कॉग्रेसचे एक राष्ट्रीय प्रवक्ता संदीप दिक्षीत यांनी भारताच्या भूदलाचे सेनापती जनरल बिपीन रावत यांना ‘सडक छाप गुंडा’ असे संबोधून, कॉग्रेस किंवा पुरोगामी भूमिकेची साक्ष दिली आहे. गेल्या दोन वर्षात आपल्या देशात राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेम हे शब्दही आक्षेपार्ह बनलेले आहेत. अन्य कोणी आम्हाला राष्ट्रप्रेम शिकवू नये, असा प्रत्येक पुरोगाम्याचा दावा आहे. कारण राष्ट्राची चिंता सर्वाधिक अशा पुरोगाम्यांनाच असून, सामान्य माणसाच्या भाषा वा व्याख्येत त्यांचा राष्ट्रवाद किंवा राष्ट्रप्रेम बसेनासे झाले आहे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने देशाशी वा देशाच्या परंपरांशी संबंधित असेल, त्याला राष्ट्रवाद वा राष्ट्रप्रेम मानले जाते. पण पुरोगामी भाषेत जे म्हणून काही राष्ट्रीय परंपरेतील असेल त्याची शरम वाटणे, किंवा त्याची निर्भत्सना करणे, म्हणजे राष्ट्रप्रेम असते. सहाजिकच संदीप दिक्षीत यांनी त्याच परिभाषेमध्ये आपले राष्ट्रप्रेम व्यक्त केले आहे. ज्या सेनापतीने काश्मिरात उच्छाद मांडलेल्या दंगेखोर वा घातपात्यांना धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे, त्याच्याविषयी तिरस्काराची भाषा वा भावना, हा आता पुरोगामी राष्ट्रवाद झाला आहे. अर्थात त्यात नवे असे काहीही नाही. आपल्याला आठवत असेल, तर वर्षभरापुर्वी दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात एका विद्यार्थी जमावाने भारताचे तुकडे होतील, अशा डरकाळ्या फ़ोडल्या होत्या. तेव्हा प्रत्येक पुरोगामी त्या घोषणांचे अविष्कार स्वातंत्र्य असे वर्नन करायला पुढे सरसावला होता. मग आज त्यांनी त्याच भारताच्या एकात्मतेसाठी आपले प्राण पणाला लावणार्या सेनेची वा तिच्या म्होरक्याची निर्भत्सना करण्याचा प्रयत्न केला तर नवल कुठले? ही देखील एक जुनी परंपराच आहे. पृथ्वीराज चौहानचा पराकोटीचा द्वेष करताना जयचंद राठोडाने, महंमद घोरीला दिल्लीच्या तख्तावर आणुन बसवल्याचीही थोर परंपरा याच देशातली नाही काय?
द्वेष ही अशी गोष्ट असते, की ती माणसाला विवेकबुद्धीपासून पारखी करीत असते. आजकाल त्याच जयचंदाच्या भूमिकेत देशातील पुरोगामीत्व पोहोचलेले आहे. त्या मानसिकतेमध्ये आपल्या भल्याचा वा सुरक्षिततेचाही विचार मागे पडत असतो. स्वत:ला पुरोगामी समजणार्यांकडे आता कुठलाही सारासार विचार वा विवेक उरलेला नाही. त्यांना भाजपा विरोध व मोदीद्वेषाची इतकी कावीळ झाली आहे, की देश वा समाजाच्या हिताचा त्यांना पुरता विसर पडला आहेच. पण त्याहीपलिकडे आपल्याच पक्षाचे वा राजकारणाच्या हिताचेही भान उरलेले नाही. अर्थात भारतातलेच पुरोगामी असे असतात, असेही मानण्याची गरज नाही. जगाच्या पाठीवर सर्वच देशात पुरोगामी जमात ही अशीच अतिशहाणी असते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बाजूच्या इराणमधले आहे. १९७९ सालात इराणमध्ये शहाच्या हुकूमशाही विरोधात प्रथम कम्युनिस्टांनी आंदोलन सुरू केले होते. तिथल्या डाव्या पक्ष व विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या त्या लढ्याला चालना मिळावी, म्हणून त्यापैकी काही शहाण्यांनी दूर फ़्रान्समध्ये लपून बसलेल्या आयातुल्ला खोमेनी या धर्मगुरूचा चेहरा पुढे केला. शहाने त्याला इराणमधून पळून जाण्याची पाळी आणलेली होती. तो फ़्रान्समध्ये आश्रय घेऊन राहिलेला होता. पण इराणच्या शिया लोकसंख्येवर त्याचा प्रभाव होता. सहाजिकच ती बहुसंख्या आपल्या क्रांतीच्या पाठीशी उभी रहावी, म्हणून इराणी कम्युनिस्ट नेत्यांनी आयातुल्लाचा चेहरा पुढे केला. परिणामी क्रांतीची सुत्रे धर्मवेड्यांच्या हाती गेली आणि खरेच इराण पेटून उठला. पण जेव्हा उद्र्क झाला आणि शहाला पलायन करावे लागले; तेव्हा राजकीय सत्तेची सुत्रे धर्ममार्तंडांच्या हाती गेली होती. क्रांती यशस्वी झाली, तेव्हा त्याला इस्लामिक क्रांती मानले गेले आणि त्याचा सर्वेसर्वा म्हणून खोमेनी हा धर्मगुरू सत्तेत येऊन बसला. त्याने सत्ता हाती घेतल्यावर प्रथम कम्युनिस्टांची कत्तल करून टाकली होती.
यातला मुद्दा असा, की कम्युनिस्टांनी क्रांतीची ज्योत पेटवली नसती, तर खोमेनीसारखा पळपुटा धर्मगुरू इराणची क्रांती घडवून आणु शकला नसता. कम्युनिस्टांनी खोमेनीला पुढे केला नसता तर इतक्या वेगाने शहाची सत्ता ढासळली नसती. त्या घाईनेच कम्युनिस्टांनी आत्मघात करून घेतला. सोपा मार्ग शोधताना त्यांनी आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली होती. भारतातल्या पुरोगाम्यांची कहाणी वेगळी कशाला असणार? बहुतांश पुरोगामी हे ग्रंथप्रामाण्यवादी असतात. थोडक्यात भारतामध्ये ज्याला पोथीनिष्ठा म्हणतात, तसे बडबड करणारे अनुभवशून्य लोक डाव्या चळवळीचे हल्ली नेतृत्व करीत असतात. निदान एकविसाव्या शतकातली भारतातील पुरोगामी चळवळ पढतमुर्खांच्या हाती गेलेली आहे. त्यामुळेच जनमानस वा लोकभावनेशी त्यांना कुठलेही कर्तव्य उरलेले नाही. म्हणूनच त्यांना नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता सहज पराभूत करू शकला. आपल्या विरोधात उठलेला प्रत्येक आवाज मोदींनी कुशलतेने आपल्या राजकीय लाभासाठी वापरून घेतला आणि पुरोगाम्यांना आपल्याच मुर्खपणाची शिकार व्हावे लागलेले आहे. आताही देशातील कोट्यवधी लोकांची राष्ट्र नावाची कल्पना किंवा राष्ट्रभावना याच्याशी पुरोगाम्यांना काडीमात्र कर्तव्य नसेल, तर लोकांचा पाठींबा त्यांना कसा मिळू शकेल? मोदींनी सत्तेत येण्यासाठी व सत्तेत आल्यावर या मुर्खपणाचा चतुराईने उपयोग करून घेतला आहे. कालपर्यंत अशा लोकांच्या द्वेषभावनेचा लाभ देशाचे शत्रू करून घेत होते. आता उलट्या पद्धतीने मोदी त्याचा राजकीय लाभ घेत आहेत. नेहरू विद्यापीठातून उमटलेल्या देशविरोधी घोषणा वा कालपरवा संदीप दिक्षीत यांनी सेनाप्रमुखाची केलेली निर्भत्सना; यांच्यातले साधर्म्य म्हणूनच समजून घेतले पाहिजे. ह्या सर्व गोष्टी सुरू होण्यापुर्वी वेदप्रकाश वैदिक नावाचा एक गृहस्थ दोन वर्षापुर्वी खुप वादग्रस्त झालेला होता.
पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाच्या कृपेने स्थापन झालेल्या एका संस्थेच्या आमंत्रणावरून अनेक भारतीय पत्रकार बुद्धीमंत पाकिस्तानात गेलेले होते. त्यांच्या समवेत तिथे गेलेल्या वेदप्रकाश वैदिकने थेट तोयबाचा म्होरक्या हफ़ीज सईद याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतल्याचे फ़ोटो झळकले व गदारोळ झाला होता. तेव्हा वैदिक याला तिकडे घेऊन गेलेल्यांची नावे उघडकीस आली. त्यात दिलीप पाडगावकर, सुधींद्र कुलकर्णी, सलमान खुर्शीद, बरखा दत्त, मणिशंकर अय्यर असेही लोक होते. तिथे एका समारंभात मुशर्रफ़ यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेल्या अय्यर यांनी मोदींना हटवा, असे आवाहन पाकिस्तानला केलेले होते. तरीही कॉग्रेसने या नेत्याला पक्षातून हाकललेले नाही. आताही काश्मिरात रोज हिंसाचार माजला असताना हे गृहस्थ तिथे फ़ुटीरवाद्यांना जाऊन अगत्याने भेटतात आणि त्यांच्याकडून भारतीय सेनादलावर होणारा शिव्यांचा वर्षाव ऐकत असतात. त्यातून अशा पाकप्रेमी भारतीयांची कहाणी लक्षात येऊ शकते. गेल्या दहा वर्षात भारतामध्ये जे पुरोगामी सरकार सत्तेत असल्याचे सांगितले जात होते, त्याचा पाकिस्तान विषयक दृष्टीकोन किती जवळीकेचा होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याच सरकारने पाकिस्तानची हस्तक म्हणून चकमकीत मारल्या गेलेल्या इशरत जहानचे उदात्तीकरण करताना भारतीय हेरखात्याच्या वरीष्ठ अधिकार्याला आरोपीच्या पिंजर्यात आणुन उभे केले. तिच्यासाठी गुजरातच्या अर्धा डझन वरीष्ठ पोलिस अधिकार्यांना आयुष्यातून उठवले. हे सर्व कागदोपत्री अफ़रातफ़री करून चाललेले होते. इतक्या पाकिस्तानी कलाने युपीए सरकार चालत असेल, तर त्यात सहभागी असलेल्यांना भारतीय सेनादल वा त्याच्या राष्ट्रनिष्ठ सेनापतीवर राग असणे स्वाभाविक आहे. तो राग आजच्या लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यापुरता मर्यदित नाही. तशीच निर्भत्सना तेव्हाही कडवा राष्ट्रनिष्ठ असलेल्या जनरल व्ही के सिंग यांच्याही वाट्याला आलेली होती.
जनरल सिंग काश्मिरात दहशतवाद व हिंसाचार आटोपण्यासाठी विविध कठोर उपाय योजत होते आणि त्यातून लोकसंख्येत लपलेल्या गद्दारांना शोधून त्यांचा बंदोबस्त करीत होते. तर त्या लष्करप्रमुखाच्या विरोधात किती अफ़वा किंवा खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या होत्या? त्यांनी मेरठच्या छावणीतून लष्कराच्या तुकड्यांना थेट दिल्लीकडे कुच करण्याचे आदेश दिले आणि दिल्लीची सत्ता काबीज करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप आपण विसरून गेलो काय? सिंग सेनेच्या माध्यमातून काश्मिर राजकारणात हस्तक्षेप करतात, असाही आक्षेप घेतला गेला होता. त्यांनी सुरू केलेल्या काश्मिरी गुप्तवार्ता विभागाची गठडी वळण्यात आली होती. जेणे करून पाकला त्रास होईल अशा कुठल्याही कृती वा मोहिमेला अडथळा आणण्याचेच काम पुरोगामी युपीए सरकारने चालविले होते. त्यामुळे प्रथमच कुणा कॉग्रेसवाल्याने एका लष्करप्रमुखाचा अवमान केला, असे मानायचे अजिबात कारण नाही. अशाच गुप्तचर कामात गुंतलेल्या कर्नल पुरोहितला हिंदू दहशतवादी म्हणून आरोपांच्या जंजाळात दिर्घकाळ गुंतवून ठेवले गेले. अजून त्याच्या विरोधात कुठलाही सिद्ध होणारा पुरावा सापडू शकलेला नाही. सहाजिकच देशविरोधी कारवाया म्हणजेच देशप्रेम, अशी एक नवी परिभाषाच गेल्या दोन दशकात निर्माण करण्यात आली. त्याच काळात डॉ. झाकीर नाईकसारखा माणूस जिहाद व ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण करीत देशभर फ़िरत होता, तर त्याचे कौतुक राहुलचे निकटवर्तिय दिग्वीजयसिंग करीत होते. त्याच्या कारवायांकडे गृहखात्याने पाठ फ़िरवली होती आणि तेव्हाच देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मात्र, संघाच्या शाखेवर दहशत माजवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या जाहिर थापा मारत होते. नंतर त्यांनी आपले शब्द मागे घेऊन माफ़ीही मागितली. पण अशा घटनाक्रमातून देशाला धोका निर्माण करील तो देशप्रेमी, अशी एक नवीच व्याख्या निर्माण करण्यात आली, हे लक्षात येऊ शकेल.
ह्या सगळ्या गोष्टी अकस्मात घडत नसतात. त्यामागे एक पद्धतशीर योजना असते. घरातल्या गृहिणीने, बहिणीने वा कुणा महिलेनेच घरच्या कर्त्या पुरूषावर नामर्द असल्याचा हल्ला चढवण्यासारखा घातक हल्ला दुसरा असू शकत नाही. ज्याने कर्ता वा रखवालदार म्हणून जीवावर उदार होऊन सुरक्षा द्यायची असते, त्याच्याच शक्ती वा ताकदीवर घरातून शंका घेतली गेली; मग त्याच्यातली लढण्याची इच्छाच खच्ची होऊन जाते. मग त्याच्या हातात कुठले कितीही भेदक हत्यार असून काहीही उपयोग नसतो. त्या हत्याराची भेदकता दुय्यम असते आणि हत्यार उचलणार्या मनगटातील शक्ती निर्णायक असते. घराचा कर्तापुरूष व देश समाजाचे सुरक्षा दल समानधर्मी असतात. त्यांच्यातली लढायची इच्छाच खच्ची करून टाकली, तर त्यांना फ़ुसका शत्रूही नामोहरम करू शकतो. पाकिस्तानचे निवृत्त ब्रिगेडीयर एस के मलिक म्हणून आहेत. त्यांनी कुराणातील युद्धशास्त्राचे निकष आपल्या एका पुस्तकात नोंदलेले आहेत. त्यानुसार शस्त्र दुय्यम असते. शस्त्राने युद्ध जिंकता येत नाही. शत्रूची लढायची इच्छा व हिंमतच खच्ची केली; तर त्याला हरवण्याची गरज नसते. त्याची देश, राष्ट्र वा धर्म अशी जी काही निष्ठा असेल, ती ढासळून टाकली, तर त्याला विनासायास पराभूत करता येते. एका बाजूला आपल्या श्रद्धा मजबूत करायच्या आणि दुसरीकडे शत्रूच्या निष्ठा ढासळून टाकायच्या; मग युद्ध म्हणजे लुटुपुटुच्या खेळ असल्यासारखा विजय संपादन करता येतो, असे मलिक सांगतात. भारतातले पुरोगामी विविध प्रकारे भारतीय सेना व त्यांच्या लढण्याच्या इर्षेवर जे हल्ले करतात, ते कोणासाठी असू शकतात? संदीप दिक्षीत वा त्यांच्याबरोबरचे कॉग्रेसवाले किंवा अन्य पुरोगामी कोणासाठी भारतीय सेनेला सदोदित खच्ची करण्यात गुंतलेले असतात? पाकिस्तानला आज आपले सैन्य सज्ज ठेवण्याची गरज उरली आहे काय? त्यांचे खरे सैनिक तर भारतातच कार्यरत नाहीत काय?
शत्रू गोटातील एक हस्तक शंभर सैनिकांपेक्षा अधिक भेदक असतो. पाकिस्तानचे आज भारतातील हस्तक त्यांचे खरे सैन्य झालेले आहे. ते काश्मिरातील भारतीय सेनेच्या कारवाईची निर्भत्सना करताना दिसतील. असे लोक भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईक केल्यावरही शंका घेऊन पाकिस्तानची वाहव्वा मिळवताना दिसतील. त्यांच्या नेहमीच्या बोलण्यात भारताच्या राष्ट्राभिमान वा राष्ट्रीय परंपरांची अवहेलना होताना अनुभवास येईल. पण असेच लोक पाकिस्तानच्या बाजूने बोलणार्या कुणाचे कौतुक करताना दिसतील. इशरतचे कौतुक करण्यातून ते अशा जिहादी पाकवादी धारणांवरची श्रद्धा मजबूत करण्याला हातभार लावताना दिसतील. पण इशरतच्या घातपाती कृत्याला पायबंद घालण्याच्या कुठल्याही कृतीचा निषेध करताना दिसतील. अरुंधती रॉयसारखी महिला काश्मिर पाकला देऊन टाकण्याची भाषा बोलत असते. तर कन्हैयासारखा पुरोगामी युवक नेता काश्मिरात भारतीय सेना बलात्कार करते, असा आरोप बेधडक करताना ऐकायला मिळेल. त्याचे वकीलपत्र घ्यायला कॉग्रेसनेते कपील सिब्बल धाव घेताना दिसतील. ह्यातल्या प्रत्येकाला पाकिस्तानने आपला हस्तक बनवलेले नसते. त्यातल्या ठराविक लोकांना पाकने हाताशी धरलेले असते. तर बाकीचे पुरोगामी मुर्खासारखे आपल्या विचारांचे लोक म्हणून त्या देशविघातक कृत्ये करणार्यांच्या समर्थनाला पुढे आलेले दिसतील. यातला संदीप दिक्षीत पाकचा कोणी हस्तक असेल असे नाही. पण ज्या माहोलमध्ये त्याचा वावर असतो, तिथे भाजपा द्वेषाने वातावरण इतके भारावलेले असते, की आपण काय करीत आहोत, त्याचे भान उरत नाही. कसाब निर्बुद्ध धर्मश्रद्ध घातपाती असतो. तर पुरोगामी शहाणे बहुतांश सुबुद्ध आत्मघाती असतात. कारण कुठल्याही उदात्त भावनेच्या आहारी गेलेला माणूस सारासार विवेकाला पारखा होतो आणि आत्मघाताला प्रवृत्त होत असतो. भारतात आज बुद्धीवादाच्या आहारी गेलेले असे शेकड्यांनी पुरोगामी मुर्ख आपण बघू शकतो. यातला मणिशंकर अय्यर चतूर हस्तक असतो आणि तो धुर्तपणे बाकीच्या मुर्खांना आपल्या कारस्थानात वापरून घेत असतो.
लोकसत्ता सारखी वृत्तपत्रे तर रोज मोदीजी नी राष्ट्रवादाचे पोकळ नशा लोकांना लावलीय असे लिहित असतात.fb वर पन असे खुप लोक आहेत जे इतर विषय घेवुन राष्ट्रवादाला बदनाम करतात लोकांना अस वाटाव की आपनच चुकतोय.अशांना काहीजन फाॅलो का करतात कळत नाही
ReplyDeleteखूपच सुंदर विश्लेषण भाऊ
ReplyDelete