Wednesday, June 19, 2019

माझे चुकलेले विश्लेषण




लोकसभा निवडणूकीच्या निमीत्ताने मी गेले दिडदोन वर्षे करीत असलेले राजकीय विश्लेषण कसे नेमके आले, त्याचे मित्र परिचितांनी खुप कौतुक केले. जिथे यानिमीत्त व्याख्याने झाली, त्यांनीही खुप पाठ थोपटून झाली. प्रामुख्याने ‘पुन्हा मोदीच का’ या पुस्तकात मांडलेला ३००+ हा आकडा नेमका आल्याचे कौतुक खुपच झाले. परंतु अशा गडबडीत आपल्या चुकांची कोणी दखल घेत नाही, याचेही अनेकदा वैषम्य वाटते. मोदी वा भाजपाला तीनशेहून जास्त जागा मिळतील हा माझा अंदाज वास्तविक ठरला असला, तरी दोन बाबतीत माझा अंदाज साफ़ चुकला आहे. त्यापैकी एक म्हणजे कॉग्रेसला किती यश मिळू शकेल, याबद्दल माझा आकडा साफ़ चुकलेला आहे. कॉग्रेसला किमान ७०-८० जागा मिळतील, अशी माझी अपेक्षा होती आणि ती अजिबात गैरलागू नव्हती. जितकी मला भाजपाविषयी खात्री होती, तितकीच कॉग्रेसने सत्तरी पार करण्याची खात्री होती. पण त्याच्या जवळपासही कॉग्रेस जाऊ शकली नाही. म्हणजेच त्या पक्षाविषयीचा माझा अंदाज फ़सला आहे. दुसरी महत्वाची बाब अशी, की मी सतत कॉग्रेस आणि पाकिस्तानची तुलना करीत होतो, तिथेही माझी तुलना चुकलेली आहे. पण कोणीही त्या चुकीवर बोट ठेवले नाही, म्हणून मला आपलीच चुक निदर्शनाला आणून देणे अगत्याचे वाटते. यातला महत्वाचा भाग म्हणजे मला वाटत होते, तितका पाकिस्तान कॉग्रेसप्रमाणे रसातळाला गेलेला नाही. राहुल गांधींनी मला चुकवण्याचा जणू विडाच उचलल्यासारखा प्रचार केला म्हणावे लागेल. कारण आता समोर येणारी माहिती बघता, राहुल घरात गप्प बसले असते तरीही कॉग्रेसने ८० चा आकडा नक्कीच पार केला असता. थोडक्यात राहुलमुळे कॉग्रेसने किमान २०-३० जागा गमावल्या आहेत आणि पाकिस्तानी कितीही दिवाळखोर असले तरी त्यांना आपला नेता चुकला तर ते बोलण्याची हिंमत आहे, जी कॉग्रेसवाल्यांनी कधीच गमावली आहे.

कालपरवा भारत पाकिस्तान यांच्यातला विश्वचषक स्पर्धेतला सामना संपल्यावर आलेल्या बातम्या बघितल्या ऐकल्या, तेव्हा मला या फ़रकाची प्रकर्षाने जाणिव झाली. कारण पाकिस्तानचा क्रिकेट कर्णधार सर्फ़राज अहमद याच्यावर त्या देशातल्या क्रिकेटशौकीन व माजी खेळाडूंनी जबरदस्त टिकेची झोड उठवली. तो इंग्लंडमधील सामना आणि भारतातील लोकसभेची निवडणूक, त्यात तसा फ़ारसा फ़रक नव्हता. इथे मोदींचा भाजपा कितीतरी शक्क्तीमान पक्ष होता आणि त्याच्या अंगावर जाऊन लढणे अशक्य होते. किमान त्यांच्या बलशाली बाजू ओळखून तिकडे दुर्लक्ष करणे व दुबळ्या बाजूंवर हल्ला चढवूनच कॉग्रेसने निवडणूकांना सामोरे जाण्याची गरज होती. पण एकूण निवडणूकीची तयारी व पुढला घटनाक्रम बघितला; तर राहुल प्रत्येक बाबतीत व वेळी भाजपाला लाभदायक ठरतील अशाच खेळी करीत गेले. पाकिस्तानच्या सर्फ़राजनेही त्या दिवशी नेमक्या त्याच खेळी करून भारताला सामना सोपा करून दिला. माजी गोलंदाज शोएब अख्तर याने त्या चुकीवर नेमके बोट ठेवले आहे. त्या सामन्यात टॉस जिंकल्यावर पाकने आधी फ़लंदाजी करण्यात शहाणपणा होता. कारणा आजवरच्या इतिहासात पाकला कधीच पाठलाग करून सामना जिंकता आलेला नाही. शिवाय मोठी धावसंख्या प्रतिपक्षाने उभारली, तर धावगतीचे दडपण येत असते. म्हणूनच टॉस आपल्याला संधी देत असताना सर्फ़राजने भारताला फ़लंदाजी देणे घातक होते. पण त्याने नेमकी तीच गोष्ट केली आणि त्याचा फ़ायदा भारतीय खेळाडूंनी उचलला. धावसंख्याच इतकी प्रचंड उभारली, की त्यासमोर पाकिस्तानचा टिकाव लागणेच अशक्य होते. राफ़ायल किंवा चौकीदार चोर अशा बोंबा ठोकून राहुल गांधी वेगळे काय करीत होते? ज्याची आयुष्यभराची प्रतिमा स्वच्छ आहे, त्याच्यावर खोटा भ्रष्टाचाराचा आरोप कसा टिकणार होता? तो उलटणे अपरिहार्य नव्हते का?

थोडक्यात राहुल गांधी अशा प्रचाराच्या आहारी गेले नसते आणि त्यांनी कुठलाही आगावूपणा करण्यापेक्षा आपल्या प्रादेशिक नेते व कार्यकर्त्यांना निवडणूक मोकळेपणाने लढवू दिली असती, तरी यापेक्षा अधिक जागा जिंकून आल्या असत्या. राहुलनी गमावले काय, तेही अजून कॉग्रेसच्या नेत्यांना ओळखता वा सांगता आलेले नाही. फ़क्त अमेठीची पिढीजात जागाच त्यांनी गमावलेली नाही. ४४ च्या जागी ५२ जागा आल्या म्हणजे आठने संख्या वाढली, असे सांगितले जाते. तेव्हा वस्तुस्थिती झाकली जाते. वाढलेल्या आठ जागा तामिळनाडूत द्रमुकच्या आघाडीत असल्याने कॉग्रेसला मिळालेल्या आहेत. ती आघाडी नसती, तर त्या आठ जागांची अपेक्षाही कॉग्रेसला करता आली नसती. याचा अर्थ त्या ८ जागा बाजूला केल्यास उरतात पुन्हा ४४ खासदार. पण त्यातून पुन्हा केरळात वाढलेल्या ५-६ जागांसाठी राहुलचे योगदान कुठले आहे? नसेल तर त्याही जागा वजा केल्यास राहुलनी ४४ चाही आकडा कमी करण्यास हातभार लावला असे म्हण्ता येईल. त्याची कारणे कुठली ते नंतर बघता येईल. परंतू अशा नेत्याची कुठे चुक झाली, ते बोलायलाही कॉग्रेसमधले दिग्गज धजावत नाहीत. पण पाकिस्तानी संघाचा कर्णधार सर्फ़राज याची लक्तरे करण्याची हिंमत पाकचे सामान्य चहाते व माजी खेळाडू धजावत असतील, तर त्यांची पाठ थोपटावीच लागेल. मागे अनेकदा मी कॉग्रेस पक्षाची अवस्था पाकिस्तानसारखी झाल्याचे तुलनात्मक विश्लेषण केलेले होते. ती माझी चुक होती, असे आता मान्य करायला हवे. कारण कॉग्रेसची अवस्था पाकिस्तानपेक्षाही डबघाईला आलेली दिसते. तो देश दिवाळखोरीत गेला तरी चुका मान्य करीत नाही वा सुधारायला तयार नाही, असे माझे मत होते. पण निदान क्रिकेटच्या बाबतीत तरी पाकिस्तान आपल्या चुका कबुल करतो आहे आणि सुधारणा करण्यासाठी कर्णधारालाला दोषी ठरवण्याचे धाडस त्याच्यात आहे. कॉग्रेस त्यापेक्षाही डबघाईला गेलेली आहे ना?

२३ मे रोजी लोकसभा मतदानाचे निकाल लागले आणि दोन दिवसात कार्यकारिणीची बैठक घेऊन राहुलनी आपल्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिलेला आहे. पण त्यांच्या राजिनाम्याचे करायचे काय, त्याचाही निर्णय त्या पक्षाला घेता आलेला नाही. इंग्लंडमधील पराभवानंतर पाकिस्तानात आपल्या खेळाडू व कर्णधारावर लोक संतप्त झाले. त्यांनी टिव्ही फ़ोडण्यापासून बराच राग व्यक्त करून झाला आहे. पण इथे कॉग्रेसमध्ये मात्र दारुण पराभवानंतर राहुलवर स्तुतीसुमनाचा वर्षाव चालू आहे. राहुल हे गांधी असल्याने ते चुकूच शकत नाहीत, अशी त्यांच्या अनुयायांना खात्री आहे. त्यामुळे कॉग्रेसचे भवितव्य काय असेल, हे आपण समजू शकतो. त्या पक्षापेक्षाही पाकिस्तानी क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल नक्कीच असेल. कारण निदान त्या शेजारी देशात आणि तिथल्या क्रिकेट चहात्यांमध्ये वास्तवाला सामोरे जाण्याची हिंमत दिसून येते. इथे कॉग्रेसच्या मुठभर नेत्यांपाशी व कार्यकर्त्यांपाशी तितकी बुद्धी असेल, अशी माझी चुकीची अपेक्षा होती आणि ती फ़ोल ठरलेली आहे. तितकी अपेक्षा कॉग्रेस पक्षाकडून बाळगणे ही माझी चुक होती आणि म्हणूनच कॉग्रेस ७०-८० चा पल्ला गाठेल असे विश्लेषण मी करून बसलो होतो. तो अंदाज सपशेल चुकलेला आहे, त्याची कबुली देण्याची मला लाज वाटत नाही. शेवटी विश्लेषण वा राजकीय अंदाज हे आखाड्यात उतरलेल्या पक्ष व त्यांच्या नेत्यांविषयी बाळगलेल्या अपेक्षेतूनच येत असतात. त्या अपेक्षा यापुढे कॉग्रेसकडून बाळगू नयेत, हा निदान मला मिळालेला धडा आहे. लक्षात ठेवा; शिखर धवन, रोहित शर्मा किंवा विराट कोहली अपेक्षेनुसार कमीअधिक खेळ करू शकले, म्हणून काही घडले आहे. जिथे अपेक्षाभंग करण्यालाच राजकीय कर्तॄत्व मानले जाते, त्यांच्याविषयी अपेक्षा बाळगणे हाच गुन्हा असतो आणि त्याची पुर्तता झाली नसेल, तर अपेक्षा बाळगणारा गुन्हेगार असतो. राहुल गांधी निर्दोष असतात.

10 comments:

  1. पंजाब मधल्या जागा या अमरीनदर सिंग यांच्या आहेत । RaGa चा त्यात काहीही हात नाही । त्या कमी करा । छिंदवाडा ची जागा कमलनाथ यांची आहे । Again, nothing to do with RaGa ... ती ही कमी करा ।
    आता उरलं काय !? 🤔

    ReplyDelete
  2. वा भाऊ, कॉंग्रेसची तुलना पाकिस्तानच्या दिवाळखोरी बरोबर करणे अगदी लाजबाब. कारण मागच्या चुकांतून ते दोघेही काहीच शिकत नाहीत.

    ReplyDelete
  3. भाऊ तुम्ही शुल्लक केलेल्या चूका स्वतःच उघड करून मान्य करता. असे मोठेपण आपले राजकारणी कधी दाखवणार आहेत?

    ReplyDelete
  4. Great, Sir, you don't spare your bhakta, you don't spare even yourself, you are really great. Future of Congress party is totally dark but future of India is bright.

    ReplyDelete
  5. भाऊ खरंच आपले स्वतःच्या चुकिचे केलेले विश्लेषण पण एकदम सही आणि यातच आपला मोठेपणा सामावलेला आहे अशा स्स्वतःच्या भुमीकेची ऊलटतपासणी आपण नेहमीच करत असतात.. तसेच मुक्त संभाषण पण आपल्या चाहत्यांच्या/ विरोधकां बरोबर करत असतात यामुळे आपले लेख हे पुढील राजकीय घडामोडींचा अदांज हा अनेक चौकस व देशहिताची जाण ठेवणारांना मार्गदर्शक ठरते...
    व आपले लेख वाचलेला वाचक चारचौघात एक वेगळा व्यक्ती म्हणुन सहज लक्षात येतो..
    आपले लेख सोशल मिडियावर खुप फिरत असतात.. व मी 2011 पासुन आपले लेख संग्रहात ठेवत आहे व मोठ्या प्रमाणात whats app वर हजारो लोकांना पठवत आहे याचा मला अभिमान आहे..
    आपणास शुभेच्छा..
    गेल्या 2 वर्षे पुर्वी च्या
    काही लेखात आपण ममता (दादा) ला काँग्रेसची अध्यक्ष करावे अशी भुमिका मांडली होती ... हि पण किती चुकिची होती हे आता सिद्ध होत आहे...
    तसेच आपले 12 ऑगस्ट 2012 सिएसटी हल्ला वरिल मुसलमानांच्या बाबतील लेखमाला या धर्माचा अंदाज घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतात..
    व यावरून आपल्या काही लेखात मांडलेली मुस्लिम मत भाजपला पडत आहेत हा अंदाज पण चुकिचा वटतो..
    जे नागरिक मुस्लिम मित्रां मैत्रिणी / लोकांन बरोबर वावरतात त्यांनी या लोकांच्या भुमीकेचे/ वागण्याचे वरुन हे सहज लक्षात येते की हे नागरिक नक्कीच आडवाणी मोदी संघाच्या भाजपला कधीच मते देत नाहीत व पर्याय असे पर्यंत देणार नाहीत.. व जे काही नगण्य देत असतील या वरुन लोकसभा व युपी राज्य निवडणूक निकाला वरुन काढणे चुकीचे ठरेल.. व यावरून तमाम मुस्लिम बाधंवा बाबत कनक्लुजन काढणे चुकीचे ठरेल.. अर्थात मोदी शहा हे जाणत असतीलच आणि म्हणुन मुस्लिम उमेदवार पण भाजपा देत नाही व या समाजाची ठेवण लक्षात घेऊन उमेदवारी घेत पण नाहीत..
    असे आपल्या अनेक सामान्य वाचकांना जे आपण लिहलेले लेख नेहमी वाचुन परत रोजच्या घडामोडी वर घासुन तपासतात अशांना वाटते..
    भाऊ पुन्हा एकदा शुभेच्छा
    एकेएस

    ReplyDelete
  6. भाऊ सही

    ReplyDelete
  7. भाऊ, तुमचे बारामतीबाबतचे भाकितही चुकले. कुल घरातला कोणी, त्यातल्या त्यात एखाद्या महिलेला तिकिट मिळाले, तर सुप्रिया सुळे जिंकू शकणार नाहीत, अशा अर्थाचा आपला एक लेख वाचल्याचे आठवते.हे अर्थात, तुम्हीच विषय काढला म्हणून...

    ReplyDelete

  8. hello,
    Your Site is very nice, and it's very helping us this post is unique and interesting, thank you for sharing this awesome information. and visit our blog site also
    Visit https://sattakingdarbar.com/

    ReplyDelete