Tuesday, April 4, 2017

कपील, ठोको ताली

Image result for kapil sharma sidhu

भाजपा सोडून कॉग्रेसमध्ये गेलेल्या नवज्योतसिंग सिद्धू याची समस्या कपील शर्माने परस्पर सोडवली, असे म्हणायला हरकत नाही. कारण पक्षांतर केलेल्या सिद्धूची मुख्यमंत्री व्हायची इच्छा अपुर्ण राहिलेली असली, तरी मुख्यमंत्री झालेल्या अमरिंदर सिंग यांनी त्याला आपल्या सरकारमध्ये मंत्री म्हणून सामावून घेतले होते. मात्र नुसता नामधारी मंत्री होऊन हा गृहस्थ खुश नाही. त्याने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. आपल्याला नगण्य मंत्रालय मिळाले, किंवा महत्वाचे आणखी काही खाते मिळावे, अशी सिद्धूची अपेक्षा आहे. त्याला तितके महत्वाचे खाते देण्याऐवजी सिद्धूला मंत्री असताना विनोदी कार्यक्रमात सहभागी होण्याने कायद्यात अडचण आहे काय, याचा शोध अमरिंदर सिंग यांनी सुरू केला होता. कारण मंत्री हा सरकारचा पुर्णवेळ कर्मचारी वा अधिकारी मानला जात असतो. त्याने अन्य मार्गाने कमाई करण्यास मुभा नसते. सिद्धूने गेल्या दशकात टिव्हीच्या माध्यमात आपली लोकप्रियता सिद्ध केलेली आहे आणि कपिल शर्मा याच्या खुप गाजलेल्या विनोदी मालिकेत सिद्धू कायम असतो. खळखळून हसणे वा अधूनमधून शेरोशायरी करीत खास डायलॉग मारण्याने, त्याने प्रेक्षकांचे पक्ष वेधून घेतलेले आहे. अर्थातच हे काम तो फ़ुकटात करत नाही. त्यासाठी त्याला नक्कीच मोठा मेहनताना मिळत असतो. म्हणूनच त्याला कमाई मानले जाते. मंत्र्याने अशी अन्य मार्गाने कमाई करण्याला प्रतिबंध आहे. सहाजिकच मंत्रीपदी विराजमान झालेल्या सिद्धूने कपील शर्माच्या शोमध्ये सहभागी रहावे किंवा नाही, यावरून वादळ उठलेले होते. दिवसा मंत्री व रात्री टिव्हीचा कलाकार, अशी दुहेरी भूमिका पार पाडण्याचा पवित्रा सिद्धूने घेतला होता. पण त्याची आता बहुधा गरज उरणार नाही. कारण कपील शर्माचा विनोदी शो बंद पडण्याची पाळी आलेली आहे.

सोनी वाहिनीवर अतिशय लोकप्रिय असलेल्या या मालिकेला आता ग्रहण लागलेले आहे. त्यातला हजरजबाबी कपील शर्मा, हे मुख्य पात्र असले तरी त्याच्या सोबतीला असलेल्या अनेक कलाकारांच्या गोतावळ्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढलेली होती. अशा अन्य कलाकारांनी अलिकडे या मालिकेच्या चित्रणाकडे पाठ फ़िरवली आहे. कारण त्यामध्ये कपील शर्मा इतरांना अपमानित करतो, अशी धारणा आहे. अर्थात कार्यक्रमातील मानापमान महत्वाचे नसतात. तो निव्वळ देखावा असतो. पण वास्तवात कपील शर्मा अन्य प्रसंगीही आपल्या सहकार्‍यांना अनाठायी अपमानित करतो, अशी कायम तक्रार राहिली आहे. पुर्वी इतर वाहिनीवर ही मालिका सुरू असताना त्यातला सुनील ग्रोव्हर बाजूला झाला होता आणि त्याला आपल्या बळावर काही करता आलेले नव्हते. म्हणून पुन्हा त्यानेही जुळते घेऊन कपील शर्माची टीम चांगली यशस्वी केलेली होती. नंतर आधीच्या वाहिनीशी जमले नाही आणि नव्या नावाने तीच टीम सोनी टिव्हीवर दाखल झाली. आजघडीला भारतीय टिव्हीच्या व्यवहारात सर्वाधिक कमाई देणारी व सर्वाधिक लोकप्रिय, अशी या मालिकेची ख्याती झालेली होती. कुठल्याही चित्रपटाच्या वितरणापुर्वी कपीलच्या मालिकेत येऊन नव्या चित्रपटाचे कलावंत तिथे आपल्या गोष्टी सांगत असायचे. शहारुख आमिरपासून सलमानखान व अमिताभही त्यातून सुटले नाहीत. यातूनच कपीलच्या कार्यक्रमाचे कौतुक लक्षात यावे. अगदी चित्रसृष्टीतल्या कुठल्याही जाहिर कार्यक्रमाच्या संचालनाचीही सुत्रे आपोआप याच टीमकडे येऊन गेली. अशा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या टीमला, अगोदर सिद्धूच्या सहभागी होण्याच्या विषयाचे ग्रासले होते आणि आता ती टीमच विस्कळीत होऊन संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या दोन आठवड्यात अन्य सहकार्‍यांनी पाठ फ़िरवल्याने कपीलाही त्याचा एकखांबी तंबू टिकणार नसल्याची खात्री झालेली असावी.

परदेशी कुठल्या कार्यक्रमासाठी गेलेले असताना, कपीलने दारू पिवून खुप धिंगाणा करण्यातून ही स्थिती आल्याचे सांगितले जाते. विमानाने ही मंडळी मायदेशी येत असताना कपील दारू प्यायलेला होता. त्याला विमानातही नशापान करायचे होते. पण तिथे दारू मिळाली नाही, म्हणून त्याने विमानातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. त्यात हस्तक्षेप करायला सुनील ग्रोव्हर गेला असताना, कपीलने आपल्या या सहकार्‍यालाही नको तितक्या शिव्या घालून अपमानित केले. वास्तविक ग्रोव्हर कपीलपेक्षाही वयाने मोठा व ज्येष्ठ आहे. यापुर्वी अनेकदा त्या दोघांमध्ये खटके उडालेले आहेत. पण जमलेली टीम विस्कटू नये, म्हणून प्रत्येकाने जुळते घेतलेले आहे. पण खेळाचे नाव आपले म्हणजेच आपणच एकटे महत्वाचे, ही बाब कपीलच्या इतकी डोक्यात गेली, की त्याने इतरांना अपमानित करण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळे सेटवर अनेकदा भांडणे व्हायची आणि कामातही व्यत्यय येत राहिला आहे. दारू प्यायल्यावर तर कपील कोणाच्याच आटोक्यात रहात नाही. त्यामुळेच ही नाराजी दिर्घकाळ चालू होती. पण परदेश वारीत झालेल्या वितंडवादाने त्याचा कडेलोट झाला. सहाजिकच मायदेशी आल्यावर अन्य कलाकारांनी कपीलवर बहिष्कार घातला. तर कपीलने त्यांच्याकडे पाठ फ़िरवून अन्य काही नकलाकारांना आमंत्रित केले. पण त्यामुळे नेहमीइतका त्याचा खेळ रंगला नाही, समोर प्रेक्षक बसले असताना व प्रेक्षकांच्याही सहभागाने चालणार्‍या या खेळामध्ये, अपेक्षित रंगत आली नाही. म्हणूनच सोनी टिव्हीच्याही व्यवस्थापनाला या मालिकेचा नव्याने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. गेले काही दिवस तशी चर्चा चाली होती. पण बाकीच्या कलाकारांनी पाठ फ़िरवल्यानंतरचे भाग, फ़ुसके ठरल्याने व्यवस्थापनाला विचार करणे भाग पडले. पुढल्या वर्षासाठी कपीलशी व्हायच्या कराराचीही आता शाश्वती राहिलेली नाही.

तुलना केल्यास कपील शर्माला खुप मोठे यश अल्पावधीतच मिळालेले आहे. एका स्पर्धात्मक मालिकेतून उदयास आलेला हा हजरजबाबी कलावंत, आपल्या गुणवत्तेने इतका मोठा झाला. चित्रसृष्टीतले मोठमोठे कलाकारही त्याची पाठ थोपटू लागले. इतके मोठे व झटपट यश त्यालाही ज्येष्ठ असलेल्या अनेक विनोदवीरांना आजपर्यंत मिळालेले नव्हते. इतके मोठे यश झटपट मिळवणे शक्य झाले, तरी कपीलला ते यश पचवणे अशक्य झालेले असावे. अन्यथा त्याने इतक्या अल्पावधीतच आपल्या त्या यशावर असे पाणी ओतले नसते. एकूण शोमध्ये त्याची अपरिहर्यता कोणी नाकारलेली नाही. त्याच्या मध्यवर्ति व्यक्तीमत्वाच्या भोवतीच संपुर्ण खेळ चालतो. असे असताना त्याची महत्ता वाढवणारे अन्य कलाकारही तितकेच अपरिहार्य आहेत. कारण त्यांच्याखेरीज कपीलची महत्ता मातीमोल ठरते. त्याचीच साक्ष गेल्या दोन आठवड्यात मिळालेली आहे. मालिकेतली विविध पात्रे रंगवणारे हे कलाकार आले नाहीत, तर त्यांना पर्याय ठरू शकतील, असे अन्य कोणीही कपीलला पेश करता आले नाहीत. सहाजिकच आता त्याने लोटांगण घालून त्यांना माघारी आणणे, हा पर्याय आहे आणि तसे केल्यास त्याला आजवरच्या पद्धतीने त्यांच्यावर हुकूमत गाजवता येणार नाही. कारण त्याच सहकार्‍यांच्या अभावी कपील तोकडा पडतो, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळेच आपला अहंकार गुंडाळून कपीलला शरण जावे लागेल. नसल्यास हा खेळच गुंडाळावा लागेल. तसे झाल्यास पंजाबचा नवा मंत्री झालेल्या सिद्धूची समस्या मात्र दूर होईल. कपीलचा खेळच थंडावल्याने त्याच्या चित्रणात भाग घेण्य़ाची सिद्धूला गरज उरत नाही, की त्यातल्या कमाईचा विषय वादाचा होऊ शकत नाही. तसे कपील व सिद्धू दोघेही मुळचे पंजाबीच आहेत. आपल्या समस्येवर कपीलने काढलेला पर्याय वा उपाय बघून सिद्धूही खुशीने म्हणेल, कपील ठोको ताली!

मान्यवराची ‘हजेरी’


Image result for sachin rekha
संसदेची दोन सभागृहे असतात. त्यापैकी एक लोकसभा असते, जिची निवड थेट लोक करतात. म्हणून तिला लोकसभा म्हणतात, दुसरे वरचे सभागृह म्हणजे राज्यसभा! त्यातल्या सदस्यांची निवड राज्यांकडून होत असते. म्हणजे राज्य विधानसभेतील आमदार या सदस्यांची निवड करतात. त्याखेरीज बारा सदस्य असे असतात, ज्यांची निवड होत नाही, तर राष्ट्रपती समाजातील मान्यवर किंवा ख्यातकिर्त म्हणून या लोकांची राज्यसभेत नेमणूक करतात. अर्थात राष्ट्रपतींना कधीच कुठला निर्णय स्वयंभूपणे घेता येत नाही. त्यांना मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने जावे लागत असल्याने, सरकार ज्यांची नावे पाठविल त्याची राष्ट्रपती नेमणूक करतात. अशा नेमलेल्या नामवंतांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभवाचा देशाला लाभ मिळवून द्यावा, म्हणूनच या नेमणूका केल्या जात असतात. शबाना आझमी किंवा तिचे पती जावेद अख्तर यांची अशीच नेमणूक यापुर्वी झालेली आहे. जुन्या काळात प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिसही या सभागृहाची सदस्य होती आणि अलिकडल्या काळात लता मंगेशकर यांचीही अशीच नेमणूक झाली होती. पण त्याच सभागृहाच्या सदस्य असलेल्या समाजवादी खासदार जया भादुरी मात्र नेमणूक नव्हेतर निवडून आलेल्या राज्यसभा सदस्य होत्या. अशा सभागृहात पाच वर्षापुर्वी सचिन तेंडुलकर व रेखा यांची नेमणूक झाली होती. त्यांच्या त्या नेमणूकीचा खुप गवगवा झालेला होता. आताही त्यांच्याच तिथे अनुपस्थित असण्याचा मुद्दा गाजला आहे. या दोघांची राज्यसभेतील उपस्थिती नगण्य असेल, तर त्यांच्या सदस्यत्वाचा विचार करावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे सदस्य नरेश अगरवाल यांनी केली. त्यांचा आक्षेप चुकीचा म्हणता येणार नाही. कारण या सदस्यांनी कामकाजात नाहीतरी सभागृहात हजेरी लावली पाहिजे. पण त्यापैकी कोणीही सभागृहात ठराविक दिवसही हजर न रहाण्याचाच विक्रम केलेला आहे.

असा आक्षेप कलाकार वा नामवंतांच्या बाबतीत घेतला, मग अनेकजण नाराज होतात. नावाने मोठी असलेली माणसे नियमाच्या पलिकडे असतात, असा आपल्या देशात एक समज आहे. त्यामुळेच सचिन वा रेखाविषयी आक्षेप घेतला गेला, मग अनेकजण अगरवाल यांच्यावर नाराज झाल्यास नवल नाही. पण त्यांच्या आक्षेपात आशय नक्कीच आहे. ह्या जागा वा नेमणूका दिखावू किंवा प्रतिष्ठेची पदके नाहीत. नामवंत व्यक्तींच्या अनुभवाचा व आकलनाचा समाजाला लाभ व्हावा, ही त्यातली अपेक्षा असते. त्यांनी जीएसटी वा लोकपाल अशा विषयात मतप्रदर्शन करावे किंवा मुद्देसुद भाषण करावे, अशी कोणाची अपेक्षा नाही. पण जेव्हा ठराविक विषय गाजतात, तेव्हा अशा लोकांचे मतप्रदर्शन जनतेसाठी अगत्याचे असते. उदाहरणार्थ सचिनवर चेंडू कुरतडल्याचा आरोप झाला, तेव्हा त्याचीही दखाल संसदेने घेतलेली होती आणि सर्व पक्षाच्या सदस्यांनी आवाज उठवला होता. गेल्या पाच वर्षात सचिनने सभागृहाचा सदस्य म्हणून अशी कुठली भूमिका संसदेत मांडली? प्रामुख्याने सध्या क्रिकेट संस्थेच्या कारभाराविषयी न्यायालयाशी संघर्ष चालू आहे आणि त्या लोकप्रिय खेळाविषयी कोट्यवधी लोकांना आकर्षण आहे. सहाजिकच त्यात काहीतरी भूंमिका सचिन तेंडुलकरने मांडली असती, तर गोष्ट वेगळी होती. याच विषयात किर्ती आझाद या माजी कसोटीपटूने आग्रहाने काही भूमिका मांडलेल्या आहेत आणि पक्षाचा सदस्य असूनही त्याने निर्भिडपणे आपले कर्तव्य बजावलेले आहे. पण नियुक्त सदस्य असूनही सचिनने क्रिकेट नियामक मंडळाविषयी मौन धारण केलेले आहे. क्रिकेटमुळेच सचिनला आज नाव मिळालेले असताना, त्याने इतक्या गंभीर विषयात देशाच्या सर्वोच्च व्यासपिठावर बोलण्याची संधी असतानाही अवाक्षर बोलू नये, ही खटकणारी बाब आहे. मग अशा नामवंत व्यक्तीने संसदेत असावेच कशाला?

नरेश अगरवाल यांचा मुद्दा म्हणूनच विचारात घेण्यासारखा आहे. ते कुठल्या पक्षाचे आहेत वा कोणाविषयी बोलत आहेत, त्याला महत्व नाही. त्यांनी अशा नेमणूकांचा मुद्दाच उपस्थित केलेला आहे. जेव्हा सचिनची नेमणूक या जागी झाली, तेव्हा कॉग्रेसची प्रतिष्ठा लयाला चाललेली होती आणि त्यात सुधार होण्यासाठी सचिनला तिथे नेमून आपली प्रतिमा उजळण्याची खटपट सोनिया राहुलनी केलेली होती. खरेतर त्यासाठीच सचिनला अनेक खेळाडूंबी तेव्हा दोष दिलेला होता. कारण तेव्हा सचिन खेळत होता आणि त्याने कॉग्रेसने दिलेली नेमणूक घेऊ नये, असे अनेकांना प्रामाणिकपणे वाटलेले होते. अर्थात सचिनला अशा नेमणूकीत रसही नव्हता. पण राजीव शुक्ला या मंत्र्याने दडपण आणून, त्याला नेमणूक स्विकारायला भाग पाडलेले होते. हा शुक्ला क्रिकेट स्पर्धेचा व मंडळाचा सदस्य होता. सहाजिकच ती नेमणूक घेऊन सचिनने आपली प्रतिष्ठा कॉग्रेसला बहाल केली होती. पण पुढे मात्र काहीही केले नाही. कारण त्याला अशा राजकीय नेमणूकीत रसच नव्हता. रेखा या अभिनेत्रीची गोष्टही वेगळी नाही. पण अशा नेमणूका राजकीय पक्ष आपापल्या हेतूने करीत असतात आणि कुठल्याही सामाजिक विषयात प्रशासकीय भूमिका नसलेल्यांना नेमणूका दिल्या जात असतात. अगरवाल यांचा आक्षेप तोच आहे आणि म्हणूऩच महत्वाचा आहे. जावेद अख्तर वा शबाना आझमी यांनाही अशी नेमणूक मिळाली होती. पण त्यांनी शोभेचे सदस्य म्हणून न रहाता, प्रत्येक महत्वाच्या विषयावर आपली मते त्या व्यासपीठावर मांडलेली होती. प्रसंगी चित्रपट उद्योगालाही चार खडेबोल ऐकवलेले होते. शबानानेही हाच मुद्दा यापुर्वी प्रथम उपस्थित केला होता. चित्रपट उद्योगातील असून व नियुक्त सदस्य असूनही त्यांनी जीवाभावाच्या अशा लता मंगेशकर सभागृहात उपस्थित नसतात, याविषयी आक्षेप नोंदवला होता.

ही बाब गंभीर आहे. कारण त्यातून अशा नेमणूकांचा हेतूच पराभूत होत चालला आहे. कुठल्याही क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचे अनुभव किंवा समस्यांविषयीचे पर्याय समाजाला मिळावेत, म्हणून अशा नेमणूकांची तरतुद केली आहे. शिक्षणक्षेत्र असो वा कलाक्षेत्र असो, त्यातूनही समाजाची जडणघडण चालू असते. म्हणूनच सरकारच्या एकूणच निर्णय प्रक्रीयेत अशा जाणत्यांचे अनुभव मोलाचे असतात. सहाजिकच तितक्या उत्साहाने व जबाबदारीने समाजातील घडामोडींवर नजर ठेवणार्‍यांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचावा, हाच अशा नेमणूकीमागचा हेतू राखलेला होता. पण ज्याप्रकारच्या नेमणूका अलिकडे होत असतात, त्यातून तो हेतू सफ़ल होताना दिसत नाही. उदाहरणार्थ शबाना वा अख्तर यांच्याइतकेच अनुपम खेरही विविध सामाजिक विषयावर बोलत असतात. त्यांच्यासारखा माणूस, अशी नेमणूक मिळाली तर तिचे सोने करू शकतो. पण त्यांच्याऐवजी रेखाची नेमणूक झाली. अशा नेमणूका होऊ नयेत आणि नेमणूका करताना संबंधित व्यक्तीला सभागृहाच्या कामकाजात रस असल्याचे तपासून घ्यावे, असेच अगरवाल म्हणत असतील, तर त्यात गैर काहीच नाही. अनेक नामवंत व्यक्ती हुशार वा अनुभवी असल्या, तरी स्पर्धात्मक वा गदारोळाच्या चर्चेत सहभागी होऊ शकणार नाहीत. पण दुसरी बाजू अशी आहे, की तशी व्यक्ती बोलायला उभी राहिली, तरी सभागृहातला गदारोळ काही काळ शांत होऊ शकतो. सचिन वा रेखा, असे कोणी गोंधळाच्या क्षणी उभे राहिले, तर इतर सदस्यही आपला मुद्दा वा आग्रह सोडून त्यांना ऐकतील. काहीकाळ तरी हमरातुमरीवर आलेल्या सभागृहात शांतता प्रस्थापित होऊ शकेल. इतकीही अपेक्षा त्यांच्याकडून करू नये काय? तापलेले वातावरण शांत करण्यासाठी जरी त्यांचा उपयोग झाला असता, तरी अगरवाल किंवा अन्य कोणाला त्यांच्या अन्य समयीच्या गैरहजेरीची तक्रार करायला जागा राहिली नसती.

व्यापारी चळवळी

Image result for jantarmantar protests AAP


‘इंडियाटुडे’ या इंग्रजी वाहिनीने काश्मिरात पोलिसांवर दगडफ़ेक करणार्‍या काही तरूणांच्या मुलाखती छुप्या कॅमेराने घेऊन प्रक्षेपित केल्या आहेत. त्यातून एका नव्या राजकीय घातपातावर प्रकाश पडला आहे. काश्मिरात पोलिस वा सुरक्षा दलांवर जमावाने हल्ले करणे वा दगडफ़ेक इत्यादी करणे, आता नवे राहिलेले नाही. त्याला आझादी आंदोलन म्हणायची आपल्याकडे बुद्धीजिवी फ़ॅशन आहे. विद्यापीठात अभ्यास करणे सोडून राजकीय हेवेदावे करण्यापासून देशात कुठेही राष्ट्रविरोधी कारवाया करण्याला आजकाल लोकशाही संबोधले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून आपल्याला अमूक अधिकार दिलेला आहे, असे म्हणत वाटेल ती मनमानी करण्याला आजकाल लोकशाही संबोधले जाते. त्यात नेहरू विद्यापीठात भारतविरोधी घोषणा देण्यापासून विद्यापीठातील मुलांना नक्षलवादी बनवण्यापर्यंतच्या कारवाया सामील आहेत. त्यापैकी कशालाही तुम्ही आक्षेप घेतला, तर तुम्ही घटनाविरोधी असता आणि लोकशाहीचे मारेकरी ठरवले जाता. हे कोण ठरवतो? तर माध्यमापासून शैक्षणिक व कला सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक नामवंत तसे ठरवत असतात. त्यांना हा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न विचारणे हे जणू पाप झालेले आहे. बुद्धीमंत म्हणून अशी माणसे समाजात पेश केली जातात आणि मग त्यांनी समाजाचे नैतिक अधिसत्ता आपल्यापाशी असल्याप्रमाणे कशालाही देशप्रेम वा देशद्रोह ठरवाचे असा हा कारभार झालेला आहे. असा वर्ग कुठून अकस्मात निर्माण झालेला नाही. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ही पंचमस्तंभीय मंडळी पद्धतशीरपणे इथे जन्माला घातली गेली व त्यांची सरकारी अनुदानातूनच जोपासना करण्यात आलेली आहे. त्यातून मग व्यापारी चळवळी उदयास आलेल्या आहेत. काश्मिरातील पोलिसांवर हल्ले व दगडफ़ेक करणारेही अशाच व्यापारी चळवळीचे घटक आहेत.

गेल्या काही वर्षापासून काश्मिरात कुठेही पोलिस ठाणी वा लष्करी छावण्यांवर घातपाती हल्ले होत राहिले आहेत. हे हल्लेखोर सीमेपलिकडून येतात आणि त्यांना इथे आश्रय मिळत असतो. त्यांच्या पाठीशी इथले बुद्धीमंत उभे रहाताना दिसतील. अशा बुद्धीमंत वा मान्यवरांचा घरखर्च कोण चालवतो, हे बघण्यासारखे आहे. परदेशातून कोट्यवधी रुपये दिर्घकाळ भारतात येत राहिले आणि अनुदानाच्या रुपाने अशा कारवायांसाठी बुद्धीमंत निर्माण करण्यात आले. यातल्या अनेकांची श्रीमंती भारतातल्या गरीबी व अन्यायाच्या कच्च्यामालावर चालत असते. असे लोक इथे एक एनजीओ स्थापन करतात. मग त्यांना त्या सामाजिक कार्यासाठी परदेशातून मोठी रक्कम येत असते. नर्मदा बचाव आंदोलनापासून गुजरातच्या दंगलीतील पिडितांना न्याय देण्यापर्यंत, अनेक बाबतीत अशा संस्था पुढाकार घेताना दिसतील. अर्थात त्यात ठराविक बाबतीत एक संस्थेचा पुढाकार असेल. पण तिच्या मदतीला तत्समच दुसर्‍या संस्थाही उभ्या असतात. सोयीनुसार यात एकजण पुढाकार घेतो आणि बाकीचे अनुयायी होत असतात. त्यात काही नावाजलेले वकील असतात, कोणी नामवंत कलाकार वा साहित्यिक असतात. पण सर्वांचा गोतावळा मुळातच एक असतो. त्यातले काहीजण भूमीगत राहून काम करतात, तर काहीजण उजळमाथ्याने समाजात वावरून तीच बाजू लढवत असतात. साईबाबा नावाचा एक प्राध्यापक दिल्लीच्या विद्यापीठात बसून गडचिरोली वा छत्तीसगड भागातल्या नक्षलवादी घातपातांना रसद पुरवित असतो. तर सेन नावाचा डॉक्टर दवाखाना थाटून नक्षली हिंसाचाराला आवश्यक साधने पुरवित असतो. अशा लोकांना कायद्याच्या जाळ्यात पकडले जाते, तेव्हा अन्य क्षेत्रात लुडबुडणारे त्यांच्या बचावाला घावून येताना दिसतील. ही स्थिती आता मागे पडली असून, आता दंगली व हिंसाचारालाच लोकशाही ठरवण्यापर्यंत मजल गेली आहे.

गतवर्षी मोदी सरकारने अशा हजारो संस्थांना परदेशातून मिळणार्‍या पैशाला लगाम लावला. त्यापैकी काही संस्थांच्या चालकांना जाब विचारले तेव्हा त्यांची पापे उघड होऊ लागली आहेत. उदाहरणार्थ कुठल्याही विषयात न्यायाच्या गप्पा मारीत, याकुब मेमनसारख्या मारेकर्‍याची फ़ाशी रोखण्यासाठी रात्रंदिवस जागलेल्या एक महिला वकील आहेत. त्यांच्याही संस्थेला त्यात लगाम लावला गेला आणि जाब विचारला गेला. एका कुठल्या तरी प्रकरणात सरकारने अमूक कायदा आणावा, म्हणून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यासाठी राजधानी दिल्लीत धरणे धरले गेलेले होते. त्याच धरण्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना रोजगार म्हणून प्रतिदिन मोबदला दिल्याचाही हिशोब संस्थेच्या खर्चात दाखवलेला होता. आंदोलन हे अशारितीने आता रोजगार हमी झालेला आहे. बघणार्‍याला वाटते, की त्या रस्त्यावर धरणे धरून बसलेल्यांची ही समस्या आहे. त्यात बिचारे कोणीतरी ग्रासलेले पिडलेले रस्त्यावर आलेले आहेत. तशा बातम्याही रंगवल्या जात असतात. त्याचे चित्रण वाहिन्यांवर झळकते आणि मग संस्थाचालकाला आपली बाजू मांडण्यासाठी कॅमेरासमोर उभे केले जाते. त्यावर चर्चा रंगवल्या जातात. एकूणच समाजात त्याच विषयात गदारोळ माजल्याचे चित्र उभे करून सरकारवर दडपण आणले जाते. प्रत्यक्षात ते धरणे वा आंदोलन हा निव्वळ पगारी लोकांनी उभा केलेला देखावा असतो. त्यासाठी कष्टकरी म्हणून तिथे पगारी गर्दी आणलेली असते. आता तोच उद्योग काश्मिरात सुरू झाला आहे. तिथे दंगली, जाळपोळ वा दगडफ़ेकीसाठी रोजंदारीवर लोकांना आणले जाते. तसे यापैकी काहीजणांनी इंडियटुडेच्या छुप्या चित्रणातच कथन केले आहे. दगड मारणारे पगारी दंगलखोर म्हणजे काश्मिरातील निराश वा नाजार तरूण आहेत आणि म्हणूनच त्यांच्याशी संवाद करण्याचाही आग्रह आहे.

एका बाजूला असे दिसेल की काश्मिरात जो हिंसाचार चालू आहे, त्यातला घातपात सोडला तर उरलेल्या धिंगाण्याचे इथले अनेकजण समर्थन करीत असतात. काश्मिरात एक संसदेचे शिष्टमंडळ गेलेले होते. तेव्हा तिथल्या विरोधातील लोकांशी संवाद करावा, असा हेतू राखलेला होता. पण हुर्रीयत वा तत्सम फ़ुटीरवादी नेत्यांनी संसदेतील या शिष्टमंडळाशी बोलायचेही नाकारले. ठरल्यावेळी व ठरल्या जागी हे नेते आलेच नाही. अखेरीस येच्युरी यांच्यासारखे काही नेते स्वत:च हुर्रीयतच्या कार्यालयापर्यंत गेले, तर त्यांच्यासाठी दारही उघडण्यात आले नाही. हीच ज्यांची भूमिका आहे, त्यांच्याशी संवाद करायचा म्हणजे काय? अशा काश्मिरात पाकमधुन कोणी घातपाती येतो आणि हिंसेच थैमान घालतो, त्याचा बंदोबस्त करायला कोणी घराबाहेर पडत नाही. पण त्याचाच बंदोबस्त करायला पोलिस वा सुरक्षा दलाचे जवान जातात, तेव्हा त्यांच्या कामात व्यत्यय आणला जातो. पुर्वी काश्मिरात शांतता राखण्यासाठी जे पोलिस वा सुरक्षा दले काम करीत होती, त्यांच्यावर काश्मिरी तरूणांचे जमाव हल्ले करताना दिसायचे. आता हे तरूण घातपाताचा बंदोबस्त करण्यात गुंतलेल्या सैनिकांवरच पाठीमागून हल्ले करीत असतात. थोडक्यात घातपात्याचा बंदोबस्त करण्यात अडथळा आणण्याचा उद्योग सुरू झाला आहे. याचा अर्थ काश्मिरात शांतता व सुरक्षा नांदावी, यासाठी चाललेल्या प्रयत्नात हे तरूण दंगेखोर व्यत्यय आणत असतात. याचा सरळ अर्थ असा, की त्यांना शांतता नको आहे आणि हिंसाचारच हवा आहे. त्यासाठी सीमेपलिकडून येणारे हिंसाचारी घातपाती त्यांना आपलेसे वाटतात आणि हिंसेचा बंदोबस्त करणारे पोलिस व सुरक्षा सैनिक या तरूणांना शत्रू वाटतात. पण असे त्या तरूणांना खरेच वाटते असा एक समज होता. इंडियाटुडेच्या चित्रणाने तो समज दूर केला आहे. या तरूणांना काश्मिर वा शांततेविषयी कसलेली कर्तव्य नाही. ते रोजंदारी म्हणून दंगल दगडफ़ेक करीत असतात.

हेच कालपरवा अमेरिकेतही होताना दिसलेले आहे. तिथे ट्रंप हा नवा अध्यक्ष निवडून आल्यावर, अनेक महानगरात ‘माझा राष्ट्राध्यक्ष नाही’ असे फ़लक घेऊन ट्रंपविरोधी निदर्शने सुरू झाली. यामागे एक मोठा उद्योगपती व पैसेवाला असल्याचे उघड झालेले आहे. अशा आंदोलने व चळवळींना पैसा पुरवणे, हाही एक व्यापार झालेला आहे. भारतात अशांतता माजवण्यासाठी पाकिस्तान वा चिनसह अनेक देश मुद्दाम अशा रितीने गुंतवणूक करत असतात. अमेरिकेसारख्या देशातील बहुराष्ट्रीय कंपन्याही आपले राजकीय किंवा व्यापारी हितसंबंध राखण्यासाठी विविध समाजसेवी संस्थांन हाताशी धरून कुठेही आंदोलने पेटवत असतात. इजिप्तमध्ये झालेले अरब बंडाचेही आंदोलन असेच होते. त्याची प्रेरणा स्थानिक नव्हती. स्थानिक विषय घ्यायचे आणि स्थानिक असंतोषाला खतपाणी घालून, त्यातून तिथल्या प्रस्थापित कायदा व्यवस्थेला सुरूंग लावायचा असा खेळ चालतो. त्यात मग स्थानिक कायदे व त्यातील पळवाटांचा कुशलतेने वापर चालू असतो. म्हणूनच प्रस्थापित कायदे व नियमानुसार अशा घातपातांचा बंदोबस्त करता येत नाही. काश्मिरात सैनिकी कारवाई करायला गेल्यास त्यात मानवाधिकाराचे अडथळे निर्माण केले जातात. तिथे मारल्या जाणार्‍या नागरिक, पोलिस, सैनिकांच्या जीवाला कवडीची किंमत नाही. पण चुकून जरी कोणी घातपाती चळवळ्या मारला गेल्यास गहजब सुरू होतो. याकुब मेमन वा संसदेवरील हल्ल्यातला दोषी अफ़जल गुरू याच्यासाठी झालेला मान्यवरांचा आटापिटा दुसरे काय सांगतो? त्यापैकी एकही मान्यवर वकील वा बुद्धीमंत नागरिक हकनाक मारले जातात, त्यांच्या न्यायासाठी पुढे सरसावलेला दिसणार नाही. मग हे लोक नेमके गुन्हेगार व दहशतवाद्याच्याच पाठिशी कशाला उभे रहातात? त्यांना कोणी पुढे केलेले असते? त्यांना कोण कसला मोबदला देत असतो?

त्याचे उत्तर चळवळीतल्या व्यापारात सामावलेले आहे. आजकाल सामान्यांच्या जीवनातील समस्या किंवा त्रास, हा राजकीय व्यापारातील कच्चा माल झालेला आहे. त्या व्यापारात विविध देशांचे हितसंबंध गुंतवून स्थानिक बुद्धीमंत आपला व्यापार चालवित असतात. काश्मिरात शांतता नांदावी म्हणून भाषणबाजी करणारे, तिथे लष्कराचे समर्थन करणार नाहीत, पण दगडफ़ेकीची पाठराखण करतील. कारण दगडफ़ेक करणार्‍यांना रोजगार पुरवणार्‍यांनीच बुद्धीमंतांनाही पोसलेले असते. यापैकी कोणी प्रत्यक्ष दंगल वा दगडफ़ेक चालू असताना हस्तक्षेप करायला जाणार नाही, की दंगलखोरांची समजूत काढण्यात पुढाकार घेणार नाही. पण तशा घटनेत कोणी पोलिसांकडून मारला गेला, मग गहजब करायला धाव घेतील. पण सुरूवात कुठून होते? पोलिस घातपात्याला पकडण्याची कारवाई करत असताना त्यांच्यावरच दगडफ़ेक होते. त्यातला खरा गुन्हेगार दगड मारणारा असतो. त्याला निर्दोष ठरवून मग पोलिसांना मारेकरी ठरवण्यात बुद्धी खर्च होते. पर्यायाने पोलिस सरकारचे असल्याने सरकारलाच खुनी ठरवले जाते. असे युक्तीवाद करणारे बुद्धीमंत आणि त्या दगडफ़ेकीला पैसे देऊन रोजगार बनवणारे एकाच पठडीतले असतात. मात्र त्यांच्यातले थेट संबंध कायद्याच्या भाषेत व व्याख्येत ठामपणे मांडता येत नसल्याने, त्यांचा हा व्यापार उजळमाथ्याने चालू असतो. जिथे कायद्याचे राज्य नाही अशा इसिसच्या साम्राज्यात किंवा चीन कोरियासारख्या देशात, यापैकी कोणाही मानवतावादी बुद्धीमंताची डाळ शिजत नाही. कारण तिथे कायद्यातील पळवाटा वापरण्याची सोय नाही की मुभा नाही. म्हणूनच चळवळींचा व्यापार अशा देशात रुजू शकलेला नाही. पण जिथे लोकशाहीचे थोतांड करून ठेवले आहे, तिथे हिंसक मानवतावादी चळवळींचा व्यापार बोकाळला आहे. उद्या संतप्त लोकच कायदा हाती घेतील, तेव्हाच या व्यापाराला पायबंद घातला जाऊ शकणार आहे.


Monday, April 3, 2017

रंगराव आणि पतंगराव

chaupal के लिए चित्र परिणाम

रंगराव आणि पतंगराव हे दोघे अतिशय जीवलग मित्र होते. एकच गावात जन्मलेले आणि एकत्र खेळत भांडत लहानाचे मोठे झालेले. त्यापैकी पतंगरावांच्या मुलीचे लग्न होते आणि त्यांनी रंगरावाला एक विनंती केली. घरी लग्नानिमीत्त पाहुणेरावळे येणार, तर भांड्यांची थोडी कटकट व्हायची शक्यता होती. तर कार्यपुरती काही भांडी रंगरावांनी उधार द्यावी. मित्राच्याच घरचे कार्य म्हटल्यावर रंगरावाने हयगय केली नाही. शक्य तितकी वापरात नसलेली घरातली भांडी पतंगरावांना देऊन टाकली. आठवड्याभरात विवाह संपन्न झाला आणि एकेदिवशी पतंगराव मोटरसायकलवर पोत्यातून उधार भांडी परत करायला आले. पोते रंगरावाच्या घरात टाकल्यावर मस्त चहा मारूनच पतंगराव माघारी फ़िरले. त्याच संध्याकाळी दोघांची गावाच्या पारावर भेट झाली. तिथेही लग्नसोहळ्याचेच कौतुक चाललेले असताना रंगराव येऊन ठेपले. त्यांनीही पतंगरावाच्या जावयाचे कौतुक केले. मात्र थोड्याच वेळात गप्पा उधार भांड्याकडे वळल्या. रंगरावांनी भांड्याचा विषय काढला तर त्यांना बोलायची संधीही न देता जमलेल्या गावकर्‍यांसमोर पतंगरावांनी मित्राचे जाहिर आभार मानले. इतका मोठा सोहळा आणि इतकी लोटलेली गर्दी संभाळताना, रंगरावाच्या घरातल्या भांड्यांमुळे पंगती कशा पुर्ण होऊ शकल्या, त्याचीही कहाणी सांगून झाली. पण त्या गडबडीत बिचार्‍या रंगरावाला आपल्या मनातले बोलायची संधीच मिळत नव्हती. अखेर पतंगरावांचे कौतुक पुराण संपल्यावर रंगराव म्हणाले, मित्रा तुझे कौतुकाचे शब्द संपले असतील तर मला काही सांगायचे आहे. पतंगरावांनीही मग अडवले नाही. रंगराव म्हणाले, अरे मित्रा भांडी परत देताना तुझी काही तरी गफ़लत झालीय. म्हणजे जितकी भांडी तू माझ्याकडून नेली होतीस, त्यापेक्षा अधिक भांडी परत केलेली आहेस. आता मात्र जमलेल्या पारावरच्या गर्दीला आश्चर्याचा धक्का बसला.

पतंगराव हा गावातला सर्वात इब्लिस व लबाड माणूस म्हणून ख्यातकिर्त होता. त्याच्याकडून अशी चुक होणेच शक्य नव्हते. एकवेळ त्याने नेलेल्या भांड्यापेक्षा कमी भांडी परत केली वा काही भांडी चोरली असे रंगरावांनी म्हटले असते, तर लोकांना नवल वाटले नसते. पण जितकी भांडी नेली, त्यापेक्षा अधिक भांडी पतंगराव चुकून परत करतो, हा त्या गावातला खरेच चमत्कार होता. पण प्रत्येकाने रंगरावाचे शब्द आपल्याच कानांनी ऐकलेले असल्याने शंकेला जागा नव्हती. सहाजिकच सर्वजण एकटक आता पतंगरावाकडे बघू लागले होते. कुजबुज शांत झाल्यावर पतंगरावाने खुलासा केला, त्यामुळे तर सर्वांना फ़ेफ़रे येण्याचेच बाकी राहिले. कारण गावामध्ये खरोखरच चमत्कार घडला होता. पतंगराव उत्तरले. अरे रंग्या, तुलाही इतकी अक्कल नाही? माझ्यासारखा व्यवहारी काटेकोर माणूस तुला स्वप्नातही फ़ुकटची अधिक भांडी देईल का? कदापी शक्य नाही. तुझी जितकी भांडी आणली तितकी परत केलीत. रंगराव म्हणाले, अरे मलाही खरे वाटले नव्हते. पण बायकोने भांडी मोजून दिली होती आणि आल्यावरही मोजली. जाताना तू ३० भांडी घेऊन गेला होतास आणि परत आणून दिलीस तेव्हा ३५ भांडी होती. बायको कशाला खोटे बोलणार? असे उत्तर ऐकून पारावरची मंडळीही अचंबित झाली व पतंगरावाकडे रोखून बघू लागली. तर मनसोक्त हसून पतंगराव म्हणाले, त्यात कुठलीही गफ़लत नाही. आठवडाभर तुमची भांडी आमच्या घरात असताना, त्यातली काही बाळंत झाली. त्यांची पाच बाळे तुमचीच नाही का? ती आमच्याकडे कशी ठेवता येतील? म्हणून परत करताना तुमच्या तीस भांड्यांसह त्यांची पाच बाळं परत केली. तुला ती प्रथमच बघितल्याने ओळखता आली नसतील. पण ती सर्व भांडी तुमचीच आहेत. माझ्याकडे बाळंत झाली म्हणून माझी होऊ शकत नाहीत. तशीच्या तशी परत केली.

या गोष्टीचा मग गवभर गवगवा झाला. ज्याच्यात्याच्या तोंडी रंगराव पतंगरावाच्या भांड्यांचा किस्सा कित्येक दिवस चालला होता. रंगराव आणि त्यांची पत्नी खुश होती. फ़ुकटात नवी पाच भांडी मिळाली होती. काही महिने उलटले आणि पतंगरावांच्या मुलाचेही लग्न निघाले. मुलीच्याच लग्नाची आताही पुनरावृत्ती झाली. पतंगरावाने घरातली अडचण सांगून रंगरावाकडे थोड्या काळासाठी भांड्यांची मागणी केली. रंगराव लगेच तयार झाला. त्याच्यापेक्षाही त्याची पत्नी उतावळी झाली होती. तिने घरातली मडकी बुडकुली सोडून सर्व धातूची किंमती भांडी पतंगरावांनी आणलेल्या पोत्यात भरली. पोते कमी पडले, म्हणून रंगरावांनी घरातल्या पोत्यात उरलीसुरली भांडी भरून पतंगरावाच्या घरी पोहोचती केली. पतंगरावाच्या पुत्राचा लग्नसोहळा यथोचित पार पडला आणि महिना उलटत आला तरी रंगरावांची उसनी भांडी परत आलेली नव्हती, की पतंगराव त्याविषयी बोलतही नव्हता. अखेरीस एका संध्याकाळी पारावरच रंगरावाने तो विषय छेडला. तेव्हा दु:खद चेहरा करून पतंगराव उत्तरले, मित्रा वाईट बातमी आहे. काय सांगू? लग्नाचा सोहळा संपला आणि दुसर्‍याच दिवशी स्वाईनफ़्लूची बाधा होऊन सगळी भांडी मरून गेली. आमची मेली तशीच तुझ्याकडून आणलेली उसनी भांडीही मरून गेली. पण तुला ही दु:खद बातमी कशी सांगू, म्हणून इतके दिवस गप्प होतो. सांगायची हिंमतच होत नव्हती बघ. क्षणात रंगरावांनी रौद्ररूप धारण केले आणि पतंगराव भामटा असल्याचा आरोप केला. हाणामारीचाच प्रसंग आला होता. पण गावकरी मध्ये पडले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार रंगरावाने मित्रावर कोर्टात दावा गुदरला. लौकरच न्यायालयात खटला उभा राहिला आणि गावकर्‍यांच्याही साक्षी निघाल्या. पुरावे तपासले गेले आणि सुनावणी संपत आल्यावर निकालापुर्वी न्यायाधीशांनी रंगरावाला पिंजर्‍यात आणून काही प्रश्न केले.

मुलीच्या लग्नाच्या वेळी तुमची उसनी भांडी पतंगरावाने परत केली होती ना? तेव्हा तुमची भांडी बाळंत झाली होती ना? तेव्हा तुमच्या भांड्यांना झालेली मुलेही तुम्ही स्विकारली होती ना? म्हणजे भांड्यांना मुले होतात वा भांडी बाळंत होतात, हे तुम्ही स्विकारलेले वास्तव होते ना? मग जी भांडी बाळंत होऊ शकतात, ती रोगराईने मरूही शकतात. म्हणूनच आता पतंगरावाला भामटा म्हणता येणार नाही. पहिल्या लग्नाच्या वेळी तुम्ही भांडी बाळंत होण्याला आणि त्यांना झालेली मुले स्विकारण्यास नकार दिला असता, तर गोष्ट वेगळी होती. विद्यमान दंडविधानानुसार तुमचा आजचा दावा मान्य करता आला असता. आज जर याला लबाडी म्हणायचे असेल, तर तेव्हाही ती भामटेगिरीच होती. पण तेव्हाची भामटेगिरी लाभदायक म्हणून तुम्ही स्विकारली असेल, तर त्याच तर्काने आजची भामटेगिरीही तुम्हाला मान्य करावी लागेल. ज्या भांड्यांना मुले होतात, ती मरूही शकतात. रंगरावाने कपाळावर हात मारून घेतला. ही भाकडकथा उत्तरप्रदेशच्या निवडणूक निकालानंतर आठवली. त्यातले रंगराव कोण, पतंगराव कोण हे समजावण्याची गरज नाही. मायावती, केजरीवाल यांना अधिक मते-जागा मिळाल्या, तेव्हा मतदान यंत्रात दोष नव्हता. मात्र पराभवाचा सामना करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांना निर्जीव धातूची भांडी मरत नसतात, हे विज्ञान आठवले आहे. पण जेव्हा त्यांची भांडी बाळंत झाली होती, तेव्हा त्यांना त्याच मतदान यंत्रात कुठलाही दोष वा भामटेगिरी दिसली नव्हती. आजकालच्या राजकारणात पतंगराव आणि रंगराव इतके बोकाळले आहेत, की त्यातून कोणाला भामटा व कोणाला प्रामाणिक म्हणावे, असा प्रश्न आहे. मधल्यामध्ये निवडणूक आयोगाला मात्र असल्या आरोप प्रत्यारोपाची डोकेदुखी सहन करावी लागत असते. केजरीवाल यांनी तर सचोटीलाच भामटेगिरी करून टाकण्यापर्यंत मजल मारली आहे.

Sunday, April 2, 2017

महाभारतातले रामायण

mulayam akhilesh with modi के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेश विधानसभेत उडालेला धुव्वा सहन केल्यावर आता हळुहळू दुखणी चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. मायावतींनी तात्काळ मतदान यंत्रावर शंका घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. पण तुलनेने मुलायमसिंग गप्प होते. खरेतर त्यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला येऊ घातलेला पराभव दिसत होता. अन्यथा त्यांनी आपल्या लाडक्या पुत्राला पक्षाचा असा धुव्वा उडवू दिला नसता. पक्षात मुलायम यांचा दबदबा नसेल असे कोणी मानू शकत नाही. पण शिवपाल यादव हा धाकटा भाऊ आणि अखिलेश हा लाडका पुत्र, यापैकी निवड करताना आपण पक्षपात केलेला नाही, असे दाखवण्यासाठी या यादवकुलीन राजकारण्याने श्रीकृष्णालाही मागे टाकले. तेव्हा कौरव-पांडव श्रीकृष्णाची मदत मागायला पोहोचले असताना, त्याने दोघांसमोर पर्याय ठेवले होते. त्यात एकाला सैन्य मिळेल आणि दुसर्‍याला फ़क्त शस्त्र न उचलणारा साक्षात श्रीकृष्ण मिळेल, असा पर्याय होता. त्यात दुर्योधनाने सैन्याची निवड केली, तर अर्जुनाने श्रीकृष्णाला पत्करले होते. कारण सैन्यापेक्षाही साक्षात विष्णुचा अवतार असलेला श्रीकृष्ण अधिक प्रभावी असतो, हे अर्जुनाला ठाऊक होते, तसे झालेली. पण ते कलियुग नव्हते की मुलायम हा महाभारत काळातला श्रीकृष्णही नाही. बिचार्‍या शिवपाल यादव यांना हेच लक्षात आले नाही. त्यांनी दुर्योधनाची चुक सुधारण्यासाठी सैन्य नाकारून आधुनिक श्रीकृष्ण मुलायमची निवड केली आणि अखिलेशला समाजवादी पक्षाची सेना घेऊ दिली. सहाजिकच कलीयुगात सेना जिंकते आणि परमेश्वर पराभूत होतो, हे आता शिवपालच्या लक्षात येते आहे. कारण निवडणूका संपुन निकाल लागल्यावरही अखिलेशने चुलत्याला माफ़ केलेले नाही. विधानसभेतले विरोधी नेतेपद मिळावे इतकीही चुलत्याची अपेक्षा पुतण्याने पार धुडकावून लावली आहे. तर कलियुगातला श्रीकृष्ण शिवपालची समजूत घालतो आहे.

मतमोजणी संपुन उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचा धुव्वा उडाला आहे. पण त्याचवेळी समाजवादी पक्षातील मुलायमचे समकालीन सर्व नेते सहकार्‍यांचा पक्षातही धुव्वा उडाला आहे. कारण पक्षंतर्गत संघर्षात सर्व सुत्रे हाती आल्यावर मुलायमना त्यात निर्णय घेण्याचे अधिकार उरलेले नाहीत आणि अखिलेशने नव्या व्यवस्थेत विधीमंडळ पक्षाचे नेतृत्व आपल्या हाती राखताना, चुलत्याला विधानसभेतही नेतेपद मिळू दिलेले नाही. सहाजिकच शिवपाल यादव नाराज आहेत. अशावेळी त्याला शांत करण्याची जबाबदारी थोरला भाऊ मुलायमची असल्याने, त्यांनी पुन्हा एकदा धाकट्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याक्षणी पक्षात बंड पुकारून नव्या पक्षाची स्थापना करणेही शिवपालना शक्य नाही. कारण आता त्यांच्या पाठीशी दोनचार कार्यकर्तेही उरलेले नाहीत आणि मुलायमच्या जुन्या सहकार्‍यांना घेऊनही शिवपाल नवे काही उभारण्याच्या स्थितीत नाहीत. सहाजिकच हा नेता आपल्या झालेल्या जखमा चाटत बसला आहे आणि मुलायम त्याची समजूत घालण्यासाठी पुत्राला शिव्याशाप दिल्याचे झकास नाटक रंगवत आहेत. ज्या मुलाने पित्यालाच जुमानले नाही व टांग मारली, तो दुसर्‍या कुणालाही फ़सवू शकतो असे, मुलायमनी एका भाषणात म्हटले आहे. अखिलेशने आपल्याला फ़सवले असे मुलायमना म्हणायचे आहे, असाच त्याचा अर्थ काढला जाणार. किंबहूना तसाच अर्थ काढावा, अशी मुलायमची अपेक्षाही आहे. पण मुलाने इतके फ़सवले अशीच पित्याची धारणा असती, तर ती व्यक्त व्हायला इतका विलंब लागण्याचे काहीही कारण नव्हते. उत्तरप्रदेश विधानसभेचे निकाल लागून तीन आठवडे पुर्ण होत आले आहेत आणि नवे सरकारही सत्तारूढ झालेले आहे. त्या सरकारच्या शपथविधीला मुलायम त्याच दगाबाज पुत्रासह कशाला हजर होते? त्यांनी अखिलेशला सोबत घेऊन पंतप्रधानांची लोकांसमक्ष कशाला भेट घेतली होती?

नवे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांच्या सत्तारोहणाचा कार्यक्रम पार पडला, त्याला पंतप्रधान मोदी हजर होते. तो उरकल्यानंतर व्यासपीठावर अनेकजण जाऊन पोहोचले. त्यात मुलायम होते आणि त्यांच्यासोबत मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादवही होते. आपल्या पुत्राची पंतप्रधानाची ओळख करून दिल्यासारखा तो प्रसंग होता. खरेच पुत्राने दगाबाजी केली असे मुलामयना वाटले असते, तर त्यांनी तिथे पुत्रासोबत मोदींची भेट घेतली नसती. जगाला आपले पुत्रप्रेम अशा प्रसंगातून दाखवले नसते. कारण तो प्रसंग राजकीय होता आणि समाजवादी पक्षासाठी सत्ता गमावल्याने यातनामय असाच होता. औपचारिकता कोणी नाकारत नाही. पण पक्षाचा दारूण पराभव घडवून आणणार्‍या पुत्रविषयीची मुलायमची आस्था त्यातून अधिक स्पष्ट झाली. सहाजिकच आता शिवपाल यादव यांना झिडकारले गेल्यावर आलेली मुलायमची प्रतिक्रीया कितपत खरी मानावी असा प्रश्न आहे. अर्थात यातले नाटक नवे नाही. पक्षात माजलेली दुफ़ळी व पितापुत्र यांच्यातला संघर्षच मुळात अप्रतिम नाटक होते. एकाने मारल्यासारखे करावे आणि दुसर्‍याने लागल्यासारखे करावे, असाच प्रयोग रंगला होता. त्यात आपला वारसा पुत्राकडे सोपवताना कुटुंबातील इतरांचे अधिकार नाकारण्यासाठी मुलायमनी रंगवलेले ते नाटक होते. आपला धाकटा भाऊ आणि कुटुंबातील अन्य वाटेकरी परस्पर निकालात काढण्याचे ते रामायण होते आणि त्यासाठी महाभारताची कथा वापरलेली होती. कैकयीला परस्पर शह देण्यात आला होता. मात्र त्यात शिवपालचा हकनाक बळी गेला. एकटा शिवपालच नव्हेतर मुलायमचे जुने सहकारी ज्येष्ठ नेतेही पक्षाच्या नेतृत्व स्पर्धेतून याच एका खेळीत बाहेर फ़ेकले गेले. आताही पक्षाची सुत्रे मुलाकडे सुखरूप स्थापित व्हावीत, म्हणून त्याच्यावर दगाबाजीचा आरोप करून हा पिता धाकट्या भावाला हुलकावणी देतो आहे.

खरेच मुलायमना पुत्राच्या कर्तृत्वावर विश्वास नसता आणि त्याच्याकडेच वारसा सोपवायचा नसता, तर लोकसभा निकालानंतरच अखिलेशची मुख्यमंत्री पदावरून गठडी वळली गेली असती. समाजवादी पक्षाच्या कुटुंबातील पाच जणांनाच लोकसभेत अन्य कोणाला निवडून आणता आले आणि त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या पुत्रच जबाबदार होता. अशावेळी सत्ता व पक्षाचा प्रभाव टिकवायचा असता, तर मुलायमनी अखिलेशला बाजूला करून राज्यसरकारची सत्ता हाती घेतली असती आणि लोकमत पक्षाच्या विरोधात जाण्याला लगाम लावला असता. तसे काही झाले नाही. मुलायमनी आत्मचिंतन वा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आणि विधानसभेच्या कामाला लागण्याचा आदेश देऊन संपवली. इतक्या मोठ्या पराभवासाठी कोणाला जबाबदार ठरवले गेले नाही, किंवा कुणाला शिक्षा झाली नाही. त्याचा अर्थच असा होता, की मुलायमनी राजकारणातून निवृत्त होण्याचा व पुत्राकडे राजकीय वारसा सोपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यात कोणी अडथळे आणू नयेत, म्हणून गटबाजीला प्रोत्साहन दिले. आपल्याच निष्ठावान सहकार्‍यांना शह देण्यासाठी वेणीप्रसाद वर्मा किंवा अमरसिंग यांच्यासारखे परागंदा नेते समाजवादी पक्षात पुन्हा आणले. त्यांच्याशी शिवपालला कारस्थाने करण्यास मोकळीक दिली आणि कसोटीची वेळ आल्यावर त्या सर्वांना वार्‍यावर सोडून दिले. दरम्यान पक्षातल्या आमदार व पुढल्या पिढीच्या नेत्यांना अखिलेशची निष्ठावान रहाण्यात भविष्य असल्याचेही संकेत देण्यात आलेले होते. सर्वकाही ठरल्याप्रमाणे झालेले असून, यापुढे शिवपाल वा तत्सम मुलायमच्य समकालीन नेत्यांनी गाशा गुंडाळणे, इतकेच त्यांना पक्षातले भवितव्य आहे. म्हणून तर मुलायम पुत्रावर दगाबाजीचा आरोप करतात. पण त्याच्या कब्जातील पक्षाने आपला फ़ोटो व नाव वापरू नये असे बंधन घालत नाहीत.

गुहेतल्या पुराणकथा

ramchandra guha के लिए चित्र परिणाम

रामचंद्र गुहा नावाचे प्राध्यापक इतिहासकार आहेत. ते आपल्या लिखाणातून व वक्तव्यातून नेहरूवादी म्हणून ओळखले जातात. विविध वाहिन्यांच्या कार्यक्रमातून त्यांना एक अभ्यासक वा इतिहासकार म्हणून पेशही केले जात असते. सहाजिकच त्यांनी आपली पुरोगमी प्रतिमा जपण्यासाठी सतत भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली, दुगाण्या झाडल्या तर त्यांना माफ़ केले पाहिजे. कारण पुरोगामी असण्यासाठी त्यांना तसे करणे भाग असते. पर्यायाने मोदीप्रेमी वा भाजपा समर्थकांचा त्यांच्यावर राग असला तर नवल नाही. कालपरवाच त्यांच्याविषयी एक बातमी झळकली होती. त्यांनी मोदींवरची टिका थांबवावी नाहीतर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. अशा धमक्या नेहमी टिकाकारांना येतच असतात. म्हणुन त्याचे गंभीर परिणाम कोणाला सहसा भोगावे लागत नाहीत. अशा फ़ुसक्या धमक्यांचे पुरोगामी लोकांनी नेहमी भांडवल केलेले आहे. पण त्यालाही महत्व नाही. गुहा यांना कोणी धमक्या द्याव्या, अशी त्यांची भाषा कधी कडवी नसते किंवा बोचरीही नसते. पण नेहरूप्रेमापायी त्यांना मोदी वा भाजपावर टिका करणे अपरिहार्य असते. गेल्या दोनतीन दशकात नेहरू व इंदिरा गांधी यांच्या कुवतीचा कोणीही नेता देशात झाला नाही आणि म्हणूनच पुरोगामी विचारवंतांना अनाथ झाल्यासारखे वाटत असेल, तर नवल नाही. नेहरू वा इंदिरा गांधी यांनी आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाच्या बळावर कॉग्रेस किंवा पुरोगामी भूमिकेला राजकारणात बळ मिळवून दिले. त्यावरच इथले पुरोगामी विचारवंत पोसले गेले आहेत. सहाजिकच अशा व्यक्तीमत्वाच्या अभावी पुरोगामी विचारवंतांची दुर्दशा आज झालेली असेल तर समजून घेतले पाहिजे. आपल्या पुरोगामी भूमिकांना राजकीय व सत्तेच्या राजकारणात आश्रयस्थान राहिले नाही, मग अशा पोसलेल्या लोकांची उपासमार सुरू होत असते. रामचंद्र गुहा त्यापैकीच एक होत.

अशा रामचंद्र गुहांना आजकाल एक नवा साक्षात्कार झालेला आहे. कॉग्रेसचे सर्वश्रेष्ठ नेते व उद्धारक राहुल गांधी, यांच्याविषयी गुहा पुर्णतया निराश झाले आहेत. राहुल कॉग्रेसला गाळातून बाहेर काढू शकत नाहीत. किंबहूना राहुल राजकारणासाठी नाकर्ते असल्याने त्यांनी विवाहबद्ध होऊन संसार करावा, इथपर्यंतचा सल्ला देऊन गुहा मोकळे झालेले आहेत. काही महिन्यांपुर्वीच त्यांनी एका मुलाखतीत राहुलना तसा सल्ला दिलेला होता. पण पोसलेल्या आश्रित विचारवंतांचा सल्ला गांधी खानदानात कोणी गंभीरपणे घेत नसल्याने, गुहांचा सल्ला कचर्‍याच्या टोपलीत गेला आणि राहुल यांना उत्तरप्रदेशातील कॉग्रेस बुडवण्याची आणखी एक संधी पक्षाने दिली. बहुतेक त्यामुळेच रामचंद्र गुहा विचलीत झालेले असावेत. कारण उत्तरप्रदेशच्या ताज्या निवडणूकीत नरेंद्र मोदी यांनी एकहाती तमाम पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांना नामोहरम करून टाकलेले आहे. त्यात उत्तरप्रदेश आणि गोवा-मणिपुर यातला फ़रक अनेक पुरोगामी अभ्यासकांना अजून उमगलेला नाही. ८० खासदारांचा उत्तरप्रदेश आणि चार खासदारांचा गोवा-मणिपुर यातला फ़रक समजण्याइतकी गुहांची बुद्धी बहुधा शाबुत असावी. म्हणूनच त्यांना नरेंद्र मोदी यांच्याकडे करिष्मा असल्याचा साक्षात्कार झाला आहे आणि त्याची कबुली त्यांनी परदेशात जाऊन दिलेली आहे. लंडन स्कुल ऑफ़ इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध संस्थेत गुहा यांचे अलिकडेच व्याख्यान झाले. तिथे त्यांनी नेहरू व इंदिरा गांधींच्या नंतर भारतातला तिसरा प्रभावशाली नेता, म्हणून नरेंद्र मोदींचे नाव घेतलेले आहे. कदाचित त्यामुळे लौकरच त्यांच्यावरही मोदीभक्त असा शिक्का मारून गुहांना प्रतिगामी गुहेत पुरले जाण्याचा धोका आहे. पण तो धोका गुहांनी पत्करलेला आहे. हळुहळू अनेक पुरोगामी विचारवंत त्याच मार्गाने वाटचाल करू लागणार आहेत. कारण बुद्धी गहाण टाकून फ़ारकाळ टिकता येत नसते.

विचारवंत किंवा बुद्धीमंताला जशी सरकारी मान्यता हवी असते, तसेच त्याला समाजाचीही मान्यता आवश्यक असते. नुसती सरकारी मान्यता किंवा तनखे विचारवंत मंडळीसाठी पुरेसे नसतात. सरकारी विचारवंताला समाजात स्थान नसले, तर पदके व पुरस्कार निकामी होऊन जातात. म्हणून तर पुरस्कार वापसीचे नाटक दिर्घकाळ चालू शकले नाही आणि आता तर अशा पुरस्कृत नेहरूवादी विचारवंतांना त्या वापसीचाही विसर पडला आहे. दिड वर्षापुर्वी देशभर गाजलेली व येऊ घातलेली आणिबाणी अजून येऊन पोहोचलेली नाही. उलट जे कोणी आणिबाणीचा इशारा देत होते, त्यापैकीच एक आलेल्या गुहा यांना मोदींमध्ये नेहरू-इंदिरा दिसू लागले आहेत. कारण गेल्या दहाबारा वर्षात त्यांनी मोदी विरोधात जी प्रवचने केलेली होती, ती धडधडीत खोटी पडली असून, मोदी यांनी अशा तमाम पुरोगामी विचारवंतांना कृतीतून खोटे पाडलेले आहे. सहाजिकच या प्रत्येकाला आपली प्रतिष्ठा व पत कायम राखण्यासाठी, आता मोदी हे श्रेष्ठ नेता असल्याचे सिद्ध करण्यातून आपलेच जुने सिद्धांत पुसण्याची नामुष्की येत चालली आहे. आपण पुर्वी मोदींविषयी जे बोललो किंवा भाकिते केली, ती खोटी पडल्याचा बभ्रा व्हायला नको असेल, तर घाईगर्दीने त्यात बदल करणे त्यांना भाग होते आहे. नरेंद्र मोदी साधारण पाच वर्षापुर्वी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले. तेव्हापासून मोदींवर गुहांसारख्या प्रत्येक पुरोगामी विचारवंताने एकच ठाम आरोप केला होता. तो समाजात विभागणी करणारा, दुही माजवणारा नेता, असाच आरोप होता. आज त्यापैकीच एक रामचंद्र गुहा म्हणतात, मोदींनी धर्म जात वा भाषा प्रांत याच्यापलिकडे जाऊन आपले नेतृत्व स्विकारणे जनतेला भाग पाडले आहे. त्यांच्या प्रभावाला कुठल्याही सीमा राहिलेल्या नाहीत, की अडथळे राहिले नाहीत. नेहरू इंदिरा गांधींप्रमाणे मोदी देशव्यापी नेतृत्व झाले आहे.

मजेची गोष्ट अशी, की मोदी इतके प्रभावी देशव्यापी नेतृत्व नसल्याचे छातीठोकपणे सांगणार्‍यात रामचंद्र गुहा आघाडीवर होते. देशातल्या सामान्य जनतेने त्यापैकी कोणाला दाद दिली नाही. ज्या सामान्य जनतेला अनभिज्ञ वा अजाण मानले जाते, तिला चारपाच वर्षापुर्वीच मोदी हे राष्ट्रीय कुवतीचे नेतृत्व असल्याचे ओळखता आले. पण इतिहासाचा अभ्यास करून विश्लेषण करणार्‍या गुहांना तेच सत्य बघायला तीनचार वर्षे उलटून जावी लागली आहेत. ज्या सामान्य जनतेने मोदींना प्रतिसाद दिला वा मोदींसाठी ज्या सामान्य लोकांनी उत्साहाने काम केले, त्यांची मोदीभक्त अशी हेटाळणी करणार्‍यात गुहा होते. म्हणजेच ज्यांची मोदीभक्त म्हणून टिंगल केली ते अभ्यासक व जाणते म्हणायला हवेत. कारण त्यांना गुहांसारख्या अभ्यासकापेक्षा अधिक जाण असल्याचीच साक्ष आज खु्द्द गुहा देत आहेत. त्यांच्या इतका मी कोणी इतिहासकार वा अभ्यासक नाही. साधा पत्रकार आहे. पण २०१३ च्या वर्षारंभी लिहीलेल्या लेखमालेत मी नरेंद्र मोदी व इंदिरा गांधी यांची अशीच तुलना केली होती. तर अनेक ज्येष्ठ पत्रकार सहकार्‍यांनी माझी मोदीभक्त म्हणून हेटाळणी केली होती. मुद्दा आकलनाचा होता. गुहांसारखे लोक खरेच इतिहासाचे अभ्यासक असतील, तर त्यांना चारपाच वर्षापुर्वीच मोदींमधला नेहरू वा इंदिराजी बघता व ओळखता आल्या पाहिजे होत्या. आता मोदींनी त्याची साक्षच दिल्यानंतर नवा काही शोध लावल्याचा आव आणण्यात काय हंशील आहे? अर्थात ते गुहांना शक्य नव्हते आणि कुठल्याही आश्रित विचारवंताला तितके सत्य बघण्याचे अधिकारही नसतात. पुरोगामी विचारवंत हे इंदिरा व नेहरूंच्या अनुदानावर पोसले गेलेले असल्यावर, त्यांना अन्य कुणाचे गुण कसे दिसावे किंवा ओळखता यावे? आता निराश्रित झाल्यानंतरच असे साक्षात्कार होऊ शकतात. मात्र अशा पुरस्कृत विचारवंतांच्या शब्दावर मोदी वहावत गेले, तर त्यांचाही नेहरू इंदिराजींप्रमाणे र्‍हास होण्याचा धोका आहे.

कॉग्रेसचा रा. स्व. संघ

aslam sherkhan के लिए चित्र परिणाम

कॉग्रेसचे १९८४ सालात मध्यप्रदेशातून निवडून आलेले एक लोकसभा सदस्य अस्लम शेरखान, हे मुळातच राजकारणी नव्हेत. भारतीय खेळाडू अशी त्यांची ओळख होती. पण राजीव गांधी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना कॉग्रेसमध्ये आणले, त्यापैकी शेरखान एक आहेत. वाजपेयी पंतप्रधान असताना शेरखान यांनी भाजपातही प्रवेश केला होता आणि गुजरात दंगलीनंतर त्यांनी भाजपा सोडून, पुन्हा कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतरच्या काळात त्यांचे नाव कुठे वाचनात आले नव्हते. आता अकस्मात त्यांनी कॉग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी काम करण्याची घोषणा केल्याने, ते प्रकाशात आलेले आहेत. तीन वर्षापुर्वी लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस पुरती भूईसपाट झाल्यावर त्या शतायुषी पक्षाच्या पुनरुज्जीवनाची गरज अनेकांनी मांडलेली आहे. देशात दिर्घकाळ राज्य केलेला व देशव्यापी संघटनात्मक सांगाडा आजही असलेल्या, या पक्षाला अजून त्या दारूण पराभवातून बाहेर पडता आलेले नाही. पक्षाचे श्रेष्ठी म्हणून जबाबदारी घेतलेल्या राहुल गांधी यांना त्याची फ़िकीर असल्याने एकदाही दिसलेले नाही. सहाजिकच त्यामुळे निराश झालेल्या अनेकांनी पक्षाला रामराम ठोकून अन्यत्र आश्रय घेतला आहे. किंवा आपल्या परीने पक्षाचा जिर्णोद्धार होण्याच्या मागण्या चालविल्या आहेत. पण कुठेही आत्मापरिक्षण करण्याची हालचाल होताना दिसलेली नाही. त्याचे पहिले कारण भाजपा वा मोदींचा विजय, हा मतदाराची दिशाभूल करूनच झाला, असा बहुतांश कॉग्रेस नेत्यांचा भ्रम आहे. म्हणूनच त्यांना पक्षाचा पराभवच मान्य नाही. पण अस्लम शेरखान यांच्यासारखे काही मूठभर लोक थोडेफ़ार तरी विचार करताना दिसतात. त्यातूनच त्यांनी सुचवलेला वा हाती घेतलेला उपाय, गंभीर विषयाला हात घालणारा वाटतो. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर कॉग्रेसमध्ये वेगळे कार्यकर्त्यांचे संघटन उभारण्याचा संकल्प सोडला आहे.

राष्ट्रीय कॉग्रेस स्वयंसेवक संघ अशी संघटना उभारण्याचा मनोदय व्यक्त केल्याने, अस्लम शेरखान यांच्याकडे लोकांचे लक्ष गेले आहे. मागल्या दोनचार वर्षात भाजपा इतके मोठे राजकीय यश मिळवू शकला, त्याला संघ कारणीभूत झाला आहे, अशी नेहमी चर्चा चालते. राजकीय पंडित संघावर जातिय वा धार्मिक भेदभावाचे आरोप करून विषय संपवत असतात. पण संघाचे स्वरूप, ध्येय वा कार्यशैली याविषयी सहसा बोलले जात नाही. त्यामुळेच संघ ही एक आधुनिक दंतकथा बनून गेली आहे. पण त्याच संघामुळे भाजपाला इतके मोठे यश मिळत असेल, तर तशीच कॉग्रेसपाशी संघटना असावी, असे शेरखान यांना वाटल्यास गैर काहीच नाही. मात्र दंतकथा ऐकून त्यांनी वेगळ्या संघाची उभारणी करण्याचे स्वप्न बघणे हास्यास्पद ठरेल. त्यांनी संघाचा इतिहास, कार्यशैली वा संघटनेचे स्वरूप समजून घेण्याची गरज आहे. खरी गोम तिथेच आहे. त्याच गाभ्याला हात घातला तर शेरखान यांच्यासह अनेकांच्या लक्षात येईल, की संघ स्वयंसेवक म्हणजे स्वातंत्र्यपुर्व काळातील कॉग्रेसच आहे. महात्मा गांधी यांनी ज्या पद्धतीने निरपेक्ष कार्यकर्त्यांची फ़ौज कॉग्रेसच्या छत्राखाली उभी केली, त्याच फ़ौजेने कुठलीही अपेक्षा न बाळगता देशासाठी समाजासाठी कष्ट उपसले. त्या संघटनेला पुढल्या काळात नेहरू वा अन्य कॉग्रेसी नेत्यांनी आपल्या राजकीय मतलबाच्या दावणीला बांधून टाकले. पण तिची जोपासना करण्याचा विचारही केला नाही. त्यातून कॉग्रेस नावाची गांधींची सेवाभावी संघटना खंगत गेली व आता मरणप्राय होऊन गेलेली आहे. तिथे कार्यकर्ता वा निरपेक्षवृत्तीला स्थानच राहिले नाही. निवडणूका संपल्या, मग त्या फ़ौजेला कोणी विचारले नाही किंवा तिची जोपासना करण्याकडे लक्ष दिले नाही. उलट त्याच कालावधीमध्ये अशा सेवाभावी तरूणांना गोळा करून देशाप्रति समर्पित होण्याची वृत्ती जोपासण्याला संघाने प्राधान्य दिले.

आज संघाविषयी जे बोलले जाते, त्यापेक्षा प्रत्यक्षातला संघ खुप वेगळा आहे. तिथे हजारो लाखो स्वयंसेवक असे आहेत, ज्यांना संघटनेकडून कुठलीही अपेक्षा नाही. तर आपण संघाला म्हणजेच पर्यायाने देशाला काय देऊ शकतो, अशा विचाराने भारावलेल्यांचा तो समुदाय आहे. त्यात भाजपा राजकीय ढवळाढवळ करू शकत नाही किंवा भाजपाच्या नित्यनेमाने चाललेल्या कामकाजात संघ हस्तक्षेप करीत नाही. दोघांमध्ये बंधूभाव असला तरी प्रत्येकाला स्वायत्तता आहे. भाजपाचा अध्यक्ष संघाच्या प्रमुख वा अन्य पदाधिकार्‍यांची नेमणूक करत नाही. काही प्रसंगी संघाच्या विविध संघटनांमध्ये आपसात मतभेद होतात. पण त्यात कोणी एकमेकांवर आपले आग्रह लादत नाही. हिंदूत्व हा समान धागा गृहीत धरून, त्यांना स्वयंभूपणे काम करता येते. ज्याला रुढार्थाने लोकशाही म्हणता येईल. पण कॉग्रेसमध्ये त्यालाच स्थान उरलेले नाही. तिथे कॉग्रेस अध्यक्ष होईल, तो आपल्या लहरीनुसार कोणालाही विविध संघटनांच्या पदावर नेमतो आणि अशा नेमणूकीने काही साध्य होण्याची गरज नसते. संघामध्ये अशा एकाधिकारशाहीला स्थान नाही. तिथे परिणाम व कर्तृत्व दाखवावे लागते. सहाजिकच नरेंद्र मोदी यांच्यासारखा एखादा स्वयंसेवक वा प्रचारकही पंतप्रधान मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकतो. तो आपल्या विचाराने चालला आहे यातच संघाला समाधान असते. तशा कुठल्याही पदासाठी वा अधिकारासाठी संघामध्ये स्पर्धा होताना दिसत नाही. प्रत्येक स्वयंसेवक आपल्या कामाला बांधिल आहे आणि त्यातून कुठल्या पदाची अपेक्षा बाळगत नाही. तशी इच्छा असेल तर त्याला संघाच्या कामातून बाजूला काढले जाते आणि राजकीय महत्वाकांक्षा पुर्ण करण्याचेही स्वातंत्र्य दिले जाते. कॉग्रेसमध्ये असे किती स्वयंसेवक आज अस्तित्वात आहेत? नसतील तर संघाला पर्याय तरी कसा उभा रहाणार? शेरखान यांनी याचाही अभ्यास केला तरी त्यांना पुढे काही करता येईल.

१९८० च्या राजीव लाटेत भाजपा पुर्णपणे भूईसपाट झाल्यावर, त्या पक्षाने व संघातील काही बुजुर्गांनी नव्या पिढीतील व विविध समाजघटकातील नव्या नेतृत्वाचा विकास करण्याचे काम हाती घेतले. प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे, नरेंद्र मोदी वा तत्सम अलिकडले अनेक भाजपा श्रेष्ठी, त्या प्रयत्नांना आलेली फ़ळे आहेत. उलट त्याच कालखंडात कॉग्रेसने नव्या पिढीला वा कर्तबगारी गाजवू शकणार्‍यांना पक्षाची व संघटनेची दारे बंद करून कौटुंबिक वारशाची कार्यशैली आरंभली. कॉग्रेस पक्षात नेत्याच्याच घरात नेता जन्मण्याची प्रक्रीया राजीव गांधी यांच्या जमान्यात सुरू झाली. तेव्हाच समाजाच्या विविध घटकातील गुणी कर्तॄत्ववान माणसे जोडण्याची मोहिम संघाने हाती घेतली. आजचा भाजपा दिसतो, त्यामागे पस्तीस वर्षाचा दिर्घकालीन प्रयास झाकलेला आहे. तो प्रयास कुठल्या राजकीय विश्लेषणात समोर येत नाही, की सांगितला जात नाही. कॉग्रेस वा पुरोगामी पक्षांच्या नाकर्तेपणाला लपवण्यासाठी भाजपाच्या यशाला जातीय वा हिंदूत्वाचा मुखवटा चढवून पेश केले जाते. प्रत्यक्षात संघाचे योग्य व रास्त मूल्यमापन होत नाही. म्हणूनच संघाच्या बळावर भाजपाने इतके मोठे निवडणूक यश मिळवले, तर अस्लम शेरखान संघ स्वयंसेवकांचे संख्याबळ फ़क्त बघतात. पण त्यांच्यातकी निरपेक्ष कार्यवृत्ती बघू शकत नाहीत. त्यांना कार्यकर्ता, संघटना आणि नुसती गर्दी यातला फ़रक उमजलेला नाही. म्हणून कॉग्रेसच्या निवडणूक विजयासाठी राबणारी कार्यकर्त्यांची फ़ौज उभारण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. पण विजयाचे श्रेय वा हिस्साही न मागणार्‍यांची गर्दी त्यांना बघताही आलेली नाही. पदाधिकारी नेमण्यातून असे कार्यकर्ते निर्माण होत नाहीत, की मिळत नाहीत. त्यांची जोपासना करावी लागते. त्यांना संस्कार देऊन कार्यान्वित करण्याला प्राधान्य असावे लागते. मोह्न भागवतांचे गोडवे गाण्यातून संघाचा स्वयंसेवक घडत नाही, इतके लक्षात घेतले तरी खुप झाले.