Monday, April 3, 2017

रंगराव आणि पतंगराव

chaupal के लिए चित्र परिणाम

रंगराव आणि पतंगराव हे दोघे अतिशय जीवलग मित्र होते. एकच गावात जन्मलेले आणि एकत्र खेळत भांडत लहानाचे मोठे झालेले. त्यापैकी पतंगरावांच्या मुलीचे लग्न होते आणि त्यांनी रंगरावाला एक विनंती केली. घरी लग्नानिमीत्त पाहुणेरावळे येणार, तर भांड्यांची थोडी कटकट व्हायची शक्यता होती. तर कार्यपुरती काही भांडी रंगरावांनी उधार द्यावी. मित्राच्याच घरचे कार्य म्हटल्यावर रंगरावाने हयगय केली नाही. शक्य तितकी वापरात नसलेली घरातली भांडी पतंगरावांना देऊन टाकली. आठवड्याभरात विवाह संपन्न झाला आणि एकेदिवशी पतंगराव मोटरसायकलवर पोत्यातून उधार भांडी परत करायला आले. पोते रंगरावाच्या घरात टाकल्यावर मस्त चहा मारूनच पतंगराव माघारी फ़िरले. त्याच संध्याकाळी दोघांची गावाच्या पारावर भेट झाली. तिथेही लग्नसोहळ्याचेच कौतुक चाललेले असताना रंगराव येऊन ठेपले. त्यांनीही पतंगरावाच्या जावयाचे कौतुक केले. मात्र थोड्याच वेळात गप्पा उधार भांड्याकडे वळल्या. रंगरावांनी भांड्याचा विषय काढला तर त्यांना बोलायची संधीही न देता जमलेल्या गावकर्‍यांसमोर पतंगरावांनी मित्राचे जाहिर आभार मानले. इतका मोठा सोहळा आणि इतकी लोटलेली गर्दी संभाळताना, रंगरावाच्या घरातल्या भांड्यांमुळे पंगती कशा पुर्ण होऊ शकल्या, त्याचीही कहाणी सांगून झाली. पण त्या गडबडीत बिचार्‍या रंगरावाला आपल्या मनातले बोलायची संधीच मिळत नव्हती. अखेर पतंगरावांचे कौतुक पुराण संपल्यावर रंगराव म्हणाले, मित्रा तुझे कौतुकाचे शब्द संपले असतील तर मला काही सांगायचे आहे. पतंगरावांनीही मग अडवले नाही. रंगराव म्हणाले, अरे मित्रा भांडी परत देताना तुझी काही तरी गफ़लत झालीय. म्हणजे जितकी भांडी तू माझ्याकडून नेली होतीस, त्यापेक्षा अधिक भांडी परत केलेली आहेस. आता मात्र जमलेल्या पारावरच्या गर्दीला आश्चर्याचा धक्का बसला.

पतंगराव हा गावातला सर्वात इब्लिस व लबाड माणूस म्हणून ख्यातकिर्त होता. त्याच्याकडून अशी चुक होणेच शक्य नव्हते. एकवेळ त्याने नेलेल्या भांड्यापेक्षा कमी भांडी परत केली वा काही भांडी चोरली असे रंगरावांनी म्हटले असते, तर लोकांना नवल वाटले नसते. पण जितकी भांडी नेली, त्यापेक्षा अधिक भांडी पतंगराव चुकून परत करतो, हा त्या गावातला खरेच चमत्कार होता. पण प्रत्येकाने रंगरावाचे शब्द आपल्याच कानांनी ऐकलेले असल्याने शंकेला जागा नव्हती. सहाजिकच सर्वजण एकटक आता पतंगरावाकडे बघू लागले होते. कुजबुज शांत झाल्यावर पतंगरावाने खुलासा केला, त्यामुळे तर सर्वांना फ़ेफ़रे येण्याचेच बाकी राहिले. कारण गावामध्ये खरोखरच चमत्कार घडला होता. पतंगराव उत्तरले. अरे रंग्या, तुलाही इतकी अक्कल नाही? माझ्यासारखा व्यवहारी काटेकोर माणूस तुला स्वप्नातही फ़ुकटची अधिक भांडी देईल का? कदापी शक्य नाही. तुझी जितकी भांडी आणली तितकी परत केलीत. रंगराव म्हणाले, अरे मलाही खरे वाटले नव्हते. पण बायकोने भांडी मोजून दिली होती आणि आल्यावरही मोजली. जाताना तू ३० भांडी घेऊन गेला होतास आणि परत आणून दिलीस तेव्हा ३५ भांडी होती. बायको कशाला खोटे बोलणार? असे उत्तर ऐकून पारावरची मंडळीही अचंबित झाली व पतंगरावाकडे रोखून बघू लागली. तर मनसोक्त हसून पतंगराव म्हणाले, त्यात कुठलीही गफ़लत नाही. आठवडाभर तुमची भांडी आमच्या घरात असताना, त्यातली काही बाळंत झाली. त्यांची पाच बाळे तुमचीच नाही का? ती आमच्याकडे कशी ठेवता येतील? म्हणून परत करताना तुमच्या तीस भांड्यांसह त्यांची पाच बाळं परत केली. तुला ती प्रथमच बघितल्याने ओळखता आली नसतील. पण ती सर्व भांडी तुमचीच आहेत. माझ्याकडे बाळंत झाली म्हणून माझी होऊ शकत नाहीत. तशीच्या तशी परत केली.

या गोष्टीचा मग गवभर गवगवा झाला. ज्याच्यात्याच्या तोंडी रंगराव पतंगरावाच्या भांड्यांचा किस्सा कित्येक दिवस चालला होता. रंगराव आणि त्यांची पत्नी खुश होती. फ़ुकटात नवी पाच भांडी मिळाली होती. काही महिने उलटले आणि पतंगरावांच्या मुलाचेही लग्न निघाले. मुलीच्याच लग्नाची आताही पुनरावृत्ती झाली. पतंगरावाने घरातली अडचण सांगून रंगरावाकडे थोड्या काळासाठी भांड्यांची मागणी केली. रंगराव लगेच तयार झाला. त्याच्यापेक्षाही त्याची पत्नी उतावळी झाली होती. तिने घरातली मडकी बुडकुली सोडून सर्व धातूची किंमती भांडी पतंगरावांनी आणलेल्या पोत्यात भरली. पोते कमी पडले, म्हणून रंगरावांनी घरातल्या पोत्यात उरलीसुरली भांडी भरून पतंगरावाच्या घरी पोहोचती केली. पतंगरावाच्या पुत्राचा लग्नसोहळा यथोचित पार पडला आणि महिना उलटत आला तरी रंगरावांची उसनी भांडी परत आलेली नव्हती, की पतंगराव त्याविषयी बोलतही नव्हता. अखेरीस एका संध्याकाळी पारावरच रंगरावाने तो विषय छेडला. तेव्हा दु:खद चेहरा करून पतंगराव उत्तरले, मित्रा वाईट बातमी आहे. काय सांगू? लग्नाचा सोहळा संपला आणि दुसर्‍याच दिवशी स्वाईनफ़्लूची बाधा होऊन सगळी भांडी मरून गेली. आमची मेली तशीच तुझ्याकडून आणलेली उसनी भांडीही मरून गेली. पण तुला ही दु:खद बातमी कशी सांगू, म्हणून इतके दिवस गप्प होतो. सांगायची हिंमतच होत नव्हती बघ. क्षणात रंगरावांनी रौद्ररूप धारण केले आणि पतंगराव भामटा असल्याचा आरोप केला. हाणामारीचाच प्रसंग आला होता. पण गावकरी मध्ये पडले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार रंगरावाने मित्रावर कोर्टात दावा गुदरला. लौकरच न्यायालयात खटला उभा राहिला आणि गावकर्‍यांच्याही साक्षी निघाल्या. पुरावे तपासले गेले आणि सुनावणी संपत आल्यावर निकालापुर्वी न्यायाधीशांनी रंगरावाला पिंजर्‍यात आणून काही प्रश्न केले.

मुलीच्या लग्नाच्या वेळी तुमची उसनी भांडी पतंगरावाने परत केली होती ना? तेव्हा तुमची भांडी बाळंत झाली होती ना? तेव्हा तुमच्या भांड्यांना झालेली मुलेही तुम्ही स्विकारली होती ना? म्हणजे भांड्यांना मुले होतात वा भांडी बाळंत होतात, हे तुम्ही स्विकारलेले वास्तव होते ना? मग जी भांडी बाळंत होऊ शकतात, ती रोगराईने मरूही शकतात. म्हणूनच आता पतंगरावाला भामटा म्हणता येणार नाही. पहिल्या लग्नाच्या वेळी तुम्ही भांडी बाळंत होण्याला आणि त्यांना झालेली मुले स्विकारण्यास नकार दिला असता, तर गोष्ट वेगळी होती. विद्यमान दंडविधानानुसार तुमचा आजचा दावा मान्य करता आला असता. आज जर याला लबाडी म्हणायचे असेल, तर तेव्हाही ती भामटेगिरीच होती. पण तेव्हाची भामटेगिरी लाभदायक म्हणून तुम्ही स्विकारली असेल, तर त्याच तर्काने आजची भामटेगिरीही तुम्हाला मान्य करावी लागेल. ज्या भांड्यांना मुले होतात, ती मरूही शकतात. रंगरावाने कपाळावर हात मारून घेतला. ही भाकडकथा उत्तरप्रदेशच्या निवडणूक निकालानंतर आठवली. त्यातले रंगराव कोण, पतंगराव कोण हे समजावण्याची गरज नाही. मायावती, केजरीवाल यांना अधिक मते-जागा मिळाल्या, तेव्हा मतदान यंत्रात दोष नव्हता. मात्र पराभवाचा सामना करण्याची वेळ आली, तेव्हा त्यांना निर्जीव धातूची भांडी मरत नसतात, हे विज्ञान आठवले आहे. पण जेव्हा त्यांची भांडी बाळंत झाली होती, तेव्हा त्यांना त्याच मतदान यंत्रात कुठलाही दोष वा भामटेगिरी दिसली नव्हती. आजकालच्या राजकारणात पतंगराव आणि रंगराव इतके बोकाळले आहेत, की त्यातून कोणाला भामटा व कोणाला प्रामाणिक म्हणावे, असा प्रश्न आहे. मधल्यामध्ये निवडणूक आयोगाला मात्र असल्या आरोप प्रत्यारोपाची डोकेदुखी सहन करावी लागत असते. केजरीवाल यांनी तर सचोटीलाच भामटेगिरी करून टाकण्यापर्यंत मजल मारली आहे.

1 comment: