Saturday, June 15, 2019

देवेंद्र: लंबी रेसका घोडा

Image result for fadnavis cartoon

लोकसभा हा विषय आता निदान पुढल्या चार वर्षासाठी संपलेला आहे आणि २०२० सुरू होण्यापुर्वी तीन राज्याच्या विधानसभा निवडणूका व्हायच्या असल्याने तिथे काय होईल, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. माझ्या ‘पुन्हा मोदीच का’ या पुस्तकात व्यक्त केलेला मोदी ३००+ हा अंदाज खरा ठरल्याने, अनेक मित्रांना आगामी विधानसभेत काय होईल त्याविषयी माझे मत जाणून घेण्याची खुप उत्सुकता आहे. पण खुद्द मला या निवडणूकीविषयी फ़ारशी उत्सुकता नाही. कारण निदान महाराष्ट्रामध्ये अटीतटीची राजकीय लढत होण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. भाजपा आणि शिवसेना यांची युती झाल्यात जमा आहे आणि ज्याप्रकारे मंत्रीमंडळाचा विस्तार या अखेरच्या पर्वात देवेंद्र फ़डणवीस करीत आहेत, त्यातून दोन्ही पक्षातल्या जागावाटपाचा विषय वादाचा नसल्याचाच संकेत दिला जात आहे. मग सत्ताधारी युती कोणाशी लढणार, असा प्रश्न पडतो आणि त्याचेच उत्तर काहीसे उत्कंठावर्धक असू शकते. अन्यथा त्यांच्याशी लढायच्या मनस्थितीत आज तरी कॉग्रेस वा राष्ट्रवादी हे पक्ष असल्याचे दिसत नाही. असते तर त्यांनी विनाविलंब लोकसभा निकाल लागताच जमवाजमव सुरू केली असती. कॉग्रेसमध्ये आपला नेता कोण आणि निर्णय कोणी घ्यायचे, याविषयी असमंजस आहे. तर राष्ट्रवादी पक्षात आपल्यातून कोण विधानसभेपुर्वी जातील, याची फ़िकीर अधिक आहे. सहाजिकच सत्ताधारी युतीच्या विरोधात लढायला उरलेले दोनच पक्ष म्हणजे मनसे व वंचित बहूजन आघाडी दिसतात. कारण ते निदान विधानसभेविषयी बोलत आहेत. अन्यथा युतीच्या दोन पक्षात जागा वाटून घेण्याचेच राजकारण चालू आहे. त्यामुळे अशा निवडणूकीच्या लढती वा निकालाविषयी काय भाकित करायचे, असा प्रश्न आहे. अर्थात माध्यमे आपल्या परीने त्यात खळबळ माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण बाकी सर्व शांतताच आहे.

आपला पुत्र भाजपात जाऊन लोकसभेत निवडून आला, तरी राधाकृष्ण विखेपाटील कॉग्रेसतर्फ़े विरोधी नेतेपदी कायम होते आणि त्यांनी राजिनामा दिला तरी त्यांच्या जागी कोणाला नेमायचा निर्णय व्हायला दोन दिवस लागले. ज्यांचे नाव भाजपात जाणार म्हणून घेतले जाते आहे, त्या जयकुमार गोरे, यांना नव्याने पक्षाचे प्रतोद म्हणून नेमण्यात आलेले आहे. ह्याला अनागोंदी म्हणतात. तिसरी गोष्ट कॉग्रेसला असलेल्या दोन जागाही राखता आलेल्या नाहीत. तरी त्यांच्या पाठीशी अजूनही १७ टक्के मतदार आहे आणि म्हणूनच तोच राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष आहे. मात्र त्याला कोणी नेता म्हणून चेहरा नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात नेता कोण, तेही समजत नाही. एकाच व्यासपीठावरून शरद पवार आणि अजितदादा मतदान यंत्राविषयी दोन वेगळ्या भूमिका मांडत असतात. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोण आमदार पळून जाणार, याच्या चिंतेत आहेत. त्यामुळे अवघ्या चार महिन्यात निकाल लागायच्या विधानसभा निवडणूकीला, हे दोन्ही प्रमुख पक्ष सज्ज नसल्याची खातरजमा होते. तब्बल पंधरा वर्षे एकत्र सत्ता उपभोगलेल्या या दोन्ही मित्र पक्षांना कसोटीच्या वेळी एकत्र नांदण्याची गरज भासत नसेल, तर ते एकत्र लढणार म्हणजे काय, असा प्रश्न आहे. त्याचा सरळ अर्थ इतकाच, की त्या त्या पक्षातले जे इच्छुक आहेत, त्यांनी आपापल्या कुवतीनुसार निवडणूकीची तयारी करावी. पक्षाकडून फ़ार तर त्यांना निवडणूक चिन्हाचे अधिकारपत्र देण्याची अपेक्षा बाळगावी. अशीच स्थिती आहे. उलट चार वर्षे अखंड एकमेकांच्या उरावर बसलेल्या भाजपा शिवसेना यांनी निवडणूका दाराशी आल्यावर त्या वैराला मूठमाती देत एकदिलाने लोकसभा लढवली आहे. आताही जागावाटपात तक्रार होताना दिसलेली नाही. म्हणजेच अधिक जागा मिळवू आणि नंतर सत्तावाटपासाठी भांडू; असा त्यांचा स्वच्छ इरादा दिसतो आहे. मग लढ्त राहिली कुठे?

लोकसभेच्या मतदानाचे आकडे बघितले, तरी दोन्ही बाजूंमध्ये कुठे तुल्यबळ लढत असल्याचे दिसत नाही. सेना भाजपा यांनी एकत्रित लढताना पन्नास टक्केहून जास्त मते मिळवली आहेत आणि विधानसभेला वेगवेगळे लढताना दोन्ही कॉग्रेसनी मिळवलेली मतांची टक्केवारी एकत्र लढतानाही त्यांना टिकवता आलेली नाही. याचीच साक्ष मिळते. नाही म्हणायला वंचित आघाडी व उमेदवाराशिवाय लढलेले राज ठाकरे; यांनी त्या काळात थोडी रंगत आणली. आताही काहीशा हालचाली त्याच दोन गोटातून होताना दिसत आहेत. यापैकी वंचितने कॉग्रेस आघाडीच्या आठनऊ जागा पाडल्या, असे विश्लेषण झाले आहे. त्यामुळे कॉग्रेसला प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचे वेध लागलेले आहेत. मात्र त्यासाठी आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा, अशी अट घालण्यात आल्याचे वृत्त आहे. इतका अहंकार भाजपाचे मुख्यमंत्री फ़डणवीस यांनी वा पक्षाध्यक्ष अमित शहांनीही दाखवला नव्हता. ते मातोश्रीवर गेले आणि काही तासात युतीची घोषणा झाली होती. पराभवानंतरही कॉग्रेसला तितकी लवचिकता दाखवता येत नसेल, तर काय व्हायचे? दुसरीकडे शरद पवारांना राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेऊन काही यश मिळवण्याची आशा आहे. त्यांचा पक्ष प्रचंड आशावादी असल्याने तिकडे फ़ार गंभीरपणे बघण्याची गारज नाही. कारण दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांना युतीची ५१ टक्के मते म्हणजे काय, तेही कळलेले नसल्याचा तो संकेत आहे. कारण ५१ टक्के मते एकत्रित लढलेल्या सेना भाजपाला मिळालेली असतील, तर विधानसभेच्या किमान सव्वादोनशे मतदारसंघात युती आघाडीवर असल्याचे समिकरण आहे. त्याचा अर्थच युती कायम असेल तर विरोधकांसाठी जिंकण्याची संधी असलेल्या फ़ार तर ७०-८० जागा शिल्लक उरतात. त्यातही हलगर्जीपणा झाला, तर दोन्ही कॉग्रेस पक्षांना मिळून फ़क्त पन्नास जागांवर समाधान मानावे लागेल.

एकूण सारांश सांगायचा, तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा देवेंद्र फ़डणवीस यांचे मुख्यमंत्रीपद अबाधित आहे. मुद्दा इतकाच आहे, की युती म्हणून भाजपा व शिवसेना एकदिलाने लढतील किंवा नाही? वेगवेगळे लढले तर काय परिस्थिती असेल? त्याचा लाभ एकत्रित लढणार्‍या दोन्ही कॉग्रेस पक्षांना कितीसा मिळू शकणार आहे? वेगवेगळे लढून भाजपा आपली सत्ता गमावणार काय? युती तोडून लढल्यास शिवसेनेला कितीसा लाभ होऊ शकेल की नुकसान होईल? युती नसली तरी भाजपा बहूमतापर्यंत मजल मारू शकेल काय? राज ठाकरे व वंचित आघाडी यांचे आगामी विधानसभा लढतीमध्ये काय स्थान असेल? महाराष्ट्रात दोन्ही कॉग्रेसचे राजकीय भवितव्य काय, हा प्रश्न आता निरर्थक झाला असून; सेना व भाजपा यांना आव्हान देणारा भविष्यातील राजकीय नेता व पक्ष कोणता असेल, हा कळीचा प्रश्न झालेला आहे. शिवसेनेने भाजपासोबत जावे किंवा नाही? अधिक हट्ट करण्यापेक्षा धाकटा भाऊ म्हणून युतीत समान जागा घेऊन आपले आमदार वाढवणे शिवसेनेला फ़ायद्याचे असेल काय? अशा प्रश्नांचा उहापोह होऊ शकतो. कारण पाच वर्षात राज्याचे राजकीय गणित बदलून गेले आहे. तेव्हा भाजपाकडे राज्याचा नेता म्हणून चेहरा नव्हता आज फ़डणवीस यांनी पाच वर्षाच्या यशस्वी कारभारातून सेनेलाही शह दिला आहे आणि दोन्ही कॉग्रेसना दुबळेपांगळे करून टाकलेले आहे. लवचिकता दाखवून त्यांनी राज्यातला पहिल्या क्रमांकाचा नेता असे स्थान प्राप्त केले आहे, शरद पवार समोर असताना व शिवसेनेला शिंगावर घेऊन; पाच वर्ष अबाधित सरकार चालवणे, म्हणजे खुप मोठी मजल आहे. अशा गोष्टींचा उहापोह व आजवरच्या मराठी राजकारणाचा इतिहास उलगडून सांगणे मनोरंजक आहे. पण ते उत्कंठावर्धक मात्र अजिबात नाही. म्हणूनच त्यावर छोटेखानी पुस्तक होऊ शकेल काय, याची चाचपणी सध्या करतोय. मात्र निकालाविषयी माझ्या मनात तीळमात्र संदेह नाही. साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फ़डणवीस यांच्यावर मी ‘लंबी रेसका घोडा’ या शिर्षकाचा लेख लिहीला होता. आजही माझे मत कायम आहे.

13 comments:

 1. भाउ यावर पुस्तक प्रकाशित करा त्यातील विश्लेषन वाचायला आवडेल ..
  देवेंद्र एकला राजा ...

  ReplyDelete
 2. अतिशय योग्य विश्लेषण ।

  ReplyDelete
 3. भाऊ तो लेख वाचायचा होता. कुठ मिळेल?

  ReplyDelete
 4. भाऊ आपण मानता येवढे सोपी निवडणूक होईल असे वाटत नाही त्याची कारणे आशि आहेत की
  १)ncpची मराठा vote बँक पूर्ण विकुरलेली आहे त्यामुळे पवार उदयनराजे ना मुखमंत्री पदाचे उमेदवार पुढे करून परत मराठा मते मिळवतील आणि ते मनसे बरोबर युती करण्याचा प्लॅन मध्ये आहेत जर का असे झाले ते पश्चिम महाराष्ट्र, पुणे,मुंबई,ठाणे,कल्याण, नाशिक या पट्यातील जवळ जवळ १४० मतदार संघात फरक पडेल.(यामदे उदयनराजेंना पवार किती कंट्रोल करतील यावरही आवलाबून आहे, कारण याचात कालच भांडणे चालू झाली आहेत)
  २)जर का दुसरी vba आणि काँग्रेस यांची आघाडी झाली तर विदर्भ माडे खूप फरक पडेल.
  ३) वरील प्रमाणे जर आगदी झाली तर शिवसेना व बिजेपी का ही निवडणूक आवघड होऊन जाईल.
  ४) पण जर का ncp, काँग्रेस,यांची कीवा ncp, काँग्रेस,vba यांची किंवा एनसीपी, काँग्रेस,vbaआणि मनसे यांची एकत्रित आघाडी झाली तर शिवसेना, भाजप ला ही निवडणूक आतयंत सोपी जाईल यात मात्र शंका नाही.

  भाऊ हा अंदाज मी तुमचा पुन्हा मोदीच का या पुस्तकावरून काडलेला आहे

  ReplyDelete
 5. भाऊ पुस्तक लवकर लिहा.वाचायला खूप मजा येईल.

  ReplyDelete
 6. अगदी खरं भाऊ....
  शरद पवार आणि शिवसेना, दोघांना एकाच वेळी खेळवणारा धुरंधर....तेही बहुमत नसताना.

  ReplyDelete
 7. भाऊ, तुमचा मुंबई मिरर चा Interview कधी व कुठल्या माध्यमात प्रसारित झालेला आहे?

  ReplyDelete
 8. देवेंद्र म्हणजे देवांचा राजा !
  फडणवीस म्हणजे सर्वांचे हिशोब पाहणारा !
  देवेंद्र फडणवीस म्हणजे राजा प्रमाणे राहून सर्वांचे हिशोब चुकते करणारा !
  म्हणजेच भाउंच्या भाषेत " लंबी रेस का घोडा "

  ReplyDelete
 9. अतिशय सुंदर

  ReplyDelete
 10. भाऊ केवळ देवेंद्र फडणवीस नव्हे तर मोदी शहा यांनी निवडलेले बाकीचे इतरही मुख्यमंत्री उदा योगी, खट्टर, रघुवर दास,विजय रूपांनी हे सर्वच मुख्यमंत्री कार्यक्षम आहे त्या त्या राज्यात याचा प्रत्यय लोकसभेला आला आहे हाच फरक भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे, भाजपने राज्यातील या नेत्यांना शक्ती दिली आहे,तर काँग्रेसमध्ये कोणत्याही राज्यात नाव घेण्या सारखे नेतृत्व उरलेले नाही आणि त्यामुळेच काँग्रेसवर आजची ही वेळ ओढवली आहे.

  ReplyDelete