Thursday, October 18, 2018

मोरारजी, कामराज, यशवंत सिन्हा, अरूण शौरी

२०१९ ची लोकसभा, जिंकणार ‘कॉग्रेसच’! (लेखांक तिसरा) 

kamaraj moraraji के लिए इमेज परिणाम

पण लागोपाठ कुठलाही पक्ष बहूमत मिळवू शकला नाही आणि सलग सात लोकसभा निवडणूका त्रिशंकू स्थितीत गेल्या, त्यामुळे अभ्यासकांनाही तोच सिद्धांत वाटायला लागला असावा. त्यामुळे २०१४ सालात बहूमतापेक्षा दहा जागा जास्त जिंकणारे नरेंद्र मोदी वा भाजपा, हा मुळात अभ्यासकांनाच चमत्कार वाटून गेला. त्यांनी त्यालाच मग सिद्धांत बनवून टाकले. पण मुळात एक मोठा राष्ट्रव्यापी पक्ष रसातळाला जातोय आणि त्याची जागा घ्यायला अन्य कोणी पक्ष पुढे येत नाही, ही अभ्यासक वर्गासाठी चिंतेची बाब होती. अभ्यासाची बाब होती. किंबहूना त्यातून भाजपा पर्यायी कॉग्रेस होत पुढे येताना दिसतही होती. पण ते सत्य डोळसपण बघायची कुठल्या विश्लेषकाची तयारी नव्हती. आपल्या पुर्वग्रह वा समजुतीतून बाहेर पडायला हा वर्ग राजी नव्हता. म्हणून सत्य बदलत नाही, की परिस्थिती जैसेथे रहात नाही. मतदाराने तशी पोषक स्थिती दिसताच पुन्हा एकपक्षीय बहूमताची लोकशाही प्रस्थापित केली. मात्र त्यातून मतदाराची भूमिका कोणती व इच्छा काय, हे अभ्यासकांना ओळखता आलेले नाही. म्हणून त्यांना मोदीलाट जाणून घेता आली नाही, की साडेचार वर्षे उलटून गेल्यावरही पचवता आलेली नाही. मागल्या खेपेस मोदींची लोकप्रियता दिसत होती, पण मनाला पटवून देता येत नव्हती. म्हणून आघाडीयुगाचा आग्रह मान्य करत येईल. पण तो उलटफ़ेर मतदाराने घडवला असताना पुढे राजकीय भाकित करणे अवघड नाही. ज्या नियमाने बदनाम होऊनही कॉग्रेस पक्ष आधीच्या सहा दशकात वर्चस्व गाजवित राहिला, तेच आता भाजपाच्या बाबतीत झालेले आहे. म्हणूनच मोदी सरकारची तुलना मनमोहन सरकारशी करता येत नाही, की त्यानुसार आगामी लोकसभेचे आडाखे बांधता येणार नाहीत. पण अशा मानसिकता व पुर्वग्रहाचे मनावर खुप दडपण असले, मग चाचण्या घेऊनही योग्य निष्कर्ष काढता येत नाहीत.

पन्नास वर्षापुर्वी संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते व महान संपादक लेखक आचार्य अत्रे कॉग्रेसचे कट्टर टिकाकार होते. त्यांच्या भाषणांचे जनमानसावर गारूड असायचे. त्यांचे एक वाक्य अजून अर्थपुर्ण वाटते. निवडणूकांच्या भाषणात अत्रे अनेकदा मतदाराला कानपिचक्या देताना म्हणायचे, ‘वर्षभर सापाच्या नावाने शंख करता आणि नागपंचमी आली, मग मात्र त्याच सापाला दूध पाजता.’ सांगायचा मुद्दा इतकाच, की पाच वर्षे विरोधकांचा धुमाकुळ चालायचा. आंदोलनांची रणधुमाळी उडायची. त्यातून कॉग्रेस किती नाराजीचा धनी आहे असेच वाटायचे. पण मतदान होऊन निकाल लागायचे, तेव्हा मात्र चांगल्या मतांनी व जागांनी कॉग्रेस पुन्हा सत्तेत आलेली असायची. तर लोक बाकीच्या लहानसहान पक्षांना चळवळीत साथ द्यायचे. पण सरकार चालवण्यासाठी पुन्हा कॉग्रेसलाच सत्तेची सुत्रे द्यायचे. याचे कारण विरोधकांची एकत्र नांदण्याची किंवा कॉग्रेसशी टक्कर देण्याची कुवतच नव्हती. धरसोड व आपापसातील भांडणे यांनी विरोधी पक्ष बेजार झालेले असायचे. मतदानासाठी वा जागावाटपासाठी विरोधी पक्षांची एकजुट व्हायची. पण निकाल लागला, की सत्तेतला कॉग्रेस पक्ष बाजूला रहायचा आणि हेच एकजुटीने मते मागणारे विविध पक्ष एकमेकांच्या उरावर बसायचे. त्यामुळेच ते सरकार चालवू शकत नसल्याची खात्री लोकांना पटलेली असायची. परिणामी लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवायला विरोधी पक्ष आणि सत्ता राबवायला कॉग्रेस अशी राजकारणाची विभागणी मतदाराने केलेली होती. कारण कॉग्रेसला बाजूला केल्यास एकत्र झालेले विरोधी पक्ष पुर्ण पाच वर्षे एकत्र टिकण्याची हमी नव्हती आणि जिथे तशी शाश्वती दिसली, तिथे बंगालसारख्या प्रांतामध्ये मतदाराने सहा वेळा विरोधी आघाडीला सत्तेत बसवून कॉग्रेसची हाकालपट्टी केलेली होती. ते सरकार चालवणे वा पुर्ण मुदतीसाठी एकत्र टिकणारा पक्ष वा आघाडी जनतेला हवी असते. तिला आघाडी म्हणा वा कॉग्रेस म्हणा.   

कॉग्रेसमुक्त भारत या नरेंद्र मोदींच्या शब्दयोजनेची अनेकांनी टिंगल केली. पण त्यातला आशय कोणी कितीसा समजून घेतला? राहुल वा सोनिया गांदींच्या नेतृत्वाचा जो पक्ष आ,हे तो मुळच्या कॉग्रेसचा उरलेला अवशेष वा सांगाडा आहे. त्यामध्ये ती उर्जा वा आशय शिल्लक उरलेला नाही. ती आता एका खानदानाची मालमत्ता होऊन गेली आहे. पुर्वीच्या संस्थानिक घराण्यातील अनेक वंशजांकडे आजही शेकडो वर्षापुर्वीच्या राजवाडे महालांची मालकी जशीच्या तशी निर्वेध आहे. पण त्यात राजेशाहीचा रुबाब किंवा हुकूमत अधिकार उरलेला नाही. ते सत्तास्थान उरलेले नाही. ती खालसा संस्थानांची व संस्थानिकाची अवस्था सोनिया राहूल कॉग्रेसची झाली आहे. कोणी याला टिका म्हणायचे कारण नाही. त्याच पक्षाचे बुद्धीमान नेते व आरंभीच्या काळात राहुलना भाषणे लिहून देणारे माजीमंत्री जयराम रमेश, यांचेच ते विधान आहे. बादशाही रसातळाला गेलीय, पण अजून सुलतान असल्याचा आवेश संपत नाही, असे त्यांनी स्वपक्षाचे मध्यंतरी वर्णन केलेले होते. मध्यंतरी कुणा बाबराच्या वंशजाने म्हणे आपल्याला बाबरी नकोय, ती जागा मंदिराला देउन टाकतो, असे प्रतिज्ञापत्रच सादर केलेले होते. पण तो राहिला बाजूला आणि बाबरीसाठी गळा काढणारेच मोठा कल्लोळ करताना दिसतात. तशी चमत्कारीक अवस्था विविध राजकीय अभ्यासक व विश्लेषकांची आहे. कॉग्रेस नामशेष होतेय, त्याची अशा लोकांनाच जास्त फ़िकीर आहे. तेच लोक राजकीय पक्ष वा राजकारणापासून अलिप्त राहून कॉग्रेसचे पुनरुज्जीवन करायला अखंड धडपडत असतात. कारण ती कॉग्रेस संपली असून त्या जागी नवी कॉग्रेस आधीच अस्तित्वात आलेली त्यांच्या मेंदूत अजून शिरलेली नाही. ती नवी कॉग्रेस म्हणजेच भाजपा आहे. देशव्यापी एक मोठा राष्ट्रीय पक्ष, म्हणजेच कॉग्रेस असते आणि त्याच्या भोवती फ़िरणारे लहानमोठे अन्य पक्ष, ही भारतीय लोकशाही आहे.

इतके विवेचन केल्यावर एक गोष्ट लक्षात येईल, की देशातले राजकीय समिकरण संपुर्ण बदलून गेले आहे. आज आपण कॉग्रेसकडे पुर्वापार चालत आलेली कॉग्रेस म्हणून बघू शकत नाही, की भाजपाकडे अडवाणी-वाजपेयींचा भाजपा म्हणून बघणेही गैरलागू आहे. त्याचप्रमाणे राजकीय वस्तुस्थितीही बदलून गेली असल्याने, विविध राजकीय पक्षांच्या विचारधारा कालबाह्य होऊन गेल्या आहेत. त्यांचे ऐतिहासिक संदर्भही आता निरूपयोगी होऊन गेलेले आहेत. त्यामुळेच एकविसाव्या शतकातील राजकारणाकडे बघताना विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या गोष्टींचे हवाले देऊन आपलीच गल्लत होऊ शकते. पर्यायाने आपले निष्कर्ष चुकू शकतात. तशीच आघाडीचे युग ही समजूत त्यागावी लागेल आणि भाजपाचे नवे कॉग्रेसजन्य स्वरूप ओळखावे लागेल. ते ओळखले, मग विश्लेषणाचे काम सोपे होऊन जाते. विविध आकड्यांना व संदर्भांना नेमका अर्थ मिळू शकतो. मतदाराच्या मनातले हेलकावे समजू लागतात. मतदानाची रहस्ये उलगडू लागतात. सहाजिकच २०१९ ची लोकसभा कुठला पक्ष वा आघाडी जिंकू शकेल काय? किंवा विरोधकांची एकजुट वा दोन भिन्न आघाड्यांकडून भाजपा पराभूत होऊ शकेल काय? अशा प्रश्नांची उत्तरे सापडू शकतात. यातली पहिली गोष्ट अशी, की नुसत्या मतविभागणी टाळण्याने काहीही सिद्ध होऊ शकत नाही. ज्याप्रकारे पुर्वीची कॉग्रेस विभिन्न विचारधारांची एकत्रित बांधलेली मोट होती, तसाच आजचा भाजपाही भिन्न प्रकृतीच्या नेते घटकांचा एक मोर्चा वा आघाडीच आहे. आपापले मतलब साधण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत आणि कॉग्रेसमध्येही तेच होते. मोदी वा भाजपाला पराभूत करण्यासाठी आघाडी म्हणजे तशी एकजिनसी आघाडी करावी लागेल आणि त्यात परस्परांना संभाळून घेण्याइतकी लवचिकता बाणवावी लागेल. ते काम सोपे नाही की इतक्या झटपट होऊ शकणारे नाही. म्हणूनच भाजपा विरोधातले राजकारण १९७०-९० च्या जमान्यातल्या आघाड्यांसारखेच फ़सत जाणार आहे.

यातली आणखी एक बाजू समजून घेतली पाहिजे. भाजपाने कॉग्रेसला पराभूत केलेले नाही, तर कॉग्रेसची जागा व्यापली आहे. कॉग्रेसमधली सुंदोपसुंदी व बेबंदशाहीनेच त्या पक्षाला पराभूत केलेले आहे. त्यामुळे जी जागा मोकळी होत गेली, ती व्यापत जाण्याने भाजपा इतक्या व्यापक प्रमाणात वाढलेला आहे, विस्तारलेला आहे. त्याचीही उद्या कॉग्रेसप्रमाणेच वाटचाल होऊ शकते. त्यातून काही गट बाहेर पडून आपले वेगवेगळे तंबू ठोकू शकतात. जोवर तिथले विविध समाजघटक वा वैचारिक गट एकत्र नांदणार आहेत आणि दुसर्‍या बाजूला तितका भक्कम पर्याय उभा केला जाणार नाही, तोपर्यंत भाजपाला कोणी हरवू शकणार नाही. भाजपाला त्याच पक्षातले नेते गट संपवू शकतात. कारण ती आजची एकविसाव्या शतकातली कॉग्रेस आहे. कॉग्रेस इतक्याच विविध विरोधाभासाने भाजपालाही वेढलेले व ग्रासलेले आहे. पण मोदीसारखे खंबीर ठोस नेतृत्व तिथे शीर्षस्थानी आहे, तोपर्यंत बाहेरचा कोणी त्या पक्षाला लोळवू शकणार नाही. १९६७ पासून सुरू झालेली कॉग्रेसच्या र्‍हासाची प्रक्रीया तब्बल साडेचार दशके चाललेली होती. भाजपा आता कुठे पाच वर्षे बहुमतातला राष्ट्रीय पक्ष झाला आहे. अजून तो वयात यायचा आहे. त्यामध्ये भाऊबंदकी व सत्तापिपासा अधीर होऊन एकमेकांच्या उरावर बसायला दहापंधरा वर्षे तर जावी लागतीलच ना? ते काम यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांच्या आवाक्यातले नाही. इंदिराजींच्या उदयाने अस्त झालेले कामराज वगैरे नेते तसेच होते. त्यांना इंदिराजींना विरोध करता आला. त्यांना रोखता आले नाही की विरोधकांच्या मदतीने संपवता आले नाही. मुळचा कॉग्रेस पक्ष नेस्तनाबूत करून इंदिराजींनी इंदिरा कॉग्रेसला त्या जागी प्रस्थापित केली. ती कॉग्रेस नामशेष होताना मोदीं-शहांनी भाजपा नावाची कॉग्रेस तिथे आणून स्थानापन्न केली आहे. त्यामुळे २०१९ साली पुन्हा कॉग्रेसच जिंकणार आहे. सरकारी कागदपत्रात तिला भाजपा म्हणून ओळखले जाईल इतकेच. (संपुर्ण)

15 comments:

  1. भाऊ भाजपमध्ये संघाकडून संघटनमंत्री पाठवले जातात हे संघटनमंत्री संघाचे अत्यंत वरिष्ठ पातळीवर काम केलेले प्रचारक असतात आजपर्यंत पक्ष शून्यातून स्वतःच्या बहुमतावर या लोकांच्या कष्टाने पोहोचला आहे उदा पंडीत दीनदयाळ जी जगन्नाथ राव जोशी रामभाऊ म्हाळगी कुशाभाऊ ठाकरे अटलजी स्वतः नरेंद्र मोदी आणि असे अनेक जण आहेत जोपर्यंत ही व्यवस्था आहे तोपर्यंत भाजपचे ठीक चालेल असे वाटते

    ReplyDelete
  2. https://en.m.wikipedia.org/wiki/Ship_of_Theseus

    लेख वाचून हे आठवलं!
    असं काहीसं झालंय!

    ReplyDelete
  3. भाऊसाहेब फारच चांगल लिहिता तुम्हि...एवढं परखड कुठेच वाचायला मिळत नाही...तुमचे लेख वाचुन ग.वा.बेहेरेच्या सोबत साप्ताहीकाची आठवण येते...सोबत बंद पडले, त्याचे अनेक अंक मी आतापर्यंत जतन करुन ठेवले, पण आता ते गहाळ झाले आहेत..ती उणिव भरुन निघाल्यासारख वाटतं.

    ReplyDelete
  4. भाउ अस मार्मिक विश्लेषण तुम्हीच करु जाणे we don't need anybody to know current and future situation

    ReplyDelete
  5. भाऊ, तुमचे हे तिन्ही लेख खूप आवडले.म्हणजे मनाला पटले. भाजपाला हरवण्यासाठी अजून किमान ३ निवडणुका जाव्या लागतील. दरम्यान हे तिन्ही लेख जनेयु च्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट व्हायला हवेत. म्हणजे राजकारणाचा अभ्यास कसा करावा ह्याची माहिती विद्यार्थ्याना होईल.

    ReplyDelete
  6. Bhau,you are great. You predicted it quite clear.ppl will realise it after 2019

    ReplyDelete
  7. अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.

    ReplyDelete
  8. 'काँग्रेस ला फक्त काँन्ग्रेस च हरवू शकते' असे पूर्वी कोणत्यातरी काँग्रेस नेत्याने म्हटले आहे त्याचा अर्थ आज समाजला.
    धन्यवाद

    ReplyDelete
  9. मोदी शहा भाजपा कांग्रेसचेच स्वरूप बनले असेल तर हे फार काही स्वागतार्ह नाही. कदाचित आज राजकारणात टिकण्यासाठी भाजपाला आयातविरांची गरज भासत असेल पण मग पुढच्या टप्प्यात भाजपाचे शुध्दीकरण करणं जरूरी असेल.
    वसूंधराराजें विषयी जनमत विरोधी असतांना राजस्थानात का शहा त्यांच्यावर भिस्त ठेऊन आहेत? दुसरा चेहरा देउन निवडणूक सोपी होणार नाही का?

    ReplyDelete
    Replies
    1. तसे केल्यास बंडखोरी ची शक्यता जास्त आहे ,,,2008 ला राजस्तान मध्ये हेच झालते,,आणि तसे झाल्यास उलरी सुरली अपेक्षा पण संपून जाईल,,,ठराविक राजपूत समाज काही प्रमाणात नाराज आहे ते खूप वाढवून दाखवले जातेय ,,येन निवडणुकीजवळ आल्यावर नेतृत्व बदल आत्महत्या ठरेल ,,त्याच वसुंधराने मोदी शहा नसताना दोनदा प्रचंड बहुमत मिळवून दिलंय एकदा सत्तेच्या जवळ आणलं,,,,शहा ना हे माहीत आहे,,आहे त्या परिस्तिथी त थोडा संघर्ष केल्याने विजय शक्य आहे पण उगच जास्त उलथापालथी केल्या तर काँग्रेस गरजेपेक्षा जास्त मजबूत होईल तिकडे परिणामी देशपातळीवर सुद्धा

      Delete
  10. BHARTIYA JANSANGH CHE ADHAKSHA SHYAMPRASAD MUMHERJEE HE CONGRESS MADHE HOTE ..AGADI NEHRUNCHYA MANTRIMANDALAT UDYOGMANTRI SUDDHA...

    ReplyDelete
  11. एक तटस्थ लेख......

    ReplyDelete
  12. खूप छान लेखमाला जमली ही भाऊ👍

    ReplyDelete