Friday, September 23, 2016

खरेखोटे कसे तपासावे?

Image result for LOC operation

मागले दोन दिवस सोशल मीडियात भारतीय कमांडो पथक पाकिस्तानी हद्दीत घुसल्याच्या बातम्या झळकत होत्या. डिफ़ेन्सन्युज नावाच्या वेबसाईटार ही बातमी होती. तिचाही सरकारने व लष्कराने इन्कार केलेला आहे. पण असा इन्कार करणेही आवश्यक असते. मध्यंतरी आझाद हिंद सेनेच्या संदर्भातील काही जुनी कागदपत्रे खुली करण्यात आली. त्यांचा आढावा घेतला तर पन्नास वर्षापुर्वी सरकारचे अधिकृत खुलासे व स्पष्टीकरणे किती खोटी होती, हे लक्षात येऊ शकते. स्वतंत्र भारताचे सरकार चालवणारे पंडीत नेहरू यांनीच सुभाषबाबूंच्या हालचालीवर किंवा त्यांच्या आप्तस्वकीयांवर पाळत ठेवल्याचे अशा कागदपत्रातून आता समोर आलेले आहे. पण तेव्हाच्या काळात सरकार छातीठोकपणे सुभाषबाबूंचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगत होते. त्याला छेद देणार्‍या तमाम बातम्यांचा इन्कार केला जात होता. सरकारच्या अनेक कारवाया गोपनीय असतात आणि त्या काळात अशी माहिती उघडकीस येणे गैरलागू असते. म्हणूनच तसे इन्कार करावे लागतात. बांगला युद्धाच्या काळातही भारतच पुर्व पाकिस्तानात उचापती करीत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून झाला होता. भारताने तो कधी उघडपणे स्विकारला नाही. पण नंतरच्या काळात बांगला युद्धात सहभागी झालेल्या अनेक अधिकारी वा संबंधितांनी पाकच्या त्याच आरोपाला दुजोरा दिलेला आहे. म्हणूनच आज कुठलीही छुपी किंवा अनधिकृत कारवाई आपण करीत असलो, म्हणून त्याला भारत सरकार वा भारतीय सेना गोपनीय राखण्याचा आटोकाट प्रयत्न करणारच. नियंत्रण रेषा ओलांडणे बेकायदा असेल, तर तशी कारवाई युद्धाची घोषणा ठरू शकते. म्हणूनच कृती केली तरी भारत सरकार ते मान्य करण्याची शक्यता नाही. तसा इन्कार होणेही योग्यच आहे. पण म्हणून तसल्या बातम्या निव्वळ निराधार असल्याचा दावाही मान्य करण्याचे कारण नाही.

अशा बातम्या संदर्भाने तपासून घेता येतात. त्यासाठी सरकारकडे खुलासे मागण्याची गरज नसते. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने त्याच बाबतीत कोणी अफ़वा पसरवत असेल, तर सरकार त्याच्या विरोधात कठोर कारवाईचेही पाऊल उचलू शकते. पण दोन दिवस फ़िरणार्‍या कमांडो बातमीबद्दल सरकारने तशी कुठलीही कारवाई केलेली नाही. किंबहूना तसे काही करण्याविरुद्ध ताकीदही दिलेली नाही. याचीच दुसरी बाजू म्हणजे पाकिस्तानची प्रतिक्रीया बोलकी आहे. पाकिस्तानने अकस्मात खुप उतावळेपणा दाखवायला आरंभ केला आहे. मंगळवारी लाहोर इस्लामाबाद ते पेशावर जाणारा हायवे वाहतुकीला बंद करण्यात आला. इस्लामाबाद येथून उत्तरेकडे होणारी हवाई वाहतुक बंद करण्यात आली. सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश जारी करण्यात आले. गुरूवारी रात्री अकस्मात पाकिस्तानी हवाई दलाची लढाऊ विमाने राजधानीच्या आकाशात घिरट्या घालू लागली. त्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून तिथले नागरिक भयभीत होऊन गेले. हमीद मीर नावाचा ज्येष्ठ संपादकही त्याचा उल्लेख तात्काळ सोशल मीडियात करण्यापासून बाजूला राहू शकला नाही. ही पाकची गडबडलेली प्रतिक्रीया नुसत्या मुत्सद्देगिरीमुळे उमटलेली नाही. भारताकडून कुठली तरी अशी खेळी झालेली असणार, की त्यामुळे पाकिस्तानचा धीर सुटला आणि त्यांनी थेट युद्धसज्ज असल्याचा पवित्रा घेतला. जेव्हा भारतीय सीमेवर काही घडल्याचे जाणवले किंवा अनुभवास आले, तेव्हाच पाकने सावधानतेची प्रतिक्रीया दिलेली असणार यात शंका नाही. अशी शंका घेण्याचे एक कारण आहे, की अशी कमांडो कारवाई सीमापार झाल्यास पाकिस्तान त्याबद्दल तक्रार कशाला करत नाही? पाकला भारतावर आरोप करण्याची त्यातून सुवर्णसंधी मिळू शकते आणि पाकिस्तान गप्प कशाला?

चार वर्षापुर्वी अशीच एक कारवाई पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयानजिक झालेली होती. ओसामा बिन लादेन लपून बसलेल्या इमारतीवर अमेरिकन कमांडो चाल करून गेले व त्यांनी त्याला ठार मारून प्रेतासह काढता पाय घेतला होता. लष्कराच्या कुंपणापाशी इतकी धडाकेबाज कारवाई होऊनही पाकला कुठलाही प्रतिसाद देता आला नव्हता. पुढे त्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीच केल्यावर पाकिस्तानचे नाक कापले गेले होते. दोन हेलिकॉप्टरनी आलेल्या त्या अमेरिकन कमांडो पथकाने तासभर मनमानी केली. तरी पाकसेना झोपून राहिली, असा त्याचा अर्थ लावला गेला आणि पाकसेनेची मायदेशातच नाचक्की झाली होती. आता तसेच काही भारतीय कमांडोंनी पाकप्रदेशात घुसून केल्याचे ओरडून सांगणे, म्हणजे आपल्याच नाकर्तेपणाचीच जाहिरात ठरू शकते. म्हणूनच पाकला तसा आरोप करण्याची सोय नाही. त्याविषयी गप्प बसण्याला पर्याय नाही. पण ही बातमी खरी ठरण्याची एक शक्यता भारतीय सेनादलानेच दिलेल्या माहितीमध्ये आहे. रविवारी उरी येथे जिहादी हल्ला झाला. तर मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणार्‍या दहा जिहादींना मारण्यात आल्याची बातमी झळकली होती. पण ही कारवाई सीमेच्या इतकी लगत होती, की मारलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैनिक पुढे जाऊ शकले नाहीत, असा खुलासा करण्यात आला. कुंपणापासून ३०० मिटर्स अंतरावर हे मृतदेह पडलेले आणि समोरून गोळीबार होत असल्याने हे जिहादींचे मृतदेह सोडून द्यावे लागले, असा खुलासा आहे. पण कुंपणाच्या अलिकडे की पलिकडे त्याबद्दत त्यात मौन आहे. अलिकडे असेल तर मृतदेहांना आणणे अशक्य असू शकत नाही आणि मृतदेह तसे उघड्यावर टाकण्याची जगात कुठेही पद्धत नाही. ज्याअर्थी मारले तिथेच मृतदेह सोडले याचा अर्थ कारवाई सीमारेषेच्या पलिकडेच झालेली असावी.

डिफ़ेन्सन्युज य़ासारखी जबाबदार वृत्तसंस्था अफ़वा पसरवू शकत नाही, की बिनबुडाच्या बातमीचा तपशील जाहिर करणार नाही. पण अशा वृत्तसंस्था किंवा माध्यमे ही ठराविक माहिती पसरवून देण्यासाठी मदतनीस ठरत असतात. जशी सीमापार कारवाईची जबाबदारी झटकून टाकली जाते, तशीच अशा बातम्यांची जबाबदारीही झटकून टाकण्यासाठीच अशा संस्थांचा उपयोग होत असतो. पण त्यातून आवश्यक व उपयुक्त परिणाम घडवणारा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जात असतो. म्हणूनच सीमापार कमांडो कारवाई झाल्याची ती बातमी संपुर्ण बिनबुडाची किंवा अफ़वा नक्कीच नाही. कारण पाकिस्तानात त्यानंतर उमटलेली प्रतिक्रीयाच तशा कारवाईची साक्ष देत आहे.  किंबहूना भारत युद्धाच्या तयारीत असल्याचा संदेश त्यातून पाठवला गेला आहे. मात्र युद्धाची घोषणा भारत करणार नाही. पण जशा कुरापती अतिरेकी पाठवून पाक करतो, तशाच कारवाया आपणही करू शकतो, हे दाखवण्याचा हा प्रयास असू शकतो. त्याच्याही पुढे जाऊन युद्धाची घोषणा पाकने करावी, यासाठीचे हे आव्हानही असू शकते. अशीच एक कारवाई गतवर्षी म्यानमारच्या जंगलात घुसून झालेली होती. त्याचीही बातमी आली, तेव्हा भारताने त्याचा इन्कारच केलेला होता. पण त्याची चाहुल लागताच प्रथम पाकिस्तानातून प्रतिक्रीया उमटलेली होती. असे काही पाकमध्ये घुसून कराल तर याद राखा. आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत, असेही पाकने बजावले होते. त्याच धमकीला अशी ताजी कारवाई आव्हान असू शकते. म्हणूनच ही घुसखोर कारवाई झाली किंवा नाही, त्याचा उहापोह करण्याची गरज नाही. कारण ती अनधिकृत कृती असते आणि कुठल्याही सरकारला त्याची शेखी मिरवता येत नाही. त्याची सत्यता तपासण्यापेक्षा त्यावर पाकिस्तानात उमटणार्‍या प्रतिक्रीया व पडसाद यांचे जमेल तितके आकलन केल्यास काही गोष्टी लक्षात येऊ शकतात.

भारतीय कमांडो घुसले?


LOC के लिए चित्र परिणाम
मुत्सद्देगिरी हा गावगप्पांचा विषय नाही. तिथे बोलले खुप जाते, पण सांगितले काही जात नाही. त्यात नेहमी आपल्या गोटातले काहीही न सांगता पलिकडल्या गोटातली माहिती काढण्याचे उद्योग चालतात. तीच काहीशी लष्करी रणनितीची गोष्ट असते. लढाईची रणनिती कधी उघड केली जात नाही. किंबहूना अनेकदा केलेली कृतीदेखील जाहिरपणे सांगितली जात नाही. लोकांच्या नजरेत त्याचे परिणाम येतात, तेव्हा त्याचा गवगवा होत असतो. म्हणूनच उरी येथील लष्करी तळावर जिहादी हल्ला झाल्यावर भारताने त्याला चोख उत्तर द्यावे, ही अपेक्षा गैर नाही. पण असे चोख उत्तर कोणते व कधी देणार; हे पत्रकार परिषदेत कोणी सांगणार नाही. अशा कारवाया आकस्मिक व परिणामकारक असतात. म्हणूनच त्यातली वेळ शत्रूला गाफ़ील गाठण्याची असते. कृती वा वेळ दोन्ही शत्रूचा गोंधळ उडवून देणारीच असावी लागते. शिवाय अशा कारवाया बातमी वा प्रसिद्धीसाठी नसतात. जिहादी वा घातपाती कारवाया आणि लष्करी उत्तर, यात हा फ़रक असतो. जिहादी वा घातपात्यांना शत्रूचे नुकसान करण्यापेक्षा त्यातून अधिकाधिक प्रसिद्धी मिळवायची असते. शत्रूला त्यातून दुबळा ठरवण्याचे लक्ष्य साधायचे असते. लष्कराची गोष्ट वेगळी असते. सेनादलाला कधीही आपल्या कृत्यांसाठी प्रसिद्धी नको असते, तर शत्रूला नामोहरम करण्याला प्राधान्य असते. म्हणूनच उरीनंतर पाकला धडा शिकवायचा असेल, तर त्यासाठीच्या कारवाईचा गाजावाजा होऊन चालणार नाही. शिवाय अशी कारवाई युद्धाकडे घेऊन जाणारी असेल तरी परिणामांचा विचार करावा लागतो. नुसतेच उत्तर द्यायचे असेल तर युद्धापर्यंत पाळी येऊ नये, अशीही काळजी घ्यावी लागते. म्हणूनच त्याबद्दल जाहिर वाच्यता केली जात नाही. किंबहूना केलेल्या कात्रवाईचेही मौन पाळले जाते. म्हणूनच सध्या काय होत आहे, त्याकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे.

मंगळवारी सकाळी उजाडल्यापासून उरी क्षेत्रातच भारतीय सेनादलाने आणखी एक जिहादी घुसखोरांचा दस्ता अडवला आणि त्यातील दहा बारा लोकांना ठार मारल्याची बातमी वाहिन्यांवर झळकत होती. संध्याकाळपर्यंत तीच बातमी रंगवून कथन केली जात होती. पण त्या कारवाईचे कुठलेही चित्र वा दृष्य़ वाहिन्यांनी दाखवलेले नव्हते. डोंगराच्या दिशेने जाणारा एक ओसाड रस्ता आणि त्यावर काटेरी तार, इतकेच दिसत होते. पुढे चकमक चालू असल्याचे वार्ताहर सांगत होते. पण पुढे तर उंच डोंगर होता आणि तिथे कुठेतरी चकमक चालू असल्याचे सांगितले गेले. मंगळवारी रात्री त्या बातमीचा सगळ्यांना विसर पडला आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ राष्ट्रसंघाच्या आमसभेत काय बोलणार, यावरच गदारोळ सुरू झाला. पण सकाळी उरी क्षेत्रात झालेल्या नव्या चकमकीसह त्यात मारल्या गेलेल्या दहाबारा अतिरेक्यांचा विषय सर्वांनीच सोडून दिला. त्यांच्यापाशी काय साहित्य सापडले, किंवा कोणते पुरावे त्यांना पाकिस्तानी घुसखोर ठरवू शकतात, याचा कुठलाही उहापोह नंतर झाला नाही. आजही पुन्हा रविवारी उरी तळावर आलेल्या व मारल्या गेलेल्या चार जिहादींचेच सामान पुरावे म्हणून दाखवले जात आहे. मग मंगळवारी तिथून जवळच मारले गेले त्या दहाबारा अतिरेक्यांचे काय? खरेच अशी चकमक झाली किंवा नाही, याचाही खुलासा होऊ शकलेला नाही. पण त्याच दरम्यान व्याप्त काश्मिरातील पाकसेनेची तारांबळ नजरेत भरणारी होती. अकस्मात व्याप्त काश्मिरातील पाकचे हवाईतळ आणि तिथून होणारी सर्व विमान उड्डाणे रद्द करणारे आदेश जारी करण्यात आले. कुठल्याही नागरी वा लष्करी विमानांना उड्डाणाला अशी बंदी कशाला करण्यात आलेली होती? पाक वाहिन्यांवरही त्या विषयाची चर्चा सुरू झालेली होती. पाकच्या सोशल मीडियात तशी घबराटही पसरली आणि भारतीय हल्ल्याच्या भयाने हा निर्णय झाल्याचे सांगितले गेले.

दरम्यान भारत सरकारतर्फ़े चोख उत्तर आणि मुत्सद्देगिरीचा खेळ सुरू होता. वाहिन्यांवर येणारे माजी भारतीय सेनाधिकारी मात्र सरकार प्रथमच आक्रमक होत असल्याचे ठामपणे सांगत होते. म्हणजेच यावेळी नुसत्या निषेधावर भागणार नाही. पाकला धडा शिकवला जाईल, अशी खात्री वरीष्ठ माजी सेनाधिकार्‍यांना वाटण्याचे काही कारण असू शकते. निवृत्त झालेल्या अशा अधिकार्‍यांचा सेनेच्या गोटातल्या हालचालींशी संबंध येतच असतो. तिथे काही हालचाली सुरू असल्याचा सुगावा असल्याने हे अधिकारी बोलत असणार. त्यात अनेक प्रस्ताव सुचवले जात होते. थेट व्याप्त काश्मिरात घुसून कारवाई करण्यापासून नेमके हवाई हल्ले करण्यापर्यंत अनेक पर्याय भारतीय माध्यमातून चर्चिले जात होते. पण तशा गोष्टी सांगणारे हे जुने अनुभवी निवृत्त अधिकारी कुठल्याही डावपेचांची खुली चर्चा करायला नकार देत होते. शत्रूला तुमची सज्जता कळू नये आणि त्यातली गोपनीयता संपू नये हेच त्याचे कारण असते. पण युद्धाशिवाय खुप पर्याय असतात याची ग्वाही हे अधिकारी देत राहिले. किंबहूना चकमक व संघर्ष पुर्ण युद्धात परावर्तित व्हायला खुप टप्पे असतात. संघर्ष बळावत जाणारी एक शिडीच असते. त्यातली एक एक पायरी चढतच युद्धापर्यंत मजल मारली जाते. म्हणूनच चोख उत्तर म्हणजे युद्ध नव्हे. तर धडा शिकवणे असाही पर्याय या अधिकार्‍यांनी सांगितला होता. लढाईच्या धमक्या देणे वेगळे आणि प्रत्यक्ष युद्धात उतरणे वेगळे! ज्याची हिंमत व सज्जता असते तो धमक्या देत नाही. उथळ पाण्याचा खळखळाट फ़ार असे म्हणतात आणि संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी पाकची तशीच संभावना केली. त्यामुळे अणुयुद्ध व अण्वस्त्र हल्ला यांना घाबरण्याचे दिवस संपले असा इशारा दिला गेला होता. तशी कारवाई मग पाकला अपेक्षित असली तर नवल नाही. पण कोणती व कुठून हल्ला येणार ही अनिश्चीत बाब भितीदायक असते.

अशा गनिमी लढाईत शत्रूला गाफ़ील पकडणे आणि त्याचा गोंधळ उडवून देण्याला प्राधान्य असते. मंगळवारी पुन्हा उरीजवळच नियंत्रण रेषेपाशी घुसखोरी झाल्याच्या व चकमक झडल्याच्या बातम्या खर्‍या होत्या की गोंधळ उडवून देण्यासाठी होत्या? जेव्हा अशा चकमकी होतात तेव्हा दोन्ही बाजूंनी सीमापार गोळीबार, तोफ़ांचा मारा सुरू होत असतो. जेव्हा अशी चकमक एका जागी झडते, तेव्हा तिथे संपुर्ण लक्ष केंदित होते. सहाजिकच अन्य आघाड्यांकडे दुर्लक्ष व शिथीलता येत असते. त्याचाच फ़ायदा घेऊन तिथून जबरदस्त हल्ला करण्याची संधी उपलब्ध होत असते. मंगळवारी पहाटेपासून चकमकीचा आभास निर्माण करून अन्यत्र भारतीय कमांडोंनी नियंत्रण रेषा पार केली आणि थेट जिहादी छावण्यांवर हल्ला केला होता काय? हेलिकॉप्टरने अशी सीमा ओलांडल्यास त्याचा सुगावा हवाईतळांना लागतो. त्यामुळे पाकने आपल्या प्रदेशातील सर्व हवाई उड्डाणे रद्द करण्याचा सावधान उपाय योजला. पण येणारा हल्ला हवाई असण्यापेक्षा छापा घातल्यासारखा कमांडो पथकाचा असल्याची सर्व माहिती मिळायला काही अवधी जाणारच. तेवढ्यात कमांडो कार्यभाग उरकून माघारी परतू शकतात. ओसामाचे वास्तव्य पाकसेनेच्या तळालगत होते. तरीही त्या कमांडो पथकाला तासभर अवधी मिळाला होता आणि पाकसेना त्यांना रोखण्यात वा पाठलाग करण्यातही तोकडी पडली होती, ही बाब लक्षात घेतली, तर नियंत्रण रेषा पार करून काम उरकणार्‍या भारतीय कमांडोंना पाक रोखू शकत नाही हे उघड आहे. मग मंगळवारी तशी कारवाई भारतीय सेनेने उरकून घेतली काय? तशा अफ़वाही पसरल्या आहेत. पण कोणी त्याला दुजोरा देत नाही की माध्यमातही तशी बातमी नाही. भारतावर आरोप करण्याची संधी असूनही पाकिस्तान त्यावर मौन कशाला धारण करून बसला आहे? भारत सरकार त्याचे श्रेय घ्यायला पुढे का आलेले नाही? (अपुर्ण)

Thursday, September 22, 2016

शहाण्यांपासून सावध रहा


kureel cartoon on secularism के लिए चित्र परिणाम
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले पाहिजे. किंवा काय केल्यास त्यांचा अस्त होईल; असे सांगणार्‍या अनेक जाणकारांचे सध्या भरपूर पीक आलेले आहे. सुदैवाने मोदी अशा कोणाचेही काही ऐकत नाहीत, की त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. पण मोदी समर्थकांची गोची आहे. त्यांना अशा जाणकारांना शिकवण्याची व समजावण्याची मोठी खाज आहे. त्यातून अनेक वादविवाद निर्माण होतात. एक साधी गोष्ट लक्षात घेतली तर त्यांना चिंता करण्याचे काही कारण शिल्लक उरणार नाही. उदाहरणार्थ आजची गोष्ट वा परिस्थिती बाजूला ठेवा आणि तीन वर्षे मागे चला. तेव्हा यातले बहुतंश जाणकार अभ्यासक जे काही सल्ले मोदींना वा त्याही आधी भाजपाला देत होते, त्याचे पालन झाले असते तर? या प्रश्नाचे उत्तर शोधा. म्हणजे असे, की भाजपाने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार करू नये, असाच या तमाम जाणकारांचा सल्ला होता. तसे केल्यास भाजपाला उरलेसुरले स्थानही गमावण्याची पाळी येईल. म्हणून भाजपाने तसा धोका पत्करू नये, हाच सल्ला दिला जात होता ना? भाजपाने तो मानला नाही आणि आज त्यांच्या हाती देशाची पुर्ण बहूमताने सत्ता आलेली आहे. दुसरे नरेंद्र मोदी घ्या. त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी प्रचाराची मोहिम सुरू केली. त्यानंतर काय झाले? हळुहळू मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर जातात असे दिसल्यावर त्याच जाणत्यांनी मोदींनी मुस्लिमांची माफ़ी मागावी, मुस्लिम टोपी घालावी; इत्यादी सल्ले दिलेच होते. अन्यथा अवघा मुस्लिम मतदार विरोधात जाऊन मोदींसह भाजपा मार खाईल, असाच इशारा होता ना? काय झाले? मोदींनी तिकडे वळून बघितले नाही आणि आज मोदी सत्तेवर आरुढ झालेत. आता तेच कालचे शहाणे आज पुन्हा मोदींनी काय केले पाहिजे, याचे सल्ले देतच आहेत. आपले सुदैव इतकेच, की मोदी त्याकडे आजही ढुंकून बघत नाहीत.

तेव्हा किंवा त्याच्याही आधीपासून अशा लोकांचा शहाणपणा स्विकारून लालकृष्ण अडवाणी वागत गेले आणि आज त्यांच्या हयातीत त्यांना त्यांच्याही पक्षात स्थान राहिलेले नाही. म्हणूनच अशा सल्लागारांची किंमत किती ती ओळखली पाहिजे. त्यांना आपले शहाणपण सांगितल्याखेरीज चैन पडत नाही आणि शहाणपणा सिद्ध करण्यासाठी शक्य तितका मोठा मुर्खपणा केल्याशिवाय घास गिळवत नाही. त्यांना त्यांच्याच नशिबावर सोडून आपण आपला विचार करू शकलो तरी खुप झाले. फ़ार दुर जाण्याची गरज नाही. गेल्या दोन वर्षात मोदी सतत परदेशी असतात वा फ़िरायला जातात; म्हणून त्यांची हेटाळणी करण्यात हेच शहाणे पुढे होते ना? मोदींना अनिवासी भारतीय ठरवण्यात त्यांनी धन्यता मानली. पण परदेशी जाऊन हा पंतप्रधान नेमके काय उद्योग करतो, याची चाचपणी करण्याची त्यांना गरज वाटली नाही. कारण त्यांना समजूतीच्या विश्वात रममाण होण्यात आनंद आहे. तर त्यांना मोदी तिथे राहू देतात आणि आपणही त्यांच्या तशा स्वर्गसुखात व्यत्यय आणण्याचे कारण नाही. उलट ज्या दिवशी मोदी अशा शहाण्या व जाणकार लोकांचा सल्ला मनावर घेऊ लागतील, त्या दिवशी आपण चिंताक्रांत व्हायची पाळी आली असे समजावे. आज तरी सुदैवाने तशी वेळ आलेली नाही. म्हणून आपण निश्चींतपणे पंतप्रधान योग्य निर्णय घेतील, इतका विश्वास बाळगून शांत राहिलो, तरी मोठे काम होईल. कारण युद्ध वा परराष्ट्रनिती ह्या गावगप्पा नसतात. चव्हाट्यावर, चावडीवर किंवा वाहिन्यांच्या स्टुडिओत चकाट्या पिटाव्यात; इतक्या सोप्या गोष्टी नसतात. हजारो संदर्भांना लक्षात घेऊन त्यातून वाट काढायची असते. ट्वीट करण्याइतके ते सोपे काम नाही. म्हणूनच शांत राहून काय चालले आहे, त्याचा आढावा घेणे खरा शहाणपणा असतो. गेल्या चार दिवसात काय घडले, त्याचा साकल्याने कोणी सुसंगत विचार केला आहे काय?

पहिली बाब म्हणजे आरंभीची प्रतिक्रीया देऊन पंतप्रधान शांत बसले आहेत. त्यांनी पाक पंतप्रधानांशी संपर्क साधला नाही, की जागतिक नेत्यांची मदत मागायला धावाधाव केलेली नाही. उलट जगातूनच भारताला सहानुभूती व पाठींब्याचे संदेश येत आहेत. ही दोन वर्षातल्या परदेश वार्‍यांची कमाई आहे. दुसरी गोष्ट बहुतेक माजी सेनाधिकारी यावेळी सरकार सकारात्मक संदेश देत असल्याचे सांगतात. विक्रमसिंग हे दोन वर्षापुर्वीपर्यंत सेनाप्रमुख होते आणि त्यांनीच तशी ग्वाही दिलेली आहे. पुर्वी कधी नव्हे इतके यावेळचे सरकार प्रतिकाराच्या मानसिकतेमध्ये असल्याचे सांगत आहेत. तिकडे पाकिस्तानात थेट अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि युद्धाला तयार असल्याच्या गमजा चाललेल्या आहेत. भारताने युद्धाची भाषा केलेली नाही, की पाकिस्तानला संपवण्याची धमकी दिलेली नाही. मग पाक सरकार व सेनेला इतका उतावळेपणा करण्याचे कारण काय? हे भयभीत झाल्याचे लक्षण आहे. चोख उत्तर देऊ इतके बोलून गप्प होणारा मोदी काय करील, याच्या भितीने पाक नेते गडबडले आहेत. मंगळवारी पाकसेनेने तमाम सुट्टीवरच्या सैनिक व अधिकार्‍यांना तात्काळ आपल्या जागी हजर होण्याचे आदेश दिले. हे कशाचे लक्षण आहे? यातून युद्धाची भिती कोणाला आहे, त्याची कल्पना येऊ शकते. पाकिस्तान कशाला घाबरतो, ह्याची जाणिव असल्याखेरीज मोदी असे गप्प बसलेले नाहीत. त्यांनी स्वत:पुरते मौन घेतलेले नाही. पण पाकविषयात अन्य कुणा मंत्र्याने बोलू नये, असाही फ़तवा काढलेला आहे. भारताचे हे मौन पाकिस्तानला चिंतेत टाकणारे ठरले आहे. अमेरिका व अन्य देशांच्या नेत्यांना भेटून नवाज शरीफ़ कसली रदबदली करीत आहेत? ज्यांच्यापाशी अण्वस्त्रांचा रामबाण उपाय सज्ज आहे आणि वापरण्याची धमक आहे, त्यांना इतकी पळापळ करावी लागत असते काय?

आजवर पाकने सतत अण्वस्त्र वापरण्याचा धाक दाखवून भारताला हुलकावणी दिलेली आहे. पण यावेळी ती धमकी कामाची नाही, याची पुर्ण कल्पना असल्यानेच त्याची तारांबळ उडालेली आहे. चोख उत्तर म्हणजे युद्ध असे गृहीत धरून पाकिस्तान युद्ध टाळण्यासाठी धावपळ करतो आहे. कारण युद्धात आपण भारतासमोर टिकू शकत नाही, हे पाकिस्तान पुर्णपणे ओळखून आहे. पण त्याच्याही पुढे पाकची अण्वस्त्रांची धमकीही पोकळ असल्याचे आता जगानेही ओळखले आहे. म्हणूनच दरवेळी अशी स्थिती आल्यावर संघर्ष टाळा, असा सल्ला देणारे अन्य मोठे देशही तशा सल्ल्यापासून अलिप्त राहिले आहेत. तणाव कमी करा असेही अमेरिका, ब्रिटन, फ़्रान्स वा रशियाने भारताला वा पाकला समजावण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. पाक अण्वस्त्राचा वापर करण्याची भिती असती, तर तर या मोठ्या देशांनी त्यात हस्तक्षेप केला असता. पण तसे कोणी करीत नाही. कारण पाकची धमकी पोकळ असल्याचे जगातल्या मुत्सद्दी लोकांनी जाणले आहे आणि त्या धमकीच्या बळावर चाललेला जिहादी खेळ भारत संपवणार असेल तर जगालाही हवा आहे. तो करताना अणुयुद्ध पेटणार नसल्याची जगाला वाटणारी खात्रीच, या अलिप्ततेचे खरे कारण आहे. पाकिस्तान त्या अलिप्ततेनेच भयभीत झाला आहे. कारण अण्वस्त्रांना भारत घाबरणार नसेल, तर त्याला रोखणे आवाक्याबाहेरचे आहे याची पाकला पुर्ण कल्पना आहे. किंबहूना मोदी म्हणजे भारतीय शहाण्यांच्या मुठीतला पंतप्रधान नाही, हेच त्या भितीचे कारण आहे. आपले भारतातील बुद्धीमान हस्तक मोदींना युद्धापासून परावृत्त करू शकत नसल्यानेच पाक घाबरला आहे. मग ज्यांच्यावर आता पाकिस्तानचाही विश्वास उरलेला नाही, त्यांच्या शहाणपणावर आपण किती विश्वास ठेवणार आहोत? अशांसाठी आपला वेळ आणि उर्जा खर्च करणे सोडले, तरी मोठे राष्ट्रकार्य होऊ शकेल.

सिद्धूचा थिल्लरपणा

aawaz e punjab के लिए चित्र परिणाम

काही दिवसांपुर्वी भाजपातून राजिनामा देऊन बाहेर पडलेले माजी खासदार क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू याने आता पुन्हा गडबड केली आहे. महिनाभर आधी त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजिनामा दिलेला होता. मग त्यावरून राजकीय बातम्यांचे वादळ उठले. हा भाजपाचा नेता आम आदमी पक्षात जाणार अशाही वार्ता आल्या. पण पुढे काही झाले नाही. भाजपानेही त्यावर फ़ारशी मल्लीनाथी केली नाही. पुढे आणखी काही दिवस गेले. आरंभी केजरीवाल यांच्या पक्षाने सिद्धू आपल्याकडे येणार अशा बातम्यांना पुरक विधानेही केली होती. काही दिवसांनी केजरीवाल व सिद्धू यांची भेटही झाली, पण काही निष्पन्न झाले नाही. पंजाबच्या विधानसभा निवडणूकांचे खुप आधीपासून वेध लागलेले आहेत. लोकसभेत सर्वाधिक अनामत रकमा गमावण्याचा विक्रम करणार्‍या आप या पक्षाला अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. त्या चारही जागा पंजाबमधल्या होत्या. सहाजिकच पक्षाचे श्रेष्ठी असल्याप्रमाणे केजरीवाल वागत होते आणि आता तिथली जनता आपल्याच पक्षाला सत्तासुत्रे सोपवण्यासाठी उतावळी असल्यासारखी भाषा आपवाले बरळू लागले होते. त्यामुळेच केजरीवाल यांच्या गोटात सिद्धू गेल्यास बाकीच्या पक्षांची धुळधाण उडणार, असे चित्र रंगवले गेल्यास नवल नव्हते. पण सिद्धू आणि केजरीवाल समान स्वभावाचे असल्याने त्यांनी एकमेकांशी जुळवून घेण्याची गरज असली तरी अशक्य कोटीतले काम होते. झालेही तसेच! नुसत्या भेटीच्या पुढे काही झाले नाही. मग एकेदिवशी सिद्धू यांनी अन्य काही नेत्यांना हाताशी धरून ‘आवाज ए पंजाब’ अशा मंचाची घोषणा केली. त्याच माध्यमातून ते निवडणूका लढवणार अशाही बातम्या आल्या. मात्र आता महिना झाला नाही इतक्यात सिद्धूंनी पुन्हा आपली भूमिका बदलली आहे. आपण वेगळा पक्ष काढून मतविभागणीचे पाप करणार नाही, असे त्यांनी जाहिर केले आहे.

मुद्दा इतकाच आहे, की सिद्धू नेमके काय करणार आहेत? ते राजकारणात आले भाजपामुळे! वाजपेयी व अन्य लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी राजकारणात व भाजपात प्रवेश केला. अमृतसर येथून त्यांनी लोकसभा अनेकदा जिंकली. मात्र गेल्या खेपेस त्यांना पक्षाने तिथूनच उमेदवारी नाकारली. देशात अन्य कुठल्याही ठिकाणी भाजपा सिद्धूला उमेदवारी द्यायला तयार होता. पण ती नाकारून घरी बसणे सिद्धूने पसंत केले. कारण आपला हक्काचा मतदारसंघ अकाली दलाच्या दडपणाखाली पक्षानेच नाकारल्याचे शल्य होते. आरंभापासून सिद्धू आणि अकाली नेत्यांचे कधी पटले नाही. त्याची परमावधी गेल्या लोकसभेत झाली. दोन वर्षे त्याबद्दल मौन पाळून सिद्धू गप्प राहिला आणि आता विधानसभेचे पडघम वाजू लागल्यावर त्याने भूमिका घेतली. भाजपाने अकाली दलाशी युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूका लढवाव्यात, असा त्याचा आग्रह होता. पण पक्षाचे तितके संघटन नसल्याने भाजपा त्याला राजी नव्हता. म्हणूनच सिद्धूने खासदारकी सोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र इतका टोकाचा निर्णय घेताना त्याची कुठली योजना नव्हती, हे आता स्पष्ट झाले आहे. आधी त्याने आम आदमी पक्षात जाणार असल्याच्या अफ़वांचा इन्कार केला नव्हता आणि त्यांच्याशी बोलणीही केली. पण ती यशस्वी झाली नाहीत, तेव्हा अन्य काही नावाजलेल्या शिखांना हाताशी धरून चौथी आघाडी बनवण्याचा पवित्रा घेतला. त्याची वाजतगाजत घोषणाही करून टाकली. तिथे भाजपा व आम आदमी पक्षाची निंदाही यथेच्छ करून घेतली. आता दोन आठवडे होत नाहीत, इतक्यात चौथी आघाडी करून मतविभागणी करायची नाही, असे बोलण्याचा अर्थ काय? ती विभागणी त्याला पत्रकारांसमोर घोषणा करताना उमजलेली नव्हती काय? विनोदी कार्यक्रमात खदखदून हसणे आणि राजकारण यात मोठा फ़रक असतो, हे त्याचा कधी लक्षात येणार आहे?

पक्षाने म्हणजे भाजपा असो किंवा आम आदमी पक्ष असो, सिद्धूला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करून निवडणूकांना सामोरे जावे, अशी त्याची अपेक्षा होती. भाजपा त्याला तयार नव्हताच. पण केजरीवाल यांनाही सिद्धूच्या हाती पक्षाची सुत्रे देण्याची इच्छा नव्हती. म्हणूनच त्यांनी सिद्धूला पक्षात घेतानाच निवडणूक लढवायची नाही असली अट घातली होती. सिद्धूनेच पत्रकार परिषदेत त्याचा खुलासा केला. पण त्यातून सिद्धूच्या मनातली महत्वाकांक्षा तर समोर आली ना? इतके झाल्यावर मतविभागणी हे कारण पुढे करून पळ काढणे, लढवय्या म्हणवून घेणार्‍याला शोभणारे नाही. पण विषय त्याच्याही पुढला आहे. ज्या माणसाला आपल्या कुठल्याही एका भूमिकेवर दोन महिने ठाम उभे रहाता येत नाही, त्याच्यावर पंजाबची जनता कितपत विश्वास ठेवू शकेल? विविध कार्यक्रमात पल्लेदार वाक्ये फ़ेकून वा हशा पिकवण्याने लोकांच्या टाळ्या मिळवता येतात, मते मिळवता येत नाहीत,. सिद्धूच्या लौकरच हे लक्षात येईल. कारण सततच्या भूमिका बदलण्यात त्याने आपलीच प्रतिष्ठा रसातळाला नेवून ठेवली आहे. पंजाबमध्ये भाजपाने स्वबळावर निवडणूका लढवाव्यात ही अपेक्षा गैर मानता येत नाही. बंगाल केरळात भाजपा स्वबळावर उभा रहात असेल, तर पंजाबात तितकी हिंमत करायला काहीही हरकत नाही. पण एका प्रदेशात पक्षाने स्वबळावर लढायचे तर तिथे तळ ठोकून बसणारा नेताही आवश्यक असतो. सिद्धूसारखा नेता तळ ठोकून बसणारा नाही. आपल्या वाहिन्यांवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सतत प्रवास करणार्‍या व्यक्तीच्या बळावर कुठलाही पक्ष इतका मोठा पवित्रा घेऊ शकत नाही. कारण निवडणूका वा पक्ष संघटना निव्वळ श्रोत्यांना सुखावणार्‍या भाषणातून साध्य होत नसतात. त्याच्यासोबत जबाबदार्‍या येत असतात. त्यांची पुर्तता करण्यासाठी अनेक मोह सोडून झोकून द्यावे लागते. जी क्षमता सिद्धूमध्ये नाही, हे यातून सिद्ध झाले.

गर्दी जमवणार्‍या व्यक्ती वा श्रोत्यांना हसवणारी व्यक्ती एका समारंभापुरती महत्वाची असते. पण संघटना किंवा सत्ता ही पुर्णवेळ जबाबदारी आहे. सिद्धूमध्ये तितका संयम नाही. असता, तर त्याला अशी धरसोडवृत्ती दाखवण्याची वेळ आली नसती. मध्यंतरीच्या दोनतीन महिन्यात या माणसाने भाजपा, आम आदमी पक्ष यांना टांग मारलीच. पण कालपरवा आवाज ए पंजाब म्हणून ज्यांना सोबत घेतले होते, त्यांचे काय? सिद्धूसोबत पत्रकार परिषदेत हजेरी लावली, त्यांना आता शेकडो प्रश्न विचारले जातील. त्यांनी काय खुलासे करावेत? दोन आठवड्यापुर्वी कॉग्रेस अकाली दलाला आव्हान देण्याची भाषा बोलणारा आज अकस्मात पळपुटेपणा करणार असेल, तर लोक त्याच्याकडे किती गंभीरपणे बघतील? यापुढे सिद्धूचे राजकीय वा सामाजिक वक्तव्य देखील हास्यास्पद म्हणूनच बघितले जाईल. कारण पंजाब विधानसभेची निवडणूक अटितटीचा विषय आहे. त्यात भ्रष्टाचार व अनागोंदीचा विषय आहेच. पण मागल्या काही वर्षात तिथे अंमली पदार्थाच्या संकटाने धुमाकुळ घातलेला आहे. तिथे दुर्लक्ष होत राहिले म्हणुन प्रस्थापित पक्षांना नाकारून लोकसभेत आम आदमी पक्षाच्या नगण्य उमेदवारांना लोकांनी प्रतिसाद दिला होता. आज त्याही पक्षाचे नेते उथळपणा करीत आहेत आणि सिद्धू लढाईचा आव आणून पळ काढतो आहे. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. मग अशा कृत्यांना सिद्धूची गुगली वगैरे ठरवुन बातम्या दिल्या जातात. पण वास्तव इतकेच आहे, की हा निव्वळ विनोदवीर आहे. त्याला कुठल्याही विषयाचे गांभिर्य कळत नाही, की जगातील घडमोडीवर भाष्य करत असताना वापरलेले शब्दही त्याला कळत नसावेत. नुसती पाठ केलेली वचने वा शेरोशायरीची पोपटपंची, इतकेच त्याचे कर्तृत्व असल्याची साक्ष त्यानेच दिलेली आहे. त्याच्याच भाषेत बोलायचे तर गुरू हो जा शुरू, असा हा थिल्लरपणा आहे.

Wednesday, September 21, 2016

पाकिस्तान गुरगुरतोय का?

cpec route map के लिए चित्र परिणाम

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण बैठकीत नेहमीप्रमाणे काश्मिरचा राग आळवला. पण त्यांना कोणी ऐकून घेणारे नव्हते. जवळपास तमाम जगाने पाकिस्तानवर बहिष्कार घातल्यासारखी स्थिती आली आहे. यापुर्वी अझर मसुदला दहशतवादी ठरवण्याच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाला चिनने आक्षेप घेतला होता. आज तोच चिनही पाकिस्तानच्या बाजूने उभा रहायला बिचकतो आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो व शत्रूही नसतो. आपापले स्वार्थ बघूनच प्रत्येकाला त्या प्रसंगी भूमिका घ्याव्या लागत असतात. चिनचा स्वार्थ व्याप्त काश्मिर आणि बलुचिस्थानातून जाणार्‍या चिन-पाक महामार्गाशी संबंधित आहे. युद्धाची स्थिती आली तर तोच महामार्ग धोक्यात येतो आहे. मग चिनला त्यातून मिळणार काय? मैत्रीसाठी ४६ अब्ज डॉलर्सचे दिवाळे चिनला परवडणारे नाही आणि तसा इशारा चिनच्या जाणत्यांनीही दिलेला आहे. ‘ग्लोबल टाईम्स’ नावाचे एक इंग्रजी वर्तमानपत्र चिनी कम्युनिस्ट पक्षातर्फ़े चालविले जाते. त्यात अलिकडेच एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये तसा स्पष्टपणे इशाराच देण्यात आला आहे. चिनने आपली सगळी गुंतवणूक पाकिस्तानमध्ये करणे म्हणजे दिवाळखोरीला आमंत्रण आहे. म्हणूनच यापुढे त्या पाकिस्तानातील महामार्गावर आणखी एक डॉलर्सचीही गुंतवणूक आत्महत्या ठरेल, असा तो इशारा होता. ही बाजू लक्षात घेतली तर पाकिस्तानात सध्या इतकी अस्वस्थता कशामुळे आली आहे, ते लक्षात येऊ शकते. पाक युद्धाला सज्ज असल्याचे व अण्वस्त्रेही वापरण्याची धमकी कशाला देतो आहे, त्याचे रहस्य त्यातच दडलेले आहे. चिनही साथ सोडून जाण्याचे भय पाकला भेडसावते आहे. कारण चिन वगळता अन्य कुठल्याही देशाकडून सध्या पाकमध्ये गुंतवणूक होत नाही. शिवाय अमेरिकाही हात झटकू लागली आहे.

पाकने दिर्घकाळ जिहादी व दहशतवादी यांचा भारताच्या विरोधात धोरणात्मक वापर केला. पण त्यातून शिरजोर झालेले जिहादी आता पाकसेना किंवा सरकारलाही दाद देईनासे झाले आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर सेनेमध्ये इतकी जिहादी मानसिकता तयार झाली आहे, की राजधानी इस्लामाबादेत बसलेल्या नेते वा सेनाधिकार्‍यांना जिहादी जुमानत नाहीत. मात्र त्यांच्याकडून होणार्‍या कारवाया उचापतीची जबाबदारी पाकला उचलावी लागते आहे. त्यातून युद्ध झाले तर भारताचे किती नुकसान व खर्च होईल, त्याचे आकडे आपल्याकडचे पाकप्रेमी देत असतात. पण यात निव्वळ भारत-पाक यांचेच नुकसान होणार नाही. यात मोठे नुकसान होणारा तिसरा देश आहे चिन! दोन देशात युद्ध झाले तर होणारे हवाई हल्ले व धुमश्चक्री यांनी विध्वंस अर्थातच व्याप्त काश्मिरी, व बलुची प्रदेशासह किनारी भागात होणार आहे. ते हल्ले भारताने केले तरी ते चिनी प्रदेशात नसतील, तर पाकप्रदेशातलेच असतील. पण हे हल्ले ज्या प्रदेशात होतील, तिथे चिनचे ४६ अब्ज डॉलर्स गुंतलेले आहेत. तिथली नासधुस पाकिस्तानची हानी करणार असले, तरी मुलत: चिनच्या अब्जावधी गुंतवणूकीला मातीमोल करून टाकणार आहे. म्हणूनच भारताच्या पाकवरील हल्ल्याची जास्त भिती चिनला भेडसावते आहे. त्यासाठीच पाक सेनाप्रमुखांना चिनी नेत्यांना जास्त उत्तरे द्यावी लागत आहेत. बलुची वा पाक तालिबानांनी सतत चिनी कंत्राटदार व बांधकामांवर हल्ले केल्याने पाकसेनेला त्या कामाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र खडा पहारा द्यावा लागत आहे. ही सामान्य स्थिती असेल, तर युद्धामुळे किती भयंकर उत्पात घडू शकतात, याचा निव्वळ अंदाज केलेला बरा. पाकिस्तानसह म्हणूनच चिनची सध्या तारांबळ उडालेली आहे. परिणामी राष्ट्रसंघातही पाकच्या समर्थनाला उभे रहाणे चिनला अशक्य होत चालले आहे.

मात्र पाक नेते व सेनेची कोंडी वेगळी आहे. त्यांना जगाकडून लाथा खाव्या लागत आहेतच. पण भारताकडून उरीनंतर कुठली प्रतिक्रीया येणार; त्याचा अंदाजही येईनासा झाला आहे. भारत युद्ध पुकारणार की किरकोळ हल्ले करून थांबणार? याविषयी एकूणच भारताकडून मौन पाळले जात आहे. प्रारंभिक प्रतिक्रीया दिल्यानंतर भारताने कुठलीही उघड कृती केलेली नाही. पण लष्करी कारवायांचे अधिकारी यांनी योग्यवेळी जबाब दिला जाईल, असे मोघम विधान केलेले आहे. ही योग्य वेळ कुठली आणि उत्तर कोणते, याविषयी पाकिस्तानी नेते गोंधळात आहेत. त्यांनी भारत हल्ला करणार असे गृहीत धरून युद्धसज्जतेची तयारी सुरू केली आहे. सैनिकांची रजा रद्द करण्यात आली असून, मोक्याच्या सैनिकी तळांवरून सैनिकांच्या कुटुंबियांना आपापल्या घरी पिटाळून लावण्यात येते आहे. कराची वा इस्लामाबाद अशा महानगराकडे येणार्‍याजाणार्‍या रस्त्यांवरील वाहतुक नियंत्रित करण्यात आली आहे. पेशावर किंवा व्याप्त काश्मिरकडे होणारी वाहतुक देखरेखीखाली आणली गेली आहे. कुठल्याही क्षणी आक्रमण होण्याची शक्यता असलेले हे उपाय पाकिस्तान भयभीत असल्याचे लक्षण मानता येईल. ज्यांच्या तोंडी अण्वस्त्रांची भाषा मागली अनेक वर्षे चालू आहे, त्यांनी इतके अस्वस्थ होण्याचे कारण नाही. त्यांचे भय अन्य कारणासाठी असू शकते. भारतीय सेनेला तोंड देणे पाकला अशक्य नाही. पण पाकमधील असंतुष्ट लोक उत्पात घडवू लागले तर काय करायचे, ही खरी समस्या आहे. भारतीय काश्मिरात सेना व पोलिसांच्या विरोधात स्थानिक कुरापतखोर जे खेळ करतात, तसाच प्रकार पाकिस्तानात होण्याच्या भयाने सध्या पाकसेनेला पछाडले आहे. किंबहूना बलुची व मोहाजिर पाक नागरिक उलटण्याची भिती अधिक आहे. म्हणूनच आतल्या आत सुरक्षेची धावपळ सुरू असताना, उठसुट भारताला धडा शिकवण्याच्या गमजा चालू आहेत.

सार्वत्रिक युद्ध झाले तर जो पाकिस्तान आहे तो शिल्लक उरेल किंवा नाही, याचीच चिंता पाकला भेडसावते आहे. यापुर्वी इस्लाम वा धर्माच्या नावाने ज्या लोकसंख्येला खेळवलेले चिथावलेले आहे, त्यातले अनेक समाजघटक आता पाकनेत्यांच्या व पंजाबी वर्चस्वाच्या नाटकाला कंटाळले आहेत. त्यातूनच पाक आत्मविश्वास गमावून बसला आहे. मागल्या दोनतीन दशकात सिंधी, मोहाजिर, पख्तुनी व बलुचींवर सेनेकडून जे अत्याचार झालेत, त्यातून मुस्लिम म्हणून एकदिलाने पाकिस्तानी असलेली लोकसंख्या बारगळली आहे. ज्यांना चिनी महामार्ग नको आहे, त्यांनाही अशावेळी सुडाचा खेळ करायची संधी मिळणार आहे. म्हणूनच भारताने युद्धाचा पवित्रा घेतला, तर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आहे. तरीही अशी अरेरावीची भाषा करणेही भाग आहे. अमेरिकेने इराकवर किंवा अफ़गाणिस्तानवर आक्रमण केले, तेव्हाही तिथले सत्ताधीश अशीच भाषा बोलत होते. अमेरिकनांची कबर खोदू हीच भाषा होती. पण प्रत्यक्ष लढाईला तोंड फ़ुटले, तेव्हा एकही सैनिक लढायला मैदानात आला नाही. ती दहशत संपल्यावर अमेरिकेने सेना मागे घेऊन अफ़गाण वा इराकला त्यांच्या नशिबावर सोडले असते, तर अमेरिकेला इतके नुकसान सोसावे लागले नसते. भारताने बंगलादेश मुक्त केला आणि आपल्या सेना मागे घेतल्या होत्या. देशाचा कारभार तिथल्या नेत्यांच्या हाती सोपवला होता. तेच अमेरिकेने करायला हवे होते. तिथे लोकशाही रुजवण्य़ाचा आगावूपणा अमेरिकेला नडला. भारताने बांगलादेशात ते केले नाही. उद्या बलुचिस्थानातही करण्याची गरज नाही. आताची लढाई बांगलादेश युद्धाची पुनरावृत्ती असेल, याची जाणिव असल्यानेच पाक गुरगुरतो आहे. कारण तो भयभीत झाला आहे. सापळ्यात फ़सलेल्या सिंहाने गुरगुरावे त्यापेक्षा पाकिस्तानची भाषा अजिबात वेगळी नाही.

इतिहास असा घडवला जातो

lalkila modi के लिए चित्र परिणाम

सध्या अमेरिकेत निवडणूकीची धामधुम चालू आहे. डोनाल्ड ट्रंप नावाचा रिपब्लिकन उमेदवार आपल्या चमत्कारीक वाटणार्‍या वक्तव्यांनी सर्वांना थक्क करून सोडतो आहे. तिथल्या राजकीय पंडितांनाही त्याने विचलीत केले आहे. परंतु असे प्रथमच घडलेले नाही. ३६ वर्षापुर्वी असाच एक धश्चोट वाटणारा उमेदवार मैदानात उतरला होता आणि राजकीय पंडितांना त्याने चक्रावून सोडलेले होते. कारण तो पुस्तकी राजकारणी नव्हता, की राजकीय पंडितही नव्हता. हॉलिवुडच्या देमार चित्रपटातली कारकिर्द गाजवून निवृत्त झाल्यावर राजकारणात शिरलेल्या त्या काऊबॉय हिरोविषयी म्हणूनच सुबुद्ध वर्गात हेटाळणीची भावना होती. पण त्यालाही अशा बुद्धीमंतांची फ़िकीर नव्हती, की त्यांच्या मतांची मर्वा नव्हती. त्याचे नाव रोनाल्ड रेगन होते. अखेर तोच दोनदा निवडूनही आला होता. आठ वर्षे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याने कारभारही चालविला होता. आजच्या ट्रंप प्रमाणेच तो उमेदवार असताना त्याला तात्कालीन राजकीय पंडितांनी घेरले व अनेक प्रश्नांची सरबत्ती केलेली होती. त्यातला एक प्रश्न होता, रेगन यांचे सोवियत विषयक धोरण कसे असेल? रेगन यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले होते. धोरण सोपे नि सरळ आहे. आपण जिंकलो पाहिजे आणि सोवियत हरले पाहिजेत. मग हसत हसत पंडितांनी त्याला उलट विचारले, पण ते हरणार वा आपण जिंकणार कसे? त्याचे डावपेच व रणनिती काय असेल? तर रेगन उत्तरले होते, ही रणनिती डावपेच वगैरे तुम्हा बुद्धीमंतांची डोकेदुखी असते. तुम्ही ते शोधून काढायचे असते. तुम्ही शोधलेल्या दहा पर्यायातून एकाची निवड करणे, हे माझे म्हणजे अध्यक्षाचे काम असेल. शोधणे हे माझे काम नाही. अर्थात तो उमेदवार त्या विचारवंत अभ्यासकांना माथेफ़िरू वाटला होता. पण वास्तवात त्याचे शब्द खरे ठरले होते. कारण त्याच अध्यक्षाच्या कारकिर्दीत सोवियत युनियनचा र्‍हास झाला होता.

नंतर जवळपास आठ वर्षांनी रेगन यांची दुसरी कारकिर्द संपत आलेली होती आणि पुन्हा अध्यक्षिय निवडणूक दार ठोठावत होती. अशावेळी सोवियत युनियनची सुत्रे मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या हाती आली होती. त्यांनी त्या कम्युनिस्ट जगात लोकशाही रुजवण्याचा पवित्रा घेतला आणि क्रमाक्रमाने सोवियत राजकारणाची युरोपिय पकड ढिली पडत जाऊ लागली होती. अशावेळी रेगन व गोर्बाचेव्ह यांचा एक संयुक्त समारंभ बर्लिन येथे व्हायचा होता. त्यात रेगन यांचे भाषण कसे असावे, याचीही तयारी चालली होती. अनेक चर्चा व मसुदे तयार झालेले होते. पण ऐनवेळी त्यांनी काय बोलावे, त्याचा अंतिम मसूदा बनवला गेला. त्यातल्या एका वाक्यावरून बरेच काहुर माजले होते. लोकशाहीच आणायची आणि जागतिक शांतता हवी असेल तर ‘मिस्टर गोर्बाचेव्ह ती बर्लिनची भिंत पाडून टाका’, असे एक वाक्य त्यात होते. ते तसेच ठेवावे की सध्या तसे बोलू नये, यावरून रेगन यांच्या मुत्सद्दी सहाय्यकांमध्ये कित्येक तास वादविवाद झाले. अखेरीस शेवटचा क्षण आला, तेव्हा ते वाक्य असू द्यावे म्हणजे रेगन यांनी बोलावे, असा बहुमताने निर्णय झाला. रेगन तावातावाने तसे बोललेही. त्याला खुप प्रसिद्धी सुद्धा मिळाली. मात्र त्यामागे किती वादविवाद झाला, त्याची कोणाला कल्पनाही नव्हती. पण पुढला घटनाक्रम असा घडत गेला, की तेच वाक्य ऐतिहासिक होऊन गेले. कारण अवघ्या काही महिन्यात खरोखरच ती बर्लिनची भिंत पडली वा पाडली गेली. त्याबरोबरच सोवियत म्हणून जो पोलादी पडदा पुर्व युरोपवर पसरलेला होता, तोही उठवला गेला. अनेक पुर्व युरोपिय देशात उठाव झाले, सत्तांतरे झाली व क्रांतीही होत गेली. पण खुप उशिरा त्या वाक्याचे रहस्य उलगडले गेले. ते उत्स्फ़ुर्तपणे रेगन यांनी बोललेले वाक्य नव्हते. तर त्यामागे काही डावपेच व रणनिती सुद्धा होती. मात्र त्यावर तेव्हा भाष्य करणार्‍यांना त्याचा थांगपत्ताही नव्हता.

त्या सर्व घडामोडींचा साक्षिदार असलेला मायकेल मायर याने पुढल्या काळात ते सर्व अनुभव लिखित स्वरुपात पुस्तकात मांडले. त्यातून बुद्धीमंत वा राजकीय अभ्यासक वास्तवाशी किती अनभिज्ञ व अजाण असतात त्याची साक्ष मिळते. कारण मायर तेव्हा त्याच पुर्व युरोपात पत्रकार म्हणून वावरत होता आणि त्याने लिहून पाठवलेले अनुभव किंवा प्रत्यक्ष घटनांची वार्तापत्रे त्याच्या अमेरिकेत बसलेल्या संपादकांना अविश्वसनीय वाटल्याने छापलीही जात नव्हती. कारण मायर आपल्या डोळ्यांनी सोवियत युनियन कोसळताना बघत होता. पण तिथून मैलोगणती दुर बसलेल्यांना मात्र त्याची वार्तापत्रे कल्पनारंजन वाटत होते. त्यांच्या कल्पनेत असलेले सोवियत युनियन फ़ुटणार नाही, ही समजूत त्यांना वास्तव समजून घ्यायला देत नव्हती. शिवाय रेगन यांचे ते ऐतिहासिक वाक्य इतके खरे ठरेल, हेच अशा जाणत्यांना मान्य करायची हिंमत होत नव्हती. पण मुळातच असे वाक्य रेगन गंमत म्हणून बोलले नव्हते. त्यांच्या धोरणकर्ते व मुत्सद्दी सहकार्‍यांनी योजलेले डावपेच व रणनितीनुसारच तसे वक्तव्य अध्यक्षांनी केलेले होते. त्याला पुरक अशा कारवायाही अमेरिकन यंत्रणेकडून चालू होत्या. पुढल्या घटना त्याचा परिपाक होता. त्या आपोआप घडत नव्हत्या. तर तशी सुत्रे हलवण्यातून त्या घटनांना वेग आणला जात होता. मुळात असे वाक्य राष्ट्रप्रमुख उत्स्फ़ुर्तपणे बोलत नसतात, की गंमत म्हणून बोलले जात नाही. त्यामागे काही योजना व अपेक्षा असतात. हेतू असतात. तसे काही नसेल तर आकर्षक म्हणून कोणी राष्ट्रप्रमुख असे काही बोलू शकत नाही. रेगनही बोलले नव्हते, की कालपरवा पंतप्रधान मोदीही बलुचिस्तानबद्दल गंमत म्हणून काही बोललेले नाहीत. आपल्या तिसर्‍या लालकिल्ला भाषणात मोदींनी तो विषय जाणिवपुर्वक उच्चारला आहे आणि म्हणूनच जगभर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

आज जगात सगळ्या देशात पाकिस्तानी नाराज बलुची वा असंतुष्ट पाकिस्तानी गट जाऊन वसलेले आहेत. त्यांनी रस्त्यावर येऊन नरेंद्र मोदी यांचा जयजयकार सुरू केला आहे. तो कुणा व्यक्तीचा नसून भारताच्या पंतप्रधानाचा गुणगौरव आहे. भारत आपल्या पाठीशी उभा असल्याचा त्यांना मोदींनी राष्ट्रीय भाषणातून दिलेला शब्द, ही गंमत नाही. ती एक मुत्सद्दी चाल अहे. उठसुट कुठल्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मिरचा विषय काढून भारताला डिवचणार्‍या पाकिस्तानला शह देण्यासाठी खेळलेली ती धुर्त चाल आहे. काश्मिरी लोकांना भारताने चिरडून काढले आहे. जबरदस्तीने भारतात बंदिस्त करून ठेवलेले आहे. अन्यथा सार्वमत घेतल्यास काश्मिरी जनता पाकिस्तानात समाविष्ट व्हायला उतावळी आहे, असे चित्र पाकिस्तान नेहमी रंगवत आलेला आहे. पण त्यासाठी काश्मिरी जनतेला सार्वमताची संधीच द्यायची तर बाकीच्या पाकिस्तानी लोकांनाही तसा अधिकार द्यावा. मग किती प्रदेश व प्रांत पाकिस्तानात शिल्लक उरतील? पंजाबी वर्चस्वाने पाकिस्तानातले विविध घटक सतत चिरडले गेले आहेत आणि त्यातूनच असंतोष पोसला गेलेला आहे. तो चिरडून काढताना अनेक असंतुष्ट नेत्यांनी परदेशी जाऊन आश्रय घेतला आहे. जे पाकिस्तानात सापडतील त्यांना ठार मारले जाते. पण कोणीही त्याबद्दल आवाज उठवत नाही, की पाक असंतुष्टांना मदतीचा हात देत नाही. सहानुभूतीचा लवलेश कुठून अनुभवास येत नाही. तेच काम जगातला पहिला राष्ट्रीय नेता म्हणून मोदींनी परवाच्या भाषणात केले. पण त्याचा जगभर परिणाम दिसावा, म्हणून मागली दोन वर्षे पुरेशी तयारी केलेली होती. विविध पाकिस्तानी असंतुष्ट गटांमध्ये समन्वय घडवून आणल्यावरच हे निर्णायक वाक्य मोदी बोलले आणि आता जगभर काहूर माजले आहे. प्रत्येक युरोपियन देशात अमेरिकेत बलुची व पाक असंतुष्ट रस्त्यावर आले आहेत. मोदींचा जयजयकार करीत आहेत आणि त्यातून पाकिस्तानात चलबिचल निर्माण करायला हातभार लागला आहे. भविष्यात या वाक्याचा परिणाम काय झाला ते इतिहासच सांगेल.

Tuesday, September 20, 2016

बुडत्याचा पाय खोलात!

rahul cartoon के लिए चित्र परिणाम

माणसाला यशाची नशा असते, तशीच अपयशाची जबाबदारी नको असते. मग आपल्या अपयशाचे मूल्यमापन कसे शक्य आहे? यशाचे बाप अनेक असतात आणि अयपश अनौरस असते, असे म्हणूनच म्हटले जाते. पण यश मिळाले तरी त्याचे विश्लेषण आवश्यक असते. कारण आपल्या यशाला खरेच आपले कर्तृत्व जबाबदार आहे, की अन्य कुणाच्या अपयशाचा परिणाम म्हणून आपण यशस्वी झाल्याचे दिसते आहे, त्याकडे निरपेक्षपणे बघणे म्हणून गरजेचे असते. अन्यथा यशही आपल्याला गाफ़ील ठेवून पुढल्या अपयशाची बेगमी करीत असते. यशाची नशा इतकी और असते, की वास्तवाचे भान येऊ देत नाही. २००९ साली कॉग्रेसप्रणित युपीएला दुसर्‍यांदा सत्ता मिळाली, तेव्हा त्या पक्षाला बहूमतही मिळाले नव्हते. पण समोर प्रतिस्पर्धी भक्कम नसल्याने त्यांना पुन्हा सत्ता मिळाली होती. विरोधकांचे अपयश हे राहुल सोनियांनी आपले यश मानले. त्यामुळे त्यांनी कधी यशाचे मूल्यमापन केलेले नव्हते, तिथेच त्यांच्या भविष्यातील अपयशाचा पाया घातला गेला होता. ज्यावर भाजपाचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले. पण ते अच्छे दिन मोदींच्या आक्रमक नेतृत्वामुळे आले होते. भाजपाची लोकप्रियता त्यामागे नव्हती. मात्र प्रत्येक भाजपावाला अशा मस्तीत बोलू वागू लागला, की मोदींना याच भाजपवाल्यांनी पंतप्रधानपदी बसवले आणि त्यात मोदींचे काहीही कर्तृत्व नसावे. वास्तवात मोदींची प्रतिमा आणि कॉग्रेसची नालायकी यातून भाजपा सत्तेपर्यंत पोहोचला. मात्र २००९ च्या यशाच्या नशेतून कॉग्रेस २०१४ च्या पराभवानंतरही बाहेर पडू शकलेली नाही. उलट आपले अपयश झाकण्यासाठी सोपी उत्तरे शोधली गेली. त्यापैकी एक होते भाजपाने, मोदींनी मार्केटींग करून मतदाराला भुलवले. अन्यथा कॉग्रेसचा पराभव झाला नसता. हेच कारण आता अरुणाचलच्या शोकांतिकेचे सुद्धा आहे.

मोदींनी आपल्या प्रचार मोहिमेत ‘कॉग्रेसमुक्त भारत’ ही शब्दावली वापरली. त्यामुळेच नंतरच्या काळात केंद्रातील सत्ता व राज्यपालांना वापरून राज्यातील कॉग्रेसची सरकारे पाडली जात असल्याचा आरोप होत राहिला. पण त्यात किती तथ्य होते? उत्तराखंड असो किंवा अरुणाचलची घडामोड असो. तिथे कॉग्रेस पक्षातीलच आमदार आपल्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात बंड करून उभे ठाकले होते. अशावेळी पक्षश्रेष्ठी म्हणून मिरवणार्‍यांनी पुढाकार घेऊन दोन्ही गटांना समोरासमोर बसवायचे असते. त्यांच्यातला बेबनाव कमी करून, त्यांना एकत्र नांदण्यास भाग पाडायचे असते. पण श्रेष्ठींना फ़क्त जागोजागी पाया पडणारे अनुयायी हवे असतील, तर मध्यस्थीचे काम कोणी करायचे? आसाममध्ये लोकसभा पराभवानंतर हीच पाळी आली. तेव्हा मुख्यमंत्र्याच्या विरोधात बंड पुकारणारे श्रेष्ठींना वारंवार भेटत राहिले. पण शिष्टमंडळाचे काही ऐकून घेण्यापेक्षा राहुल घरातल्या कुत्र्याशी खेळत बसायचे. त्यामुळे कंटाळलेला एक ज्येष्ठ मंत्री पक्ष सोडून भाजपात दाखल झाला व त्याने आसाममधून कॉग्रेस संपवण्याचा चंग बांधला. निवडणूकांनी ते साध्यही केले. हे पाप भाजपाने नव्हेतर पक्षश्रेष्ठी होऊन बसलेल्या राहुल गांधी यांचे होते. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात. पण राहुल गांधी हे पक्षासाठी आधाराची काडीही होऊ शकलेले नाहीत. उलट कॉग्रेससाठी राहुल हा उपाध्यक्ष म्हणजे बुडत्याच्या गळ्यातला धोंडा झाल्याचे परिणाम पक्षाला आसामामध्ये भोगावे लागले. तीच गोष्ट उत्तराखंड वा अरुणाचल राज्यांची होती. राहुल गांधींच्या अशा वागण्याने कंटाळलेले रागावलेले आमदार भाजपाच्या नादी लागले, तर त्याचे खापर कोणाच्या माथी मारायचे? भाजपाच्या माथी फ़ोडल्याने नुकसान कोणाचे होणार, याचा तरी विचार कॉग्रेसमधल्या इतरेजनांनी करायला नको काय? तो केला असता तर आज अरुणाचल प्रकरणात तोंडघशी पडायची वेळ आली नसती.

मुळात नाबाम तुकी या मुख्यमंत्र्याला बदलावे म्हणून तिथल्या अर्ध्याहून अधिक आमदारांनी श्रेष्ठींना साकडे घातले होते. तेच उत्तराखंडातही झाले होते. राहुलनी त्यात लक्ष घालून समजुत काढली असती वा नेतृत्व बदल केला असता, तर पुढली बंडखोरी होऊच शकली नसती. त्यात हस्तक्षेप करण्याची संधी भाजपा किवा राज्यपालांना मिळू शकली नसती. म्हणजेच मुळात मुर्खपणा राहुल गांधी यांनी केला. त्यातून घटनात्मक पेचप्रसंग उभे राहिले. त्याला कायदेशीर वा न्यायालयीन आश्रय मिळाला. म्हणून सत्य बदलत नव्हते. ह्यात भाजपा गुन्हेगार नव्हता, तर राहुल सोनियांच्या पापामुळेच ही दुर्दशा कॉग्रेसच्या नशिबी आलेली होती. त्यावर अरुणाचलात नियमांवर बोट ठेवून कोर्टाने कॉग्रेसच्या नाबाम तुकी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवले. पण त्यांच्यामागे बहूमत नव्हते. म्हणून त्यांनी बहूमत सिद्ध करण्याऐवजी अखेरच्या दिवशी राजिनामा देऊन प्रेमा खांडू नावाचा नवा मुख्यमंत्री आणला गेला. पुन्हा कॉग्रेसचा मुख्यमंत्री सत्तेवर बसला म्हणून सुखावलेले तमाम पुरोगामी पत्रकार अभ्यासक मग यथेच्छ भाजपाला धारेवर धरू लागले. मोदी सरकारची निर्भत्सना करू लागले. पण कोणालाही वास्तवाचे तोंड बघण्याची गरज वाटली नाही. यातून माध्यमे व अन्य हौशी लोकांची भाजपाला झोडण्याची हौस जरूर भागली. पण कॉग्रेसला हौस म्हणून भाजपाला झोडून काय मिळाले? परिणाम विचारवंतांना भोगावे लागणार नव्हते, तर कॉग्रेसला भोगावे लागणार होते. झालेही तसेच. कारण दोन महिन्यातच उरलासुरला कॉग्रेस पक्षही अरुणाचलातून नामशेष झाला आहे. कायदेशीर लढाई कॉग्रेसने जिंकली होती आणि कायदेशीर पळवाट काढून त्यांच्याच बंडखोरांनी सोनिया राहुलचे नाक कापलेले आहे. कारण हीच दोन माणसे आज कॉग्रेससाठी सर्वाधिक मोठी समस्या आहेत आणि बिचारे कॉग्रेसजन त्यांच्याकडेच उपाय म्हणून आशाळभूत नजरेने बघत बसले आहेत.

कोर्टात नाबाम तुकी यांच्या तांत्रिक विजय झाला होता. त्यांना कोर्टाने पुन्हा मुख्यमंत्री केलेले नव्हते, तर बहूमत त्यांच्याच पाठीशी असल्याचे सिद्ध करण्याची संधी दिलेली होती. म्हणून मग त्यांना बदलून प्रेमा खांडू यांना नेतृत्व देण्याच्या बदल्यात बंडखोरांना पक्षात परत आणले गेले. हेच काम जानेवारी महिन्यात राहुल सोनियांनी थोडे लक्ष घालून केले असते, तर बंडखोरी झाली नसती, की कोर्टात जावे लागले नसते. ते काम ज्यांनी केले नाही, त्यांना अरुणाचलची फ़िकीर नव्हती की कॉग्रेस पक्षाच्या भवितव्याची काळजी नव्हती. अशा बेफ़िकीर लोकांना जर कॉग्रेसश्रेष्ठी वा पक्षाचे तारणहार मानले जाते. मग त्या पक्षाला संपवायला भाजपाने वा मोदींनी अधिक काही करण्याची गरज उरत नाही. झालेही तसेच आहे. अपेक्षेप्रमाणे अरुणाचल कॉग्रेसने गमावला आहे आणि त्यासाठी भाजपाला काहीही करावे लागलेले नाही. कोर्टाने कॉग्रेस मुख्यमंत्र्याला पुन्हा संधी देण्याचा निर्णय दिल्यानंतर एकदाही राहुल त्या राज्याकडे फ़िरकले नाहीत, की कोणी वरीष्ठ नेता तिकडे दखल घ्यायला गेला नाही. आता त्या आधीच्या बंडखोरांनी उरल्यासुरल्या कॉग्रेस आमदारांना घेऊन पक्षांतर केले आहे. पक्षात वा अरुणाचल विधानसभेत कॉग्रेसचे ४४ आमदार होते. त्यापैकी आता एकटा आमदार उरला आहे. त्याचे नाव नाबाम तुकी असून त्यालाच कोर्टाने पुन्हा मुख्यमंत्री म्हणून ‘न्याय’ दिला होता. त्यातून कोर्टानेच भाजपाला धडा शिकवला असे पांडित्य सांगणार्‍या अभ्यासक पत्रकारांची अक्कल मात्र चव्हाट्यावर आली. कारण धडा भाजपाला नव्हता, तर कॉग्रेसला मिळालेला होता. कॉग्रेसला तो धडा अशा अर्धवट अभ्यासक जाणकारांनी शिकू दिला नाही. मग काय व्हायचे? बुडत्याचा पाय खोलात म्हणतात, तशी एका आणखी राज्यातून कॉग्रेसच नामशेष झाली आहे. राहुल असल्याचे उरलीसुरली कॉग्रेस बुडवण्यासाठी मोदींनी काही करण्याची गरज आहे काय?

रोजनिशी  दै. जनशक्ति