Saturday, August 11, 2018

सुदृढ पुरोगामीत्वासाठी

 hameed dalawai triple talaq के लिए इमेज परिणाम

रविवार २९ जुलै २०१८ रोजी सोलापूरच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या निमीत्ताने गेलेला होतो. तिथे माझे व्याख्यान होते. दुसर्‍या दिवशी मराठा आरक्षणाच्या कारणाने सोलापूर बंद असल्याने मला तिथून निघणे शक्य नव्हते. तिथल्या पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी मग वार्तालाप गप्पा अशा कार्यक्रमाला आमंत्रित केले. आदल्याच दिवशी तिथेही एक समारंभ पार पडला होता आणि त्यात वादग्रस्त कार्यकर्ते पत्रकार निखील वागळे यांचे भाषण झालेले होते. सहाजिकच माझ्या गप्पांमध्ये पुरोगामी प्रतिगामी वगैरे प्रश्न विचारले जाणार, हे अपेक्षितच होते. कोणीतरी तसा प्रश्न विचारलाही. इतका जुना पत्रकार असूनही मी प्रतिगामी विचारांचे समर्थन कसा करतो? त्याला सविस्तर उत्तर देण्य़ाची यामुळे संधी मिळाली. साधारण तिशीचाळीशीतला पत्रकार वर्ग समोर होता. त्यांना एक जुनी आठवण म्हणजे प्रत्यक्ष घटनाच कथन केली. जुनी म्हणजे तब्बल ४६ वर्षे जुनी.

१९७२ सालाच्या अखेरीस मुंबईच्या नागपाडा भागात महाराष्ट्र कॉलेजमध्ये अखील भारतीय मुस्लिम व्यक्तीगत कायदा मंडळाची परिषद भरलेली होती. तो परिसर पुर्णत: मुस्लिम बहुल वस्तीचा आणि तिथेच तलाकपिडीत महिलांना न्याय देण्यासाठी हमीद दलवाई यांनी एक मोर्चा योजलेला होता. त्या मोर्चात मुठभरही मुस्लिम नव्हते. तर आमच्या सारखे तथाकथित पुरोगामी जन्माने हिंदूच अधिक होते. अधिक म्हणजे तरी किती? आमची सगळी मिळून संख्या पन्नासही नव्हती. उलट तिथे दहाबारा हजाराचा अफ़ाट मुस्लिम समुदाय तावातावाने दलवाई मुर्दाबादच्या घोषणा देत गदारोळ करीत होता. आमच्या मोर्चाला चहूकडून पोलिसांनी वेढा दिलेला होता. अखेरीस आम्हाला पोलिसांनी गाडीत भरून नागपाडा पोलिस ठाण्यात नेले. नंतर सोडूनही दिले. त्या तलाकविरोधी मागणी वा मोर्चाला पुरोगामी म्हणावे, की प्रतिगामी असा प्रश्न आहे. कारण त्या मोर्चात कोणीही बिगर पुरोगामी नव्हता. आज तलाकबंदीला कडाडून विरोध करणारे बहुतांश त्यात सहभागी होते आणि मोर्चाची मागणी मात्र तलाकबंदीची होती. त्यात राज्यसभेचे आजचे खासदार हुसेन दलवाई हे हमीदचे बंधू होते आणि पुरोगामी पत्रकार समर खडसचे पिताजी महंमद खडस होते. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर होते आणि प्रा. नलिनी पंडितही होत्या. मी आजही त्या मागणीच्या पाठीशी ठाम उभा आहे. म्हणूनच मोदी सरकारने आणलेल्या तिहेरी तलाक बंदीच्या कायद्याला माझा पुर्ण पाठींबा आहे. शेहेचाळिस वर्षापुर्वी जिथे भाऊ तोरसेकर उभा होता, तिथेच आजही ठामपणे उभा आहे. त्याच पुरोगामी मागणीच्या पाठीशी मी उभा असेन, तर मी प्रतिगामी कसा होऊ शकतो? की तेव्हा पुरोगामी असलेली मागणी आज प्रतिगामी झाली आहे? आणि तिहेरी तलाक अकस्मात पुरोगामी होऊन गेला आहे? नेमके काय बदलले आहे?

सवाल बदलाचा आहे. मी तेव्हा तिहेरी तलाकचा विरोधक म्हणून पुरोगामी होतो. म्हणूनच आजही पुरोगामीच आहे. पण तेव्हाचे माझे अनेक पुरोगामी सहकारी, उदाहरणार्थ हुसेन दलवाई किंवा मुणगेकर मात्र उलट्या टोकाला जाऊन तिहेरी तलाकच्या विरोधालाच विरोध करत आहेत. तर त्यांचे पुरोगामीत्व कुठे शिल्लक राहिले? हा सगळा किस्सा ऐकून अनेक उपस्थित पत्रकार अवाक झाले. तेव्हा माझा युक्तीवाद पुढे नेत मी समजावले, की आजही मी तितकाच व तसाच पुरोगामी आहे. पण तेव्हाचे माझे अनेक सोबती मात्र पुरोगामीत्व विसरून इस्लामी प्रतिगामीत्वाला शरण गेलेले आहे. मी अजून पुरोगामी आहे. पण मुणगेकर दलवाई मात्र थेट तालिबानी होऊन गेले आहेत. आज त्यांनी पत्करलेली भूमिका पुरोगामी नाही, तर तालिबानी वा जिहादी झालेली आहे. पण हा बदल केवळ तिहेरी तलाकपुरता मर्यादित नाही. प्रत्येक बाबतीत या तेव्हाच्या पुरोगामी लोकांनी जिहादी तालिबानी भूमिका स्विकारलेल्या आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून इस्लामी जिहादी प्रवृत्ती आपल्याला पुरोगामी म्हणवून घेत पुढे सरसावल्या आहेत. आजकाल कुणालाही पुरोगामी असल्याचे प्रमाणपत्र कुणा मुल्लामौलवी किंवा बिशप फ़ादरकडून मिळवावे लागते. पुरोगामी विचार कधीच संपला असून, त्यावर जिहादी टोळीने कब्जा केलेला आहे. प्रातिगामीत्वालाच पुरोगामी असे लेबल लावण्यात आलेले आहे. अशी ग्राहकाची फ़सवणूक नेहमी लबाड दुकानदार करीतच असतात. कुठल्याही भेसळीच्या मालाला उत्तम दर्जेदार मालाचे लेबल लावून, ग्राहकाच्या गळ्यात मारून झटपट अधिक मफ़ा कमावण्याचा उद्योग कायम चालू असतो. त्याला तात्पुरते यशही मिळते. पण ग्राहकाला हळुहळू आपली फ़सगत लक्षात येते आणि तो सामान्य माणूस अशा डुपिलिकेट मालाकडे पाठ फ़िरवत असतो. मागल्या दोन दशकात हा राजकीय विचारांच्या भेसळीचा उद्योग प्रचंड फ़ोफ़ावला होता आणि त्यांचे पितळ उघडे पडत गेल्याने त्याकडे जनता पाठ फ़िरवत गेली आहे. कालपर्यंत देशावर राज्य करणार्‍या पुरोगामी पक्ष संघटनांचे म्हणून दिवाळे वाजलेले आहे आणि दुकाने बंद पडत गेलेली आहेत. कारण त्यांनी आपल्या दुकानावर कितीही पुरोगामीत्वाचे फ़लक झळकवलेले असोत, किंवा मालावर सेक्युलर लेबले लावलेली असोत. त्या फ़लक व लेबलाच्या आडोशाने प्रतिगामीत्व आपल्य गळ्यात मारत असल्याची जाणिव सामान्य जनता व मतदाराला झालेली आहे.

मुद्दा असा आहे, की ज्यांला कोणी या नकली पुरोगामीत्वाने स्पर्श केला आहे, त्यांचेही असेच दिवाळे वाजत गेलेले आहे. पत्रकार वा साहित्यिक यांना पुरोगामी प्रतिगामी असायची कुठलीही गरज नसते. समाजाचे प्रबोधन हे अशा वर्गाचे खरे कर्तव्य असते. जेव्हा असा वर्ग विचारधारेचा गुलाम होतो आणि खोटीनाटी प्रमाणपत्रे पुरवून जनतेची दिशाभूल करण्यास हातभार लावण्यात पुढाकार घेतो, तेव्हा त्याचेही दिवाळे वाजू लागते. आज वर्तमानपत्रे, वाहिन्या किंवा साहित्य क्षेत्राची त्यामुळेच धुळधाण उडालेली आहे. नावाजलेले संपादक वा माध्यमे दिवाळखोरीत गेली आहेत. कारण त्यांना नकली पुरोगामीत्वाची बाधा झालेली आहे. त्यातून बाहेर पडण्यापेक्षा त्याच मानसिक आजाराला आपले निरोगीपण सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड त्यांना अधिकच गर्तेत घेऊन चालली आहे. याचा अर्थ पुरोगामी विचार चुकीचा नसतो. भारतीय जनता नेहमीच पुरोगामी वा प्रगत विचारांची समर्थक राहिलेली आहे. पण त्या सामान्य भारतीयाला अस्सल माल व नकली माल यातला फ़रक उमजण्याची बुद्धी आहे. म्हणूनच एका टोळीने पुरोगामीत्व बळकावले आणि प्रतिगामी करून टाकले, तेव्हा भारतीयांनी लेबल लावलेल्या सर्व प्रकारच्या पुरोगामीत्वाला झुगारून देण्य़ाचा विडा उचललेला आहे. त्याला संघ वा भाजपा हिंदूत्ववादी जबाबदार नसून, ‘जमाते पुरोगामी’ नावाची नकली पुरोगामी टोळी कारणीभूत झालेली आहे. भाऊ तोरसेकर आजही पुरोगामी आहे आणि भारतीय जनता आजही तितकीच प्रगत विचारांची आहे. फ़रक पडला आहे तो पुरोगामीत्वाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या जिहादी तालिबानी नकली मालाचा. असले जिहादी पुरोगामीत्व लोकांनी नाकारले आहे आणि पर्यायाने त्याचाच भार डोक्यावरून वहाणार्‍या पुरोगामी वर्गाला लोकांनी झिडकारण्याची भूमिका घेतलेली आहे. हे लोक पुरोगामी नाहीत तर इस्लामी धर्मांधतेने ह्या पुरोगाम्यांचा मुखवटा आपल्या हिडीस चेहर्‍याला झाकण्यासाठी वापरला आहे. 

हमीद दलवाईंच्या पुरोगामी विचार वा भूमिकांना हेच लोक पायदळी तुडवत असतील, तर त्यांचे पुरोगामी मुखवटे फ़ाडण्याची गरज आहे आणि त्या मुखवट्याआड लपलेल्या पुरोगामी जमातीचा खरा चेहरा सामान्य माणसाला दाखवणे अगत्याचे आहे. एकवेळ जिहादी कसाब किंवा तालिबानी ओसामा परवडला. कारण तो समोरून येणारा उघड शत्रू असतो. पण जमाते पुरोगामी हा गाफ़ील ठेवून मित्ररुपाने येणारा मायावी राक्षस असतो. त्याच्याविषयी जनतेला सातत्याने सावध करणे व त्याच्या मायावी रुपामागचा हिडीस चेहरा लोकांना दृगोचर करून दाखवणे, हे खरेखुरे पुरोगामी व प्रगतीशील कार्य आहे. प्रवचने व व्याख्यानातून राष्ट्रीय विचारांना उजाळा देत रमलेल्या डॉ. सच्चीदानंद शेवडे व डॉ. परिक्षीत शेवडे या पितापुत्रांनी सवड काढून त्यासाठी लेखणी हाती घेतली हे म्हणूनच एक पवित्र पुरोगामी कार्य आहे. भेसळीचा माल समाजाला दाखवून जागृत करणे, हे म्हणूनच समाज निरोगी बनवण्याचे समाजकार्य आहे. राष्ट्रनिर्मिती वा उभराणी करताना त्याला लागणार्‍या किडीचे निर्मूलन अगत्याचे असते. आज त्या विषाणूंनी पुरोगामी विचारांना रोगट करून टाकले आहे. तिथेच त्याला पायबंद घातला नाही, तर राष्ट्र व समाज त्याच रोगराईत ओढला जाणे अपरिहार्य असते. शेवडे पितापुत्र संयुक्तपणे या कामाला लागले असतील, तर त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्याला पर्याय उरत नाही. कारण अशा प्रयत्नातूनच हमीद दलवाई किंवा अनेक स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यसैनिकांनी रुजवलेला विचारच अधिक प्रभावी व सुदृढ होणार आहे. त्याला जमाते पुरोगामीच्या भुलभुलैयापासून सुखरूप ठेवण्याच्या प्रयासांना म्हणूनच महत्व आहे. आज पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या नव्या पिढीतल्या रोगट पुरोगाम्यांची भरकटलेली मानसितता या आजाराचे गाभिर्य स्पष्ट करणारी आहे. त्यावरचा जालीम उपाय म्हणून शेवडे पितापुत्रांच्या या लेखमाला ग्रंथाकडे बघणे आवश्यक आहे. हा ग्रंथ प्रामाणिक पुरोगाम्यांना उपयुक्त ठरावा आणि राष्ट्रावर प्रेम करणार्‍यांना मार्गदर्शक ठरेल अशी खात्री आहे.

(शेवडे पितापुत्रांच्या आगामी पुस्तक ‘जमाते पुरोगामी’साठी पुरस्कार प्रस्तावना)

9 comments:

  1. उत्तम भाऊ ,तुम्ही सगळ्या पुरोगामी ?पत्रकारांसमोर त्यांनाच आरसा दाखवलात .हा नकली बुरखा फाटण्याची सुरुवात २०१४ पासून झालीय तोपर्यंत ते विष भीनतच होत समाजामध्ये ,लोकांना वाटत २०१४ साली नुसता सत्ताबदल झाला पण तसं नव्हतं ,भारताची जी यंत्रणा नेहरूंनी उभी केली होती ती पहिल्यांदाच विस्कटली गेली ,त्यात सर्वच आले,हे उचकटन खूप शांत डोक्याने हळू हळू केलं गेलंय ,आता सगळे बुरुज ढासळताना लक्षात येतंय,जे कोसळतायत त्यांना कसं सावरावे ते देखील कळेना. अजून खूप काही येईल समोर

    ReplyDelete
  2. भाऊ तिहेरी तलाक वर तुम्ही, सगळी भारतीय जनता, मुस्लिम महिला एकाच बाजूच्या आहेत,नाहीत फक्त पुरोगामी म्हणवणारे लोक आणि काँगेस तत्सम पक्ष
    पण ते खुल्यापणे भूमिका का घेत नाहीत? NRC ,आरक्षण आंदोलने,राम मंदिर,काश्मीर मधल operation ऑल आऊट ,obc बिल ,सगळ्यातच काँग्रेसला काही ठोस भूमिका घेता येईना ,पुरोगामी लोक वगैरे ठीक आहे त्यांना काय मत मागायची नसतात ,खरं तर विरोधी पक्षाने सरकारला अस भूमिका कोंडीत पकडायचं असत ,इथं उलटंच होतंय .सर्वात मोठ्या विरोधी पक्षाने असं चाचपडावं हे ठीक नव्हे.

    ReplyDelete
  3. Who are these people to issue certificates of secularism and progressiveness? What is their criteria? They have diverted from their agenda may be due to their petty short term gains.
    As a society, we Hindus are progressive minded. We have accepted many changes in our practices.
    The second issue in my mind is, Hindus are criticised on manusmrity. I don't know, how many people have seen it, let the reading be apart. It is very easy to label anybody as conservative.

    ReplyDelete
  4. पुरोगामी विषय निघाला म्हणून २ दिवसापूर्वी तामिळनाडूचा पण पुरोगामित्वाचा नकली चेहरा समोर आला ,द्रविडीयन चळवळीचा बोजा dmk आणि admk यांनी फार पूर्वीच वाजवला ,आणि ते पुरोगामी म्हणता कट्टर सनातनी झाले ,नाहीतर अण्णादुराई च्या पायाशी काही फूट जागा द्या यासाठी रात्री कोर्टात कशाला गेले असते,सर्वजण जयललिता पक्षाला लाखोली वाहत होते मोदींना पण ओढत होते ,त्यांना ते असे का करतायत हा प्रश्न वाटला नाही ,त्याचे कारण त्याच जनहित याचिका .dmk ने वापरलेल्या . जयललितांचे निधन झाले तेव्हा पक्ष सत्तेत असल्याने मरिना बीचवर त्यांचं स्मारक झालं ,पण dmk पक्षाने जनहित याचिका नावाने त्याला विरोध सुरु केला होता ,नेहमीच पर्यावरणाचं कारण ,साताधारी पक्षला २ वर्षे कोर्टात उत्तर द्यावं लागत होत आणि ५ याचिका होत्या ,त्या खरंच पर्यावरण वाद्यांच्या होत्या तर करुणानिधींना परवानगी नाकारताच १५ मिन मागे कशा घेतल्या?तामिळ नेत्यासाठी मागे घेतल्या अस म्हणावं तर जयललिता तामिळ द्रविड नेत्या नवत्या काय ,मग त्यांना विरोध का होता कोर्टबाजी का चालू होती?खरं तर admk महित होत कि स्मारक तिथेच होणार आहे त्यांना त्रास देणाऱ्या नकली याचिका मागे घ्याला लावायच्या होत्या ,तीच वेळ होती कारण परवानगी दिली असती तर करुणाचं स्मारक निर्वेध झालं असत आणि जयललितासाठी कोर्टबाजी चालू राहिली असती म्हणूनच शेवटची याचिका सकाळी मागे घेतली गेली आणि सरकारने भूमिका नरम केली,ते काम स्टालिन लाच करावं लागलं कारण तोच कारणीभूत होता ,नको तिथं राजकारण केला कि असं होतं म्हणून त्याला निकाल आला कि रडू कोसळलं,हे जर केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर झालं असलं तर स्टालिन ला कळलं असेल मोदी काय चीज आहे आणि इथून पुढे समोर काय उभे आहे. विरोध पत्करून गुजरात मध्ये मोदींच्या शपथविधीला येणाऱ्या जयांना त्यांनी न्याय दिला

    ReplyDelete
  5. भाऊ, हा तेव्हाच्या पुरोगामी मंडळींच्यात आता बदल का आणि कसा झाला, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? हुसेन दलवाई आणि मुणगेकर यांचे मतपरिवर्तन का झाले? त्यांची तत्त्वावरची नजर हलली की त्यांचा बुद्धिभंग झाला? तसा तो कोणी केला? हमीद दलवाई हे मुस्लिम समाजातून आले म्हणून त्यांचे पुरोगामीत्व मंजूर आणि बाकीच्या बिगर-मुस्लिम लोकांनी त्याच बदलांचा आग्रह धरला तर ते नामंजूर असे आहे का? की ती पुरोगामी चळवळ त्यावेळी मुल्ला-मौलवींच्या आणि राजकारण्यांच्या हातात गेली नव्हती, आणि आता गेली आहे, हे कारण आहे? ह्यावरचे विवेचन उपयुक्त ठरेल कारण खरोखरच ह्यातून खूप शिकण्यासारखे आहे.

    ReplyDelete
  6. Call the dog mad and shoot him या म्हणीप्रमाणे आपण पुरोगामी आणि पलीकडचे प्रतिगामी असे ठरवले जाते .ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही . मुस्लिमांचा अनुनय करण्याची हिंदूंनाच का गरज भासते ? मुस्लिम हिंदूंचा अनुनय करत आहेत असे कुठेही दिसत नाही .

    ReplyDelete
  7. भाऊ ..........मस्तच !! आजच्या भोंदू आणि ढोंगी ' पुरोगामी ' मुखवट्यामागील चेहऱ्याचे वास्तव तुम्ही समोर आणले याबद्दल धन्यवाद. मला वाटते आजच्या पुरोगाम्यांना ' चरितार्थासाठी ' विदेशी ' एन.जी.ओ ' कडून उपकृत केले जात असून त्यासाठीही हे लोक लाचार आणि ' निर्लज्ज ' झाले आहेत असे वाटते.

    ReplyDelete
  8. Manusmriti is succeeded by yadnyawalya! Manu was a kshatriya! People neither hv read anything nor have sense of history n they r called purogaami!

    ReplyDelete