Monday, June 19, 2017

कॉग्रेस आणि राष्ट्रपती

indira v v giri के लिए चित्र परिणाम

सोमवारी आपल्या पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक घेऊन भाजपाने आपला राष्ट्रपती पदाचा उमेदवार जाहिर केला. बिहारचे विद्यमान राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्याला आता कुठल्या पक्षाचा पाठींबा आहे आणि कोणाचा विरोध आहे, ते समोर येईलच. पण मागला महिनाभर यासाठी ज्या चर्चा रंगल्या होत्या, त्या खुप मनोरंजक होत्या. कारण अशा चर्चा घेणार्‍या व रंगवणार्‍या किती शहाण्यांना, या पदासाठी झालेल्या निवडणूकांचा इतिहास ठाऊक आहे, याचीच शंका येते. राष्ट्रपती कसा असावा? तो पक्षनिरपेक्ष असावा. त्याला राज्यघटनेची जाण असावी. तो पक्षाचा प्रतिनिधी नसतो. तो सर्वसहमतीने निवडला जावा. यासारखे शहाणपण अकस्मात पत्रकार व माध्यमांसह विरोधी पक्षांना का सुचावे? यापुर्वी पंतप्रधानपदी बसलेल्या किती व्यक्तींनी तसे प्रयास केलेले होते? मोदी विरोधी पक्षांना विश्वासात घेत नाहीत, अशी तक्रार सातत्याने होत असते. पण तसे विरोधकांना विश्वासात घेऊन देशाचा कारभार करणारे कोण महान पंतप्रधान आजवर होऊन गेले? त्यापैकी कोणी विरोधकांशी सल्लामसलत करून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवला होता? त्याचेही दाखले यानिमीत्ताने समोर मांडले गेले असते, तर बरे झाले असते. पण त्यांचे दुर्दैव असे, की खोट्या गोष्टींचे कधी कुठे पुरावे नसतात, की दाखलेही नसतात. मग त्यांनी तरी बिचार्‍यांनी ते कुठून आणावेत? राष्ट्रपतींची गुणवत्ता किती होती, हेही अनेकांना ठाऊक नाही. इंदिराजींच्या काळात राष्ट्रपतींवर रबरी शिक्का असल्याचे शिकामोर्तब झालेले होते. पण तेव्हा ज्यांचा जन्मही झाला नव्हता, किंवा तेव्हाच्या राजकीय घडामोडींचा इतिहासही ज्यांना वाचण्याची गरज भासलेली नाही; असे दिवाळखोर आजचे विश्लेषक असतील, तर त्यांच्याकडून कुठली अपेक्षा बाळगता येईल? म्हणूनच या निमीत्ताने काही जुन्या राष्ट्रपती व निवडणुकांच्या आठवणी जागवणे उपकारक ठरू शकेल.

१९६९ सालात तात्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसे्न यांचे आकस्मिक निधन झाले होते. सहाजिकच उपराष्ट्रपती असलेले वराह गिरी व्यंकट गिरी यांना राष्ट्रपती म्हणून काम बघावे लागत होते. त्याच दरम्यान कॉग्रेस पक्षात श्रेष्ठी व पंतप्रधान यांच्यात बेबनाव निर्माण झालेला होता. इंदिराजी तेव्हा पंतप्रधान होत्या आणि त्यांचे पक्षाच्या संसदीय मंडळ व कार्यकारिणीशी अजिबात पटत नव्हते. सहाजिकच राष्ट्रपती पदाचा नवा उमेदवार ठरवण्यावरून खडाजंगी, त्याच पक्षात उडालेली होती. श्रेष्ठींनी नीलम संजीव रेड्डी यांची उमेदवारी निश्चीत केली होती. पण ती इंदिराजींना मान्य नव्हती. म्हणूनच त्यांनी पक्षाची शिस्त पाळण्यासाठी रेड्डी यांचा अर्ज भरला आणि प्रत्यक्षात त्यांच्या विरोधातही आपला उमेदवार पुढे केला. गिरी यांना इंदिराजींनी पद सोडून उभे रहाण्यासाठी चिथावणी दिली आणि देशाचे तात्कालीन सरन्यायाधीश हिदायतुल्ला राष्ट्रपती म्हणून काम बघू लागलेले होते. मग राजकारणाला रंगत आलेली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार रेड्डी यांनाच मते देण्याचा फ़तवा काढण्याचा पक्षनेतृत्वाचा आग्रह इंदिराजींनी फ़ेटाळून लावला. कॉग्रेसच्या आमदार खासदारांनी ‘विवेकबुद्धी’चे स्मरण करून योग्य उमेदवाराला मत द्यावे; असे आवाहन इंदिरा गांधी यांनी केले. त्याचा अर्थ उघड होता, की त्यांना मानणार्‍या कॉग्रेस आमदार खासदारांनी गिरी यांना मत द्यावे, असेच इंदिराजींचे आवाहन होते. झालेही तसेच व त्या निवडणूकीत कॉग्रेसचे उमेदवार संजीव रेड्डी यांचा दारूण पराभव झाला. तर गिरी चौथे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले होते. पण केवळ कॉग्रेसच्या मतावर गिरी निवडून आलेले नव्हते. त्यांना निवडून आणण्यासाठी पुरोगामी डाव्या पक्षांनी हिरीरीने पुढाकार घेतला होता. कॉग्रेसपेक्षाही बिगर कॉग्रेसी मतांवर इंदिराजींचा हा उमेदवार जिंकला आणि त्यातून गांधी घराण्याचे राज्य देशात प्रस्थापित झाले.

आपण सत्ताधारी कॉग्रेस पक्षात दुफ़ळीला खतपाणी घातले म्हणून तेव्हा तमाम पुरोगामी पक्ष कमालीचे सुखावलेले होते. कारण त्यांच्याच मतांवर कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी दणकून आपटले होते आणि कॉग्रेसच्या बंडखोर पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू गिरी राष्ट्रपती झालेले होते. त्या दुफ़ळीवर नंतरच्या काळात शिक्कामोर्तब झाले आणि इंडीकेट व सिंडीकेट असे कॉग्रेसचे दोन तुकडे पडले होते. त्याला राष्ट्रपती निवडणुक कारणीभूत झाली. मग लोकांची सहानुभुती व विश्वास संपादन करण्यासाठी इंदिराजींनी अचानक बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण केले आणि स्वातंत्र्योत्तर काळातही चालू असलेले संस्थानिकांचे तनखे बंद करून टाकले. मग काय, पुरोगामी डाव्यांना तर देशात लालबावट्याचेच राज्य आल्याचा साक्षात्कार झाला. दुफ़ळी माजलेल्या कॉग्रेसमधील इंदिरा गटाचे अल्पमत झाकण्यासाठी सर्व डावे इंदिराजींच्या मागे ठामपणे उभे राहिले. या निवडणूकीचा आणखी एक लाभ म्हणजे भारतीय लोकसभेत प्रथमच कुठल्या तरी एका पक्षाकडे ५५ खासदार असल्याने पहिला विरोधी नेता नेमला गेला. अल्पमतात गेलेल्या सिंडीकेट उर्फ़ संघटना कॉग्रेसच्या गटात ६० च्या आसपास खासदार आलेले होते. त्यांचे नेते राम सुभग सिंग यांना लोकसभेत विरोधी नेता म्हणून मान्यता मिळाली. भारतीय संसदेतील तो पहिलावहिला विरोधी नेता ठरला. आज कॉग्रेसला तितकीही मान्यता उरलेली नाही. पुढे इंदिराजींनी लोकमानसावर असे गारूड केले, की पुरोगामी पक्षांच्या मेहरबानीवर विसंबून रहाण्याचा त्रास त्यांनी लौकरच संपवला. १९७० अखेरीस त्यांनी लोकसभाच एक अध्यादेश काढून विसर्जित केली आणि देशातली पहिली मध्यावधी संसदीय निवडणूक झालेली होती. चौथ्या राष्ट्रपती निवडणूकीच्या निमीत्ताने इतके दिर्घ परिणामकारक राजकारण नंतरच्या काळात घडले. तेव्हा निवडून आलेल्या गिरी यांची पंतप्रधानांच्या दारात काय लायकी होती?

लोकसभा विसर्जित झाली आणि नंतर समाजवादी लाटेवर स्वार झालेल्या इंदिराजींनी पुरोगामी पक्षांना त्या मध्यावधी निवडणूकीय पुरते लोळवले. दोन तृतियांश बहूमत घेऊन इंदिराजी तेव्हा जिंकल्या होत्या आणि संघटना कॉग्रेसच्या अस्ताने सुखावलेल्या पुरोगामी पक्षांचाही पुरता धुव्वा उडाला होता. त्याच दरम्यान पाकिस्तानात राजकारण तापले आणि युद्धाचा प्रसंग ओढवला होता. त्यात पाकिस्तानची फ़ाळणी होऊन गेली आणि इंदिराजींना दुर्गा संबोधण्याची वेळ वाजपेयी यांच्यावर आली. मग त्यांनी देशभरच्या विधानसभा बरखास्त केल्या आणि तिथे कॉग्रेसला अभूतपुर्व बहूमत मिळवून दिले. थोडक्यात इंदिराजी म्हणजे कॉग्रेस, असे चित्र निर्माण करण्यात त्यांना यश आले आणि पुढल्या काळात इंदिराजी व त्यांचे घराणे म्हणजे कॉग्रेस असा सिद्धांत निर्माण झाला. आजही राहुल, सोनिया वा प्रियंका अशा घराणेशाहीची चर्चा चालते, त्याचा आरंभ त्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडीतून झालेला आहे. आज मोदींनी काय करावे असे शहाणपण शिकवणार्‍यांना इंदिराजी आठवत नाहीत. मोदींनी आपला उमेदवार निदान पक्षाशी सल्लामसलत करून ठरवला आहे. इंदिराजींनी पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला. पण त्याला मते देण्याच्या विरोधात उभ्या राहून, त्यालाच पराभूत करण्यातून त्यांचे राजकारण झळाळले होते. त्यातून त्यांचे राजघराणे लोकशाहीतही प्रस्थापित होऊ शकले. त्या राष्ट्रपती निवडणूकीने कॉग्रेस पक्षाची संघटना मोडून टाकली, पक्षाची शिस्त निकालात काढली. पण आणखी एक गोष्ट विसरता कामा नये. कॉग्रेस पक्षात इंदिराजींनी ‘विवेकबुद्धी’ वापरण्याचे केलेले ते शेवटचे आवाहन. त्यानंतरच्या काळात कॉग्रेस आणि विवेकबुद्धी यांचा सूतराम संबंध राहिला नाही. त्या इतिहासाशी तुलना केली, तर नरेंद्र मोदी खुपच सौम्य व समावेशक पंतप्रधान मानावे लागतील. इंदिराजींनी निवडून आणलेल्या त्या राष्ट्रपती गिरींची प्रतिष्ठा काय होती, ते त्यांच्याच एका ऐतिहासिक फ़ोटोतून जगाने बघितलेले आहे.

4 comments:

  1. भाऊ फोटो पाहिला की आपोआप हसू फुटतं.

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच मस्त लेख भाऊ.

    १९६९ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाचा नीलम संजीव रेड्डी हा अधिकृत उमेदवार असताना त्यांना मत द्यायचे आवाहन न करता काँग्रेस खासदार-आमदारांनी आपल्या सद्सद्विवेकबुध्दीला स्मरून मत द्यावे हे इंदिरांनी आवाहन केले याचा अर्थ स्पष्ट होता. रेड्डी हे सिंडिकेटचे उमेदवार होते. काँग्रेस अध्यक्ष एस.नीजलिंगप्पा यांनी नीलम संजीव रेड्डींना जनसंघाची मते मिळावीत यासाठी जनसंघ नेत्यांची भेट घेतली . ही घटना १३ ऑगस्ट १९६९ म्हणजे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या आठवडाभर आधी. वास्तविक काँग्रेसकडे रेड्डींना स्वबळावर निवडून आणायची ताकद असताना जनसंघाची मते मिळवायचा प्रयत्न करायची तशी काही गरज नव्हती. तसेच जनसंघ, स्वतंत्र पक्ष आणि दोन्ही समाजवादी पक्षांनी चिंतामणराव देशमुख हा स्वतःचा उमेदवार उभा केलेला असताना जनसंघाची मते मिळणे शक्य नाही हे समोर दिसत असतानाच तसे करणे अजून धक्कादायक (किंबहुना निरर्थक) होते. पण इंदिरासमर्थक आपली मते रेड्डींना देणार नाहीत याची कुणकुण कदाचित नीजलिंगप्पांना लागली असावी म्हणून गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर तोडून खाल्ली हा एक प्रयत्न नीजलिंगप्पांनी केला. त्याकाळी काँग्रेसच्या दृष्टीने जनसंघ म्हणजे 'वाळीत टाकलेला' पक्ष होता. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांनी जनसंघाच्या नेत्यांची भेट घेतल्यामुळे इंदिरांना निमित्त मिळालेच. त्यांनी नीजलिंगप्पांना पत्र लिहून त्यांच्या कृत्याचा जाब विचारला तसेच काँग्रेस खासदार-आमदारांसाठी नीलम संजीव रेड्डींना मत द्यायचा व्हिप इंदिरा गांधींनी (कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून) जारी करावा या नीजलिंगप्पांच्या मागणीला इंदिरांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या.नीलम संजीव रेड्डी जिंकले असते तर इंदिरांना मात्र पंतप्रधानपदावर टिकणे कठिण गेले असते.१९६९ ची राष्ट्रपती निवडणुक हा इंदिरांच्या राजकीय जीवनातील एक महत्वाचा टप्पा होता.

    ReplyDelete