भाजपा सोडून कॉग्रेसमध्ये गेलेल्या नवज्योतसिंग सिद्धू याची समस्या कपील शर्माने परस्पर सोडवली, असे म्हणायला हरकत नाही. कारण पक्षांतर केलेल्या सिद्धूची मुख्यमंत्री व्हायची इच्छा अपुर्ण राहिलेली असली, तरी मुख्यमंत्री झालेल्या अमरिंदर सिंग यांनी त्याला आपल्या सरकारमध्ये मंत्री म्हणून सामावून घेतले होते. मात्र नुसता नामधारी मंत्री होऊन हा गृहस्थ खुश नाही. त्याने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. आपल्याला नगण्य मंत्रालय मिळाले, किंवा महत्वाचे आणखी काही खाते मिळावे, अशी सिद्धूची अपेक्षा आहे. त्याला तितके महत्वाचे खाते देण्याऐवजी सिद्धूला मंत्री असताना विनोदी कार्यक्रमात सहभागी होण्याने कायद्यात अडचण आहे काय, याचा शोध अमरिंदर सिंग यांनी सुरू केला होता. कारण मंत्री हा सरकारचा पुर्णवेळ कर्मचारी वा अधिकारी मानला जात असतो. त्याने अन्य मार्गाने कमाई करण्यास मुभा नसते. सिद्धूने गेल्या दशकात टिव्हीच्या माध्यमात आपली लोकप्रियता सिद्ध केलेली आहे आणि कपिल शर्मा याच्या खुप गाजलेल्या विनोदी मालिकेत सिद्धू कायम असतो. खळखळून हसणे वा अधूनमधून शेरोशायरी करीत खास डायलॉग मारण्याने, त्याने प्रेक्षकांचे पक्ष वेधून घेतलेले आहे. अर्थातच हे काम तो फ़ुकटात करत नाही. त्यासाठी त्याला नक्कीच मोठा मेहनताना मिळत असतो. म्हणूनच त्याला कमाई मानले जाते. मंत्र्याने अशी अन्य मार्गाने कमाई करण्याला प्रतिबंध आहे. सहाजिकच मंत्रीपदी विराजमान झालेल्या सिद्धूने कपील शर्माच्या शोमध्ये सहभागी रहावे किंवा नाही, यावरून वादळ उठलेले होते. दिवसा मंत्री व रात्री टिव्हीचा कलाकार, अशी दुहेरी भूमिका पार पाडण्याचा पवित्रा सिद्धूने घेतला होता. पण त्याची आता बहुधा गरज उरणार नाही. कारण कपील शर्माचा विनोदी शो बंद पडण्याची पाळी आलेली आहे.
सोनी वाहिनीवर अतिशय लोकप्रिय असलेल्या या मालिकेला आता ग्रहण लागलेले आहे. त्यातला हजरजबाबी कपील शर्मा, हे मुख्य पात्र असले तरी त्याच्या सोबतीला असलेल्या अनेक कलाकारांच्या गोतावळ्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढलेली होती. अशा अन्य कलाकारांनी अलिकडे या मालिकेच्या चित्रणाकडे पाठ फ़िरवली आहे. कारण त्यामध्ये कपील शर्मा इतरांना अपमानित करतो, अशी धारणा आहे. अर्थात कार्यक्रमातील मानापमान महत्वाचे नसतात. तो निव्वळ देखावा असतो. पण वास्तवात कपील शर्मा अन्य प्रसंगीही आपल्या सहकार्यांना अनाठायी अपमानित करतो, अशी कायम तक्रार राहिली आहे. पुर्वी इतर वाहिनीवर ही मालिका सुरू असताना त्यातला सुनील ग्रोव्हर बाजूला झाला होता आणि त्याला आपल्या बळावर काही करता आलेले नव्हते. म्हणून पुन्हा त्यानेही जुळते घेऊन कपील शर्माची टीम चांगली यशस्वी केलेली होती. नंतर आधीच्या वाहिनीशी जमले नाही आणि नव्या नावाने तीच टीम सोनी टिव्हीवर दाखल झाली. आजघडीला भारतीय टिव्हीच्या व्यवहारात सर्वाधिक कमाई देणारी व सर्वाधिक लोकप्रिय, अशी या मालिकेची ख्याती झालेली होती. कुठल्याही चित्रपटाच्या वितरणापुर्वी कपीलच्या मालिकेत येऊन नव्या चित्रपटाचे कलावंत तिथे आपल्या गोष्टी सांगत असायचे. शहारुख आमिरपासून सलमानखान व अमिताभही त्यातून सुटले नाहीत. यातूनच कपीलच्या कार्यक्रमाचे कौतुक लक्षात यावे. अगदी चित्रसृष्टीतल्या कुठल्याही जाहिर कार्यक्रमाच्या संचालनाचीही सुत्रे आपोआप याच टीमकडे येऊन गेली. अशा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या टीमला, अगोदर सिद्धूच्या सहभागी होण्याच्या विषयाचे ग्रासले होते आणि आता ती टीमच विस्कळीत होऊन संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या दोन आठवड्यात अन्य सहकार्यांनी पाठ फ़िरवल्याने कपीलाही त्याचा एकखांबी तंबू टिकणार नसल्याची खात्री झालेली असावी.
परदेशी कुठल्या कार्यक्रमासाठी गेलेले असताना, कपीलने दारू पिवून खुप धिंगाणा करण्यातून ही स्थिती आल्याचे सांगितले जाते. विमानाने ही मंडळी मायदेशी येत असताना कपील दारू प्यायलेला होता. त्याला विमानातही नशापान करायचे होते. पण तिथे दारू मिळाली नाही, म्हणून त्याने विमानातील कर्मचार्यांना शिवीगाळ केली. त्यात हस्तक्षेप करायला सुनील ग्रोव्हर गेला असताना, कपीलने आपल्या या सहकार्यालाही नको तितक्या शिव्या घालून अपमानित केले. वास्तविक ग्रोव्हर कपीलपेक्षाही वयाने मोठा व ज्येष्ठ आहे. यापुर्वी अनेकदा त्या दोघांमध्ये खटके उडालेले आहेत. पण जमलेली टीम विस्कटू नये, म्हणून प्रत्येकाने जुळते घेतलेले आहे. पण खेळाचे नाव आपले म्हणजेच आपणच एकटे महत्वाचे, ही बाब कपीलच्या इतकी डोक्यात गेली, की त्याने इतरांना अपमानित करण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळे सेटवर अनेकदा भांडणे व्हायची आणि कामातही व्यत्यय येत राहिला आहे. दारू प्यायल्यावर तर कपील कोणाच्याच आटोक्यात रहात नाही. त्यामुळेच ही नाराजी दिर्घकाळ चालू होती. पण परदेश वारीत झालेल्या वितंडवादाने त्याचा कडेलोट झाला. सहाजिकच मायदेशी आल्यावर अन्य कलाकारांनी कपीलवर बहिष्कार घातला. तर कपीलने त्यांच्याकडे पाठ फ़िरवून अन्य काही नकलाकारांना आमंत्रित केले. पण त्यामुळे नेहमीइतका त्याचा खेळ रंगला नाही, समोर प्रेक्षक बसले असताना व प्रेक्षकांच्याही सहभागाने चालणार्या या खेळामध्ये, अपेक्षित रंगत आली नाही. म्हणूनच सोनी टिव्हीच्याही व्यवस्थापनाला या मालिकेचा नव्याने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. गेले काही दिवस तशी चर्चा चाली होती. पण बाकीच्या कलाकारांनी पाठ फ़िरवल्यानंतरचे भाग, फ़ुसके ठरल्याने व्यवस्थापनाला विचार करणे भाग पडले. पुढल्या वर्षासाठी कपीलशी व्हायच्या कराराचीही आता शाश्वती राहिलेली नाही.
तुलना केल्यास कपील शर्माला खुप मोठे यश अल्पावधीतच मिळालेले आहे. एका स्पर्धात्मक मालिकेतून उदयास आलेला हा हजरजबाबी कलावंत, आपल्या गुणवत्तेने इतका मोठा झाला. चित्रसृष्टीतले मोठमोठे कलाकारही त्याची पाठ थोपटू लागले. इतके मोठे व झटपट यश त्यालाही ज्येष्ठ असलेल्या अनेक विनोदवीरांना आजपर्यंत मिळालेले नव्हते. इतके मोठे यश झटपट मिळवणे शक्य झाले, तरी कपीलला ते यश पचवणे अशक्य झालेले असावे. अन्यथा त्याने इतक्या अल्पावधीतच आपल्या त्या यशावर असे पाणी ओतले नसते. एकूण शोमध्ये त्याची अपरिहर्यता कोणी नाकारलेली नाही. त्याच्या मध्यवर्ति व्यक्तीमत्वाच्या भोवतीच संपुर्ण खेळ चालतो. असे असताना त्याची महत्ता वाढवणारे अन्य कलाकारही तितकेच अपरिहार्य आहेत. कारण त्यांच्याखेरीज कपीलची महत्ता मातीमोल ठरते. त्याचीच साक्ष गेल्या दोन आठवड्यात मिळालेली आहे. मालिकेतली विविध पात्रे रंगवणारे हे कलाकार आले नाहीत, तर त्यांना पर्याय ठरू शकतील, असे अन्य कोणीही कपीलला पेश करता आले नाहीत. सहाजिकच आता त्याने लोटांगण घालून त्यांना माघारी आणणे, हा पर्याय आहे आणि तसे केल्यास त्याला आजवरच्या पद्धतीने त्यांच्यावर हुकूमत गाजवता येणार नाही. कारण त्याच सहकार्यांच्या अभावी कपील तोकडा पडतो, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळेच आपला अहंकार गुंडाळून कपीलला शरण जावे लागेल. नसल्यास हा खेळच गुंडाळावा लागेल. तसे झाल्यास पंजाबचा नवा मंत्री झालेल्या सिद्धूची समस्या मात्र दूर होईल. कपीलचा खेळच थंडावल्याने त्याच्या चित्रणात भाग घेण्य़ाची सिद्धूला गरज उरत नाही, की त्यातल्या कमाईचा विषय वादाचा होऊ शकत नाही. तसे कपील व सिद्धू दोघेही मुळचे पंजाबीच आहेत. आपल्या समस्येवर कपीलने काढलेला पर्याय वा उपाय बघून सिद्धूही खुशीने म्हणेल, कपील ठोको ताली!
No comments:
Post a Comment