Sunday, April 2, 2017

गुहेतल्या पुराणकथा

ramchandra guha के लिए चित्र परिणाम

रामचंद्र गुहा नावाचे प्राध्यापक इतिहासकार आहेत. ते आपल्या लिखाणातून व वक्तव्यातून नेहरूवादी म्हणून ओळखले जातात. विविध वाहिन्यांच्या कार्यक्रमातून त्यांना एक अभ्यासक वा इतिहासकार म्हणून पेशही केले जात असते. सहाजिकच त्यांनी आपली पुरोगमी प्रतिमा जपण्यासाठी सतत भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली, दुगाण्या झाडल्या तर त्यांना माफ़ केले पाहिजे. कारण पुरोगामी असण्यासाठी त्यांना तसे करणे भाग असते. पर्यायाने मोदीप्रेमी वा भाजपा समर्थकांचा त्यांच्यावर राग असला तर नवल नाही. कालपरवाच त्यांच्याविषयी एक बातमी झळकली होती. त्यांनी मोदींवरची टिका थांबवावी नाहीतर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. अशा धमक्या नेहमी टिकाकारांना येतच असतात. म्हणुन त्याचे गंभीर परिणाम कोणाला सहसा भोगावे लागत नाहीत. अशा फ़ुसक्या धमक्यांचे पुरोगामी लोकांनी नेहमी भांडवल केलेले आहे. पण त्यालाही महत्व नाही. गुहा यांना कोणी धमक्या द्याव्या, अशी त्यांची भाषा कधी कडवी नसते किंवा बोचरीही नसते. पण नेहरूप्रेमापायी त्यांना मोदी वा भाजपावर टिका करणे अपरिहार्य असते. गेल्या दोनतीन दशकात नेहरू व इंदिरा गांधी यांच्या कुवतीचा कोणीही नेता देशात झाला नाही आणि म्हणूनच पुरोगामी विचारवंतांना अनाथ झाल्यासारखे वाटत असेल, तर नवल नाही. नेहरू वा इंदिरा गांधी यांनी आपल्या प्रभावी व्यक्तीमत्वाच्या बळावर कॉग्रेस किंवा पुरोगामी भूमिकेला राजकारणात बळ मिळवून दिले. त्यावरच इथले पुरोगामी विचारवंत पोसले गेले आहेत. सहाजिकच अशा व्यक्तीमत्वाच्या अभावी पुरोगामी विचारवंतांची दुर्दशा आज झालेली असेल तर समजून घेतले पाहिजे. आपल्या पुरोगामी भूमिकांना राजकीय व सत्तेच्या राजकारणात आश्रयस्थान राहिले नाही, मग अशा पोसलेल्या लोकांची उपासमार सुरू होत असते. रामचंद्र गुहा त्यापैकीच एक होत.

अशा रामचंद्र गुहांना आजकाल एक नवा साक्षात्कार झालेला आहे. कॉग्रेसचे सर्वश्रेष्ठ नेते व उद्धारक राहुल गांधी, यांच्याविषयी गुहा पुर्णतया निराश झाले आहेत. राहुल कॉग्रेसला गाळातून बाहेर काढू शकत नाहीत. किंबहूना राहुल राजकारणासाठी नाकर्ते असल्याने त्यांनी विवाहबद्ध होऊन संसार करावा, इथपर्यंतचा सल्ला देऊन गुहा मोकळे झालेले आहेत. काही महिन्यांपुर्वीच त्यांनी एका मुलाखतीत राहुलना तसा सल्ला दिलेला होता. पण पोसलेल्या आश्रित विचारवंतांचा सल्ला गांधी खानदानात कोणी गंभीरपणे घेत नसल्याने, गुहांचा सल्ला कचर्‍याच्या टोपलीत गेला आणि राहुल यांना उत्तरप्रदेशातील कॉग्रेस बुडवण्याची आणखी एक संधी पक्षाने दिली. बहुतेक त्यामुळेच रामचंद्र गुहा विचलीत झालेले असावेत. कारण उत्तरप्रदेशच्या ताज्या निवडणूकीत नरेंद्र मोदी यांनी एकहाती तमाम पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांना नामोहरम करून टाकलेले आहे. त्यात उत्तरप्रदेश आणि गोवा-मणिपुर यातला फ़रक अनेक पुरोगामी अभ्यासकांना अजून उमगलेला नाही. ८० खासदारांचा उत्तरप्रदेश आणि चार खासदारांचा गोवा-मणिपुर यातला फ़रक समजण्याइतकी गुहांची बुद्धी बहुधा शाबुत असावी. म्हणूनच त्यांना नरेंद्र मोदी यांच्याकडे करिष्मा असल्याचा साक्षात्कार झाला आहे आणि त्याची कबुली त्यांनी परदेशात जाऊन दिलेली आहे. लंडन स्कुल ऑफ़ इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध संस्थेत गुहा यांचे अलिकडेच व्याख्यान झाले. तिथे त्यांनी नेहरू व इंदिरा गांधींच्या नंतर भारतातला तिसरा प्रभावशाली नेता, म्हणून नरेंद्र मोदींचे नाव घेतलेले आहे. कदाचित त्यामुळे लौकरच त्यांच्यावरही मोदीभक्त असा शिक्का मारून गुहांना प्रतिगामी गुहेत पुरले जाण्याचा धोका आहे. पण तो धोका गुहांनी पत्करलेला आहे. हळुहळू अनेक पुरोगामी विचारवंत त्याच मार्गाने वाटचाल करू लागणार आहेत. कारण बुद्धी गहाण टाकून फ़ारकाळ टिकता येत नसते.

विचारवंत किंवा बुद्धीमंताला जशी सरकारी मान्यता हवी असते, तसेच त्याला समाजाचीही मान्यता आवश्यक असते. नुसती सरकारी मान्यता किंवा तनखे विचारवंत मंडळीसाठी पुरेसे नसतात. सरकारी विचारवंताला समाजात स्थान नसले, तर पदके व पुरस्कार निकामी होऊन जातात. म्हणून तर पुरस्कार वापसीचे नाटक दिर्घकाळ चालू शकले नाही आणि आता तर अशा पुरस्कृत नेहरूवादी विचारवंतांना त्या वापसीचाही विसर पडला आहे. दिड वर्षापुर्वी देशभर गाजलेली व येऊ घातलेली आणिबाणी अजून येऊन पोहोचलेली नाही. उलट जे कोणी आणिबाणीचा इशारा देत होते, त्यापैकीच एक आलेल्या गुहा यांना मोदींमध्ये नेहरू-इंदिरा दिसू लागले आहेत. कारण गेल्या दहाबारा वर्षात त्यांनी मोदी विरोधात जी प्रवचने केलेली होती, ती धडधडीत खोटी पडली असून, मोदी यांनी अशा तमाम पुरोगामी विचारवंतांना कृतीतून खोटे पाडलेले आहे. सहाजिकच या प्रत्येकाला आपली प्रतिष्ठा व पत कायम राखण्यासाठी, आता मोदी हे श्रेष्ठ नेता असल्याचे सिद्ध करण्यातून आपलेच जुने सिद्धांत पुसण्याची नामुष्की येत चालली आहे. आपण पुर्वी मोदींविषयी जे बोललो किंवा भाकिते केली, ती खोटी पडल्याचा बभ्रा व्हायला नको असेल, तर घाईगर्दीने त्यात बदल करणे त्यांना भाग होते आहे. नरेंद्र मोदी साधारण पाच वर्षापुर्वी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले. तेव्हापासून मोदींवर गुहांसारख्या प्रत्येक पुरोगामी विचारवंताने एकच ठाम आरोप केला होता. तो समाजात विभागणी करणारा, दुही माजवणारा नेता, असाच आरोप होता. आज त्यापैकीच एक रामचंद्र गुहा म्हणतात, मोदींनी धर्म जात वा भाषा प्रांत याच्यापलिकडे जाऊन आपले नेतृत्व स्विकारणे जनतेला भाग पाडले आहे. त्यांच्या प्रभावाला कुठल्याही सीमा राहिलेल्या नाहीत, की अडथळे राहिले नाहीत. नेहरू इंदिरा गांधींप्रमाणे मोदी देशव्यापी नेतृत्व झाले आहे.

मजेची गोष्ट अशी, की मोदी इतके प्रभावी देशव्यापी नेतृत्व नसल्याचे छातीठोकपणे सांगणार्‍यात रामचंद्र गुहा आघाडीवर होते. देशातल्या सामान्य जनतेने त्यापैकी कोणाला दाद दिली नाही. ज्या सामान्य जनतेला अनभिज्ञ वा अजाण मानले जाते, तिला चारपाच वर्षापुर्वीच मोदी हे राष्ट्रीय कुवतीचे नेतृत्व असल्याचे ओळखता आले. पण इतिहासाचा अभ्यास करून विश्लेषण करणार्‍या गुहांना तेच सत्य बघायला तीनचार वर्षे उलटून जावी लागली आहेत. ज्या सामान्य जनतेने मोदींना प्रतिसाद दिला वा मोदींसाठी ज्या सामान्य लोकांनी उत्साहाने काम केले, त्यांची मोदीभक्त अशी हेटाळणी करणार्‍यात गुहा होते. म्हणजेच ज्यांची मोदीभक्त म्हणून टिंगल केली ते अभ्यासक व जाणते म्हणायला हवेत. कारण त्यांना गुहांसारख्या अभ्यासकापेक्षा अधिक जाण असल्याचीच साक्ष आज खु्द्द गुहा देत आहेत. त्यांच्या इतका मी कोणी इतिहासकार वा अभ्यासक नाही. साधा पत्रकार आहे. पण २०१३ च्या वर्षारंभी लिहीलेल्या लेखमालेत मी नरेंद्र मोदी व इंदिरा गांधी यांची अशीच तुलना केली होती. तर अनेक ज्येष्ठ पत्रकार सहकार्‍यांनी माझी मोदीभक्त म्हणून हेटाळणी केली होती. मुद्दा आकलनाचा होता. गुहांसारखे लोक खरेच इतिहासाचे अभ्यासक असतील, तर त्यांना चारपाच वर्षापुर्वीच मोदींमधला नेहरू वा इंदिराजी बघता व ओळखता आल्या पाहिजे होत्या. आता मोदींनी त्याची साक्षच दिल्यानंतर नवा काही शोध लावल्याचा आव आणण्यात काय हंशील आहे? अर्थात ते गुहांना शक्य नव्हते आणि कुठल्याही आश्रित विचारवंताला तितके सत्य बघण्याचे अधिकारही नसतात. पुरोगामी विचारवंत हे इंदिरा व नेहरूंच्या अनुदानावर पोसले गेलेले असल्यावर, त्यांना अन्य कुणाचे गुण कसे दिसावे किंवा ओळखता यावे? आता निराश्रित झाल्यानंतरच असे साक्षात्कार होऊ शकतात. मात्र अशा पुरस्कृत विचारवंतांच्या शब्दावर मोदी वहावत गेले, तर त्यांचाही नेहरू इंदिराजींप्रमाणे र्‍हास होण्याचा धोका आहे.

1 comment:

  1. भाऊ ..तुम्ही लिहिलेले पुढील वाक्य खरे ठरते कि काय .....' .मात्र अशा पुरस्कृत विचारवंतांच्या शब्दावर मोदी वहावत गेले, तर त्यांचाही नेहरू इंदिराजींप्रमाणे र्‍हास होण्याचा धोका आहे '..........अशाच घटना भविष्यात घडतील कि काय असे वाटावे अशा पद्धतीने मोदींनी अजमेर च्या दर्ग्याला भेट देऊन जी चादर ओढायचा कार्यक्रम केला त्यावरून असेच वाटते कि मोदींनाही ' पुरोगामी / निधर्मी ' बनण्याचा ' चस्का ' लागला कि काय .....!!

    ReplyDelete