ताज्या लोकसभेतील आपल्या प्रचंड विजयामुळे मोदी वा भाजपा जितके फ़ुशारून जायला हवेत, त्यापेक्षा विरोधी पक्षच अधिक गांगरून गेलेले आहेत. त्यांच्यापेक्षाही थेट राजकारणात नसलेले छुपे पुरोगामी गडबडले आहेत. अशा विरोधी नेते व तथाकथित पुरोगामी अभ्यासकांच्या वैफ़ल्य आणि नैराश्याकडे बघून कींव येते. जणु यापुर्वी कोणा पक्षाला वा नेत्याला लोकसभेत ३०० हून अधिक जागा मिळालेल्याच नव्हत्या; असे आजच्या तरूण पिढीला वाटू शकते. पण पंडित नेहरू वा इंदिराजींनी दोनपेक्षा अधिक प्रसंगी त्यापेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या आणि एकाच पक्षाच्या बळावर मिळवल्या होत्या. पण तेव्हाचे विरोधी नेते किंवा राजकीय विचारवंतही आजच्या इतके गर्भगळित होऊन बोलत नव्हते. कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास होता आणि मतदारावरही विश्वास होता. दुर्दैवाने आजचे विरोधी नेते किंवा अभ्यासक, खुपच खुजे व बुटके आहेत. त्यामुळेच त्यांना जगबुडी आल्यासारखे वाटते आहे. म्हणून मग सध्या चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अलिकडला इतिहास आठवतो. जेव्हा लोक मोदींना पर्याय कोण, किंवा भाजपाला हरवणार कोण; असा प्रश्न विचारतात तेव्हा बारा वर्षापुर्वीच्या वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेची आठवण होतेच. तेव्हा राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा प्राथमिक फ़ेरीतच बोर्या वाजला होता. पाकिस्तानही तसाच बाद झाला होता. दोन्ही शेजारी व जुने विश्वचषक विजेते पहिल्या फ़ेरीतच स्पर्धेतून बाहेर फ़ेकले गेले होते. तेव्हा भारतीय क्रिकेटशौकीन व जाणकारही गडबडून गेले होते. आता भारतीय क्रिकेटला भविष्य नाही, अशीच भाषा चालली होती. पण त्यातूनच महेंद्रसिंग धोनी नावाचा तारा क्षितीजावर उगवला होता ना? त्याच स्पर्धेत संपलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ़्रिकेत भरलेल्या नव्या २०-२० स्पर्चेत जगज्जेता बनवून धोनीने केलेला पराक्रम आपण विसरून गेलो काय?
आजही इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा चालू आहे आणि त्यात धोनी खेळतो आहे. जुना झालाय आणि कदाचित या स्पर्धेनंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. पण तेव्हा बारा वर्षापुर्वी धोनी नवखा होता. विश्वचषक स्पर्धेत दिग्गजांचा भारतीय संघ पराभूत होऊन आलेला असताना, क्रिकेट मंडळाने या नव्या २०-२० स्पर्चेसाठी थेट नवा प्रयोग म्हणून अगदी नवख्या खेळाडूंचा संघ उभा केलेला होता. त्यात सचिन, द्रविड, कुंबळे वा गांगुलीसारखे कोणी नामवंत नव्हते. धोनी तर प्रथमच कर्णधार म्हणून उभा राहिला होता. अनेक नवे चेहरे त्या संघात दाखल झाले होते आणि कसलीही अपेक्षा नसताना त्यांनी ती स्पर्धा जिंकून जगाला थक्क केलेले होते. नव्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये नव्या कर्णधाराने चमत्कार घडवला होता. विराट कोहली त्यातूनच पुढे आला आणि रोहित शर्मापासून अनेक नवे चेहरे त्याच स्पर्धेने भारताला दिले. तितका पराक्रम करूनही नंतरच्या मालिका व खेळात धोनी कर्णधार नव्हता. हळुहळू त्याच्याकडे एक एक प्रकारच्या क्रिकेटचे नेतृत्व येत गेले. त्यानेही आपली सर्व बुद्धी व कौशल्य पणाला लावून नवा संघ उभा केला. आज त्याचेच गोडवे आपण गातो ना? वेस्ट इंडिजमधला दारूण लज्जास्पद पराभव पचवल्यानंतर २०११ साली भारतातच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत धोनीने दुसर्यांदा भारताला अजिंक्य ठरवून दाखवले ना? नवेपणाची तीच किमया असते. जुन्यामध्ये अडकून पडलेल्यांना त्याची मजा समजू शकत नाही, की नव्याला सामोरे जाण्याचे धाडस त्यांच्यामध्ये असत नाही. ही़च आजच्या भारतीय राजकारणातल्या मुरब्बी लोकांची शोकांतिका झाली आहे. त्यांना भविष्यात डोकावुन बघायचीच भिती वाटते आहे. म्हणूनच २०१२ पर्यंत गुजरातचा मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींचा हा अवतार त्यांना तेव्हा बघता आला नाही, की आज त्यांना मोदींनाही पर्याय असतो आणि तो योग्यवेळी समोर येईल, अशी कल्पनाही सुचत नाही.
२००९ सालात दुसर्यांदा मनमोहन सिंग पंतप्रधान झाले, किंवा युपीएला सत्ता मिळाली, तेव्हा सोनियांच्या नेतृत्वाला पर्याय असू शकेल, अशी कोणाला कल्पना होती? अगदी भाजपातही कोणी आशावादी नव्हता आणि इतर पक्षातला कोणी कल्पनाही करू शकत नव्हता. वर्षभर आधी अणुकराराला विरोध करून मनमोहन सरकार पाडू बघणार्या डाव्या खुळचटांनी तेव्हा मायावतींनाही भावी पंतप्रधान म्हणून स्विकारण्याची तयारी केलेली होती. पण वर्षभरातच त्यांची बंगालमधली सद्दी संपली आणि ममता नावाचा नवा चेहरा तिथल्या राजकीय क्षितीजावर उगवला होता. त्या अर्धवट यशाने कॉग्रेस इतकी फ़ुशारली होती, की त्याची नशा अनेक कॉग्रेस नेत्यांना अजून २०१९ सालातही झटकून टाकता आलेली नाही. देशातल्या विरोधकांना निराशेने इतके ग्रासलेले होते, की हक्काचे बहूमत नसतानाही सोनिया व राहुल गांधी कसलीही मनमानी राजरोस करीत होते. भ्रष्टाचार घोटाळ्यांचे पेव फ़ुटलेले होते. पण कोणी आंदोलन करायला पुढे आला नव्हता. अण्णा हजारे वा बाबा रामदेव या त्रयस्थ लोकांना भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवावा लागत होता. तेव्हाही नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मर्यादित होते आणि तेच युपीएला सत्ताभ्रष्ट करू शकतील, असे कोणाला वाटलेले नव्हते. म्हणूनच २०१२ नंतर मोदी मैदानात आले, तेव्हा बहुतांश राजकीय पक्ष व अभ्यासकांनी त्यांची टवाळी केलेली होती. ती मोदींची टवाळी नव्हती, तर अशा निराश, वैफ़ल्यग्रस्त नाकर्त्यांचे रडगाणे होते. तेव्हा सोनियांच्या अपुर्ण यशाने ज्यांचे डोळे दिपले, त्यांना आज मोदींचे यश अपुर्व वाटले तर नवल नाही. पण म्हणून मोदींचे यश अभूतपुर्व नाही, किंवा अजरामर देखील नाही. पर्याय येतच असतो आणि मोदीं-शहांच्या लोकसभेतील यशाला आव्हान देणारा पर्याय समोर येणारच. ती काळाची गरज असते आणि अपरिहार्य घटनाक्रम असतो.
कुठलाही नेता किंवा सम्राट अमरपट्टा घेऊन आलेला नाही. ज्याच्यापाशी हिंमत असते आणि इतिहासाला आव्हान देण्याची आकांक्षा असते, असा कोणीही नेता म्हणून पुढे येत असतो. तो आजही आपल्याच आसपास कुठेतरी वावरत असतो आणि आपल्यालाही त्याचा चेहरा माहिती असतो. पण त्याची कुवत आपल्याला किंवा बहुधा त्यालाही आज माहिती नसते. परिस्थिती त्याला समोर घेऊन येते आणि तेव्हा त्याच्यातल्या गुणवत्तेला आव्हाने बाहेर आणून सिंहासनावर बसवित असतात. त्यामुळे मोदींचे आजचे यश, हा कालौघातील एक टप्पा आहे. तिथे येऊन जग थांबलेले नाही की थांबणार नाही. जोपर्यंत मोदी जनतेला विश्वासात घेऊन काम करतील व कारभार हाकतील, तोपर्यंत त्यांच्या सिंहासनाला धोका नसतो. जेव्हा त्या विश्वासाला तडे जातील, किंवा पर्याय शोधण्याची परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा आपल्याला त्या पर्यायाचा चेहरा दिसू लागेल. वेस्ट इंडीजमध्ये दारूण पराभव झाला, तेव्हाही धोनी भारतीय संघात होता. पण त्याचे नेतृत्वगुण आपल्याला कुठे बघता आलेले होते? कोणाला दिसलेले होते? आज मोदींच्या नेत्रदिपक यशाच्या झगमगाटामध्ये अशा भविष्यातील नेत्याचा चेहरा आपण आताच कसा बघू शकणार आहोत? म्हणून असा नेताच नाही वा तो पैदा होणार नाही, असल्या भ्रमातही जगण्याचे काही कारण नाही. तो भाजपातला असेल किंवा अन्य कुठल्याही पक्षातला असू शकतो. निराशाग्रस्त लोकांना तशी अपेक्षा करता येत नाही. पराभूत मानसिकतेने जखडलेल्यांच्या मनातही तसा विचार येत नाही. म्हणून ती वस्तुस्थिती नसते आणि म्हणूनच निराशेचे कारण नाही. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना किंवा दंगलीचे आरोप बदनामी सहन करताना; मोदींनी कुठे पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगली होती? हातातले काम व अंगावर पडलेली जबाबदारी पार पाडताना माणूस इथवर पोहोचला ना? टिंगल टवाळी करणारे होते तिथेच आहेत. पराभूतांनी, संकटात घेरलेल्यांनी, म्हणूनच निराश व्हायचे कारण नसते. पोषक परिस्थिती येण्याची प्रतिक्षा करता आली पाहिजे.
भाऊ,
ReplyDeleteमोदीं हा वेगळाच कर्णधार आहे,
त्यांनी नंतरचे कर्णधार किंवा आपल्याला पर्याय आधीच बनवून ठेवलेत, फक्त दाखवलेले नाहीत.
या पाच वर्षात ते ज्या योजना राबवतील व (अल्पसंख्यांक) जनता त्याला कसा प्रतिसाद देतील त्यावर कर्णधार ठरेल
जर काही समाज सर्व समावेशक झाला तर भावी पंतप्रधान म्हणून देवेंन्द्र साहेब पुढे येतील, थोडा आगाऊपणा करतील तर अमीत साहेब असतील,
जास्तीचा फडफडाट करतील तर योगी साहेब आहेतच
OPPONENT च्या STRATEGY वर कर्णधार मिळेल
मोदीं जनतेला वेगवेगळे पर्याय देतील
लगे रहो मुन्नाभाई प्रमाणे
यह WALLET है,
यह BULLET है,
तु CHOOSE कर।
खूपच छान प्रतिक्रिया
Deleteअगदी बरोबर. देवेंद्र फडणवीस हे नक्कीच भावी पंतप्रधान म्हणून राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतात. तसेच सांगितल्याप्रमाणे अमित शहा आणि योगी आदित्यनाथ हे पर्याय आहेतच.
Deleteअग्दी बरोबर।
Deleteखरय भाउ. २०१२ पर्यंत कुणालाही वाटत नव्हत की मोदी पर्याय असताील म्हनुन.मिडीयातल्या काॅंगरेसी लोकांनी तर राहुलला पंतप्रधान म्हनुन मानलच होत.तेव्हा पेपरात टिम राहुल म्हनुन खुप लेख यायचे.ते आठवुन आता वाटत हे कस झाल? लेख लिहीनारे तर अजुन सावरु शकले नसनार
ReplyDeleteश्री. मोदींनी आपला वारस म्हणून श्री. अमित शहा यांना पुढे करायचे आज तरी ठरवलेले दिसतेय. अर्थात पुढे काय होणार ते काळच ठरवेल. पण आपण म्हणता त्या प्रमाणे विरोधक सध्या तरी गोंधळलेले आहेतच !
ReplyDelete" कालाय तस्मै नमः । ".....
त तो पर्याय दिसतोय त्याने गुणवत्ता सिद्ध पण केलीय.अमित शहांना सगळ्या कॅबिनेट कमीटीत घेवुन व गृह खाते खर तर उपपंतप्रधानाचाच दर्जा दिलाय.त्यांचे सरकारमधील वजन वाढतच जाणार आहे.राहुलने १० वर्ष सत्ता असताना कोणताही जबाबदारी घेतली नव्हती.पण मोदी शहांना तयार करताहेत.अध्यक्ष असताना ५ वर्ष कुठेही परदेशात न जाता संपुर्ण भारत फिरुन स्वताःला देशात ओळखीच करुन दिल व देश समजुन घेतला.
ReplyDeleteभाऊ,
ReplyDelete2013 साली कॉंग्रेस थिंक टँक ने छान योजना आखली. अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्या आंदोलनाला हवा देण्याचे काम कॉंग्रेस उपक्रुत मिडिया करत होती.
पाठीशी चिरंजीवी आणि राज ठाकरे अनुभव होते. सत्ताविरोधी मतांसाठी प्रेशर कुकर शिट्टी तयार करून विरोधी मतांचे विभाजन करणे हा मास्टर प्लॅन होता. सारंकाही संहितेप्रमाणे घडत होते पण मध्येच मोदी नावाचा फँक्टर आला आणि सगळी गणिते बिघडली. अन्यथा कॉंग्रेस पुन्हा सत्तेत येणे स्क्रिप्टेड होते.
खरच पटल सगळे म्हणायचे नेहरू , गावस्कर , तेंडुलकर नंतर कोण पण पर्याय हा असतोच फक्त तो असा दिसत नाही एवढेच.
ReplyDeleteभाऊ ...........सोनिया गांधी कोठल्या अधिकाराने चीनच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटतात हे लक्षात येत नाही. हे सर्व संशयास्पदच वाटते. सोनिया गांधी ' विरोधी पक्षनेता ' ही नाहीत.
ReplyDeleteBhau, eye-opener aahe virodhakansathi.
ReplyDeleteKhote waganare pratiksha karu shakat nahi.
ReplyDeleteमला वाटते की अजून कॉंग्रेसची आपण विरोधक आहोत हे मानायची तयारी नाही. कॉंग्रेस सध्या (तुम्ही मागे वर्णन केलेले आणि भाऊ पाध्ये यांनी सांगितलेल्या) नॉनमॅट्रिक अवस्थेत आहे.
ReplyDeleteमला काही वेळा वाटते कि मोदी-शहा हळू हळू काँग्रेस आणि शक्य तितक्या प्रादेशिक पक्षांना संपवून मग ती पोकळी भरण्यासाठी भाजपमध्येच काही जणांना फोडून नवा विरोधी पक्ष तयार करतील.. म्हणायला ते भाजपच्या विरोधात उभे राहिले तरी आतून ते संघ विचारांचे आणि हिंदुत्ववादीच असतील. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे कमी-अधिक फरकाने एकाच विचारधारेचे असतील.. आणि बेगडी धर्मनिरपेक्षतावादापेक्षा ते सरकारने केलेल्या कामावरून निवडणूक लढवतील.. बेगडी धर्मनिरपेक्षतावादाचे भूत आपल्या मानगुटीवरून उतरवायचे असेल आणि हिंदू राष्ट्रवादाचे मूळ धरायचे असेल तर ते होणे आवश्यक आहे.. आणि भाजप आणि संघाला तिथे पोचायचे असेल तर समविचारी सत्ताधारी आणि विरोधी असले पाहिजेत म्हणजे त्या विचारधारेला बळ देणारे कायदे संमत होताना लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी आडकाठी होणार नाही.
ReplyDeleteमोदींचे आत्तापर्यंतचे राजकारण पाहिले तर ते संपवतातच मग ते विरोधी पक्ष असो कि विरोधी विचार..