Friday, October 5, 2018

ए टीम आणि बी टीम

mayawati 2019 cartoon kureel के लिए इमेज परिणाम

चारपाच महिन्यापुर्वी कर्नाटकातल्या निवडणूका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि सगळेच प्रमुख पक्ष आवेशात प्रचाराला लागलेले होते. त्यात मग एकमेकांवर आरोप आणि चिखलफ़ेक, ही नित्याची बाब झालेली आहे. पण एक आरोप गेल्या चारपाच वर्षात सातत्याने सगळे बिगरभाजपा पक्ष सातत्याने करीत असतात, त्याची गंमत वाटते. कर्नाटक विधानसभा निवडणूकीत तो आरोप झाला होता आणि अलिकडल्या काळात तोच आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावरही झालेला आहे. गेल्या बुधवारी तोच आरोप बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींनी कॉग्रेसवर केला आणि गंमत वाटली. त्यांनी मध्यप्रदेशात आपल्या पक्षातर्फ़े सर्व जागा लढवण्याची घोषणा करतानाच, महागठबंधन व कॉग्रेसशी आघाडीची शक्यता संपवतानाच कॉग्रेसलाच भाजपाचा एजंट म्हणण्यापर्यंत मजल मारली. तिथले माजी मुख्यमंत्री व कॉग्रेसचे तोंडाळ नेते दिग्विजयसिंग, यांना भाजपाचे एजंट म्हटले. नेमका हाच आरोप कर्नाटकात पाच महिन्यांपुर्वी कॉग्रेसचे तात्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या देवेगौडांच्या पक्षावर करीत होते. आज कॉग्रेसशी युती करून सत्तेत बसलेले कुमारस्वामी व त्याचा जनता दल सेक्युलर, हा पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा तो आरोप होता. मात्र मजेची गोष्ट अशी, की मतदान संपुन निकाल लागल्यावर कॉग्रेसने सर्वप्रथम याच भाजपा बी टीमशी सत्तेसाठी हातमिळवणी करून टाकली होती. थोडक्यात भाजपाची बी टीम हा आता एक राजकीय विनोद होऊन गेला आहे. ज्याला कोणाला शिव्या घालायच्या असतील, त्याच्यावर भाजपाची बी टीम असा शिक्का मारायचा, ही पुरोगमी फ़ॅशन बनलेली आहे. पण त्यातून एक निष्कर्ष नक्की काढता येतो. सगळा मोदी विरोधातला शोध हा भाजपाच्या बी टीमसाठी चालू असून, ए टीम कुठली ती प्रत्येकाने मान्य केलेली आहे. तिचे नाव मुद्दाम सांगण्याची गरज आहे काय?

कुठल्याही खेळात उत्तम खेळाडूंचा संघ असतो, त्याला ए टीम असे नाव गृहीत असते. सहाजिकच जे कोणी तितकेच चांगले पण उत्तम खेळू शकत नसतील, त्यांचीही एक टीम तयार ठेवली जात असते. विचित्र प्रसंग आला मग ही बी टीम बाहेर काढली जाते. कुठल्याही जटील गुंतागुंतीच्या कामात व योजनेत ए प्लान असतो, तसाच बी-सी असे आणखी प्लान तयार असतात. त्याचा अर्थ मुख्य योजना असफ़ल झाली तर इतर पर्याय बघायचे असतात. विचारात घ्यायचे असतात. पण पहिलाच प्लान वा योजना चांगली असेल, तर इतर योजनांना कोणी किंमत देत नाही, विचारातही घेत नाही. बी टीम हा तसाच प्रकार आहे. हा संदर्भ लक्षात घेतला, तर भाजपाची बी टीम म्हणजे काय ते लक्षात येऊ शकेल. कुठल्याही क्षणी भाजपाला अडचण आली, तर त्याच्या मदतीला धावून जाईल अशा पक्षाला वा नेत्याला बी टीम संबोधले जायला हवे. पण प्रत्यक्षात बघितले तर ह्या सगळ्या भाजपाच्या बी टीम, नेहमी भाजपा विरोधकांनाच मदतीला धावून जात असतात. ते शरद पवार, मायावती वा देवेगौडा असोत वा ममता असोत. याच मायावतींनी उत्तराखंडात कोसळणारे कॉग्रेस सरकार वाचवण्यासाठी आपले दोन आमदार कोणाच्या मदतीला पाठवले होते? एफ़डीआय विरोधात मोठे भाषण संसदेत दिल्यानंतरही प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मायावती कोणाच्या बाजूने गेल्या होत्या? हा सगळा इतिहास उकरून काढला तर भाजपाच्या बी टीम या प्रत्यक्ष व्यवहारात कॉग्रेसच्याच बी टीम म्हणून कायम राबत राहिल्या आहेत. त्यात बंगालच्या मार्क्सवादी पक्षाची गणना होते, तशीच महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी पक्षाचीही गणती होते. मात्र त्यांचे एकमेकांशी सौदे साधले नाहीत, मग परस्परांवर चिखलफ़ेक करताना त्यापैकी कोणावर तरी भाजपाची बी टीम अशा शिक्का मारला जात असतो. पण अशा कुठल्याही बी टीमची भाजपाला निदान मागल्या चारपाच वर्षात गरजही भासलेली नाही ना?

त्यातला विनिद बाजूला ठेवला तर एक गोष्ट लक्षात येते, की ही विरोधकांची पराभूत मानसिकता आहे. त्यांच्यात परस्परांचा विश्वास नाही आणि स्वत:च्या बळाविषयी आत्मविश्वासही नाही. एकमेकांच्या आधाराशिवाय चालणे उभे रहाणेही अशक्य असल्याचा आत्मविश्वास जबरदस्त आहे. मात्र एकमेकांना आधार देताना आपले ओझे कुणा दुसर्‍याने निमूटपणे उचलावे आणि आपण पालखीत बसून सैर करावी; अशी प्रत्येकाची महत्वाकांक्षा आहे. तिथेच सगळी गडबड होऊन जाते. तसे झाले, मग बाकी गोष्टी सोडून देत एकमेकांना भाजपाची बी टीम ठरवण्याची स्पर्धा सुरू होत असते. पण यातला कोणीही भाजपाची ए टीम कोण त्याचा खुलासा कशाला करत नाही? की त्यांना ती टीम ठाऊक आहे आणि त्या भाजपाच्या ए टीमचे नावही घेण्याची भिती वाटत असते? की त्या ए टीमला कुठल्याही बी टीमची गरजही नसल्याची भिती अशा लोकांना सतावत असते? मायावती वा कॉग्रेसला आपल्या शक्तीचा इतकाच आत्मविश्वास असेल, तर त्यांनी मुळात जागावाटप किंवा तडजोडीची भाषा करवीच कशाला? आपल्याच बळावर भाजपाला एकहाती पराभूत करायचा मनसुबा कशाला नसावा? कारण स्पष्ट आणि उघड आहे. आपला नाकर्तेपणा प्रत्येकाला साफ़ माहिती आहे. मात्र ते मान्य करून तडजोड करायची नाही, की एकहाती लढायची क्षमता आत्मसात करायचे कष्ट घ्यायचे नाहीत. साध्या शब्दात भिक हवी आहे, पण हक्काचे दावेही जोरात आहेत. एक दुसर्‍याला आपल्याशिवाय तुझे चालणार नसल्याचे पटवून देण्यासाठीचे खेळ चालवित आहेत. मात्र त्यात त्यांचेच नाकर्तेपण जनतेसमोर उघडे पडत चालले आहेत. अशा भाजपाची बी टीम आरोपातून ते जनतेला समजावून देत आहेत, की आम्ही सगळे विरोधकच राजकारणा्ली बी टीम आहोत आणि उत्तम टीम हवी असेल, तर मतदाराने भाजपाची ए टीम म्हणजे मोदींकडे जावे.

आघाडीत आपल्याला मित्रपक्ष काय देणार, यापेक्षा आपण मित्राला काय अधिक देऊ शकतो, या्ला प्राधान्य असते. मोदींची घो्डदौड रोखण्यासाठी बिहारमध्ये नितीश हट्टाला पेटले. त्यांनी ११२ आमदार असतानाही शंभर जागांवर समाधान मानले होते आणि २८ आमदार असलेल्या लालूंना शंभर जागा दिल्या होत्या. कॉग्रेसचे अवघे ४ आमदार असतानाही त्यांना ४० जागा देऊ केल्या होत्या. त्याला खरी आघाडी म्हणतात. जिथे ए टीम किंवा बी टीम असले आरोप करावे लागत नाहीत. आताही तिथे बिहारमध्ये लोकसभेच्या २२ जागा भाजपाकडे आहेत. पण नितीशना सोबत घेण्यासाठी भाजपा २० जागांपर्यंत खाली यायला राजी झालेला आहे. लढायला अधिक जागा मागण्यापेक्षा जिंकायच्या जागा अधिक जुळवण्याला आघाडी वा गठबंधन असे नाव आहे. पण ते कॉग्रेसच्या स्वभावातच नाही. म्हणून त्यांनी बंगालमध्ये मार्क्सवादी पक्षाशी आघाडी करून त्याला बुडवले आणि उत्तरप्रदेशात शंभर जागा घेऊन समाजवादी पक्षाचा बोर्‍या वाजवून दिला. मायावतींना त्यासाठीच कॉग्रेसच्या सोबत जाण्याची भिती सतावते आहे. लाभ होण्यापेक्षा आपला तोटा झाला तर? कॉग्रेस सोबत युती-आघाडी करून कुठल्याही पक्षाचा स्थानिक वा सार्वत्रिक निवडणूकीत फ़ायदा झाल्याची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र अशा आघाड्यातून बी टीम झालेल्यांचा अवतार संपुष्टात आल्याचे दाखले पैशाला पासरी आहेत. मायावती त्यालाच घाबरलेल्या असाव्या. म्हणून त्यांनी छत्तीसगडामध्ये अजित जोगींच्या नवख्या पक्षाची बी टीम होणे पसंत केले, कर्नाटकात देवेगौडांची बी टीम होण्याला मान्यता दिली. पण कॉग्रेस पक्षाची बी टीम व्हायला मायावती तयार नाहीत. त्याच कशाला? दिवस जवळ येत जातील, तसे इतरही लहानमोठे पक्ष असेच कॉग्रेसला हुलकावणी देऊन अन्य पर्याय स्विकारत जातील. कारण भाजपाची बी टीम म्हणून बदनाम होण्यापेक्षा कॉग्रेसी बी टीम होण्यातला धोका अधिक आहे.

1 comment: