Sunday, January 17, 2016

उंटाच्या पाठीवरची काडीपाकिस्तानने मौलाना अझहर मसूद याला अटक केल्याची किंवा स्थानबद्ध केल्याची बातमी बुधवारी संध्याकाळी भारतीय वृत्तवाहिन्यांवर घुमू लागली. विनाविलंब त्यातून वाटेल ते निष्कर्ष काढण्याची मग स्पर्धाच चालू झाली. बातमी सर्वात आधी देण्याची स्पर्धा कळू शकते. पण ज्या गोष्टीला दुजोराही मिळालेला नाही, त्यावरून अनेक निष्कर्ष काढण्याची स्पर्धा केवळ मुर्खपणा नसतो, तर घातकही असतो. अझहर मसूदच्या बातमीचे तेच झालेले आहे. कारण तशी बातमी पाक माध्यमातून दिली जात होती आणि भारतात त्याबद्दल जाणकारांच्या प्रतिक्रीया घेतल्या जात होत्या. मग भारताच्या दबावाखाली येऊन पाकिस्तानने जैशच्या म्होरक्याला अटक केल्याची पाठही थोपटून घेतली जात होती. पण तशी अटक झाल्याच्या वृत्ताला तेव्हा पाक वा भारत सरकारनेही दुजोरा दिलेला नव्हता. अटक किंवा स्थानबद्धता यातला फ़रक इथल्या उतावळ्या पत्रकारांना कळत नाहीच. पण कोणाला पोलिसांनी वा तपास यंत्रणांनी ताब्यात घेण्याला अटक म्हणत नाहीत. याचेही संपुर्ण अज्ञान त्यामुळे पुन्हा पुढे आले. अशीच अटक तोयबाचा म्होरक्या सईद हाफ़ीजला काही वर्षापुर्वी मुंबई हल्ल्यासाठी झाली होती. पण प्रत्यक्षात त्याच्या विरोधात कुठले आरोप दाखल झाले नाहीत, की भारताने पाकला पुरवलेले पुरावेही कोर्टात सादर करण्यात आले नाहीत. मग पुराव्याअभावी हाफ़ीजची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली होती. अर्थात अटकही एक नाटक होते. कारण हाफ़ीजला कुठल्या तुरूंगात ठेवलेले नव्हते, तर एका आलिशान बंगल्यात ठेवलेले होते. म्हणजे त्याला भारतीय हस्तकांकडून मारले जाऊ नये म्हणून केलेली त्याची सुरक्षाच इथल्या शहाण्यांना अटक वाटलेली होती. आताही त्यापेक्षा वेगळे काही झाले असेल, असे अजून मानता येत नाही. म्हणुनच पाक सरकारने त्याविषयी मौन धारण केले होते, तर भारत सरकारही त्याविषयी कुठली प्रतिक्रीया देत नव्हते. मग पाकिस्तानात चालले तरी काय आहे?

एक गोष्ट स्पष्ट आहे, की जुना काळ बदलला आहे. संसदेवरील हल्ला, मुंबईतला रक्तपात, कारगिल वा तत्सम अनेक हल्ले झाले, तेव्हाची स्थिती आज उरलेली नाही. तेव्हा पाकिस्तान जितका शिरजोर होता, तितकी आज त्याच्यात मस्ती राहिलेली नाही. भारतही पुर्वी जितका दुबळा व दबावाखाली होता तशी आजची स्थिती नाही. जगातली समिकरणेही आता खुप बदलून गेलेली आहेत. पाकिस्तानात तर नको इतके अराजक माजले आहे. त्यांनीच जन्माला घातलेले व पोसलेले जिहादी गट आज पाकिस्तानला जुमानत नाहीत. त्यातल्या काही गटांनी पाकच्याच विरोधात हिंसाचाराचे थैमान घातलेले आहे. धर्माच्या नावाने एकत्र येऊ शकेल, असा एकजीव मुस्लिम समाज आता पाकिस्तानात शिल्लक उरलेला नाही. पंथीय बेबनावाने पाकिस्तान गांजलेला आहे. त्यातच मुस्लिम देशातील धर्मबंधूताही विस्कटून गेली आहे. जगातल्या मुस्लिम देशांची व तिथे वसलेल्या मुस्लिम लोकसंख्येची शिया-सुन्नी अशी विभागणी झालेली आहे. त्याच्याही पलिकडली बाब म्हणजे पंधरावीस वर्षापुर्वी अवघे जग खनीज तेलासाठी जसे पश्चिम आशियातील मुस्लिम अरबी देशांवर विसंबून होते, तशीही अगतिकता आता शिल्लक उरलेली नाही. वेगळ्या तंत्रज्ञानाचा विकास करून आता अमेरिकेसारखे देश तेलाच्या बाबतीत स्वयंभू झालेले आहेत. अमेरिकेसारखा तेलाचा सर्वात मोठा ग्राहक गमावल्याने सौदी अरेबिया व अरबी तेलसंपन्न देशांचे अर्थकारण कोसळू लागले आहे. पण तिथल्या अर्थव्यवस्था मात्र तेलाच्या पैशावर विसंबलेल्या आहेत. त्यात कपात करणे शक्य नाही आणि तेलाच्या किंमती घसरत असताना अनुदानाची रक्कम जमवताना अरबी देशांच्या नाकी दम आलेला आहे. त्यातच जिहादी हिंसाचाराने अरबी प्रदेशाला भंडावून सोडले आहे. याचा एकत्रित परिणाम पाकिस्तानला भोगावा लागणे अपरिहार्य आहे. कारण पाकचेही अर्थकारण अरबी वा अन्य देशांच्या खिरापतीवर अवलंबून राहिलेले आहे.

खुद्द पाकिस्तान किती गडबडलेला आहे, ते समजून घ्यायचे असेल, तर काही महिन्यांपुर्वी भारताने म्यानमारमध्ये केलेली कारवाई आठवा. भारताच्या सैनिकांच्या तुकडीने थेट म्यानमारच्या हद्दीत घुसून तिथे दडलेल्या व आश्रय घेतलेल्या बंडखोर उल्फ़ा व अन्य अतिरेक्यांचा खात्मा केलेला होता. त्याचा बोलबाला होताच पहिली प्रतिक्रीया पाकिस्तानातून आलेली होती. म्यानमारमध्ये भारताने जो साहसवाद दाखवला, तो पाकिस्तानात चालणार नाही, असे बजावताना पाकिस्तानचे नेते व सेनाधिकारी आपल्याकडे अण्वस्त्रे असल्याची भाषा बोलू लागलेले होते. आमची अण्वस्त्रे म्हणजे फ़टाके नाहीत असे धमकावण्यापर्यंत त्यांनी मजल गेली होती. कुठलेही कारण नसताना पाकने अशा धमक्या देण्याची काय गरज होती? त्याचे कारण स्पष्ट होते, की व्याप्त काश्मिर वा अन्य पाक प्रदेशात् जिथे जिहादी छावण्या आहेत, तिथेही भारतीय सेना अशाच कारवाया करण्याच्या भयाने पाकला पछाडलेले होते. म्हणून एकीकडे अण्वस्त्रांची भाषा बोलताना दुसरीकडे पाक सरकार भारताशी शांतीवार्ता करण्याचा आग्रहही धरत होते. ही भयगंडाची लक्षणे होती. त्याचे कारण पाकिस्तान आता पुर्णपणे युद्ध छेडण्याच्या अवस्थेत राहिलेला नाही. खरेच युद्ध छेडले गेले तर एकजुट होऊन लढण्याइतकी पा्किस्तानची क्षमता राहिलेली नाही. म्हणूनच जिहादी मार्गाने भारताच्या कुरापती काढणे पाकला परवडते. पण युद्ध अंगावर घेणे पाकला शक्य नाही. त्याचे कारण गेल्या दोनतीन वर्षात हिंसाचार व दहशतवाद त्यांनाच भोवतो आहे. त्यात पुन्हा शिया-सुन्नी तंटा विकोपाला गेलेला आहे. मदतीला येऊ शकणार्‍या मुस्लिम देशातही काहुर माजलेले आहे. चीन मैत्रीची भाषा करीत असला तरी प्रत्यक्ष लढाईला तोंड लागले तर मैदानात उतरणार नाही. आजवर ज्या उचापती पाकिस्तानने केल्या आहेत, त्याची परतफ़ेड करण्याची वेळ आलेली आहे. तरीही त्याला तोंड देण्याची कुवत वा शक्ती त्याच्यापाशी उरलेली नाही. हे ओळखूनच भारताने गेल्या दिड वर्षात डावपेच खेळलेले आहेत. पाकिस्तानवर हल्ला करण्यापेक्षा त्याला आपल्याच पापांच्या दबावाखाली मेटाकुटीला आणायचे, असा साधा डाव भारत खेळतो आहे. 

अशा स्थितीत भारताला दुखावणे पाकिस्तानला परवडणारे नाही. हे जसे नवाज शरीफ़ यांना कळते, तसेच पाक सेनापतींनाही कळते. पण पाक हेरखाते व धर्मांध मानसिकतेच्या आहारी गेलेल्या त्यांच्या काही लोकांना ते उमजलेले नाही. आणि असे जे घटक पाकसेना वा हेरखात्यात आहेत, त्यांना आवरण्याची पाकनेत्यात धमक राहिलेली नाही. ही बाब लक्षात घेतली, तर पठाणकोटचा हल्ला कशामुळे होऊ शकला त्याचा अंदाज येऊ शकतो. त्याच्या मागे पाकसेना वा हेरखातेही पुर्ण शक्तीनिशी उभे नसावे. मग पाक सरकार असण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. कारण भारताची कुरापत अशावेळी काढणे पाकला परवडणारे नव्हते. तरीही व्हायचे ते होऊन गेले आहे. त्याची जबाबदारी म्हणूनच नेहमीप्रमाणे पाकने झटकून टाकलेली नाही. पाकची अगतिकता लक्षात घेऊन मोदी सरकारने पाकवर दबाव आणलेला आहे. पण तो दबाव पुर्वी इतकाच आहे. असेच इशारे याहीपुर्वीच्या भारतीय सत्ताधीशांनी दिलेले होते. पण तेव्हा पाक आजच्या इतका दुबाळा वा अगतिक नव्हता. म्हणूनच आज तेच इशारे दबाव बनले आहेत. परिस्थितीने नेहमीच्या सामान्य इशार्‍यांना दबाव बनवले आहे. कारण आज पाकिस्तान स्वत:च्याच पापांच्या ओझ्याखाली दबून गेलेला आहे. आर्थिक तंगी, अंतर्गत असुरक्षा, अराजक, मुस्लिम जगतातील बेबनाव आणि बदललेली जागतिक स्थिती; यांनी पाकला अगतिक करून टाकलेले आहे. अशावेळी भारताने थोडी आक्रमक भूमिका घेतली, तरी पोखरलेला पाकिस्तान कोसळून पडायला वेळ लागणार नाही, हे पाकला कळते. पण त्यांनी निर्माण केलेल्या भस्मासूरांना उमजत नाही, ही आजची पाकची खरी समस्या आहे. त्यातून पठाणकोटचा हला उदभवलेला आहे. मात्र त्याची किंमत मोजायची वेळ पाक राज्यकर्त्यांवर आलेली आहे. आपणच जमवलेल्या जिहादी सापळ्यात पाकिस्तान फ़सलेला आहे आणि मोदी सरकार त्याचाच पुरेपुर लाभ उठवत आहे. 

माजी लष्करशहा व सेनापती जनरल मुशर्रफ़ काय म्हणाले होते आठवते? ओसामा किंवा सईद हाफ़ीज आमचे हिरोच आहेत. मात्र आम्ही ज्यांना पोसले तेच आता आमच्यावर उलटले आहेत. त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. आपण ज्यांना घातपात शिकवले व भारताविरुद्ध चिथावण्या दिल्या, तेच आज पाकला गोत्यात आणत आहेत. गोत्यात याचा अर्थ काही गट पाक सेनेवरच हल्ले चढवत आहेत आणि काही गट पाकला नको असतानाही भारताच्या कुरापती काढत आहेत. पठाणकोटचा हल्ला भले भारताला त्रासदायक ठरला असेल. पण त्याहीपेक्षा तो पाकिस्तानला गोत्यात आणणारा ठरला आहे. त्यामुळे जगातून पाकवर कारवाई करण्याचे दडपण आलेले आहे. अमेरिकेने देऊ केलेली आधुनिक शस्त्रास्त्रे ठप्प झाली आहेत. अधिक शांतीवार्ता रोखण्याचे निमीत्त भारताला मिळाले आहे. त्यातून बाहेर पडायचे तर काहीतरी ठोस कृती केलेली दाखवण्याला पर्याय उरलेला नाही. पण तशी कारवाई करणे म्हणजे लाल मशीदीची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. लाल मशिदीच्या मदरश्यात तयार झालेले धर्मांध जिहादी तालिबान शेवटी मुशर्रफ़ना लष्कराच्या तुकड्या आणून मारावे लागले होते ना? अझहर मसुद वा सईद हाफ़ीजला उचलून त्यांच्या अनुयायांना चिथावणे पाकिस्तानला अंतर्गत धोका निर्माण करणारे आहे. कारण आजवरच्या डावपेचात नुसते माथेफ़िरू तरूण तयार झालेले नाहीत. त्यांच्याच सहवासात अखंड राहून हेरखाते व लष्कराचे अनेक अधिकारी जवानही जिहादी झालेले आहेत. त्यांनीच उचाल खाल्ली तर शरीफ़च नव्हेतर पाकसेनेचे अधिकारीही त्यांना आवर घालू शकणार नाहीत. गेल्या चारपाच दशकातल्या उचापतखोरीची परतफ़ेड करण्याची वेळ आलेली आहे. पण ती कशी करावी याचे उत्तर पाकिस्तानकडे आज उरलेले नाही. जगात पाकिस्तान आपली विश्वासार्हता संपवून बसला आहे. बुधवारीच अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी देशाला उद्देशून दिर्घ भाषण केले. त्यात त्यांनी पाकिस्तान हा जिहादी दहशतवादाचे नंदनवन होण्याचा धोका वर्तवला आहे. त्यातून पाकिस्तानची जगातली खरी ओळख होऊ शकते.

अमेरिकेला पाकिस्तान आपला मित्र मानतो. त्याच अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकची लायकी आपल्या भाषणातून जगाला सांगितली. त्याचा अर्थ इतकाच, की पाक आता जगभर विश्वासू देश राहिलेला नाही. त्यामुळेच भारताने आक्रमक पवित्रा घेतला, तर पाकला कोणी मित्र नाही. म्हणूनच आजवरचे जुने पवित्रे व डावपेच कालबाह्य झालेले आहेत. त्याच कारणास्तव नवाज शरीफ़ व पाक सरकार भारताशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या मैत्रीचा अर्थ युद्ध नको इतकाच आहे. ती बोलणी व्हावीत म्हणून तीन महिन्यांपुर्वी शरीफ़ यांनी आपला सुरक्षा सल्लागारही बदलला. त्यानंतर बोलण्यांना वेग आलेला आहे. त्यात पठाणकोटच्या हल्ल्याने पाचर मारली गेली आहे. ती बोलणी थांबू नयेत असे वाटत असेल, तर पाकला काहीतरी हालचाल करणे भाग होते. त्यातून मग मोठ्या प्रमाणावर धरपकड झालेली आहे. ती भारताला खुश करण्यासाठी आहे. पण अशा धरपकडीने पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना आपल्याच देशातील जिहादी गटांना दुखावणेही भाग पडलेले आहे. तिथेच न थांबता असा साहसवाद पुढे होऊ नये, याचीही पाकिस्तानला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण आता भारताला सतावण्याची स्थिती राहिलेली नसून पाकिस्तानचे अस्तित्व टिकवण्याला प्राधान्य देण्याची वेळ आलेली आहे. इंग्रजीमध्ये उंटाच्या पाठीवर काडी अशी उक्ती आहे. उंटावर खुप ओझे लादलेले असते. पण ते असह्य झालेले असताना त्याच्या पाठीवर नुसती काडी ठेवली तरी तो बसतो. काडीचे त्याला ओझे नसते. तर मुळच्याच ओझ्याने तो दबलेला असतो. काडी नुसते निमीत्त असते. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर भारताने वा मोदींनी कठोर शब्द वापरले, हे केवळ निमीत्त आहे. पाक आपल्याच ओझ्याखाली दबण्याच्या स्थितीत असल्याचे ओळखून मोदी सरकारने केलेली खेळी यशस्वी ठरली, इतकाच त्याचा अर्थ आहे. कारण अशा कारवाईची कटू फ़ळे भविष्यात पुन्हा पाकिस्तानलाच भोगावी लागणार आहेत. आज अटक केलेले जिहादी पाक नेत्यांना माफ़ करतील काय?

2 comments:

  1. मस्त भाऊ छानच अशा बातमी मुळे थोडा confidence येतो

    ReplyDelete
  2. He pakistanche velkadhu dhoranhi asu shakate

    ReplyDelete