Tuesday, June 20, 2017

काही उपयोग आहे?

abu salem के लिए चित्र परिणाम

मुंबईतल्या १९९३ सालच्या बॉम्बस्फ़ोट मालिकेला आता दोन तपांचा कालावधी उलटून गेला आहे आणि त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात त्यात गुंतलेल्या सात आरोपींचा खटला संपून सहा जणांना दोषी ठरवले गेले आहे. या प्रदिर्घ कालखंडात एक पिढी जग पुढे गेले आहे. आज विशीच्या पार असलेली नवी पिढी त्या भयंकर घटनेची साक्षीदारही नाही. तो हृदयद्रावक अनुभव या पिढीला नाही. सहाजिकच त्यातली दाहकता तिला समजूही शकत नाही. उलट तेव्हा तरूण असलेली पिढी, आज पन्नाशीच्या पलिकडे गेलेली आहे. तिच्या जखमा सुकून गेलेल्या आहेत आणि ज्यांनी त्या स्फ़ोटाचे चटके सोसले, त्यांच्या डोळ्यातले अश्रूही सुकून गेले आहेत. अशा वेळी कोण तो अबु सालेम आणि कोण तो मुस्ताफ़ा डोसा, असे प्रश्न आजच्या पिढीला पडले तर नवल नाही. कारण कितीही वस्तुस्थिती असली, तरी आता मुंबईतली बॉम्बस्फ़ोट मालिका एक दंतकथा बनून गेलेली आहे. मागल्या पिढीने थरारक आठवण म्हणून पुढल्या दोन पिढ्यांना कथन करावी, यापेक्षा त्यात तथ्य उरलेले नाही. कारण देशातील त्या पहिल्या स्फ़ोटमालिकेनंतर तशा घटना देशाच्या कुठल्याही महानगरात व शहरात सातत्याने होत राहिल्या आहेत आणि त्यातल्या गुन्हेगारांना कुठलेही धडा शिकवणारे शासन होऊ शकलेले नाही. गुन्हेगारांच्या मनाचा थरकाप उडावा, असे या दोन तपात काहीही घडलेले नाही. कायदे खुप बदलले वा आणखी कठोर झाले, असे म्हटले जाते. पण त्यापेक्षाही दहशतवाद वा जिहादी मानसिकता अधिक प्रभावी झाली आहे. काश्मिर धडधडा पेटलेला आहे. कारण पाव शतकानंतर अधिकाधिक तरूणांना दहशतवाद आकर्षित करतो आहे. दहशतवाद सोकावला आहे आणि पोलिस वा कायदा यंत्रणा अधिकच दुबळी होऊन गेली आहे. कायदा आणखी निकामी ठरला आहे. मग अशा निकाल वा खटल्यातून काय साधले, याचा विचार व्हायला नको काय?

कायदा वा न्यायव्यवस्था ही समाजात काही किमान शिस्त व सुटसुटीतपणा असावा म्हणून निर्माण झालेली व्यवस्था आहे. त्यात आपण जगताना इतरांना अपाय होऊ नये वा अपाय करू नये, इतका दंडक पाळला जाण्यासाठी कायदा व त्याच्या अंमलबजावणीची यंत्रणा अस्तित्वात आलेली आहे. कायद्याचे राज्य म्हणजे लोकसंख्येतील दुबळ्यांना आधार वाटावा आणि मस्तवालांना धाक वाटावा, अशी कायद्यामागची संकल्पना आहे. आजकाल तिचा मागमूस कुठे दिसतो काय? ज्यांनी मुंबईतले स्फ़ोट घडवले आणि अडीचशे निरपराधांचा बळी घेतला, त्यांना अशा शिक्षेने कुठला धाक वाटलेला आहे? ज्यांचे बळी त्यात पडले किंवा जे शेकडो लोक कायमचे जायबंदी झाले, त्यांची कुठली भरपाई होऊ शकली आहे? त्यांच्या वेदना यातनांवर किंचीत फ़ुंकर तरी घातली गेली आहे काय? मुंबईतल्या सव्वा कोटी वा देशातल्या सव्वाशे कोटी जनतेला, अशा निकालातून सुरक्षेची हमी मिळू शकली आहे काय? पाकिस्तानात बसलेल्या वा काश्मिरात धुमाकुळ घालणार्‍या कुणा दहशतवाद्याच्या पोटात अशा निकालाने धडकी भरली आहे काय? या निकालातून नेमके कोणाला काय मिळाले? कधीतरी भारतीय समाज, इथले राज्यकर्ते वा विचारवंत अशा प्रश्नाचे उत्तर शोधणार आहेत काय? कारण यापैकी काहीही घडलेले नाही. त्या मालिकेतील पहिल्या खटल्याचा निकाल लागण्यापुर्वी लोकल रेल्वेगाड्यांमध्ये दुसरी स्फ़ोटमालिका घडलेली होती आणि आणखी काही शेकडा निरपराधांचा बळी गेलेला होता. थोडक्यात सांगायचे तर एकूणच अशा जीवधेण्या घटनांनी लोकांना आता त्यातून पर्याय नसल्याचा अनुभव गाठीशी आलेला आहे. बाकी सरकार, कायदा वा न्याय वगैरे गोष्टी म्हणजे सोपस्कार होऊन गेलेले आहेत. त्याचा समाज वा न्यायाशी काडीमात्र संबंध राहिलेला नाही. ज्यांचा अशा वेदना यातनांशी कसलाही संबंध नाही, त्यांच्या विरंगुळ्यापेक्षा अशा न्यायाला काहीही अर्थ नाही.

आता त्यात दोषी ठरलेल्या अबु सालेम या आरोपीला फ़ाशीची शिक्षा होऊ शकते किंवा नाही, यावरून चर्चा रंगलेल्या आहेत. कारण अबु सालेमला पोर्तुगाल येथून आणावे लागलेले होते. पोर्तुगाल हा युरोपियन युनियनचा घटक आहे आणि त्यामुळे तिथे पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या कुणाही परदेशी नागरिकाला फ़ाशीपासून अभय देणे, हे प्रत्येक घटक देशाचे कर्तव्य आहे. सहाजिकच अबुला मायदेशी आणताना भारत सरकारने त्याला फ़ाशी होणार नसल्याचे लिहून दिलेले आहे. अबु मुळात पोतुगाल देशात गेलाच कशाला? त्याचेही कारण आहे. असे कुठलेही गंभीर गुन्हे केल्यावर हे खतरनाक गुन्हेगार युरोपिय देशात आश्रय घेतात. म्हणजे बेकायदा मार्गाने तिथे जाऊन पोहोचतात आणि आपल्याला अन्यत्र फ़ाशी होऊ शकते, म्हणून कायद्यालाच वाकुल्या दाखवित आश्रय मिळवतात. नदीम सैफ़ी नावाचा संगीतकार खुनी असाच दिर्घकाळ इंग्लंडमध्ये दडी मारून बसला आहे. कॅसेटकिंग म्हणून ओळखल्या गेलेल्या गुलशनकुमार याच्या हत्याकांडातला नदीम आरोपी आहे. आपल्यावर गुन्हा सिद्ध होण्याची भिती वाटली, तेव्हा त्याने इंग्लंडला पळ काढला आणि तिथे फ़ाशीचे निमीत्त दाखवून आश्रय घेतला. ९/११ या न्युयॉर्कच्या हल्ल्यातील एक आरोपी असाच जर्मनीच्या ताब्यात होता. पण अमेरिका त्याला गुन्हा सिद्ध करून फ़ाशी देईल, म्हणून कधीही त्याला अमेरिकेच्या हवाली करण्यात आले नाही. अशा रितीने आता कायदा हाच गुन्हेगारी व हिंसाचाराचा खरा आश्रयदाता बनलेला आहे. सामान्य माणसाला अभय देण्यासाठीचा कायदा आता गुन्हेगाराला अभय देऊ लागला आहे आणि त्याच व्यवस्थेला आपण कायदा समजत असतो. तो बदलण्याचा वा परिणामकारक बनवण्याचा विचारही शहाण्यांना सुचत नाही. कारण अशा कुठल्याही गुन्ह्याची शिकार व्हायची पाळी ज्यांच्यावर येत नाही, ते आपल्या वतीने निर्णय घेत असतात.

कसाबने कितीही लोकांना किडामुंगीसारखे मारावे. तरी अबु सालेम वा याकुब मेमन यांना फ़ाशीतून वाचवण्यासाठी आकाशपाताळ एक केले जाते. त्यावर आक्षेप घेण्यासाठी सामान्य लोक पुढे येत नाहीत, तोपर्यंत असे सव्यापसव्य चालणारच. कायदा आपला हेतू गमावून बसला आहे. गुन्हे रोखणे व त्यासाठी गुन्हेगारीला धाक घालणे, हेच कायद्याचे खरे कर्तव्य आहे. याचा आज जगभरच्या शहाण्यांना विसर पडला आहे. अशा शहाण्यांवर जो समाज विसंबून रहातो, त्याला गुन्ह्यापासून संरक्षण मिळू शकत नाही. त्या सुरक्षेसाठी आपले प्राण धोक्यात घालणार्‍या पोलिस वा लष्करावर दगड मारणार्‍यांचे कोडकौतुक ज्या समाजात उजळमाथ्याने चालते, तिथे गुन्हेगारी शिरजोर झाल्यास नवल नाही. म्हणून विध्वंसक हत्यारे बाळगणार्‍या जगभरच्या फ़ौजा आणि सेना, आज दहशतवादापुढे शरण गेल्या आहेत. मुठभर हत्यारे घेऊन इसिस वा त्याचा म्होरक्या बगदादी अवघ्या जगाला धमकावू शकतो. त्याच्या शब्दाचा दरारा जितका आहे, तितका महाशक्ती म्हणून गणल्या जाणार्‍या अमेरिकेच्या अध्यक्षाचा आज दबदबा उरलेला नाही. पाकिस्तानात बसलेला सईद हफ़ीज भारताची झोप उडवू शकतो. कोणी युरोपिय देशात आश्रय घेऊन डझनभर लोकांची हकनाक कत्तल करू शकतो. तर तशा लोकांना देशात येण्यापासून रोखण्याचे बळ तिथल्या सत्ताधीशांमध्ये उरलेले नाही. कारण शहाण्यांनी कायदाच इतका पांगळा करून टाकला आहे, की आता गुन्हेगार आपल्यावर राज्य करू लागले आहेत, दहशतवाद जगातली सर्वात मोठी महासत्ता झालेला आहे. मग सुरक्षा कशाला म्हणायचे? न्याय कशाला संबोधावे? कुत्र्यामांजराप्रमाणे ज्यांचे जीव घेतले गेले, त्यांच्याविषयी कवडीची आस्था नसलेल्या व्यवस्थेने कुठले पुरावे वा तत्वावर निकाल दिला, म्हणून कोणता फ़रक पडणार आहे? अबु सालेमला फ़ाशी झाली वा नाही झाली, म्हणून काय होणार आहे?

मानवमुक्तीचा जंगली मार्ग

terror killings के लिए चित्र परिणाम

पुर्वीच्या काळात घरोघरी टिव्ही नव्हते आणि असले तरी इतक्या वाहिन्या नव्हत्या. त्यामुळे लोकांपर्यंत माहितीचा ओघ कमी यायचा. आता शेकड्यांनी वाहिन्या लोकांना उपलब्ध झाल्या आहेत. त्यात ठराविक विषयाला वाहिलेल्या वाहिन्याही आहेत. नॅशनल जिओग्राफ़िक वा अनिमल प्लॅनेट अशा वाहिन्यांची लोकप्रियता थोडी नाही. त्यात अनेक गोष्टी समजावून सांगितल्या जात असतात. या वाहिन्यांवर पशू व निसर्गाची सुंदर माहिती सादर केलेली असते. त्यात जंगलातल्या पशूंची संस्कृती सातत्याने बघायला मिळत असते. कुठल्याही जंगलात वाघ-सिंह वा चित्ते अशी श्वापदे भुक भागवण्य़ासाठी इतरांची शिकार करत असतात. असे दबा धरून बसलेले श्वापद आढळले वा त्याच्या नुसता सुगावा लागला, तरी झेब्रे, हरणे वा अन्य चरणारे प्राणी जीव मूठीत धरून पळ काढत असतात. कारण त्या श्वापदाने हल्ला चढवला, तर आयुष्य़ संपुष्टात येणार असते. आपल्यावरचा हल्ला न्याय्य आहे किंवा नाही, याची दाद कुठेही मागण्याची सोय त्या प्राण्यांना उपलब्ध नसते. म्हणून बिचारे जीव वाचवायला पळत असतात. हा शिकारीचा प्रकार भयंकर क्रुर वा हिंसक वाटणारा असला, तरी त्यात एक शिस्त असते. अनेकदा असे दिसते, की सिंह चित्ते शांतपणे आपल्या जागी लोळत असतात आणि जवळपास चरणार्‍या अन्य पशूंना उगाच त्रास देत नाहीत. भुक लागलेली नसेल तर कोणाची शिकार वगैरे करीत नाहीत. किंबहूना या श्वापदांच्या वागण्यावरूनही अन्य चरावू प्राण्यांना जीवाला धोका आहे किंवा नाही याचा अंदाज येत असतो. अशा श्वापदांच्या सहवासातही हे दुर्बळ जीव छान चरत असतात. भुकेपुरती शिकार वा रक्तपात हा अशा श्वापदांचा कायदा असतो. उगाच ते कोणाचा जीव घेत नाहीत. त्यांच्यापेक्षा माणूस सुसंस्कृत असतो काय? तो अकारण रक्तपात करतो ना? मग कोणाला सुसंस्कृत मानायचे, असा प्रश्न पडतो.

जंगलच्या राज्यात कुठलाही लिखीत कायदा नसतो किंवा कोणाला कसली सवलत नसते. भुक लागली मग श्वापदाने शिकार करायची आणि त्याच्या तावडीत सापडेल त्या प्राण्याने कर्तव्यबुद्धीने बळी जायचे, इतकाही ढिलेपणा नसतो. शक्य होईल तितकी आपल्या मागे लागलेल्या श्वापदाला हुलकावणी देण्याचा अधिकार त्या प्राण्याला असतो. त्यात गफ़लत झाली, तरच त्याला जीवाला मुकावे लागत असते. मानवी जगात अशी कुठली सभ्यता आहे काय? अकारण कोणाचाही जीव घेणे, ही मानवाची प्रवृत्ती श्वापदांपेक्षाही भयंकर नाही काय? अशा मानवी जगात कधी श्वापदे किंवा जंगलातील प्राणी आलेच आणि त्यांनी इथले कायदेकानु समजून घेतले, तर ती माणसे नाहीत यांचा त्यांना अभिमानच वाटेल. कारण माणूस त्यांच्यापेक्षाही हिडीस आणि पाखंडी आहे. जंगलात बळी तो कान पिळी हाच कायदा असतो. पण मानवाच्या जगात मात्र ज्याच्यापाशी बळ आहे, तोच शिकारही होऊ शकतो. कायदा त्याला बळीचा बकरा बनवू शकतो. तसे नसते तर सशस्त्र असलेले भारतीय सैनिक वा कुठल्या जिहादग्रस्त देशातले सैनिक हकनाक कशाला मारले गेले असते? जगात मागल्या काही दशकात सैनिक हे दहशतवादी घातपात्यांनी नेमबाजीचा सराव करण्यासाठी मरत असतात. दिसता़च वा नुसता संशय आला, तरी कुणालाही ठार मारण्याचे कौशल्य ज्याने आत्मसात केलेले असते, त्याला आजचे जग सैनिक म्हणून ओळखते. पण त्या सैनिकाच्या पायात कायद्याची अशी बेडी घातलेली आहे, की त्याला स्वत:चा बचाव करण्याची मोकळीक ठेवलेली नाही. म्हणजे सिंह चित्त्याच्या तावडीतून निसटण्याची वा प्रसंगी त्याच्यावर उलटा हल्ला करण्याची जी मुभा जंगलात कुठल्याही प्राण्याला असते, ती आधुनिक कायदेशीर सेनेला राहिलेली नाही. त्यामुळे आता अवघे जग हे दहशतवाद नावाच्या श्वापदाचे मोकाट रान होऊन बसले आहे.

हातात बंदुक व बॉम्ब असला, तरी त्याचा स्वसंरक्षणार्थ वापर करण्याची मुभा सैनिकाला नसेल, तर त्याला नुसतेच मरावे लागणार ना? काश्मिरात वा अन्यत्र कुठे अफ़गाण आदि प्रदेशात दहशतवाद मानल्या जाणार्‍या हिंसेचे बळी सामान्य लोक होतच असतात. पण अलिकडे त्यात सैनिकांचाही भरणा झालेला आहे. या सैनिकांनी देशाचे वा समाजाचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा आहे. पण ते कसे करायचे? त्यांनी मरणाला सामोरे जावे हीच अपेक्षा असेल, तर ते कोणाची सुरक्षा करू शकतील? काश्मिरच्या भूप्रदेशात भारताने म्हणजे तीन लाखाहून अधिक सेना तैनात केलेली आहे. ते खरे असेल तर त्या संख्येपुढे पाचसात हजार जिहादी नगण्य असतात. त्यांना मिळतील तिथून शोधून काढून, दिसतील तिथे ठार मारण्याला सेनेला काही दिवसही लागणार नाहीत. पण मागल्या दोन दशकातही ते साध्य झालेले नसेल, तर काही गडबड आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते सैनिक नालायक असायला हवेत, किंवा आळशी असायला हवेत. पण त्यापैकी कशाचाही पुरावा नाही. समस्या अशी आहे, की त्यांनी कोणावरही हल्ला करण्यापुर्वी समोरची संशयास्पद व्यक्ती घातपाती असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. ही खात्री कशी करून घ्यायची? कारण असे घातपाती आपले ओळखपत्र सैनिकांना दाखवून मगच घातपात करीत नाहीत. ते सामान्य नागरिकासारखे दिसणारे असतात आणि अकस्मात हल्लाही करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी खातरजमा होईपर्यंत सैनिकाचा बळी गेलेला असतो. परिणामी घातपाताला पायबंद घालणारी कुठलीही सेना, आजकाल बळीचा बकरा बनलेली आहे. त्या वाहिन्यांवर जंगल दाखवतात, तिथेही अशीच स्थिती असते. चित्ता मादी कुणा दुबळ्या हरणावर पंजा मारून जायबंदी करते आणि मग आपल्या पिलांना शिकारीचा खेळ शिकवू लागते, तो खेळ त्या हरणाच्या जीवाशी चाललेला असतो. त्यापेक्षा आपल्या सैनिकांची स्थिती भिन्न राहिली आहे काय?

कालपरवा काश्मिरात सहा पोलिसांचा बळी घातपात्यांनी घेतला. काहीही समजण्यापुर्वी ते मृत्यूमुखी पडलेले होते. त्यांच्या अंत्ययात्रेलाही कोणी राजकारणी नेता फ़िरकला नाही. मग ह्या पोलिसांनी कुणाच्या संरक्षणासाठी आपले प्राण वेचले? कशासाठी आपले जीव दिले? त्याचे उत्तर कोणी देऊ शकेल काय? त्यांचा जीव घातपातातून ज्यांनी घेतला, त्यांच्याशी या सैनिक वा पोलिसांचे कोणते वैर होते काय? नसेल तर त्यांनी कोणासाठी व कशासाठी मरायचे असते? दरमहा पगार मिळतो म्हणून आपला नंबर लागेल, तेव्हा मरायला सज्ज असण्याला पोलिस वा सैनिक म्हणतात काय? समोरच्या आव्हानाला सामोरे जाऊन आपल्याला त्याने मारण्यापुर्वी त्याचाच बळी घेणार्‍याला सुरक्षा दल म्हणत नाहीत का? येणार्‍या मृत्यूला निमूट कवटाळण्याला कोणी सैनिक म्हणत नाहीत. पण आजकालच्या राजकारणाने व कायद्यातील त्रुटींनी त्यालाच वस्तुस्थिती बनवून टाकले आहे. जंगलालाही लाजवणार्‍या या नव्या माणूसकीने जंगलचा कायदा अधिक सुरक्षित बनवला आहे. मानवी जगातला कायदा आता सैनिक वा पोलिसांसाठीही सुरक्षित राहिला नसेल, तर तुमचे आमचे संरक्षण कोण करणार? हाती हत्यार असून कोणी सुरक्षित होत नाही. ते हत्यार प्रसंगी आपल्याच संरक्षणाला वापरण्याचीही मुभा नसलेल्या फ़ौजा काय कामाच्या? त्यामुळे मानवी जगात सिंह आणि श्वापदांचीच शिकार होऊ लागलेली आहे. ती बघितली तर श्वापदांना नव्हेतर सामान्य जंगली पशूंनाही मानवी संस्कृतीची भिती वाटल्याशिवाय रहाणार नाही. किंबहूना अशा संस्कृतीला कंटाळून व घाबरून लोक आपणच आपल्या सुरक्षेला सिद्ध होऊ लागले आहेत. त्यातून जगातल्या कुठल्याही देशात अराजक सोकावत चालले आहे. कारण मानवी बुद्धीला पाशवी विकृतीने पछाडलेले आहे. त्यातून मुक्ती मिळण्याचा एकच मार्ग आहे, तो माणसांना जंगली कायद्यापर्यंत घेऊन जाणार आहे.

ममता समोरचे आव्हान

GJM protests के लिए चित्र परिणाम

पेटलेला दार्जिलिंग मुख्यमंत्री ममता बानर्जी यांच्या समोरचे भविष्यातले मोठे आव्हान आहे. कारण आज त्यांनाच सत्तेपर्यंत घेऊन येणारा त्यांचाच पुर्वेतिहास आठवत नसावा. गुरखा समाजाच्या वेगळ्या राज्याची मागणी नवी नाही. ती खुप जुनी आहे आणि त्या आगीला शांत ठेवण्यात यश मिळाले, म्हणूनच डाव्या आघाडीला आणि त्यांचा दुरदृष्टी नेता ज्योती बसूंना यश मिळालेले होते. देशात सर्वाधिक काळ सलग सत्ता उपभोगणारे मुख्यमंत्री, म्हणून ज्योती बसू यांची भारतीय इतिहासात नोंद झाली आहे. पण त्यांच्या नंतर कोणालाच बंगालला तितके राजकीय स्थैर्य देणे शक्य झालेले नाही. त्यांच्याच छायेत राजकारणाचे धडे गिरवणार्‍या बुद्धदेव भट्टाचार्य यांना, आपल्या मार्क्सवादी पक्षाच्या नेत्यांना हाताळता आले नाही. तिथूनच त्या पक्षाची आपल्या बालेकिल्ल्यात घसरगुंडी सुरू झाली होती. बसूंनी फ़ार उत्तम कारभार केला असा दावा कोणी करू शकत नाही. पण सुसह्य म्हणावे असा कारभार त्यांनी नक्कीच केला होता. समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्यातून त्यांचे सरकार आपली लोकप्रियता टिकवू शकले होते. काही प्रसंगी तर पक्षाच्या राजकीय भूमिकेला ज्योती बसूंनी बंगाली हितसंबंधांसाठी वाकवलेले व वळवलेले होते. पण तितके साहस भट्टाचार्य यांच्यापाशी नव्हते. म्हणूनच त्या पक्षाची पिछेहाट होत गेली. बंगाली हित वा पक्षाचे त्या राज्यातील हित खुंटीला टांगून, राजकारण खेळले गेले. त्यातून मार्क्सवादी पक्षाची बंगालवरील पकड ढिली होत गेली आणि त्याचा राजकीय फ़ायदा उठवत ममतांनी मरगळल्या कॉग्रेसचे त्या राज्यात पुनरुज्जीवन केले. मात्र सत्ता हाती आल्यावर आणि विरोधातला आवाज निकामी झाल्यावर ममता मोकाट सुटलेल्या आहेत. त्यातूनच त्यांच्या र्‍हासाचा कालखंड सुरू होतोय, असे म्हणायची वेळ आली आहे. धुमसणारा दार्जिलिंग ही त्याची सुरूवात आहे.

गुरखाभूमीचे वेगळे राज्य ही जुनी मागणी आहे आणि तिच्यातली हवा काढून घेताना ज्योती बसूंनी गुरखा बहूल प्रदेशाला स्वतंत्र प्राधिकरणाचा दर्जा देऊन मागणीतली हवा काढून घेतली होती. गुरखा अस्मितेची धार त्यातून कमी झाली, तरी डाव्यांशी गुरखा राजकारण्यांनी कधी जमवून घेतले नाही. म्हणूनच डाव्यांच्या विरोधात ममता बानर्जींनी राजकीय लढाई छेडली, तेव्हा गुरखा मुक्तीमोर्चाही ममताच्या सोबत होता. पण पहिली सत्ता हाती आल्यानंतर ममतांना आपले सहकारी सोबत राखता आले नाहीत आणि अलिकडे तो मोर्चा भाजपाच्या सोबत गेला. राज्याच्या एका कोपर्‍यातील किरकोळ प्रादेशिक राजकीय संघटनेच्या अशा पवित्र्याने ममतांनी विचलित होण्याचे कारण नव्हते. पण सत्तेची मस्ती चढली, मग किरकोळ विरोध वा प्रतिकारही शत्रू भासू लागतो. त्यातूनच त्यांनी सत्तेचा वापर करून गुरखा संघटनांना चिरडून टाकायची चढाई सुरू केली. त्यात गुरखा बहुल प्रदेशातील जिल्हे वा नगरपालिकांच्या रचनेत फ़ेरफ़ार करण्यापासून त्यांच्या अस्मितेलाच डिवचण्याची कृती होऊन गेली. अलिकडेच ममतांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सक्तीने बंगाली भाषा माध्यम लादण्याचा आदेश जारी केला. त्यातून आता दार्जिलिंग व गुरखाबहूल प्रदेश धुमसू लागला आहे. ही आपल्याला संस्कृतीपासून वंचित करणारी खेळी असल्याचा आक्षेप घेत, बहुतेक सर्व गुरखा संघटना एकवटल्या आणि त्यांनी बंगाली सक्तीच्या विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला. तर त्यांच्याशी बोलणी करून तितक्या प्रदेशाचा अपवाद करण्याने फ़ारसे काही विघडले नसते. पण ममतांनी बोलण्यांचा मार्ग सोडून सरळ पोलिसी कारवाईने आंदोलन मोडीत काढण्याचे पाऊल उचलले. त्यातून आता अवघा गुरखा परिसर धुमसू लागला आहे आणि आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. त्याचे परिणाम काय होतील, ते आज सांगता येत नाहीत. पण ही धोक्याची घंटा मात्र निश्चीत आहे.

डाव्यांपेक्षा वा ज्योती बसूंपेक्षा ममतांनी उत्तम कारभार केला, असे कोणी म्हणू शकत नाही. किंबहूना डाव्यांच्या उत्तरार्धात जशी पक्षीय गुंडगिरी बंगालभर बोकाळली होती. ती गुंडगिरीच त्यांच्या र्‍हासाला आमंत्रण ठरली होती. नंदीग्राम वा सिंगूर या दोन गावातील शेतकर्‍यांची जमिन सरकारने उद्योगासाठी अधिगृहीत करण्यामधून तिथे विरोधाचा भडका उडाला. त्यात पोलिस आणि डाव्यांचे गुंड याच्यात शेतकरी गावकरी भरडला गेला. तेव्हा त्यांची तळी उचलून ममतांनी दिर्घकालीन धरणे धरले. तिथून बंगालचे राजकारण झपाट्याने बदलत गेले. आज डाव्यांच्या गुंडगिरीसारखेच तृणमूलच्या गुन्हेगारी व अरेरावीचे प्रमाण झालेले आहे. बंगालभर तृणमूल गुंडांनी लोकांना भंडावून सोडलेले आहे. मात्र त्याचा सामुहिक आवाज उठलेला नव्हता. बारीकसारीक तक्रारी होत राहिल्या आहेत. त्याला ममताविरोधी संघटीत आंदोलन बनवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळत असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी धुमसू शकणार्‍या विषयांना चालना देणे, म्हणजे आत्मघातच आहे. पण ती चुक ममतांनी केली आहे. सरकारच्या विरोधात समाजातले लहानमोठे गट नेहमीच कुरबुर करीत असतात. अशा गटांना एकत्र येण्य़ाची संधी नाकारणे, हे सत्ताधार्‍यांचे राजकारण असते. ममतांना त्याचेच भान राहिलेले नाही. भाजपाची संघटनात्मक बांधणी नव्याने सुरू आहे. त्यामुळेच त्यांना मोठे आंदोलन इतक्यात शक्य नाही. पण गुरखा मोर्चाने पेटवलेल्या आंदोलनाचा भडका उडाला, तर राज्यात इतरत्र पसरलेल्या नाराजीला राज्यव्यापी आंदोलनाचे स्वरूप यायला वेळ लागणार नाही. त्यात उघडपणे अन्य पक्ष सहभागी झाले नाहीत, तरी त्यांचे अनुयायी वेगळ्या नावाने त्यात उडी घेऊ शकतात आणि त्यातून अराजकाची स्थिती येऊ शकते. म्हणजे डाव्या आघाडीच्या काळात जसा भडका उडालेला होता, त्याची पुनरावृत्ती होऊ शकते.

आज बंगालमध्ये पोलिस यंत्रणा आणि तृणमूलचे आक्रमक गुंड यात साटेलोटे असल्याची तक्रार भाजपाची एकट्याचीच नाही. तीच तक्रार कॉग्रेससह डाव्याकडूनही होत असते. म्हणजे राजकीय भडका उडाला, तर असे विविध गट ममता विरोधात विनाविलंब एकत्र येण्याला चालना मिळू शकते. गुरखा मुक्तीमोर्चाच्या लोकांनी तृणमूलच्या अनुयायांनी हल्ले केल्याची तक्रार आधीच केली आहे. तर तृणमूलमध्ये सहभागी असलेल्या अनेक गुरखा समाजातील कार्यकर्त्यांनी ममतांची साथ सोडून, मुक्तीमोर्चात जाण्याला वेळ लागलेला नाही. अशा स्थितीत पेटलेल्या दार्जिलिंग वा अन्य भागात गुरखा विरुद्ध बंगाली, असा संघर्ष तृणमूलच्या गुंडांमुळे निर्माण होऊ शकतो. त्यातून अराजकाची स्थिती उदभवू शकते. ही स्थिती तितक्या भागापुरती असेल. पण अन्यत्र तृणमूलचे गुंड विरोधात उर्वरीत पक्षाचे अनुयायी असाही भडका उडत जाईल. त्याची राजकीय किंमत फ़ार मोठी असेल. ज्या बुद्धीजिवी वर्गाने ममतांना सात वर्षापुर्वी उचलून धरलेले होते, तो आधीच ममताविषयी नाराजी व्यक्त करू लागलेला आहे. पत्रकार व माध्यमेही ममताच्या अनुयायांवर आसूड ओढू लागली आहेत. अशा स्थितीत चिरडण्याची मानसिकता घेऊन ममतांनी गुरखा आंदोलन हाताळले, तर ती तृणमूलच्या र्‍हासाची सुरूवात मानावी लागेल. त्याचा अंदाज सत्तेची मस्ती चढलेली असताना येत नाही. हे अखिलेश यादव ममतांना नेमके समजावू शकतील. कारण ममताचा कारभारही अखिलेशच्या शैलीनेच चालला आहे. उत्तरप्रदेशचे निकाल लागण्यापर्यंत त्यांचाही आवाज व अरेरावी ममतासारखीच होती. मतदाराच्या हातातली लाठी दिसत नाही. पण ती पाठीवर पडते, तेव्हा उठून उभे रहाण्याचेही त्राण शिल्लक उरत नाही. लोकशाहीची हीच जादू आहे. गुरखा आंदोलन हे ममता समोरचे सात वर्षातले पहिले व गंभीर आव्हान आहे. चहाचे मळे पेटू लागले, तर ते चहाच्या पेल्यातले वाटणारे हे वादळही बंगालला राजकीय दणका देऊ शकेल.

Monday, June 19, 2017

कॉग्रेस आणि राष्ट्रपती

indira v v giri के लिए चित्र परिणाम

सोमवारी आपल्या पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक घेऊन भाजपाने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहिर केला. बिहारचे विद्यमान राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्याला आता कुठल्या पक्षाचा पाठींबा आहे आणि कोणाचा विरोध आहे, ते समोर येईलच. पण मागला महिनाभर यासाठी ज्या चर्चा रंगल्या होत्या, त्या खुप मनोरंजक होत्या. कारण अशा चर्चा घेणार्‍या व रंगवणार्‍या किती शहाण्यांना, या पदासाठी झालेल्या निवडणूकांचा इतिहास ठाऊक आहे, याचीच शंका येते. राष्ट्रपती कसा असावा? तो पक्षनिरपेक्ष असावा. त्याला राज्यघटनेची जाण असावी. तो पक्षाचा प्रतिनिधी नसतो. तो सर्वसहमतीने निवडला जावा. यासारखे शहाणपण अकस्मात पत्रकार व माध्यमांसह विरोधी पक्षांना का सुचावे? यापुर्वी पंतप्रधानपदी बसलेल्या किती व्यक्तींनी तसे प्रयास केलेले होते? मोदी विरोधी पक्षांना विश्वासात घेत नाहीत, अशी तक्रार सातत्याने होत असते. पण तसे विरोधकांना विश्वासात घेऊन देशाचा कारभार करणारे कोण महान पंतप्रधान आजवर होऊन गेले? त्यापैकी कोणी विरोधकांशी सल्लामसलत करून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवला होता? त्याचेही दाखले यानिमीत्ताने समोर मांडले गेले असते, तर बरे झाले असते. पण त्यांचे दुर्दैव असे, की खोट्या गोष्टींचे कधी कुठे पुरावे नसतात, की दाखलेही नसतात. मग त्यांनी तरी बिचार्‍यांनी ते कुठून आणावेत? राष्ट्रपतींची गुणवत्ता किती होती, हेही अनेकांना ठाऊक नाही. इंदिराजींच्या काळात राष्ट्रपतींवर रबरी शिक्का असल्याचे शिकामोर्तब झालेले होते. पण तेव्हा ज्यांचा जन्मही झाला नव्हता, किंवा तेव्हाच्या राजकीय घडामोडींचा इतिहासही ज्यांना वाचण्याची गरज भासलेली नाही; असे दिवाळखोर आजचे विश्लेषक असतील, तर त्यांच्याकडून कुठली अपेक्षा बाळगता येईल? म्हणूनच या निमीत्ताने काही जुन्या राष्ट्रपती व निवडणुकांच्या आठवणी जागवणे उपकारक ठरू शकेल.

१९६९ सालात तात्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसे्न यांचे आकस्मिक निधन झाले होते. सहाजिकच उपराष्ट्रपती असलेले वराह गिरी व्यंकट गिरी यांना राष्ट्रपती म्हणून काम बघावे लागत होते. त्याच दरम्यान कॉग्रेस पक्षात श्रेष्ठी व पंतप्रधान यांच्यात बेबनाव निर्माण झालेला होता. इंदिराजी तेव्हा पंतप्रधान होत्या आणि त्यांचे पक्षाच्या संसदीय मंडळ व कार्यकारिणीशी अजिबात पटत नव्हते. सहाजिकच राष्ट्रपती पदाचा नवा उमेदवार ठरवण्यावरून खडाजंगी, त्याच पक्षात उडालेली होती. श्रेष्ठींनी नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी निश्चीत केली होती. पण ती इंदिराजींना मान्य नव्हती. म्हणूनच त्यांनी पक्षाची शिस्त पाळण्यासाठी रेड्डी यांचा अर्ज भरला आणि प्रत्यक्षात त्यांच्या विरोधातही आपला उमेदवार पुढे केला. गिरी यांना इंदिराजींनी पद सोडून उभे रहाण्यासाठी चिथावणी दिली आणि देशाचे तात्कालीन सरन्यायाधीश हिदायतुल्ला राष्ट्रपती म्हणून काम बघू लागलेले होते. मग राजकारणाला रंगत आलेली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार रेड्डी यांनाच मते देण्याचा फ़तवा काढण्याचा पक्षनेतृत्वाचा आग्रह इंदिराजींनी फ़ेटाळून लावला. कॉग्रेसच्या आमदार खासदारांनी ‘विवेकबुद्धी’चे स्मरण करून योग्य उमेदवाराला मत द्यावे; असे आवाहन इंदिरा गांधी यांनी केले. त्याचा अर्थ उघड होता, की त्यांना मानणार्‍या कॉग्रेस आमदार खासदारांनी गिरी यांना मत द्यावे, असेच इंदिराजींचे आवाहन होते. झालेही तसेच व त्या निवडणूकीत कॉग्रेसचे उमेदवार संजीव रेड्डी यांचा दारूण पराभव झाला. तर गिरी चौथे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले होते. पण केवळ कॉग्रेसच्या मतावर गिरी निवडून आलेले नव्हते. त्यांना निवडून आणण्यासाठी पुरोगामी डाव्या पक्षांनी हिरीरीने पुढाकार घेतला होता. कॉग्रेसपेक्षाही बिगर कॉग्रेसी मतांवर इंदिराजींचा हा उमेदवार जिंकला आणि त्यातून गांधी घराण्याचे राज्य देशात प्रस्थापित झाले.

आपण सत्ताधारी कॉग्रेस पक्षात दुफ़ळीला खतपाणी घातले म्हणून तेव्हा तमाम पुरोगामी पक्ष कमालीचे सुखावलेले होते. कारण त्यांच्याच मतांवर कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी दणकून आपटले होते आणि कॉग्रेसच्या बंडखोर पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू गिरी राष्ट्रपती झालेले होते. त्या दुफ़ळीवर नंतरच्या काळात शिक्कामोर्तब झाले आणि इंडीकेट व सिंडीकेट असे कॉग्रेसचे दोन तुकडे पडले होते. त्याला राष्ट्रपती निवडणुक कारणीभूत झाली. मग लोकांची सहानुभुती व विश्वास संपादन करण्यासाठी इंदिराजींनी अचानक बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण केले आणि स्वातंत्र्योत्तर काळातही चालू असलेले संस्थानिकांचे तनखे बंद करून टाकले. मग काय, पुरोगामी डाव्यांना तर देशात लालबावट्याचेच राज्य आल्याचा साक्षात्कार झाला. दुफ़ळी माजलेल्या कॉग्रेसमधील इंदिरा गटाचे अल्पमत झाकण्यासाठी सर्व डावे इंदिराजींच्या मागे ठामपणे उभे राहिले. या निवडणूकीचा आणखी एक लाभ म्हणजे भारतीय लोकसभेत प्रथमच कुठल्या तरी एका पक्षाकडे ५५ खासदार असल्याने पहिला विरोधी नेता नेमला गेला. अल्पमतात गेलेल्या सिंडीकेट उर्फ़ संघटना कॉग्रेसच्या गटात ६० च्या आसपास खासदार आलेले होते. त्यांचे नेते राम सुभग सिंग यांना लोकसभेत विरोधी नेता म्हणून मान्यता मिळाली. भारतीय संसदेतील तो पहिलावहिला विरोधी नेता ठरला. आज कॉग्रेसला तितकीही मान्यता उरलेली नाही. पुढे इंदिराजींनी लोकमानसावर असे गारूड केले, की पुरोगामी पक्षांच्या मेहरबानीवर विसंबून रहाण्याचा त्रास त्यांनी लौकरच संपवला. १९७० अखेरीस त्यांनी लोकसभाच एक अध्यादेश काढून विसर्जित केली आणि देशातली पहिली मध्यावधी संसदीय निवडणूक झालेली होती. चौथ्या राष्ट्रपती निवडणूकीच्या निमीत्ताने इतके दिर्घ परिणामकारक राजकारण नंतरच्या काळात घडले. तेव्हा निवडून आलेल्या गिरी यांची पंतप्रधानांच्या दारात काय लायकी होती?

लोकसभा विसर्जित झाली आणि नंतर समाजवादी लाटेवर स्वार झालेल्या इंदिराजींनी पुरोगामी पक्षांना त्या मध्यावधी निवडणूकीय पुरते लोळवले. दोन तृतियांश बहूमत घेऊन इंदिराजी तेव्हा जिंकल्या होत्या आणि संघटना कॉग्रेसच्या अस्ताने सुखावलेल्या पुरोगामी पक्षांचाही पुरता धुव्वा उडाला होता. त्याच दरम्यान पाकिस्तानात राजकारण तापले आणि युद्धाचा प्रसंग ओढवला होता. त्यात पाकिस्तानची फ़ाळणी होऊन गेली आणि इंदिराजींना दुर्गा संबोधण्याची वेळ वाजपेयी यांच्यावर आली. मग त्यांनी देशभरच्या विधानसभा बरखास्त केल्या आणि तिथे कॉग्रेसला अभूतपुर्व बहूमत मिळवून दिले. थोडक्यात इंदिराजी म्हणजे कॉग्रेस, असे चित्र निर्माण करण्यात त्यांना यश आले आणि पुढल्या काळात इंदिराजी व त्यांचे घराणे म्हणजे कॉग्रेस असा सिद्धांत निर्माण झाला. आजही राहुल, सोनिया वा प्रियंका अशा घराणेशाहीची चर्चा चालते, त्याचा आरंभ त्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडीतून झालेला आहे. आज मोदींनी काय करावे असे शहाणपण शिकवणार्‍यांना इंदिराजी आठवत नाहीत. मोदींनी आपला उमेदवार निदान पक्षाशी सल्लामसलत करून ठरवला आहे. इंदिराजींनी पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला. पण त्याला मते देण्याच्या विरोधात उभ्या राहून, त्यालाच पराभूत करण्यातून त्यांचे राजकारण झळाळले होते. त्यातून त्यांचे राजघराणे लोकशाहीतही प्रस्थापित होऊ शकले. त्या राष्ट्रपती निवडणूकीने कॉग्रेस पक्षाची संघटना मोडून टाकली, पक्षाची शिस्त निकालात काढली. पण आणखी एक गोष्ट विसरता कामा नये. कॉग्रेस पक्षात इंदिराजींनी ‘विवेकबुद्धी’ वापरण्याचे केलेले ते शेवटचे आवाहन. त्यानंतरच्या काळात कॉग्रेस आणि विवेकबुद्धी यांचा सूतराम संबंध राहिला नाही. त्या इतिहासाशी तुलना केली, तर नरेंद्र मोदी खुपच सौम्य व समावेशक पंतप्रधान मानावे लागतील. इंदिराजींनी निवडून आणलेल्या त्या राष्ट्रपती गिरींची प्रतिष्ठा काय होती, ते त्यांच्याच एका ऐतिहासिक फ़ोटोतून जगाने बघितलेले आहे.

लाथा आणि बाता

Image result for farmers agitation maharashtra

शेतकरी संप तात्पुरता का होईनाम थांबला हे बरे झाले. कारण असे संप वा आंदोलन फ़ार काळ चालू शकत नसते. सामान्य लोकांना आपल्या पोटपाण्याच्या विवंचना असतात. म्हणूनच कामधंदा सोडून फ़ारकाळ आंदोलनाच्या मागे धावता येत नाही. सहाजिकच अशा दुबळ्या विरोधाला मोडून काढणे शासनाला सहजशक्य असते. म्हणूनच आटोपशीर वेळेत आंदोलन व्हावे आणि त्यात ठराविक लाभ पदरात पडून ते निकालात निघावे, अशी अपेक्षा असते. मुंबईच्या गिरणी कामगारांचे काय झाले, ते आपण बघून आहोत. डॉ. दत्ता सामंत यांच्यासारख्या लढावू नेत्याच्या मागे गिरणी कामगार धावत सुटला आणि आपल्यासोबत गिरणीधंदाही घेऊन बुडाला. त्याचे हेच कारण होते. वास्तविक त्याच्याही पुर्वी गिरणी कामगारांची अनेक आंदोलने झाली. किंबहूना देशातील कामगार वर्गाच्या लढाईचा इतिहासच मुंबईच्या गिरणी कामगाराने सुरू केला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पण कम्युनिस्ट वा अन्य पक्षीय राजकारण्यांनी केलेले गिरणी संप कामगारांना काही मिळवून देणारे ठरले. उलट लढवय्या म्हणून दत्ता सामंत पुढे आले आणि त्यांच्या सवयीप्रमाणे प्रदिर्घ संपाचे हत्यार उपसून त्यांनी कामगारालाच कायमचा देशोधडीला लावले. कारण त्या धंद्यात तितका जीव नव्हता आणि संपात टिकून रहाण्याची कामगारांची शक्ती मर्यादित होती. एका पिढीला तो संप बरबाद करून गेला, हा इतिहास लक्षात घेतला, तर अकस्मात सुरू झालेल्या शेतकरी संपाची वेळेत सांगता होण्याला किती महत्व आहे, ते लक्षात येऊ शकेल. कारण ऐन पावसाळा सुरू होत असताना शेतीच्या कामांना प्राधान्य असते आणि त्याचवेळी लढा लांबला, तर त्यात सहभागी होणार्‍यांना काढता पाय घेऊन बाजूला होणे भाग झाले असते. थोडक्यात लांबलेला संप बारगळला, अशीच स्थिती झाली असती. तो प्रसंग टळला आणि आता प्रत्येक राजकीय पक्ष श्रेय घेण्याची धडपड करू लागला आहे.

आपल्यामुळेच शेतकरी संप यशस्वी झाला किंवा शेतकर्‍याच्या पदरात काही पडले; असे सांगणारे अनेक दावे आता सुरू झाले आहेत. त्यात शिवसेनेने आपल्यामुळेच शेतकर्‍याला न्याय मिळू शकला, असा केलेला दावा खरेच हास्यास्पद आहे. आपण मंत्रीमंडळात होतो आणि आपणच सरकारला लाथा घातल्या, म्हणून मागण्या पदरात पडू शकल्या, असाही सेनेचा दावा आहे. अर्थात असा दावा सेनेच्या कोणा मंत्र्याने वा नेत्याने केलेला नाही. पक्षाच्या मुखपत्रातून तसा दावा करण्यात आला आहे. त्यात गंमतीची गोष्ट अशी, की आदल्याच दिवशी पक्षाच्या एका नेत्याने कुठल्याही क्षणी सरकारचा गळा दाबण्याची भाषा केलेली होती. तिलाच घाबरून सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या असतील, असे त्या मुखपत्राला वाटणे स्वाभाविक आहे. कारण आजकाल शिवसेना मुखपत्रापुरती मर्यादित राहिली आहे. कार्यकर्ता वा शाखांमध्ये शिवसैनिकांची वर्दळ कमी झालेली आहे. पक्षप्रमुखांनी दुष्काळी भागला भेट देण्याचे काम नेमून दिले असताना, पक्षाचा आमदार सिक्कीमला पर्यटनाला निघून जातो आणि भलत्याच कुणाला तरी तोतया आमदार म्हणून पेश करायची नामुष्की येते. अशी जिथे संघटनेची अवस्था आहे. तिथे मंत्रीमंडळात बसून खुर्च्या उबवत नाही वा अंडीही घालत नाही, असली भाषा पोकळ असते. शेतकर्‍यांसाठी लढणार्‍या शिवसेनेच्या आमदाराला तोतयेगिरी करावी लागली, त्यातून लढ्यातला सेनेचा सहभाग किती होता, त्याचा अंदाज येऊ शकतो. अशी स्थिती असताना आपल्यामुळेच मागण्या पदरात पडल्याचे दावे करण्याची गरज नव्हती. कारण कसोटीची वेळ आली, तेव्हा सेनेने काय केले, ते अवघ्या विधानसभेने बघितलेले आहे. किंबहूना विरोधकांनी उक्ती कृतीतला शिवसेनेचा दुटप्पीपणा तिथे विधानसभेत बोलूनही दाखवलेला आहे. शिवसेनेचा प्रत्येक आमदार तेव्हा खुर्ची उबवत बसला व अवाक्षर बोलला नाही, ही वस्तुस्थिती जगाला ठाऊक नाही काय?

आपण सत्तेसाठी नाही वा सत्तेत बसून सरकारला लाथा घातल्या, अशा फ़ुशारक्या मारण्यात काही अर्थ नाही. तसे असते तर मागल्या अधिवेशनाता शिवसेनेने फ़डणवीस सरकार समोर पेच उभा केला असता. पण तसे झाले नाही. राष्ट्रवादी व कॉग्रेसचे आमदार शेतकर्‍यांच्या समस्या घेऊन सभागृह डोक्यावर घेत असताना, शिवसेनेचे वाघ मुग गिळून गप्प बसले होते. म्हणून तर शेतकर्‍यांना आपल्या न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले. पुणतांब्याच्या काही शेतकर्‍यांनी मुसंडी मारून रस्त्यावर उतरण्याचे धाडस केले. त्याला कोणी राजकीय पक्ष नेतृत्व देऊ शकला नव्हता. अगदी शेतकरी संघटना म्हणून राजकारणात आलेल्या पक्षालाही शेतकर्‍यांचे आंदोलन पेटवण्याची हिंमत झालेली नव्हती. पण एका गावातल्या शेतकर्‍यांनी ते साहस केले आणि त्याची सर्वत्र प्रतिक्रीया उमटत गेली. त्या प्रतिक्रीयेलाच मग काही लोकांनी आंदोलनाचे स्वरूप दिले होते. त्यामुळे कुठल्याही पक्षाने शेतकर्‍यांच्या न्यायासाठी आपण़च पुढे होतो, असा दावा करण्यात अर्थ नाही. गळा दाबण्याची वा लाथा घालण्याची भाषा म्हणूनच हास्यास्पद आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी अकस्मात या समेट घडवून आणण्यात पुढाकार घेण्यामागचे राजकारण समजून घेणे लाभदायक ठरू शकेल. अजून दोन वर्षे पुर्ण शिल्लक असताना मुख्यमंत्र्यांना लोकमत विरोधात जाण्याची कुठलीही भिती नव्हती. शिवाय नुसत्याच वल्गना करणार्‍या शिवसेनेकडून सरकारचा पाठींबा काढून घेण्याची आजकाल मुख्यमंत्र्यांना अजिबात भिती उरलेली नाही. म्हणूनच घाबरून फ़डणवीस यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या असतील, अशी शक्यता शून्य आहे. कारण पावसाळा तोंडावर असताना शेतकरी आंदोलन अधिक काळ लांबण्याचीही भिती नव्हती. मग त्यांनी आंदोलनाच्या मागण्यांना शरण जाण्याचा पवित्रा कशाला घेतला असेल? त्यामागे काही राजकारण आहे काय?

अर्थातच फ़डणवीस व त्यांचा पक्ष भाजपा, राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच कुठल्याही हालचाली करीत असतो. त्यात आपले राजकीय लाभ कशात आहेत, त्यानुसारच निर्णय घेतले जात असतात. दोन वर्षांनी आजच्या शेतकरी संतापाचे प्रतिबिंब मतदानात पडू शकत नाही. पण लगेच काही महिन्यांनी मतदान होणार असेल, त्यामध्ये मात्र नक्कीच शेतकर्‍यांचा राग व्यक्त होऊ शकतो. तशी शक्यता असेल तर आज शेतकर्‍यांना दुखावणे मुख्यमंत्र्याला परवडणारे नव्हते. याचा अर्थच असा होतो, की नजिकच्या काळात महाराष्ट्रामध्ये मतदान होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी गृहीत धरलेली आहे. ते मतदान कुठले असू शकते? मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला भाजपा लागलेला असल्याच्या बातम्या उत्तरप्रदेश निकालापासून आलेल्या आहेत. मागल्या तीन वर्षात शिवसेनेकडून सतत अडवणूक होत असतानाही फ़डणवीस यांनी ठामपणे सरकार चालवून दाखवलेले आहे. पण बहूमताच्या आकड्यांनी त्यांना सतावलेले आहे. त्यासाठी सेनेला सोबत राखण्याची कसरत त्यांना करावी लागलेली आहे. त्यातून बाहेर पडायचे तर २५ आमदार अन्य पक्षातून फ़ोडणे किंवा सरळ मध्यावधी घेऊन बहुमताचा जुगार खेळणे, असे दोन पर्याय त्यांच्यापुढे आहेत. त्यातला पहिला पर्याय कटकटीचा आहे. तर दुसरा पर्याय सुटसुटीत आहे. जे आमदार फ़ुटायला तयार आहेत त्यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा आहे. भाजपाचा जोर असल्याने अन्य पक्षातले ४०-५० आमदार मध्यावधी आल्यास भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर करू शकतात. अशा रितीने १६०-१७० आमदारच भाजपाचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले, तर भाजपाला बहूमताचा जुगार यशस्वीपणे खेळता येऊ शकतो. गुजरातची विधानसभा निवडणुक वर्षाच्या शेवटी व्हायची असून, तेव्हाच महाराष्ट्राची मध्यावधी उरकली जाऊ शकते. तेच लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना गाजर दाखवले आहे.

मागल्या काही दिवसात अनेक स्थानिक निवडणुका पार पडल्या. त्यात प्रत्येक वेळी कॉग्रेस वा राष्ट्रवादीला इर्षेने लढतानाही कोणी बघितलेले नाही. सहाजिकच अधिकृत विरोधी पक्ष म्हणून जे पक्ष आज समोर आहेत, त्यांना भाजपाला पराभूत करून सत्ता बळकावण्य़ाची इच्छाच राहिली नसल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. तर मित्रपक्ष म्हणून सोबत घेतलेल्या शिवसेनेशी कुठल्याही परिस्थितीत युती करायची नाही, असे भाजपाने आधीच ठरवलेले आहे. उलट भाजपाला पराभूत करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाची कुठल्याही थराला जाण्याची तयारी आहे. पण ही तयारी मैदानात दिसून येत नाही. मुंबईत आपल्या बालेकिल्ल्यात भाजपाने इतकी मुसंडी मारल्यावरही सेना सावध झालेली नाही. सहाजिकच मध्यावधी निवडणुका घेतल्या, तर सेनेलाही गाफ़ील ठेवून एकहाती बहूमत मिळवण्य़ाचा विचार भाजपामध्ये सुरू असल्यास नवल नाही. किंबहूना त्यासाठीच शेतकरी संपाची गंभीर दखल घेऊन आधीच्या सरकारला जमले नाही, त्यापेक्षा अधिक काही करून दाखवल्याचे राजकारण फ़डणवीस खेळलेले आहेत. शिवसेना लाथा मारण्याच्या बाता मारत असताना भाजपाने मध्यावधीची तयारी केलेली आहे. त्यात मरगळलेल्या विरोधी व मित्रपक्षांच्या श्रेय उकळण्याच्या गमजांनी विचलीत होण्याचे भाजपाला कारणच नाही. किंबहूना अशाच वल्गना करीत मित्राने रहावे आणि विरोधकांनी तितकेच बेसावध रहावे; असे फ़डणावीशी राजकारण राज्यात चालले आहे. त्याचा अंदाज कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या धुर्त नेत्यांना आलेला असला, तरी ते लढण्याची इच्छाच गमावून बसले आहेत. शिवसेना नुसत्या बाता व लाथा मार्ण्यात गर्क आहे. पण कोणाला मुख्यमंत्री अकस्मात इतके लवचिक कशाला झाले, त्याचा शोधही घ्यावा असे वाटलेले नाही. मध्यावधीचा फ़ास आवळला गेल्यावरच बहुधा लाथा झाडणार्‍यांना जाग येऊ शकेल. पण तेव्हा खुप उशीर झालेला असेल.

गोमांस आणि टोपी

Image result for modi refused cap

देशाच्या विविध भागात व राज्यात सध्या गोमांस भक्षणाचा विषय तापत ठेवला गेला आहे. त्यावरून जितकी दिशाभूल करायची तितका बौद्धिक विपर्यास होत असतो. यातला बुद्धीवाद नाटकी तितकाच ढोंगी असतो. केंद्र सरकारने दुभत्या जनावरांच्या खरेदीविक्रीचे नियंत्रण करण्यासाठी एक आदेश जारी केला. तर त्यालाच गोवधबंदी वा गोमांस खाण्यावर बंदॊ ठरवून मोठे नाटक रंगवण्यात आले. जेव्हा त्यातले सत्य समोर आले, तेव्हा अशा शहाण्यांची बोलती बंद झाली. दुर्दैव म्हणजे अशा भामट्यांचा युक्तीवाद तपासून बघितला जात नाही. म्हणूनच अशी नाटके नित्यनेमाने चाललेली असतात. गोरक्षणाच्या निमीत्ताने इतरांच्या खाण्यापिण्यावरही सरकार निर्बंध आणू बघते, असा सरसकट आरोप झाला. त्यातून असे भासवले गेले की गोमांस खाणारे लोक या देशात आहेत आणि त्यांच्या त्या खाण्याला सरकार प्रतिबंध घालते आहे. हा देश लोकशाही असून तिथे प्रत्येकाला आपल्या खाण्यापिण्याची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे. ते कोणी नाकारलेले नसतानाच गदारोळ करण्यात आला. पण गमतीची गोष्ट अशी, की ज्यांनी हा हलकल्लोळ माजवला होता, तेही इतरांच्या आवडीनिवडीवर आपली हुकूमत नेहमी लादण्यात आघाडीवर असतात. म्हणजे अमूक एक योग्य वा अमूक एक गुन्हा, हे ठरवण्याचा अधिकार आपल्यालाच मिळालेला आहे अशा थाटात ही बुद्धीमंत मंडळी कल्लोळ करत असतात. यांना कायद्याने कुठलाही अधिकार दिलेला नसताना, त्यांनी तरी इतरांच्या आवडीनिवडी ठरवण्याचे आग्रह कशाला धरावेत? उदाहरणार्थ विविध सरकारी संस्था वा उपक्रमात कुणाची नेमणूक करावी, याचा अधिकार सत्तेत असलेल्या राज्यकर्त्याचा असतो. त्याच्यावर आपली आवडनिवड लादण्याचे उद्योग सातत्याने कोण करत असतो? कोणी कुठली टोपी घालावी वा घालू नये, याचे आग्रह कोण धरत असतात? भाषा वा शब्दांची आवडनिवड कोण लादत असतो?

सत्तांतर झाल्यावर पुण्याच्या फ़िल्म इन्स्टीट्यूट संचालकपदी ज्या व्यक्तीची निवड सरकारने केलेली होती, त्यावरून आक्षेप घेत कोणी काहूर माजवले होते? अमूक एक व्यक्ती वा अमूक एका गटातलीच व्यक्ती त्या पदावर नेमण्याची सक्ती केल्यासारखे नाटक कोणी रंगवले होते? मोदी सरकारने आपल्या अधिकारात ती नेमणूक केलेली होती. तो अधिकार कायद्याने त्या सरकारला दिलेला आहे. त्यात अमूक एक व्यक्ती नको यासाठी आकाशपाताळ एक करणारे, पंतप्रधान मोदींवर वा सरकारवर स्वत:ची आवडनिवड लादत नव्हते काय? की देशातली सत्ता ज्याच्याकडे जनतेने लोकशाही मार्गाने सोपवलेली आहे, त्याला लोकशाहीने बहाल केलेले अधिकार नसतात? उलट मुठभर बुद्धीमंतांनाच तसे जन्मदत्त अधिकार असतात? मोदींनी या देशातील करोडो मतदारांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यामुळेच जनतेने आपली आवडनिवड त्यांच्याकडे सोपवलेली आहे. मग त्यात ढवळाढवळ करणारे कुठल्या लोकशाही व स्वातंत्र्याविषयी आक्षेप घेत असतात? दिर्घकाळ त्या फ़िल्मी संस्थेच्या नेमणूकीवरून आंदोलन करण्यात आले व तिथले कामकाज ठप्प करण्यात आले. तेव्हा सरकारवर आपली आवडनिवड लादणारे आज खाण्यापिण्याचा स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहेत. त्याचा अर्थ इतकाच असतो, की सक्ती वा जबरदस्ती करण्याचे अधिकार या लोकांना परस्पर मिळत असतात. त्याला कायद्याच्या संपतीची गरज नसते. पण ज्याला लोकांनी मतातून अधिकार सोपवले आहेत, त्याला मात्र कुठलीही आवडनिवड असता कामा नये. यांच्यावर कायद्याने कुठली सक्ती होता कामा नये आणि यांच्या इच्छा आकांक्षांसाठी इतरांच्या निवडीचा गळा घोटला पाहिजे. खरेतर सामान्य भारतीय जनतेला अशा बुद्धीवादी भंपकपणाचा इतका कंटाळा आलेला आहे, की  हेच नाटक संपवण्यासाठी मोदींना लोकांनी भरभरून मते दिलेली आहेत.

पाच वर्षापुर्वी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि विधानसभा निवडणूक जवळ आल्याने त्यांनी सद्भावना यात्रा आरंभलेली होती. राज्यभर फ़िरलेल्या यात्रेमध्ये त्यांनी लाखो सामान्य लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी संवादही साधला होता. अशाच एका भेटीगाठीच्या निमीत्ताने मंचावर येऊन त्यांना एक मौलवी भेटलेले होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर या मौलवीने खिशातून एक धार्मिक टोपी काढली आणि मुख्यमंत्र्याच्या माथ्यावर घालण्याचा प्रयास केला. त्याला तसाच रोखून मोदी यांनी टोपी स्विकारण्यास नकार दिला होता. पुढल्या काळात कित्येक महिने हे चित्रित दृष्य़ वाहिन्यांवरील ‘व्हायरल सच’ बनलेले होते. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी एका मुस्लिम मौलवीकडून टोपी स्विकारण्यास नकार दिला. म्हणजे जाणू मोठाच गुन्हा केला असल्याच्या थाटात इस्लामचा अवमान म्हणून हलकल्लोळ करण्यात आला होता. आपल्या डोक्यावर कुठली टोपी असावी किंवा नसावी, हे ठरवण्याचा अधिकार गुजरातच्या मुख्यमंत्र्याला नसतो काय? आपल्या डोक्यावर काय असावे, याची आवडनिवड मोदींनी करायची की पुरोगामी बुद्धीमंतांनी करायची? त्यावरून मोदींना लाखो वेळा जाब विचारण्याचे रंगलेले नाटक, निवडीचे स्वातंत्र्य नाकारणारा तमाशा नव्हता काय? त्यात जी मंडळी हिरीरीने सहभागी झाली होती, तीच मंडळी आज खाण्यापिण्याच्या निवडीविषयी आकाशपाताळ एक करताना दिसतील. तेव्हा आपण एका मुख्यमंत्र्यावर आपली निवड लादण्याचा अट्टाहास करत आहोत, याचेही भान या शहाण्यांना नव्हते, की त्यांना मुळातच सामान्य बुद्धीच नसावी? मोदींच्या माथी टोपी कोणती, त्याची सक्ती ही लोकशाही असते आणि देशातल्या सरकारने काही गोष्टी ठरवल्या, तर त्या कायदेशीर असूनही लोकशाहीला मारक असतात. बदमाशीचा यापेक्षा गलिच्छ पुरावा असू शकत नाही. याच खोटेपणामुळे अशा वृत्तीच्या सर्वांना लोकांनी नाकारले आहे.

देशाच्या वा समाजाच्या नितीमत्तेचे अधिकार आपल्याकडे असल्याच्या थाटात जगणारा हा मूठभर वर्ग आहे. जो स्वत्त:ला कुठल्याही कायदेशीर वैधतेशिवाय जनतेच्या माथी मारण्याचे नाटक रंगवत असतो. कधी तो साहित्यिक कलाकार म्हणून पुढे येतो, तर कधी तो विचारवंत बुद्धीमंत म्हणून मुखवटे चढवत असतो. वास्तवात असे लोक राजकीय बांधिलकीने राजकारणाशी जोडलेले असतात आणि साधूसंत असल्याच्या थाटात सत्तेलाही धमकावत असतात. त्यांना कुठल्याही विचारांशी वा नितीमत्तेशी कर्तव्य नसते. सत्तेने आपल्याला सुखसोयी द्याव्यात आणि आपल्या मौजमजेची सज्जता राखावी, अशी त्यांची खरी मागणी वा अपेक्षा असते. त्यात व्यत्यय आला वा खंड पडला, मग सत्ताधार्‍यांची नैतिकता ढासळल्याचे स्वप्न त्यांना पडते. मग बुद्धीच्या कसरती करून ते पापपुण्य़ाचे थोतांड माजवू लागतात. मग कधी टोपी घालण्याचे निमीत्त शोधले जाते, तर कधी दिल्लीनजिक कुणा मुस्लिम नागरिकाला गोमांस खाल्ल्याच्या आरोपाने मारले जाण्याचे निमीत्त पुरते. त्यांना अशी निमीत्ते हवी असतात. पुर्वी असे पाखंडी लोक समाजात पाप वाढले म्हणून कलियुग आल्याची आवई उठवायचे. आजकालचे पुरोगामी आणिबाणी अवतरल्याची अफ़वा फ़ैलावून स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा आक्रोश सुरू करतात. वास्तवात त्यांच्या नैतिक अधिकाराची बाजारातील पत घसरलेली असते आणि त्यांच्या पापपुण्याच्या पाखंडाला कोणी जुमानिसा झालेला असतो. तसे नसते तर मोदींच्या टोपी नाकारण्याचे काहूर माजवूनही मोदीच पंतप्रधान झालेच नसते. आताही गोमांसभक्षण अथवा गोरक्षणाच्या गदारोळातून अशा भुरट्या भोंदू भगतांनी कितीही काहुर माजवले, म्हणून काहीही फ़रक पडताना दिसत नाही. त्यामुळे अशा पुरोगामी शहाण्यांची अवस्था कालबाह्य झालेल्या तांत्रिक मांत्रिकासारखी केविलवाणी झालेली आहे.

पाकची पोकळ पोपटपंची

Image result for general rawat

कॉग्रेसचे एक राष्ट्रीय प्रवक्ता संदीप दिक्षीत यांनी भारताच्या भूदलाचे सेनापती जनरल बिपीन रावत यांना ‘सडक छाप गुंडा’ असे संबोधून, कॉग्रेस किंवा पुरोगामी भूमिकेची साक्ष दिली आहे. गेल्या दोन वर्षात आपल्या देशात राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेम हे शब्दही आक्षेपार्ह बनलेले आहेत. अन्य कोणी आम्हाला राष्ट्रप्रेम शिकवू नये, असा प्रत्येक पुरोगाम्याचा दावा आहे. कारण राष्ट्राची चिंता सर्वाधिक अशा पुरोगाम्यांनाच असून, सामान्य माणसाच्या भाषा वा व्याख्येत त्यांचा राष्ट्रवाद किंवा राष्ट्रप्रेम बसेनासे झाले आहे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने देशाशी वा देशाच्या परंपरांशी संबंधित असेल, त्याला राष्ट्रवाद वा राष्ट्रप्रेम मानले जाते. पण पुरोगामी भाषेत जे म्हणून काही राष्ट्रीय परंपरेतील असेल त्याची शरम वाटणे, किंवा त्याची निर्भत्सना करणे, म्हणजे राष्ट्रप्रेम असते. सहाजिकच संदीप दिक्षीत यांनी त्याच परिभाषेमध्ये आपले राष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. ज्या सेनापतीने काश्मिरात उच्छाद मांडलेल्या दंगेखोर वा घातपात्यांना धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे, त्याच्याविषयी तिरस्काराची भाषा वा भावना, हा आता पुरोगामी राष्ट्रवाद झाला आहे. अर्थात त्यात नवे असे काहीही नाही. आपल्याला आठवत असेल, तर वर्षभरापुर्वी दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात एका विद्यार्थी जमावाने भारताचे तुकडे होतील, अशा डरकाळ्या फ़ोडल्या होत्या. तेव्हा प्रत्येक पुरोगामी त्या घोषणांचे अविष्कार स्वातंत्र्य असे वर्नन करायला पुढे सरसावला होता. मग आज त्यांनी त्याच भारताच्या एकात्मतेसाठी आपले प्राण पणाला लावणार्‍या सेनेची वा तिच्या म्होरक्याची निर्भत्सना करण्याचा प्रयत्न केला तर नवल कुठले? ही देखील एक जुनी परंपराच आहे. पृथ्वीराज चौहानचा पराकोटीचा द्वेष करताना जयचंद राठोडाने, महंमद घोरीला दिल्लीच्या तख्तावर आणुन बसवल्याचीही थोर परंपरा याच देशातली नाही काय?

द्वेष ही अशी गोष्ट असते, की ती माणसाला विवेकबुद्धीपासून पारखी करीत असते. आजकाल त्याच जयचंदाच्या भूमिकेत देशातील पुरोगामीत्व पोहोचलेले आहे. त्या मानसिकतेमध्ये आपल्या भल्याचा वा सुरक्षिततेचाही विचार मागे पडत असतो. स्वत:ला पुरोगामी समजणार्‍यांकडे आता कुठलाही सारासार विचार वा विवेक उरलेला नाही. त्यांना भाजपा विरोध व मोदीद्वेषाची इतकी कावीळ झाली आहे, की देश वा समाजाच्या हिताचा त्यांना पुरता विसर पडला आहेच. पण त्याहीपलिकडे आपल्याच पक्षाचे वा राजकारणाच्या हिताचेही भान उरलेले नाही. अर्थात भारतातलेच पुरोगामी असे असतात, असेही मानण्याची गरज नाही. जगाच्या पाठीवर सर्वच देशात पुरोगामी जमात ही अशीच अतिशहाणी असते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बाजूच्या इराणमधले आहे. १९७९ सालात इराणमध्ये शहाच्या हुकूमशाही विरोधात प्रथम कम्युनिस्टांनी आंदोलन सुरू केले होते. तिथल्या डाव्या पक्ष व विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या त्या लढ्याला चालना मिळावी, म्हणून त्यापैकी काही शहाण्यांनी दूर फ़्रान्समध्ये लपून बसलेल्या आयातुल्ला खोमेनी या धर्मगुरूचा चेहरा पुढे केला. शहाने त्याला इराणमधून पळून जाण्याची पाळी आणलेली होती. तो फ़्रान्समध्ये आश्रय घेऊन राहिलेला होता. पण इराणच्या शिया लोकसंख्येवर त्याचा प्रभाव होता. सहाजिकच ती बहुसंख्या आपल्या क्रांतीच्या पाठीशी उभी रहावी, म्हणून इराणी कम्युनिस्ट नेत्यांनी आयातुल्लाचा चेहरा पुढे केला. परिणामी क्रांतीची सुत्रे धर्मवेड्यांच्या हाती गेली आणि खरेच इराण पेटून उठला. पण जेव्हा उद्र्क झाला आणि शहाला पलायन करावे लागले; तेव्हा राजकीय सत्तेची सुत्रे धर्ममार्तंडांच्या हाती गेली होती. क्रांती यशस्वी झाली, तेव्हा त्याला इस्लामिक क्रांती मानले गेले आणि त्याचा सर्वेसर्वा म्हणून खोमेनी हा धर्मगुरू सत्तेत येऊन बसला. त्याने सत्ता हाती घेतल्यावर प्रथम कम्युनिस्टांची कत्तल करून टाकली होती.

यातला मुद्दा असा, की कम्युनिस्टांनी क्रांतीची ज्योत पेटवली नसती, तर खोमेनीसारखा पळपुटा धर्मगुरू इराणची क्रांती घडवून आणु शकला नसता. कम्युनिस्टांनी खोमेनीला पुढे केला नसता तर इतक्या वेगाने शहाची सत्ता ढासळली नसती. त्या घाईनेच कम्युनिस्टांनी आत्मघात करून घेतला. सोपा मार्ग शोधताना त्यांनी आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली होती. भारतातल्या पुरोगाम्यांची कहाणी वेगळी कशाला असणार? बहुतांश पुरोगामी हे ग्रंथप्रामाण्यवादी असतात. थोडक्यात भारतामध्ये ज्याला पोथीनिष्ठा म्हणतात, तसे बडबड करणारे अनुभवशून्य लोक डाव्या चळवळीचे हल्ली नेतृत्व करीत असतात. निदान एकविसाव्या शतकातली भारतातील पुरोगामी चळवळ पढतमुर्खांच्या हाती गेलेली आहे. त्यामुळेच जनमानस वा लोकभावनेशी त्यांना कुठलेही कर्तव्य उरलेले नाही. म्हणूनच त्यांना नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता सहज पराभूत करू शकला. आपल्या विरोधात उठलेला प्रत्येक आवाज मोदींनी कुशलतेने आपल्या राजकीय लाभासाठी वापरून घेतला आणि पुरोगाम्यांना आपल्याच मुर्खपणाची शिकार व्हावे लागलेले आहे. आताही देशातील कोट्यवधी लोकांची राष्ट्र नावाची कल्पना किंवा राष्ट्रभावना याच्याशी पुरोगाम्यांना काडीमात्र कर्तव्य नसेल, तर लोकांचा पाठींबा त्यांना कसा मिळू शकेल? मोदींनी सत्तेत येण्यासाठी व सत्तेत आल्यावर या मुर्खपणाचा चतुराईने उपयोग करून घेतला आहे. कालपर्यंत अशा लोकांच्या द्वेषभावनेचा लाभ देशाचे शत्रू करून घेत होते. आता उलट्या पद्धतीने मोदी त्याचा राजकीय लाभ घेत आहेत. नेहरू विद्यापीठातून उमटलेल्या देशविरोधी घोषणा वा कालपरवा संदीप दिक्षीत यांनी सेनाप्रमुखाची केलेली निर्भत्सना; यांच्यातले साधर्म्य म्हणूनच समजून घेतले पाहिजे. ह्या सर्व गोष्टी सुरू होण्यापुर्वी वेदप्रकाश वैदिक नावाचा एक गृहस्थ दोन वर्षापुर्वी खुप वादग्रस्त झालेला होता.

पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाच्या कृपेने स्थापन झालेल्या एका संस्थेच्या आमंत्रणावरून अनेक भारतीय पत्रकार बुद्धीमंत पाकिस्तानात गेलेले होते. त्यांच्या समवेत तिथे गेलेल्या वेदप्रकाश वैदिकने थेट तोयबाचा म्होरक्या हफ़ीज सईद याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतल्याचे फ़ोटो झळकले व गदारोळ झाला होता. तेव्हा वैदिक याला तिकडे घेऊन गेलेल्यांची नावे उघडकीस आली. त्यात दिलीप पाडगावकर, सुधींद्र कुलकर्णी, सलमान खुर्शीद, बरखा दत्त, मणिशंकर अय्यर असेही लोक होते. तिथे एका समारंभात मुशर्रफ़ यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेल्या अय्यर यांनी मोदींना हटवा, असे आवाहन पाकिस्तानला केलेले होते. तरीही कॉग्रेसने या नेत्याला पक्षातून हाकललेले नाही. आताही काश्मिरात रोज हिंसाचार माजला असताना हे गृहस्थ तिथे फ़ुटीरवाद्यांना जाऊन अगत्याने भेटतात आणि त्यांच्याकडून भारतीय सेनादलावर होणारा शिव्यांचा वर्षाव ऐकत असतात. त्यातून अशा पाकप्रेमी भारतीयांची कहाणी लक्षात येऊ शकते. गेल्या दहा वर्षात भारतामध्ये जे पुरोगामी सरकार सत्तेत असल्याचे सांगितले जात होते, त्याचा पाकिस्तान विषयक दृष्टीकोन किती जवळीकेचा होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याच सरकारने पाकिस्तानची हस्तक म्हणून चकमकीत मारल्या गेलेल्या इशरत जहानचे उदात्तीकरण करताना भारतीय हेरखात्याच्या वरीष्ठ अधिकार्‍याला आरोपीच्या पिंजर्‍यात आणुन उभे केले. तिच्यासाठी गुजरातच्या अर्धा डझन वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना आयुष्यातून उठवले. हे सर्व कागदोपत्री अफ़रातफ़री करून चाललेले होते. इतक्या पाकिस्तानी कलाने युपीए सरकार चालत असेल, तर त्यात सहभागी असलेल्यांना भारतीय सेनादल वा त्याच्या राष्ट्रनिष्ठ सेनापतीवर राग असणे स्वाभाविक आहे. तो राग आजच्या लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यापुरता मर्यदित नाही. तशीच निर्भत्सना तेव्हाही कडवा राष्ट्रनिष्ठ असलेल्या जनरल व्ही के सिंग यांच्याही वाट्याला आलेली होती.

जनरल सिंग काश्मिरात दहशतवाद व हिंसाचार आटोपण्यासाठी विविध कठोर उपाय योजत होते आणि त्यातून लोकसंख्येत लपलेल्या गद्दारांना शोधून त्यांचा बंदोबस्त करीत होते. तर त्या लष्करप्रमुखाच्या विरोधात किती अफ़वा किंवा खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या होत्या? त्यांनी मेरठच्या छावणीतून लष्कराच्या तुकड्यांना थेट दिल्लीकडे कुच करण्याचे आदेश दिले आणि दिल्लीची सत्ता काबीज करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप आपण विसरून गेलो काय? सिंग सेनेच्या माध्यमातून काश्मिर राजकारणात हस्तक्षेप करतात, असाही आक्षेप घेतला गेला होता. त्यांनी सुरू केलेल्या काश्मिरी गुप्तवार्ता विभागाची गठडी वळण्यात आली होती. जेणे करून पाकला त्रास होईल अशा कुठल्याही कृती वा मोहिमेला अडथळा आणण्याचेच काम पुरोगामी युपीए सरकारने चालविले होते. त्यामुळे प्रथमच कुणा कॉग्रेसवाल्याने एका लष्करप्रमुखाचा अवमान केला, असे मानायचे अजिबात कारण नाही. अशाच गुप्तचर कामात गुंतलेल्या कर्नल पुरोहितला हिंदू दहशतवादी म्हणून आरोपांच्या जंजाळात दिर्घकाळ गुंतवून ठेवले गेले. अजून त्याच्या विरोधात कुठलाही सिद्ध होणारा पुरावा सापडू शकलेला नाही. सहाजिकच देशविरोधी कारवाया म्हणजेच देशप्रेम, अशी एक नवी परिभाषाच गेल्या दोन दशकात निर्माण करण्यात आली. त्याच काळात डॉ. झाकीर नाईकसारखा माणूस जिहाद व ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण करीत देशभर फ़िरत होता, तर त्याचे कौतुक राहुलचे निकटवर्तिय दिग्वीजयसिंग करीत होते. त्याच्या कारवायांकडे गृहखात्याने पाठ फ़िरवली होती आणि तेव्हाच देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मात्र, संघाच्या शाखेवर दहशत माजवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या जाहिर थापा मारत होते. नंतर त्यांनी आपले शब्द मागे घेऊन माफ़ीही मागितली. पण अशा घटनाक्रमातून देशाला धोका निर्माण करील तो देशप्रेमी, अशी एक नवीच व्याख्या निर्माण करण्यात आली, हे लक्षात येऊ शकेल.

ह्या सगळ्या गोष्टी अकस्मात घडत नसतात. त्यामागे एक पद्धतशीर योजना असते. घरातल्या गृहिणीने, बहिणीने वा कुणा महिलेनेच घरच्या कर्त्या पुरूषावर नामर्द असल्याचा हल्ला चढवण्यासारखा घातक हल्ला दुसरा असू शकत नाही. ज्याने कर्ता वा रखवालदार म्हणून जीवावर उदार होऊन सुरक्षा द्यायची असते, त्याच्याच शक्ती वा ताकदीवर घरातून शंका घेतली गेली; मग त्याच्यातली लढण्याची इच्छाच खच्ची होऊन जाते. मग त्याच्या हातात कुठले कितीही भेदक हत्यार असून काहीही उपयोग नसतो. त्या हत्याराची भेदकता दुय्यम असते आणि हत्यार उचलणार्‍या मनगटातील शक्ती निर्णायक असते. घराचा कर्तापुरूष व देश समाजाचे सुरक्षा दल समानधर्मी असतात. त्यांच्यातली लढायची इच्छाच खच्ची करून टाकली, तर त्यांना फ़ुसका शत्रूही नामोहरम करू शकतो. पाकिस्तानचे निवृत्त ब्रिगेडीयर एस के मलिक म्हणून आहेत. त्यांनी कुराणातील युद्धशास्त्राचे निकष आपल्या एका पुस्तकात नोंदलेले आहेत. त्यानुसार शस्त्र दुय्यम असते. शस्त्राने युद्ध जिंकता येत नाही. शत्रूची लढायची इच्छा व हिंमतच खच्ची केली; तर त्याला हरवण्याची गरज नसते. त्याची देश, राष्ट्र वा धर्म अशी जी काही निष्ठा असेल, ती ढासळून टाकली, तर त्याला विनासायास पराभूत करता येते. एका बाजूला आपल्या श्रद्धा मजबूत करायच्या आणि दुसरीकडे शत्रूच्या निष्ठा ढासळून टाकायच्या; मग युद्ध म्हणजे लुटुपुटुच्या खेळ असल्यासारखा विजय संपादन करता येतो, असे मलिक सांगतात. भारतातले पुरोगामी विविध प्रकारे भारतीय सेना व त्यांच्या लढण्याच्या इर्षेवर जे हल्ले करतात, ते कोणासाठी असू शकतात? संदीप दिक्षीत वा त्यांच्याबरोबरचे कॉग्रेसवाले किंवा अन्य पुरोगामी कोणासाठी भारतीय सेनेला सदोदित खच्ची करण्यात गुंतलेले असतात? पाकिस्तानला आज आपले सैन्य सज्ज ठेवण्याची गरज उरली आहे काय? त्यांचे खरे सैनिक तर भारतातच कार्यरत नाहीत काय?

शत्रू गोटातील एक हस्तक शंभर सैनिकांपेक्षा अधिक भेदक असतो. पाकिस्तानचे आज भारतातील हस्तक त्यांचे खरे सैन्य झालेले आहे. ते काश्मिरातील भारतीय सेनेच्या कारवाईची निर्भत्सना करताना दिसतील. असे लोक भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईक केल्यावरही शंका घेऊन पाकिस्तानची वाहव्वा मिळवताना दिसतील. त्यांच्या नेहमीच्या बोलण्यात भारताच्या राष्ट्राभिमान वा राष्ट्रीय परंपरांची अवहेलना होताना अनुभवास येईल. पण असेच लोक पाकिस्तानच्या बाजूने बोलणार्‍या कुणाचे कौतुक करताना दिसतील. इशरतचे कौतुक करण्यातून ते अशा जिहादी पाकवादी धारणांवरची श्रद्धा मजबूत करण्याला हातभार लावताना दिसतील. पण इशरतच्या घातपाती कृत्याला पायबंद घालण्याच्या कुठल्याही कृतीचा निषेध करताना दिसतील. अरुंधती रॉयसारखी महिला काश्मिर पाकला देऊन टाकण्याची भाषा बोलत असते. तर कन्हैयासारखा पुरोगामी युवक नेता काश्मिरात भारतीय सेना बलात्कार करते, असा आरोप बेधडक करताना ऐकायला मिळेल. त्याचे वकीलपत्र घ्यायला कॉग्रेसनेते कपील सिब्बल धाव घेताना दिसतील. ह्यातल्या प्रत्येकाला पाकिस्तानने आपला हस्तक बनवलेले नसते. त्यातल्या ठराविक लोकांना पाकने हाताशी धरलेले असते. तर बाकीचे पुरोगामी मुर्खासारखे आपल्या विचारांचे लोक म्हणून त्या देशविघातक कृत्ये करणार्‍यांच्या समर्थनाला पुढे आलेले दिसतील. यातला संदीप दिक्षीत पाकचा कोणी हस्तक असेल असे नाही. पण ज्या माहोलमध्ये त्याचा वावर असतो, तिथे भाजपा द्वेषाने वातावरण इतके भारावलेले असते, की आपण काय करीत आहोत, त्याचे भान उरत नाही. कसाब निर्बुद्ध धर्मश्रद्ध घातपाती असतो. तर पुरोगामी शहाणे बहुतांश सुबुद्ध आत्मघाती असतात. कारण कुठल्याही उदात्त भावनेच्या आहारी गेलेला माणूस सारासार विवेकाला पारखा होतो आणि आत्मघाताला प्रवृत्त होत असतो. भारतात आज बुद्धीवादाच्या आहारी गेलेले असे शेकड्यांनी पुरोगामी मुर्ख आपण बघू शकतो. यातला मणिशंकर अय्यर चतूर हस्तक असतो आणि तो धुर्तपणे बाकीच्या मुर्खांना आपल्या कारस्थानात वापरून घेत असतो.