Sunday, October 7, 2018

सभेत सोडलेला उंदीर

mayawati statue के लिए इमेज परिणाम

पुर्वीच्या काळात म्हणजे साधारण तीसचाळीस वर्षापुर्वी राजकीय पक्षांच्या किंवा कुठल्याही जाहिरसभा समारंभात गडबड करण्यासाठी एक खास युक्ती वापरली जायची. तिथे शांत बसलेल्या जमावात उंदीर सोडला जायचा, किंवा उंदीर साप घुसल्याचा गदारोळ केला जायचा. मग तिथे जे रणकंदन माजायचे व पळापळ व्हायची, त्यातून सभेच्या कामकाजाचा पुरता बोजवारा उडून जायचा. कारण उंदीर वा साप चटकन दिसत नाही, पण त्याची मनात घर करून असलेली भिती काम करून जायची. हल्ली तसे प्रकार होत नाहीत. पण कालपरवा बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी अकस्मात तसाच काहीसा प्रकार विरोधी पक्षांच्या महागठबंधनाच्या बाबतीत केला. अजून विधानसभांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झालेला नाही आणि लोकसभा आठ महिने दुर असताना, त्यांनी त्या निमीत्तने एकत्र येण्यासाठी जमलेल्या विरोधी पक्षांच्या मानसिक बैठकीमध्ये एक उंदीर सोडून दिला आहे. त्याला उंदीर इतक्यासाठी म्हणायचे, की त्यांनी केलेली कृती वा जाहिर केलेला निर्णय, राजकारणावर फ़ारसा परिणाम घडवणारा नसला, तरी मोदी विरोधातील आघाडीच्या आवेशाला टाचणी लावणारा आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थान अशा विधानसभांच्या निवडणूका पुढल्या दोन महिन्यात व्हायच्या असून, तिथे आपण कॉग्रेससोबत युती आघाडी वा जागावाटप करणार नसल्याचा निर्णय मायावतींनी जाहिर केला आहे. त्यामुळे कॉग्रेस पक्षाचे फ़ार मोठे कुठले नुकसान संभवत नाही. पण लोकसभेसाठी जी विरोधकांची आघाडी कॉग्रेसला उभी करायची आहे, त्यात सहभागी होऊ शकणार्‍या पक्षांच्या मनात मायावतींनी संशयाचे पिल्लू सोडून दिले आहे. त्यामुळे एकूणच घडामोडीला कसा प्रतिसाद द्यावा, त्याचा विरोधकात गोंधळ उडाला आहे आणि भाजपावाले खुश होऊन गेलेले आहेत. मात्र मायावतींनी त्यातून आपला दुरगामी डाव यशस्वीपणे खेळलेला आहे.

खरे तर हे असेच होणार हे आधीपासून दिसत होते. कर्नाटकातल्या कुमारस्वामी सरकारचा शपथविधी होत असताना तमाम विरोधी नेते एकाच मंचावर आले आणि त्याचाच धागा पकडून मध्यप्रदेशात नव्याने पक्षाध्यक्ष झालेल्या कमलनाथ यांनी विधानसभा निवडणूकीत मायावतींशी हातमिळवणी करण्याचा मनसुबा जाहिर करून टाकला. कारण बंगलोरच्या त्या मंचावर सोनिया व मायावती एकमेकांच्या डोक्याला डोके लावून मैत्रिणी असल्यासारख्या पोज देऊन मोकळ्या झाल्या होत्या. पण अशा फ़ोटोतून वा माध्यमातल्या चर्चेतून राजकारण पुढे सरकत नसते आणि निर्णयही होत नसतात. म्हणूनच कमलनाथ यांनी इतक्या गडबडीने जाहिर घोषणा करणे चुकीचे होते. एकदा तसे काही बोललात, मग वाहिन्यांचे कॅमेरेवाले तुमचा पाठलाग सुरू करून उहापोह सुरू करतात. अशाच एका बातमीत कमलनाथ यांनी थेट मायावतींशी संपर्क साधला असल्याची घोषणाही करून टाकली होती. मात्र मायावतींच्या मध्यप्रदेशातील पक्षनेत्याने त्याचा साफ़ इन्कार केला होता आणि आपला बसपा सर्व जागा लढवायला सज्ज असल्याचेही सांगून टाकलेले होते. परिणामी ती न झालेली युती आघाडी टिकवणे, कॉग्रेसची जबाबदारी होऊन गेली आणि मायावती मात्र अन्य कुठल्याही पक्षांशी नेत्यांशी पुढले नियोजन करायला मोकळ्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी बाजूच्या छत्तीसगड राज्यात कॉग्रेसपासून वेगळा झालेला अजित जोगींचा पक्ष हाताशी धरून जागावाटप उरकले आणि त्याची घोषणा करतानाच मध्यप्रदेशातील २२ उमेदवारही जाहिर करून टाकले. त्यामुळे कमलनाथ यांना काय भूमिका घ्यावी, किंवा बोलावे तेही समजेनासे झाले. अशावेळी त्यांना गोत्यात घालायला टपलेले मध्यप्रदेशचेच कॉग्रेसनेते दिग्विजयसिंग यांनी आगीत तेल ओतले नसते तरच नवल होते. सगळा मग चुथडा होत गेला आणि आता मायावतींनी निदान विधानसभेला तरी कॉग्रेसशी हातमिळवणी अशक्य असल्याचे जाहिर करून टाकले.

वास्तविक हा मायावतींचा निर्णय आहे आणि तो जाहिर करताना त्यांनी भाजपापेक्षाही कॉग्रेसवर तोंडासुख घेतलेले आहे. पण ते करताना त्यांनी वापरलेले शब्द आणि आरोप इतर पक्षांना चिंतेत टाकणारे आहेत. भाजपाला पराभूत करण्यापेक्षा कॉग्रेसला बसपासारख्या लहान व पुरोगामी पक्षांनाच संपवायचे आहे, असा गंभीर आरोप त्यात झाला आहे. तो खोटाही मानता येणार नाही. कारण उत्तरप्रदेशात सत्तेत असलेला समाजवादी पक्ष विधानसभेला अखेरच्या क्षणी कॉग्रेसच्या सोबत गेला व त्यामध्ये सत्तेसोबतच पक्षाचाही बोजवारा उडाला. त्याच्याही आधी असाच प्रयोग बंगालमध्ये डाव्या आघाडीने ममतांचे आव्हान स्विकारण्यासाठी केलेला होता. आपल्या पारंपारिक वैरभावनेला बाजूला ठेवून मार्क्सवाद्यांनी कॉग्रेसशी हात मिळवला व जागावाटपही केले. त्याचा लाभ कॉग्रेसला झाला आणि डावी आघाडी बंगालमधून जवळपास संपून गेली आहे. आज त्यांना तिथून राज्यसभेत एक खासदारही निवडून आणणे शक्य उरलेले नाही. महाराष्ट्रात पुरोगामी एकजुट करताना रिपब्लिकन, शेकाप वा कम्युनिस्ट अ्से पक्ष गिळंकृत करून कॉग्रेस टिकली व बाकीचे पक्ष लयास गेले. म्हणूनच पुरोगामीत्वाच्या नावाखाली कॉग्रेस पुरोगामी लहान पक्षांना खाऊन फ़स्त करते, हा आरोप बिनबुडाचा मानता येणार नाही. नेमका तोच आरोप मायावतींनी बुधवारी केला आणि होऊ घातलेल्या महागठबंधनाला अपशकून होऊन गेलेला आहे. उत्तरप्रदेशात मायावती व अखिलेश यांचे सपा-बसपा एकत्र येऊन मोठा फ़रक पडू शकतो. कॉग्रेसला त्यात घ्यायला अखिलेश राजी नव्हताच. तरीही मायावती कॉग्रेससाठी आग्रही होत्या. आता त्यांनीही पाठ फ़िरवली असेल तर बिहारमध्ये लालू व महाराष्ट्रात राष्ट्रवादी सोडल्यास कॉग्रेसने गठबंधनाचे मित्र आणायचे कुठून? बंगालमध्ये ममतांना राहुलची कॉग्रेस नकोच आहे. अशा स्थितीत मायावतींनी काय बॉम्ब टाकला ते लक्षात येऊ शकेल.

पण राजकारणात फ़क्त सूड वा रागलोभ काम करीत नाहीत. आपल्या रागासाठी कोणी दुसर्‍या शत्रूचा लाभही करून देत नाहीत. म्हणूनच मायावतींवर भाजपाची बी टीम असल्यचा आरोप करणे खुळेपणाचे लक्षण आहे. त्यापेक्षा त्यात मायावतींची कुठली खेळी आहे, ते समजून घेणे योग्य ठरेल. पहिली गोष्ट म्हणजे जिथे निवडणूका होऊ घातल्या आहेत, त्यापैकी एकाही जागी बहूजन समाज पक्ष शक्तीशाली पक्ष नाही वा मतदानावर मोठा प्रभाव टाकण्याची त्याची क्षमता नाही. पण अशा पक्षाला सोबत घेऊन त्याची प्रत्येक मतदारसंघातील किरकोळ मते आपल्या पारड्यात घेतली, तर कॉग्रेससारख्या पक्षाला मोठा लाभ मिळू शकतो. काठावरच्या अल्पमताने गमावल्या जाणार्‍या अनेक जागा त्यामुळे विजयी होऊ शकतात आणि त्याचे पुर्ण भान मायावतींना आहे. कॉग्रेसशी युती केल्याने आपला लाभ तुलनेने मोठा असला तरी व्यवहारात कॉग्रेसचा लाभ अधिकच मोठा असल्याचे मायावती जाणतात. म्हणून त्या अधिक किंमत मागत होत्या आणि ती कॉग्रेसला परवडणारीही किंमत होती. पण सौदा ताणून धरण्याच्या नादात कॉग्रेसने संधी गमावली आहे. उलट युती आघाडी झिडकारून मायावतींनी मात्र मोठी संधी साधली आहे. मागल्या पंधरा वर्षात जिथे भाजपाची सत्ता आहे, तिथे आणखी पाच वर्षे भाजपाच सत्तेत आला, तर मायावतींचा बाल बाका होणार नाही. पण त्यातून लागोपाठ कॉग्रेसचा पराभव झाल्यास तो पक्ष अधिकच खचून जातो. त्याच्या भंगारातून मायावती व अन्य लहान पुरोगामी पक्षांना आपापल्या उपयोगाच्या वस्तु घटक किमान किंमतीत मिळवता येणार आहेत. या ती्न किंवा एकदोन राज्यात सत्ता मिळाल्यास कॉग्रेस अधिक शिरजोर होईल आणि मग लोकसभेसाठी त्या पक्षाबरोबर सौदेबाजी अवघड होऊन जाईल. उलट त्यात कॉग्रेस खच्ची झाली तर निमूट मित्रपक्षांच्या अटी मान्य करायला तयार होईल.

मोठा पक्ष जितका दुवळा तितका त्याच्याशी सौदा सोपा व लाभाचा असतो. कॉग्रेस व राहुल सोनियांसाठी राज्यांपेक्षा दिल्लीतील लोकसभा व तिथल्या जागा महत्वाच्या आहेत. म्हणूनच विधानसभेपेक्षा लोकासभेच्या जागा हा कॉग्रेससाठी जटील सौदा आहे. देशाच्या विविध राज्यात कॉग्रेसच्या मदतीने लोकसभा लढवण्याचा मोठा फ़ायदा मायावती वा अन्य काही पक्षांना मिळू शकतो. जसा बंगाल, तामिळनाडू वा आंध्रप्रदेशात पाय रोवण्यासाठी भाजपाने स्थानिक शक्तीशाली पक्षांचा उपयोग करून घेतलेला होता. मायावतींना अन्य राज्यात आपले सहकारी पायावर उभे करायचे आहेत आणि त्यासाठी तिथे नजरेत भरणारी संख्या व जागा निवडून आणायच्या तर कॉग्रेसशी आघाडी लाभदायक आहे. पण अडचणीतली कॉग्रेस नम्रपणे व्यवहार करते आणि विजयाची मस्ती चढली, मग मित्रांनाही गुलामासारखी नाकारते. म्हणून तीन राज्यात मायावतीच कशाला, इतर मित्र पक्षांनाही कॉग्रेस जिंकलेली नकोच आहे. पण तितकाच भाजपाही नको असल्याने तोंडदेखली कॉग्रेसला साथ द्यावी लागत असते. त्याचीच कोंडी मायावतींनी फ़ोडलेली आहे. मायावतींनी लोकसभेवर डोळा ठेवून विधानसभेची रणनिती आखलेली आहे. त्यात कॉग्रेसला सत्तेपासून दुर ठेवून आणि मित्र पक्षांची गरज भासावी, अशा स्थितीत आणायचा डाव यातून खेळलेला आहे. त्यासाठीच छत्तीसगडमध्ये अजित जोगींशी युती केली आणि राजस्थानात अन्य लहान पक्षांची मोट मयावतींनी पुढाकार घेऊन उभी केलीय. ती सगळी जमवाजमव होईपर्यंत मायावतींनी मौन पाळले होते आणि सज्जता झाल्यावर थेट बॉम्बच टाकला आहे. त्याचा अर्थ कॉग्रेस नेत्यांना लागलेला नाही, की आकलनही होऊ शकलेले नाही. म्हणून तर बहनजींनी इतके आरोप करूनही कॉग्रेस नेते प्रवक्ते कुठलीच नेमकी प्रतिक्रीयाही द्यायला धजावलेले नाहीत. म्हणून याला सभेत उंदीर सोडून देणे म्हणावे लागते.

आपल्या देशातले बहुतांश राजकीय नेते विद्यापीठातले राज्यशास्त्र शिकून राजकारणात आलेले नाहीत. ते मुख्यत: सार्वजनिक जीवनाचे अनुभव घेत इथपर्यंत आलेले आहेत. म्हणूनच त्यांच्या राजकीय भूमिका, डावपेच, रणनिती यांचे अंदाज अभ्यासकांना व पत्रकारांना समजून घेता येत नाहीत, की ओळखताही येत नाहीत. वरवरच्या गोष्टी बघून व त्यालाच हेतू समजून उलगडा करण्याची केविलवाणी कसरत चालते. म्हणून मग भाजपाला संघाला शिव्याशाप देऊन कोणीही उपटसुंभ पुरोगामी होतो आणि त्याच खुळेपणाने कोणालाही ट्रोल भक्त वा भाजपाचा भाडोत्री ठरवायचीही स्पर्धाही चालते. सत्य त्यापासून मैलोगणती दुर असते. पुढे प्रत्यक्ष परिणामातून त्याची प्रचिती येते, तेव्हा असे उपटसुंभ त्याला चमत्कार वा करिष्मा ठरवून पळ काढतात. त्यांच्या खुळ्या आकलनावर विसंबून राजकारण करणार्‍यांना मग इव्हीएम घोटाळे दिसू लागतात. पळवाटा बुद्धीमंत अभ्यासक शोधू लागतात आणि त्यांच्यापेक्षा सामान्य बुद्धीचे राजकारणी यशस्वी होतात. एकट्याच्या बळावर मायावतींनी विविध समाज घटकांना जोडून सत्ता मिळवल्यानंतर त्याला सोशल इंजिनीयरींग म्हणून पाठ थोपटली जाते. पराभव झाला मग त्यात जातीची मते शोधली जातात. मुलायम वा मायावती हे सामान्य घटकातून आलेले राजकारणी आहेत आणि नरेंद्र मोदीही त्यापैकीच एक आहेत. त्यांना लोकमताचे हेलकावे समजत असतात, जाणवतही असतात. म्हणूनच एखादे विधान ते करतात, तेव्हा त्यातून साधायच्या परिणामांना अधिक महत्व देतात. त्याचे राजकीय वजन बुद्धीमंतांच्या तागडीत तोलून मोजता येत नसते की परिणामांचा अंदाजही घेता येत नसतो. ज्या विधानांमुळे मोदींना बुद्धीमंतांचे शिव्याशाप मिळाले, त्यासाठीच त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाणारी मतेही मिळाली. तरीही त्यापासून काही धडा घेण्याची कुठली तयारी नाही.

कालपरवाच कुठल्या वाहिनीने चाचणीचे आकडे प्रसारीत केले. त्यात ८० टक्के लोकांना राफ़ायल प्रकरणच ठाऊक नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यात तेवढ्याच लोकांनी राफ़ायलची किंमत जाहिर करू नये, असेही मत व्यक्त केलेले आहे. पण माध्यमे राहुलची पाठ थोपटत आहेत आणि त्यांच्यासह कॉग्रेसने आपली सगळी शक्ती राफ़ायल प्रकरणातच पणाला लावलेली आहे. माध्यमे व बुद्धीमंत खुश करताना कॉग्रेसने आपली अशी दुर्दशा करून घेतलेली आहे, तर मायावतींना त्यांच्याच शिव्या पडणार असतील, तर त्या योग्य दिशेने जात असल्याची ग्वाही देता येईल. लोकसभेत त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य नाही आणि विधानसभेतून राज्यसभेत खासदार पाठवण्याइतकेही आमदार आलेले नाहीत. त्यांना पुरोगामी विचारांच्या विजयापेक्षाही आपल्या पक्षाचा टिकाव लागण्याची चिंता सतावते आहे. पुन्हा मोदी वा भाजपा सत्तेत आले आणि मायावतींना त्याचवेळी संसदेसह राजकारणात महत्वा़चे स्थान मिळाले, तर हवे आहे. पण पुरोगामीत्वासाठी आपल्या पक्षाचा बळी देण्याचा मुर्खपणा त्यांना करायचा नाही, ही गोष्ट साफ़ आहे. येत्या काही वर्षात आपला पक्ष संघटनात्मक बळावर काही राज्यात उभा करायचा आणि त्यासाठी कॉग्रेस वा तत्सम पक्षांचे बळ कमी होणे अगत्याचे आहे. याचे पुर्ण भान असल्याने मायावतींनी ही रणनिती योजलेली आहे. ती भाजपाला पराभूत करण्यापेक्षा आपला राजकीय प्रभाव विस्तारणे असा हेतू गाठण्यासाठीची रणनिती आहे. महागठबंधन वा पुरोगामी आघाडी हा बुद्धीमंतांचा खेळ असला तरी त्यांच्या पटावरचे प्यादे होऊन आपलीच बरबादी करायला मायावती राजी नाहीत. इतकाच त्यांच्या आक्रमक पवित्र्याचा आता लागणारा अर्थ आहे. तो त्यांना कळतो तितकाच कॉग्रेसलाही समजलेला आहे. म्हणूनच पुरोगाम्यांचे बुद्धीमंत ऊर बडवत असताना कॉग्रेसच्या आघाडीवर शांतता नांदते आहे.


5 comments:

  1. भाउ मोदी किती जानकार राजकारनी आहेत ते सभेवरुन कळतते एका सभेत जरी म्हनाले की मी चोर आहे का?लोक नाहीच म्हनतील पन ते तस विचारत नाहीत त्यांनापन माहिता हे राफेल लोकांना माहित नाही अय्यर जेव्हा नीच बोलले तेवा मात्र मोदींनी त्याचा केवढा गहजब केला होता अय्यर बोललेले पन फारस माहित नवत पन मोदींनी माहित करुन दिल

    ReplyDelete
  2. भाउ उर बडवन चालुय.मायावतींना सल्ले चालुयत कुनी नावे ठेवतय पुरोगामी? वाटतय की मायावतींनी नमत घ्याव पन राहुलला pm करन्यासाठी त्या का बळी जातील? मोदी नी राहुल त्यांना सारखेच युपी मधे जागा वाढन त्यांच लक्ष पन पुरोगामीचा झेंडा खांद्यावर घेतलेल्यांना ही मानसिकता कळत नाही.

    ReplyDelete
  3. मायावतींकडे असे अनेक उंदीर आहेत. त्यांचा राजकीय इतिहास पाहता याआधीही त्यांनी असे अनेक उंदीर सोडले आहेत, त्यातील बऱ्याच उंदरांनी त्यांचा फायदा ही करून दिला आहे. आता हा नवीन टेस्ट ट्यूब उंदीर काय करामत करतोय ते २०१९ च्या निकला नंतर कळेल.

    ReplyDelete