Sunday, August 12, 2018

अगतिकतेचे ‘स्व’रुप

swarup pandit के लिए इमेज परिणाम

नऊ वर्षापुर्वी साधारण याच आसपास एक चुणचुणित मुलगा मला भेटायला आलेला होता. तेव्हा मी ‘मुंबई तरूण भारत’ नव्याने प्रकाशन सुरू करण्यात सहभागी झालेला होतो. ह्या पंचविशीतल्या तरूणाला पत्रकारितेत यायचे होते. माझ्या मुलीनेच त्याचे नाव सुचवले होते. पुण्याच्या चाणक्य मंडळात युपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी गेलेला असताना, त्याची मुलीशी ओळख झालेली होती. त्याच्या अंगावरून घाम जितका वहात नसेल, इतका उत्साह वहाताना दिसत होता. स्वरूप पंडित त्याचे नाव. दोनचार प्रश्न विचारले आणि एक विषय लिहून मागितला. लगेच त्याला सहभागी करून घेतले. चेंबूरच्या कार्यालयात हा पंचविशीतला मुलगा, विरारहून दोन गाड्या बदलून दोन अडीच तासाचा आटापीटा करून यायचा. पण रात्री उशिरा निघतानाही त्याच्या अंगातला उत्साह संपलेला नसायचा. मग काही महिन्यातच तो अन्यत्र काम शोधत निघूनही गेला. ओआरएफ़ या संस्थेत अभ्यास व संशोधन असे त्याच्या छंदाशी जुळणारे काम मिळाले आणि स्वरूप माझ्या समोरून अंतर्धान पावला. अधूनमधून फ़ोन करायचा, कधी कुठल्या संदर्भासाठी विचारणा करायचा. पण काही महिन्यात त्याने नाते जोडले होते. मग लोकसत्ता वगैरे अन्य दैनिकातून त्याने काम केले. कुठेतरी वाट शोधत निघालेला, पण नेमके गंतव्य स्थान अजूनही ठाऊक नसलेला वाटसरू, असे काहीसे माझे त्याच्याबद्दल मत झालेले होते. संपर्कात नसला तरी मुलीकडून त्याची अधूनमधून खबर मिळत होती. एकदोनदा भेटायलाही आला होता. दरम्यान त्याने लग्नही उरकले होते. एकदा पत्नी अंजलीला घेऊन भेटायला आला. आजच्या युगात व पिढीत इतका सत्शील व शुद्ध जगण्याचा कठोर प्रयास करणारा प्राणी दुर्मिळ. दोन महिन्यापुर्वी अकस्मात कन्या म्हणाली स्वरूप खुप आजारी आहे. मला त्याच्या आजारी रुपाची कल्पनाही करता येत नव्हती. ज्याच्या अंगातून कायम उत्साहाच्या धाराच वहात असल्याचे मला प्रत्येक भेटीत व सहवासात जाणवत राहिले, तो मुलगा आजारी? नेमके कारण ठाऊक नव्हते. पण मुलीशी फ़ोनवर तो बोलत असताना तिच्याच आग्रहाखातर त्याला उगाच आवाज चढवून उपचार व औषधपाण्यावरून दमदाटीही केली. त्याच्यासारख्या कोवळ्या पोराने आजारी पडायचे, तर माझ्यासारख्या म्हातार्‍याने मरावे काय? असेही उपरोधिक बोललो होतो. असा स्वरूप प्रत्यक्षात असाध्य कर्करोगाने ग्रासलेला होता, हे तेव्हा मला ठाऊक नव्हते आणि स्वरूपलाही माहित नव्हते. हा पुढला घटनाक्रम इतक्या वेगाने बदलत गेला, की गुरूवारी संकेत सातोपेने स्वरूपला हिंदूजामध्ये अतिदक्षता विभागात दाखल केल्याचे अकस्मात फ़ोनवर सांगितले. तेव्हा धक्काच बसला. मी मुलीला कळवले आणि ती ऑफ़िसातून धावत घरी आली. स्वरूप अखेरच्या टप्प्यावर आलेला होता. माझी मुलगी, पत्नी त्याला भेटून आले. मग मला तिथे जाण्याची संधी मिळाली. सर्वांनी म्हटले होते, स्वरूपचा डोळा लागलाय. त्याला उठवू नका. पण मी त्याच्या रुग्णशय्येपाशी पोहोचलो, तेव्हा त्याचे डोळे किलकिले वाटले. म्हणून भसाड्या आवाजात म्हणालो, मी भाऊ तोरसेकर. त्याने मान वळवली आणि ओशाळवाणा हसलाही. नाकाला जोडलेली प्राणवायुची नळी काढायचाही प्रयास केला त्याने. पण मी थांबवले. तो माझ्याकडे टकटकीत नजरेने बघत होता. मला ओळखले असेही वाटले. पण त्याच्या नजरेत स्वरूपचा उत्साह कुठे जाणवला नाही. नऊ वर्षापुर्वी भेटलेला स्वरूप त्या नजरेत नव्हता. किंबहूना आपण तोच स्वरूप नाही, याचे ओशाळवाणेपण त्याच्या त्या अगतिक नजरेत साफ़ दिसत होते. मुलीला व इतरांना त्याने मला ओळखले वा डोळे उघडून वळून बघितल्याचे कौतुक होते. पण मला ती हरवलेली नजर अजिबात भावली नव्हती. तो दृष्टीक्षेप निरोप घेणारा होता. तिशीतला स्वरूप सर्व काही संपल्याचाच संकेत देत होता. मी माझे हे मत कोणाला बोललो नाही. माझी मुलगीही पुन्हा उपचार सुरू होण्याविषयी उत्साहात बोलत होती. तिला अजिबात निराश केले नाही. पण स्वरूपची निराश ओशाळी नजर, सर्व काही स्पष्ट करून गेली होती आणि शनिवारी दुपारी त्याने जगाचा निरोप घेतल्याची बातमी मिळाली. अजून त्याचा अर्थ लागलेला नाही. आयुष्यातली तीन दशके तनमनाने विशुद्ध निरोगी निरागस जगलेला स्वरूप, ह्या भयाण मृत्यूच्या रुपात बघायला लागावा, ही सल चोविस तास उलटत आले तरी बोचायची थांबलेली नाही. बरेवाईट, योग्य-अयोग्य, पापपुण्य अशा सगळ्या शब्दांची निरर्थकता आकलनाच्या पलिकडे गेलेली आहे. विज्ञान वैद्यकशास्त्र त्याचे शेकडो खुलासे स्पष्टीकरणे देतीलही. पण माणूस फ़क्त मातीचा बनलेला नसतो. त्यातली चेतना व भावना विज्ञानाच्याही पलिकडली असते. बुद्धी व तर्काला निरूत्तर करून जाणारे असे क्षण, आयुष्याला श्रीमंत करतात की भिकारी करून जातात? या विश्वाच्या पसार्‍यात आपली बुद्धी किती क्षुल्लक आहे, त्याची बोचरी जाणिव अगतिक करून टाकणारी असते. स्वरूप निघून गेला. पण किती प्रश्न व बोचर्‍या जाणिवा मागे ठेवून गेला ना?
#खयाल_अपना_अपना

10 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. तुमचा लेख मला अतिशय भावविवश करुन गेला. मला माझ्या आईची आठवण झाली.

    ReplyDelete
  3. भाऊ, वाचून डोळ्यातून अश्रू आले. ईश्वर त्याच्या आत्म्यास सद्गती देवो.

    ReplyDelete
  4. Miss you swaroop dada...
    Chanakya mandal parivar cha khambir hath ata sharirane nahisa zala pan manatun ajunahi ithech ahe...
    We'll nevwr forget you..
    ....... tuzach adnyadharak..
    (Ek vidyarthi)
    (Cmp 16-17)

    ReplyDelete
  5. म्हणूनच रामदास स्वामी सांगतात मरावे परी कीर्तिरूपे उरावे

    ReplyDelete
  6. खूपच वाईट वाटले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चीर शांती देवो.

    ReplyDelete
  7. Deeply saddened by his demise ... he used to call -support - reply to all my Kashmir articles - Khup sadha ani suswabhavi ... don’t have words ..
    I still can’t believe

    ReplyDelete
  8. He was my classmate at chaphekar's classes..Rather I knew him since we were just 10 years old.. real simpleton yet always had battle within ..His truthful ways verses conniving multitude around..This battle took a toll on his health..This battle kept gnawing his soul thus transpired as a terminal illness..I used to tell him "please live as a realist...But he Always advocated his ideal approach. From last 6-7 years I lost touch n now I got his Whereabouts...As shocking news of his demise...In year 1999.. MacDonald's was such a craze..He denied the junk food..Vices..Bad habits..Bad company...Still..Cancer...such an injustice..God must be put on trial for this if at all he is there somewhere!!
    Many memories.. just have a Peace there .. take a rest my dear friend. Will miss a real gem of a person.



    ReplyDelete
  9. स्वरूपचे " स्वरुप " शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे, त्यच्यावर सस्कार करणाऱ्या मातापित्याना वंदन

    ReplyDelete