Saturday, October 27, 2018

लेकी बोले पुतण्या लागे

Image result for sharad pawar ajit pawar

भारतीय राजकारणामध्ये मागल्या दोनतीन दशकात दोन असे नेते उदयास आले, की त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून पुढल्या निवडणूकीचे मोसमी वारे कुठल्या बाजूने वहात आहेत, त्याचा अंदाज वेधशाळेपेक्षाही उत्तमरित्या बांधता येत असतो. त्यापैकी एक आहेत महाराष्ट्राचे विद्यमान ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसरे आहेत बिहारचे मुरब्बी नेता रामविलास पासवान. या दोघांची खासियत अशी आहे, की त्यांनी जवळ आलेल्या निवडणुकीत त्या बाजूला झुकाव दिलेला आहे की त्यांचा कल बघून आपण भावी मतदार कौल ठरवू शकतो. त्यासाठी कुठ्ल्याही मतचाचणीची गरज नसते. मात्र त्या दोघांचा कल परस्परविरोधी बाजूला असतो, हाही एक चमत्कार आहे. यातले रामविलास पासवान नेमके आपल्या भूमिका बदलून जिंकणार्‍या बाजूने झुकतात, तर शरद पवार जिंकणारी बाजू सोडून पराभूत होणार्‍या बाजूने आपले वजन टाकत असतात. त्यामुळेच आताही लोकसभेचे वेध लागलेले असताना हे दोन नेते काय भूमिका घेतात, याला महत्व आहे. त्यापैकी पवार यांनी पुढल्या लोकसभेनंतर देशात भाजपा वा मोदींचे सरकार सत्तेवर रहाणार नाही, अशी ग्वाही नुकतीच दिली आहे आणि पासवान अजून तरी एनडीएमध्ये टिकलेले आहेत. नुकतीच त्यांनी बिहारच्या ४० लोकसभा जागांची वाटणी मान्यही केलेली आहे. त्यामुळे सर्वाधिक खुश भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. कारण ह्या दोन नेत्यांचे वर्तन त्यांच्यासाठी शुभसंकेत घेऊन येणारे आहे. शरद पवार यांनी सत्ता जाण्याची ग्वाही दिलेली आहे. अर्थात आपण काही भविष्यवेत्ते नाही असेही पवार म्हणू शकतात. पण वेगळ्या अर्थाने तेही भविष्यच वर्तवित असतात. कालपरवा त्यांनी एक वाहिनीच्या चर्चासत्रामध्ये ही भविष्यवाणी केली, तेव्हा त्यांना २०१३ सालची आपलीच भविष्यवाणी कशी आठवली नाही?

सोळाव्या लोकसभा निवडणूका २०१४ च्या पुर्वार्धात व्हायच्या होत्या आणि त्यासाठीच्या प्रचाराचा आरंभ नरेंद्र मोदी यांनी २०१३ च्या अखेरीसच केलेला होता. देशाच्या विविध कानाकोपर्‍यात मोदी फ़िरत होते आणि मोठमोठ्या सभा घेऊन आपली भूमिका मांडू लागलेले होते. मतदानाचे वेळापत्रक जाहिर झाले नव्हते, की विविध पक्षांची तयारीही सुरू झालेली नव्हती. दिल्लीसह चार विधानसभांच्या निवडणूका रंगात आलेल्या होत्या. तिथेही मोदींची मुलूखगिरी चालू होती. त्याचे निकाल लागल्याने भाजपा जोरात असल्याचे संकेत मिळालेले होते. पण त्याला दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाने अपशकून घडवला होता. मोदींसाठी निवडणूका सोप्या नसल्याचा तो संकेत होता. अशावेळी मुरब्बी म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी मोदींनी न विचारताही एक बहुमोलाचा सल्ला दिलेला होता. पवार जितके राजकारणात आहेत तितके क्रीडाक्षेत्रातही कार्यरत आहेत. त्याचाच आधार घेऊन पवार म्हणाले होते, मॅराथॉन धावणारा धावपटू इतक्या लौकर वेग घेत नाही. इतक्या घाईने पळू लागत नाही. तर नंतरच्या टप्प्यासाठी आपली उर्जा राखून ठेवतो. कारण घाई केली तर अखेरच्या अटीतटीच्या लढतीमध्ये उर्जा संपून जाते आणि धावपटू थकून पराभूत होतो. त्यात तथ्य जरूर होते. कोणालाही पटणारे सत्य होते. पण पवारांना हवा तसाच अनेकांनी अर्थ लावला आणि मोदींना लक्ष्य करण्यासाठी त्याचा वापर झाला. त्यावेळी माझ्या विश्लेषणातही मी पवारांच्या त्या विधानाची गंभीर दखल घेतली होती आणि वेगळे मत मांडलेले होते. पवारांचे मत मलाही पटलेले होते. उदाहरणही योग्य होते. त्यात गफ़लत एकाच गोष्टीची झालेली होती. ज्याच्या संदर्भात उदाहरण दिलेले होते, ती व्यक्ती चुक होती. मोदींना अजिबात घाई झालेली नव्हती की त्यांनी अकारण लौकर पंतप्रधानाच्या शर्यतीत धावायचा उतावळेपणा अजिबात केलेला नव्हता. ते उदाहरण मग कोणासाठी योग्य होते?

मॅराथॉन धावताना लौकर सुरूवात करू नये आणि अखेरच्या टप्प्यासाठी उर्जा राखून ठेवायचे हे सुत्र, खुद्द शरद पवारांनाच आपल्या आयुष्यात योग्यरितीने समजून घेता आले नाही, की वापरता आले नाही. वयाच्या चाळीशीत १९७८ सालात पवारांनी मुख्यमंत्री होण्याची घाई केलेली होती. त्यानंतर ज्या काही कसरती त्यांनी पुढल्या काळात केल्या, त्या मॅराथॉन धावणार्‍या धावकापेक्षाही मॅराथॉन मुलाखती देणार्‍यापुरत्या मर्यादित होऊन गेल्या. अशा प्रदिर्घ मुलाखतींनी पवारांना महाराष्ट्राचा मुरब्बी नेता जरूर बनवले. पण पंतप्रधानाच्या शर्यतीमध्ये स्पर्धक म्हणूनही त्यांना कधी संधी मिळू शकली नाही. त्या स्पर्धकांच्या प्राथमिक निवडीतच धसमुसळेपणा करण्याने पवार शर्यतीतून बाद होत राहिले. १९८६ सालात पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांना आपला पक्ष गुंडाळून कॉग्रेसवासी व्हावे लागले आणि राजीव गांधींचे निधन झाल्यावर थेट पंतप्रधान होण्यासाठी झेपावलेले पवार, वयोवृद्ध नरसिंहराव यांच्याकडून चितपट होऊन गेले. त्यांनी चौथ्यांदा पवारांना दिल्लीतून मुख्यमंत्री व्हायला रवाना केलेले होते. त्यानंतर पवार जे पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाहेर फ़ेकले गेले ते आजपर्यंत त्याकडे आशाळभूतपणे बघत बसलेले आहेत. त्याचे एकमेव कारण म्हणजे घाईगर्दी व उतावळेपणा, इतकेच सांगता येईल. कुठलीही तयारी वा सराव केल्याशिवाय शर्यतीत झोकून देण्याची घाई पवारांना राष्ट्रीय वा प्रादेशिक राजकारणात नामशेष करून गेलेली आहे. त्यामुळे आजची अगतिकता त्यांना असह्य झालेली आहे. वासरात लंगडी गाय शहाणी, तसे पवार एकूण राजकीय क्षेत्रात वावरत असतात. त्यांच्या शत्रूला वा प्रतिस्पर्धी पक्षांनाही त्यांची दया यावी, अशी स्थिती झालेली आहे. ती शर्यतीत खुप आधी उतरून व उर्जा संभाळून न वापरण्याच्या उतावळेपणामुळे. असे पवार राजकीय भाकित करतात, त्याचे म्हणूनच नवल वाटते.

दुसरे टोक आहेत बिहारचे रामविलास पासवान. ते भाजपा किंवा संघाचे जुन्या काळापासूनचे विरोधक आहेत. १९७७ सालात कोवळा तरूण असताना ते जनता पक्षातर्फ़े लोकसभेत विक्रमी मतांनी निवडून आले, म्हणून गिनीज बुकात नोंद झालेली आहे. त्यानंतर जनता पक्ष संपला व जनता दलही आता रसातळाला गेलेला पक्ष आहे. पण पासवान आपले राजकारणातील अस्तित्व टिकवून आहेत. त्यांनी वेळोवेळी आपले पक्ष बदलले आहेत आणि कधी स्वतंत्र तंबू ठोकून आपले सवंगडी मित्रपक्ष बदललेले आहेत. १९९६ सालात भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याच्या राजकारणातले ते एक म्होरके होते. पुढे बिहारमध्ये लालू फ़र्नांडीस असा बेबनाव झाला, तेव्हाही पासवान लालू गटात रहिले होते. मात्र लौकरच त्यांनी बाजू बदलली आणि १९९९ सालात ते फ़र्नांडिसाशी हातमिळवणी करून भाजपाच्या गोटात दाखल झालेले होते. वाजपेयी सरकार स्थापन झाले, त्यात पासवान मंत्रीही झालेले होते आणि २००२ नंतर त्या सरकारचा राजिनामा देणारे ते पहिले मंत्री होते. गुजरात दंगलीनंतर मोदींची मुख्यमंत्री म्हणून हाकालपट्टी केली नाही, म्हणून केंद्रीय मंत्रीपद सोडण्याची हिंमत त्यांनी केलेली होती. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आणि लालू व कॉग्रेसशी हातमिळवणी केलेली होती. सोनियांचे नेतृत्व स्विकारून लोकप्रिय वाजपेयींच्या विरोधात पासवान खडे राहिले होते. तेव्हा कोणालाही वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपा पराभूत होईल असे वाटलेले नव्हते. पण पासवान यांना तशी खात्रीच होती. म्हणुन त्यांनी मंत्रीपद सोडण्याचा जुगार खेळलेला होता. तो यशस्वी झाला आणि २०१४ साली तेच पासवान त्याच नरेंद्र मोदींच्या भाजपप्रणित आघाडीत सहभागी झाले होते. जेव्हा पवारांना मोदी मॅराथॉन धावताना दमतील असे वाटले, तेव्हा पासवान यांनी त्याच मोदींशी हातमिळवणी करण्याच यशस्वी जुगार खेळलेला होता.

असे हे दोन नेते आहेत. त्यांच्या वागण्यातून येऊ घातलेल्या निवडणूक निकालाचा नेमका अंदाज म्हणूनच बांधता येत असतो. त्यात पवार ज्यांच्या पराभवाचे भाकित करतील, त्याचे यश गृहीत धरावे आणि पासवान कुठल्या बाजूने उभे रहातात, त्यावर विजयी बाजूचे गणित मांडायला घ्यावे, असे एकूण समिकरण आहे. लोकसभेत दारूण पराभव झाला असतानाही विधानसभेत पवारांनी कॉग्रेसशी असलेली आघाडी मोडण्याच ऐतिहासिक निर्णय भाजपाला पराभूत करण्यासाठी घेतला होता, की विजयी करण्यासाठी होता? आपल्या पक्षाची ताकद वाढली असल्याचा दावा करून अवास्तव अधिक जागा मागण्यातून ती आघाडी मोडली गेली होती. निकालांनी राष्ट्रवादी पक्ष व पवारांची महाराष्ट्रातील खरी ताकद दाखवून दिली. १९८० सालात प्रथम वेगळ्या पक्षाची चुल मांडून पवारांनी विधानसभा लढवली होती. त्यात पन्नासहून थोडे कमी आमदार निवडून आलेले होते. २०१४ मध्ये त्यापेक्षा अधिक झेप त्यांचा पक्ष घेऊ शकला नाही. आयुष्यात असे कुठले यशस्वी निवडणुकांचे गणित पवारांनी मांडले आणि ते खरे ठरलेले आहे? पण ते भाकिते करीत असतात आणि मुरब्बी धुर्त राजकारणी म्हणून माध्यमे त्यांची टिमकी वाजवित असतात. पण तात्पुरती खळबळ उडवून देण्यापलिकडे पवारांच्या विधानांचा आता कुठलाही उपयोग राहिलेला नाही. अनेकदा तर ‘लेकी बोले पुतण्यालागे’ अशी विधाने पवार करीत असतात. त्यामुळेच पत्रकारांची चंगळ होते. वाहिन्यांना चर्चेसाठी एक चघळण्याचा विषय मिळतो. पण महाराष्ट्राच्या एका ज्येष्ठ अनुभवी नेत्याची इतकीच किंमत असावी काय? बाकीच्या कोणी नाही तरी खुद्द पवारांनी आता वाढलेल्या वयात त्याचा विचार करायला हवा ना? असली बाष्कळ भाकिते करून ते काय साधतात? त्यांच्या राजकीय आयुष्यापेक्षाही वयाने लहान असलेल्या नव्या पिढीच्या पत्रकारांकडून खिल्ली उडवून घेण्यात कसली मौज आहे?

आपले भाकित सांगताना पवारांनी २००४ सालातला दिलेला संदर्भ किती गैरलागू असावा? वाजपेयी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना पराभूत झाले व शायनिंग इंडिया पवारांना नेमका आठवतो. पण २००४ पुर्वी १९९८ आणि १९९९ अशा दोन लोकसभा निवडणुकांनी वाजपेयींना पंतप्रधानपद भूषवता आले. तेव्हाची स्थिती पवारांना कशाला आठवत नाही? दोनदा पंतप्रधान होताना वाजपेयींना एकदाही दोनशे जागांचा टप्पा ओलांडता आलेला नव्हता. म्हणून ते लोकप्रिय असतील तर वाजपेयींपेक्षा शंभर जागा अधिक पहिल्या फ़ेरीत जिंकून पक्षाचे बहूमत सिद्ध करणारे नरेंद्र मोदी लोकांच्या मनातून उतरलेले असतात काय? वाजपेयींच्या १८६ जागा आणि मोदींनी जिंकलेल्या २८२ जागा यातले काही गणित आकडे पवारांना समजत नाहीत काय? १८६ जागा जिंकणे ही लोकप्रियता आणि आता मोदी २४० जागा जिंकण्याची सगळीकडून व्यक्त होणारी शक्यता हे लोकप्रियता गमावल्याचे लक्षण असते का? जेव्हा तुम्ही पराभवाची तुलना करीत असता, तेव्हा जिंकण्याचीही तुलना करावी लागते. १९९६, १९९८ आणि १९९९ अशा तीन निवडणूका हरतानाही कॉग्रेसने शंभरी पार केलेली होती आजची कॉग्रेस त्याच्या जवळपासही फ़िरकू शकत नाही, अशी स्थिती आहे. जिंकायला आवश्यक असलेली पक्ष संघटना आज कॉग्रेसपाशी नाही आणि तितकी इच्छाशक्तीही उरलेली नाही. किंबहूना स्वबळावर भाजपा वा मोदींना हरवण्याची हिंमतही आज कॉग्रेस गमावून बसलेली आहे. अशा अनेक पक्षांची बोळबेरीज करून सोनियांनी २००४ सालात वाजपेयींची सत्ता हिरावून घेतलेली होती. त्यालाही बाहेरून डाव्यांनी पाठींबा दिला म्हणून सत्तापालट शक्य झालेला होता. विस्कळीत असूनही विरोधकांना वाजपेयीना हरवणे अशक्य कोटीतलॊ गोष्ट वाटलेली नव्हती, की गठबंधनातून भाजपाला पराभूत करण्याची भाषा सोनियांना कधी बोलावी लागलेली नव्हती. पवारांना यातले काही आठवतच नाही काय?

कुणालाही लोकसभेत बहूमत मिळणार नाही आणि सभागृह त्रिशंकू होईल; असे पवारांचे भाकित आहे. सहाजिकच मोदींच्या नेतृत्वाखाली अन्य कोणी पक्ष जाणार नाहीत व भाजपाची सत्ता संपेल; अशी आशाळभूत स्थिती विरोधकांची आहे. मोदींना पाडायचे आहे आणि सत्तेतून हाकलून लावायचे आहे. पण त्यासाठी कुठलीही मेहनत घ्यायची नाही. आयते कोणी मोदींना पराभूत करावे आणि आम्हाला सत्तेवर आणुन बसवावे; असा हा आशाळभूतपणा आहे. म्हणूनच मग सांगितले जाते, मोदींच्या जागी पर्यायी पंतप्रधान कोण ते नाव आता सांगण्याची गरज नाही. आधी मोदींना पराभूत करायचे आहे. ते काम झाल्यावर विरोधी पक्ष एकत्र बसून नवा नेता निवडतील व नवे सरकार स्थापन करतील. थोडक्यात नवा देवेगौडा वा मनमोहन नंतर निवडता येईल. कोणीही असेल. मोदी नकोत इतकाच विरोधकांचा अजेंडा आहे. तो जनतेचा वा मतदाराचा अजेंडा असायचे काही कारण नाही. २०१४ सालात मोदी हवेत, हा मतदाराचा अजेंडा होता. कारण मनमोहन सोनिया नकोत ही जनधारणा झालेली होती. त्याला पर्याय हवा म्हणून आसुसलेल्या मतदारासमोर मोदींनी आपला चेहरा समोर ठेवला व त्यांना प्रतिसाद मिळाला. त्यांना हरवायचे असेल, तर म्हणूनच नवा वेगळा चेहराच सादर करावा लागेल. त्यातून सुटका नाही. असल्या तात्विक वा वैचारिक कोलांट्या उड्या पत्रकार विश्लेषक मारू शकतात. तेव्हाही आपल्याकडे चेहर्‍यावर निवडणूक जिंकता येत नाही, कारण ही अध्यक्षीय लोकशाही नसल्याचे युक्तीवाद झालेच होते. ते खोटे पाडून मोदींना एकहाती बहुमत देणारा मतदार ज्यांना अजून समजला नाही, त्यांनी कशाला भाकिते करावीत? त्यापेक्षा उर्वरीत आयुष्य मिळवलेली प्रतिष्ठा व पत टिकवण्याचे कष्ट तरी पवारांनी घ्यावेत ना? कारण पवार इतके अगतिक व केविलवाणे झालेले त्यांच्या विरोधक वा शत्रूलाही बघायला भावत नाहीत ना? असली आव्हाडव्य भाकिते कशाला हवीत

14 comments:

  1. Khup khupcha bharicha bhau....1no. Bollat pn kalate pn vayamanane valat nahi na

    ReplyDelete
  2. भाऊ,
    बास कि आता....
    जीव देतील ते हे वाचल तर.....
    ख्या ख्या ख्या ख्या

    ReplyDelete
  3. सगळ्यात शेवटचं वाक्य झक्कास...!!!! पवार आव्हाडी(व) बोलतात...

    ReplyDelete
  4. आजकाल सगळी पुरोगामी जमात आघाडी सरकारचे महत्ता सांगतेय.मजा म्हनजे ते चांगल कस यासाठी देवेगौडा राजनारायण ची उदा देतेय.काय हे धाीर सुटल्याच लक्षण.भाउ पण त्या मुलाखतीत पवार मोदी सरकारविशयी संयमीत बोलत हेोते इतर विरोधी जसे बोलतात तसे नाही वाटले.याच कारण काय?

    ReplyDelete
  5. कर्नाटकची आठवण झाली तेव्हा पवार कांग्रेसला बहुमत मिळेल अस म्हनाले हेोते त्यामुळ राहुल बेफिकीर राहिले की काय?

    ReplyDelete
  6. भाऊराव,

    आव्हाडव्य हे विशेषण लई म्हणजे लैच्च आवडलं! ( आव्हाडलं नाय बरंका !)

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  7. भाऊ
    या माणसाबद्दल काही वाचावं आस वाटत नाही. तुम्ही सुद्धा काही लिहिण्याचे कष्ट घेऊ नका.

    ReplyDelete
  8. Incredible explanation Hon.Bhau

    ReplyDelete
  9. Very intuitive comparison of Ramvilas Paswan and Sharad Pawar. Pawaranchi sadhya vritti ekhadya dombarya sarkhi zalli ahe. Tyachatch te Khush ahet. Ji gardi dolya samor ahe tyanchya purta ha dombarya bolat ahe. Bhau hats off for a perfect reading of political intentions

    ReplyDelete
  10. भाऊ माझे हे बोलणे कदाचित तुम्हाला अतिशय अतिशयोक्तीचे वाटू शकेल परंतु खरोखरीच मनापासून सांगतो आता निवडणुका जवळ आल्या आहेत आणि आपले लेख वाचून अक्षरशः हजारो लोकांचे मन परिवर्तन आणि पर्यायाने मतपरिवर्तन होते असा माझा स्वानुभव आहे तरी आपण दिवसाला किमान तीन ते चार नवीन लेख टाकत जावेत 2019 च्या निवडणुका होईपर्यंत अशी आपल्याला नम्र नम्र नम्र प्रार्थना माझ्यामते सर्वजण सहमत असतील याला

    ReplyDelete
  11. असली आव्हाडव्य भाकिते कशाला हवीत

    अवाढव्य

    ��

    ReplyDelete
  12. Ashi *avhadh*vya bhakite karun




    Pawaranna fakt *jitendra* hota yeil




    *Narendra* nahi

    ReplyDelete