Wednesday, September 21, 2016

इतिहास असा घडवला जातो

lalkila modi के लिए चित्र परिणाम

सध्या अमेरिकेत निवडणूकीची धामधुम चालू आहे. डोनाल्ड ट्रंप नावाचा रिपब्लिकन उमेदवार आपल्या चमत्कारीक वाटणार्‍या वक्तव्यांनी सर्वांना थक्क करून सोडतो आहे. तिथल्या राजकीय पंडितांनाही त्याने विचलीत केले आहे. परंतु असे प्रथमच घडलेले नाही. ३६ वर्षापुर्वी असाच एक धश्चोट वाटणारा उमेदवार मैदानात उतरला होता आणि राजकीय पंडितांना त्याने चक्रावून सोडलेले होते. कारण तो पुस्तकी राजकारणी नव्हता, की राजकीय पंडितही नव्हता. हॉलिवुडच्या देमार चित्रपटातली कारकिर्द गाजवून निवृत्त झाल्यावर राजकारणात शिरलेल्या त्या काऊबॉय हिरोविषयी म्हणूनच सुबुद्ध वर्गात हेटाळणीची भावना होती. पण त्यालाही अशा बुद्धीमंतांची फ़िकीर नव्हती, की त्यांच्या मतांची मर्वा नव्हती. त्याचे नाव रोनाल्ड रेगन होते. अखेर तोच दोनदा निवडूनही आला होता. आठ वर्षे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याने कारभारही चालविला होता. आजच्या ट्रंप प्रमाणेच तो उमेदवार असताना त्याला तात्कालीन राजकीय पंडितांनी घेरले व अनेक प्रश्नांची सरबत्ती केलेली होती. त्यातला एक प्रश्न होता, रेगन यांचे सोवियत विषयक धोरण कसे असेल? रेगन यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले होते. धोरण सोपे नि सरळ आहे. आपण जिंकलो पाहिजे आणि सोवियत हरले पाहिजेत. मग हसत हसत पंडितांनी त्याला उलट विचारले, पण ते हरणार वा आपण जिंकणार कसे? त्याचे डावपेच व रणनिती काय असेल? तर रेगन उत्तरले होते, ही रणनिती डावपेच वगैरे तुम्हा बुद्धीमंतांची डोकेदुखी असते. तुम्ही ते शोधून काढायचे असते. तुम्ही शोधलेल्या दहा पर्यायातून एकाची निवड करणे, हे माझे म्हणजे अध्यक्षाचे काम असेल. शोधणे हे माझे काम नाही. अर्थात तो उमेदवार त्या विचारवंत अभ्यासकांना माथेफ़िरू वाटला होता. पण वास्तवात त्याचे शब्द खरे ठरले होते. कारण त्याच अध्यक्षाच्या कारकिर्दीत सोवियत युनियनचा र्‍हास झाला होता.

नंतर जवळपास आठ वर्षांनी रेगन यांची दुसरी कारकिर्द संपत आलेली होती आणि पुन्हा अध्यक्षिय निवडणूक दार ठोठावत होती. अशावेळी सोवियत युनियनची सुत्रे मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या हाती आली होती. त्यांनी त्या कम्युनिस्ट जगात लोकशाही रुजवण्याचा पवित्रा घेतला आणि क्रमाक्रमाने सोवियत राजकारणाची युरोपिय पकड ढिली पडत जाऊ लागली होती. अशावेळी रेगन व गोर्बाचेव्ह यांचा एक संयुक्त समारंभ बर्लिन येथे व्हायचा होता. त्यात रेगन यांचे भाषण कसे असावे, याचीही तयारी चालली होती. अनेक चर्चा व मसुदे तयार झालेले होते. पण ऐनवेळी त्यांनी काय बोलावे, त्याचा अंतिम मसूदा बनवला गेला. त्यातल्या एका वाक्यावरून बरेच काहुर माजले होते. लोकशाहीच आणायची आणि जागतिक शांतता हवी असेल तर ‘मिस्टर गोर्बाचेव्ह ती बर्लिनची भिंत पाडून टाका’, असे एक वाक्य त्यात होते. ते तसेच ठेवावे की सध्या तसे बोलू नये, यावरून रेगन यांच्या मुत्सद्दी सहाय्यकांमध्ये कित्येक तास वादविवाद झाले. अखेरीस शेवटचा क्षण आला, तेव्हा ते वाक्य असू द्यावे म्हणजे रेगन यांनी बोलावे, असा बहुमताने निर्णय झाला. रेगन तावातावाने तसे बोललेही. त्याला खुप प्रसिद्धी सुद्धा मिळाली. मात्र त्यामागे किती वादविवाद झाला, त्याची कोणाला कल्पनाही नव्हती. पण पुढला घटनाक्रम असा घडत गेला, की तेच वाक्य ऐतिहासिक होऊन गेले. कारण अवघ्या काही महिन्यात खरोखरच ती बर्लिनची भिंत पडली वा पाडली गेली. त्याबरोबरच सोवियत म्हणून जो पोलादी पडदा पुर्व युरोपवर पसरलेला होता, तोही उठवला गेला. अनेक पुर्व युरोपिय देशात उठाव झाले, सत्तांतरे झाली व क्रांतीही होत गेली. पण खुप उशिरा त्या वाक्याचे रहस्य उलगडले गेले. ते उत्स्फ़ुर्तपणे रेगन यांनी बोललेले वाक्य नव्हते. तर त्यामागे काही डावपेच व रणनिती सुद्धा होती. मात्र त्यावर तेव्हा भाष्य करणार्‍यांना त्याचा थांगपत्ताही नव्हता.

त्या सर्व घडामोडींचा साक्षिदार असलेला मायकेल मायर याने पुढल्या काळात ते सर्व अनुभव लिखित स्वरुपात पुस्तकात मांडले. त्यातून बुद्धीमंत वा राजकीय अभ्यासक वास्तवाशी किती अनभिज्ञ व अजाण असतात त्याची साक्ष मिळते. कारण मायर तेव्हा त्याच पुर्व युरोपात पत्रकार म्हणून वावरत होता आणि त्याने लिहून पाठवलेले अनुभव किंवा प्रत्यक्ष घटनांची वार्तापत्रे त्याच्या अमेरिकेत बसलेल्या संपादकांना अविश्वसनीय वाटल्याने छापलीही जात नव्हती. कारण मायर आपल्या डोळ्यांनी सोवियत युनियन कोसळताना बघत होता. पण तिथून मैलोगणती दुर बसलेल्यांना मात्र त्याची वार्तापत्रे कल्पनारंजन वाटत होते. त्यांच्या कल्पनेत असलेले सोवियत युनियन फ़ुटणार नाही, ही समजूत त्यांना वास्तव समजून घ्यायला देत नव्हती. शिवाय रेगन यांचे ते ऐतिहासिक वाक्य इतके खरे ठरेल, हेच अशा जाणत्यांना मान्य करायची हिंमत होत नव्हती. पण मुळातच असे वाक्य रेगन गंमत म्हणून बोलले नव्हते. त्यांच्या धोरणकर्ते व मुत्सद्दी सहकार्‍यांनी योजलेले डावपेच व रणनितीनुसारच तसे वक्तव्य अध्यक्षांनी केलेले होते. त्याला पुरक अशा कारवायाही अमेरिकन यंत्रणेकडून चालू होत्या. पुढल्या घटना त्याचा परिपाक होता. त्या आपोआप घडत नव्हत्या. तर तशी सुत्रे हलवण्यातून त्या घटनांना वेग आणला जात होता. मुळात असे वाक्य राष्ट्रप्रमुख उत्स्फ़ुर्तपणे बोलत नसतात, की गंमत म्हणून बोलले जात नाही. त्यामागे काही योजना व अपेक्षा असतात. हेतू असतात. तसे काही नसेल तर आकर्षक म्हणून कोणी राष्ट्रप्रमुख असे काही बोलू शकत नाही. रेगनही बोलले नव्हते, की कालपरवा पंतप्रधान मोदीही बलुचिस्तानबद्दल गंमत म्हणून काही बोललेले नाहीत. आपल्या तिसर्‍या लालकिल्ला भाषणात मोदींनी तो विषय जाणिवपुर्वक उच्चारला आहे आणि म्हणूनच जगभर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

आज जगात सगळ्या देशात पाकिस्तानी नाराज बलुची वा असंतुष्ट पाकिस्तानी गट जाऊन वसलेले आहेत. त्यांनी रस्त्यावर येऊन नरेंद्र मोदी यांचा जयजयकार सुरू केला आहे. तो कुणा व्यक्तीचा नसून भारताच्या पंतप्रधानाचा गुणगौरव आहे. भारत आपल्या पाठीशी उभा असल्याचा त्यांना मोदींनी राष्ट्रीय भाषणातून दिलेला शब्द, ही गंमत नाही. ती एक मुत्सद्दी चाल अहे. उठसुट कुठल्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मिरचा विषय काढून भारताला डिवचणार्‍या पाकिस्तानला शह देण्यासाठी खेळलेली ती धुर्त चाल आहे. काश्मिरी लोकांना भारताने चिरडून काढले आहे. जबरदस्तीने भारतात बंदिस्त करून ठेवलेले आहे. अन्यथा सार्वमत घेतल्यास काश्मिरी जनता पाकिस्तानात समाविष्ट व्हायला उतावळी आहे, असे चित्र पाकिस्तान नेहमी रंगवत आलेला आहे. पण त्यासाठी काश्मिरी जनतेला सार्वमताची संधीच द्यायची तर बाकीच्या पाकिस्तानी लोकांनाही तसा अधिकार द्यावा. मग किती प्रदेश व प्रांत पाकिस्तानात शिल्लक उरतील? पंजाबी वर्चस्वाने पाकिस्तानातले विविध घटक सतत चिरडले गेले आहेत आणि त्यातूनच असंतोष पोसला गेलेला आहे. तो चिरडून काढताना अनेक असंतुष्ट नेत्यांनी परदेशी जाऊन आश्रय घेतला आहे. जे पाकिस्तानात सापडतील त्यांना ठार मारले जाते. पण कोणीही त्याबद्दल आवाज उठवत नाही, की पाक असंतुष्टांना मदतीचा हात देत नाही. सहानुभूतीचा लवलेश कुठून अनुभवास येत नाही. तेच काम जगातला पहिला राष्ट्रीय नेता म्हणून मोदींनी परवाच्या भाषणात केले. पण त्याचा जगभर परिणाम दिसावा, म्हणून मागली दोन वर्षे पुरेशी तयारी केलेली होती. विविध पाकिस्तानी असंतुष्ट गटांमध्ये समन्वय घडवून आणल्यावरच हे निर्णायक वाक्य मोदी बोलले आणि आता जगभर काहूर माजले आहे. प्रत्येक युरोपियन देशात अमेरिकेत बलुची व पाक असंतुष्ट रस्त्यावर आले आहेत. मोदींचा जयजयकार करीत आहेत आणि त्यातून पाकिस्तानात चलबिचल निर्माण करायला हातभार लागला आहे. भविष्यात या वाक्याचा परिणाम काय झाला ते इतिहासच सांगेल.

1 comment:

  1. सुंदरच भाऊ हे या खांग्रेस व इतर खांग्रेस मित्रांना कळत नाही मोदीजीना विरोध करताकरता स्वतः देशद्रोही झालोय ते कळतनाही आहे

    ReplyDelete