंदीसारखा होत चालला आहे. मध्यंतरी मी मुद्दाम युट्युबवर ते चित्रपटगीत अनेकदा ऐकून त्यातला आशय सध्याच्या राजकारणाशी ताडून बघण्याचा प्रयास केला आणि त्यात किशोरकुमारचा प्रतिसाद मला खुपच राजकीय विश्लेषण करणारा वाटला. त्यात मेहमूद म्हणतो, ‘एक चतूर नार करके सिंगार, मेरे मनके द्वार, ये घुसत जात, हम मरत जात’. उ्लट त्याचा दावा फ़ेटाळून ला्वत किशोर म्हणतो, ‘एक चतूर नार बडी होशियार, अपनेही जालमे फ़सत जात, हम हसत जात’. अविश्वास प्रस्तावापासून कालपरवा राज्यसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीपर्यंत, ‘एक चतुर नार’ पदोपदी अनुभवायला मिळालेली नाही काय? अविश्वास प्रस्तावाच्या वेळी सोनिया म्हणाल्या, कोण म्हणतो आमच्यापाशी संख्याबळ नाही? आताही उपाध्यक्षाच्या निवडणूकीत सोनियांनी अखेरच्या क्षणी इतर पक्षांना अंधारात ठेवून स्वपक्षाचा उमेदवार मैदानात आणला. ही चतुराई पक्षाला कुठे घेऊन गेली? विरोधी राजकारणाला कुठल्या नामुष्कीकडे घेऊन गेली? ही सगळी राजकीय जुगलबंदी हळुहळू पडोसनच्या त्या विनोदी गाण्याचे वळण घेत चाललेली दिसत नाही काय? आता तर मला असेही वाटू लागले आहे, की पन्नास वर्षापुर्वीचे गाजलेले सिनेमे मुद्दाम मिळवून बघावेत आणि त्यातले प्रसंग वा विनोद आजच्या राजकारणाचे भविष्यातील भाकित करणारे होते काय, याची जरा झाडाझडती करावी. तेव्हाच्या चित्रपटातले विनोद किंवा कथानक, काहीशा रह्स्यमय भाषेत सांगितलेले नॉस्ट्रेडेमसचे भविष्य तर नसेल ना? अन्यथा त्यात इतके साम्य साधर्म्य कशाला मिळत रहावे? की राजकारणातले गांभिर्य संपून तो एक मनोरंजनाचा खेळ होऊन बसला आहे?

7 comments:

  1. भाऊ खरंय म्हणून तर २०१४ नंतर काँग्रेस ला संपवण्याची भाषा मोदी करतायत ,तसं केलंय पण त्यांनी म्हणजे अतिशय कमजोर करणं ,राहुलच्या दुबळ्या नेतृत्वाने ते आणखी सोपं केलं ,मुख्य म्हणजे काँगेसची ideology कालबाह्य करून टाकलीय ,म्हणजे भाजपची नाराज लोकांनी पर्याय म्हणून काँगेस चा विचार करू नये ,महाराष्ट्रात कोणी विचार केला असेल का ५ वर्षांपूर्वी काँग्रेस ची अशी अवस्था होईल,आज तर इथे त्यांना मुस्लिम सोडल्यास मतदार नाही आणि जिथे राष्ट्रवादी प्रबळ आहे तिथे मुस्लिम पण ncp ला मत देतात.मुख्य पक्ष कमजोर केला तर प्रादेशिक पक्ष केंद्रात सरकार स्थापन करू शकत नाहीत,केलं तरी ते टिकत नाही ,त्यांच्यात प्रबळ असणाऱ्या ममतांशी पण शहानी उभा दावा मांडलाय. या खेपेस त्याचं लक्ष बंगाल दिसतंय

    ReplyDelete
  2. " राजकारणातले गांभिर्य संपून तो एक मनोरंजनाचा खेळ होऊन बसला आहे? " होय, पण दुसर्‍याचे नाही तर स्वत:चेच मनोरंजन करून घेत इतरांना खेळवण्याचा खेळ बनु लागला आहे !

    ReplyDelete
  3. भाऊ असे विश्लेषण फक्त तुम्हीच करू जाणे. अप्रतिम

    ReplyDelete
  4. पुरोगाम्यांना अतिशय प्रिय असणाऱ्या गुजरात मध्ये जिथे राहुलचा नैतिक विजय झाला होता,सध्या काय परिस्थिती आहे कोण लक्ष देत नाही ,तशी मोदींची पण इच्छा दिसते कि चर्चा नको,त्यासाठी खास रूपांनी आहेत ,ते व्यावसायिक आहेत ,संघर्षापेक्षा तडजोड त्यांना आवडते ,मुख्य म्हणजे कोणत्याही पक्षाचे आमदार गुजरात मध्ये व्यापारी business वाले असतात ,त्यांना संघर्ष नको असतो ,त्यांचं काम करून दिल कि झालं,तिथला मतदार आणि नेते पण वेगळे आहेत ,निवडणूक त्यांना जीवनमरणाचा प्रश्न नसतो व्यापार असतो,जिग्नेश ला त्यामुळं गुजरात मध्ये काही काम नाही म्हणून तो बाहेर फिरत असतो. खरं तर जास्त आमदार निवडून आल्याने गुजरात मध्ये काँग्रेस ने तीव्र विरोध करणे अपेक्षित आहे पण तस होत नाही शांत आहे ,मोदींनी १३ वर्षे असाच केलं त्यांचा संघर्ष केंद्राशी राहिला ,गुजरात काँगेसशी नव्हे

    ReplyDelete
  5. अफलातून लेख. 😂
    Analysis feels pinpointed and perfect. ही निवडणुक काँग्रेस नि जिवाच्या आकांताने लढणं जरुरी आहे, पण तसं काही दिसत नाही. या situation मध्ये NDA 365+ जागांमध्ये जिंकले तरी आश्चर्य वाटू नये. Opposition seem to be hell bent on gifting it to NDA.

    ReplyDelete
  6. व्वा!!! भाऊ क्या बात है। ये तो अलग अंदाज है आपका। बहुत बढ़िया है।

    ReplyDelete
  7. भाऊ तुम्हाला साष्टांग नमस्कार

    ReplyDelete