Saturday, April 11, 2020

जागतिक संस्थांची एक्सपायरी डेट

WHO declares public health emergency amid coronavirus outbreak ...

दुसर्‍या महायुद्धापुर्वीचे जग आणि नंतरचे जग यात जमिन अस्मानाचा फ़रक होता. गेल्या सत्तर ऐशी वर्षात हे महायुद्धानंतरचे जग चालत आले, ते प्रत्येक उपायानंतर नव्या समस्यांना जन्म देत गेले आणि जी रचना तेव्हा उभारण्यात आलेली होती, ती अधिक पोखरून काढत गेले. महायुद्धाने ज्या समस्या जगासमोर उभ्या केल्या होत्या, त्यापुरता विचार करून तेव्हाची जागतिक मांडणी झाली. भविष्यात तसे प्रश्न समस्या सामोर्‍या येऊ नयेत म्हणून सज्जता करण्यात आलेली होती. पण त्या ठाऊक असलेल्या वा अनुभवलेल्या समस्यांवर मात केल्यानंतर पुढल्या काळात जगाचे नेतॄत्व भरकटत गेले आणि त्याच्या परिणामी क्रमाक्रमाने हाती असलेल्या रचना व व्यवस्थांवरचा बोजा वाढत गेला. कारण मर्यादित कारणासाठी जागतिक नेते म्हणवणारे देश आणि त्यांच्या नेत्यांनी तात्कालीन प्रश्नांची उत्तरे शोधली होती. त्यांना पुढल्या काळात उलगडणार्‍या भविष्याचा थांगपत्ता लागला नव्हता. सहाजिकच त्यावर उपाय योजताना हंगामी उत्तरे शोधली गेली आणि ती मुळच्या रचनेवरचा बोजा बनत गेली. मुळात राष्ट्रसंघाची स्थापना ही पुन्हा जगात कुठेही युद्ध होऊ नये आणि मानवाहानी होऊ नये यासाठी होती. पण राष्ट्रसंघाला कुठलेही युद्ध थांबवता आले नाही. उलट जागतिक नेते म्हणवणार्‍या देशांनी नेत्यांनी आपापले मतलब साधण्यासाठी हाती आलेल्या अधिकाराचा वापर केला. आपल्या हस्तक छोट्या नवस्वतंत्र देशांना हाताशी धरून आपली सत्तेची साठमारी चालू केली आणि त्यामुळेच आज जगाचे प्रश्न समजू न शकणारे लोक अशा संस्थांचे म्होरके होऊन बसलेले आहेत. ते नेते व संस्थाही पुरत्या निरूपयोगी होऊन गेल्या आहेत. हे दिसत होते, पण कोणी बघायला वा मान्य करायला राजी नव्हता. कोरोनाने त्याच अतिशहाण्यांना दणका दिला आहे. कोरोनाने किती लोकांना बाधा केली वा कितींचा जीव घेतला, यापेक्षाही त्याने अशा कालबाह्य झालेल्या व मोडकळीस आलेल्या संस्थांचा अस्त जवळ आणला हे समजून घेणे महत्वाचे आहे.

महायुद्धाचा शेवट झाल्यावर जे काही करारमदार मोठ्या विजेत्या देशांमध्ये झाले, त्याचे अपत्य म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ होय. त्याची मांडणी झाल्यावर हळुहळू विजेत्या देशांनी आपले बस्तान बसवले आणि त्यात खालसा झालेल्या ब्रिटन वा फ़्रान्स अशा देशांना आपली साम्राज्ये सोडून देण्याची पाळी आली. त्यातून स्वतंत्र झालेल्या नवजात देशांना आपल्या पायावर उभे रहाणेही अशक्य होते. त्यामुळेच नव्या पाळण्यातल्या देशांना त्या बड्या देशांच्या आश्रयाला जाऊन उभे रहावे लागले. त्यांच्या तालावर नाचणे भाग होते. त्यांना राष्ट्रसंघाचे सदस्य करून घेण्यात आले. पण त्यांना जागतिक घडामोडीत कुठलाही अधिकार नव्हता. महाशक्ती वा पुढारलेले देश होते, त्यांच्याच कलाने जग चालत होते. तिथल्या राजकीय संकल्पना व वैचारिक तात्विक भूमिका उर्वरीत जगावर राष्ट्रसंघाच्या माध्यमातून लादल्या जात होत्या. पुढे त्यांना संस्थात्मक व कायद्याचे रुप देण्यासाठी विविध जागतिक करार झाले आणि त्यातून आणखी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था संघटना अस्तित्वात आल्या. WHO किंवा जागतिक आरोग्य संघटना त्यापैकीच एक आहे. जगाला भेडसावणार्‍या आरोग्य विषयक समस्यांचे एकत्रित उपाय करण्यासाठीची ही संघटना मागल्या काही दशकात निरूपयोगी ठरलेली आहे. कोरोनाने तर तिचे पुरते वस्त्रहरण केले आहे. ह्या नव्या विषाणूचा उदभव किंवा फ़ैलाव आणि त्याने महामारी भयावह रूप धारण करण्यापर्यंत ही संघटना काहीही करू शकलेली नव्हती. म्हणून आज अवघ्या जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. चीनमध्ये त्याचा उदभव झाला आणि परिस्थिती क्रमाक्रमाने हाताबाहेर होत गेली, तरी WHO जगाला पुर्वसुचना देऊ शकली नाही. वेळीच कुठले निर्णय घेऊ शकली नाही. कारण ती संघटना सर्व देशांचे प्रतिनिधीत्व करीत नसून तिथे स्थानापन्न झालेल्या मुठभरांचे हितसंबंध जपणार्‍या वा पोसणार्‍या श्रीमंत देशांसाठी ही संस्था रखेली झाली आहे. सबब अवघ्या जगासाठी पुरती निरूपयोगी ठरली आहे.

Amnesty International targeted by politically motivated spyware ...

एक गोष्ट उघड आहे, की आजचे WHO संघटनेचे म्होरके चीनच्या इच्छेसमोर झुकले आणि त्यांनीच अवघ्या जगाला कोरोनाच्या फ़ैलावाच्या शक्यतेविषयी अंधारात ठेवलेले आहे. त्याचे परिणाम कोट्यवधी लोकांना भोगावे लागत आहेत. सुदैव असे, की जे देश WHO संघटनेकडून इशारा मिळण्यापर्यंत वा घोषणा होण्यापर्यंत थांबले नाहीत, त्या देशांना कोरोना फ़ारसा भेडसावू शकलेला नाही. उलट WHO किंवा तत्सम राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने मागल्या सात दशकात उभ्या राहिलेल्या तशाच जागतिक संघटनांच्या आहारी गेलेल्या देशांना कोरोनाने पुरते जमिनदोस्त करून टाकलेले आहे. त्यांना आपल्यावर येऊ घातलेले संकट ओळखता आले नाही, की उपायही वेळीच अंमलात आणता आले नाहीत. उलट WHO ने महामारी जाहिर केल्यावर वेळ गेलेली होती. पण अशी फ़क्त WHO एकमेव संस्था संघटना नाही. अम्नेष्टी वा मानवाधिकार विषयक जागतिक संघटनही पुरती निरूपयोगी ठरलेली आहे. त्या संघटनांचा मुळ हेतू मानवता वाचवण्याचा होता, पण मागल्या तीनचार दशकात त्यांचा ताबा विकृत लोकांनी घेतला आणि हळुहळू त्याच संघटना अधिकाधिक मानवी बळी घेणार्‍या होऊन गेल्या आहेत. तीन दशके आपला शेजारी श्रीलंका हा इवला देश तामिळी वाघांच्या दहशतवादाखाली होरपळत होता आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयास अम्नेष्टी वा तिच्या उपसंस्था करीत होत्या. पण व्यवहारत: परिणाम बघितले तर त्यांच्याच आश्रयाने जगभर व श्रीलंकेतही दहशतवाद पोसला व जोपासला गेला होता. जेव्हा श्रीलंकेने आपल्या भूमीवर अम्नेष्टीला वा त्यांच्या कुणा हस्तकाला येण्यास प्रतिबंध घालून कठोर उपायांची कास धरली. तेव्हाच अल्पावधीत तामिळी दहशतवाद संपुष्टात आला आणि मागली सहासात वर्षे तिथे शांतता नांदते आहे. हिंसाचारापासून त्याची मुक्तता होऊन गेली आहे. पण तसे कुठलेही यश अम्नेष्टीला इतरत्र मिळू शकलेले नाही.

मानवाधिकार हे असेच एक नाटक मागल्या तीनचार दशकात जगभर सोकावले. जिथे म्हणून त्याला आश्रय मिळाला, तिथे अधिकाधिक सामान्य निरपराध नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे. त्या उदारमतवादी भूमिकेचा अतिरेक ज्या देशांनी केला, त्यांनाच दहशतवाद व आता कोरोनाचा सर्वात मोठा फ़तका बसला आहे. राष्ट्रसंघ तर जगातले कुठले युद्ध मागल्या चारपाच दशकात थांबवू शकला नाही आणि मानवाधिकार वा अन्य संस्थांना कुठले जागतिक अरीष्ट टाळता आलेले नाही. त्यांचे उदात्त हेतूच या संस्थांच्या म्होरक्यांनी निकामी करून टाकलेले आहेत. म्हणूनच त्या संस्था आज कालबाह्य झाल्या म्हणावे लागते. त्या मोडकळीस आलेल्या असल्या तरी त्यांना टिकवून ठेवले गेले. कारण तिथले म्होरकेपण करणारे वा त्याचा आडोसा घेऊन आपली गैरकृत्ये उजळमाथ्याने करणार्‍या लोकांसाठी त्या संस्थांनी अभय दिलेले होते. मानवी उद्धार व कल्याणासाठी स्थापन झालेल्या त्या संस्था, आजकाल मानवी विनाशाचे मुख्य कारण झालेल्या आहेत. परिणामी त्याना कालबाह्य वा एक्सपायरी झालेल्या म्हणावे लागते. पण त्या चालू राहिल्या व त्यांचा बडेजाव सुरू राहिला. कोरोनाने त्यांना साधा धक्का दिला आणि त्या कोसळून पडल्या आहेत. कोरोनाचा धक्का संपल्यावर नव्याने जग उभारण्याची हिंमत वा इच्छाशक्तीही त्या संघटना गमावून बसल्या आहेत. त्या नव्या जगाचे मानवाचे किंवा सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणार्‍याही नाहीत. म्हणून त्यांच्या अशा आकस्मिक निर्वाणाचे दु:खही करण्याचे कारण नाही. त्याला त्यांचा नैसर्गिक मृत्य़् म्हणायलाही हरकत नाही. कारण कोरोनानंतरच्या जगात ह्या संस्थांना स्थान नसेल वा त्यांचा उपयोगही नसेल. नव्या जगाची रचना नवे लोक, नेतृत्वाची नवी पिढी करणार आहे आणि त्यात कालबाह्य झालेल्या महाशक्ती वगैरे देशांना स्थान असू शकणार नाही. वास्तवात जगाचे नेतृत्व करू शकतील व जगभरच्या लोकसंख्येला ज्यांचा आधार वाटेल, असे नेतृत्व कोरोना नंतर उदयास येणार आहे आणि त्यातून जगाची नवी रचना होणार आहे.

12 comments:

  1. भाऊ ....नेहमीप्रमाणे छान लेख..!! आशावाद कायम ठेवून नवीन तरुण पिढीकडून बदलाची नेतृत्वाची आणि तुम्ही अपेक्षा ठेवली आहे त्यासाठी धन्यवाद.. !! संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद आणि इतर संलग्न संघटनाही बरखास्त करावयास हव्यात.

    ReplyDelete
  2. भाऊ, तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण केले आहे. १९७१ साली आपण दोघेही रुपरेलमध्ये होतो. तुम्ही बहुतेक कला शाखेत होता. मी तुम्हाला तेव्हापासून ओळखतो. मध्यंतरी तुम्ही मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत दिसत होतात. अलीकडे दिसत नाहीत. बहुतेक तुमची परखड मते त्यांना झेपत नसतील.

    ReplyDelete
  3. एकदम बरोबर! पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ स्थापन केला होता. पण त्यावेळी जर्मनीवर घातलेल्या निर्बंधांमुळे जर्मन लोक हिटलरच्या मागे गेले आणि राष्ट्रसंघ दुसरं महायुद्ध टाळण्यात अपयशी ठरला. ह्याच इतिहासाची पुनरावृत्ती भाऊंच्या या लेखातून मांडली आहे.

    ReplyDelete
  4. जागतिक संस्था या USA आणि पशचिमी देश यांच्या मदतीने बनल्या असल्याने व त्यानी दिलेल्या पैशावर चालत असल्रयाने त्यांच्यावर नियंत्रणही त्यांचेच होते व आहे.पूर्ण लोकशाहीवादी जागतिक संस्था आजच्या घडीला तरी अशक्य आहे.मात्र काही बदल जरुर होऊ शकतात.UNSC मध्ये बदल करणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  5. १)आताच्या जागतिक संघटनांचे वास्तव विश्लेषण केले आहे. साम्यवादाची उद्दिष्टे काही असली, तरी नोकरशाही व हुकूमशाही वाढली. तसेच ॲम्नेष्टी व WHO इ. संघटनांची नोकरशाही वाढली. व स्वत:ची सत्ता त्यांनी वाढवली.बेजबाबदार चीनला सुरक्षा समितीत घेऊन धोका वाढला.हे बदलले पाहिजे पण काहीतरी जागतिक व्यासपीठ गरजेचे ठरते. मूलभूत विषयावर छान लेख. धन्यवाद

    ReplyDelete
  6. Just Right, Respected Bhau..
    On the lines of WHO, there are other institutions like IMF, World Bank, International Court Of Justice etc. These institutions are now required to reconstruct or overhaul right from top to bottom. One example is that of IMP. Time and again, it has utterly failed to respond against global recession. So though growth is there,so many target population aren't recovered from poverty, health, education etc. I believe that India under present leadership can lead the world in proper direction.

    ReplyDelete
  7. भाऊ, अगदी परखडपणे लिहिले आहात. WHO आणि अँम्नेष्टी काय आणि युनो काय बलाढ्य देशांच्या घरच्या दासीच आहेत. कारण यांना पैसा पुरवणारे तेच आहेत. मानवाधिकार संघटनेबद्दल तर बोलायलाच नको, सामान्य माणसाच्या आधिकारापेक्षा त्यांना अतिरेक्यांच्या अधिकाराची फार काळजी हे काश्मीर प्रकरणातून पहिल्यापासूनच दिसत होते.
    या मोठ्यामोठ्या संस्थांबरोबर आपल्या देशातील पण बरीच संस्थाने मोडीत पडण्याची शक्यता नक्कीच दिसतेय. त्यातील एक म्हणजे शरद पवार आणि त्याची राष्ट्रवादी नावाची कंपनी, एवढ्या भयानक काळात त्यांचे मतपेटीचे प्रेम आणि राजकारण काही सुटत नाही, म्हणूनच तब्लिगींच्या बातम्या सतत दाखवायला हव्याच का हे बोलून गेले, की जेंव्हा अनेक विदेशी तब्लिगी देशभरात मशिदीत लपून बसलेले सापडले व कर्मज वरुन परतलेल्यांमुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली व अनेक लपून बसलेले तब्लिगी सापडत नाहीत. केवळ फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून त्यांचा आवडता मंत्री गुन्हा दाखल न करता मारहाण करतो व त्याबद्दल तोंडदेखला पण एक शब्द काढत नाहीत. पण सामान्य काय समजायचे ते समजतातच.
    बाकी काही म्हणा जे होते ते चांगल्यासाठी होते हे नक्कीच. फडणवीस मनातल्या मनात मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने देवाचे आभार मानत असतील आणि उद्धव ठाकरे स्वतःला शिव्या देत असतील.
    पण भाऊ एक शंका जर फडणवीस मुख्यमंत्री असते तर या कोरोना परिस्थितीत पवार आणि कंपनीने किती नंगानाच केला असता? थोडीफार कल्पना करू शकतो, सांगली कोल्हापूरच्या पूर प्रकरणावरुन. खोटंनाट दडपून सांगत बसले असते. पण आता विरोधक मदतीचा हात पुढे करताहेत पण त्यांनाच हे राजकारण करु नका म्हणून सुनावत आहेत.

    ReplyDelete
  8. WHO ने "कोरोना व्हायरस चे संक्रमण हे pandemic आहे" अशी औपचारिक घोषणा करण्यास नक्कीच उशिर केला. याच संस्थेने याआधी, 2009 मधे प्रसार झालेला व्हायरस कमी त्रासदायक आणि कमी जीवहानी करणारा असून देखील, त्या Influenza H1N1 च्या साथीला मात्र योग्यवेळी pandemic असल्याचे घोषित केले होते. त्याची तुलना केल्यास आजचा कोरोना 3 ते 4 पट अधिक जीवघेणा, 3 पट जास्त गम्भीर आजार करणारा आहे. कोरोनाची सर्वात भयंकर बाब म्हणजे सुरवातीचे 10-12 दिवस संक्रमण झालेली व्यक्ती लक्षणं दाखवत नाही परंतू त्या दरम्यान रोगाचा प्रसार करत राहाते. (त्यामुळेच याचे क्वारंटाइन 14 दिवसाचे आहे.) तुलना केल्यास H1N1 मधे हाच कालावधी 36-48 तासांचा आहे.
    चीन ने सुरुवातीला माहीती लपवली आणि WHO ने देखील माहीती झाल्यावर योग्य कारवाई करण्यास निश्चितच दिरंगाई केलेली आहे. आजचे pandemic संपल्यावर, या दोन्ही गोष्टींचे जगाला योग्य ते समाधान शोधावे लागेल.

    ReplyDelete
    Replies
    1. आजचे WHO संघटनेचे म्होरके चीनच्या इच्छेसमोर झुकले आणि त्यांनीच अवघ्या जगाला कोरोनाच्या फ़ैलावाच्या शक्यतेविषयी अंधारात ठेवले. The current DG of WHO owes his position and income to the influence and power of China. Therefore he he shielded China and did not tell the world about Corona. This Ethiopian man has caused untold damage to the world economies and caused deaths of hundreds of thousands. He should be dragged in front of the International Court and asked to justify his actions.

      Delete
  9. अतिशय सुरेख विश्लेणात्मक लेख. मस्त....भाऊ.. धन्यवाद

    ReplyDelete
  10. "All are equal but some are more equal than others". Geoge Orwell from Animal Farm

    ReplyDelete