Tuesday, December 17, 2013

लोकसभेसाठी ‘आप’टबार

   दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीत लक्षणिय यश मिळवल्यावर तिथे सरकार बनवण्याची संधी नाकारणार्‍या आम आदमी पार्टीने आता आपले लक्ष लोकसभेच्या निवडणूकीवर केंद्रीत केले आहे. त्यासाठीच त्यांनी अल्पमताचे सरकार दिल्लीत स्थापन करण्याची संधी असतानाही त्यावर लाथ मारण्याचा आव आणला आहे. अर्थातच त्यातून आपण सत्तेसाठी राजकारणात आलेलो नाही, हे सिद्ध करण्याची संधी त्यांना साधायची आहे. पण प्रत्यक्षात सरकार बनवले तर त्यांनाही सत्तेचा हव्यास असल्याचे कुठूनही सिद्ध होऊ शकले नसते. कारण त्यांनी कुणाचा बहूमतासाठी पाठींबा मागितलेला नव्हता, की त्यासाठी त्यांनी अन्य पक्षांप्रमाणे कुठलीही सत्तापदांची सौदेबाजी केलेली नव्हती. म्हणूनच सरकार बनवले असते, म्हणून त्यांचे पावित्र्य डागाळणार नव्हते किंवा कोणी त्यांच्यावर सत्तेसाठी भ्रष्ट झाल्याचाही आरोप करू शकला नसता. उलट अवघ्या दोनतीन महियात त्यांनीच दिलेली आश्वासने काही प्रमाणात का होईना, पुर्ण करण्यातून त्यांना देशातल्या जनतेसमोर कर्तृत्वाचा पुरावाच सादर करता आला असता. सहाजिकच त्यातून त्यांना दिल्लीबाहेरच्या मतदाराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे अधिक सोपे झाले असते. पण ती उत्तम संधी त्यांनी साधलेली नाही. कारण दिल्लीच्या निवडणूकीत मारलेल्या थापा पाच वर्षे हुकूमी बहुमत पाठीशी असले तरी पुर्ण होऊ शकणार्‍या नाहीत. तेव्हा मग जबाबदारी पत्करण्यापेक्षा पावित्र्याचे नाटक करून त्यांनी नव्या थापा दिल्लीबाहेरच्या लोकांच्या गळी उतरवण्याचा पवित्रा घेतलेला आहे. तेही काम सोपे नाही. म्हणून मग नामवंत किंवा बड्या नेत्यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याची आव्हानांची भाषा केली जात आहे. तेही व्यवहारी नसल्याने तो नुसताच ‘आप’टबार ठरू शकेल.

   दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांना केजरीवाल यांनी पराभूत केले असले, तरी शाझीया इल्मी नावाच्या ‘आप’च्या उमेदवार मात्र पराभूत झाल्या, त्याचे काय? शीला दिक्षित कॉग्रेसवरील जनतेच्या रागाचे प्रतिक बनल्या होत्या. त्याचा लाभ त्याच संतापावर स्वार झालेल्या केजरीवाल यांना मिळाला. याचा अर्थ देशातली जनता त्यांच्या पक्षावर फ़िदा झाली असा होत नाही. स्थानिक पातळीवर जनतेने अनुभवलेले पक्ष व नेते आहेत. त्यांना दिल्लीच्या लाटेवर स्वार होऊन पराभूत करणे म्हणजे गंमत नाही. भारतात लागोपाठ सामने व मालिका जिंकलेल्या धोनीच्या संघाची दक्षिण आफ़्रिकेत झालेली नामुष्की आपण हल्लीच बघितलेली आहे. त्या मालिकेसाठी धोनीचा संघ रवाना झाला, तेव्हा याच भारतीय माध्यमातील पत्रकारांनी केलेल्या गमजा आपण विसरलो काय? आफ़्रिकेत धोनीच्या संघाचा दारूण पराभव कालपरवा झाला; तेव्हा त्याच्यासह त्याच्या सहकार्‍यांचे दोष तेच पत्रकार व माध्यमे मोठ्या चवीने सांगत होती. केजरीवाल यांचे दिल्लीतले यश त्याच दिशेने चालले आहे. माध्यमांनी त्यांना घोड्यावर बसवले आहे आणि ‘आप’चे नेते बरळू लागले आहेत, महाराष्ट्रात नागपूरला नितीन गडकरींच्या विरोधात अंजली दमाणिया व नाशिकात छगन भुजबळांच्या विरोधात विजय पांढरे यांना उभे करण्याच्या बातम्या म्हणूनच मनोरंजक आहेत. असे उमेदवार गडकरी व भुजबळांच्या नाकी दम आणणार, अशा बातम्या लिहिणा‍र्‍या व सांगणार्‍यांची कींव करावीशी वाटते. पुण्यात अरूण भाटिया व अविनाश धर्माधिकारी अशा स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तींनी त्याचा अनुभव घेतला आहे. तिथे कलमाडी यांच्यासारख्या अत्यंत बदनाम व भ्रष्ट व्यक्तीसमोर यांना पराभव पत्करावे लागले होते. मग दमाणिया-पांढरे यांचे काय होईल, त्याची नुसती कल्पना केलेली बरी.

   निवडणूका मोठे चमत्कार घडवतात यात शंका नाही. दिल्लीतला ‘आप’ने घडवला तो असा चमत्कार नक्कीच आहे. पण चमत्कार नित्यनेमाने घडत नाहीत, हे सुद्धा विसरून चालणार नाही. भोवतालच्या परिस्थितीने दिलेले यश व त्या परिस्थितीचा तुम्ही उठवलेला लाभ; यांचा विसर पडला, मग चमत्कार आपले शक्तीस्थान वाटू लागते. दोन वर्षे दिल्ली घुसळून निघाली होती. त्याचा लाभ ‘आप’ला मिळाला. ती त्या नवख्या पक्षाची शक्ती वा बळ नाही. अवघ्या तीनचार महिन्यात त्याची प्रचिती त्याच्या नेत्यांना आल्यशिवाय रहाणार नाही. रामलिला आंदोलनातला उत्साह पुढे केजरीवाल यांच्या उपोषणात ओसरला होता. पण पुढल्या सामुहिक बलात्काराने जी चीड जनमानसात शिरली; त्याचा लाभ या पक्षाला मिळाला. त्याच रामलिला आंदोलनानंतर अनेक राज्यात पोटनिवडणुका झाल्या, तिथे केजरीवाल यांनी कॉग्रेसला पाडायचे आवाहन मतदारांना केले होते. त्याचे कितीसे परिणाम झाले होते? दिल्लीबाहेरच्या लोकसभा मतदारसंघात यश मिळवणे वा मान्यवर उमेदवारांच्या नाकी दम आणणे दूरची गोष्ट झाली. राष्ट्रपती राजवट आणायला कारणीभूत झालेल्या ‘आप’च्या नेत्यांना पुढल्या दिल्लीतल्याच निवडणूका जमीनीवर आणतील. कारण मतदारांना तातडीने हवे असलेले काहीही पदरात पडलेले नाही. उलट आता राष्ट्रपती राजवट आल्याने कुठल्याही पक्षाला शिव्याही घालायची सोय उरलेली नाही. त्यामुळेच महागाई, महागडी वीज, पाणीटंचाई अशा बाबतीत निवडून दिलेल्या ‘आप’ उमेदवारांवर लोकांचा राग वाढत जाणार आहे. ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूका व्हायच्या असून त्यावेळी पालिकेत सत्ता असलेल्या भाजपाकडून वा कॉग्रेस नगरसेवकांकडून लोकांना थो्डाफ़ार दिलासा मिळू शकणार आहे. जिथे ‘आप’चा कोणी प्रतिनिधी नाही. म्हणजेच यांना मते देऊन फ़सलो, ही लोकांची धारणा होऊन त्यांचा रोष ‘आप’ला सोसावा लागणार आहे. बड्या नेत्यांना घाम आणायची गोष्ट सोडा, केजरीवाल यांना घाम फ़ुटणार आहे.

No comments:

Post a Comment