पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण बैठकीत नेहमीप्रमाणे काश्मिरचा राग आळवला. पण त्यांना कोणी ऐकून घेणारे नव्हते. जवळपास तमाम जगाने पाकिस्तानवर बहिष्कार घातल्यासारखी स्थिती आली आहे. यापुर्वी अझर मसुदला दहशतवादी ठरवण्याच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाला चिनने आक्षेप घेतला होता. आज तोच चिनही पाकिस्तानच्या बाजूने उभा रहायला बिचकतो आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो व शत्रूही नसतो. आपापले स्वार्थ बघूनच प्रत्येकाला त्या प्रसंगी भूमिका घ्याव्या लागत असतात. चिनचा स्वार्थ व्याप्त काश्मिर आणि बलुचिस्थानातून जाणार्या चिन-पाक महामार्गाशी संबंधित आहे. युद्धाची स्थिती आली तर तोच महामार्ग धोक्यात येतो आहे. मग चिनला त्यातून मिळणार काय? मैत्रीसाठी ४६ अब्ज डॉलर्सचे दिवाळे चिनला परवडणारे नाही आणि तसा इशारा चिनच्या जाणत्यांनीही दिलेला आहे. ‘ग्लोबल टाईम्स’ नावाचे एक इंग्रजी वर्तमानपत्र चिनी कम्युनिस्ट पक्षातर्फ़े चालविले जाते. त्यात अलिकडेच एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये तसा स्पष्टपणे इशाराच देण्यात आला आहे. चिनने आपली सगळी गुंतवणूक पाकिस्तानमध्ये करणे म्हणजे दिवाळखोरीला आमंत्रण आहे. म्हणूनच यापुढे त्या पाकिस्तानातील महामार्गावर आणखी एक डॉलर्सचीही गुंतवणूक आत्महत्या ठरेल, असा तो इशारा होता. ही बाजू लक्षात घेतली तर पाकिस्तानात सध्या इतकी अस्वस्थता कशामुळे आली आहे, ते लक्षात येऊ शकते. पाक युद्धाला सज्ज असल्याचे व अण्वस्त्रेही वापरण्याची धमकी कशाला देतो आहे, त्याचे रहस्य त्यातच दडलेले आहे. चिनही साथ सोडून जाण्याचे भय पाकला भेडसावते आहे. कारण चिन वगळता अन्य कुठल्याही देशाकडून सध्या पाकमध्ये गुंतवणूक होत नाही. शिवाय अमेरिकाही हात झटकू लागली आहे.
पाकने दिर्घकाळ जिहादी व दहशतवादी यांचा भारताच्या विरोधात धोरणात्मक वापर केला. पण त्यातून शिरजोर झालेले जिहादी आता पाकसेना किंवा सरकारलाही दाद देईनासे झाले आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर सेनेमध्ये इतकी जिहादी मानसिकता तयार झाली आहे, की राजधानी इस्लामाबादेत बसलेल्या नेते वा सेनाधिकार्यांना जिहादी जुमानत नाहीत. मात्र त्यांच्याकडून होणार्या कारवाया उचापतीची जबाबदारी पाकला उचलावी लागते आहे. त्यातून युद्ध झाले तर भारताचे किती नुकसान व खर्च होईल, त्याचे आकडे आपल्याकडचे पाकप्रेमी देत असतात. पण यात निव्वळ भारत-पाक यांचेच नुकसान होणार नाही. यात मोठे नुकसान होणारा तिसरा देश आहे चिन! दोन देशात युद्ध झाले तर होणारे हवाई हल्ले व धुमश्चक्री यांनी विध्वंस अर्थातच व्याप्त काश्मिरी, व बलुची प्रदेशासह किनारी भागात होणार आहे. ते हल्ले भारताने केले तरी ते चिनी प्रदेशात नसतील, तर पाकप्रदेशातलेच असतील. पण हे हल्ले ज्या प्रदेशात होतील, तिथे चिनचे ४६ अब्ज डॉलर्स गुंतलेले आहेत. तिथली नासधुस पाकिस्तानची हानी करणार असले, तरी मुलत: चिनच्या अब्जावधी गुंतवणूकीला मातीमोल करून टाकणार आहे. म्हणूनच भारताच्या पाकवरील हल्ल्याची जास्त भिती चिनला भेडसावते आहे. त्यासाठीच पाक सेनाप्रमुखांना चिनी नेत्यांना जास्त उत्तरे द्यावी लागत आहेत. बलुची वा पाक तालिबानांनी सतत चिनी कंत्राटदार व बांधकामांवर हल्ले केल्याने पाकसेनेला त्या कामाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र खडा पहारा द्यावा लागत आहे. ही सामान्य स्थिती असेल, तर युद्धामुळे किती भयंकर उत्पात घडू शकतात, याचा निव्वळ अंदाज केलेला बरा. पाकिस्तानसह म्हणूनच चिनची सध्या तारांबळ उडालेली आहे. परिणामी राष्ट्रसंघातही पाकच्या समर्थनाला उभे रहाणे चिनला अशक्य होत चालले आहे.
मात्र पाक नेते व सेनेची कोंडी वेगळी आहे. त्यांना जगाकडून लाथा खाव्या लागत आहेतच. पण भारताकडून उरीनंतर कुठली प्रतिक्रीया येणार; त्याचा अंदाजही येईनासा झाला आहे. भारत युद्ध पुकारणार की किरकोळ हल्ले करून थांबणार? याविषयी एकूणच भारताकडून मौन पाळले जात आहे. प्रारंभिक प्रतिक्रीया दिल्यानंतर भारताने कुठलीही उघड कृती केलेली नाही. पण लष्करी कारवायांचे अधिकारी यांनी योग्यवेळी जबाब दिला जाईल, असे मोघम विधान केलेले आहे. ही योग्य वेळ कुठली आणि उत्तर कोणते, याविषयी पाकिस्तानी नेते गोंधळात आहेत. त्यांनी भारत हल्ला करणार असे गृहीत धरून युद्धसज्जतेची तयारी सुरू केली आहे. सैनिकांची रजा रद्द करण्यात आली असून, मोक्याच्या सैनिकी तळांवरून सैनिकांच्या कुटुंबियांना आपापल्या घरी पिटाळून लावण्यात येते आहे. कराची वा इस्लामाबाद अशा महानगराकडे येणार्याजाणार्या रस्त्यांवरील वाहतुक नियंत्रित करण्यात आली आहे. पेशावर किंवा व्याप्त काश्मिरकडे होणारी वाहतुक देखरेखीखाली आणली गेली आहे. कुठल्याही क्षणी आक्रमण होण्याची शक्यता असलेले हे उपाय पाकिस्तान भयभीत असल्याचे लक्षण मानता येईल. ज्यांच्या तोंडी अण्वस्त्रांची भाषा मागली अनेक वर्षे चालू आहे, त्यांनी इतके अस्वस्थ होण्याचे कारण नाही. त्यांचे भय अन्य कारणासाठी असू शकते. भारतीय सेनेला तोंड देणे पाकला अशक्य नाही. पण पाकमधील असंतुष्ट लोक उत्पात घडवू लागले तर काय करायचे, ही खरी समस्या आहे. भारतीय काश्मिरात सेना व पोलिसांच्या विरोधात स्थानिक कुरापतखोर जे खेळ करतात, तसाच प्रकार पाकिस्तानात होण्याच्या भयाने सध्या पाकसेनेला पछाडले आहे. किंबहूना बलुची व मोहाजिर पाक नागरिक उलटण्याची भिती अधिक आहे. म्हणूनच आतल्या आत सुरक्षेची धावपळ सुरू असताना, उठसुट भारताला धडा शिकवण्याच्या गमजा चालू आहेत.
सार्वत्रिक युद्ध झाले तर जो पाकिस्तान आहे तो शिल्लक उरेल किंवा नाही, याचीच चिंता पाकला भेडसावते आहे. यापुर्वी इस्लाम वा धर्माच्या नावाने ज्या लोकसंख्येला खेळवलेले चिथावलेले आहे, त्यातले अनेक समाजघटक आता पाकनेत्यांच्या व पंजाबी वर्चस्वाच्या नाटकाला कंटाळले आहेत. त्यातूनच पाक आत्मविश्वास गमावून बसला आहे. मागल्या दोनतीन दशकात सिंधी, मोहाजिर, पख्तुनी व बलुचींवर सेनेकडून जे अत्याचार झालेत, त्यातून मुस्लिम म्हणून एकदिलाने पाकिस्तानी असलेली लोकसंख्या बारगळली आहे. ज्यांना चिनी महामार्ग नको आहे, त्यांनाही अशावेळी सुडाचा खेळ करायची संधी मिळणार आहे. म्हणूनच भारताने युद्धाचा पवित्रा घेतला, तर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आहे. तरीही अशी अरेरावीची भाषा करणेही भाग आहे. अमेरिकेने इराकवर किंवा अफ़गाणिस्तानवर आक्रमण केले, तेव्हाही तिथले सत्ताधीश अशीच भाषा बोलत होते. अमेरिकनांची कबर खोदू हीच भाषा होती. पण प्रत्यक्ष लढाईला तोंड फ़ुटले, तेव्हा एकही सैनिक लढायला मैदानात आला नाही. ती दहशत संपल्यावर अमेरिकेने सेना मागे घेऊन अफ़गाण वा इराकला त्यांच्या नशिबावर सोडले असते, तर अमेरिकेला इतके नुकसान सोसावे लागले नसते. भारताने बंगलादेश मुक्त केला आणि आपल्या सेना मागे घेतल्या होत्या. देशाचा कारभार तिथल्या नेत्यांच्या हाती सोपवला होता. तेच अमेरिकेने करायला हवे होते. तिथे लोकशाही रुजवण्य़ाचा आगावूपणा अमेरिकेला नडला. भारताने बांगलादेशात ते केले नाही. उद्या बलुचिस्थानातही करण्याची गरज नाही. आताची लढाई बांगलादेश युद्धाची पुनरावृत्ती असेल, याची जाणिव असल्यानेच पाक गुरगुरतो आहे. कारण तो भयभीत झाला आहे. सापळ्यात फ़सलेल्या सिंहाने गुरगुरावे त्यापेक्षा पाकिस्तानची भाषा अजिबात वेगळी नाही.
छानच भाऊ
ReplyDelete