कॉग्रेसचे १९८४ सालात मध्यप्रदेशातून निवडून आलेले एक लोकसभा सदस्य अस्लम शेरखान, हे मुळातच राजकारणी नव्हेत. भारतीय खेळाडू अशी त्यांची ओळख होती. पण राजीव गांधी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना कॉग्रेसमध्ये आणले, त्यापैकी शेरखान एक आहेत. वाजपेयी पंतप्रधान असताना शेरखान यांनी भाजपातही प्रवेश केला होता आणि गुजरात दंगलीनंतर त्यांनी भाजपा सोडून, पुन्हा कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतरच्या काळात त्यांचे नाव कुठे वाचनात आले नव्हते. आता अकस्मात त्यांनी कॉग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी काम करण्याची घोषणा केल्याने, ते प्रकाशात आलेले आहेत. तीन वर्षापुर्वी लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस पुरती भूईसपाट झाल्यावर त्या शतायुषी पक्षाच्या पुनरुज्जीवनाची गरज अनेकांनी मांडलेली आहे. देशात दिर्घकाळ राज्य केलेला व देशव्यापी संघटनात्मक सांगाडा आजही असलेल्या, या पक्षाला अजून त्या दारूण पराभवातून बाहेर पडता आलेले नाही. पक्षाचे श्रेष्ठी म्हणून जबाबदारी घेतलेल्या राहुल गांधी यांना त्याची फ़िकीर असल्याने एकदाही दिसलेले नाही. सहाजिकच त्यामुळे निराश झालेल्या अनेकांनी पक्षाला रामराम ठोकून अन्यत्र आश्रय घेतला आहे. किंवा आपल्या परीने पक्षाचा जिर्णोद्धार होण्याच्या मागण्या चालविल्या आहेत. पण कुठेही आत्मापरिक्षण करण्याची हालचाल होताना दिसलेली नाही. त्याचे पहिले कारण भाजपा वा मोदींचा विजय, हा मतदाराची दिशाभूल करूनच झाला, असा बहुतांश कॉग्रेस नेत्यांचा भ्रम आहे. म्हणूनच त्यांना पक्षाचा पराभवच मान्य नाही. पण अस्लम शेरखान यांच्यासारखे काही मूठभर लोक थोडेफ़ार तरी विचार करताना दिसतात. त्यातूनच त्यांनी सुचवलेला वा हाती घेतलेला उपाय, गंभीर विषयाला हात घालणारा वाटतो. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर कॉग्रेसमध्ये वेगळे कार्यकर्त्यांचे संघटन उभारण्याचा संकल्प सोडला आहे.
राष्ट्रीय कॉग्रेस स्वयंसेवक संघ अशी संघटना उभारण्याचा मनोदय व्यक्त केल्याने, अस्लम शेरखान यांच्याकडे लोकांचे लक्ष गेले आहे. मागल्या दोनचार वर्षात भाजपा इतके मोठे राजकीय यश मिळवू शकला, त्याला संघ कारणीभूत झाला आहे, अशी नेहमी चर्चा चालते. राजकीय पंडित संघावर जातिय वा धार्मिक भेदभावाचे आरोप करून विषय संपवत असतात. पण संघाचे स्वरूप, ध्येय वा कार्यशैली याविषयी सहसा बोलले जात नाही. त्यामुळेच संघ ही एक आधुनिक दंतकथा बनून गेली आहे. पण त्याच संघामुळे भाजपाला इतके मोठे यश मिळत असेल, तर तशीच कॉग्रेसपाशी संघटना असावी, असे शेरखान यांना वाटल्यास गैर काहीच नाही. मात्र दंतकथा ऐकून त्यांनी वेगळ्या संघाची उभारणी करण्याचे स्वप्न बघणे हास्यास्पद ठरेल. त्यांनी संघाचा इतिहास, कार्यशैली वा संघटनेचे स्वरूप समजून घेण्याची गरज आहे. खरी गोम तिथेच आहे. त्याच गाभ्याला हात घातला तर शेरखान यांच्यासह अनेकांच्या लक्षात येईल, की संघ स्वयंसेवक म्हणजे स्वातंत्र्यपुर्व काळातील कॉग्रेसच आहे. महात्मा गांधी यांनी ज्या पद्धतीने निरपेक्ष कार्यकर्त्यांची फ़ौज कॉग्रेसच्या छत्राखाली उभी केली, त्याच फ़ौजेने कुठलीही अपेक्षा न बाळगता देशासाठी समाजासाठी कष्ट उपसले. त्या संघटनेला पुढल्या काळात नेहरू वा अन्य कॉग्रेसी नेत्यांनी आपल्या राजकीय मतलबाच्या दावणीला बांधून टाकले. पण तिची जोपासना करण्याचा विचारही केला नाही. त्यातून कॉग्रेस नावाची गांधींची सेवाभावी संघटना खंगत गेली व आता मरणप्राय होऊन गेलेली आहे. तिथे कार्यकर्ता वा निरपेक्षवृत्तीला स्थानच राहिले नाही. निवडणूका संपल्या, मग त्या फ़ौजेला कोणी विचारले नाही किंवा तिची जोपासना करण्याकडे लक्ष दिले नाही. उलट त्याच कालावधीमध्ये अशा सेवाभावी तरूणांना गोळा करून देशाप्रति समर्पित होण्याची वृत्ती जोपासण्याला संघाने प्राधान्य दिले.
आज संघाविषयी जे बोलले जाते, त्यापेक्षा प्रत्यक्षातला संघ खुप वेगळा आहे. तिथे हजारो लाखो स्वयंसेवक असे आहेत, ज्यांना संघटनेकडून कुठलीही अपेक्षा नाही. तर आपण संघाला म्हणजेच पर्यायाने देशाला काय देऊ शकतो, अशा विचाराने भारावलेल्यांचा तो समुदाय आहे. त्यात भाजपा राजकीय ढवळाढवळ करू शकत नाही किंवा भाजपाच्या नित्यनेमाने चाललेल्या कामकाजात संघ हस्तक्षेप करीत नाही. दोघांमध्ये बंधूभाव असला तरी प्रत्येकाला स्वायत्तता आहे. भाजपाचा अध्यक्ष संघाच्या प्रमुख वा अन्य पदाधिकार्यांची नेमणूक करत नाही. काही प्रसंगी संघाच्या विविध संघटनांमध्ये आपसात मतभेद होतात. पण त्यात कोणी एकमेकांवर आपले आग्रह लादत नाही. हिंदूत्व हा समान धागा गृहीत धरून, त्यांना स्वयंभूपणे काम करता येते. ज्याला रुढार्थाने लोकशाही म्हणता येईल. पण कॉग्रेसमध्ये त्यालाच स्थान उरलेले नाही. तिथे कॉग्रेस अध्यक्ष होईल, तो आपल्या लहरीनुसार कोणालाही विविध संघटनांच्या पदावर नेमतो आणि अशा नेमणूकीने काही साध्य होण्याची गरज नसते. संघामध्ये अशा एकाधिकारशाहीला स्थान नाही. तिथे परिणाम व कर्तृत्व दाखवावे लागते. सहाजिकच नरेंद्र मोदी यांच्यासारखा एखादा स्वयंसेवक वा प्रचारकही पंतप्रधान मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकतो. तो आपल्या विचाराने चालला आहे यातच संघाला समाधान असते. तशा कुठल्याही पदासाठी वा अधिकारासाठी संघामध्ये स्पर्धा होताना दिसत नाही. प्रत्येक स्वयंसेवक आपल्या कामाला बांधिल आहे आणि त्यातून कुठल्या पदाची अपेक्षा बाळगत नाही. तशी इच्छा असेल तर त्याला संघाच्या कामातून बाजूला काढले जाते आणि राजकीय महत्वाकांक्षा पुर्ण करण्याचेही स्वातंत्र्य दिले जाते. कॉग्रेसमध्ये असे किती स्वयंसेवक आज अस्तित्वात आहेत? नसतील तर संघाला पर्याय तरी कसा उभा रहाणार? शेरखान यांनी याचाही अभ्यास केला तरी त्यांना पुढे काही करता येईल.
१९८० च्या राजीव लाटेत भाजपा पुर्णपणे भूईसपाट झाल्यावर, त्या पक्षाने व संघातील काही बुजुर्गांनी नव्या पिढीतील व विविध समाजघटकातील नव्या नेतृत्वाचा विकास करण्याचे काम हाती घेतले. प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे, नरेंद्र मोदी वा तत्सम अलिकडले अनेक भाजपा श्रेष्ठी, त्या प्रयत्नांना आलेली फ़ळे आहेत. उलट त्याच कालखंडात कॉग्रेसने नव्या पिढीला वा कर्तबगारी गाजवू शकणार्यांना पक्षाची व संघटनेची दारे बंद करून कौटुंबिक वारशाची कार्यशैली आरंभली. कॉग्रेस पक्षात नेत्याच्याच घरात नेता जन्मण्याची प्रक्रीया राजीव गांधी यांच्या जमान्यात सुरू झाली. तेव्हाच समाजाच्या विविध घटकातील गुणी कर्तॄत्ववान माणसे जोडण्याची मोहिम संघाने हाती घेतली. आजचा भाजपा दिसतो, त्यामागे पस्तीस वर्षाचा दिर्घकालीन प्रयास झाकलेला आहे. तो प्रयास कुठल्या राजकीय विश्लेषणात समोर येत नाही, की सांगितला जात नाही. कॉग्रेस वा पुरोगामी पक्षांच्या नाकर्तेपणाला लपवण्यासाठी भाजपाच्या यशाला जातीय वा हिंदूत्वाचा मुखवटा चढवून पेश केले जाते. प्रत्यक्षात संघाचे योग्य व रास्त मूल्यमापन होत नाही. म्हणूनच संघाच्या बळावर भाजपाने इतके मोठे निवडणूक यश मिळवले, तर अस्लम शेरखान संघ स्वयंसेवकांचे संख्याबळ फ़क्त बघतात. पण त्यांच्यातकी निरपेक्ष कार्यवृत्ती बघू शकत नाहीत. त्यांना कार्यकर्ता, संघटना आणि नुसती गर्दी यातला फ़रक उमजलेला नाही. म्हणून कॉग्रेसच्या निवडणूक विजयासाठी राबणारी कार्यकर्त्यांची फ़ौज उभारण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. पण विजयाचे श्रेय वा हिस्साही न मागणार्यांची गर्दी त्यांना बघताही आलेली नाही. पदाधिकारी नेमण्यातून असे कार्यकर्ते निर्माण होत नाहीत, की मिळत नाहीत. त्यांची जोपासना करावी लागते. त्यांना संस्कार देऊन कार्यान्वित करण्याला प्राधान्य असावे लागते. मोह्न भागवतांचे गोडवे गाण्यातून संघाचा स्वयंसेवक घडत नाही, इतके लक्षात घेतले तरी खुप झाले.
No comments:
Post a Comment