Saturday, June 1, 2019

प्रवक्ते कोण? बंदी कुणावर?

Image result for TV debates ghanshyam tiwari

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी मागल्या गुरूवारी झाली आणि निकालही लागले. त्यानंतर बरोबर सात दिवसांनी या गुरूवारी कॉग्रेसच्या माहिती विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला, यांनी एक ट्वीट करून आपले आदेश जारी केलेत. त्यानुसार त्यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांना कुठल्याही उपग्रहवाहिनीच्या चर्चेत हजेरी लावण्यावर प्रतिबंध लागू केला आहे. त्याच्याही पुढे जाऊन वाहिन्यांनीही कुणा कॉग्रेस प्रवक्त्याला चर्चेसाठी निमंत्रित करू नये, असे आवाहन केलेले आहे. हे वाचून अनेकांना मोठी मौज वाटली असेल. कारण मागल्या अनेक वर्षात अनेक वाहिन्यांवर होणार्‍या चर्चेत नाव घेण्यासारखा कोणी कॉग्रेस प्रवक्ता समोर आलेला नाही. किंबहुना २०१४ नंतर अनेक प्रमुख वाहिन्यांवर कॉग्रेस पक्षाने अघोषित बहिष्कार घातलेला होता. इंग्रजीतील लोकप्रिय वाहिन्या म्हणजे टाईम्स नाऊ आणि दोन वर्षापुर्वी सुरू झालेली रिपब्लिक वाहिनी यावर कित्येक वर्षात कॉग्रेसचा कुठला प्रवक्ता सहभागी होऊ शकलेला नाही. तिथे कॉग्रेसचे समर्थक वा पाठीराखे म्हणून अनेक पत्रकार विश्लेषकच कॉग्रेसची बाजू हिरीरीने मांडताना दिसलेले आहेत. किंबहूना कुणा खर्‍या कॉग्रेस प्रवक्त्यापेक्षाही अशा विश्लेषक पत्रकारांनी कॉग्रेसची बाजू अतिशय समर्थपणे मांडलेली आहे. अन्यथा इतर वाहिन्यांवर प्रकाश झा किंवा पवन खेरा असे कोणी कॉग्रेसी अधूनमधून दिसतात. त्यांच्याखेरीज नव्याने भरती झालेले पण वेळ संपल्यावरही अथक बोलत रहाणारे काही प्रवक्ते दिसलेले आहेत. त्यांच्या बोलण्यातून पक्षाला लाभ मिळण्यापेक्षा अधिकाधिक हास्यास्पद बनवण्याचे कर्तव्य त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडले आहे. सहाजिकच नेमक्या कोणाला सुरजेवाला यांनी प्रतिबंधित केले आहे, हा खरा प्रश्न आहे. कारण अनेकजण दोनतीन वर्षे कॉग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत, त्यापैकी कोणीही अधिकृत पक्ष प्रवक्ता नाही. मग बंदी कशाला व कोणावर?

लोकसभेचे निकाल लागल्यावर समाजवादी पक्षाने सर्वात आधी आपले सर्व पक्षप्रवक्ते बरखास्त करून टाकले. त्यासारखे उत्तम पक्षकार्य अध्यक्ष अखिलेशने मागल्या चार वर्षात दुसरे काही केलेले नसेल. कारण या पक्षाचा घनश्याम तिवारी नावाचा प्रवक्ता कुठल्या पक्षाचा आहे, याचीच शंका नेहमी यायची. त्याने कधीही समाजवादी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून काही धोरणात्मक वा भूमिकेवर काही प्रतिपादन केलेले ऐकायला मिळाले नाही. कुठलाही विषय असो. हा तिवारी कायम मोदी व भाजपाला नुसत्या शिव्याशाप देताना ऐकायला मिळे. शिवाय कुठल्याही टोकाला जाऊन त्याने राहुल गांधी यांच्या तद्दन मुर्खपणाचे समर्थन करताना, समाजवादी पक्षाला कॉग्रेसची जणू शाखाच बनवून टाकलेले होते. नेमकी तशीच कहाणी मार्क्सवादी पक्षाचे सुनित चोप्रा किंवा कम्युनिस्ट पक्षाचे दिनेश वार्ष्णेय यांची होती. ते पक्षाचे नाव कशाला घेतात, असा प्रश्न पडायचा. त्यांचा भाजपा विरोध समजू शकतो. पण त्यांनी कुठल्याही टोकाला जाऊन कॉग्रेसच्या वेडगळपणाचे समर्थन चालविलेले ऐकायला मिळायचे. हे त्यांचे काम होते काय? त्यांनी आपला पक्ष, त्याच्या भूमिका वा धोरणांवर प्रतिपादन करताना भाजपाचा विरोध करावा. याविषयी कुणाची तक्रार असायचे कारण नाही. पण त्यांनीही कधी आपल्या पक्षाची कुठली भूमिका मांडलेली बघायला मिळाली नाही. कारण वा निमीत्त कुठलेही असो, भाजपाच्या नावाने उद्धार करणे यापेक्षा त्यांना दुसरे काही काम नसायचे. थोडक्यात ते राहुल गांधी व कॉग्रेसचे अनधिकृत प्रवक्ते असायचे. मग अर्णब गोस्वामी त्यांना पुढे करून एकूण डाव्या चळवळीचे वाभाडे काढायचा आणि अशा प्रवक्त्यांकडून कॉग्रेसचे समर्थन व डाव्या चळवळीला बदनाम व्हायला लागले आहे. अशा लोकांना कॉग्रेस कसे रोखू शकणार आहे? तेच आताही कॉग्रेसची बाजू वाहिन्यांवर मांडणार आहेत आणि लोकांचे मनोरंजन चालूच रहाणार आहे.

याखेरीज तहसिन पुनावाला, सबा नकवी, अलिमुद्दीन खान किंवा कोणी दुष्यंत नागर असे प्रवक्तेवजा कॉग्रेस समर्थक वाहिन्यांवर बघायची श्रोत्यांना सवय लागलेली आहे. त्यांच्या मनोरंजक युक्तीवादातून कॉग्रेसची उडवली जाणारी खिल्ली, श्रोत्यांमध्ये लोकप्रिय झालेले आयटेम आहेत. त्यांना सुरजेवाला रोखू शकत नाहीत. म्हणून मग कॉग्रेसची वाहिन्यांवरची वि्टंबना कशी थांबू शकणार आहे? अर्थात वाहिन्या आपल्या चर्चांमध्ये अशा लोकांना अगत्याने बोलावणार आहेत आणि कॉग्रेसला आपली अशी अवहेलना थांबवता येणार नाही. ते मागल्या दोनतीन वर्षात राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्याचे फ़ळ आहे. मुद्दा कुठलाही असो, त्याला छेद देऊन अच्छेदिन वा १५ लाख रुपये, असली बाष्कळ बडबड करणार्‍यांची एक फ़ौज निर्माण करण्यात आलेली आहे. त्यांची विल्हेवाट कशी लावायची? कोण एक महंमद खान किंवा महादेवन नावाची कोवळ्या वयातली मुलगी, ती पोपटपंची छानपैकी करतात. त्यांच्यामुळे कॉग्रेसची मते गेली असे आता पक्षाला वाटते काय? असेल तर त्यांना असे निरर्थक बडबडायला ज्यांनी शिकवले किंवा प्रोत्साहीत केले? त्याच्यावर बडगा उगारावा लागेल. खुद्द सुरजेवालाच त्याला जबाबदार आहेत. कारण पत्रकार परिषद घेऊन कुठलेही बिनबुडाचे आरोप त्यांनी करायचे आणि त्यावर खळबळ माजवणार्‍या चर्चा वाहिन्यांवर घडवून आणायला प्रोत्साहन देण्याचे पा्प त्यांचेच आहे. कपील सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, सॅम पित्रोडा किंवा मणिशंकर अय्यर, शशी थरूर यांनी बेछूट बडबड केल्याने वाहिन्यांना खळबळ माजवण्याची संधी नित्यनेमाने मिळत गेली. अशा प्रवक्ते किंवा समर्थकांनी त्याची पाठराखण केलेली आहे. मग आता त्यांच्यावर खापर फ़ोडून काय निष्पन्न होणार आहे? असे प्रवक्ते बाजुला करून थरूर वा पित्रोडांचे तोंड कसे बंद होऊ शकते? पक्षबाह्य अन्य पक्षाच्या प्रवक्त्यांना लगाम कसा लागणार आहे?

मुळात प्रवक्ते किंवा समर्थक म्हणून पोपटपंची करणारे यांच्या माथी खापर फ़ोडून काहीही साध्य होणार नाही. मुद्दा असे बिनबुडाचे आरोप करून वा आवया अफ़वांचे रान पिकवून, लोकांना भुलवता येण्याचे दिवस संपलेत. हे समजून घ्यावे लागेल. प्रवक्ते वा समर्थकांची गोष्ट सोडून द्या. पत्रकार म्हणून हयात काढलेल्या कॉग्रेसच्या समर्थकांनाही अशा खोटेपणाची आता चटक लागलेली आहे. त्यामुळे जो काही बालीश फ़ुलीश प्रकार पक्षातून होईल, त्याचे समर्थन करायला अशी मंडळी नंतरही मोठ्या उत्साहात वाहिन्यांवर जाणार आहेत. त्यांच्या हास्यास्पद विधानातून कॉग्रेसच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जाण्याला पर्याय नाही. राहुल गांधी पक्षाध्यक्ष असोत किंवा नसोत, पक्षाला खुळेपणाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची गरज आहे. भाजपा किंवा मोदींवर बेछूट आरोप करून लोकमत जिंकता येत नसते. राहुलनी सुरूवात करून दिली नसती, तर हे बाकीचे झिलकरी हलकारे द्यायला पुढे कशाला आले असते? पक्षाला पुढील दहावीस वर्षात आपले नव्याने पुनरूज्जीवन करण्याची योजना आखावी लागेल. झटपट सत्ता मिळवण्य़ासाठी युत्या आघाड्या करण्यापासून माध्यमांना मलिदा पुरवून अफ़वा पिकवण्याचा धंदा बंद करावा लागेल. आपला कंडू शमवण्यासाठी तथाकथित पुरोगाम्यांनी लोया किंवा तत्सम भुतावळ निर्माण केल्यावर त्याच्या मागे पळत सुटण्याचा मोह टाळावा लागेल. संघटनेत लक्ष घालून फ़क्त माध्यमात धुळवड करून निवडणुका जिंकण्याच्र मनसुबे सोडायला हवेत. इतक्या गोष्टी नुसती प्रवक्त्यांची मुस्कटदाबी करून शक्य होणार नाहीत. एकट्या राहुल गांधींना शक्य नाहीत. त्यासाठी जाणकारांची मदत घ्यावी लागेल आणि बालीशपणाला पुर्णपणे फ़ाटा द्यावा लागेल. सामान्य जनतेत जावे लागेल आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे करावे लागेल. खुप कष्टाचे काम आहे आणि गांधी कुटुंबाला मेहनत इतरांनी करावी असेच वाटत असेल, तर अन्य मार्ग कुठला आहे?

12 comments:

  1. भाऊ .........कांग्रेस पक्ष खड्यात चालला आहे. प्रश्न फक्त एव्हढाच की किती वेगात हे घडून येईल यावरच वादविवाद घालता येईल. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ..युक्तीच्या चार ( जाणकारांची मदत घ्यावी लागेल / सामान्य जनतेत जावे लागेल / कार्यकर्त्यांचे मोहोळ उभे करावे लागेल / बालीशपणाला पुर्णपणे फ़ाटा द्यावा लागेल ) हे सर्व राउलबाबाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. .......कांग्रेसमध्ये जो ' वृद्धाश्रम ' तयार झाला आहे तो पहिल्यांदा बंद करावा लागेल. या सर्व वयोवृद्ध मुखंडांना नारळ द्यावा लागेल. (मोतीलाल वोरा ( काटकोनात वाकलेला हा मनुष्य अजून कांग्रेसचा खजिनदार ? ) / शीला दीक्षित / दिग्विजय सिंग / गेहलोत / चिदंबरम / कमलनाथ / मणिशंकर अय्यर )... हे सर्व थकले रे नंदलाला .........यांजकडून काय अपेक्षा करणार ? जाणता राजा ही या वृद्धांच्या रांगेतच आहे.

    ReplyDelete
  2. काॅंग्रेसला " ना शेंडा ना बुडखा " अशा परिस्थितीशी सामना करावयाचा आहे. पक्षातील प्रत्येक जण स्वतःला " राजकुमार " समजत असल्याने , या पक्षाचे भवितव्य कठीणच आहे.
    तुम्ही केलेल्या विश्लेषणाशी संपूर्ण सहमत आहे.

    ReplyDelete
  3. खरय भाउ १५ लाख एेकुन तर कान किटले होते.ते ही त्यांच स्वताच मुद्दा नव्हता,अरुंधती राॅय सारख्या भारताशाी नाळ तुटलेल्या व्यक्तीने ट्वीट काय केल.विरोधी ५ वर्ष तेच घेउन बसले.ना मोदींनी तस वचन दिल होत ना मतदारांना ते हव होत.तेच राफेलबाबत झाल.

    ReplyDelete
  4. नेमक विश्लेषन भाउ.खर तर काॅंग्रेसी प्रवक्ते बरेचसे चॅनल वर जात नाहीत.त्यामुळ चॅनलच काही बिघडत नाही.इतर विरोधी पक्ष उगीचच का्ॅग्रेसी प्रवक्ते झाले होते.आणि बरेचसे विश्लेषक पण छुपे काॅग्रेसी प्रवक्तेच असतात.या सर्वांचा पराभव झालाय.

    ReplyDelete
  5. आदरणीय भाऊ.. पाच वर्षांपूर्वी मी कॉलेज ला असताना तुमचे दैनिक पुण्यनगरी मध्ये लेख यायचे.. तेव्हा पासून मी तुमच्या लिखाणाचा, अभ्यासपूर्ण व्याख्यानं ,यांचा कौतुक वाटायचं मात्र गेल्या काही दिवसांपासून मला तुमच्या लेखात सतत काँग्रेस द्वेष जाणवतो. रोजगार, नोटबंदी, राफेल, या मुद्द्यावर तुमच्याकडून खरं तुमच्या कडून खूप चांगल्या लेखाची अपेक्षा होती..पण तुमचं लिखाण सद्या 'भक्त' या नजरेतून होत की काय असंच वाटत नेहमी.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्यामध्ये काही कमी असेल तर आपण दूर करावी. शेजारचा त्याची पोरं काढून त्यांच्यामध्ये रमत असेल तर आपण कशाला दुस्वास करावा. आता पुढचं मांडत नाही. आपण कुठे वैचारिक वाहून घेतलंय त्याचा विचार करावा. दुसऱ्याने कशाला तळी उचलावी असा एकूण सभ्य मतितार्थ. आपल्याला पटत नाही तेव्हा सोयीस्करीत्या भक्त ठरवण्यानेच माती खाल्लीय.अजून लहान आहात पण खऱ्या अर्थाने परिपक्वता आली तर देवाचे आभार माना. काहीजणांना साठी उलटली तरी अजून आली नाहीये भक्त म्हणून टोमणे ऐकण्याची इच्छा नसल्याने.

      Delete
    2. जमत असेल तर मुद्दे खोडून दाखवावे. मला तर तुमच्या डोक्यात चाटूकार असल्याचा पूर्वग्रह दुषितपणा साठलेला दिसतोय. आधी मोदींविरोधाचा काळा चष्मा काढा तटस्थपणे लेख वाचा आणि मग भाऊंची नजर कशी आहे ते बघा :- एक नियमित तटस्थ वाचक (कृष्णा देशमुख )

      Delete
    3. Unknown hai fakt aarop aahet . Fact koto ahet. Jeva 4 person behtta Teva 3 nuste modi var aarop jartat proof det nahi.

      Delete
  6. भाऊ
    लोकशाहीत विरोधी पक्ष हवाच पण ज्या पद्धतीने काँग्रेस चालली आहे ते पाहता मोदी यांच्या कडून काही मोठी चूक होत नाही तोवर अवघड आहे.

    ReplyDelete
  7. कॉग्रेसच्या माहिती विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवालाच काय तर यच्ययावत बांडगुळॆ व अर्थात संपूर्ण गांधी परिवाराला डच्यू देवूनच कॉग्रेसने शुध्दी करणाची प्रक्रीया सुरू करायला हवी !

    ReplyDelete
  8. Sir, why you are telling them so valuable things. Please let them go by their natural way. Now you can focus on policies which should be implemented by Modi 2 government. For better India.

    ReplyDelete
  9. भाऊ शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन उपाययोजना बाबत एक लेख अपेक्षित आहे तुमच्याकडून.🙏

    ReplyDelete