Friday, January 29, 2016

नव्या वर्णवर्चस्वाच्या पाऊलखुणाआपल्या देशाला भेडसावणारे नेमके कोणते प्रश्न आहेत? कधीकधी हा विषय चिंतेत टाकतो. कारण एक आठवडाभर आधी अयोध्येतील मंदिरापेक्षा दुष्काळ वा असंहिष्णूता अधिक गंभीर विषय होता. तेव्हा मंदिराचा किंवा श्रद्धा पूजेचा विषय गैरलागू होता. अकस्मात मग शिंगणपुरातील शनिमंदिरात महिलांना भक्तीभावाने पूजा करण्याचा अधिकार हा राष्ट्रीय विषय होऊन गेला. तेव्हा कोणाला दुष्काळ वा शेतकर्‍यांच्या आत्महत्या आठवत नाहीत. अकस्मात कधीतरी असाच कुठला तरी विषय देशव्यापी होऊन जातो आणि काही दिवस उलटले, मग अडगळीत जाऊन पडतो. मागल्या दोनचार दिवसापासून कोणाला रोहित वेमुला़चे स्मरण झालेले नाही वा कोणाला पुरस्कार वापसीचेही स्मरण उरलेले नाही. तिथे पुण्यात फ़िल्म इंस्टीट्युटमध्ये काय चालले आहे, त्याची चिंता उरलेली नाही. मागल्या दोन वर्षापुर्वी देशातला सर्वात ज्वलंत प्रश्न गुजरातच्या दंगलपिडीतांना न्याय देण्याचा होता. आजकाल कोणाला त्यातले काहीच आठवत नाही. महिने आठवडे अशा गतीने देशाला भेडसावणारे प्रश्न बदलत जातात. दादरीत एका मुस्लिमाची जमावाने हत्या केल्यावर देशातले तमाम बुद्धीमंत आपापले पुरस्कार माघारी देण्यापर्यंत विचलीत होतात. पण मालदा पश्चीम बंगाममध्ये भीषण दंगल होऊन संपुर्ण पोलिस ठाणेच भस्मसात केले जाते, तेव्हा त्यांनाच साधी झळही लागत नाही. हे सर्व काय प्रकरण आहे, तेच समजत नाही. ही कुठली संवेदनशीलता आहे? गुलाम अलीच्या गायनाला मुंबईत विरोध झाला, मग उसळून येणारे रक्त पाकिस्तानात कुणी विराट कोहलीच्या गुणगानासाठी तुरूंगात जातो, तेव्हा कसे बर्फ़ासारखे थंड रहाते? या सर्वाच्या मागचे तर्क वा शास्त्रच लक्षात येत नाही. काल हे बुद्धीमंत ज्याला ज्वलंत प्रश्न म्हणतात, त्यालाच आज कालबाह्य ठरवू लागतात. सरड्यालाही इतक्या गतीने रंग बदलता येत नाही म्हणे.

अयोध्येत मंदिराचा विषय कोणी काढला, मग तो तातडीने बंद पाडला पाहिजे. कशाला, तर लोकांमध्ये दुही माजते आणि हिंसेची शक्यता निर्माण होते. पण शिंगणापूर येथे मंदिरात जाण्य़ाचा प्रयत्न केला तर तो अधिकार असतो. मग तसाच अधिकार अयोध्येत मंदिर बांधण्याची इच्छा बाळगणार्‍यांना कशाला नसतो? शिंगणापुरातील घुसखोरी अधिकाराची असेल, तर अयोध्येतही तशीच घुसखोरी कायदेशीर कशाला नसते? कोणी काय करावे किंवा करू नये, असा अधिकार राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे. पण तो वापरण्याला आधुनिक पुरोगामी पुरोहितांची मान्यता घ्यावी लागते. त्यांना बुद्धीमंत किंवा माध्यमे म्हणतात. म्हणूनच कुठलाही प्रश्न राष्ट्रव्यापी व जिव्हाळ्याचा आहे किंवा नाही, ते फ़क्त अशी माध्यमे ठरवू शकतात. ही आधुनिक जातीव्यवस्था किंवा वर्णवर्चस्व होऊन बसले आहे. पापपुण्याच्या कल्पना कुठल्याही श्रद्धा वा अंधश्रद्धेसाठी महत्वाचा घटक असतो. इथे आपल्याला असे दिसेल, की पुरोगामी असतात तेच पुण्यवंत बुद्धीमंत असतात आणि त्यांच्या शब्दाबाहेर जाणार्‍याला धर्मबाह्य वा बहिष्कृत केले जात असते. म्हणून मग अविष्कार स्वातंत्र्याच्या नावे सदोदित गळे काढणारेच, अशा समारंभात अनुपम खेरची खिल्ली उडवत असतात. कारण खेर मोदींचा समर्थक चहाता असतो. थोडक्यात मोदी, भाजपा, शिवसेना वा संघाला अस्पृष्य़ मानण्याची आधुनिक पुरोहितांची सक्ती असते. त्यातून कुणालाही सवलत मिळू शकत नाही. अगदी कितीही पक्का पुरोगामी असला तरी त्याला ह्या बेडीतून मुक्ती नाही. पुरस्कार वापसीच्या नाटकाला सुरूवात करणार्‍या उदय प्रकाश यांनाही त्यातून जावे लागलेच. दोन दशकांपुर्वी जाणते पुरोगामी विचारवंत डॉ. य. दि. फ़डके यांनीच त्याची ग्वाही दिलेली होती. जातीयवाद वा वर्णवर्चस्व आपल्या समाजात कुठून कसे आले, त्याचा हा दांडगा पुरावा आहे.

शिवसेना भाजपा युतीची सत्ता १९९५ सालात आलेली होती. तेव्हा महाराष्ट्र सरकारने प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. य. दि. फ़डके हे दिर्घकाळ प्रबोधनकारांचे निकटवर्तिय होते. सहाजिकच त्यांनी त्याकामी सरकारला सहाय्य केले. त्या समग्र साहित्याच्या प्रकाशन सोहळ्याला बाळासाहेब ठाकरे यांच्यासह फ़डके उपस्थित होते. आता पुरोगामी वर्णव्यवस्थेत ठाकरे हे बहिष्कृत असतात, त्यामुळे पुरोगामी गोतावळ्यातल्या फ़डक्यांना तिथे हजेरी लावण्यास प्रतिबंध होता. पण कामच आपण केले असल्याने फ़डक्यांना समारंभाला हजेरी लावणे अपरिहार्य होते. आपण कोणते ‘पाप’ करतोय, याची त्यांनाही पक्की जाणिव होती. म्हणूनच त्यांनी तेव्हा तिथेच जाहिरपणे आपल्यावर होऊ शकणार्‍या आरोपांची आधीच वाच्यता करून टाकली. त्या समारंभात बोलताना फ़डके म्हणाले, ‘अनेकांच्या भुवया आता ताणल्या जातील आणि काही लोक म्हणतील, हा कसा गेला तिथे?’ त्यांचा संकेत अर्थातच पुरोगाम्यांकडे होता. संपुर्ण आयुष्य पुरोगामी विचार मांडण्यात आणि त्याचे विश्लेषण करण्यात गेलेल्या तपस्वी विचारवंत फ़डके यांना जर अशी भिती दोन दशकापुर्वी सतावत असेल, तर हा आधुनिक वर्णवर्चस्ववाद किती भिनलेला व बोकाळलेला असेल याची कल्पना येऊ शकते. शिवसेनाप्रमुखाच्या सहवासात बसणे-उठणे वा त्यांच्या समारंभात सहभागी होणे म्हणजे पुरोगामी संप्रदायातले पापकर्मच! फ़डके यांनी त्याची दिलेली कबुली लक्षात घेतली, तर आजच्या भारतीय समाजाला कुठली समस्या भेडसावते आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. जोवर अण्णा हजारे मोदी विरोधात बोलतील, तोवरच ते पवित्र पुण्यवंत असू शकतात आणि चुकून मोदींविषयी कौतुकचे शब्द उच्चारले, मग पाप होत असते. शिंगणापुरातील गाव समिती किंवा कुठलीही खाप पंचायत यापेक्षा कितीशी वेगळी वागत असते?

थोडक्यात आजकाल पुरोगामी लोकांनी आपल्या विचारसरणीची खाप पंचायत करून टाकलेली आहे. तिला कुठल्याही विचार वा भूमिकेला आधार राहिलेला नाही. एक रुढी परंपरा होऊन बसली आहे. शेकडो हजारो वर्षे दलितांना स्पर्ष करणे गुन्हा ठरवला गेला, तसा आजच्या पुरोगामी धर्ममार्तंडांनी नव्या अस्पृष्यतेचा खाक्या तयार केलेला आहे. त्याला कुठल्या तर्काचा वा विवेकाचा आधार शिल्लक राहिलेला नाही. आपण सांगू तेच वेद आणि आम्ही कथन करी तोच त्याचा अर्थ; अशाच थाटात तमाम पुरोगामी बोलत व वागताना दिसतील. मग एका गावातल्या किरकोळ निदर्शनांना राष्ट्रव्यापी आंदोलनाचा चेहरा दिला जातो आणि लाखो लोक जमले तरी त्याची कोणी माध्यमे दखलही घेत नाहीत. मालद्यातील दंगलीचा मागमूस माध्यमात दिसणार नाही आणि दादरीतील घटनेचा राष्ट्रव्यापी आक्रोश सुरू होतो. कारण स्पष्ट व समोर आहे. माध्यमे ही आता देशातील धर्ममार्तंड असल्याचा तो दारूण अनुभव आहे. कुठल्याही जुन्या धर्माचे पुरोहित वा धर्ममार्तंड कालबाह्य झाले असून नव्या जगात माध्यमातले संपादक वा बुद्धीमंत असलेले पुरोगामी आधुनिक धर्ममार्तंड झालेले आहेत. ते फ़तवे काढतात आणि बाकीच्यांनी त्यानुसार वागावे, असा अट्टाहास असतो. जो त्याच्या आज्ञेबाहेर जाईल, त्याला बहिष्कृत केले जाईल अशी दहशत आहे. म्हणूनच कधी अयोध्येतील मंदिर नगण्य असते आणि कधी शनि शिंगणापुरचे मंदिर देशातले सर्वात मोठे देवस्थान होऊन जाते. कुठलाही धर्म वा पंथ अस्तित्वात आला, मग तो नेहमी सामान्य समाजाला ओलीस ठेवत असतो. पुरोगामी चळवळी आता त्यापेक्षा काय वेगळे करीत आहेत? धर्माच्या पावित्र्यापुढे जीवनमरणाचे प्रश्नही दुय्यम असतात. तसे नसते तर मागले तीनचार दिवस शिंगणापूर इतके कशाला गाजले असते? महागाई, आत्महत्या, दुष्काळ कुठल्या कुठे कशाला फ़ेकले विसरले गेले असते?

=======================

२६ जानेवारी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनापासून माझ्या नव्या (वेबसाईट) संकेतस्थळाचा आरंभ झाला आहे. क्रमाक्रमाने ब्लॉगपासून इथेच सर्व लेख आणले जातील व पुढले सर्व लेख इथेच बघायला मिळतील. मित्रांनी शक्यतो इमेलद्वारे सदस्यत्व स्विकारले तर थेट नव्या लेखाचा दुवा आपोआप मिळू शकेल. मला इमेल पत्ता देऊ नये, तर वेबसाईटवर तशी सुविधा असल्याने स्वत:च नोंदणी करावी. किंवा फ़ेसबुकवरून नियमित दुवा दिला जाईलच. नव्या जगात सर्वांचे स्वागत!
-भाऊ तोरसेकर

http://bhautorsekar.in/

6 comments:

 1. नवीन संकल्पना
  पुरोगामी पुरोहित,
  पुरोगामी संप्रदायातले पापकर्म
  आधुनिक वर्णवर्चस्ववाद

  ReplyDelete
 2. भाऊ ........चांगला लेख............स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्ट लोक ...' साहित्य / दूरदर्शन / रेडीओ / दैनिक वर्तमानपत्र / कला ... या ठिकाणी पेरले गेले आणि त्या लोकांची / बांडगुळांची दुसरी पिढी आता या सर्व ठिकाणी विखुरलेली आहे. खान्ग्रेस नावाची एक प्रचंड ' व्यवस्था ' स्वातंत्रयोत्तर काळात निर्माण झाली आणि ' खान्ग्रेस ' ने अशा सर्व लोकांचा वेळोवेळी ' रमणा ' भरवून आणि या लोकांना ' पुरस्कार / पैसा ' वाटून या सर्वाना आपल्या कह्यात घेतले आहे. त्यामुळे खान्ग्रेसी संगीतकारांच्या तालावर हि मंडळी सांगतील त्या दिशेला ' माना ' डोलावतात व चेनेल वर ' चिल्लम चिल्ली ' करतात. या विखुरलेल्या लोकांना टिपून काढून ( हे खूप अवघड काम आहे ) ' हाकलून ' दिल्याशिवाय ' चांगले ' काही घडेल असे वाटत नाही. नवीन पिढी ' टी व्ही ' वरील बातम्या बघत नाही व त्यांची स्वतःची अशी विशिष्ट मते आहेत. त्यांच्याकडूनच हि खान्ग्रेसी व्यवस्था हळू हळू अस्तास जाईल अशी अशा वाटते.

  ReplyDelete
 3. षटकर्मनिपुणो विप्रो मन्त्रतन्त्रविशारदः ।
  अवैष्णवो गुरुर्न स्याद् वैष्णवः श्वपचो गुरूः ॥

  ReplyDelete
 4. अप्रतिम पृथ:कारण. ज्या विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुखांना शैक्षणिक गुणवत्ता हवी असेल. तिला त्यांचा अगदीच विरोध नसेत त्यांनी असे वेचे आपल्या पत्रकारितेच्या अभ्यास क्रमात घेतले पाहिजेत. म्हणजे निदान पुढची पिढी तरी जर कमी कावीळग्रस्त निपजेल.

  ReplyDelete
 5. काश्मिरात हजरत बाल आहे ही मुसलमानांची श्रध्दा आहे....
  आकाशातला देव येशूचा पिता आहे आणि मेरी कुमारी असली तरी येशूची माता होती ही ख्रिश्चनांची श्रध्दा आहे.
  खूप बौध्द लोक्स आंबेडकरांना देव मानतात आणि भारतीय राज्य घटना त्यांनी एकट्यानेच लिहिली आहे अशी त्यांची श्रध्दा आहे....
  .
  मग शनी बाल ब्रम्हचारी आहे ही देखील हिंदूची श्रध्दा आहे.
  शिंगणापूर शनी मंदिरातल्या कडक नियमा प्रमाणे आंघोळी नंतर कोणतीही एकवस्त्रा ओलेती स्त्री चार चौघात उघडपणे तिथे जाणार आहे का ?
  .
  तसंही ते मंदीर आख्यायिकेवर म्हणजे तथाकथित बुध्दीवाद्यांच्या मते अंधश्रध्देवर आधारित आहे मग श्रध्दा आणि धर्म मान्य नसलेल्यांनी तिथे जावंच कशाला ? सगळेच धार्मिक विधी पाळायचे नसतील तर धर्मच सोडा ना....
  मुद्दाम केलेला सगळा हलकट पणा आहे आणि आपल्याला मूळ कारण माहित नसल्याने आपणही गप्प बसतो.

  ReplyDelete
 6. You save mt all typing troubles. You write precisely what I feel.

  ReplyDelete