Sunday, June 30, 2019

इंदिराजींच्या आठवणी

Image result for indira gandhi elephant cartoon

राजकारणात किंवा कुठल्याही मोठ्या लढाईत तुम्ही पराभूत झालेले असलात, म्हणून संपलेले नसता. पहिली गोष्ट म्हणजे त्यातून सावरून पुन्हा आपल्या पायावर ठाम उभे रहाण्याला प्राधान्य असते. लढण्याची खुमखुमी दाखवण्याची ती वेळ नसते, तर पराभव स्विकारून नव्याने तयारीला लागण्यात शहाणपणा असतो. कारण् ज्याच्या समोर तुम्ही पराभूत झालेले असता, त्याचा विजय निर्विवाद असतो आणि तेव्हा असा विजेता आणखी जोशात असतो. त्यामुळेच त्याला तशा जोशात असताना आव्हान देण्य़ाने कपाळमोक्ष ओढवणे अपरिहार्य असते. त्यापेक्षा आपल्या जखमा भरून सावरण्याकडे लक्ष द्यायचे असते. सहाजिकच तुमची मरगळ बघून शत्रू वा प्रतिस्पर्धीही निश्चींत होतो. त्याचे दोन लाभ तुम्हाला होतात. तुम्हाला सावरासावर करायला उसंत मिळते आणि त्यात तुमचा शत्रू व्यत्ययही आणत नाही. पुढल्या काळात तुम्ही शत्रूच्या एका चुकीच्या खेळीची वा दुबळ्या बाजूची प्रतिक्षा करायची असते. संधी मिळताच त्यावर झडप घालायची असते. गेल्या आठवड्यात आणिबाणीच्या घोषणेला व कालखंडाला ४४ वर्षे पुर्ण झाली. तेव्हा त्यातून पराभूत झालेल्या इंदिराजी कशा सावरल्या त्याचे स्मरण झाले. आज त्यांचा नातूच गाळात रुतलेला इंदिराजींचा कॉग्रेस पक्ष सावरायला धडपडतो आहे. पण त्याला मात्र आजी आठवतही नाही, हे इंदिराजींचे खरे दुर्दैव म्हणावे लागेल. ४४ वर्षापुर्वीच्या त्या भयंकर दारूण् पराभवानंतर इंदिरा गांधी कशा राजकारणात पुन्हा उसळी मारून पुढे आल्या, तो एक राजकीय धडा आहे. फ़क्त राहुल गांधीच नव्हेतर सर्व भारतीय राजकारण्यांसाठी धडा आहे. इंदिराजींना तशी संधी मिळायला सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. पण राहुलना समोर असलेली संधीही बघता आलेली नाही. मग तिचा लाभ उठवण्याची गोष्टच दुर राहिली ना? बिहारचे बेलछी गाव आज किती लोकांना ठाऊक आहे? ते गाव कशामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले?

१९७६ च्या उत्तरार्धात इंदिराजींनी आणिबाणी शिथील करून देशात लोकसभेच्या निवडणूकांची घोषणा केली. तोपर्यंत माध्यमांवर निर्बंध होते. सरकार वा कॉग्रेस विरोधात अवाक्षर छापण्याची पत्रकारांची हिंमत नव्हती. पण निवडणूका लागल्या आणि असे तमाम निर्बंध शिथील झाले. तुरूंगात पडलेल्या बहुतांश विरोधकांना मुक्त करण्यात आले आणि सरकारच्या जुलमी सत्तेविरोधात गाजावाजा सुरू झाला. त्याची मोठी किंमत इंदिराजींनी १९७७ च्या आरंभी मोजली. त्यांचे बहूमत गेले आणि चार पक्षांचा विलय होऊन बनलेल्या जनता पक्षाने बहूमत मिळवत सत्ताही बळकावली. खुद्द इंदिराजी रायबरेलीत व त्यांचे सुपुत्र संजय गांधी अमेठीतून पराभूत झालेले होते. त्यावेळी पराभवावर भाष्य करण्याचेही साहस इंदिराजींपाशी उरलेले नव्हते आणि पराभवाला त्या निमूट सामोर्‍या गेल्या होत्या. पक्षातही त्यांच्या विरोधातले आवाज उठत होते आणि प्रतिकुल परिस्थितीशी सामना करण्याची संधी इंदिराजी शोधत होत्या. पण त्याची वाच्यता त्यांनी केली नाही, की वल्गना करून वादग्रस्त विधाने केली नाहीत. त्याच वर्षीच्या मध्यास बिहारमध्ये एक अशी घटना घडली, की राजकीय डाव सत्ताधारी जनता पक्षावर उलटून टाकण्याची क्षमता इंदिराजींना त्यात आढळली. आज ज्या बिहारमध्ये मेंदूज्वराने दोनशेच्या आसपास बालकांचा बळी गेला आहे, त्याच बिहारमधली ती घटना होती. जवळपास वर्षातला हाच कालखंड् होता. तेव्हा बेलछी नावाच्या गावात दलितांचे हत्याकांड घडलेले होते. जमिनदार गुंडांनी त्या मजुरी करणार्‍या वस्तीवर हल्ला चढवून जाळपोळ व कत्तल केलेली होती आणि तात्काळ इंदिराजींनी त्यात आपल्या पुनरुज्जीवनाची संधी ओळखली. त्यांनी सरकारला दोष देण्यापेक्षा बेलछीला भेट देण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तिथून जनता पक्षाचे दिवस भरत गेले. इंदिराजींच्या पुनरागमनालाचा मार्ग बेलछीतून प्रशस्त होत गेला होता.

तेव्हा कॉग्रेसची सुत्रे यशवंतराव चव्हाण व ब्रह्मानंद रेड्डी यांच्याकडे होती आणि अकस्मात इंदिराजींनी बेलछी प्रकरणात पुढाकार घेतला. ऑगस्ट महिन्याचा पुर्वार्ध होता आणि पावसाळा असल्याने बिहारमध्ये जाणेही पुर्वतयारीनिशी अवघड काम होते. पण इंदिराजींनी आपल्या विश्वासू सहकार्‍यांना घेऊन पाटणा गाठले. पाटणा नालंदा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या दुर्गम गावात जाण्याचे धाडस केले होते. धाडस इतक्यासाठी म्हणायचे, की तिथेपर्यंत जीपनेही जाणे अशक्यप्राय होते आणि चिखल तुडवित इंदिराजी गेल्या. त्यांच्या स्वागताला गावोगाव लोकांची झुंबड उडाली. एका जागी नदीला पुर आलेला होता. तर हत्ती मागवून त्यांनी नदी ओलांडली होती. त्याचा इतका गाजावाजा झाला, की इंदिराजी राजकीय प्रकाशझोतामध्ये आल्या. त्यांनी पंतप्रधान मोरारजी देसाई व जनता सरकारलाही मागे टाकून पिडीतांचे अश्रू पुसले होते आणि नंतर सरबराई करण्याला जनता सरकारला तोंड राहिले नव्हते. नव्या राज्यात दलित पिडीत पिछडे बेसहारा झाल्याचा गवगवा इतका सुरू झाला, की त्यातून इंदिराजींचा राजकीय पुनर्जन्म झाला होता. आणिबाणीतली जुलूमशाही वा अतिरेक लोक विसरून गेले होते आणि त्या घटनेवरून जनता पक्षात व सरकारमध्ये धुसफ़ुस सुरू झाली. सांगायचा मुद्दा इतकाच, की जनता सरकारला पहिल्या दिवसापासून इंदिराजींनी विरोध केला नाही की संसदीय अडथळेही आणले नाहीत. त्यांनी राजकारण रस्त्यावर उतरून केले आणि त्यात राजेशाही थाटाची अपेक्षाही केलेली नव्हती. स्वपक्षातील कोणावर दोषारोप केले नाहीत, की पदाची अपेक्षा बाळगली नाही. पदाशिवाय देखील त्याच सर्वोच्च नेत्या असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आणि जनता सरकारला घाम फ़ुटला होता. राजकारणात पराभूत मनोवृत्तीला जागा नसते. संधी दिसताच झडप घालण्याची चतुराई असावी लागते. सोनिया वा राहुल-प्रियंकांना ते कसब दाखवता आलेले आहे काय?

आजच्यापेक्षाही भयंकर नामुष्कीला इंदिराजींना सामोरे जावे लागले होते. पराभवानंतर आजही निदान कॉग्रेस पक्ष व श्रेष्ठी राहुल सोनियांच्या मागे ठाम उभे आहेत. पण इंदिराजी तेव्हा जवळपास एकट्या पडल्या होत्या. चव्हाणम, रेड्डी वा तत्सम तमाम ज्येष्ठ नेते श्रेष्ठी त्यांच्या बरोबर उभे रहायला तयार नव्हते. इंदिराजी निवडणूका जिंकून देऊ शकल्या नसल्याने पक्षालाही त्या बोजा वाटू लागल्या होत्या. तेव्हा त्यांनी मुठभर ज्येष्ठ वा श्रेष्ठींपेक्षा आपल्या मागे जनतेच्या सहानुभूतीला उभे करण्याची संधी शोधली व साधली होती. पराभवाच्या जखमा चाटत इंदिराजी बसल्या नव्हत्या, की सत्ताधारी जनता पक्षावर आळ घेण्यात त्यांनी धन्यता मानली नव्हती. आपल्याला पोषक अशी परिस्थिती निर्माण करणार्‍या घटनाक्रमाची प्रतिक्षा करतानाच त्यांनी सत्ताधारी जनता पक्षातले भेद ओळखून डावपेच खेळले. त्यांच्यात फ़ुट पाडली. त्यांना परस्परांशी झुंजायला भाग पाडून, आपल्या नेतृत्वाची देशाला व समाजाला गरज असल्याचे कृतीनेच सिद्ध केले. आज त्यांच्याकडून भाजपाचा पंतप्रधान चालना प्रेरणा घेतो आहे. विरोधी पक्षांचे कडबोळे देशाला नेतृत्व देऊ शकत नाही, की योग्य कारभार चालवू शकत नाही. अशा राज्यात जनता निराश्रितासारखी अनाथ होऊन जाते व अराजक उभे रहाते; याची जाणिव समाजात वाढण्याला इंदिराजी हातभार लावत गेल्या. त्याच्या परिणामी अवघ्या अडीच वर्षात त्या पुन्हा देशाच्या सार्वभौम नेता म्हणून पंतप्रधान झाल्या होत्या. त्यांच्यातला आत्मविश्वास हा सर्वात मोठा गुण होता, तितकाच संयम त्यांची मोठी ठेव होती. कालपरवा लोकसभेच्या पहिल्या दिवशीच कॉग्रेसनेता अधीरंजन चौधरी यांच्या वादग्रस्त विधानांतून त्यांना इंदिराजी ऐकूनही माहित नसल्याची प्रचिती आणून दिली. मागला महिनाभर पराभवाच्या जखमा चाटत बसलेल्या राहुल-प्रियंकांचा केविलवाणा खेळ् बघितला आणि इंदिराजींचे स्मरण झाले.

राजकारण हा अतिशय निष्ठूर क्रुर खेळ आहे. त्यात हळवेपणाला अजिबात स्थान नसते. इंदिराजी दलित पिछड्यांच्या न्यायासाठी कळवळून बेलछीला गेल्या नव्हत्या, की त्यांची गरीबांवरील अन्याय अत्याचारांनी झोप उडाली नव्हती. त्यांना त्या अन्याय अत्याचारात राजकीय संधी दिसली होती आणि त्यांनी साळसुदपणे संधीसाधूपणा केला होता. कुठलाही मुरब्बी राजकारणी तेच करतो. त्याचा कळवळा किंवा भावनाविवशता देखावाच असतो. त्याला इंदिराजी अपवाद नव्हत्या की नरेंद्र मोदीही अपवाद असणार नाहीत. पण जे अशा नेत्यांच्या नकला करतात, त्यांना यातले इंगित मात्र उलगडलेले नाही. राहुल गांधी आठ वर्षापुर्वी विदर्भातील आत्महत्या केलेल्या एका  शेतकर्‍याच्या घरी पोहोचले आणि नंतर त्यांनी त्याच्या विधवा पत्नी कलावतीच्या दुर्दशेचे वर्णन लोकसभेत बोलताना केलेले होते. पुढेही त्यांनी असे अनेक तमाशे केले, पण त्यांना आजीप्रमाणे संधी शोधता आली नाही, की साधता आली नाही. तितकी बुद्धी असती, तर गेले दोन आठवडे जे राजकीय रणकंदन माजलेले आहे, त्यातली संधी त्यांना दिसू शकली असती आणि लोकसभेत मोदींवर दुगाण्या झाडण्यापेक्षा त्यांच्यासह कॉग्रेसने बिहारमध्ये धाव घेतली असती. आपल्या आजीने बेचाळीस वर्षापुर्वी बिहारच्या बेलछी गावात जाऊन अवघ्या प्रतिकुल राजकारणाला कशी कलाटणी दिली, त्याचा अभ्यास राहुलनी केला असता. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बचावात्मक पवित्र्यात आणायची संधी साधली असती. कारण आज बिहारचा मुझफ़्फ़रपूर जिल्हा व आसपासचा परिसर बालकांच्या मृत्यूकांडाने धुमसतो आहे. त्या असंतोषाच्या आगीत तेल ओतण्याचे काम माध्यमे करीत आहेत. पण त्या आगीवर आपली पोळी भाजून घेण्याचीही इच्छा विरोधी पक्षात दिसत नाही, याचे नवल वाटते. कारण दोन आठवडे उलटून गेले तरी राहुल वा तेजस्वी यादव असा कोणी तिकडे फ़िरकलेलाही नाही.

बालकांचे रोगबाधेने मृत्य़ू ही अतिशय दु:खद घटना आहे. त्याचे राजकारण करायचे नाही, असे सभ्य भाषेत बोलले जाणारच. तो राजकीय देखावा असतो. म्हणून राजकारण तितके सोवळे कधीच नसते आणि असणारही नाही. इंदिराजींनी बेलछीला भेट दिल्यानंतर तिथल्या किंवा एकूण बिहारच्या सार्वजनिक जीवनात कुठला न्याय येऊ शकला? आज बेचाळीस वर्षानंतरही तिथे साध्या साथीच्या कुठल्या आजाराने बालकांना मृत्यूच्या तोंडी बळी देण्यापेक्षा पालकांना अन्य कुठला पर्याय नाही. मग इंदिराजींच्या त्या धाडसाने काय साध्य केले? त्यानंतरही अनेक घटना घडलेल्या आहेत. आठ महिन्यापुर्वी शेतकरी आत्महत्या व कर्जमाफ़ीचा तमाशा करून कॉग्रेसनेही तीन राज्यातील सत्ता मिळवली. म्हणून आत्महत्या संपलेल्या नाहीत ना? कालपरवाच राजस्थानच्या बिकानेर भागातल्या एका शेतकर्‍याने कर्जमाफ़ी मिळू शकली नाही म्हणून आत्महत्या करीत असल्याचे मोबईलवर् चित्रीत करून इहलोकाचा निरोप घेतला. म्हणून बाकी कॉग्रेसवाल्यांनी लोकसभेत त्याच विषयाचे भांडवल मोदींना जाब विचारण्यासाठी करायचे थांबवले आहे काय? जो प्रश्न मध्यप्रदेश राजस्थानात भाजपावाले कॉग्रेसला विचारतात, तोच प्रश्न लोकसभेत वा महाराष्ट्रात कॉग्रेसचे एकाहून एक ज्येष्ठ नेते प्रवक्ते भाजपाला विचारत असतात ना? तर मुद्दा इतकाच, की राजकारण भयंकर कठोर व निर्दय असते. त्यात मृतांच्या पिडीतांच्या वेदनेचे राजकीय भांडवल करण्याला चतुराई वा मुरब्बीपणा मानले जाते. जितकी त्यातली चतुराई अधिक तितका नेता अधिक ‘जाणता’ मानला जातो. इंदिराजी त्यात वाकबगार होत्या आणि त्याच गुणवत्तेमुळे दिर्घकाळ नेहरूंचे वारस देशावर अविरत राज्य करू शकले. राहुल प्रियंकापाशी त्याचा मागमूस नसेल तर त्यांनी राजकारणात जिंकण्याची अपेक्षाही करू नये. आजीचे नाव तर त्याहूनही घेण्याचे कारण नाही.

राजकारण म्हणजे पिडल्या गांजल्या लोकांच्या अपेक्षा आकांक्षांवर स्वार होण्याची चतुराई असते. त्यातून लोकांचे प्रश्न सुटतात किंवा समस्या संपुष्टात येतात, असेही नाही. पण लोकांना किमान तशी आशा वाटते आणि लोक ती आशा दाखवणार्‍याच्या मागे धावत सुटतात. स्वप्ने दाखवणारा लोकांना आवडतो. पण् स्वप्नांची पुर्तता होण्याची शक्यता नसते. तरीही निदान अशी स्वप्ने दाखवणारा आणि त्यातले आकर्षंण कायम राखणारा नेता लोकांना हवा असतो. निराश व नैराश्याला भांडवल करून कोणी सत्ता मिळवू शकत नाही. राजकीय नेते स्वप्नांचे सौदागर असतात आणि त्यांना खोटे पाडून कोणी आपले दुकान चालवू शकत नाही. पण त्यापेक्षा सुंदर स्वप्न दाखवून किंवा स्वप्नपुर्तीची शक्यता रंगवून यशस्वी होणे शक्य असते. आयडिया ऑफ़ इंडिया नावाचे भ्रामक स्वप्न नेहरूंनी ज्या पिढीसमोर रंगवले, त्यातून बुद्धीमंत झालेल्या वर्गाला अजून त्या भ्रमातून बाहेर पडणे शक्य झालेले नाही. तर सामान्य बुद्धीच्या लोकांचे स्वप्न किती किरकोळ व शक्यतेच्या टप्प्यातील असेल ना? लोक त्याच्यामागे धावत असतात. शंभर अपेक्षांतील एकदोन किरकोळ गरजा भागल्या, तरी लोक समाधानी असतात. त्यांच्या समाधानावर काही मुठभर लोक महत्वाकांक्षांचे महाल उभे करतात, त्याला समाजातील बुद्धीमान किंवा उच्चभ्रू वर्ग मानले जाते. ज्या नेत्याला अशा दोन्ही वर्गाला खेळवता येते, त्यालाच त्या समाज वा देशावर सत्ता राबवता येत असते. त्याचप्रमाणे तशाच कुवतीच्या माणसाला अशा लोकप्रिय नेत्याला आव्हान उभे करता येते. नेता स्वप्नाळू असून चालत नाही. तो व्यवहारी आणि जनता स्वप्नाळू असावी लागते. इंदिराजी व्यवहारी होत्या आणि नातू मात्र स्वप्नाळू आहे. म्हणूनच त्याला आजीच्या नावाने मते हवी आहेत, पण आजीला समजलेला व्यवहार मात्र राहुलना अजून उमजलेला नाही. मोदींना मात्र इंदिराजी नेमक्या समजलेल्या आहेत.

13 comments:

  1. मला आठवतय त्याप्रमाणे राजनारायण, चरणसिंग व मोरारजींनी इंदिराजींना अनावश्यक प्रसिध्दी मिळवून दिली असा एकही दिवस गेला नाही की वृत्तपत्रांत त्यांची बातमी नाही. त्यामुळे सत्ताधार्यापेक्षा इंदिराजीच जास्त चर्चेत राहिल्या.

    ReplyDelete
  2. सुशीलकुमार शिंदेंना अध्यक्ष केलं यामागे विधानसभा निवडणुका असतील का?

    ReplyDelete
  3. YOUR ARTICLE COPIED BY CONGRESS MP & JOURNALIST KUMAR KETKAR WHICH PUBLISHED IN theprint,in on 01 st July 2019

    ReplyDelete
  4. "नेता स्वप्नाळू असून चालत नाही. तो व्यवहारी आणि जनता स्वप्नाळू असावी लागते."

    Aprateem ... agadi chapkhal !!!

    ReplyDelete
  5. राजकारणाचे खरेखुरे विश्लेषण.राजकारण खरोखरच भावनाशुन्य असत. तापत्या तव्यावर जो स्वतःची पोळी भाजून घेईल व त्याला समाजसेवेचा मुलामा चढवेल तोच खरा राजकारणी. बाकी सर्व सारखेच.

    ReplyDelete
  6. उत्तम! या ब्लॉग ला सिंहासन सिनेमाची किनार आहे.

    ReplyDelete
  7. tumche lekh vachun kadhi kadhi bhiti vatate ki janateche khare prashna kadhi sutnarach nahit ka? te sutle tar bhandwalach sampel mhanun congress kay kinwa modi kay sagle aplyala ase varyavarach sodtil ka? lokanni modinvar khup jasti vishwas dakhavla karan tyanna modinkadun khup jasti apeksha ahet. mag modi pan lokanchya vyathancha bajar mandun swatahacha faydach tyat shodhtil ka? asech jar chalu rahile tar deshache kay? aapli kharokharichi pragati hoil ki nahi???
    khup prashna ubhe rahtat manat.. tyanna suddha uttare dya bhau.. tumchya nazarela kase diste bhavishyatalya bheratache chitra????

    ReplyDelete
  8. मोदीही 370 व 35 ए काढून टाकायचे स्वप्न हिंदूत्ववाद्यांना दाखवतात. साध्या परिसिमनाचा आदेशही काढत नाहीत.

    ReplyDelete
  9. भाऊ, या लेखात एक चूक झाली आहे. इंदिराजींचे सुपुत्र संजय सिंग असे लिहिले आहे. त्यांचे सुपुत्र संजय गांधी होते. संजय सिंग हे अमेठीचे राजे होते व आहेत. ते वेगळे.
    नेता व्यवहारी असावा लागतो आणि जनता स्वप्नाळू असावी लागते. हे अगदी खरे.

    ReplyDelete
  10. नेहमीप्रमाणे अप्रतिम, ऊद्बोधक!

    ReplyDelete
  11. Bhau, tumche aikale bareka? ajichya pavalavar paul takun priyanka sonbhadrala geli ani punha ekda tiche godve gayla suruvat jhali

    ReplyDelete