Tuesday, September 20, 2016

बुडत्याचा पाय खोलात!

rahul cartoon के लिए चित्र परिणाम

माणसाला यशाची नशा असते, तशीच अपयशाची जबाबदारी नको असते. मग आपल्या अपयशाचे मूल्यमापन कसे शक्य आहे? यशाचे बाप अनेक असतात आणि अयपश अनौरस असते, असे म्हणूनच म्हटले जाते. पण यश मिळाले तरी त्याचे विश्लेषण आवश्यक असते. कारण आपल्या यशाला खरेच आपले कर्तृत्व जबाबदार आहे, की अन्य कुणाच्या अपयशाचा परिणाम म्हणून आपण यशस्वी झाल्याचे दिसते आहे, त्याकडे निरपेक्षपणे बघणे म्हणून गरजेचे असते. अन्यथा यशही आपल्याला गाफ़ील ठेवून पुढल्या अपयशाची बेगमी करीत असते. यशाची नशा इतकी और असते, की वास्तवाचे भान येऊ देत नाही. २००९ साली कॉग्रेसप्रणित युपीएला दुसर्‍यांदा सत्ता मिळाली, तेव्हा त्या पक्षाला बहूमतही मिळाले नव्हते. पण समोर प्रतिस्पर्धी भक्कम नसल्याने त्यांना पुन्हा सत्ता मिळाली होती. विरोधकांचे अपयश हे राहुल सोनियांनी आपले यश मानले. त्यामुळे त्यांनी कधी यशाचे मूल्यमापन केलेले नव्हते, तिथेच त्यांच्या भविष्यातील अपयशाचा पाया घातला गेला होता. ज्यावर भाजपाचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले. पण ते अच्छे दिन मोदींच्या आक्रमक नेतृत्वामुळे आले होते. भाजपाची लोकप्रियता त्यामागे नव्हती. मात्र प्रत्येक भाजपावाला अशा मस्तीत बोलू वागू लागला, की मोदींना याच भाजपवाल्यांनी पंतप्रधानपदी बसवले आणि त्यात मोदींचे काहीही कर्तृत्व नसावे. वास्तवात मोदींची प्रतिमा आणि कॉग्रेसची नालायकी यातून भाजपा सत्तेपर्यंत पोहोचला. मात्र २००९ च्या यशाच्या नशेतून कॉग्रेस २०१४ च्या पराभवानंतरही बाहेर पडू शकलेली नाही. उलट आपले अपयश झाकण्यासाठी सोपी उत्तरे शोधली गेली. त्यापैकी एक होते भाजपाने, मोदींनी मार्केटींग करून मतदाराला भुलवले. अन्यथा कॉग्रेसचा पराभव झाला नसता. हेच कारण आता अरुणाचलच्या शोकांतिकेचे सुद्धा आहे.

मोदींनी आपल्या प्रचार मोहिमेत ‘कॉग्रेसमुक्त भारत’ ही शब्दावली वापरली. त्यामुळेच नंतरच्या काळात केंद्रातील सत्ता व राज्यपालांना वापरून राज्यातील कॉग्रेसची सरकारे पाडली जात असल्याचा आरोप होत राहिला. पण त्यात किती तथ्य होते? उत्तराखंड असो किंवा अरुणाचलची घडामोड असो. तिथे कॉग्रेस पक्षातीलच आमदार आपल्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात बंड करून उभे ठाकले होते. अशावेळी पक्षश्रेष्ठी म्हणून मिरवणार्‍यांनी पुढाकार घेऊन दोन्ही गटांना समोरासमोर बसवायचे असते. त्यांच्यातला बेबनाव कमी करून, त्यांना एकत्र नांदण्यास भाग पाडायचे असते. पण श्रेष्ठींना फ़क्त जागोजागी पाया पडणारे अनुयायी हवे असतील, तर मध्यस्थीचे काम कोणी करायचे? आसाममध्ये लोकसभा पराभवानंतर हीच पाळी आली. तेव्हा मुख्यमंत्र्याच्या विरोधात बंड पुकारणारे श्रेष्ठींना वारंवार भेटत राहिले. पण शिष्टमंडळाचे काही ऐकून घेण्यापेक्षा राहुल घरातल्या कुत्र्याशी खेळत बसायचे. त्यामुळे कंटाळलेला एक ज्येष्ठ मंत्री पक्ष सोडून भाजपात दाखल झाला व त्याने आसाममधून कॉग्रेस संपवण्याचा चंग बांधला. निवडणूकांनी ते साध्यही केले. हे पाप भाजपाने नव्हेतर पक्षश्रेष्ठी होऊन बसलेल्या राहुल गांधी यांचे होते. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात. पण राहुल गांधी हे पक्षासाठी आधाराची काडीही होऊ शकलेले नाहीत. उलट कॉग्रेससाठी राहुल हा उपाध्यक्ष म्हणजे बुडत्याच्या गळ्यातला धोंडा झाल्याचे परिणाम पक्षाला आसामामध्ये भोगावे लागले. तीच गोष्ट उत्तराखंड वा अरुणाचल राज्यांची होती. राहुल गांधींच्या अशा वागण्याने कंटाळलेले रागावलेले आमदार भाजपाच्या नादी लागले, तर त्याचे खापर कोणाच्या माथी मारायचे? भाजपाच्या माथी फ़ोडल्याने नुकसान कोणाचे होणार, याचा तरी विचार कॉग्रेसमधल्या इतरेजनांनी करायला नको काय? तो केला असता तर आज अरुणाचल प्रकरणात तोंडघशी पडायची वेळ आली नसती.

मुळात नाबाम तुकी या मुख्यमंत्र्याला बदलावे म्हणून तिथल्या अर्ध्याहून अधिक आमदारांनी श्रेष्ठींना साकडे घातले होते. तेच उत्तराखंडातही झाले होते. राहुलनी त्यात लक्ष घालून समजुत काढली असती वा नेतृत्व बदल केला असता, तर पुढली बंडखोरी होऊच शकली नसती. त्यात हस्तक्षेप करण्याची संधी भाजपा किवा राज्यपालांना मिळू शकली नसती. म्हणजेच मुळात मुर्खपणा राहुल गांधी यांनी केला. त्यातून घटनात्मक पेचप्रसंग उभे राहिले. त्याला कायदेशीर वा न्यायालयीन आश्रय मिळाला. म्हणून सत्य बदलत नव्हते. ह्यात भाजपा गुन्हेगार नव्हता, तर राहुल सोनियांच्या पापामुळेच ही दुर्दशा कॉग्रेसच्या नशिबी आलेली होती. त्यावर अरुणाचलात नियमांवर बोट ठेवून कोर्टाने कॉग्रेसच्या नाबाम तुकी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवले. पण त्यांच्यामागे बहूमत नव्हते. म्हणून त्यांनी बहूमत सिद्ध करण्याऐवजी अखेरच्या दिवशी राजिनामा देऊन प्रेमा खांडू नावाचा नवा मुख्यमंत्री आणला गेला. पुन्हा कॉग्रेसचा मुख्यमंत्री सत्तेवर बसला म्हणून सुखावलेले तमाम पुरोगामी पत्रकार अभ्यासक मग यथेच्छ भाजपाला धारेवर धरू लागले. मोदी सरकारची निर्भत्सना करू लागले. पण कोणालाही वास्तवाचे तोंड बघण्याची गरज वाटली नाही. यातून माध्यमे व अन्य हौशी लोकांची भाजपाला झोडण्याची हौस जरूर भागली. पण कॉग्रेसला हौस म्हणून भाजपाला झोडून काय मिळाले? परिणाम विचारवंतांना भोगावे लागणार नव्हते, तर कॉग्रेसला भोगावे लागणार होते. झालेही तसेच. कारण दोन महिन्यातच उरलासुरला कॉग्रेस पक्षही अरुणाचलातून नामशेष झाला आहे. कायदेशीर लढाई कॉग्रेसने जिंकली होती आणि कायदेशीर पळवाट काढून त्यांच्याच बंडखोरांनी सोनिया राहुलचे नाक कापलेले आहे. कारण हीच दोन माणसे आज कॉग्रेससाठी सर्वाधिक मोठी समस्या आहेत आणि बिचारे कॉग्रेसजन त्यांच्याकडेच उपाय म्हणून आशाळभूत नजरेने बघत बसले आहेत.

कोर्टात नाबाम तुकी यांच्या तांत्रिक विजय झाला होता. त्यांना कोर्टाने पुन्हा मुख्यमंत्री केलेले नव्हते, तर बहूमत त्यांच्याच पाठीशी असल्याचे सिद्ध करण्याची संधी दिलेली होती. म्हणून मग त्यांना बदलून प्रेमा खांडू यांना नेतृत्व देण्याच्या बदल्यात बंडखोरांना पक्षात परत आणले गेले. हेच काम जानेवारी महिन्यात राहुल सोनियांनी थोडे लक्ष घालून केले असते, तर बंडखोरी झाली नसती, की कोर्टात जावे लागले नसते. ते काम ज्यांनी केले नाही, त्यांना अरुणाचलची फ़िकीर नव्हती की कॉग्रेस पक्षाच्या भवितव्याची काळजी नव्हती. अशा बेफ़िकीर लोकांना जर कॉग्रेसश्रेष्ठी वा पक्षाचे तारणहार मानले जाते. मग त्या पक्षाला संपवायला भाजपाने वा मोदींनी अधिक काही करण्याची गरज उरत नाही. झालेही तसेच आहे. अपेक्षेप्रमाणे अरुणाचल कॉग्रेसने गमावला आहे आणि त्यासाठी भाजपाला काहीही करावे लागलेले नाही. कोर्टाने कॉग्रेस मुख्यमंत्र्याला पुन्हा संधी देण्याचा निर्णय दिल्यानंतर एकदाही राहुल त्या राज्याकडे फ़िरकले नाहीत, की कोणी वरीष्ठ नेता तिकडे दखल घ्यायला गेला नाही. आता त्या आधीच्या बंडखोरांनी उरल्यासुरल्या कॉग्रेस आमदारांना घेऊन पक्षांतर केले आहे. पक्षात वा अरुणाचल विधानसभेत कॉग्रेसचे ४४ आमदार होते. त्यापैकी आता एकटा आमदार उरला आहे. त्याचे नाव नाबाम तुकी असून त्यालाच कोर्टाने पुन्हा मुख्यमंत्री म्हणून ‘न्याय’ दिला होता. त्यातून कोर्टानेच भाजपाला धडा शिकवला असे पांडित्य सांगणार्‍या अभ्यासक पत्रकारांची अक्कल मात्र चव्हाट्यावर आली. कारण धडा भाजपाला नव्हता, तर कॉग्रेसला मिळालेला होता. कॉग्रेसला तो धडा अशा अर्धवट अभ्यासक जाणकारांनी शिकू दिला नाही. मग काय व्हायचे? बुडत्याचा पाय खोलात म्हणतात, तशी एका आणखी राज्यातून कॉग्रेसच नामशेष झाली आहे. राहुल असल्याचे उरलीसुरली कॉग्रेस बुडवण्यासाठी मोदींनी काही करण्याची गरज आहे काय?

रोजनिशी  दै. जनशक्ति  1 comment:

  1. मस्तच भाऊ महाराष्ट्रामध्येही ठराविक घराण्यांसाठी खांग्रेस संपत आहे

    ReplyDelete