Friday, August 10, 2018

गळ्यात पट्टा बांधलेल्या अभिव्यक्तीची गळचेपी?


 à¤¸à¤‚बंधित इमेज

जुलै महिन्यात अखेरच्या रविवारी सोलापूरमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात माझे व्याख्यान होते. योगायोगाने त्याच दिवशी तिथल्या पत्रकार संघात महान अभिव्यक्ती लढवय्याचाही काही कार्यक्रम होता. त्या काळात मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला असल्याने दुसर्‍या दिवशी मला तिथून निघणे अशक्य झाले आणि पत्रकार संघाच्या काही लोकांनी आग्रह केल्यामुळे मी तिथे गप्पांच्य कार्यक्रमात सहभागी झालो. अर्थात मी पुरोगामी वा मोदी विरोधात काहीबाही लिहीणारा पत्रकार नसल्याने विकला गेलेला पत्रकार आहे. पर्यायाने प्रतिगामी असे लेबल लागलेलाही पत्रकार आहे. त्याच संदर्भाने अनेक प्रश्न विचारले गेले आणि मलाही ते अपेक्षित होते. मोदी सरकारच्या काळात माध्यमांची व अविष्कार स्वातंत्र्याची गळपेची चालू असल्याचे आजकाल सातत्याने ऐकू येतच असते. सहाजिकच त्या संदर्भात मला प्रश्न विचारले जाणे अपेक्षितच होते. पत्रकारांवर होणारे हल्ले वा पत्रकारिता असेही प्रश्न आले. त्याविषयी मलाही सविस्तर भूमिका मांडता आली. यातला एक मुद्दा महत्वाचा होता, की खरोखरच आजकाल पत्रकारिता शिल्लक राहिली आहे काय? कारण असेल तरच तिची गळपेची होणार ना? पत्रकरिताच शिल्लक उरलेली नसेल, तर तिच्या गळपेचीचा विषयच कुठे येतो? आजकाल मीडिया असतो, माध्यमकर्मीही असतात. पण पत्रकार नेमका कुठे उरलेला आहे? किती मालक संपादक आहेत? मुळचे संपादक मालक ज्यांनी आपापली वर्तमानपत्रे सुरू केली, असे आता कोण शिल्लक उरलेत? कंपन्यांनी अन्य उत्पादनाचे कारखाने चालवावेत, तशी वर्तमानपत्रे वा वाहिन्या चालत असतील, तर त्याला पत्रकरिता म्हणता येईल काय? अशा माध्यमांची गळचेपी होत असेल, तर त्याला कंपनी वा मालकाची गळचेपी नक्की म्हणता येईल. पत्रकारितेचा त्यात विषय कुठून आला? हा सगळाच कांगावा नाही काय?

आजचे परखड ‘पडझड’ संपादक गिरीश कुबेर यांनी अजून तरी माध्यमांच्या गळचेपी वा मुस्कटदाबीची तक्रार केलेली नाही. लोकसत्तामध्ये त्यांनी लिहीलेला एक अग्रलेख ‘असंतांचे संत’ मागे घेण्याचा पराक्रम त्यांनी मध्यंतरी काही वर्षापुर्वी केलेला आहे. तो कुणाच्या दबावामुळे मागे घेतला? जगाच्या इतिहासामध्ये कधी संपादकाने आपला छापून वाचून संपलेला अग्रलेख मागे घेण्याचा दिग्वीजय अन्य कोणी केला आहे काय? तो कुबेरांनी साजरा केल्याबद्दल कुठल्या पत्रकार संघटनेने त्यांचा वाजतगाजत सत्कार केल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. त्याचप्रमाणे त्याला गळचेपी म्हणायचे असेल, तर त्याचा निषेधही कुठल्या पत्रकार संघटनेने केल्याचे वाचनात आलेले नाही. कुबेरच कशाला? संतांचाच मामला निघाला आहे म्हणून, महाराष्ट्राचे मानबिंदू म्हणून मिरवणार्‍या सर्वाधिक खपाच्या दैनिक लोकमतचे व्यवस्थापकीय प्रमुख व पत्रकार विजय दर्डा यांची काय कथा आहे? सहा वर्षापुर्वी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी तात्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना महात्मा वा संत ठरवणारी भाषा वापरली होती. हे त्यांचे मत असेल वा त्यांनी व्यक्त केलेले मत असेल, त्यांना तात्काळ कॉग्रेस पक्षाने शोकॉज नोटीस बजावली होती. दर्डांनीही विनाशर्त शरणागती पत्करून आपले शब्द गुंडाळले होते. तितकेच नाही, तर आपलेच शब्द कसे खोटे व दिखावू होते, त्याची जाहिर कबुली देणारा प्रदीर्घ लेखही आपल्याच मानबिंदू वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेला होता. त्यातून त्यांनी माध्यमातील लांडगे कसे आपल्यावर शिकारी श्वापदासारखे तुटून पडले, त्याचाही हवाला दिलेला होता. थोडक्यात त्यांनी पत्रकारांना  शेलक्या शब्दात ‘जागा’ दाखवून दिली होती. त्याचाही निषेध कुणा पत्रकार संघटनेने केल्याचे मला तरी स्मरत नाही. तेही मोदीयुग सुरू होण्यापुर्वी घडलेले होते. पण तेव्हाही कोणाला अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी दिसली नाही की जाणवली नाही.

पत्रकारांची वा त्यांच्या संघटना नामक जमाव’ झुंडींची ही निवडक वेचक संवेदनशीलता अलिकडे अधिकच बधीर झालेली असावी. किंवा अकस्मात सुप्तावस्थेतून जाग येणारी झालेली असावी. अन्यथा त्यांना जिव्हारी होणार्‍या जखमेचे दु:ख अजिबात जाणवत नाही. पण नुसत्या अफ़वांनी ते भयभीत कशाला झाले असते? कुठल्या तरी वाहिनीतून कुणा पत्रकाराची हाकालपट्टी मालकाने व व्यवस्थापनाने केल्यावर अशा लोकांना मिरच्या झोंबतात. मग त्याचे खापर मोदी सरकारवर फ़ोडण्याची स्पर्धा सुरू होते. आता त्याला कोणी फ़ारशी किंमतही देईनासा झाला आहे. ज्या कंपन्यांमध्ये हे महान अविष्कार स्वातंत्र्याचे लढवय्ये आपली तलवार परजित गेलेले असतात, तिथे भांडवल कुठून आले वा कोणाचे गळे कापून माध्यमाचा डोलारा उभा राहिला, त्याची त्यांना फ़िकीर नसते. त्यांचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी कोणी खुन मुडदे पाडून पैसे आणावेत, अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणून तर कोळसाखाण घोटाळ्यात गुंतलेल्या मालकाविषयी आपल्या वाहिनीवर चर्चाही करायची हिंमत नसलेले संपादक, इतर घोटाळेबाजांना चर्चांमधून ‘दरडा’वत बोलायचे. पण तिथूनही त्यांची हाकालपट्टी झाल्यावर कोणी चकार शब्द काढला नाही. कुठल्या भांडवलावर अशा वाहिन्या उभ्या राहिल्या? त्यात क्रोनी कॅपिटॅलिझम नव्हता का? की या बाजारबुणग्यांच्या पृष्ठभागावर लाथ बसली, मग तेच कालपर्यंतचे पवित्र भांडवल रातोरात क्रोनी कॅपिटल होऊन जाते? हा कुठला मनुवाद किंवा स्पृष्यास्पृष्यतेचा विचार आहे? ज्यात अशा सनातनी मठाधीशांच्या स्पर्शाने क्रोनी कॅपिटल लोणी कॅपिटल होते आणि यांना लाथ बसली, मग त्याच लोण्याचे क्रोनी होतात? अविष्कार स्वातंत्र्य गळ्यात पट्टे बांधलेल्या संपादकांसाठी नसते. जाडजुड पगार व सुखसोयींना सोकावलेल्यांना स्वातंत्र्य नको तर पगाराची शाश्वती हवी असते. पण नाटक मात्र स्वातंत्र्याचे रंगवले जात असते.

पत्रकारांच्या किंवा अविष्कार स्वातंत्र्याचे हे आधुनिक भोंदू नमुने माझे आदर्श कधीच नव्हते आणि असणार नाहीत. सोलापूरचे रंगा अण्णा वैद्य, औरंगाबादचे अनंतराव भालेराव, पुण्याचे नानासाहेब परूळेकर, मराठाचे आचार्य अत्रे किंवा अलिकडले निळूभाऊ खाडीलकर हे माझे आदर्श असतात. अगदी कंपनीच्या नोकरीत राहूनही आपले स्वातंत्र्य व त्याच्या लक्ष्मणरेषा पाळणारे गोविंदराव तळवलकर, अशा भुरट्या लढवय्यांपेक्षा आदरणिय असतात. दोन पिढ्या मागले नोकरदार संपादक पां. वा. गाडगीळ अधिक शूरवीर होते. त्यांच्यासह सगळ्या संपादक मंडळाने कंपनीची राजकीय भूमिका मान्य नव्हती, तर नोकर्‍यांवर लाथ मारून ‘लोकमान्य’ बंद पाडला. तरी बेकारीची कुर्‍हाड अंगावर घेताना मागेपुढे पाहिले नव्हते, की कंपनीवर क्रोनी कॅपिटॅलिइझमचा आरोप केला नव्हता. कुबेरांप्रमाणे अग्रलेख मागे घेतला नाही. तर नोकरी संपण्याची मुदत असेपर्यंत कंपनीच्या भूमिकेला झुगारणारे अग्रलेख लिहीण्याची निकराची झुंज दिली होती. असे माझे अविष्कार स्वातंत्र्याचे आदर्श आहेत आणि त्यांच्याच अनुकरणाने स्वातंत्र्याची लक्ष्मणरेषाही मला शिकवलेली आहे. ज्यांना अशा अस्सल पत्रकार संपादक व त्यांच्या बौद्धिक लढ्याचा मागमूस ठाऊक नाही वा त्या स्वातंत्र्याचे भय वाटत असते, त्यांच्याकडून मला अविष्कार स्वातंत्र्याचे मंत्र ऐकण्याइतकी दिवाळखोरी आलेली नाही. कोणी दोन टपल्या मारल्या वा शिव्या हासडल्या, तर ज्यांच्या विजारी पिवळ्या ओल्या होतात, त्यांच्यासाठी कुठलेही स्वातंत्र्य पेलणारे नसते. कारण स्वातंत्र्य ही वाडग्यात कोणी टाकलेली भिक नसते. तर कुठल्याही प्रतिकुल स्थितीत बिनधोक जे घेतले जाते, ते स्वातंत्र्य असते. माझ्या सुदैवाने असे अनेक दांडगे संपादक, पत्रकार, लेखक, प्रतिभावंत मला खुप जवळून बघता आलेले आहेत, त्यांचे अनुकरण करण्याचे सुदैव माझ्या वाट्याला आलेले आहे. असाच एक कोवळ्या वयातला प्रसंग आहे, ४४ वर्षे जुना.

१९७४ सालात मध्यमुंबई लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक व्हायची होती आणि तिथे ताकद असूनही शिवसेनेने आपला उमेदवार उभा केलेला नव्हता. तर अघोषित असा पाठींबा कॉग्रेस उमेदवार रामराव आदिक यांना दिलेला होता. त्याला विरोध करताना ‘सोबत’ साप्ताहिकात संपादक ग. वा. बेहरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खिल्ली उडवणारा प्रदीर्घ लेख लिहिला. त्याचे शीर्षक होते, ‘सेनापती की शेणपती?’. त्यामुळे शिवसैनिक कमाली़चे चिडलेले होते आणि त्याच आठवड्यात शिवाजीपार्कच्या बालमोहन विद्यामंदिर हॉलमध्ये ‘सोबत’चा वर्धापनदिन सोहळा ठरलेला होता. त्यानिमीत्ताने मुंबईत आलेले बेहरे जवळच सेनाभवन समोरच्या गल्लीत असलेल्या प्रा, माधव मनोहर यांच्या घरी उतरलेले होते. माधवरावही सोबतचे एक स्तंभलेखक. ते अन्य दोनतीन सहकार्‍यांसह कार्यक्रमाला निघालेले असताना सेनाभवनाच्या नाक्यावरच शिवसैनिकांनी त्यांच्यावर जबरदस्त हल्ला केला. दोघांना खुप मारहाण झाली. कपडे फ़ाटले, रक्तबंबाळ झाले. आजच्याप्रमाणे तेव्हा मोबाईल फ़ोन व्हाट्स अप वगैरे सुविधा नसल्याने बातमी पसरायला वेळ लागला. तोपर्यंत माधवराव आणि बेहरे माघारी घरी आले. त्यांनी डॉक्टर बोलावून उपचार करून घेतले व कपडेही बदलले. पुन्हा निघून कार्यक्रम साजरा केला. तिथेही या हल्ल्याचा निषेध झाला. त्यांच्यासाठी विषय निषेधाने संपलेला होता. पण कार्यक्रम संपण्यापर्यंत बातमी गावभर झाली होती आणि तात्कालीन गृहराज्यमंत्री शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचली होती. त्यांनी थेट माहिम पोलिस ठाण्याशी संपर्क साधून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. यातली महत्वाची बाब अशी, की जखमी वा पिडीत ज्येष्ठ संपादक पत्रकारांनी गळा काढला नव्हता. आक्रोश आरंभला नव्हता. वाढदिवसाच्य कार्यक्रमाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आखाडाही बनवला नव्हता.

पुढे संध्याकाळी उशिरा माहिम पोलिस ठाण्याचे वरीष्ठ अधिकारी माधवरावांच्या घरी दाखल झाले, बहुधा त्यांचे नाव इन्स्पेक्टर जयकर असावे. त्यांनीच मंत्र्याकडून आदेश असल्याची माहिती दिली व या दोघाही ज्येष्ठांना रितसर तक्रार देण्याची विनंती केली. रक्तबंबाळ व मलमपट्ट्यांने वेढलेल्या या दोघांची उत्तरे मला अजूनही पक्की स्मरणात आहेत. कारण मी त्याचा साक्षीदार होतो. माधवरावांचा सुपुत्र जेमिनी मनोहर माझा कॉलेजातील वर्गमित्र असल्याने माझे त्यांच्या घरी सतत येणेजाणे असायचे. त्या पोलिस अधिकार्‍यांच्या विनंती व आग्रहाचा सन्मान राखूनही बेहरे म्हणाले, आम्हाला तक्रार करायची नाही. कारण ज्यांनी मारहाण केली, त्यांना लिहीलेले कळलेले नाही की उमजलेले नाही. त्यांच्या विरोधात तक्रार देऊन काय साध्य होणार आहे? पोलिस तपास होईल, त्यांना गजाआड टाकले जाईल. दिर्घकाळ खटलाही चालेल, कदाचित शिक्षाही होईल. पण त्यातून त्यांची बुद्धी बदलणार आहे काय? त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची महत्ता उमजणार आहे काय? त्यांनाच बदलण्यासाठी पत्रकाराने काम करायचे असते. त्यांना शिक्षा देऊन वा केलेल्या दुष्कृत्याची शिक्षा देऊन, समाजाची वा त्यांची बुद्धी बदलणार नसेल, तर अशा तक्रारी तपास, खटल्याने काय साध्य होणार आहे? पत्रकारिता समाज बदलण्यासाठी सुधारण्यासाठी असते. कुणाला शिक्षापात्र ठरवण्यासाठी नसते. सहाजिकच तक्रार देण्याने त्या पत्रकारीतेचाच पराभव होणार ना? थोडक्यात बेहर्‍यांनी तक्रार द्यायचेच नाकारले. फ़ार कशाला, इतके होऊनही त्यांनी कधी बाळसाहेब वा शिवसेनेविषयी मनात डुख धरला नाही. बेहरे तरी सावरकरवादी वा हिंदूत्ववादी होते. माधव मनोहर पुरोगामी विचारांचे होते. पण त्यांनीही या हल्ल्याविषयी तक्रार द्यायचे साफ़ नाकारले. पण माधवरावांनी दिलेला खुलासा अधिकच नेमका व आजच्या भुरट्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरावा.

अर्थात आंजन त्यांच्या डोळ्यात परिणामकारक ठरत असते, ज्यांचे डोळे उघडे असतात. जे डोळे मिटूनच जगाकडे बघतात आणि मनातल्या कल्पनेलाच जगातले सत्य समजून निद्रीस्त रहाण्यात धन्यता मानतात, त्यांच्या बंद डोळ्यांच्या पापण्यांना अंजन लागून उपयोग कुठला असणार ना? माधव मनोहर यांनी मारहाणीविष्यी तक्रार देण्याचे नाकारताना दिलेले स्पष्टीकरण मला आयुष्यभर पुरलेला मंत्र आहे. लोकशाहीने आपल्या अविष्य्कार स्वातंत्र्य दिले आहे. पण ज्याला आपण लोकशाही समजून इतका गदारोळ करत असतो, ती खरोखर तितकी परिपुर्ण प्रगल्भ लोकशाही आहे काय? नसेल तर ती प्रलल्भ असल्यासारखी तिच्यापासून अपेक्षा करण्यात काही अर्थ आहे काय? माधवराव तक्रार करायचे नाकारताना त्या पोलिस अधिकार्‍याला म्हणाले, ‘अडाण्यांच्या लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची इतकी किंमत तरी मोजावीच लागणार ना? त्याविषयी तक्रार करून काय फ़ायदा?’ आजही या देशात लोकशाही तितकीच कमीअधिक अडाणी आहे, मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपॊची तक्रार करून काय साध्य होणार आहे. स्वातंत्र्याची किंमत मोठी असते, ते भिक म्हणून कोणी वाडग्यात घालत नाही. कुठलीही बहुमोल वस्तु फ़ुकटात मिळत नाही. त्याचीही काही किंमत असते. ती किंमत मोजणार्‍यांसाठी स्वातंत्र्य असते. गळ्यात पट्टे बांधून मालकाची सेवा करणार्‍यांचे नसते. भांडवलदार त्याची आर्थिक किंमत मोजत असेल, तर स्वातंत्र्य त्याचे असते. गळ्यात पट्टा बांधून घेणा्रा निष्ठावंत सेवक असतो. त्याने स्वातंत्र्याचा टेंभा मिरवायचा नसतो. तो बेहर्‍यांनी माधवरावांनी किंवा अनंत भालेराव किंवा रंगा अण्णा वैद्यांनी मिरवावा. बाकी गळ्यात पट्टा मिरवणार्‍यांनी मालकाच्या इशार्‍यावर भुंकण्याचे कर्तव्य पार पाडावे. उगाच गळचेपी झाल्याचा कांगावा करू नये. पट्टा बांधून घेतला की आपल्या गळ्यावरही आपला हक्क उरलेला नसतो ना?

21 comments:

  1. व्वा भाऊ! तुमच्या सडेतोडपणाला सलाम!

    ReplyDelete
  2. वा भाऊ निःशब्द .शेवटचे वाक्य क्लासिक

    ReplyDelete
  3. भाऊ जबरदस्त सणसणीत

    ReplyDelete
  4. ABSOLUTELY GREAT... but, unfortunately, for whom you have written are not capable of understanding it... all of it shall fall on deaf ears. But what you write is a bitter truth.

    ReplyDelete
  5. Replies
    1. श्री भाऊ शहाण्या ला शब्दाचा मार, हे सगळं जे तुम्ही लिहिलय त्याला खरोखरच जिगरबाज वृत्ती हवी, कोणाच्या ताटाखालचे मांजर काय लिहणार

      Delete
  6. देव। त्यांना सदबुद्धि देवो

    ReplyDelete
  7. तुमच्या सडेतोड लेखांमुळे मागच्या पिढीत घडलेल्या अशा अनेक घटना आमच्यापर्यंत पॉहचतात व आहाला शाश्वत सत्याचा उलगडा होतो हे सत्य आमच्या पिढीपर्यंत पोहचवल्याबद्दल आभार..

    Hats of to you भाऊ

    ReplyDelete
  8. Very nice. Bhau, your articles should translated into English so that non Marathi guys can also read and understand these excellent views of yours

    ReplyDelete
  9. अप्रतिम भाऊ...
    अगदी आतला आवाज आहे...

    ReplyDelete
  10. सर्व पत्रकारांनी पुन्हा पुन्हा वाचून अभ्यासावा हा लेख. ��

    ReplyDelete
  11. एकदम वास्तववादी भाऊ

    ReplyDelete
  12. फारच आवडला. जबरदस्त.

    ReplyDelete
  13. ‘अडाण्यांच्या लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची इतकी किंमत तरी मोजावीच लागणार ना? त्याविषयी तक्रार करून काय फ़ायदा?’


    Very true same is the status of Current Aandolan

    ReplyDelete
  14. एकदम ढासू लेख..पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे बंद डोळ्यांना हे अंजन उपयोगी पडणार नाही..संत"कुबीरां"च्या भाषेत आविष्कार स्वातंत्र्य म्हणजे नोकरीची शाश्वती. तिच्यावर गदा आली आहे मोदीमुळे.

    ReplyDelete
  15. व्वा भाऊ छान‌‌ चोपलत या अधर्मीय युध्दात पारंगत बुजगावण्या पत्रकारांना...नुसत यांना छ्छु करायचा उशीर...भुंकत सुटतात नुसते आणि यांना 'दरड'वायला गेलं की लगेच अभिव्यक्तीची कोंडी होत असते....खुप झालं आता...असल्या भुरट्यांना अनुल्लेखानेच मारणं खरंतर यांच्यावर सुड उगवण्यासारखं आहे....

    ReplyDelete
  16. आज महाराष्ट्रातील स्थिती अराजकतेकडे चाली आहे.
    आपल्या सारख्या पत्रकारांची नितांत गरज आहे असेच लेख लिहित जा.

    ReplyDelete
  17. आज महाराष्ट्रातील स्थिती अराजकतेकडे चाली आहे.
    आपल्या सारख्या पत्रकारांची नितांत गरज आहे असेच लेख लिहित जा.

    ReplyDelete