Tuesday, June 25, 2019

कॉग्रेसचे भवितव्य

Related image

निवडणूकांची मतमोजणी होऊन आता चार आठवड्याचा कालावधी उलटला आहे. नव्या सरकारचा शपथविधी झालेला असून सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशनही सुरू झाले आहे. पण त्या निकालांच्या किंवा त्यातील पराभवाच्या धक्क्यातून अजून विरोधी पक्ष बाहेर पडलेले नाहीत. किंबहूना अशावेळी ज्या मुख्य विरोधी पक्षाने सर्वांना सोबत घेऊन विरोधी राजकारणाची रणनिती बनवायला हवी, तो कॉग्रेस पक्षच अजून त्या धक्क्यातून सावरलेला नाही. त्याची अनेक कारणे आता समोर आली असून, त्याची मिमांसा नंतरच्या काळात होत राहिल. पण जग कोणासाठी थांबत नाही आणि व्यवहारी राजकारणात असलेल्यांना हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कॉग्रेसची अशी स्थिती का झाली, ते समजून घेतानाच त्यातून बाहेर पडण्याचेही मार्ग शोधायला हवेत. पण एकदा असा मोठा पराभव झाला, मग कुठल्याही बाजूचे मोठे अनुयायी डगमगू लागतात आणि कॉग्रेस त्याला अपवाद नाही. म्हणून तर अनेक राज्यात कॉग्रेसमध्ये दुफ़ळी माजलेली आहे आणि त्यांना आवर घालण्याच्या मनस्थितीत श्रेष्ठी वा केंद्रीय नेतृत्व दिसत नाही. मग मिमांसा हा पुढला विषय झाला. पण या निमीत्ताने जे अनेक दृष्टीकोन पुढे आलेत, त्यातला एक मोलाचा धागा तेहसिन पुनावाला या कॉग्रेस समर्थकाच्या लेखात सापडतो. किंबहूना त्यात नेमकी मिमांसाही असल्याचे ठामपणे सांगता येईल. विविध वाहिन्यांवर कॉग्रेसची बाजू ठामपणे मांडणारा हा राजकीय निरीक्षक एका इंग्रजी दैनिकातल्या लेखात म्हणतो. कॉग्रेस आपली ओळखच हरवून बसली आहे, त्याचा दाखला देताना स्वातंत्र्यपुर्व काळातील कॉग्रेसची ओळख हिंदू राष्ट्रवादी पक्ष अशी असल्याची आठवण त्याने करून दिलेली आहे. पण मागल्या दोन दशकात हळुहळू कॉग्रेस हा राष्ट्रविरोधी व अल्पसंख्यांकाचे तुष्टीकरण करणारा पक्ष होऊन बसला असे त्याचे म्हणणे आहे, त्यात नवे काहीच नाही. २०१४ च्या निकालानंतर नेमलेल्या अन्थोनी समितीने तोच निष्कर्ष काढला होता. कॉग्रेस हिंदूविरोधी पक्ष ठरल्याने त्याची अशी दुर्दशा झाल्याचे अन्थोनी समितीनेही आपल्या अहवालात म्हटलेले होते.

त्यावरचा उपाय म्हणून मागल्या दिडदोन वर्षात राहुल गांधी प्रत्येक निवडणूकीपुर्वी स्थानिक मंदिरांच्या पायर्‍या झिजवू लागले,. जनेयुधारी ब्राह्मण अशी आपली ओळख निर्माण करण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद होता. कारण मुद्दा मंदिरात जाण्याचा नव्हत, तर धर्मांध नसलेल्या हिंदू बहुसंख्यांक समाजाचा विश्वास संपादन करण्याचा होता आणि तिथेच कॉग्रेस तोकडी पडलेली आहे. त्याला पक्षाचे आजचे व्यापक नेतृत्व जबाबदार आहे. आज जे कोणी श्रेष्ठी म्हणून मिरवत असतात, त्यापैकी कोणीही मुळात कॉग्रेसी संस्कारातून नेतृत्वापर्यंत आलेला नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल केल्याने नाव कमावलेल्यांना थेट पक्षात आणून नेते करण्याचे पाप झाले. त्यातून ही अवस्था आलेली आहे. त्याच्या नेमकी उलट स्थिती भाजपामध्ये दिसू शकते आणि तेच त्याच्या यशाचे गमक आहे. कालपरवा भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहांनी निवडणूका जिंकण्याची यशस्वी रणनिती राबवली व तेही सरकारमध्ये सहभागी झाले. तर त्यांच्या जागी आता जयप्रकाश नड्डा यांच्याकडे पक्षाची संघटना सोपवण्यात आलेली आहे. लोकसभेचे सभापती म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली. कित्येक वर्षे भाजपाच्या वा संघाच्या कुठल्या तरी संघटनेत कार्यकर्ता म्हणून राबत उच्चपदी आलेल्यांच्या हातीच पक्षाच्या धोरणांची सुत्रे रहातील, अशा पद्धतीने काम चाललेले दिसते. नड्डा असोत की बिर्ला, शहा असोत; त्यांनी तरूण वयात संघ वा पक्षाच्या युवा संघटनेत काम केलेले आहे. त्याला विचारसरणीचे संस्कार म्हणतात. चिदंबरम, कपील सिब्बल वा राजीव शुक्ला अशापैकी किती ज्येष्ठ कॉग्रेसनेते तळागाळातून कार्यकर्ता म्हणून भरती होऊन या पदापर्यंत पोहोचले आहेत? त्यांना आपल्या पक्षाचे विचार वा संस्कारही ठाऊक नाहीत. इतिहासाची ओळख नाही. पुरोगामी वा सेक्युलर अशा शब्दांची पोपटपंची करण्यापलिकडे त्यांना कॉग्रेस ठाऊक नाही.

लोकसभा प्रचाराची धुराही तशाच उपटसुंभ व्यावसायिकाकडे सोपवण्यात आलेली होती. त्याने जे मुद्दे दिले किंवा घोषणा दिल्या, त्याचे आंधळे अनुकरण करत कॉग्रेस निवडणूकीच्या गाळात रुतत गेली. त्याचाही वादग्रस्त तपशील आलेला आहे. ज्याला दोन वर्षापुर्वी कॉग्रेसमध्ये कोणी ओळखत नव्हता, तोच निवडणूकीच्या प्रचाराचे सुत्रसंचालन करीत होता आणि त्याला उलटा प्रश्न विचारण्याची कोणाची बिशाद नव्हती. तशीच कोणी कन्नड अभिनेत्री भाजपा विरोधी आघाडी चालवण्यासाठी नेमली होती आणि निकाल लागल्यानंतर ते दोघेही बेपत्ता आहेत. मल्ल्या वा नीरव मोदीपेक्षा त्यांची कहाणी वेगळी नाही. शतायुषी पक्षात असे कोणीही येऊन धुमाकुळ घालत असतील, तर त्या पक्षाला कुठले भवितव्य असू शकते? त्यांच्यावर आणि त्यांच्यासाठी किती पैसे खर्च झाले, हा वेगळा विषय आहे. पण त्यांनी केलेले पक्षाचे नुकसान भरून आणण्यासाठी आता कोणी पुढे यायला राजी नाही, ही शोकांतिका आहे. अशावेळी तेहसिन पुनावाला इतिहास आठवण करून देतो, तोच अधिक प्रामाणिक वाटतो. डाव्या क्रांतीवादी पोपटपंचीच्या आहारी जाऊन कॉग्रेस आपली ओळख पुसत गेली, तीच खरी समस्या आहे. कॉग्रेस हा देशातील कुठल्याही राज्यातील व धर्मातील कार्यकर्त्यांसाठी मुख्य प्रवाह होता. त्याची तीच ओळख पुसली जाताना भाजपा हिंदू हिताचे रक्षण करणारा पक्ष म्हणून पुढे आला. हे सत्य स्विकारले तरी सावरणे अशक्य नाही. त्यासाठी भगवी वस्त्रे परिधान करून हिंदूत्ववादी होण्याची गरज नाही, तर सर्वसमावेशक राजकीय पक्ष ही आपली ओळख कॉग्रेसला पुनरुज्जीवित करावी लागेल. कार्यकर्त्यांची नवी फ़ौज उभी करून उसनवारीचे व्यावसायिक नेते आणून चालढकल केल्यास त्या पक्षाला भवितव्य नसेल. शक्य झाल्यास कॉग्रेसपासून दुरावलेले छोटे प्रादेशिक गट व नेतेही सामावून घेता येतील. पण मुळात आपली ओळख कॉग्रेसने इतिहासाच्या आरशात डोकावून करून घ्यावी.

सात दशकापुर्वी स्वातंत्र्य येताना देशाची फ़ाळणी धर्माच्या आधारावरच झालेली होती आणि त्यात हिंदूंचा राष्ट्रवादी पक्ष म्हणून कॉग्रेसने भूमिका बजावली होती. मुस्लिम हिताचे रक्षण करणारा पक्ष अशी कॉग्रेसची प्रतिमा कधीच नव्हती. बहुसंख्यांक हिंदूंच्या वतीने राष्ट्रहित जपणारा पक्ष, ही प्रतिमा होती. म्हणून तर मुस्लिम लीगसारखा धर्माधिष्ठीत पक्ष कॉग्रेसला हिंदू पक्ष म्हणून हिणवित होता. आज नेमकी त्याच भाषेत कॉग्रेसवाले भाजपाला टोचून बोलत असतील, तर स्वातंत्र्योत्तर काळातल्या कॉग्रेसचा खरा वारसा आपणहून भाजपाकडे आलेला आहे. तो वारसा कॉग्रेसने नाकारला आणि भाजपाने स्विकारला. तिथेच देशातील राजकीय उलथापालथ सुरू झालेली होती. त्याचे परिणाम दिसायला तीनचार दशके उलटली इतकेच. आज ज्याप्रकारे कॉग्रेसमध्ये मुस्लिम दिसतात किंवा मुस्लिमांना कॉग्रेस आपला पक्ष वाटतो, तशी तेव्हा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातली परिस्थिती नव्हती. मुस्लिम लीगने पाकिस्तान घेतल्याने इथे उरलेल्या धार्मिक अस्मिता जपणार्‍या मुस्लिम नेत्यांनी धाकापोटीच कॉग्रेस जवळ केली होती. अन्यथा तेव्हा व नंतरच्या दोन दशकात हिंदू राष्ट्रवादी पक्ष अशीच कॉग्रेसची ओळख होती. सहाजिकच देशाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात कोणी सामाजिक कार्यात उतरला, तर आपोआप कॉग्रेसी म्हणूनच मुख्यप्रवाहात दाखल व्हायचा. मध्यंतरीच्या काळात कॉग्रेसमध्ये डाव्या समाजवादी मंडळींनी घुसखोरी केली आणि त्या हिंदू राष्ट्रवादी पक्षाचा चेहरामोहरा बदलून टाकला. आता कॉग्रेसच्या नेत्यांना वा वारसांनाही आपली खरी ओळख उरलेली नाही. आताची कॉग्रेस डाव्या विचारांच्या विकृतीच्या इतकी आहारी गेली आहे, की त्यात स्वातंत्र्य चळवळीचा मागमूस उरलेला नाही. तिच्या नेतृत्वाला गांधीजी आणि माओ यातला रफ़क सुद्धा समजेनासा झाला आहे. अशा स्मृतीभ्रंश झालेल्या जमावाला कुठले भवितव्य असू शकते?

13 comments:

  1. कांग्रेसच्या आधोगतीस त्यांनी जिकलेल्या राज्याचा निवडणूकाच करण आहे.ज्या घतनसाठी ते मोदींवर प्रहार करत होते ते सर्व त्या राज्यात सर्रास घडत होत्या.जसे शेतकरी आत्महत्या,फसलेली कर्जमाफी,अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी,अतंरगत मतभेद वगैरे.यामुळे कांग्रेस उघडी पडली वा सर्वाला जनता आगोदरच कंटाळली होती व त्याना मग मोदीवर पुन्हा विष्वास दाखवला

    ReplyDelete
  2. Congress has made an impression that it is Muslim party. President of the party has elected from Muslim population.

    ReplyDelete
  3. भाऊ बरोब्बर दहा वर्षांपूर्वी याच दिवसात भाजपाची स्थिती याच प्रकारची होती. अडवाणी, जोशी, स्वराज हे नेते पूर्णपणे निष्प्रभ झाले होते.गुजरातचे मुख्यमंत्री मोदी आणि गृहमंत्री शहा यांना वेगवेगळ्या चौकश्यांच्या फेऱ्यात अडकवण्यात आले होते आणि सोनिया गांधी या अजिंक्य भासू लागल्या होत्या. नितीशकुमार यांच्या सारखा मित्रपक्ष बिहारमध्ये मोदींची सावली पण नको अशा पध्दतीने भाजपला अपमानित करत होता, मात्र अशा स्थितीत न डगमगता भाजपमध्ये मातृ संघटनेने लक्ष घातले, संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी वयोवृद्ध आडवानी आणि जोशींना मार्गदर्शक भूमिकेत जाण्यास सांगितले, तरुण अशा नितीन गडकरींना दिल्लीत आणले गेले,तिसऱ्यांदा गुजरात राज्याची निवडणूक जिंकल्यावर नितीश सारख्यांचा दबाव झुगारून देऊन नरेंद्र मोदींना प्रचार समितीचे प्रमुख आणि नंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवण्यात आले, अमित शहा यांच्या सारख्या कुशल संघटना बांधणाऱ्या नेत्याला उत्तर प्रदेशात प्रभारी म्हणून पाठविण्यात आले या पद्धतीने पराभवातून उभारी घेऊन भाजप आजच्या स्थितीत आला आहे, आज काँगेसचा विचार केला तर आजच्या पराभूत स्थितीतून पुढच्या दहा वर्षांत पक्षाला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून देईल अशी यंत्रणा आजच्या घडीला या पक्षा कडे नाही त्यामुळे काँग्रेसचे अस्तित्व आपण म्हणता तसे निश्चितच धोक्यात आले आहे.

    ReplyDelete
  4. ' मागल्या दोन दशकात हळुहळू कॉग्रेस हा राष्ट्रविरोधी व अल्पसंख्यांकाचे तुष्टीकरण करणारा पक्ष होऊन बसला असे त्याचे म्हणणे आहे '

    Means he is also indirectly suggesting that the Italian person who was made the Congress President is the one who led the Party down the completely self destructive path and to its present doom... 😄😄

    ReplyDelete
  5. भाऊराव,

    काँग्रेसला माओ व गांधी यांतला फरकही कळेनासा झालाय हे वाचून जाम हसलो. हा खरा बुद्धीजीवी विनोद. :-)

    तुमचं एक मत चांगलंच पटलं. ते म्हणजे काँग्रेस हा बहुसंख्यांक हिंदूंच्या वतीने राष्ट्रहित जपणारा पक्ष, ही प्रतिमा होती. पण काँग्रेस या प्रतिमेशी कधीच प्रामाणिक राहिली नाही. आपल्याजवळ हिंदूंचा जनादेश ( = mandate ) आहे असं नेहमी भासवीत राहिली आणि पडद्याआडून भारतद्रोही शक्तींना खतपाणी घालीत राहिली. हे हिंदूंना कळंत होतं , पण वळंत नव्हतं. जेव्हा मोदींचा पर्याय मिळाला झाला तेव्हा हिंदूंनी काँग्रेसला भिरकावून दिलं.

    आज हिंदूहितैषी प्रतिमेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी तिचे नेते देवळांना भेटी देताहेत. पण लोकं, विशेषत: नवी पिढी, या सोंगाढोंगाच्या आरपार पाहायला शिकलेत.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  6. हा अँथोनी रिपोर्ट शोधूनही सापडत नाहीये.

    ReplyDelete
  7. श्री भाऊ काँग्रेस ला जर खरोखरच पुढे यावस वाटत असेल तर नेतृत्व बदल आणि तळा पासून पुन्हा नव्याने उभारणी करावी लागेल आणि हे सगळं पुढची 10 वर्षे करावं लागेल आता प्रश्न असा आहे की काँग्रेस हे करील का; बहु शः नाही हेच त्याचे उत्तर आहे

    ReplyDelete
  8. भाऊ, आपले विश्लेषण खूप अचूक वाटले. काँग्रेस पक्षाची मूल्यावर आधारित ओळख पुसली जाणे आणि कार्यकर्त्यांचे महत्त्व संपणे ही काँग्रेसच्या ऱ्हासाची प्रमुख करणे पटतात. मुद्दा असा आहे की संघटना उभी करण्याची पात्रता आणि कुवत ही सध्याच्या काँग्रेसमध्ये कुणाकडेच नाही. आणि स्पष्ट शब्दात बोलायचे तर राजीव गांधींकडेही नव्हती, आणि इंदिराजींनी तर संघटनेचे महत्त्व जाणून बुजून संपवले. असे असतानाही आजच्या काळात जर त्या असत्या तर पुन्हा संघटना उभी करण्याची ताकद त्यांच्याकडे होती असे वाटते पण मागच्या दोन पिढ्यांना संघटनकौशल्य माहित नाही. मग हा ज्वलंत प्रश्न कसा काय आणि कोण सोडवणार? एकुणात, निव्वळ ही जाणीव होऊन उपयोग नाही, वेळ निघून गेलेली आहे.

    दुसरी गोष्ट म्हणजे, तुलनेत, भाजप ह्या प्रमुख विरोधी पक्षाची अनेक लक्षणे नजरेत भरतात. संघटना हे एक शक्तिस्थळ झाले, पण ह्या पक्षाचे मंत्री आणि अनेक राजकारणी खरोखरच तडफेने कामे करत आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात मुख्यमंत्री किंवा केंद्रात गडकरी घ्या. गेल्या कित्येक वर्षांत अश्या निग्रहाने कार्य करणारा एक सुद्धा कार्यकर्ता हरीचा लाल दिसलाय का काँग्रेस किंवा इतर कुठल्याही छोट्या पक्षात? कदाचित चंद्राबाबू नायडूंचे नाव डोळ्यासमोर येईल. इतर राजकीय पक्ष सत्ताकारणात मश्गुल आहेत. थोडक्यात, एकीकडे चमचेगिरी, गुंडगिरी, खाबूगिरी इत्यादींवर आधारित "संघटन" आणि दुसरीकडे एक विकासाची व्यापक भूमिका असलेला आणि नेतेपदी स्वच्छ मनुष्य असलेला पक्ष, अशी हे विजोड प्रतिस्पर्ध्यांची स्पर्धा आहे. कसा काय जिंकणार कुठलाही विरोधी पक्ष? आज भाजपने खरोखरच स्वतःला अश्या पातळीवर नेऊन ठेवले आहे की त्यांच्याशी स्पर्धा करायची झाल्यास कुठल्याही इतर पक्षाच्या दोन तरी पिढ्या खर्च होतील. इतर कुठल्याही राजकारण्यात स्वतःचे बलिदान करून पुढच्या पिढ्यांची मदत करायची वृत्ती दिसत नाही, त्यामुळे भाजपने स्वतःच्या पायावर धोंडा पडून घ्यायचा ठरवला तरच इतरांना काही आशा आहेत.

    ReplyDelete
  9. भाऊ, तुम्ही काँग्रेसचे भवितव्य या विषयावर विचार करता. असा विचार काँग्रेसमधील कोणी नेते करत असतील असे वाटत नाही. २०१४ चा पराभव त्यांनी गांभिर्याने घेतलाच नाही. हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, त्यांच्यात आपापसात भांडणे होतील, त्यांचे नोकरशाहीवर नियंत्रण रहाणार नाही, त्यांची सर्वत्र छिथूं होईल इ. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून पाच वर्षे घालवली. त्यामूळे अँथनी समितीच्या सूचना बघायची जरुरी भासली नाही. आता २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांना आपला पराभव झाला आहे असे दिसते. त्यातून काय मार्ग काढायचा हे त्यांना कदाचित २०२४ नंतर कळेल.

    ReplyDelete