Sunday, October 21, 2018

गोव्यातला ‘हेमंतो’ बिश्वजित

Image result for vishwajit rane

आजकाल पाच विधानसभांचे वेध राजकारणाला लागलेले आहेत. सहाजिकच राहुल गांधी त्या पाच राज्यातल्या विविध मंदिरे मशिदींना भेटी देत फ़िरत आहेत आणि मोदी-भाजपावर तोफ़ा डागून धमाल उडवून देत आहेत. त्यासाठी त्यांनी साधे विमान वापरायचे सोडून फ़्रान्सच्या लढावू राफ़ायल विमानाचा उपयोग सुरू केला आहे. त्याच प्रचाराचा भाग म्हणून त्यांनी हिंदूस्तान एरोनॉटीक्स लिमीटेड या सरकारी विमान निर्माण कंपनीच्या कर्मचार्‍यांची भेट घेऊन राफ़ायलचे इथले उत्पादन त्यांच्याच कंपनीला मिळवून देण्याची शाश्वती दिलेली आहे. त्या कारणास्तव कोणाला राहुल गांधींशी संपर्क साधायचा असेल, तर रात्री अपरात्री कधीही राहुल उपलब्ध असतील, असे आश्वासनही त्यांनी दिलेले आहे. ती आता राहुल गांधींची शैली होऊन गेली आहे. जिथे जातील आणि निवडणूका असतील, त्या भागातल्या लोकासाठी पुर्ण वेळ राहुल उपलब्ध असतात आणि त्याच भागामध्ये उत्पादन होणार्‍या वस्तु जगभर विकल्या गेल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. हिमाचल प्रदेशमध्ये असताना त्यांना चिनी नागरिकांनी खरेदी केलेला मोबाईल ‘मेड इन सिमला’ असावा असे वाटत होते. उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात उत्पादन झालेल्या भांड्यात अमेरिकेच्या अध्यक्ष पत्नीने बिर्यानी शिजवावी, असे त्यांचे स्वप्न होते. हल्ली त्यांना राफ़ायल विमाने एच ए एल या कंपनीतच बनली पाहिजेत, असे वाटू लागलेले आहे आणि तसे होण्यासाठी सर्व कामे बाजूला ठेवून ते त्याच्याच मागे लागलेले आहेत. कुठे मुलींवर बलात्कार झाला तर तिलाही वाचवायला राहुल सज्ज असतात. फ़क्त सत्ता त्यांच्या हाती नाही इतकीच समस्या आहे. जेव्हा सत्ता हातात होती, तेव्हा निर्भयासाठी त्यांना घरासमोर आलेल्या मोर्चालाही सामोरे जायला वेळ नव्हता, ही गोष्ट वेगळी. मात्र या निमीत्ताने राहुल गांधी कोणाला वेळ देऊ शकतात, हेही तपासून बघणे अगत्याचे ठरेल.

देशातल्या कुठल्याही निवडणूका लागलेल्या असल्या, की त्या भागातल्या सभेत उपस्थित असलेल्यांसाठी राहुल चोविस तास उपलब्ध असतात. मात्र ते चोविस तास सभा चालू असण्यापर्यंतच असतात, सभा संपली की तिथल्या लोकांसाठीचे चोविस तास संपून गेलेले असतात. ही झाली सामान्य लोकांसाठी उपलब्ध असलेली सुविधा. पण जे राहुलचे निकटार्तिय वा पक्षाचे निष्ठावंत आहेत, त्यांच्यासाठी राहुल गांधी किती वेळ देऊ शकतात? दिल्लीच्या कॉग्रेस नेत्या बरखा सिंग या पक्षातर्फ़े महिला आयोगाच्या प्रमुख होत्या. दोन वर्षापुर्वी दिल्लीच्या तीन महापालिकेत पक्षाच्या उमेदवारी वाटपात गडबड झाली, म्हणून शिष्टमंडळ घेऊन बरखासिंग राहुलच्या घरी पोहोचल्या. तर त्यांना कोणी आत सोडले नाही आणि राहुलही त्यांना भेटायला बाहेर आले नाहीत. अशीच कहाणी मागल्या लोकसभेत कॉग्रेसचा दारूण पराभव होऊन गेल्यावर आसामचे तात्कालीन कॉग्रेसमंत्री हेमंत्तो विश्वशर्मा यांची झालेली होती. लगेच सावरले नाही तर इशान्येकडील मोठे राज्य असलेल्या आसाममधून पक्षाचे नाव पुसले जाईल, असे सांगायला हेमंत तिथे पोहोचले होते. त्यांच्यासोबत तिथले कॉग्रेसचे काही आमदारही होते. हे शिष्टमंडळ आपले गार्‍हाणे पक्षाच्या उपाध्यक्षासमोर मांडत होते. पण उपाध्यक्ष असलेल्या राहुल गांधींचे तिकडे लक्षही नव्हते. कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे दुखणे समजून घेण्य़ापेक्षा राहुल आपल्या लाडक्या कुत्र्याला बिस्कीटे खिलवण्यात इतके गर्क होते, की शिष्टमंडळाला दिलेला वेळ संपून गेला. मग हेमंतो यांच्या लक्षात आले, की आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्ता नेत्यापेक्षा कॉग्रेसला लाडक्या कुत्र्यांची गरज आहे. माघारी आसामला जाताच त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा दिला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाकडून त्यांना काय हवे होते? त्यांनी कुठले पद वा सत्ता मागितली?

हेमंतो विश्वशर्मा यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी पक्षप्रवेशाची चर्चा केली, तेव्हा त्यांनी भविष्यात सत्ता भाजपाला मिळाल्यास आपले मंत्रीपद कायम ठेवावे किंवा आपल्यालाच मुख्यमंत्री करावे, अशी कुठलीही अट घातली नाही. त्यांनी अतिशय विचित्र अट घातली आणि शहांनी ती आनंदाने तात्काळ मान्य करून टाकली. ती अट अशी होती, की इशान्य भारतात भाजपाचा विस्तार वाढवण्याची जबाबदारी हेमंतोवर टाकावी आणि त्यातून कॉग्रेस पुरती नामशेष करण्याच्या कार्याला आशीर्वाद द्यावे. यापेक्षा तिथे हातपाय पसरू बघणार्‍या भाजपाला कुठला शुभशकून हवा असेल? पण हेमंतो यांना इतके भाजपाविषयी प्रेम कुठून आले? तर प्रेमापेक्षाही हेमंतोला राहुल गांधींनी दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा बदला घेण्याची अनिवार इच्छा झालेली होती आणि त्यासाठी त्याने चंग बांधला होता. ते काम नवा पक्ष स्थापन करून आरंभ करण्यात कालापव्यय झाला असता, म्हणून हेमंतोने भाजपात जाऊन त्याची मांडणी केली. त्यांनी नंतरच्या तीन वर्षात आपला संकल्प पुर्ण केलेला आहे. आधी आसाम राज्यातली सत्ता भाजपाला मिळवून देण्यासाठी हेमंतो राबला आणि नंतर इशान्येकडील अनेक लहानमोठ्या राज्यातले स्थानिक प्रादेशिक पक्ष भाजपाच्या गोटात दाखल झाले. त्रिपुरासारख्या राज्यातली सत्ताही भाजपाकडे आली. ही हेमंतोची इच्छा असेल, पण त्याची प्रेरणा राहुल गांधींकडून आलेली होती. राहुलजी कधीही कोणालाही भेटायला उपलब्ध असण्यातून हा चमत्कार घडला आणि आता तशीच काहीशी अवस्था पश्चीम किनार्‍यावरील गोवा या छोट्या राज्यातल्या कॉग्रेस पक्षात घडताना दिसत आहे. कालपरवा तिथल्या राज्यपालांना भेटून सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉग्रेसला सरकार बनवण्यास आमंत्रित करण्याचे पत्र देणार्‍या कॉग्रेसचे दोन आमदार फ़ुटले आहेत. त्याची सुत्रे विश्वजित राणे या माजी कॉग्रेस आमदारानेच हलवली आहेत.

गोव्यात चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या प्रतापराव राणे यांचा विश्वजित राणे हा मुलगा. मध्यंतरी ते विधानसभेचे सभापती होते आणि मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री तेव्हा दोघांच्या सहमतीने विश्वजित विरोधी पक्षाचा असूनही त्याला एका सरकारी उपक्रमाचे मुख्य नेमण्यात आलेले होते. दोनदा कॉग्रस आमदार म्हणून निवडून आलेला हा आमदार, दिड वर्षापुर्वी गोव्यात कॉग्रेसला मोठा पक्ष होण्याची संधी मिळताच सरकार स्थापनेचे गणित जुळवून दिल्लीला राहुल गांधींच्या भेटीला पोहोचला होता. कारण पक्षाचे गोव्यातील प्रभारी दिग्विजयसिंग मौजमजा करीत बसलेले होते. तर दिल्लीत कोणी या नेत्याला राहुल गांधींना भेटूही दिले नाही. दोन दिवस चरफ़डत गेल्यावर तो माघारी गोव्याला परतला व त्याने नव्याने निवडून आलेल्या जागेचाही राजिनामा देऊन टाकला. दिग्विजयच नव्हेतर राहुलच्याही नावाचा त्याने उद्धार केला आणि भाजपा सरकार बनवण्यास उघडपणे हातभार लावला. तेवढ्यावर न थांबता भाजपाचा उमेदवार होऊन पुन्हा तीच जागा जिकली. मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्रीपद सोडुन माघारी गोव्यात आले आणि विश्वजित मंत्रीही झाला. सध्या पर्रीकरांची प्रकृती गंभीर असून पुन्हा कॉग्रेसने मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना सुरूवात केली होती. इतक्यात विश्वजितने नवा चमत्कार घडवला आहे. सोळापैकी दोन आमदार फ़ोडून त्याने कॉग्रेस आणखी दुबळी केली आहे. आमदारकीचा राजिनामा देऊन दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर असे त्या दोन आमदारांचे नाव असून, त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आपणच हे काम केलेले असून गोव्यातून कॉग्रेस नामशेष करण्याचा विडा उचलला असल्याचे विश्वजितने त्यानंतर सांगितले. इतक्या टोकाला कॉग्रेसचा हा तरूण नेता कशामुळे गेला? राहुल गांधींनी मोक्याच्या क्षणी त्याला भेट नाकारली वा दिली नाही, इतकीच गोष्ट आहे ना? मग तेच राहुल गांधी सामान्य माणसला अडल्यानडल्या प्रसंगी भेटणार म्हणजे नेमके काय?

यातून एक प्रश्न असा विचारणे भाग आहे, की सध्या ज्या प्रचारसभा चालू आहेत, त्यात राहुल गांधी कसली आश्वसने देत आहेत? कधीही कुठेही काम असेल तर लगेच संपर्क याचा नेमका अर्थ काय होतो? ते शक्य असते, तर विश्वजित राणे वा हेमंतो विश्वशर्मा इतके टोकाला कशाला गेले असते? अशा घटनांना राहुल गांधी वा अन्य कोणी विचार तरी करतो काय? यातून आपल्या पक्षाचे काय वा किती नुकसान झाले? ते कसे टाळता येईल वगैरे? तो विचार झाला असता तर मागल्या चार वर्षात पक्षाची जी इतकी पडझड झाली, तिला तरी लगाम लावता आला असता. पण कुठे चुकले त्याचा विचार नाही की होणारी पडझड रोखण्याविषयी काडीमात्र आस्था नाही. श्रीमंत घरातल्या लाडक्या शेफ़ारलेल्या पोराला मोडायला दिलेले महागडे खेळणे, अशी कॉग्रेस पक्षाची दुर्दशा होऊन गेलेली आहे. मात्र ते ठामपणे पुढे येऊन बोलून दाखवण्याची हिंमत कोणा ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यापाशी शिल्लक उरलेली नाही. ज्यांना सहन होत नाही, त्यांना पक्षाच्या बेड्या झुगारून राजकारणात टिकायचे आहे, त्यांना वेगळ्या वाटा शोधाव्या लागत आहेत. त्यातले काही अपमानाचे उट्टे काढण्यासाठी सुडाला पेटल्यासारखे कॉग्रेस नामशेष करण्याचा चंग बांधतात. हेमंतोचा धडा शिकले असते, तर विश्वजित राणे इतक्या थराला गेला नसता ना? पण कोणाला पर्वा आहे? हे लोक पक्ष सोडून गेले, की त्यांच्यावर मतलबाचा स्वार्थाचा आरोप केला की काम संपले. हे पक्षकार्य होऊन बसले आहे. अध्यक्षाच्या मुर्खपणाला टाळ्या पिटण्यातून ज्येष्ठता मिळत असेल, तर अशा बांडगुळांचीच गर्दी वाढणार ना? विधानसभा वा लोकसभा जिंकायची जिद्द असलेल्यांना बाहेरची वाट शोधावी लागते आणि आयतोबा मोठ्या पदावर विराजमान होऊन बसतात.


10 comments:

  1. भाउ कांगरेसचे मराठी पत्रकारपण काही कमी नाहीत ते सतत मोदींना शिकवत असतात राहुलला शिकवावे पण उलटच होतय ते राहुलचे अपयश,चुका कशा बरोबर आहेत तेच सांगतात ३ राज्यात खर तर कांगरेसला मायावतींना सोबत घेन्यात पुर्ण अपयश आलय तरी हे शहाणे बिहारच उदा.देउन वेोटकटाउ पक्ष मानतात ओवेसीमुळे काही फरक पडला नाही म्हनुन मग वोटकटाउ ncp ने गुजरातमधे राहुलचा राज्याभिषेकाला कसा अपशकुन केला? जोगी तर १५ वर्ष करतायतच परत राहुलच राफेल उडवण्यात दंग

    ReplyDelete
  2. Bhau Apratim lekh. Ya shefarlelya mulakadun ankhin Kay apeksha Karu shakato

    ReplyDelete
  3. एकदम वास्तवाचे चित्रण .भाऊसाहेब वंदन

    ReplyDelete
  4. भाऊ कालच तुमचे संभाजीनगर चे राफेल संदर्भात व्याख्यान ऐकले आणि मी तुमचा fan झालो .
    आता नियमित तुमचा ब्लॉग वाचनार
    धन्यवाद

    ReplyDelete
  5. भाऊ कालच तुमचे संभाजीनगर चे राफेल संदर्भात व्याख्यान ऐकले आणि मी तुमचा fan झालो .
    आता नियमित तुमचा ब्लॉग वाचनार
    धन्यवाद

    ReplyDelete
  6. भाऊ सुंदर आणि चपखल विश्लेषण ...

    ReplyDelete
  7. छान खुपच लेख

    ReplyDelete
  8. He bhashan online ahe Kay aslyas link dya krupaya

    ReplyDelete
  9. भाऊ तुमचे लेख जरी सगळे वाचले तरी राजकारण कस कराव याचा कोणालाही अंदाज येईल

    ReplyDelete