Thursday, September 22, 2016

सिद्धूचा थिल्लरपणा

aawaz e punjab के लिए चित्र परिणाम

काही दिवसांपुर्वी भाजपातून राजिनामा देऊन बाहेर पडलेले माजी खासदार क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू याने आता पुन्हा गडबड केली आहे. महिनाभर आधी त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजिनामा दिलेला होता. मग त्यावरून राजकीय बातम्यांचे वादळ उठले. हा भाजपाचा नेता आम आदमी पक्षात जाणार अशाही वार्ता आल्या. पण पुढे काही झाले नाही. भाजपानेही त्यावर फ़ारशी मल्लीनाथी केली नाही. पुढे आणखी काही दिवस गेले. आरंभी केजरीवाल यांच्या पक्षाने सिद्धू आपल्याकडे येणार अशा बातम्यांना पुरक विधानेही केली होती. काही दिवसांनी केजरीवाल व सिद्धू यांची भेटही झाली, पण काही निष्पन्न झाले नाही. पंजाबच्या विधानसभा निवडणूकांचे खुप आधीपासून वेध लागलेले आहेत. लोकसभेत सर्वाधिक अनामत रकमा गमावण्याचा विक्रम करणार्‍या आप या पक्षाला अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. त्या चारही जागा पंजाबमधल्या होत्या. सहाजिकच पक्षाचे श्रेष्ठी असल्याप्रमाणे केजरीवाल वागत होते आणि आता तिथली जनता आपल्याच पक्षाला सत्तासुत्रे सोपवण्यासाठी उतावळी असल्यासारखी भाषा आपवाले बरळू लागले होते. त्यामुळेच केजरीवाल यांच्या गोटात सिद्धू गेल्यास बाकीच्या पक्षांची धुळधाण उडणार, असे चित्र रंगवले गेल्यास नवल नव्हते. पण सिद्धू आणि केजरीवाल समान स्वभावाचे असल्याने त्यांनी एकमेकांशी जुळवून घेण्याची गरज असली तरी अशक्य कोटीतले काम होते. झालेही तसेच! नुसत्या भेटीच्या पुढे काही झाले नाही. मग एकेदिवशी सिद्धू यांनी अन्य काही नेत्यांना हाताशी धरून ‘आवाज ए पंजाब’ अशा मंचाची घोषणा केली. त्याच माध्यमातून ते निवडणूका लढवणार अशाही बातम्या आल्या. मात्र आता महिना झाला नाही इतक्यात सिद्धूंनी पुन्हा आपली भूमिका बदलली आहे. आपण वेगळा पक्ष काढून मतविभागणीचे पाप करणार नाही, असे त्यांनी जाहिर केले आहे.

मुद्दा इतकाच आहे, की सिद्धू नेमके काय करणार आहेत? ते राजकारणात आले भाजपामुळे! वाजपेयी व अन्य लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी राजकारणात व भाजपात प्रवेश केला. अमृतसर येथून त्यांनी लोकसभा अनेकदा जिंकली. मात्र गेल्या खेपेस त्यांना पक्षाने तिथूनच उमेदवारी नाकारली. देशात अन्य कुठल्याही ठिकाणी भाजपा सिद्धूला उमेदवारी द्यायला तयार होता. पण ती नाकारून घरी बसणे सिद्धूने पसंत केले. कारण आपला हक्काचा मतदारसंघ अकाली दलाच्या दडपणाखाली पक्षानेच नाकारल्याचे शल्य होते. आरंभापासून सिद्धू आणि अकाली नेत्यांचे कधी पटले नाही. त्याची परमावधी गेल्या लोकसभेत झाली. दोन वर्षे त्याबद्दल मौन पाळून सिद्धू गप्प राहिला आणि आता विधानसभेचे पडघम वाजू लागल्यावर त्याने भूमिका घेतली. भाजपाने अकाली दलाशी युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूका लढवाव्यात, असा त्याचा आग्रह होता. पण पक्षाचे तितके संघटन नसल्याने भाजपा त्याला राजी नव्हता. म्हणूनच सिद्धूने खासदारकी सोडून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र इतका टोकाचा निर्णय घेताना त्याची कुठली योजना नव्हती, हे आता स्पष्ट झाले आहे. आधी त्याने आम आदमी पक्षात जाणार असल्याच्या अफ़वांचा इन्कार केला नव्हता आणि त्यांच्याशी बोलणीही केली. पण ती यशस्वी झाली नाहीत, तेव्हा अन्य काही नावाजलेल्या शिखांना हाताशी धरून चौथी आघाडी बनवण्याचा पवित्रा घेतला. त्याची वाजतगाजत घोषणाही करून टाकली. तिथे भाजपा व आम आदमी पक्षाची निंदाही यथेच्छ करून घेतली. आता दोन आठवडे होत नाहीत, इतक्यात चौथी आघाडी करून मतविभागणी करायची नाही, असे बोलण्याचा अर्थ काय? ती विभागणी त्याला पत्रकारांसमोर घोषणा करताना उमजलेली नव्हती काय? विनोदी कार्यक्रमात खदखदून हसणे आणि राजकारण यात मोठा फ़रक असतो, हे त्याचा कधी लक्षात येणार आहे?

पक्षाने म्हणजे भाजपा असो किंवा आम आदमी पक्ष असो, सिद्धूला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करून निवडणूकांना सामोरे जावे, अशी त्याची अपेक्षा होती. भाजपा त्याला तयार नव्हताच. पण केजरीवाल यांनाही सिद्धूच्या हाती पक्षाची सुत्रे देण्याची इच्छा नव्हती. म्हणूनच त्यांनी सिद्धूला पक्षात घेतानाच निवडणूक लढवायची नाही असली अट घातली होती. सिद्धूनेच पत्रकार परिषदेत त्याचा खुलासा केला. पण त्यातून सिद्धूच्या मनातली महत्वाकांक्षा तर समोर आली ना? इतके झाल्यावर मतविभागणी हे कारण पुढे करून पळ काढणे, लढवय्या म्हणवून घेणार्‍याला शोभणारे नाही. पण विषय त्याच्याही पुढला आहे. ज्या माणसाला आपल्या कुठल्याही एका भूमिकेवर दोन महिने ठाम उभे रहाता येत नाही, त्याच्यावर पंजाबची जनता कितपत विश्वास ठेवू शकेल? विविध कार्यक्रमात पल्लेदार वाक्ये फ़ेकून वा हशा पिकवण्याने लोकांच्या टाळ्या मिळवता येतात, मते मिळवता येत नाहीत,. सिद्धूच्या लौकरच हे लक्षात येईल. कारण सततच्या भूमिका बदलण्यात त्याने आपलीच प्रतिष्ठा रसातळाला नेवून ठेवली आहे. पंजाबमध्ये भाजपाने स्वबळावर निवडणूका लढवाव्यात ही अपेक्षा गैर मानता येत नाही. बंगाल केरळात भाजपा स्वबळावर उभा रहात असेल, तर पंजाबात तितकी हिंमत करायला काहीही हरकत नाही. पण एका प्रदेशात पक्षाने स्वबळावर लढायचे तर तिथे तळ ठोकून बसणारा नेताही आवश्यक असतो. सिद्धूसारखा नेता तळ ठोकून बसणारा नाही. आपल्या वाहिन्यांवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सतत प्रवास करणार्‍या व्यक्तीच्या बळावर कुठलाही पक्ष इतका मोठा पवित्रा घेऊ शकत नाही. कारण निवडणूका वा पक्ष संघटना निव्वळ श्रोत्यांना सुखावणार्‍या भाषणातून साध्य होत नसतात. त्याच्यासोबत जबाबदार्‍या येत असतात. त्यांची पुर्तता करण्यासाठी अनेक मोह सोडून झोकून द्यावे लागते. जी क्षमता सिद्धूमध्ये नाही, हे यातून सिद्ध झाले.

गर्दी जमवणार्‍या व्यक्ती वा श्रोत्यांना हसवणारी व्यक्ती एका समारंभापुरती महत्वाची असते. पण संघटना किंवा सत्ता ही पुर्णवेळ जबाबदारी आहे. सिद्धूमध्ये तितका संयम नाही. असता, तर त्याला अशी धरसोडवृत्ती दाखवण्याची वेळ आली नसती. मध्यंतरीच्या दोनतीन महिन्यात या माणसाने भाजपा, आम आदमी पक्ष यांना टांग मारलीच. पण कालपरवा आवाज ए पंजाब म्हणून ज्यांना सोबत घेतले होते, त्यांचे काय? सिद्धूसोबत पत्रकार परिषदेत हजेरी लावली, त्यांना आता शेकडो प्रश्न विचारले जातील. त्यांनी काय खुलासे करावेत? दोन आठवड्यापुर्वी कॉग्रेस अकाली दलाला आव्हान देण्याची भाषा बोलणारा आज अकस्मात पळपुटेपणा करणार असेल, तर लोक त्याच्याकडे किती गंभीरपणे बघतील? यापुढे सिद्धूचे राजकीय वा सामाजिक वक्तव्य देखील हास्यास्पद म्हणूनच बघितले जाईल. कारण पंजाब विधानसभेची निवडणूक अटितटीचा विषय आहे. त्यात भ्रष्टाचार व अनागोंदीचा विषय आहेच. पण मागल्या काही वर्षात तिथे अंमली पदार्थाच्या संकटाने धुमाकुळ घातलेला आहे. तिथे दुर्लक्ष होत राहिले म्हणुन प्रस्थापित पक्षांना नाकारून लोकसभेत आम आदमी पक्षाच्या नगण्य उमेदवारांना लोकांनी प्रतिसाद दिला होता. आज त्याही पक्षाचे नेते उथळपणा करीत आहेत आणि सिद्धू लढाईचा आव आणून पळ काढतो आहे. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. मग अशा कृत्यांना सिद्धूची गुगली वगैरे ठरवुन बातम्या दिल्या जातात. पण वास्तव इतकेच आहे, की हा निव्वळ विनोदवीर आहे. त्याला कुठल्याही विषयाचे गांभिर्य कळत नाही, की जगातील घडमोडीवर भाष्य करत असताना वापरलेले शब्दही त्याला कळत नसावेत. नुसती पाठ केलेली वचने वा शेरोशायरीची पोपटपंची, इतकेच त्याचे कर्तृत्व असल्याची साक्ष त्यानेच दिलेली आहे. त्याच्याच भाषेत बोलायचे तर गुरू हो जा शुरू, असा हा थिल्लरपणा आहे.

2 comments:

  1. सरदारजींवरच्या विनोदात आणखी एक भर पडली. 😆😆😆

    ReplyDelete