Tuesday, April 7, 2020

कठीण समय येता, कोण कामास येतो?

Coronavirus Outbreak: Amitabh Bachchan, Rajinikanth, Mohanlal ...

अकस्मात कुठल्याही वाहिनीवर तुम्ही कुठला कार्यक्रम बघत आहात. त्यात कथामालिका चालत असते किंवा प्रायोजकाची जाहिरात लागलेली असते. रंगीत टिव्हीच्या जमान्यात एकदम पडदा कृष्णधवल होतो आणि सोफ़ावर बसलेला अमिताभ बच्चन कुठल्या तरी हिंदी चित्रपटातल्या वृद्ध गृहस्थाच्या रुपात दिसतो. बोलतो ते वाक्यही तसेच तद्दन फ़िल्मी. ‘अरी ओ सुनती हो? मेरा काला चष्मा कहा है?’ तेच दोनदा बोलल्यावर वैतागून नरम आवाजात म्हणतो, घरात माझे कोणी ऐकत नाही. मग एकामागून एक वेगवेगळ्या फ़िल्मी कलावंतांचे दर्शन आपल्याला होऊ लागते. एक शीख फ़ेट्यातला गायक नट आहे, तो झोपलेल्या कोणाला तरी उठवून अंकलचा चष्मा कुठे म्हणून विचारणा करतो. पुढल्या फ़्रेममध्ये डोळ्यावर पट्टी बांधून झोपलेला रणवीर कपूर वैतागून त्याला दुरूत्तर देतो आणि नंतर मराठी अभिनेत्री चक्क मराठीत अंकलचा चष्मा दोघांनी शोधून काढा, म्हणून त्यांना दटावते. पुढे ही साखळी वाढतच जाते. त्यात बंगाली, मल्याळी, तामिळी, तेलगु अभिनेतेही दिसत जातात आणि आपापल्या भाषेत चष्मा विषयक काही बोलतात. काही मिनीटात फ़िरत फ़िरत कथानक पुन्हा अमिताभपर्यंत येऊन पोहोचते आणि विषय संपतो. शेवटी त्या इवल्या चित्रपटाची सांगता करताना त्याच्या निर्मितीची कथाही अमिताभ सांगतो. ह्या सगळ्या कलावंतांनी मिळून पुर्ण केलेला तो छोटासा चित्रपट, एकमेकांना भेटल्याशिवाय आणि एकत्र आल्याशिवाय चित्रित केला आहे. ते सगळे आपापल्या घरातच आहेत आणि आपल्याला जमेल तसे तितके चित्रण करून त्यातून त्यांनी हे कथानक बनवले आहे.

ज्याची कोणाची ही कल्पना पटकथा असेल त्याला साष्टांग दंडवत घातला पाहिजे. इतक्या मोठ्या जागतिक संकटात कलाकाराने वा प्रतिभावंताने कसे वागावे किंवा कसे व्यक्त व्हावे; त्याचा यापेक्षा उत्तम वस्तुपाठ दुसरा असू शकत नाही. आज देशातल्या कोट्यवधी लोकांना आपापल्या घरात बंदीस्त होऊन पडावे लागलेले आहे. जगण्यासाठी व कोरोनापासून सुरक्षित रहाण्यासाठी हा दुरावा आवश्यक आहे. तर त्यात सामान्य जनतेला प्रेरीत करण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयास आहे. अशा प्रकारे एक छोटाचा आटोपशीर चित्रपट बनवून लोकशिक्षण व प्रबोधन करता येईल, हे ज्याला सुचले त्याचे कौतुक आहे. त्याला प्रामाणिकपणे प्रतिसाद देऊन प्रत्येक भाषेतल्या कलावंताने आपल्याच घरात बसून उपलब्ध असलेल्या साधनांनिशी ते चित्रण पुर्ण करून पाठवले. कोणीतरी त्याचे कलात्मक संकलन करून चित्रपट म्हणून पेश केलेले आहे. ह्या सगळ्यांची सामुहिक इच्छा व कल्पकता त्यातून साकार झालेली आहे. समाजाला कोणत्या व कशा प्रतिभावंतांची गरज आहे, त्याचा हा सर्वोत्तम दाखला आहे. म्हटले तर प्रकार गंमतीशीर आहे. पण प्रसंग व प्रयास यांची घातलेली सांगड, हा खराखुर्‍या प्रतिभेचा अविष्कार आहे. त्यामध्ये कोणी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला नाही, किंवा राजकीय मान्यतेने प्रतिभावंत म्हणून मिरवणाराही नाही. सगळे व्यवहारी जगातले् व्यवसायिक कलाकार आहेत. अमिताभ ते रजनीकांत.

आता आपण त्या प्रतिभेचा शोध घेऊ. चार वर्षापुर्वी दिल्लीनजिक दादरी नामे गावात गोमांस खाल्ल्याचा आरोप होऊन अखलाख नावाच्या एका गरीब मुस्लिमाची हत्या झाली होती. त्याला एका जमावाने मारले होते आणि त्याचा गवगवा झाल्यानंतर अकस्मात देशातल्या कांगावखोर प्रतिभावंतांना काही साक्षात्कार झाले होते. मानवतेला काळीमा फ़ासला गेला म्हणून त्यांनी धडाधड लाईन लावून आपल्याला मिळालेले सरकारी पुरकार परत करण्याची मोहिम सुरू केली होती. त्यांना प्रतिभावंत कोणी ठरवले? माध्यमातल्या त्यांच्याच साथीदारांनी आपल्या राजकीय विचारांच्या अशा भणंगांना प्रतिभावंत म्हणून पेश केले होते. त्यांच्या पुरस्कार वापसीचा तमाशा खुप रंगवला होता. त्यांची प्रतिभा किती व सृजनशीलता किती, हा भाग संशयास्पदच होता व आहे. देशाच्या कुठेही कोपर्‍यात काही विचित्र घडले म्हणून त्या बाजारू प्रतिभावंतांना मरणयातनांनी ग्रासले होते. पण त्यापैकी आज कुणाचाही मागमूस अवघा देश संकटात सापडलेला असताना लागलेला नाही. कोरोनाने अवघ्या जगाला व कोट्यवधी भारतीयांना भेडसावून सोडलेले आहे. आपापल्या घरातच बंदिस्त करून टाकलेले आहे. अविष्कार सोडूनच द्या, साधे संचार स्वातंत्र्यही अवघा देश कोरोनामुळे गमावून बसला आहे. महाल मनोर्‍यापासून साध्या झोपडीपर्यंत प्रत्येक भारतीय कोंडवाड्यात पडला व घुसमटला आहे. तर त्याला दिलासा द्यायला त्या पुरस्कारी प्रतिभावंतांनी काही केले आहे काय? आज देश कोट्यवधी लोकांच्या असह्य जगण्याला सुसह्य करण्यासाठी त्यांच्या प्रतिभेला कुठलाही अंकुर फ़ुटलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर उपरोक्त इवल्या चित्रपटाचे कथानक म्हणजे जणू महाकाव्यच आहे.

गेल्या सहा वर्षापासून आपण आपल्या देशाच्या विविध प्रांतातल्या व भाषेतल्या ढोंगी प्रतिभावंतांची नौटंकी बघत आलेलो आहोत. कुठलेही फ़ुटकळ कारण वा निमीत्त शोधून हे लोक नरेंद्र मोदींना हुकूमशहा फ़ॅसिस्ट ठरवायला उतावळे झालेले आपण बघितलेले आहेत. कॉग्रेसचे राज्य व सत्ता असलेल्या कर्नाटकात कलबुर्गी हे साहित्यिक व गौरी लंकेश या महिला पत्रकाराची हत्या झाली. तिथे पोलिसांचे म्होरके कॉग्रेसचे आणि त्याचेही खापर मोदींवरच फ़ोडायला हिरीरीने पुढे आलेला प्रत्येकजण स्वत:ला पुरोगामी वा प्रतिभावंत म्हणवून घेणाराच होता ना? प्रतिभा ही नव्या कलेचा वा जनहिताला प्रेरणा देणारा अविष्कार असतो. पण त्यापैकी कितीजण वास्तविक जीवनात तशा प्रतिभेचा साक्षात्कार घडवू शकलेले आहेत? त्यांना आपल्या राजकीय मतलबासाठी प्रतिभेचा मुखवटा लावलेलेच आपण बघितले आहे. मागल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी सहाशेहून अधिक अशा तोतयांनी एकत्रित सह्यांचे पत्रक काढलेले होते आणि देशात बुद्धीजिवी व प्रतिभावंतांची गळचेपी होत असल्याचा कांगावा केलेला होता. नागरी स्वातंत्र्ये धोक्यात आली आणि अघोषित आणिबाणीच मोदींनी लावली; म्हणून सामुदायिक गळा काढलेला होता ना? मग आज काय परिस्थिती आहे? त्यांनी गळा काढला व टाहो फ़ोडला, तेव्हा सगळीकडे मुक्त संचार करायची मुभा होती. पण आज अवघा देश तुरूंग असल्यासारखी परिस्थिती आहे आणि त्यासाठीचा लॉकडाऊन मोदींनीच घोषित केला आहे. पण त्याविषयी त्यापैकी एका तोतया प्रतिभावंताने तोंडही उघडलेले नाही. अचानक त्यांची प्रतिभा म्हशीसारखी आटून गेली काय?

अर्थात नामवंत वा ख्यातनाम मंडळी बिळात लपून बसली आहेत आणि त्यांची बाजारू पिलावळ मात्र आपल्या प्रतिभेचे शक्य तितके हिडीस प्रदर्शन आजही करते आहे, जागतिक आरोग्य संघटनेपासून प्रगत देशांचे पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष मोदींनी उचललेल्या कोरोना विरोधी पावलांचे गुणगान करीत आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रभाव रोखला गेला, म्हणून जगाला कौतुक वाटते आहे. पण तोतया प्रतिभावंतांची तोंडे बंद आहेत आणि त्यांची अनौरस पिलावळ मात्र आजही तितक्याच उत्साहाने मोदींची खिल्ली उडवण्यासाठी आपल्या बुद्धीचे शेण सारवत बसलेली आहे. अशा भंपक पुरस्कृत वापसीखोर कवी साहित्यिकांची भाषा व शब्द, आता किळसवाणे वाटायला लागलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अमिताभ व अन्य कलावंतांनी केलेला हा अल्पकालीन अजब कलाविष्कार कंटाळलेल्या नागरीकांना मोठाच दिलासा देणारा आहे. म्हणूनच काळाच्या कसोटीवर उतरलेली प्रतिभा म्हणून त्याकडे बघण्याची गरज आहे. त्याकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे. किंबहूना प्रतिभावंत कसे नसावेत आणि असावे, याची जाण सामान्य माणसात रुजावी, म्हणून या कलाकृतीविषयी लिहीणे मला अगत्याचे वाटले. खरे सोने अग्नीत झळाळून निघते म्हणतात, त्याचाच हा पुरावा नाही काय? कोंडवाड्यात पडलेल्या या सर्व सुखवस्तु कलाकारांनी याही कसोटीच्या सत्वपरिक्षेच्या कालखंडात आपल्या मनस्तापाला बाजूला ठेवून समूह दुरावा हेच जगण्यातले खरे सुत्र असल्याचे साध्या सोप्या स्वरूपात जनतेला समजावण्याचा केलेला हा प्रयास म्हणूनच कौतुकास्पद आहे. तेच कोरोनाच्या अंधार युगातले इवलेसे महाकाव्य म्हणणे भाग आहे. अर्थात त्यातले काव्य पुरस्कृत वा प्रमाणपत्र, पदके मिरवणार्‍या प्रतिभावंतांना कधीही समजू उमजू शकणार नाही, हा भाग वेगळा.

11 comments:

  1. Farch sundar, barobar bhashet aapan mandalay....

    ReplyDelete
  2. परखड परीक्षण भाऊ, मानल तुम्हाला. लिहीत रहा, स्वस्थ रहा, धन्यवाद.शार्ट फिल्म खरोखर उत्तम प्रतिभेचा नमुना आहे,त्यासाठी दिग्दर्शक प्रसुन पांडेंच विशेष कौतुक.

    ReplyDelete
  3. https://www.facebook.com/1319028514/posts/10222096034692751/?notif_id=1586253109207336&notif_t=nf_share_story&ref=notif&flite=scwspnss&extid=NvuatmUoTg9TxOE3

    ReplyDelete
  4. Very true sir, as usual, that film is great and so your article. 🙏🙏👍👍☑️☑️🙂🙂

    ReplyDelete
  5. भाऊ, या पुरस्कार वापसी लोकांना प्रतिभावंत म्हणणे म्हणजे प्रतिभा या शब्दाचा अपमान आहे. हे एकाचवेळी सेक्युलर, अंधश्रद्धाविरोधी वगेरे वगेरे असतात. सेक्युलर म्हणजे फक्त हिंदू विरोधी व मुस्लिम समर्थक असणे ही यांची व्याख्या. अंधश्रद्धा यांच्या लेखी फक्त हिंदूच्या असतात. तब्लिगींच्या मर्कट चाळ्यांनी देश संकटात आला हे यांना दिसत नाही पण मोंदीनी दिवे उजळवण्यास सांगितले त्यावर मात्र चवताळून उठले. तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा.

    ReplyDelete
  6. भाऊ लेख आवडला अगदी अप्रतिम .


    तब्येतीची काळजी घ्या

    ReplyDelete
  7. भाऊ ...........लेख नेहमीप्रमाणे मस्तच !! लेखात तुम्ही वापरलेले शब्द प्रयोग ..जबरदस्त आणि भन्नाट . ' बुद्धीचे शेण सारवणे ' . पुरस्कार वापसी करणारे एकजात सगळे ' भामटे ' याच वर्गवारीत येतात. त्यांचे दाणापाणी गेल्या ३ / ४ वर्षात पूर्णपणे बंद झाल्याने सगळे अर्थहीन झालेले आहेत. तोतये प्रतिभावंत , समूह दुरावा आणि आता अस्तित्वाचा प्रश्न !!

    ReplyDelete
  8. भाऊ , छान लिहता आपण,एक प्रश्न आहे के हे जे ताब्लिगी प्रकरण झाले याला नेमकं जबाबदार कोण आहे, त्यांना परवानगी दिली कशी? का ?आणि केव्हा दिली यावर थोडं लिहावं अस मला वाटतं, महाराष्ट्र शासनाने म्हणजे पोलीस खात्याने परवानगी नाकारली अस म्हणतात.. ती का? आणि केजरीवाल सरकार चा यांच्याशी किती संबंध आहे..ते लोक का जात नव्हते बाहेर, अजित देवल यांना केंद्राने का पाठवले आणि नंतर तो मौलाना साद गायब झाला..कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  9. जागता पहारा....
    असा ब्लॉग आहे
    हे आजच कळले.

    ब्लॉगचे शीर्षक एकदम अर्थपूर्ण आणि समर्पक आहे.
    शुभम भवतु..

    ReplyDelete