Sunday, June 23, 2019

लाथोके भूत बातोसे नही मानते

(वैचारिक अश्लिलता - भाग दुसरा)

Image result for donald imus


कालपरवा एबीपी माझा वाहिनीने सावरकर अवमानाविषयी दिलगिरी व्यक्त केल्यावर त्या कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍या एन्कर प्रसन्ना जोशी व संपादक राजीव खांडेकर यांच्या हाकालपट्टीची मागणीही काही लोकांनी लावून धरली आहे. असे काही झाले, मग अविष्कार स्वातंत्र्यावर गदा आल्याचा गदारोळ आपल्याकडे नेहमी होत असतो. पण जगात असे प्रथमच घडलेले नाही. माध्यमे किंवा पत्रकारिता हा धंदा झाल्यापासून अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि अशीच नाटकेही रंगलेली आहेत. अन्यथा कुबेरांनी अग्रलेख मागे घेऊन क्षमायाचना केली नसती, की एबीपीने दिलगिरीचे नाटक रंगवले नसते. पण सुदैवाने त्यांच्या विरोधात सोशल मीडियात छेडल्या गेलेल्या मोहिमेचा फ़ारसा गाजावाजा झाला नाही. याचे खरे तर नवल वाटते. त्यामुळेच दहाबारा वर्षापुर्वीचा असाच अमेरिकेतला एक किस्सा आठवला. तिथेही असेच प्रकरण घडले आणि अविष्कार स्वातंत्र्याचा डंका पिटला गेला होता. पण आर्थिक नाड्या आवळल्या जाताच, एकामागून एक स्वातंत्र्यसैनिक पत्रकारांनी शेपूट घातली होती. जॉन डोनाल्ड आयमस हे नाव आपल्यापैकी कितीजणांनी ऐकले आहे? त्याच्यावर अशीच पाळी आलेली होती. पण त्यात कोणी मोहिम चालविली नव्हती. तर ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांनीच फ़क्त एक ठाम भूमिका घेतली आणि आयमससहीत अमेरिकेतील एका मोठ्या माध्यम नेटवर्कला शेपूट घालण्याची वेळ आलेली होती. चार दिवस स्वातंत्र्याचा चाललेला तमाशा दोन तासात गुंडाळून तमाम स्वातंत्रसैनिक फ़रारी झालेले होते. खुद्द आयमसनेही शरणागती पत्करून संबंधितांनी बिनशर्त माफ़ी मागितली होती. बहुधा २००७ च्या मध्याची घटना आहे आणि त्यानंतर लोकप्रिय समालोचक असूनही आयमसचे सर्व रेडिओ आणि नेटवर्क कार्यक्रम बंद करण्यात आलेले होते. त्यामुळे इथे एबीपी माझावर आलेला प्रसंग तसा नवा किंवा अपुर्व नक्कीच नाही.

कुठल्याशा बास्केटबॉल स्पर्धेत एका विद्यापीठाच्या महिला संघाने अजिंक्यपद संपादन केलेले होते. त्या सामन्याचे समालोचन करताना आयमसची जीभ घसरली होती. सदरहू महिला संघामध्ये बहुतांश कृष्णवर्णिय मुलीचा समावेश होता आणि त्यांच्या खेळाविषयी भाष्य करताना आयमसने वांशिक हेटाळणी करणार्‍या शब्दांचा वापर केला होता. सहाजिकच त्या मुली व एकूणच त्यांचे अनुयायी दुखावले होते. सदरहू विद्यापीठ व त्यांच्या चहात्यांनी मग आयमसच्या विरोधात झोड उठवली आणि ह्या वांशिक भेदभावावर जोरदार टिका सुरू झाली. पण् टिका करणारे पत्रकारही आयमसला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचा बचाव मांडत राहिले होते. त्याच्यावर कारवाई व्हावी किंवा त्याने बिनशर्त माफ़ी मागावी, असे कोणी बोलायला राजी नव्हता. एका बाजूला त्याचे शब्द आक्षेपार्ह ठरवूनही अविष्कार स्वातंत्र्याचा डंकाही पिटला जात होता. असे तब्बल दोनतीन दिवस उलटले आणि तोपर्यंत त्याचा कार्यक्रम प्रसारीत करणार्‍या एकूण नेटवर्क कंपनीनेही त्याच्या अधिकाराचा बचाव मांडला होता. किमान पन्नससाठ रेडीओ स्टेशनवर त्याचा लोकप्रिय कार्यक्रम एकाच वेळी प्रसारीत व्हायचा, इतका तो लोकप्रिय समालोचक होता. सहाजिकच प्रक्षेपण करणारे नेटवर्क त्याला बाजूला करायला राजी नव्हते. त्यामुळे मीडिया स्वत:च हाऊन काही कारवाई करील, ही अपेक्षा फ़ोल ठरली होती. तेव्हा त्या अजिंक्यपद संपादन करणार्‍या महिला संघाच्या प्रशिक्षकाने पुढाकार घेऊन एक पत्रकार परिषद घेतली. त्यात् त्यांनी फ़क्त आपली भूमिका जाहिर केली. आयमसचा निषेध म्हणून आपण त्याच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणार्‍या कुठल्याही नेटवर्कला जाहिराती देणार्‍या कंपनीचे प्रायोजन घेणार नाही, अशी ती भूमिका होती. ती भूमिका जहिर झाली आणि अवघ्या दोन तासात चमत्कार घडायला सुरूवात झालेली होती. काय झाले असेल?

त्या अजिंक्यपद संपादन करणार्‍या संघाला विराट कोहली वा भारतीय क्रिकेटसारखी लोकप्रियता लाभलेली होती आणि त्यांना आपापला ब्रान्ड अंबॅसेडर बनवायला अनेक मोठ्या कंपन्या उत्सुक होत्या. पण त्यांनीच अशी अट घातल्यावर कंपन्यांची तारांबळ उडाली. तात्काळ अशा चार कंपन्यांनी आयमसचे प्रक्षेपण करणार्‍या नेटवर्कला आपण जाहिराती मागे घेत असल्याचे कळवले. पुढल्या दोन तासात त्या नेटवर्कने आयमसचे तमाम कार्यक्रम दोन आठवड्यासाठी रद्द केल्याची घोषणा करून टाकली होती. त्यानंतर विनविलंब आयमसच्या अविष्कार स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन नाचणार्‍यांची बोलती बंद झाली आणि एकामागून एक स्वातंत्रसैनिक गाशा गुंडाळूना बिळामध्ये दडी मारून बसले. खुद्द आयमसने त्या संघातील मुलींची भेट घेऊन आपली बाजू मांडली आणि न्यु जर्सीच्या महिला गव्हर्नरने त्यासाठी मध्यस्थी केलेली होती. पण मुद्दा काय आहे? तथाकथित अविष्कार स्वातंत्र्य व कोणालाही हिणवणे दुखावण्याचे स्वातंत्र्य खरे नाही, किंवा अनिर्बंध नाही. त्याला कुठला कायदा रोखत नसला तरी जाहिरातदार किंवा गुंतवणूकदार त्याच स्वातंत्र्याचा राजरोस गळा घोटू शकत असतो. ज्या मुलींचा मॉडेल म्हणून त्या कंपन्यांना वापर करायचा होता, त्या कंपन्यांचा आवाज व अधिकार कायद्यापेक्षाही मोठा असतो आणि निर्णायक असतो्. इथे एबीपी वाहिनीला सावरकर किंवा अन्य कुणाची महत्ता पटलेली नाही, किंवा वाटलेली नाही. त्यांना जाहिरातदार हे दैवत असते आणि सगळ्या निष्ठा त्या गुंतवणूक व जाहिरात उत्पन्नात गुंतलेल्या असतात. सगळी मस्ती जाहिरातीच्या उत्पन्नात असते आणि जाहिरातदारालाही वाकवू शकणारा एक प्रभावशाली वर्ग समाजात असतो. किंबहूना आजच्या बाजारू अर्थव्यवस्थेमध्ये अशा घटकाच्या हाती अधिक शक्ती एकवटलेली आहे. त्या वर्गाला किंवा घटकाला ग्राहक म्हणतात. त्या ग्राहकाने हत्यार उपसले, मग कोणाची बिशाद नसते.

आज सोशल मीडियातून ही मोहिम सावरकरप्रेमी लोकांनी चालविली, त्याचा दुहेरी परिणाम झाला. त्यापैकी अनेकांनी एबीपी वाहिनीलाच बहिष्कृत करून टाकले आणि मग त्याचा परिणाम जाहिरातीवर झालेला आहे. एकदोन जाहिरातदारांनी स्वेच्छेने त्यांना जाहिराती नाकारल्या असतील. पण लोकप्रियता कमी झाल्यावर इतर मालाच्या जाहिरातीही घटतात. त्यामुळेही नाड्या आवळल्या जातात. त्या जाहिरातदारांना बहिष्काराचे आवाहन करणे, ही त्या दुधारी हत्याराची एक बाजू आहे. त्यापेक्षाही अधिक भेदक अशी धार त्यांच्या मालाच्या खपावर विपरीत परिणाम होण्याचे असू शकते. आपल्या भावना दुखावणार्‍या गोष्टी वा चर्चा घडवणार्‍या माध्यमांना धडा शिकवण्याचा तो अधिक प्रभावी मार्ग असू शकतो. अमूक एक वाहिनी वा वर्तमानपत्र जाणिवपुर्वक भावना दुखावण्याचे काम करीत असेल, तर त्याच्या जाहिरातीमधला माल खरेदी करण्यावर बहिष्कार घातला जाणे, अधिक प्रभावी असते. या मोठ्या कंपन्या जो ग्राहक माल उत्पादित करतात, त्याच्या विभागवार खपावर त्यांची बारीक नजर असते. त्यात कधी व कशामुळे घट झाली, त्याविषयी त्यांचे मार्केटींग विभाग अतिशय संवेदनशील असतात. सहाजिकच अशी मोहिम अमूक एका वाहिनीला वा वर्तमानपत्राला जाहिरात दिल्याने त्यांच्या मालाच्या विरोधात सुरू झाली; तर त्याच कंपन्या संबंधित वाहिनी वा वर्तमानपत्राला धडा शिकवू शकतात. केवळ त्या माध्यमात जाहिरात केल्याने खप होत नसेल, तर तात्काळ जाहिरातीचा हात आखडला जात असतो आणि अविष्कार स्वातंत्र्याचा ढोंगधत्तूरा निकालात निघत असतो. अमूक एक कार्यक्रम वा अमूक एका निवेदकाच्या कार्यक्रमाला जी जाहिरात आहे, त्याच मालावर बहिष्कार टाकला गेला; तर त्याचा तात्काळ परिणाम त्या दोनचार दिवसात मालाच्या खपावर होतो. मग मार्केटींग विभागाची तारांबळ उडून जाते. म्हणून हे अतिशय धारदार शस्त्र आहे. ते यापुर्वी अनेकांनी उपसलेले आहे.

काही वर्षापुर्वी असाच प्रकार प्रेषित महंमदाचे व्यंगचित्र प्रकाशित केल्यानंतर उदभवला होता. युरोपातील कुठल्या देशात तशा व्यंगचित्राचे प्रकाशन झाले, म्हणून हिंसाही झालेली होती. पण त्या माध्यमांनी माघार घेतलेली नव्हती. शेवटी अरबी व मुस्लिम देशांनी त्या देशांशी संबंधित असलेल्या विविध कंपन्यांच्या ग्राहक मालावर आपल्या देशात प्रतिबंध लागू केलेले होते. तेव्हा त्या तथाकथित लोकशाहीवादी युरोपियन देशांनी आपल्या देशातल्या त्या अविष्कार स्वातंत्र्यसैनिकांची गळचेपी करून प्रेषिताच्या व्यंगचित्रांचे प्रकाशन करण्याला प्रतिबंध लागू केलेला होता. इराकवर अमेरिकेने युद्ध लादले, तेव्हा भारतातल्या मुस्लिम हॉटेल मालकांनी आपल्या दुकानात कोकाकोला किंवा पेप्सी विक्री करण्याला नकार दिलेला आठवतो कोणाला? आजकाल ग्राहक हा सर्वात मोठा देव भगवंत झालेला आहे, कारण जगाची अर्थव्यवस्थाच बाजारी झाली आहे. तिथे ग्राहक हाच इश्वर मानला जातो. सोशल मीडिया किंवा जागरूक असा मध्यमवर्ग हाच प्रामुख्याने भारतातला असा ग्राहक आहे. म्हणूनच त्याची क्रयशक्ती हे त्याच्या हातातले सर्वात मोठे व भेदक हत्यार आहे. मुद्दा इतकाच असतो, की तुम्ही किती चतुराईने आपल्या हातातील साधने व हत्यारे वापरणार यावर परिणाम मिळणे अवलंबून असते. एबीपीची माफ़ी वा दिलगिरी ही त्याची किरकोळ चुणूक आहे. नुसत्या दोनचार जाहिरातदारांनी पैसे नाकारले, म्हणून जे शरणागत होतात, त्यांच्या वाह्यातपणाला रोखणे कुठल्याही कायदा वा संघटनेपेक्षाही ग्राहकाला सोपे आहे. असल्या वाह्यात किंवा डिवचणार्‍या चर्चा किंवा तत्सम पॅनेलिस्टंना आमंत्रित करणार्‍यांना सामान्य ग्राहक वेसण घालू शकतो. कारण जाहिरातीच्या हाती माध्यमांचा लगाम आहे आणि ग्राहकाच्या हाती कंपन्याच्या नाड्या आलेल्या आहेत. जागरूक समाज त्या अमेरिकन कृष्णवर्णिय मुलींच्या संघासारखा असतो. ते फ़क्त भूमिका घेतात आणि मग बाजारी अर्थव्यवस्थाच उपटसुंभांना शिस्त लावत असते. त्यांच्या मुसक्या बांधायला बाजार समर्थ असतो. कारण लाथोके भूत बातोचे कहॉ मानते है?

9 comments:

  1. आपली शक्ती कुठे लावायची, कशी लावायची हे उमगले की बलाढ्य शत्रू नामोहरम होतो...
    समाज जागृत होत आहे, हेच ह्या सगळ्यात महत्वाचे..
    भाऊ, आपण मार्गदर्शन करीत राहावे ही विनंती..

    ReplyDelete
  2. भाऊ तो कार्यक्रम मी पाहीला नव्हता. त्या कार्यक्रमांत सहभागी झालेल्या सर्व बुध्दिवंतांवर कारवाई होणे गरजेचे आहे. यापुढे असे तथाकथित बुध्दिवंत ज्या ज्या कार्यक्रमांत सहभागी होतील त्या सर्व चॅनेलवर सुध्दा बंदी घातली पाहिजे.

    ReplyDelete
  3. सुपर भाउ.पुण्य प्रसुन सेोबत पण अस झाल त्याने आजतक वर रामदेव बाबांवर समोर वाटेल ते आरोप केले चीड यावी असे पण जेव्हा बाबांनी जाहीराती बंद केल्या तेव्हा आजतक ला पण झुकाव लागल पुण्य प्रसुनला आगावुपणा केल्याबद्दल नोकराी गमवावी लागली.

    ReplyDelete
  4. आपल्या हाती किती मोठे हत्यार आहे, हे सांगितल्याबद्दल आभार!

    ReplyDelete
  5. हो, त्यांच्या होटेलात दुय्याम दर्जाची पेये त्याच भावाने विकत होते

    ReplyDelete
  6. हा भाग आवडला. माहितीपूर्ण आणि रोचक!

    ReplyDelete
  7. सोशल मिडिया व संघटित प्रयत्न यामुळेच आर्थिक नाड्या आवळल्या म्हणूनच नाटकी माफी मागावी लागली. आहे. मी बंद केलेला चॅनल अजुन्ही चालू केला नाही. यांच्या एकांगी चर्चा, वीट येणारा पक्षपाती सुत्रसंचालन,तथाकथित तज्ञ यांचे अगाध ज्ञान यामुळे चौथा खांब असलेली प्रतिमा संपुर्ण लयास गेलेली आहे. असेच उत्तम विवेचन करत रहा.

    ReplyDelete
  8. अप्रसन्न जोशी आणि राजू खांड कर यांनी माझा कट्टा यासारखेच कार्यक्रम करावेत. तेच त्यांना जास्त शोभत.

    ReplyDelete