Friday, September 23, 2016

भारतीय कमांडो घुसले?


LOC के लिए चित्र परिणाम
मुत्सद्देगिरी हा गावगप्पांचा विषय नाही. तिथे बोलले खुप जाते, पण सांगितले काही जात नाही. त्यात नेहमी आपल्या गोटातले काहीही न सांगता पलिकडल्या गोटातली माहिती काढण्याचे उद्योग चालतात. तीच काहीशी लष्करी रणनितीची गोष्ट असते. लढाईची रणनिती कधी उघड केली जात नाही. किंबहूना अनेकदा केलेली कृतीदेखील जाहिरपणे सांगितली जात नाही. लोकांच्या नजरेत त्याचे परिणाम येतात, तेव्हा त्याचा गवगवा होत असतो. म्हणूनच उरी येथील लष्करी तळावर जिहादी हल्ला झाल्यावर भारताने त्याला चोख उत्तर द्यावे, ही अपेक्षा गैर नाही. पण असे चोख उत्तर कोणते व कधी देणार; हे पत्रकार परिषदेत कोणी सांगणार नाही. अशा कारवाया आकस्मिक व परिणामकारक असतात. म्हणूनच त्यातली वेळ शत्रूला गाफ़ील गाठण्याची असते. कृती वा वेळ दोन्ही शत्रूचा गोंधळ उडवून देणारीच असावी लागते. शिवाय अशा कारवाया बातमी वा प्रसिद्धीसाठी नसतात. जिहादी वा घातपाती कारवाया आणि लष्करी उत्तर, यात हा फ़रक असतो. जिहादी वा घातपात्यांना शत्रूचे नुकसान करण्यापेक्षा त्यातून अधिकाधिक प्रसिद्धी मिळवायची असते. शत्रूला त्यातून दुबळा ठरवण्याचे लक्ष्य साधायचे असते. लष्कराची गोष्ट वेगळी असते. सेनादलाला कधीही आपल्या कृत्यांसाठी प्रसिद्धी नको असते, तर शत्रूला नामोहरम करण्याला प्राधान्य असते. म्हणूनच उरीनंतर पाकला धडा शिकवायचा असेल, तर त्यासाठीच्या कारवाईचा गाजावाजा होऊन चालणार नाही. शिवाय अशी कारवाई युद्धाकडे घेऊन जाणारी असेल तरी परिणामांचा विचार करावा लागतो. नुसतेच उत्तर द्यायचे असेल तर युद्धापर्यंत पाळी येऊ नये, अशीही काळजी घ्यावी लागते. म्हणूनच त्याबद्दल जाहिर वाच्यता केली जात नाही. किंबहूना केलेल्या कात्रवाईचेही मौन पाळले जाते. म्हणूनच सध्या काय होत आहे, त्याकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे.

मंगळवारी सकाळी उजाडल्यापासून उरी क्षेत्रातच भारतीय सेनादलाने आणखी एक जिहादी घुसखोरांचा दस्ता अडवला आणि त्यातील दहा बारा लोकांना ठार मारल्याची बातमी वाहिन्यांवर झळकत होती. संध्याकाळपर्यंत तीच बातमी रंगवून कथन केली जात होती. पण त्या कारवाईचे कुठलेही चित्र वा दृष्य़ वाहिन्यांनी दाखवलेले नव्हते. डोंगराच्या दिशेने जाणारा एक ओसाड रस्ता आणि त्यावर काटेरी तार, इतकेच दिसत होते. पुढे चकमक चालू असल्याचे वार्ताहर सांगत होते. पण पुढे तर उंच डोंगर होता आणि तिथे कुठेतरी चकमक चालू असल्याचे सांगितले गेले. मंगळवारी रात्री त्या बातमीचा सगळ्यांना विसर पडला आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ राष्ट्रसंघाच्या आमसभेत काय बोलणार, यावरच गदारोळ सुरू झाला. पण सकाळी उरी क्षेत्रात झालेल्या नव्या चकमकीसह त्यात मारल्या गेलेल्या दहाबारा अतिरेक्यांचा विषय सर्वांनीच सोडून दिला. त्यांच्यापाशी काय साहित्य सापडले, किंवा कोणते पुरावे त्यांना पाकिस्तानी घुसखोर ठरवू शकतात, याचा कुठलाही उहापोह नंतर झाला नाही. आजही पुन्हा रविवारी उरी तळावर आलेल्या व मारल्या गेलेल्या चार जिहादींचेच सामान पुरावे म्हणून दाखवले जात आहे. मग मंगळवारी तिथून जवळच मारले गेले त्या दहाबारा अतिरेक्यांचे काय? खरेच अशी चकमक झाली किंवा नाही, याचाही खुलासा होऊ शकलेला नाही. पण त्याच दरम्यान व्याप्त काश्मिरातील पाकसेनेची तारांबळ नजरेत भरणारी होती. अकस्मात व्याप्त काश्मिरातील पाकचे हवाईतळ आणि तिथून होणारी सर्व विमान उड्डाणे रद्द करणारे आदेश जारी करण्यात आले. कुठल्याही नागरी वा लष्करी विमानांना उड्डाणाला अशी बंदी कशाला करण्यात आलेली होती? पाक वाहिन्यांवरही त्या विषयाची चर्चा सुरू झालेली होती. पाकच्या सोशल मीडियात तशी घबराटही पसरली आणि भारतीय हल्ल्याच्या भयाने हा निर्णय झाल्याचे सांगितले गेले.

दरम्यान भारत सरकारतर्फ़े चोख उत्तर आणि मुत्सद्देगिरीचा खेळ सुरू होता. वाहिन्यांवर येणारे माजी भारतीय सेनाधिकारी मात्र सरकार प्रथमच आक्रमक होत असल्याचे ठामपणे सांगत होते. म्हणजेच यावेळी नुसत्या निषेधावर भागणार नाही. पाकला धडा शिकवला जाईल, अशी खात्री वरीष्ठ माजी सेनाधिकार्‍यांना वाटण्याचे काही कारण असू शकते. निवृत्त झालेल्या अशा अधिकार्‍यांचा सेनेच्या गोटातल्या हालचालींशी संबंध येतच असतो. तिथे काही हालचाली सुरू असल्याचा सुगावा असल्याने हे अधिकारी बोलत असणार. त्यात अनेक प्रस्ताव सुचवले जात होते. थेट व्याप्त काश्मिरात घुसून कारवाई करण्यापासून नेमके हवाई हल्ले करण्यापर्यंत अनेक पर्याय भारतीय माध्यमातून चर्चिले जात होते. पण तशा गोष्टी सांगणारे हे जुने अनुभवी निवृत्त अधिकारी कुठल्याही डावपेचांची खुली चर्चा करायला नकार देत होते. शत्रूला तुमची सज्जता कळू नये आणि त्यातली गोपनीयता संपू नये हेच त्याचे कारण असते. पण युद्धाशिवाय खुप पर्याय असतात याची ग्वाही हे अधिकारी देत राहिले. किंबहूना चकमक व संघर्ष पुर्ण युद्धात परावर्तित व्हायला खुप टप्पे असतात. संघर्ष बळावत जाणारी एक शिडीच असते. त्यातली एक एक पायरी चढतच युद्धापर्यंत मजल मारली जाते. म्हणूनच चोख उत्तर म्हणजे युद्ध नव्हे. तर धडा शिकवणे असाही पर्याय या अधिकार्‍यांनी सांगितला होता. लढाईच्या धमक्या देणे वेगळे आणि प्रत्यक्ष युद्धात उतरणे वेगळे! ज्याची हिंमत व सज्जता असते तो धमक्या देत नाही. उथळ पाण्याचा खळखळाट फ़ार असे म्हणतात आणि संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी पाकची तशीच संभावना केली. त्यामुळे अणुयुद्ध व अण्वस्त्र हल्ला यांना घाबरण्याचे दिवस संपले असा इशारा दिला गेला होता. तशी कारवाई मग पाकला अपेक्षित असली तर नवल नाही. पण कोणती व कुठून हल्ला येणार ही अनिश्चीत बाब भितीदायक असते.

अशा गनिमी लढाईत शत्रूला गाफ़ील पकडणे आणि त्याचा गोंधळ उडवून देण्याला प्राधान्य असते. मंगळवारी पुन्हा उरीजवळच नियंत्रण रेषेपाशी घुसखोरी झाल्याच्या व चकमक झडल्याच्या बातम्या खर्‍या होत्या की गोंधळ उडवून देण्यासाठी होत्या? जेव्हा अशा चकमकी होतात तेव्हा दोन्ही बाजूंनी सीमापार गोळीबार, तोफ़ांचा मारा सुरू होत असतो. जेव्हा अशी चकमक एका जागी झडते, तेव्हा तिथे संपुर्ण लक्ष केंदित होते. सहाजिकच अन्य आघाड्यांकडे दुर्लक्ष व शिथीलता येत असते. त्याचाच फ़ायदा घेऊन तिथून जबरदस्त हल्ला करण्याची संधी उपलब्ध होत असते. मंगळवारी पहाटेपासून चकमकीचा आभास निर्माण करून अन्यत्र भारतीय कमांडोंनी नियंत्रण रेषा पार केली आणि थेट जिहादी छावण्यांवर हल्ला केला होता काय? हेलिकॉप्टरने अशी सीमा ओलांडल्यास त्याचा सुगावा हवाईतळांना लागतो. त्यामुळे पाकने आपल्या प्रदेशातील सर्व हवाई उड्डाणे रद्द करण्याचा सावधान उपाय योजला. पण येणारा हल्ला हवाई असण्यापेक्षा छापा घातल्यासारखा कमांडो पथकाचा असल्याची सर्व माहिती मिळायला काही अवधी जाणारच. तेवढ्यात कमांडो कार्यभाग उरकून माघारी परतू शकतात. ओसामाचे वास्तव्य पाकसेनेच्या तळालगत होते. तरीही त्या कमांडो पथकाला तासभर अवधी मिळाला होता आणि पाकसेना त्यांना रोखण्यात वा पाठलाग करण्यातही तोकडी पडली होती, ही बाब लक्षात घेतली, तर नियंत्रण रेषा पार करून काम उरकणार्‍या भारतीय कमांडोंना पाक रोखू शकत नाही हे उघड आहे. मग मंगळवारी तशी कारवाई भारतीय सेनेने उरकून घेतली काय? तशा अफ़वाही पसरल्या आहेत. पण कोणी त्याला दुजोरा देत नाही की माध्यमातही तशी बातमी नाही. भारतावर आरोप करण्याची संधी असूनही पाकिस्तान त्यावर मौन कशाला धारण करून बसला आहे? भारत सरकार त्याचे श्रेय घ्यायला पुढे का आलेले नाही? (अपुर्ण)

4 comments:

 1. भाऊ भारतीय सेनेच्या फेसबुक पेजवर १० किमीखोलवर pok त घुसुन कार्यवाही केल्याची पोस्ट आहे

  ReplyDelete
 2. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 3. Replies
  1. In Hindi "Bhartiya Army" near about 22,25,000 like's

   Delete