Sunday, December 8, 2013

‘आप’च्या विजयातला धडा


   चार राज्य विधानसभेच्या निवडणूक निकालांतून देशात कॉग्रेस विरोधी वारे कसे घोंगावत आहेत, त्याची साक्ष मतदाराने दिलेलीच आहे. पण अशा निकालातून पुढल्या राजकारणाची दिशा शोधण्याचा प्रयास नेहमीच होत असतो. मग या निकालांनी कोणता संदेश राजकीय पक्षांना दिलेला आहे? पहिली गोष्ट म्हणजे मध्यप्रदेश वा राजस्थानच्या निकालातली त्सुनामी नजरेआड करून बहुतेक सेक्युलर लोक देशात नरेंद्र मोदी यांचीही लाट कशी आलेली नाही, त्याचे विवेचन अगत्याने करणार यात शंका बाळगण्याचे कारण नाही. ज्यांना सत्य बघण्यापेक्षा आपल्याच मनातले मांडे खायचे असतात; त्यांच्यासाठी असले विश्लेषण चांगलेच असते. पण असल्याच विश्लेषणाच्या आहारी जाऊन गाफ़ील राहिलेल्या कॉग्रेस पक्षाची आज जी दारूण अवस्था झालेली आहे, त्यातून इतर राजकीय पक्षांनी काही धडा घेण्य़ासारखा आहे. मोदी यांनी सहा महिने दूर असलेल्या लोकसभा निवडणूकीचा बिगुल याच विधानसभांच्या आखाड्यात वाजवून घेतला. पण त्याचे परिणाम दोन राज्यात दिसले तर उर्वरित दोन राज्यात म्हणजे छत्तीसगड व दिल्लीत का दिसले नाहीत; असा उलट सवाल विचारला जाऊ शकतो. तेव्हा त्याचे उत्तर सांगण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण या निकालांच्या वास्तविक संदेशाकडे वळणे योग्य ठरेल. या निवडणूक निकालांनी भाजपाला दिलेले यश किंवा कॉग्रेसला दिलेल्या दणक्यापेक्षा त्या लढतीमध्ये नसलेल्या अन्य तथाकथित सेक्युलर पक्षांना एक मोलाचा संदेश वा धडा दिलेला आहे. तो धडा अर्थात केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाच्या माध्यमातून शिकवला आहे. अवघ्या चौदा महिन्यांपुर्वी स्थापन झालेल्या या नवख्या पक्षाचे दिल्ली विधानसभा निवडणूकीतील यश अनेकांना चक्रावून सोडणारे आहे.

   या पक्षाची पार्श्वभूमी काय किंवा त्याला कोणी मते दिली वा त्याने कोणाची मते खेचली; हे गौण प्रश्न आहेत. कुठलाही नवा राजकीय पक्ष निवडणूकीच्या आखाड्यात उतरतो तेव्हा तो आधीपासून प्रस्थापित असलेल्या विविध पक्षांच्याच मतांचे लचके तोडून आपला मतदार बनवत असतो. तेव्हा सर्व जागा लढवून ‘आप’ मैदानात उतरला; तेव्हा त्याने सर्वांचीच मते खाणे स्वाभाविक होते. पण आंदोलनाच्या माध्यमातून जनमानस आधीच जिंकलेल्या या पक्षाने कोणता मतदार बळकावला, ते महत्वाचे आहे. अर्थात पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या कॉग्रेसच्या नाराज मतदाराने त्याला खुप मोठी साथ दिलेली आहे. पण त्याचवेळी भाजपाच्याही किरकोळ मतदाराने त्याला साथ दिलेली आहे. पण एवढ्याच मतांवर केजरीवाल इतकी मोठी मजल मारू शकले नसते. त्यांनी बिगर भाजपा बिगर कॉग्रेस पर्याय शोधणार्‍या मतदाराकडेही डोळा ठेवला होता. म्हणूनच सतत त्यांनी आपल्या प्रचारात त्याच दोन्ही पक्षांना आपल्या टिकेचे लक्ष्य बनवले होते. थोडक्यात आपल्या देशात सातत्याने जी तिसर्‍या आघाडी वा पर्यायाची भूमिका मांडली जात असते, तिला दिल्लीपुरते साकार करण्यासाठी केजरीवाल यांनी कंबर कसली होती. त्यामुळेच त्यांनी अशा अन्य पक्षांकडे जाणारा मतदारही आपल्याकडे वळवला. मागल्या खेपेस चौदा टक्के मते मिळवणारा बसपा यावेळी गडप झाला आहे. कारण त्याची जागा व मते केजरीवाल यांच्या ‘आप’ पक्षाने गिळंकृत केली आहेत. अगदी मतदान संपले तरी आपण दोन्ही पक्षांना साथ देणार नाही, अशी ग्वाही या नव्या पक्षांचे नेते देत होते. तिथेच मायावती, मुलायम, लालू वा पासवान इत्यादींपेक्षा आपण वेगळे आहोत; अशी ओळख या पक्षाने करून दिलेली आहे. म्हणूनच त्याला मिळालेला प्रतिसाद महत्वाचा संकेत आहे,.

   नेहमी निवडणूकीच्या काळात भाजपासहीत कॉग्रेसच्या विरोधात बोलायचे आणि निकाल लागल्यावर सेक्युलर जातीयवादाचा बागुलबुवा करून पुन्हा जनतेने नाकारलेल्या कॉग्रेसला जीवदान द्यायचे, असे आपल्या देशातील सेक्युलर पक्षांचे थोतांड चालले आहे. प्रत्यक्षात त्यांनी देशा्तल्या सेक्युलर शक्ती मजबूत केलेल्या नाहीत. पण मरू घातलेल्या कॉग्रेसला प्रत्येकवेळी जीवदान दिलेले आहे. सत्तेची भागिदारी मि्ळवण्यासाठी सेक्युलर नाटक रंगवलेले आहे. ‘आप’ने त्यालाच शह दिला आहे. भाजपा वा कॉग्रेसला कुठल्याही स्थितीत पाठींबा नाही, अशी ठाम भूमिका त्याने घेतलेली आहे. म्हणूनच त्या दोन्ही पक्षांना वगळता असलेल्या मतांचा तिसरा पर्याय ‘आप’च्या झोळीत पडला आहे. म्हणजेच किरकोळ प्रमाणात असलेली सपा. बसपा. जदयु वा डाव्यांची मते आप’च्या झोळीत जाऊन पडलेली आहेत. या पक्षांनी मागल्या दोन दशकात आपली विश्वासार्हता गमावलेली होती. म्हणूनच जनता तिसरी आघाडी ही कॉग्रेसचीच छुपी टिम मानू लागली होती. त्यामुळे जी राजकीय जागा मोकळी आहे, तीच व्यापण्यासाठी हा नवा पक्ष पुढे सरसावला आहे. त्यामुळेच पुढल्या काळात भाजपा वा कॉग्रेस नको म्हणणार्‍या मतदारासाठी, तोच खरा प्रामाणीक तिसरा पर्याय होऊ शकणार आहे. त्यामुळेच त्याचा धोका भाजपाला असणार नाही, तर केवळ बिगर कॉग्रेसवादाचे नाटक करून पडद्यामागे कॉग्रेसशी हातमिळवणी करणार्‍या पक्षांना पर्याय उभा राहिला आहे. ‘आप’ हा म्हणूनच मुलायम, मायावती, लालू, पासवान, नितीश वा डावी आघाडी यांच्यासाठी पर्याय म्हणून पुढे येऊ घातला आहे. तो मोदी भाजपा विरोधी असेलच, पण जातीयवाद रोखायचे नाटक करून कॉग्रेसच्या वळचणीला बसणार नाही, ह्या विश्वासामुळे देशातला तिसरा पर्याय बनू शकतो.

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. आता त्या सत्तावीस आमादाराना पुरते पाच वर्ष एकही दमडी खाऊ न देत , एकही डाग न पडू देत - सांभाळणे आणी जसे कबूल केले आहे तसे "सकारात्मक " विरोधी पक्ष होणे , हेच मोठे आव्हान

    ReplyDelete
  3. भाऊ, एक धोका अजूनही उद्भवतो तो म्हणजे "आप" पक्षातले निवडून आलेले बहुसंख्य आमदार सर्वसामान्य वर्गातले असून "भाजपा" अथवा "कोंग्रेस" मधील धंदेवाईक कार्यकर्ते असतात तसे नाहीत. तेंव्हा त्यातील अननुभवी आमदारांना फितवून सत्तेच्या लोण्याचा गोळा खाऊ घालू शकतात !

    ReplyDelete
  4. छत्तीसगड,मध्यप्रदेश,राजस्थान येथे बीजेपीला बहुमत मिळाले परंतु दिल्ली मध्ये सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा त्यांना सरकार स्थापन करता येत नाही स्पष्ट बहुमत कोणाकडेही नाही 'आप' म्हणते बीजेपी सरकार बनवेल आणि 'बीजेपी' म्हणते आप सरकार बनवेल कमीत कमी दोघांनी मिळून सरकार स्थापन करावे जनतेचे पैसे कशाला वय घालवता 'आप' ला सरकार बनवायची नाहुती तर इलेक्शन मध्ये भाग कश्याला घेतला ? आता ते म्हणतात पक्ष घोडेबजी करतात मग केजरीवाल स्वतः का प्रेस मध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांना आप मध्ये बोलवतात ती घोडेबजी नाही का ? ते काहीही असो दिल्ली मध्ये राष्ट्रपती शासन लागू होणार म्हणजे केंद्र सरकारचे शासन येणार मग निवडणुका घेऊन फायदा काय झाला ?

    ReplyDelete